Thursday, August 30, 2018

क्रांती चिरायू होवो!



सव्वा दोन वर्षापुर्वी मुलीच्या आग्रहाखातर आम्ही सिक्कीमचा दौरा करायला गेलेले होतो. त्यासाठी बंगालच्या उत्तरेस सिलीगुडी जिल्ह्यातील बागडोगरा विमानतळापर्यंतच हवाई प्रवास शक्य असतो. पुढे तिथून गंगटोक सिक्कीमपर्यंत भूमार्गाने गाडीने प्रवास करावा लागतो. त्यासाठी खाजगी टॅक्सी व बसेस आहेत. अशाच एका टॅक्सीवाल्याने आम्हाला गंगटोकला नेले आणि त्याच्याशी गप्पा मारताना आम्हाला बागडोगरा विमानतळापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर नक्षलबाडी असल्याचे कळले. पुढे त्याच्याशी दोस्ती झालेली असल्याने त्यानेच पुन्हा बागडोगराला आणायचे मान्य केले होते. सिक्कीम उरकून माघारी आलो, तेव्हा विमानाच्या उड्डाणाला चार तास बाकी होते. म्हणून त्याला म्हटले थोडे पैसे जास्त घे, पण आम्हाला झटपट नक्षलबाडीला नेवून आण. त्याने मान्य केले आणि नक्षलबाडीला पोहोचलो, तर कुठेही कम्युनिस्टांचा लालबावटा नव्हता, की कुठली माओवादाची खुण नव्हती. ड्रायव्हरला मात्र आमच्या नक्षलबाडी आग्रहाने चकीत केले होते. कारण कोणीही प्रवासी पर्यटक तिकडे फ़िरकत नाहीत. तेव्हा त्याला पाच दशके जुन्या कहाण्य़ा सांगून चारू मुजूमदार, कनु सन्याल, जंगल संथाळ यांचे स्मारक बघायचे असल्याचे समजावले. तर तो हसू लागला. कारण असे कुठले स्मारक नाही. पण एका आडोशाला रस्त्यालगत काही पुतळे असल्याचे त्याने सांगितले. आम्ही उत्साहीत झालो, तर तोही हसू लागला. नक्षलबाडीचा बाजार व गर्दी तुडवित त्याने कशीबशी गाडी गावाबाहेर काढली आणि रेल्वेरुळांच्या समांतर नेवून आम्हाला एका ओसाड जागी स्मारक दाखवले. त्याचा फ़ोटो इथे मुद्दाम टाकला आहे. एक उंच पाईपचा ध्वजस्तंभ आणि सात ओबडधोबड अर्धपुतळे तिथे उघड्यावर रिमझिमणार्‍या पावसात उभे होते. बाकी आसपास कोणी नव्हते आणि मागल्या बाजूला शेताडी पसरलेली होती. कालपरवा काही लोकांची नक्षली म्हणून धरपकड झाल्यावर तो क्षण आठवला.

काही मिनीटे तिथे थांबलो होतो. फ़ोटोही काढले आणि माघारी विमानतळावर येताना ड्रायव्हरने नक्षलबाडीची सध्यस्थिती कथन केली. आता तिथे कोणी कम्युनिस्ट उरलेला नाही की चळवळ वगैरे शिल्लक राहिलेली नाही. कित्येक वर्षापासून तिथे कॉग्रेसचा आमदार निवडून येतो आणि आता त्याचा प्रतिस्पर्धी तृणमूल कॉग्रेसवाला आहे. बाकी लालबावट्याचे काही नामोनिशाण शिल्लक नाही. पत्रकारितेच्या उमेदवारीच्या काळात कधीतरी कॉम्रेड चारू मुजूमदार यांच्या निधनाची बातमी लिहीलेली होती. १९७० च्या दशकात ही आरंभीची नक्षलवादी मंडळी भूमिगत गनिमी युद्ध लढवत होती आणि त्यातला कॉम्रेड चारू मुजूमदार दुबळ्या प्रकृतीचा होता. हृदयविकार हा त्याला जडलेला आजार असल्याचे त्या बातमीत म्हटलेले होते. अखेरीस तो पकडला गेला आणि काही दिवसातच त्याचा पोलिस कस्टडीत मृत्यू झाला. त्याचीच ती बातमी होती. देशात सशस्त्र क्रांती करण्यासाठी त्याने हत्यार उपसलेले होते आणि भारतीय संविधान झुगारून लालक्रांतीशी बांधिलकी मानणार्‍यांनी त्याला साथ दिली होती. त्यातून वर्गशत्रूंचा नायनाट करण्याचा निर्धार केलेल्या या सहकार्‍यांनी नक्षलबाडीत जमिनदारांचे हत्याकांड करून आपल्या क्रांतीला आरंभ केला होता. तिथून मग ह्या रक्तरंजित इतिहासाला सुरूवात झाली. त्या हत्याकांडाने देश हादरून गेला होता आणि त्या गावाच्या नावावरून त्या हिंसक चळवळीला नक्षलवादी असे नाव मिळाले. त्या हत्याकांडाचा शोध पोलिस यंत्रणा घेत असताना अनेक जागी तशी हिंसा सुरू झाली आणि चारूचे सहकारी ज्या प्रदेशातले होते, तिथे तशा हिंसक घटनांची पुनरावृत्ती सुरू झाली. आरंभी क्रांतीकारकांची समिती असे नाव असलेल्या त्या संघटनेला पुढे माओवादी लेनिनवादी अशी अनेक उपनावे जोडली गेली. पण जिथून त्याची सुरूवात झाली तिथे आज त्याचे नामोनिशाण उरलेले नाही.

पण हा विषय फ़क्त नावापुरताही नाही. त्या क्रांतीसाठी चारू मुजूमदार व अनेकजणांनी आपल्या सुखवस्तु जीवनावर लाथ मारून त्यात उडी घेतलेली होती. कुठल्याही क्षणी पोलिस वा सेनादलाच्या गोळीचे बळी व्हावे लागेल, ते मान्य करून त्यांनी हा मार्ग चोखाळला होता. जमिनदार वा मध्यमवर्गिय सुखासिन जीवनाचा त्याग करून ते लढ्यात उतरले होते आणि त्यांचे इतर सहकारीही तितकेच जीवावर उदार झालेले होते. त्या काळात आजच्या सारखे मानवाधिकार नावाचे हत्यार त्यांना उपलब्ध झालेले नव्हते. म्हणूनच लौकरच त्या सशस्त्र लढ्याला इंदिरा सरकारने चिरडून काढले. चकमकी वा दिसेल तिथे गोळ्या घालण्याच्या मोहिमेतून काही वर्षातच नक्षली चळवळ नेस्तनाबुत झाली. पण संपलेली नव्हती, सुप्तावस्थेत गेलेली होती. कोवळ्या किशोर वयात नव्या जाणिवा जग झुगारून देण्याला प्रवृत्त करीत असतात. त्याच जाणिवा जग उलथून पाडण्याची चिथावणीही देत असतात. अशा वयातील मुलांसाठी मग चारू मुजूमदार व नक्षली क्रांती कायम भुरळ घालणारी परिकथा बनून गेली तर नवल नव्हते. त्या स्वप्नांनी भारावलेल्या अनेकांनी पुढल्या काळात आपली रणनिती बदलली आणि देश व व्यवस्था उलथून पाडण्यासाठी नवनवे मार्ग चोखाळले. त्यात मानवाधिकार सुविधा, हे हत्यार बनवले गेले. कायद्याचे आडोसे घेऊन गनिमी युद्धाची एक नवी फ़ळी उभारण्यात आली. ‘काही तरी तुफ़ानी करू या’ अशा वयात येण्याच्या कालखंडातील उर्मींना खतपाणी घालून इच्छुकांना साहसी संधी उपलब्ध करून देण्याची मोहिम उभारली गेली. त्याच वेळी विविध राज्यातले आदिवासी, खेडूत, पिडीत, वंचित यांनाही न्यायासाठी सशस्त्र लढ्याने आमिष दाखवले गेले. हळुहळू त्याला परदेशी मदतही मिळू लागली आणि सत्तेसाठी लाचार असलेल्यांकडून सरकारी अनुदानाचे पैसेही अशा मोहिमांसाठी वळवण्याची योजना यशस्वी होत गेली.

Image may contain: basketball court

१९६७ सालात वंचित, पिडीत व सर्वहारा वर्गाची असलेली ही चळवळ पन्नास वर्षात आता अनेक गटात विभागली गेलेली आहे. त्यापैकी एक भाग हातात हत्यार घेऊन बळी जायला सज्ज असलेला गरीब घरातल्या तरूण मुली महिला यांचा आहे. दुसरा गट कम्युनिस्ट तत्वज्ञानाने भारावलेला सुशिक्षित बुद्धीवादी वर्ग आहे. तिसरा गट आपापले राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अशा चळवळी व त्यांच्या हिंसक कुवतीचा कौशल्याने वापर करून घेणारा आहे. त्याच्याही पलिकडे चौथा गट अशा मार्गाने भारतीय संस्था व प्रशासन व्यवस्थेला सुरूंग लावण्यासाठी परदेशी शक्तींना मदत करणारा मतलबी वर्ग आहे. जीवावर उदार होऊन क्रांतीसाठी मरणारी फ़ौज त्यांची खरी ताकद किंवा कच्चा माल आहे. त्याच बळावर असे इतर गट आपली राजकीय सौदेबाजी करीत असतात. भूमिगत राहून गनिमी युद्ध करताना खर्‍या लढवय्यांना आपल्या मुठीत ठेवण्याचे मोठे काम जे संभाळू शकतात, त्यांच्या मदतीने शहरात व उच्चभ्रू वर्तुळात मिरवणारे अनेक फ़ॅशनेबल क्रांतीकारक आता नक्षल समर्थक झालेले आहेत. कारण आता तो एक किफ़ायतशीर धंदा झालेला आहे. कालपरवा ज्यांची धरपकड झाली ते असे सुखव्स्तु नक्षलवादी आहेत. गनिमी युद्धात फ़सलेले व भूमिगत जीवन कंठणार्‍यांचे ‘मदारी’ म्हणून ते वाडगा फ़िरवून कमाई करीत असतात. गोळ्या झेलून मरणार्‍यांच्या मानवी हक्कांसाठी लढण्याचे नाटक रंगवून हे लोक, शहरात चैनमौजेचे सुखवस्तु जीवन कंठत असतात. शेकड्यांनी नक्षली आजवर मारले गेलेले आहेत. पण त्यांच्या मृत्यूसाठी कधी इतका गदारोळ हलकल्लोळ माजवला गेला नाही. पण त्यांच्या जीवावर मौजमजा करणार्‍यांना धक्का लागण्याची चिन्हे दिसताच किती आकांत मांडला गेला आहे ना? कॉम्रेड चारू मुजूमदारच्या भाषेत अशा क्रांतीकारकांना बुर्ज्वा म्हटले आहे. पण चर्चा गदारोळ असा चाललाय, की कोणी जीवावर उदार झालेले सामान्य नक्षलीच सुळावर चढायला निघालेले आहेत.

क्रांती चिरायू होवो! कॉम्रेड चारू मुजूमदार लाल सलाम! चेअरमन माओ लाल सलाम!

2 comments:

  1. भाउ तुमच हे परखड कटु सत्य अगावर काटा आणणार आहे हा लेख खरतर प्रत्येक भारतीयान वाचायला हवा तुम्ही काही करुन हे राष्ट्रीय पातळीवर न्या जे नेउ शकतील त्यांची मदत घ्या

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete