Monday, August 27, 2018

उत्तरप्रदेशची तुट बंगाल भरणार?

kureel on mamta के लिए इमेज परिणाम

बंगलोर येथे कुमारस्वामी यांच्या शपथविधीला हात उंचावून दोन डझन विरोधी पक्षांचे नेते उभे रहाताच अनेकांना उकळ्या फ़ुटलेल्ल्या होत्या. आता ३१ टक्के मतांवर भाजपा किंवा मोदी पुन्हा देशाची सत्ता मिळवू शकत नाहीत, याविषयी त्यांच्या मनात शंकाही उरलेली नव्हती. नशिब त्यांच्या हाती नव्हते आणि भारतीय राज्यघटनेने मोकळीक दिलेली नाही. अन्यथा अशा उतावळ्यांनी राहुल गांधी वा तत्सम कोणाचा पंतप्रधान म्हणून शपथविधीही उरकून घेतला असता. अर्थात मनातले मांडे खायचे असले तर कोरडेच खाण्याचा दळाभद्रीपणा कशाला करायचा? चांगले तुप लावून खरपूस भाजून खायला कोणाची हरकत नसते. कारण त्यात मांडे बनवावे लागत नाहीत, की तुपाचाही खर्च होणार नसतो. सहाजिकच विरोधी एकजुटीचा विजय अपरिहार्य असल्याच्या भ्रमाने भाजपाचे काहीही वाकडे होण्याची भिती अमित शहा वा मोदींना वाटण्याचे काही कारण नाही. मात्र अशा एकजुट वा मतविभागणी टाळण्याचे प्रयास काही तुट निर्माण करू शकतात, याची त्यांनाही जाणिव आहे. म्हणून तर अमित शहा बंगालमध्ये २२ जागा जिंकण्याची भाषा बोलत आहेत. त्याची टिंगल होणे स्वाभाविक आहे. कारण बंगालमध्ये आता कुठे भाजपाने आपले पाय रोवायला आरंभ केला आहे आणि ममतांनी त्याला चांगला हातभारही लावला आहे. त्यात काही तथ्य नसते तर अकस्मात बंगालमध्ये हिंदू सण सार्वत्रिक साजरे करण्याची नवी स्पर्धा डावे पक्ष व तृणमूल कॉग्रेसमध्ये कशाला जुंपली असती? आता हे दोन्ही पक्ष वाजतगाजत रक्षाबंधनाचे उत्सव साजरे करणार आहेत. कारण भाजपाच्या काही संघटना जन्माष्टमी जोरात साजरा करणार आहेत. हा हिंदू धार्मिक ज्वर बंगालमध्ये प्रथमच दिसू लागला आहे. किंबहूना त्याचे कारणच अमित शहांची भाषा आहे. भाजपाला तिथे अधिक जागा स्वबळावर मिळण्याच्या भितीनेच पुरोगामी पक्षांना हिंदूधर्मियांचा उमाळा आला आहे. त्याचा विरोधी एकजुटीशी संबंध काय?

गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत भाजपाने अतिशय योजनाबद्ध रितीने एक एक मताची जुळणी करून उत्तरप्रदेशात अभूतपुर्व यश मिळवले होते. त्यानंतर विरोधकांना आपल्या मतविभाजनाचा लाभ भाजपाला मिळत असल्याचा साक्षात्कार झाला. ऐंशी टक्के जागा मिळवताना भाजपाने आपल्या मतांची टक्केवारी चाळीसच्या जवळपास नेवून ठेवली आहे. त्याला धक्का द्यायचा तर अखिलेशचा समाजवादी व मायावतींचा बसपा एकत्र यायला हवेत. पण त्यांची बेरीजही भाजपाला तुक्यबळ नाही. म्हणून त्यात अजितसिंग यांचे लोकदल आणि कॉग्रेसलाही समाविष्ट व्हावे लागेल. ते जितके शक्य असेल तितकेच भाजपाला धक्का देणे शक्य आहे. पण त्यांचे एकत्र येणे आव्हानात्मक नसले तरी भाजपाला लोकसभेच्या ८० पैकी ७१ जागा एकहाती जिंकणेही सोपे नाही. सहाजिकच कितीही जमेची बाजू असली, तरी ७१ पैकी किमान दहावीस जागा भाजपाच्या तिथे घटणार, हे अमित शहांचे गृहीत आहे. सहाजिकच तो घाटा अन्य राज्यातून भरून काढण्याला पर्याय नाही. त्यासाठीच शहांनी पक्षाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यापासून अनेक राज्यात भाजपाचा नव्याने विस्तार व पाया घालण्याचे काम हाती घेतले होते. म्हणूनच मागल्या दोन वर्षात पारंपारिक विरोधकांना सोडून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जी नगण्य वाटणार्‍या भाजपाच्या मागे हात धुवून लागल्या आहेत. देशाच्या कानाकोपर्‍यात कुठेही भाजपा विरोधात खुट्ट वाजले, तरी ममता तिथे धाव घेऊन जातात. त्यामुळे त्यांना पंतप्रधान पदाचे वेध लागलेत असा अनेकांचा समज झालेला आहे. पण वस्तुस्थिती तशी अजिबात नाही. ममतांना आपलाच बालेकिल्ला बंगालमध्ये आपल्यापेक्षा मोदींची लोकप्रियता वाढत असल्याच्या भयाने पछाडलेले आहे. म्हणून त्या बंगालबाहेरही मोदींवर टिका करण्यासाठी सवड काढून धावत असतात. ती दिल्लीत जाण्यासाठी नव्हेतर बंगालमध्ये टिकण्याची कसरत आहे.

वास्तविक असे अनेक प्रश्न व समस्या आहेत, की ज्यामुळे ममतांना डाव्यांचा बालेकिल्ला उध्वस्त करून बंगालची सत्ता पादाक्रांत करण्यात यश आले. त्याचे कारण तिथे बांगलादेशी घुसखोर व मुस्लिम दहशतवाद लोकांना भेडसावत होता. त्याकडे मतपेढी म्हणून डावे किंवा कॉग्रेस ढुंकून बघायला राजी नव्हते आणि ममतांनी तेच मुद्दे उचलून धरले. मग त्यांना अबोल मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत गेला. पण सत्तासुत्रे हाती आल्यावर त्यांनी त्या समस्यांना हात घातला नाही. कारण डाव्या पक्षांना ज्या दहशतीचा व घुसखोरीचा लाभ मिळत होता, तो देणार्‍या प्रवृत्ती आश्रयासाठी ममतांच्या वळचणीला आल्या. त्यांना मतदान करणार्‍यांचा पुरता भ्रमनिरास झाला. पण विरोधी पक्ष म्हणून कॉग्रेस किंवा डावे त्या हिंदू बहुसंख्यांकांचे दुखणे मान्य करून लढायला राजी नव्हते. सहाजिकच ममतांनी ज्यांना वार्‍यावर सोडून दिले होते, ते मतदार भाजपाकडे आशेने बघू लागले. केवळ ते मतदारच नव्हेतर आज तृणमूल वा कॉग्रेस व डाव्या पक्षात असलेले अनेकजण तसे आहे़त. त्यांना कुठल्यातरी केंद्रीय वा राजकीय पक्षाचा आधार या दहशतवादाच्या विरोधात हवा आहे. अमित शहा व भाजपा यांनी त्याच मतदाराची मशागत करायचे काम हाती घेतले आणि बघता बघता भाजपाची शक्ती बंगालमध्ये वाढलेली आहे. ते ओळखलेल्या ममतांनी संघर्षाचा पवित्रा घेऊन हिंदूंना भयभीत करण्यासाठी आक्रमक मुस्लिम नेत्यांपेक्षा हिंदूंवरच्या अन्यायाला रोखण्यासाठी सत्ता वापरली असती, तरी भाजपाला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नसता. पण तसे केल्यास मतपेढीचे मॅनेजर असलेल्या काही मुल्लामौलवींचा रोष पत्करावा लागला असता. तिथेच ममता अडखळल्या आणि आज भाजपाने तळागाळापर्यंत मुसंडी मारलेली आहे. ती वरकरणी नजरेत भरणार नाही. पण मतदानाचे निकाल लागतील, तेव्हा बंगालचा त्रिपुरा झालेला दिसेल. ह्याला उत्तरप्रदेशची तुट भरून काढणे म्हणता येईल.

२००९ सालात असाच चमत्कार तृणमूलने घडवला होता आणि कॉग्रेसला सोबत घेऊन लढताना डाव्यांना पाणी पाजले होते. दोन वर्षांनी विधानसभेत तर डाव्यांचे मुख्यमंत्री भट्टाचार्यांचाही पराभव झाला होता. पण तो होईपर्यंत कोणाला डाव्यांचा बालेकिल्ला डळमळला असल्याचा थांगपत्ता लागलेला नव्हता. नेमक्या त्याच स्थितीत आज बंगालचा भाजपा आहे आणि म्हणून अमित शहा ४२ पैकी २२ जागा जिंकण्याची भाषा बोलत आहेत. किंबहूना त्यात किती तथ्य आहे, त्याची प्रचिती ममतांच्या वागण्या बोलण्यातूनच येत असते. ती अस्वस्थता मोदी सरकारविषयीची नसून बंगाल हातून निसटण्याची चिंता आहे. म्हणून मग हिंदूंना चुचकारणे व मुस्लिमांनाही लालूच दाखवणे, अशी दोन टोकाची कसरत ममतांना करावी लागते आहे. आजही विधानसभेत डावे आणि कॉग्रेस मोठे पक्ष असताना त्यापेक्षाही नगण्य असलेल्या भाजपाच्या विरोधात ममतांनी म्हणून सगळी शक्ती झोकून दिलेली आहे. यातला आणखी एक पैलू असा आहे, की तृणमूलचे अनेक दुय्यम व कनिष्ठ नेतेही ममतांना कंटाळले असून भाजपाच्या वहात्या गंगेत उडी घ्यायला सज्ज बसलेले आहेत. सत्तांतराची नुसती चाहूल लागली तरी ममतांचा पक्ष उत्तरप्रदेशातल्या सपा बसपासारखा बारगळत जाण्याची शक्यता ममतांना भेडसावू लागली आहे. त्यांना दिल्लीतील मोदी सरकार पराभूत करण्यापेक्षा आपले बंगालचे राज्य टिकावण्याची चिंता लागलेली आहे. उलट मोदी-शहा उत्तरप्रदेश वा इतर उत्तर भारतीय राज्यातून भाजपाला येणारी २०-३० जागांची तुट बंगाल-ओडिशा अशा नव्या राज्यातून भरून काढण्यासाठी कामाला लागलेले आहेत. मतविभागणी शक्य नसल्याने आणखी एकदोन राज्यात नव्या ३०-४० जागा वाढवून आपले एकपक्षीय बहूमत टिकवण्याचे हे नियोजन शहांनी चार वर्षापुर्वीच सुरू केलेले आहे. पण हात उंचावून अभिवादनात गुंतलेल्यांना त्याचे भान कुठे आहे?

4 comments:

  1. ' त्या बंगालबाहेरही मोदींवर टिका करण्यासाठी सवड काढून धावत असतात. ती दिल्लीत जाण्यासाठी नव्हेतर बंगालमध्ये टिकण्याची कसरत आहे '.

    नेमक्या शब्दात असलीयत मांडलीत... 👍👌

    ReplyDelete
  2. पण एकुणात २०१९ भाजप ला सहज सोपे नाही हे तितकेच खरे

    ReplyDelete
  3. waaa....Khup chhan vatale vachun
    http://www.universityofpune.com/unipune-syllabus/

    ReplyDelete
  4. भाऊ the ग्रेट अचूक विश्लेषण...भाऊ कशाला एवढे गुपित सांगताय वो....भाजपद्वेषी जागे होतील की����

    ReplyDelete