Monday, August 20, 2018

कपील, सुनील आणि सिद्धू ‘पाजी’

Image result for grover kapil sharma sidhu

पाकिस्तानात नव्या पंतप्रधानांनी शपथ घेतली आहे आणि त्याविषयी अनेक उलतसुलट बातम्या आल्या व येत आहेत. पण या निमीत्ताने भारताचा अनधिकृत प्रतिनिधी म्हणून पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू पोहोचले होते. अर्थातच नवे पंतप्रधान माजी क्रिकेटपटू इमरान खान यांनी सिद्धूला आमंत्रण दिले होते. पण ते आमंत्रण एकट्या सिद्दूंना दिलेले नव्हते तर आपले समकालीन कपील देव आणि सुनील गावस्कर यांनाही इमरानने दिलेले होते. पण त्या दोघांनी सराईतपणे त्याकडे पाठ फ़िरवली. वेगवेगळी कारणे देऊन कपील सुनील त्यापासून दुर राहिले. कपीलने आपल्यापर्यंत आमंत्रण पोहोचलेच नाही असा खुलासा केला होता, तर सुनीलने आपण आधीपासून क्रिकेट समालोचनाच्या कामात गुंतलो असल्याने जाऊ शकत नसल्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यांचे खुलासे भारतीयांना आवडणारे असले तरी पटणारे किती आहेत? अशा खास समारंभाला उपस्थित रहाण्यासाठी सवड काढता येत नाही असे कधीच होत नाही. पण तिथे इमरानच्या शपथविधीला जाणे म्हणजे भारतीय क्रिकेट शौकीनांचा रोष ओढवुन घेणे हे कपील सुनील नेमके ओळखून आहेत. म्हणूनच त्यांनी सारवसारव केलेली आहे. शिवाय पाकिस्तानातील लोकांनाही इमरानचे फ़ार कौतुक उरलेले नाही. लष्कराने दडपशाही करून या निवडणूका उरकल्याने इमरानच्या नव्या कारकिर्दीविषयी तिथलेही क्रिकेट शौकीन खुश नाहीत. अशा गोष्टी लक्षात घेऊनही कपील सुनील यांनी तिकडे पाठ फ़िरवली. सिद्धू त्या दोघांनाही कनिष्ठ असल्याने त्याचे महत्व कमी आहे. पण तरीही चमकण्याची त्याची हौस थोडीथोडकी नाही. म्हणूनच त्याने वाट वाकडी करून तिकडे जाण्याचा उत्साह दाखवला आहे. तेवढ्यावर न थांबता त्याने त्या समारंभात पाकचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेण्याचाही तमाशा केलेला आहे. ह्या कॉमेडी शोची गरज होती काय?

क्रिकेट सोडल्यावर राजकारणात प्रवेश केलेला सिद्धू मध्यंतरी आपल्या कॉमेंट्रीमुळे अधिक प्रकाशात आला. कधीकाळी पाकचा आघाडीचा फ़लंदाज जावेद मियांदाद याच्यावर बॅट घेऊन अंगावर धावलेला सिद्धू लोकांच्या लक्षात होता. पण नंतरच्या कॉमेंत्री करणार्‍या सिद्धूने आपला तो चेहरा कधीच पुसून टाकला. आधी क्रिकेटच्या सामन्याचे समालोचन करताना विविध भाषातील म्हणी वा वचने सांगून धमाल करणारा व लोकांना हसवणारा सिद्धू आजच्या पिढीला ठाऊक आहे. दहाबारा वर्षापुर्वी शेखर सुमनने हिंदीत विनोदी नकला करणार्‍या कलावंतांचा ‘लाफ़्टर चॅलेंज’ शो वाहिन्यांवर सुरू केला आणि त्यात सिद्धूला आणल्यापासून सिद्धू कधी स्वत:च एक महान विनोदवीर होऊन गेला त्यालाही समजले नाही. त्याच्या बडबडीला मग सिद्धूइझम असे नाव मिळाले. तत्पुर्वी लोकसभेवर अमृतसर येथून सिद्धू निवडून आला आणि त्याची राजकीय कारकिर्द सुरू झाली. त्याने भाजपात प्रवेश केला असला तरी गरजेखेरीज तो सम्सदेत कधी हजर राहिला नाही. २००४ सालात प्रथमच सिद्धूने लोकसभेत बोलयला तोंड उघडले आणि स्वभावाने गंभीर राजकारणी असूनही सभापती पदावर बसलेले सोमनाथ चॅटर्जीही आधीच हसू लागलेले होते. आम्ही सगळे सदस्य तुमच्या सिद्धूइझमच्या प्रतिक्षेतच आहोत अशी मल्लीनाथी त्यांनी केलेली होती. पण अशा रितीने सिद्धू आपल्या उक्तीकृतीने प्रत्यक्षातला विनोदवीर होऊन गेला होता. पुढे शेखर सुमनचा तो विनोदी कार्यक्रम थंडावला आणि त्यातूनच उदयास आलेल्या कपील शर्माने आपलाच एक खास विनोदी शो सुरू केला, त्यात मोठ्या भव्य आसनावर सदोदीत प्रतिक्रीया देणारा व खुमासदार भाष्य करणारा म्हणून सिद्धूला सहभागी करून घेण्यात आलेले होते. अलिकडल्या काळात तीच सिद्धूची खरी ओळख होऊन गेली. योगायोग असा की त्यातही कपील व सुनील होते.

कपील शर्माच्या त्या कार्यक्रमात त्याच्या इतकाच लोकप्रिय ठरलेला दुसरा विनोदवीर होता सुनील ग्रोव्हर. मागल्या काही वर्षात सिद्धू या कपील व सुनीलच्याच सोबत अधिक राहिला. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीतून विनोद निर्मिती हा सिद्धूचा स्वभाव झाला असेल तर नवल नाही. गेल्या लोकसभा निवडणूकीत अकालींचा अग्रह मान्य करून भाजपाने अमृतसर येथून सिद्धूला उमेदवारी नाकारली, तेव्हापासून तो नाराज होता. पण त्याने तात्काळ पक्षाला रामराम ठोकला नव्हता. मग राज्यसभेत त्याची सोय लावली गेली. पण त्याने एक दिवस त्या सदस्यत्वाचा राजिनामा दिला. पण कुठल्या पक्षात जावे याचा निर्णय होत नव्हता. म्हणूनच सिद्धू केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्यामध्ये घोटाळत राहिला. जेव्हा त्यापैकी कोणीच सिद्धूला मुख्यमंत्री म्हणून घोषित करायला राजी होईना, तेव्हा सिदधू ‘पाजी’ आपलाच स्वतंत्र पक्ष काढायल सिद्ध झाले. हॉकीतला माजी खेळाडू कर्णधार परगट सिंग व अन्य काही लोकांना सोबत घेऊन पाजींनी नव्या राजकीय संघटनेची घोषणा करून टाकली. पण घोषणा व संघटना यातले अंतर तोडतानाच पाजींची विकेट पडली आणि त्यांनी निमूट पुन्हा अन्य पक्षांचे उंबरठे झिजवायला सुरूवात केली. त्यात कॉग्रेसने फ़क्त मंत्रीपदाचे आश्वासन दिले आणि केजरीवाल तितकेही द्यायल राजी नव्हते. परिणामी सिद्धू कॉग्रेसवासी झाले, तेव्हा त्यांना आपल्या रक्तातच कॉग्रेस असल्याचे स्मरण झाले. कधीकाळी आपले पिताश्री कॉग्रेस नेता असल्याचे छातीठोकपणे सांगताना सिद्धू मागे राहिले नाहीत. मग मंत्री असतानाही टीव्हीच्या कार्यक्रमत सहभागी व्हावे किंवा नाही असा नवा वाद त्याने उपस्थित केला. कार्यक्रमात सहभागी होऊन मंत्रीपदाची जबाबदारी पुर्ण करण्यातले अडथळे त्याने फ़ेटाळून लावले. एकुण काय? पाजी कायम वादग्रस्त राहिले आणि विनोद निर्माण करत राहिले. कपील व सुनील त्यांची कॅमेरासमोर टिंगलही करीत राहिले.

विनोदी कार्यक्रमात सहभागी झालेला सिद्धू नेहमी सुनील ग्रोवर आणि कपील शर्मांचे गिर्‍हाईक असायचे. याची पगडी उडवल्याशिवाय त्यांचे विनोद पुर्ण व्हायचे नाहीत. इमरानने ते कार्यक्रम बघितलेले नसावेत, अन्यथा त्याने गावस्कर वा देव या क्रिकेटपटूंना आमंत्रण देण्यापेक्षा ग्रोव्हर व शर्मा तांना आमंत्रण दिले असते आणि एकट्या सिद्धी ‘पाजींना’ शपथविधीला जाण्याची वेळ आली नसती. इमरान खान वा अन्य कोणा पाकिस्तानी मान्यवरांपेक्षाही या त्रिकुटाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असते आणि पाकिस्तानी टिव्हीवरही कॉमेडी शो छान रंगला असता. पण इमरानची चुक झाली किंवा आमंत्रणे वाटणार्‍यांना त्यानेही हीच नावे दिली असतील. पण वाटणार्‍याने क्रिकेटमध्ये सुनील व कपील यांना आमंत्रण पत्रिका पाठवून दिल्या. ती ‘गुत्थी’ कपील शर्मा अजून सोडवू शकलेला नसावा. कदाचित डॉ. गुलाटीचे पात्र रंगवणार्‍या सुनील ग्रोव्हरला पाजींच्या कोलांत्या उड्यांनी आपले नाव सार्थक झाल्यासारखे वाटले असावे. कॉग्रेस पक्षाला मात्र त्यामुळे आपल्या विनोदी अध्यक्षांच्या तोडीस तोड मंत्री मिळालेला आहे. बहूधा सिद्धू पाजींनी हे आमंत्रण स्विकारल्याचे ऐकल्यावर कपील देव आणि सुनील गावस्कर भयभीत झाले असतील. त्यांनी शक्य असून देखील इमरानच्या शपथविधीला जाण्यातून माघार घेतली असावी. एकवेळ भारतीय क्रिकेट शौकीनांचा रोष पत्करला. पण आपली गणना सिद्धू सोबत विनोदवीर म्हणून होईल अशा भयाने त्यांनी पाय मागे घेतलेला असावा. कारण नावातील कपील व सुनील हे साम्य त्यांनाही कॉमेडी सर्कसचे ठरवायल पुरेशी ठरली असती. चमकण्याची कुठली संधी न सोडण्याचा सिद्धूचा हव्यास त्याचे नुकसान करणारा नसल तरी कॉग्रेस पक्षाला महागात पडणारा आहे. म्हणून तर मोदींसारख्या राजकीय मुरब्बी नेत्याने गेल्या लोकसभा प्रचारातही सिद्धू पाजींना चार हात दुर ठेवले होते. राहुलना त्याच्यात विजयाची नवी ज्योत दिसली असेल तर कोण काय करू शकतो?

2 comments:

  1. भाउ लोकसत्ता पेपर कुनी आजपासुन वाचु नये भाजप मोदीद्वेषपायी किती घातक प्रचार करावा ते पन खोटा मी हे विरोधी लोक काय म्हनतात हे पाहण्यासाठी वाचत होते पन आता तिकडे फिरकनार नाही केरळ विषयी जे लेख लिहिलाय तो वाचुन ब्रिटीशांनी कसा देशाची फाळणी करण्यासाठी प्रोपागंडा केला असेल याची आठवन होते त्याकाळी फाळनीच समर्थन करन्यासाटी अयेच लेख लिहिले होते भयंकर आहे सर्व

    ReplyDelete