शनिवारी पाकिस्तानचा बाविसावा पंतप्रधान म्हणून माजी क्रिकेटपटू इमरान खान याचा शपथविधी पार पडला. त्यासाठी उपस्थित असलेल्या पाहुण्य़ांमध्ये नखशिखांत आपला देह झाकून घेतलेली एक महिला उपस्थित होती. तिचे नाव बुशरा मनेका. ही इमरानची नवी आणि तिसरी पत्नी आहे. मागल्या फ़ेब्रुवारी महिन्यातच त्यांचा निकाह पार पडला. बुशराला आधीच्या पतीपासून पाच मुले आहेत आणि तिच्याच प्रयत्नांनी इमरान याने दुसरा विवाह तलाकमध्ये परिवर्तित केला, असे म्हटले जाते. ही बुशरा कोणी सामान्य गृहिणी नसून पीरफ़कीर म्हणजे आपल्याकडल्या बुवा महाराजांप्रमाणे आध्यात्मिक गुरू मानली जाते. मागल्या अनेक वर्षापासून आपल्या वैवाहिक व राजकीय जीवनात वैफ़ल्यग्रस्त असलेला इमरान मन:शांतीसाठी अनेक पीरफ़कीरांचे उंबरठे झिजवत होता आणि त्यातच त्याची बुशराशी गाठ पडली. तेव्हा इमरान घटस्फ़ोटीतच होता. त्याचा पहिला विवाह ब्रिटीश अब्जाधीश गोल्डस्मिथ यांची कन्या जेमिमाशी झालेला होता आणि तो नऊ वर्षे टिकला. नंतर एकलकोंडा असताना त्याचे तशाच परदेशी रेहम खानशी सुत जुळले. ही महिला आधुनिक युगातली व पत्रकार म्हणून बुद्धीमानही होती. फ़ारकाळ इमरानला तिच्याशी संसार चालवता आला नाही. सततच्या राजकीय पराभवांनी खचलेल्या इमरानला बुद्धीमान साथीदारापेक्षाही मन:शांती व भविष्यवाणी करणार्या कुणाची गरज होती. त्याच कालखंडात बुशराशी त्याचा संबंध आला. तिनेच इमरानला उपदेश व अध्यात्मिक सांगताना राजकीय यशाची गुरूकिल्ली दिली. तिसरा विवाह केला, तरच पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकशील, असे भविष्य तिनेच इमरानला सांगितले होते. ते खरे करण्य़ासाठी इमरानने बुशराशीच तिसरा निकाह केला. निदान पाकिस्तानी माध्यमे तसे म्हणतात. आता ही पीरफ़कीर पत्नी इमरानसह पाकिस्तानला कुठे घेऊन जाते बघायचे.
बुशरा मनेका ही चाळिशीतली महिला असून लाहोरनजिकच्या कुठल्या कुरेशी वंशातली आहे. आधी तिचा निकाह पाकिस्तानच्या एका वरिष्ठ कस्टम अधिकार्याशी झालेला होता आणि वैवाहिक जीवन कंठतानाच ती अध्यात्माकडे वळली होती. तिला पिंकी पीर म्हणूनही ओळखले जाते. आधीच्या पतीपासून तिला पाच मुले झालेली असून, मध्यंतरी तिने त्याच्याशी तलाक घेतला. योगायोग असा, की त्यापुर्वीच इमरानने रेहम हिलाही तलाक दिलेला होता. किंबहूना रेहम इमरान विवाहित असतानाच बुशरा व इमरान यांच्यात जवळीक सुरू झालेली होती. मन:शांतीसाठी बुशराशी भेटीगाठी चालू असताना इमरान इतका आहारी गेला, की त्याच्याशी रेहमचा दुरावा वाढत गेला. कदाचित तो दुरावा बुशरानेच वाढवला असावा, असेही म्हटले जाते. पण तिसरा निकाह आणि पंतप्रधानपद यांची सांगड या पिंकी पीरने अशी घातली, की इमरात तिच्या थेट ‘प्रेमातच पडला’. अर्थात हा त्या दोघांच्या खाजगी जीवनातला मामला असल्याने इतरांनी त्यात नाक खुपसण्याचे कारण नाही. पण सवाल इमरान या व्यक्तीचा नसून त्याच्या हाती देशाची राजकीय व प्रशासकीय सुत्रे गेलेली असल्याने, त्यात बुशरा किती ढवळाढवळ करणार हा मुद्दा सार्वाजनिक हिताचा आहे. आता पाकिस्तान राजकीय नेता चालवणार की पीरफ़कीर चालवणार, असा प्रश्न जनतेशी निगडित आहे. एका बाजूला इमरानचे यश म्हणजे पाकिस्तानी लष्कराचा डावपेच असल्याचा खुप गवगवा झालेला आहे. हा तहरिके पाकिस्तान पक्षाचा पंतप्रधान असण्यापेक्षाही पाक लष्कराची कठपुतळी निवडून आणली गेली, असेही सगळीकडून म्हटले जात आहे. मग काही प्रश्न उपस्थित होतात. बुशरा ही खरीच पीरफ़कीर आहे, की लष्कराने आपले प्यादे म्हणून तिला पुढे करून हा सगळा बनाव घडवून आणला आहे? कारण बुशराच्या भविष्यवाणीपेक्षाही इमरानचे यश लष्कराने योजलेल्या व्युहरचनेतून आलेले आहे.
मागल्या दोन वर्षापासून पाकिस्तानातल्या घडामोडी अतिशय वेगाने घडत गेलेल्या आहेत. त्यात बहूमताने निवडून आलेल्या नवाज शरीफ़ यांना सत्ताभ्रष्ट करण्य़ासाठी न्यायालयाचा हात पिरगाळून लष्कराने कारवाया केल्या. नंतर संपुर्ण शरीफ़ कुटुंबाला परागंदा करण्याची योजलेली रणनिती जेव्हापासून अंमलात येऊ लागली, तेव्हाच इमरान व बुशरा यांच्यातले आध्यात्मिक प्रकरण सुरू व्हावे, याला निव्वळ योगायोग मानता येत नाही. पनामा पेपर्स चव्हाट्यावर आल्यापासून शरीफ़ विरोधात खटल्याचे नाटक रंगू लागले आणि तोच कालावधी बुशराकडे इमरानने आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी जाण्याचा आहे. शरीफ़ यांच्या विरोधात सर्व बाबतीत न्यायालयीन व कायदेशीर प्रक्रीया पूर्णत्वास गेल्यावरच बुशरा इमरान अधिक जवळ आले. की आणले गेले? लष्कराला आपल्या तालावर नाचणारा राजकीय पक्ष व नेता हवा होता. त्यासाठी शरीफ़ यांची मुस्लिम लीग वा भुत्तो कुटुंबाची मालमत्ता असलेली पिपल्स पार्टी राजी नव्हती. त्यामुळेच मग मागली दोन दशके धडपडणार्या इमरानला लष्कराने आपल्या जाळ्यात ओढण्याच्या हालचाली सुरू केल्या असाव्या. त्यातून बुशरा हे प्यादे पुढे सरकवण्यात आले असावे. आध्यात्मिक गुरू पीरफ़कीर आशीर्वाद देऊ शकतात किंवा भविष्यवाणी नक्कीच करू शकतात. पण ती भविष्यवाणी पुर्ण करण्यासाठी आपल्याशीच कोणाला विवाहबद्ध होण्याचा सल्ला देण्याची, ही बहुधा जगातली पहिली घटना असावी. इमरानच्या दुसर्या लग्नाला दोनतीन महिनेही झालेले नसतील, तेव्हा बुशरा त्याच्याशी परिचित झाली आणि तिने पंतप्रधान होण्यासाठी तिसर्या निकाहचा सल्ला इमरानला दिला. याचा अर्थ नुकताच रेहमशी झालेला निकाह मोडण्याचाच आग्रह होता. कारण दुसर्या लग्नातून मोकळा झाल्याशिवाय इमरान तिसरा निकाह करू शकणार नव्हता. मात्र त्याचा राजकीय गवगवा कोणालाच नको होता.
इमरानने म्हणून असेल, आधी रेहमला तलाक दिला आणि तेव्हाही बुशरा आपल्या पहिल्या पतीशी संसार करीत होती व अध्यात्मिक उपदेशही करीत होती. इमरानला तिसर्या विवाहाचे सल्ले देणार्या बुशराला आपल्या प्रदिर्घ विवाहात कोणती अडचण अकस्मात आली? इमरानच्या रेहमशी तलाक नंतर काही महिन्यांनी बुशराने आपल्या पहिल्या पतीकडून तलाक मिळवला आणि अल्पवधीतच इमरानने तिला आपल्याशी विवाह करण्यास सुचवले. पाच मुलांची आई आणि दोन लग्नांत अपयशी ठरलेला इमरान, तिसरा विवाह करून कोणते वैवाहिक जीवन जगणार होते? इमरानसारख्या प्लेबॉय म्हणून पुर्वायुष्य घालवलेल्या व्यक्तीमध्ये बुशराला कोणता आध्यात्मिक सहयोगी भेटला होता? की तिच्या माध्यमातून पाकिस्तानच्या प्रशासकीय नेतेपदी आपले बुजगावणे बसवण्याचा डाव पाक लष्कराने खेळलेला आहे? जो माणूस पाकच्या पंतप्रधानपदी शनिवारी विराजमान झाला, त्याने कुणाच्याही प्रभावाखाली कुठला निर्णय घेणार नसल्याची शपथ घेतली. पण ज्याला आपल्याच व्यक्तीगत व वैवाहिक जीवनातले निर्णय अन्य कुणाच्या प्रभावाखाली घ्यावे लागले, तो शासकीय निर्णय स्वतंत्रपणे कसे घेऊ शकेल? एकूण या बुशरा प्रकरणाचे आता उघड होऊ लागलेले धागेदोरे पहाता, पुढल्या काळात पाकिस्तानच्या घडामोडी इमरानपेक्षाही पिंकी पीर बुशराच्या हालचालीतून शोधाव्या लागणार आहेत. थोडक्यात पाकिस्तानची सत्तासुत्रे आजवर जिहादी मौलवी व लष्कर यांच्या हाती केंद्रीत झाली होती. यापुढे राजकारणाची सुत्रेही इस्लामी पीरफ़किरांच्या हाती गेलीत असे दिसते. मग पीरफ़कीर देश चालवणार, की त्यांनाच पाक सेनाधिकारी कळसुत्री वाहुल्याप्रमाणे नाचवणार, हे लौकरच दिसणार आहे. शरीफ़ भुत्तो ही नावे विसरून आपणही बुशरा वा पिंकी पीर ह्या नावांची सवय अंगी बाणवून घेणे भाग आहे. कारण आता तेच आपले शेजारी झालेले आहेत ना?
भाउतुम्हीम्हनताय त्याचा प्रत्यय कालच पाक असेंब्लीत आला इमरानची निवड झाल्यावर शरीफच्या पक्षाचे खासदार त्याला भाषन करु देत नव्हते गराडाच घातला होता तेव्हा हताश होउन इमरान खाली बसला सरळ खिशातली जपाची माळ काढली आणि जप करत बसला यावरुन कळत काय होनार आहे आणि पिंकी पीरी साध प्रकरन नाही तिचा नवरा कस्टम मध्ये खुप दोन नंबरच काम करायचा तिन आर्मीशी संधान बांधुन त्याला सोडवलाच बढती पन मिळवुन दिली तेच आर्मी वसुल करतेय दोघांकडुन. तिने इमरानच्या घराचा पु्र्ण कब्जा घेतलाय रोज विचित्र जादुटोने करते इमरानला काही करुन पंतप्रधान व्हायच यान पछाडल्याने फायदा घेते.
ReplyDeleteपाक लष्कराचा नीचपना काही जात नाही कपिल आणि गावस्कर शहाने म्हनायचे की गेले नाहीत कारन सिद्धुसारख pok च्या अध्यक्षाजवळ बसायला लागल असत,बाजवांशी गळाभेट घ्यावी लागली असती जे भारतीयांना अपमानीत करनार आहे खास करुन भारतीय जवानांना.सिद्धुन तस मुद्दाम केल कांगरेसचा वेगळा संदेश पाकला घेउन गेला होता की खरच अपमान झाला याची द्यावी लागतीलच
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteपाकिस्तानी लेडी रासपुतिन
ReplyDeleteBushara ISI agent asoo shakel aani Imran la aapalyaa jaalyaat odhun pak lashkaraane he kele asaave.
ReplyDelete