Saturday, August 18, 2018

संघाच्या मुशीत घडलेला, अखेरचा ‘अटल’ नेहरूवादी

Image result for atal at rajghat

अटलबिहारी वाजपेयी १९५७ सालात प्रथमच लोकसभेत म्हणजे संसदेत निवडून आले. त्यांच्या पहिल्याच भाषणाने सभागृह गाजवले होते आणि त्याची दखल तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी घेतली होती. आपल्या या पहिल्या भाषणात अटलजींनी नेहरूंच्या कॉग्रेस सरकारवर सडकून टिका केलेली होती. तरीही कामकाज संपल्यावर नव्याने लोकसभेत आलेल्या या तरूण खासदाराकडे नेहरूंनी मोर्चा वळवला. अटलजींच्या अमोघवाणीने प्रभावित झालेल्या नेहरूंनी, त्या तरूणाचे कौतुक केले. इतकेच नव्हेतर त्याच्या भवितव्याचेही भाकित करून ठेवलेले होते. भविष्यात हा तरूण देशाचा मोठा नेता होईल आणि बहुधा पंतप्रधानही होईल, अशी भविष्यवाणी पंडितजींनी केलेली होती. अटलजींनी त्यांचे शब्द खरे करून दाखवले. आपल्या भाषणाला प्रभावित करण्यासाठी अटलजींना पंतप्रधानाच्या आसनापर्यंत जाऊन त्याला बेसावध असताना मिठी मारण्याचे नाटक करावे लागलेले नव्हते. आपल्यावरच्या कठोर टिकेनंतरही नेहरूंना या उदयोन्मुख नेत्याच्या भवितव्याविषयी दिसलेले सत्य झाकण्याची गरज वाटलेली नव्हती. ही भारतीय लोकशाही होती आणि आज आपण तीच लोकशाही हरवून बसलेले आहोत. त्या महान परंपरेतला हा शेवटचा दुवा गुरूवारी निखळला. आपल्याला पर्याय म्हणून राजकारणात उदयास आलेल्या एका नव्या विचारधारा वा नेतृत्वाची गुणवत्ता नाकारण्याचा कद्रुपणा नेहरूंपाशी नव्हता. त्यांच्या कॉग्रेस पक्षातही नव्हता. आज भारतीय संसदीय व निवडणूकीच्या राजकारणात त्याचाच सार्वत्रिक दुष्काळ पडलेला आपल्याला अनुभवास येत असतो. आपल्या उदात्त आठवणी मागल्या दहा वर्षात अटलजीही सांगू शकले असते. पण त्यांचे पंतप्रधानपद गमावणार्‍या २००४ च्या लोकसभा निकालानंतर त्यांनी राजकारणाकडे साफ़ पाठ फ़िरवली. नेहरू जाऊन त्यांच्या नातसुनेच्या हाती कॉग्रेसची सुत्रे गेल्याचा तो परिणाम होता.

नेहरू वा अटलजींच्या त्या भेटीला इतक्यासाठी महत्व आहे, की स्वातंत्र्योत्तर काळात जे विविध राजकीय प्रवाह देशात सुरू झाले, त्यांची पाळेमुळे कॉग्रेसचा स्वातंत्र्यलढा होती. सहाजिकच सर्वच पक्षांवर कॉग्रेसी विचाराची व पर्यायाने नेहरूंनी रुजवलेल्या विचारांची छाप होती. त्याला अपवाद होता जनसंघ! रा. स्व. संघाच्या पाठींब्यावर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी सुरू केलेल्या जनसंघ पक्षाची वैचारिक भूमिका नेहरूंनी रुजवलेल्या अहिंदू राजकारणाचा प्रतिवाद होता. देशाची फ़ाळणी हिंदू व मुस्लिम अशी धर्माधिष्ठीत झालेली असली, तरी पाकिस्तान वगळून उरलेल्या प्रदेशाला नेहरूंनी हिंदूंचा देश मानलेले नव्हते आणि त्याविषयी कोणाची तक्रारही नव्हती. अगदी हिंदू राजकारण्यांचाच भरणा असलेल्या कॉग्रेसनेही कधी हिंदू भारताचा आग्रह धरलेला नव्हता. पण हिंदू असणे वा हिंदूत्वाचा अभिमान बाळगणे, हा भारतात गुन्हा असल्याची काहीशी चमत्कारीक भूमिका नेहरूंनी घेतली होती. त्याचा प्रतिवाद स्वत:ला कॉग्रेसी वारस मानणारा कुठलाही पक्ष करायला राजी नव्हता. पाकिस्तान विभक्त झाल्याने हिंदू महासभा हा पक्ष कालबाह्य झाला होता आणि स्वतंत्र भारतात हिंदूहिताला प्राधान्य देणार्‍या पक्षाची गरज कोणीच विचारात घेत नव्हता. अशा स्थितीत डॉ. मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली व त्यासाठी हिंदूत्ववादी संघाचा पाठींबा मिळवला. कॉग्रेसी अहिंदू विचारधारेला छेद देणारा वा खंबीरपणे विरोध करणारा, असा तो एकमेव पक्ष, वैचारिक बाबतीत बिगरकॉग्रेसी पक्ष होता. बाकीच्या पक्षांचा कॉग्रेसविरोध तात्विक वा धोरणापुरता मर्यादित होता. सहाजिकच जनसंघ हाच एकमेव हिंदू पक्ष होऊन गेला. पण त्याच्या हिंदूत्वाची सामान्य जनतेला गरज वाटण्यासारखी परिस्थिती अजिबात नव्हती. सहाजिकच जनसंघाला हिंदूंचा पक्ष म्हणून पाळेमुळे रुजवण्यापासून आरंभ करावा लागला आणि त्या पहिल्या मशागतीला आरंभ करणारा एक खंदा शिलेदार अटलबिहारी वाजपेयी होते.

स्वातंत्र्य चळवळीत युवक कार्यकर्ता सत्याग्रही म्हणून भाग घेणारे अटलजी, श्यामाप्रसाद मुखर्जी व बलराज मधोक यांच्यानंतर जनसंघाचा चेहरा बनून गेले. पण त्यांचा चेहरा फ़क्त एका राजकीय पक्षाचा नव्हता, तर खर्‍याखुर्‍या बिगरकॉग्रेसी राजकारणाचा चेहरा होता. अगदी नेमक्या शब्दात सांगायचे तर कधीही कॉग्रेसी विचारधारेत सहभागी होऊ शकणार नाही, असा एकमेव पक्ष होता जनसंघ आणि त्याचा चेहरा होता अटलबिहारी वाजपेयी. म्हणूनच नेहरूंच्या अस्तानंतर आणि इंदिराजींच्या उदयाने जी राजकीय पोकळी निर्माण झाली, त्यात हळुहळू लोकांनाही हिंदूहिताची जपणूक करणार्‍या पक्षाची गरज जाणवू लागली. त्यातून अटलजी नावाच्या नेतृत्वाचे विविध पैलू उजळत गेले. अनेक निवडणूका व त्यातून घडत बिघडत गेलेली विविध राजकीय समिकरणे, यामुळे सामान्य हिंदूला कॉग्रेससहीत अन्य पक्षांच्या राजकीय घडामोडीत हिंदूंचा कोणी वाली नसल्याचे पटत गेले. तसतशी जनसंघाची जमिन विस्तारत गेली. त्यात मुस्लिम धर्मांधतेसारखी टोकाची भूमिका न घेणारा, पण हिंदु असण्याची शरम नसलेला पक्ष, लोक पारखून घेत गेले. सेक्युलर वा पुरोगामी राजकारणाचा अतिरेक करताना विविध पक्ष जितके मुस्लिम वा अल्पसंख्यांकाच्या आहारी गेले, तसतसा जनसंघ किंवा नंतरचा अवतार भाजपाचा वेगळेपणा दृगोचर होत गेला. हिंदूंना भावत गेला. त्याला हिंदूत्व म्हणता आले नाही, तरी हिंदूहिताची जाण असलेला पक्ष, असे त्याचे स्वरूप होत गेले. भारताला हिंदूराष्ट्र बनवण्यासाठी नव्हेतर भारताला मुस्लिमांचा धर्मांध देश बनवण्यापासून रोखण्यासाठी पुरोगामीत्वाचे राजकारण रोखण्याची गरज वाढत गेली, तसतसा भाजपा विस्तारत गेला आणि त्या कालखंडात त्याचा चेहरा अटलजी होते. पण संघाच्या मुशीत तयार झालेला हा नेता विचाराने हिंदूत्ववादी आणि कार्यशैलीने लोकशाहीवादी उदात्त भूमिकेतला राहिला.

नेहरूंच्या नंतर इंदिराजींचे युग आले, त्यात अटलजींचे नेतृत्व बहरत गेले आणि आणिबाणीनंतर त्यांच्या नेतृत्वाला धार येत गेली. जनसंघाचे जनता पार्टीत विसर्जन झाले आणि जनता पक्ष फ़ुटल्यावर पुन्हा जनसंघाचा जिर्णोद्धार भाजपा म्हणून झाला, तोही अटलजींच्या अध्यक्षतेखाली. परिणामी अटलजी हे भारतीय राजकारणात नेहरूवादाच्या विरोधाचा चेहरा झालेले असले, तरी प्रत्यक्षात तेच नेहरू कार्यशैलीच्या राजकारणाचे अखेरचा अध्याय होते. पुरोगामीत्वाच्या नावाखाली नंतरच्या काळामध्ये भारतातल्या हिंदूंच्या मनात आपल्या धर्म परंपरांविषयी अपराधगंड निर्माण करण्याचा विकृत प्रयास झाला. त्याच्या विरोधात उभा राहिलेला उदारवादी नेता म्हणजे अटलबिहारी वाजपेयी होते. हिंदूत्वाचा हा मवाळ चेहरा म्हणजे एकप्रकारे इंदिराजींचे सौम्य रुप होते आणि त्याला टिकून रहायला तथाकथित पुरोगाम्यांनी वा संघ विरोधकांनी संधीच दिली नाही. सहाजिकच पुरोगामी उदारमतवाद आणि हिंदू अस्मितेचा मवाळपणा, यांची सांगड घालण्याचा अटलजींच्या आटापिटा काही फ़लनिष्पत्ती करू शकला नाही. विखुरलेल्या राष्ट्रीय राजकारणाला समन्वयाच्या व सामंजस्याच्या मंचावर आणण्याचा पराकोटीचा प्रयत्न अटलजींनी १९९० नंतरच्या दशकात केलेला होता. पण पुरोगाम्यांनीच त्याला सुरूंग लावून भाजपाला किंवा भारतातील हिंदू लोकसंख्येला कडव्या हिंदूत्वाकडे सरकण्यास भाग पाडले. १९९६ सालात लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून सरकार बनवणार्‍या अटलजींना पाठींबा नाकारण्याचा करंटेपणा अश लोकांनी केला. त्यातून शेवटी हिंदूत्वाच्या पक्षाला बहूमत देण्यापर्यंतची अपरिहार्यता भारतीय नागरिकांवर आली. तो मतदार आजही हिंदूत्ववादी नाही, तर अटलजींच्या भूमिकेइतकाच मवाळ व सौम्य भूमिकेतला आहे. पण कुठलेही तारतम्य न ठेवता अटलजींना सत्ताभ्रष्ट करण्याचे डावपेच ज्यांनी खेळले, त्यांनी अटलजींना पराभूत केले नाही, तर नरेंद्र मोदींचा मार्ग प्रशस्त केला.

अटलजी व नरेंद्र मोदी यांच्यातला फ़रक लक्षात घेतला पाहिजे. अटलजींनी १९९० नंतर एक वक्तव्य केले होते. ‘आता हिंदू मार खाणार नाही’. त्याचा अर्थ हिंदूत्ववादी आता आक्रमक धर्मांध होतील असा नाही. तर भारतात हिंदू घाबरून व अपराधगंडाने पछाडलेल्या अवस्थेत जगणार नाही, इतकाच होता. आज आपल्याला देशभर जो पुरोगामी विचारांचा कडवा विरोध दिसुन येतो, तो पुरोगामीत्वाला विरोध नसून, त्या नावाखाली चाललेल्या अल्पसंख्यांक लांगुलचालनाचा विरोध आहे. भाजपाचा मतदार कडवा हिंदूत्ववादी वा धर्मांध नसून, त्याला हिंदू म्हणून अपमान सहन करण्याचा कंटाळा आलेला आहे. आपल्या पुर्वजांच्या स्मृती व अभिमानाच्या गोष्टी यांची शरम बाळगण्याच्या संक्तीचा कंटाळा आलेला आहे. हिंदूंच्या अभिमानाला अपमानास्पद ठरवण्याचे राजकारण बुद्धीवादाला हा मतदार कंटाळलेला आहे. त्याच्या भावनेला पहिला आवाज देऊन लोकप्रिय करण्याचे काम अटलजींनी हाती घेतले. त्यांनी आक्रस्ताळा हिंदुत्ववाद अंगिकारला नाही. पण आपल्या अभिमान अस्मितेला नाकारण्य़ाला आव्हान देण्यात पुढाकार घेतला. पण त्या मवाळ हिंदू अभिमानालाही पायदळी तुडवण्यालाच राजकीय प्रतिष्ठा देण्याचे टोकाचे राजकारण सुरू झाले आणि अटलजींना त्यात टिकून रहाणे शक्य नव्हते. ते मनाने उदारमतवादी होते आणि जशास तसे हा त्यांचा स्वभाव नव्हता. आज ज्यांना मोदी आक्रमक हिंदूनेता वाटतात व त्यांची तुलना अटलजींशी केली जाते, त्यांनीच तर अटलजींचा उदारवाद खच्ची केला. इतकेच अटलजी आदरणिय होते आणि आदर्श होते, तर त्याना संख्याबळावर संपवण्याचे डावपेच कशाला खेळले गेले होते? त्याची प्रतिक्रीया उमटायला दहा वर्षे गेली आणि अडवाणीही मवाळ व्हायला गेल्यामुळे मागे पडले. परिणामी नरेंद्र मोदी हा आक्रमक नेता वाजपेयींच्या पुण्याईवर देशाचा पंतप्रधान होऊ शकला.

१९५७ सालात अटलजी प्रथमच लोकसभेत निवडून आले व त्यांनी नेहरूंनाच संसदीय लोकशाहीचा आदर्श समजून राजकारणाला आरंभ केला. ते हिंदूंना मायभूमीत सन्मानाने जगता यावे एवढ्यापुरते मर्यादित होते. मुळातच मुस्लिम राष्ट्र मान्य करून देशाच्या फ़ाळणीला मान्यता देणार्‍या नेहरूंच्या कॉग्रेस पक्षाकडून हिंदू जनतेची तितकीच अपेक्षा होती. जगाच्या पाठीवर किंवा मानवी इतिहासात कधी हा खंडप्राय देश धर्माचा नव्हता, की हिंदूराज्यही नव्हता. मग समाजवादी व पुरोगामी राष्ट्रासाठी त्याला अहिंदू देश बनवण्याचा आटापिटा कशाला चालला होता? नेहरूंच्या त्याच भूमिकेच्या विरोधातून जनसंघाचा जन्म झाला आणि अटलजी १९७० नंतर त्याचा चेहरा बनत गेले. किंबहूना नेहरूंच्याच हयातीत हा नवा हिंदू चेहरा उदयास आला होता. एकप्रकारे त्या अहिंदू नेहरूवादी राजकारणाचा पर्यायी चेहरा म्हणून जे राजकारण स्वातंत्र्योत्तर काळात रुजत गेले, त्याचा अटलजी चेहरा होत्र गेले. खरेतर त्यांचा मवाळ चेहरा स्विकारला गेला असता किंवा त्यातला आशय ओळखला गेला असता, तर भाजपा आज देशव्यापी पक्ष होऊ शकला नसता. किंवा कॉग्रेसचा अस्त अशारितीने जवळ आला नसता. कॉग्रेसच्या हातून सत्ता गेली तेव्हा आघाडीच्या सत्तेचे नेतृत्व अटलजी करीत होते. तरी तो नेहरूवादाचा अखेरचा दुवा होता. कारण सत्तांतर होऊनही अटलजींनी राजकीय व्यवस्था किंवा नेहरूंनी उभारलेल्या प्रस्थापित गोष्टी मोडीत काढल्या नव्हत्या. पण त्यांनाच पराभूत व खच्ची करून मधला मार्ग पुरोगामी म्हणवणार्‍यांनी उध्वस्त करून टाकला. बहूसंख्य हिंदू लोकसंख्या असलेल्या देशात हिंदूंवर चोरासारखे जगण्याची जणू सक्ती सुरू झाली आणि त्यात अटलजींचा चेहरा पुसट होत गेला. नेहरूवादी कार्यशैलीचा उरलासुरला अवशेषही अटलजींच्या पराभवाने संपुष्टात आला. पुरोगामी अहिंदू डावपेच व राजकारणाने बहुसंख्य समाजाला मोदींची भुरळ पडली.

यातला विरोधाभास लक्षात घेण्याची गरज आहे. अटलबिहारी हे भले बिगरकॉग्रेसी राजकीय पक्षाचे पहिले पंतप्रधान होते. पण नेहरू कार्यशैलीचे ते अखेरचे लोकशाहीवादी राष्ट्रीय नेता होते. सत्तेच्या लालसेने किंवा अतिरेकी द्वेषामुळे त्यांना पुरोगाम्यांनी व नेहरूवाद्यांनीच पराभूत केले. पण प्रत्यक्षात त्याच करंटेपणाने नेहरूवाद उध्वस्त करण्याला हातभार लावला. कॉग्रेसमध्ये नेहरूवाद पुढे घेऊन जाऊ शकणारा उदारवादी जाणिवांचा कोणी नेता उरलेला नव्हता आणि वाजपेयींच्या रुपाने भाजपात असलेला उदारवादी राष्ट्रीय नेताही निकामी करून टाकण्यात आला. पर्यायाने नेहरूवाद संपुष्टात आणला गेला. अटलजींच्या राजकारणाचे वाहन हिंदूत्ववादी भाजपाचे असले, तरी त्याचा राजकीय गाभा बहुतांशी नेहरूवादी होता. पुढल्या दहा वर्षात सत्ता कॉग्रेसच्या हाती पुन्हा आली असली, तरी त्यातला नेहरूवादी उदारवाद नामशेष झाला होता. मग त्या कडव्या अहिंदू राजकारणाला शह देताना नेहरूवादाला तिलांजली देणारा चेहराच पुढे आला. सध्या जो कॉग्रेस पक्ष शिल्लक आहेम तो नेहरूंचे नाव आणि वारसा सांगत असला, तरी व्यवहारात त्याने नेहरूंच्या तत्वांना विचारांना कधीच मूठमाती दिलेली आहे. त्यांच्यापेक्षा अटलजी अधिक नेहरूवादी होते. विचाराने नाही तरी कृतीने कार्यशैलीने अटलजी नेहरूंचे वारस होते. म्हणूनच त्यांच्या निधनाने अखेरचा नेहरूवादी अस्ताला गेला असे म्हणता येईल. एक मात्र निश्चीत. अटलजी बिगर कॉग्रेसवादाचा ‘अटल’ चेहरा होते. पंडितजींच्या हयातीतच अटलजींनी बिगरकॉग्रेसी नेतृत्व उभारण्यासाठी कंबर कसली होती. पण त्यांच्या रुपाने व पुढाकाराने नेहरू विचार व कार्यशैली तरी टिकली असती. बिगरकॉग्रेसी राजकारणाने नेहरू संपले नसते. पण पुरोगामी खुळेपणा व अतिरेकाने नेहरूंना पुसणारा नेता पुढे आणला. अटलजी  बिगरकॉग्रेस राजकारणाचा चेहरा असले तरी नेहरूयुगाचे अखेरचा वारस होते. त्या अर्थाने त्यांच्यासोबत नेहरूयुगच संपले आहे.

नेमक्या आणि मोजक्या शब्दात सांगायचे तर संघाच्या मुशीत घडलेला नेहरूंचा अखेरचा वारस, सोनिया गांधी व आजच्या कॉग्रेसने नेस्तनाबुत केला.

11 comments:

  1. हिंदू मनस्थिती आणि approach अतिशय कोरीवपणे मांडणारा लेख । You spoke the mind of many.... 🙏

    ReplyDelete
  2. अटलजींना विरोधी पक्षातही मान होता हे खरेच. पण नेहरूचे गुणगान पटत नाही. नेहरू हे एक नंबरचे ' कद्रू ' व ' हेकट ' होते. मागील आठवड्यातच दलाई लामा यांनी सांगितले की महात्मा गांधी बैरीस्टर जिना याना भारताचे पंतप्रधान करावयास तयार होते. याचाच दुसरा अर्थ असा की केवळ ' नेहरू ' या एका व्यक्तीमुळेच हिंदुस्तानची फाळणी झाली हे कटू असले तरी सत्य आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ' सुभाषचंद्र बोस ' हे आमच्या तुरुंगात आहेत असे रशियन सरकारने भारत सरकारला कळवले असताना नेहरूंनी ' बोस ' हे ब्रिटिशांचे ' युद्धकैदी ' असल्याने त्यांना ब्रिटिशांच्या हवाली करावे असे सांगितले होते. हीच गोष्ट ' तिबेट ' चा ताबा चीनकडे जाणे असू दे अथवा १९६२ च्या युद्धात हिंदुस्थानी सैन्य अधिकारी परत परत चीनच्या सैनिकांच्या हिंदुस्थानी सीमेवरील धोकादायक हालचालींबद्दल नेहरूंना सारखे सांगत असताना हेच नेहरूं ' पंचशील ' तत्वांचे तुणतुणे वाजवत ' हिंदी चिनी भाई-भाई ' ची धून वाजवत होते. श्यामाप्रसाद मुखर्जी , दीनदयाळ उपाध्याय या दोन्ही महान नेत्यांचा संशयास्पद मृत्यूही नेहरूंच्या काळातच झाला होता.वल्लभ भाई पटेल यांच्याकडून काश्मीरचे खाते काढून घेऊन काश्मीरला भारताचे एक कायमचे दुखणे बनविणारे ते हेच ' नेहरू '

    ReplyDelete
  3. उत्तम विष्लेशन भाउ.खरच वाजपेयी उदारमतवादाचा चेहरा होते त्यांना चांगल म्हनत पुरेगामी लोकांनी संपवल२००४साली खर काही कारन नसता कांगरेसच्या deep states ने वाजपेयींना हरवल तेवा खुप वाइट वाटल होत पन आता वाटत जे झाल ते भल्यासाठीच नाहीतर मोदींसारखा आक्रमक नेता पुरोगामी ढोंगापनाला संपवनारा भारताला मिळाला नसता आता अशी वेळ आलीय की सत्ता सोडा कांगरेसला अस्तित्वाचा प्रश्नआहे मोदी हे वाजपेयींच find आहे

    ReplyDelete
  4. वाजपेयींनच्या अतिउदारमतवादाने त्यांची सत्ता घालवीली.नशीब मोदी तसे नाहीत किंवा धडा घेतला असेल वाजपेयींचा पाकने खुप गद्दारी केली तरी वाजपेयी चुचकारत राहीले मोदींनी पन आधी मैत्रीचा हात पुढे केला पन नेहमीप्रमाने धोका मिळाला मोदीमुळे पाकला किंमत चुकवावी लागली युद्ध न करता पाकला कंगाल केलय पाकची अर्थव्यवस्था इतकी खालावन्याच कारन मोदी सरकारने पाक निर्यात करनारे item वर भारतातील निर्यीतदाराना सवलती दिल्या,आखाती देशांत कामगार replace केले,अफगाण व काश्मीरमध्ये धरने बांधुन दोनी बाजुंनी पानीकोंडी केली.पाक मंत्र्यांच्या बाॅम्बच्या धमक्या हास्यास्पद वाटतात आता तिथे पन यावर कोन बोलत नाही कारन खायचे वांदे झालेत

    ReplyDelete
  5. भाऊ नेहमीप्रमाणे छान लेख !!!
    भिवंडी दंगल आणि त्याअनुषंगाने हिंदू मार नही खायेगा ...हे १९७० चे अटलबिहारीजिचे उदगार ! वर कदाचित typo म्हणून १९९० आलेय !

    ReplyDelete
  6. नेहरूवाद हा शब्द अनेकदा आला आहे पण त्याचा नेमका अर्थ समजला नाही. हिंदु असण्याची लाज वाटणे हा जर नेहरूवाद असेल तर अटलजी नेहरुवादी कधीच नव्हते.नेहरूंनी अनेक राजकीय चुका केल्या ज्याचे दुष्परीणाम देश अजूनही भोगतोय.

    ReplyDelete
  7. भाऊ नेहरूंचं गुणगान ठीक आहे. पण सुभाषचंद्र बोस यांचं नाव न्युरेंबर्ग च्या खटल्यात होतं ते सुद्धा भारताच्या सरकारनी काढायची विनंती केली नाही.

    नेहरू हे नक्कीच सत्तापिपासू होते म्हणून च बोस, सावरकर यांना वाळीत टाकण्याची कामं पद्धतशीरपणे त्यांनी केली. कारण बोस, सावरकर म्हणजे त्यांच्या महात्वाकांशेला आव्हान होतं.

    ReplyDelete
  8. भाऊ हा लेख तुमच्या लेखनातील एक MILESTONE म्हणून गणला जाईल👌🏼👌🏼👌🏼

    ReplyDelete
  9. He shakya aahe kee Ataljinee jo mavaal hidutvaachaa prayatna kela tyaalaa yash n aalyaane aakramak hidutva Modinee sveekarale asaave. Anyathaa he tathaakathit purogaamee jaastach sokaavale asate. Godhraa chee pratikriya mhanun prattyuttar denaare Modi ch hote. Aajhee congress mukta bharat mhanajech congressi vichardhara mukta bharat haach vichaar asaava anyathaa bhrashta netyaanvar bharaabhar cases karun revenge ghetalaa asataa.

    ReplyDelete
  10. Bhau,pv narsimha rao yanna Congress ne dileli vagnuk yavar apan lekh lihava.je Lok modi Ani vajpayee tulna karat ahet tyanna samjel

    ReplyDelete