Thursday, August 23, 2018

झेन पोरी, लाजवलंस ग!



बुधवारी सकाळी मध्य मुंबईतल्या परळ भागात क्रिस्टल टॉवर या गगनचुंबी इमारतीच्या बाराव्या मजल्यावर अकस्मात आगडोंब उसळला होता. तेव्हा त्या इमारतीत वास्तव्य करणार्‍या अनेक कुटुंबांची तारांबळ उडालेली होती. कारण तिथली अग्निशमन व्यवस्था नादुसरुस्त होती आणि कोणाला काय करावे ते सुचत नव्हते, की माहिती नव्हते. अशावेळी सोळाव्या मजल्यावर वास्तव्य करणार्‍या सदावर्ते कुटुंबातली बारा वर्षाची कन्या झेन गाढ झोपलेली होती. तिच्या वडीलांनी आपल्या बाथरूमधला गिझर तपासला तर त्यातून धुर येत होता. ते बघूनच झेनची आई घाबरली आणि टाहो फ़ोडून रडू लागली. त्या आवाजाने झेनची झोप मोडली आणि ती खडबडून जागी झाली. तिने आसपास बघितले आणि काय झाले आहे त्याचा अंदाज घेतला. फ़्लॅटचे दार उघडले तर समोरच्या जिन्यातून धुर येत होता आणि जवळ वास्तव्य करणारे शेजारीही सैरावैरा पळत आक्रोश करीत होते. अशा प्रसंगात बारा वर्षाच्या शाळाकरी मुलीने काय करायला हवे होते? नुसता एका बारा वर्षाच्या मुलीचा चेहरा समोर आणा आणि तिला अशा प्रसंगात झोकून द्या. क्षणात आपल्या डोळ्यासमोर काय चित्र उभे राहिल? आईबाप व शेजारीपाजारी यांचा आक्रोश बघून तीही बालिका टाहो फ़ोडून घाबरलेली तुम्हाला दिसू लागेल. जीवाचा आकांत करताना भासेल. पण झेन सदावर्ते त्याला अपवाद होती. ती तितक्या जीवघेण्या परिस्थितीलाही घाबरली नव्हती आणि आता आपणच ही परिस्थिती संभाळू शकतो, अशा आत्मविश्वासाने कामाला लागली. तिने पुढल्या काही मिनीटात मृत्यूच्या दाढेतून सतरा प्रौढ व वृद्धांना सुखरूप बाहेर काढून दाखवले. ह्याला विद्यमान शहरी जीवनातला चमत्कार मानावा लागेल. या चिमुरडीने नुसते कोणाचे प्राण वाचवलेले नाहीत, तर देशातल्या एकाहून एक मोठ्या विद्वान, शासकीय अधिकारी व राज्यकर्त्यांना लाज वाटण्याची स्थिती निर्माण करून ठेवली आहे.

अशा स्थितीत आग वरच्या दिशेने सरकत असते. बाराव्या मजल्यावरच्या आगीचे लोळ वरच्या दिशेने म्हणजे सोळाव्या मजल्याकडे येत होते आणि म्हणूनच जिन्याचा वा लिफ़्टचा उपयोग नव्हता. अग्निशमन दलाच्या मदतीशिवाय सुटका नव्हती. पण ती बाहेरची मदत येईपर्यंत आपला जीव अक्षरश: ‘मुठीत’ धरून जीवंत रहाण्याला सर्वाधिक महत्व होते. त्यासाठी कुठल्या सुविधा नव्हत्या, तर जे काही उपलब्ध होते, त्यातूनच चतुराईने उपयुक्त साधने उभारण्याला पर्याय नव्हता. आगीचा धुर घुसमटून मारून टाकतो, म्हणजे श्वसनाला प्रतिरोध करतो. आसपासच्या हवेत कार्बनचे प्रमाण वाढलेले असते आणि पर्यायाने प्राणवायूचे प्रमाण नगण्य होऊन जाते. म्हणून घुसमटून प्राणवायू अभावी माणसाचा मृत्यू झटकन होऊन जातो. अशा वेळी सुती कपडा ओला करून नाकतोंडाच्या भोवती गुंडाळला, तर धुर श्वसनात आला तरी त्यातील कार्बनचे कण ओल्या फ़डक्याला चिकटून बसतात आणि वस्त्रगाळ हवा फ़ुफ़्फ़ुसात पोहोचणे शक्य होते. भले यात प्राणवायूचे प्रमाण कमी असेल. पण कार्बनचे प्रमाण अत्यल्प झाल्याने धुरापासून बचाव होतो आणि घुसमटून येणारे मरण दुर लोटता येते. पुढली वा बाहेरची मदत मिळण्यापर्यंत माणसाला जगवता येते, झेन सदावर्ते या चिमुरडीने अत्यंध धीरोदात्त राहून क्रिस्टल टॉवरला आगीने वेढा घातला असताना एवढेच केले. कारण लहानपणी तिसरीत असताना शाळेमध्ये तिला असले काही कोणी शिकवलेले होते. प्रत्यक्ष प्रसंग ओढवला तेव्हा चारपाच वर्षापुर्वी अजाण वयात गिरवलेले धडे अंमलात आणले आणि केवळ त्यामुळेच १७ प्रौढवृद्धांना जीवदान मिळून गेले. कारण ते सर्वजण अग्निशमन दलाची शिडी व मदत येण्यापर्यंत जीवंत राहू शकले. झेनचे प्रसंगावधान महत्वाचे आहेच. पण त्यापेक्षा आपल्या पुस्तकी ज्ञानाच्या पलिकडे जाऊन त्याचा प्रसंगी योग्य वापर करण्याचा तिचा विवेक कौतुकास्पद आहे.

आता अर्थातच झेनचे सार्वत्रिक कौतुक होईल आणि महापौर, मुख्यमंत्री वा पंतप्रधानांनाही तिची पाठ थोपटावी असे़च वाटेल. अवघ्या परिसरात तिच्या छायाचित्रासह भव्यदिव्य फ़लक लागतील आणि माध्यमातून तिच्या गुणगानाला पारावार रहाणार नाही. मुद्दा झेनच्या कौतुकाचा वा प्रसंगावधान राखण्याचा मुळातच नाही. इवल्या पोरीने अशा प्रतिकुल प्रसंगात जो विवेक दाखवता आला, त्याचाच दुष्काळ आपल्या देशात व बुद्धीवादी प्रांतात पडला आहे. ती सर्वात मोठी चिंताजनक बाब झालेली आहे. बारा वर्षाच्या झेन सदावर्तेपाशी जे प्रसंगावधान आहे आणि प्रतिकुल स्थितीत सकारात्मक प्रतिसाद देण्याची बुद्धी आहे, तिचा दुष्काळ आपल्या देश समाजाला भेडसावतो आहे. त्याच इमारतीत नव्हेतर मुंबईत अशा अनेक आगी लागत असतात आणि त्यात अनेकांचा बळी जातच असतो. मग आपल्याकडे महापालिका, सरकार अग्निशमन दल अथवा अन्य शासकीय यंत्रणांना गुन्हेगार ठरवण्याची स्पर्धा सुरू होते. ते करताना आपण सगळे आपले प्रौढत्व, जबाबदार्‍या विसरून झेनच्या आईसारखे रडारड सुरू करत नाही काय? टाहो फ़ोडून रडणारी झेनची जन्मदाती वा अन्य आसपासचे शेजारी, यांनाही त्या क्षणी काय नाही व किती दुर्दशा भोवताली पसरली आहे, तेवढेच दिसत होते. पण झेन ही बारा वर्षाची कोवळी पोर, त्यातही आशेचा किरण शोधू शकली. घरातले सुती कपडे व ते भिजवायला असलेले पाणी, या मृत्यूच्या जबड्यातून अनेकांना बाहेर काढू शकेल, हा विचार तिच्या मनात आला. त्याचा अर्थ काय नाही त्यापेक्षाही काय आहे, त्याकडे डोळसपणे बघण्याची व त्यांचा उपयोग अशा संकटात करण्याची सकारात्मक बुद्धी शाबुत होती. जेव्हा बाहेर शेकडो कॅमेरे आगीचे लोळ दाखवून मृत्यूच्या सापळ्याचे कौतुक सांगत दाखवत होते, तेव्हाच ही चिमुरडी त्या मृत्यूला आव्हान देत एकाकी धावपळ करीत होती.

झेनच्या हाती कुठली साधने नव्हती आणि त्या इमारतीचा बिल्डर वा सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी हाती असूनही त्यांनी अक्षम्य चुका केलेल्या होत्या. पण वेळ त्यांच्या नावाने शंख करण्याची नव्हती. आपल्या वडीलधार्‍यांचाही धीर सुटलेला असताना इतक्या धीराने वागण्याची या पोरीची कुवत मोठी होती. हातात अधिकार वा साधनेही नसताना दुर्दम्य इच्छाशक्तीने तिने प्रसंगाचा सामना केला. तिला काय माहिती होते वा शिकवलेले होते, तेही दुय्यम आहे. मुद्दा घेतलेले ज्ञान व शिक्षण यांचा नसून, योग्य प्रसंगी त्यांचा उपयोग करण्याचा आहे. अन्यथा कितीही शिकलेले असा, ते ज्ञान पुस्तकात रहाते आणि संकटाचे बळी होण्याला पर्याय नसतो. झेन सदावर्तेने जे खुप आधी शिकलेले होते, त्याचा खर्‍या संकटात उपयोग केला आहे आणि तितके ज्ञान कुठूनही आज उपलब्ध आहे. इंटरनेट वा वाहिन्यांवरून आपल्याला सतत असले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जात असतात. त्यामुळे झेनला माहिती होते, ते इतरांनाही ठाऊक असायला अजिबात हरकत नव्हती. इतरही ते शिकलेले असतील. पण शिकलेले वापरण्यासाठी आपलीच विवेकबुद्धी निर्णायक असते. आजकालची बुद्धीमान हुशार माणसे आपली बुद्धी वापरायचेच विसरून गेली आहेत. म्हणूनच आपल्याला मृत्यूने वेढलेले असतानाही इतर कोणाच्या माथी खापर फ़ोडण्यात धन्यता मानतात आणि आपलाच बळी जाऊ देतात,. ह्या घटनेनंतर झेनला एका वाहिनीवर ऐकली. तिथली निवेदिका किती बुद्दू असावी? ज्यांना वा़चवले, त्यांनी तुझे आभार मानले काय, असा निर्बुद्ध सवाल तिने झेनला केला आणि ती चिमुरडी उत्तरली, ते सर्व घाबरलेले व बिथरलेले होते. तेव्हा आभार वगैरे मानण्याच्या स्थितीतही नव्हते. हे प्रसंगाचे भान असते, जे वाहिनीच्या कॅमेरासमोर मुलाखत देतानाही त्या कोवळ्या बालिकेला होते आणि प्रश्न विचारणार्‍या थोराड निवेदिकेला नव्हते. म्हणून झेन कौतुकाची आहे.

ही चिमुरडी नुसती धीरोदात्त व दुर्दम्य इच्छाशक्तीची मुर्ती नाही. आपल्या कर्तव्याचे श्रेय घेण्याचीही तिला गरज वाटलेली नाही. आज आपल्या समाजात इतक्या तरतम बुद्धीची किती मान्यवर माणसे उरलेली आहेत? कुठे रस्त्याचे काम केले वा बगिच्या बनवला, तर त्याचे श्रेय घेण्यासाठी मोठे फ़लक लावणारे नगरसेवक. इतर कुठल्या कामासाठी आपलीच पाठ थोपटून घेणारे आमदार मंत्री आपल्याला सगळीकडे दिसतील. त्यांच्या नाकर्तेपणाला दोष देऊन जगण्यातल्या वा योजनेतल्या त्रुटी ठळकपणे दाखवणार्‍या अभ्यासक, पत्रकार, जाणकारांचाही आपल्या समाजात तुटवडा नाही. सगळीकडे नकारात्मकता व नाकर्तेपणाचा इतका डोंगर उभा आहे, की त्याच्याआडून विधायक सकारात्मक विवेकाचा सूर्य डोकावायलाही घाबरत असावा. कुठली नैसर्गिक आपत्ती असो किंवा अपघात घातपात असो, आपण कसे हतबल आहोत आणि आपल्या हाती काहीच नसल्याचे सांगणार्‍यांचे जमाव चहूकडून आपल्याला घेरून उभे आहेत. त्यात म्हणूनच झेन सदावर्ते हा अपवाद आहे. तो नुसता कर्तबगार नाही, तर अंधारालाही प्रकाशित करणारा आशेचा किरण आहे. कुणा प्रसिद्ध कविच्या ओळी आहेत, ‘माना के अंधेरा घना है, लेकिन दिया जलाना कहा मना है?’ क्रिस्टल टॉवरच्या आगीने तसाच एक दिवा फ़क्त त्या १७ लोकांना दाखवलेला आहे. देशभरच्या नकारात्मकतेने हतबल होऊन गेलेल्या बुद्दीला व शहाण्यांनाही आशेचा किरण दाखवलेला आहे. झेन पोरी, तू दाखवलेला दिवा व त्याचा प्रकाश बघण्यासाठी या देशाच्या बुद्धीचे डोळे तर उघडे असायला हवेत ना? पण तू निराश होऊ नकोस. तुझ्यामुळे शेकड्यांनी चिमुरड्या झेन प्रभावित होतील. आपल्यातल्या सकारात्मकतेने या देशाला प्रकाशित करून टाकतील. कुठल्याही संकटात धीराने उभे राहून विवेकाने विचार करून प्रसंगावर मात कशी करावी, याचा धडा तुझ्याकडून गिरवताना आम्हाला आपलीच लाज वाटतेय आणि तुझा अभिमान वाटतोय.

14 comments:

  1. लेख वाचून अनेक झेन तयार व्हाव्यात हीच प्रार्थना

    ReplyDelete
  2. वरील लेख वाचल्यावर असे समजते कि झेन हि फक्त वयाने लहान आहे (चिमुरडी) पण तीने जे काही केलेलं आहे ते एखाद्या प्रौढ व्यक्तीसारख. म्हणजेच ती शरीराने लहान असली तरी मनाने ती प्रोध आहे.

    ReplyDelete
  3. भाऊ मी झेनचे सर्व वाहिन्यांना दिलेले बाईट्स ऐकले. या मुलीने दाखविलेल्या समयसूचकते चे कौतुकच आहे. परंतु मनाला अत्यंत खटकलेली एक बाब म्हणजे सदावर्ते या शुद्ध मराठी आडनावाची असून देखील जेना हे बाहेरचे नाव तिला दिलेल्या आई-वडिलांच्या कृपेने या मुलीला मराठीतला म सुद्धा येत नाही असे लक्षात आले. बर मुलींचे इंग्रजी देखील काही फार उत्कृष्ट म्हणता येईल असे नव्हते यावरून असे लक्षात येते की आपली तरुण कोवळी पिढी किती आंग्लाळत चाललेली आहे आणि तिची मूळ संस्कृतीशी नाळ किती लवकर तुटत चाललेली आहे. असो , तिने केलेले सर्व कौतुकास्पदच आहे परंतु जे खटकले ते सांगितले. कारण या पिढीला उद्या भाऊ तोरसेकर नावाचा कोणी भन्नाट पत्रकार होता आणि तो काय काय लिहायचा हेच माहिती नसेल कारण त्यांना ते वाचताच येणार नाही

    ReplyDelete
    Replies
    1. यासाठी भाऊंच्या लेखाचे रोज हिंदी व इंग्रजी भाषांतर होण्याची गरज आहे. नित्यनेमाने करण्याची ही गोष्ट आहे. इंग्रजी व हिंदी चांगल्यापैकी येणारे दोन स्वयंसेवक जर भाऊंना मिळाले तर हे होऊ शकेल. घेताय का कुणी पुढाकार? माझ इंग्रजी व हिंदी तेवढे चांगले नाही म्हणून हे विचारतोय?

      Delete
  4. Zen Zindabad

    Future is Bright !!!

    Hats Off !!!

    ReplyDelete
  5. Khar ahe khup jasti nakartmkta pasrvli ahe news and media ne. Sarkhe bomblat astata he wait to wait zale . Karat kahich nahi. Jitke paise Ani akkal he Lok murkh batmya dakhvnyat ghaltat tevdhya paisya madhe to prashna Mula pasun sutu shakto.
    Pratyek nagrikane roj ek satkarma samajasathi kel tar sare kahi sujlam hoil

    ReplyDelete
  6. झेन हे बुध्दीस्ट नाव आहे. तिचे वडील वकील असून आंबेडकरी चळवळीचे कार्यक्ते आहेत. राहिला प्रश्न इंग्रजीचा पोरगी 6 वीत आहे.

    ReplyDelete
  7. "इवल्या पोरीने अशा प्रतिकुल प्रसंगात जो विवेक दाखवता आला, त्याचाच दुष्काळ आपल्या देशात व बुद्धीवादी प्रांतात पडला आहे. ती सर्वात मोठी चिंताजनक बाब झालेली आहे. बारा वर्षाच्या झेन सदावर्तेपाशी जे प्रसंगावधान आहे आणि प्रतिकुल स्थितीत सकारात्मक प्रतिसाद देण्याची बुद्धी आहे, तिचा दुष्काळ आपल्या देश समाजाला भेडसावतो आहे. त्याच इमारतीत नव्हेतर मुंबईत अशा अनेक आगी लागत असतात आणि त्यात अनेकांचा बळी जातच असतो. मग आपल्याकडे महापालिका, सरकार अग्निशमन दल अथवा अन्य शासकीय यंत्रणांना गुन्हेगार ठरवण्याची स्पर्धा सुरू होते. ते करताना आपण सगळे आपले प्रौढत्व, जबाबदार्‍या विसरून झेनच्या आईसारखे रडारड सुरू करत नाही काय? टाहो फ़ोडून रडणारी झेनची जन्मदाती वा अन्य आसपासचे शेजारी, यांनाही त्या क्षणी काय नाही व किती दुर्दशा भोवताली पसरली आहे, तेवढेच दिसत होते. पण झेन ही बारा वर्षाची कोवळी पोर, त्यातही आशेचा किरण शोधू शकली. घरातले सुती कपडे व ते भिजवायला असलेले पाणी, या मृत्यूच्या जबड्यातून अनेकांना बाहेर काढू शकेल, हा विचार तिच्या मनात आला. त्याचा अर्थ काय नाही त्यापेक्षाही काय आहे, त्याकडे डोळसपणे बघण्याची व त्यांचा उपयोग अशा संकटात करण्याची सकारात्मक बुद्धी शाबुत होती."

    नुकत्याच मंजूर झालेल्या मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणारे दुसरे तिसरे कोणी नसून झेनचे वडील म्हणजेच डॉ. गुणरत्न सदावर्ते हे आहेत, हाही एक योगायोग म्हणावा लागेल.

    ReplyDelete