Sunday, August 26, 2018

ऐका ‘सत्य’नारायणाची कथा



पु. ल. देशपांडे यांच्या कुठल्यातरी एका कथेत घरगडी साक्षरता वर्गात जात असतो आणि अधूनमधून ते त्याची विचारपूस करत असतात. त्याने लिहीण्यावाचण्यात किती प्रगती केली, त्याचा आढावा घेत असतात. मग एकेदिवशी तो गडी म्हणतो आता सही करता यायला लागली. त्यासाठी त्याची पाठ थोपटल्यावर लेखक विचारतात, पुढे काय? तर गडी उत्तरतो, मास्तरला ढिसमीस करून टाकला. हा प्रकार दिर्घकाळ हास्याचे फ़वारे निर्माण करून राहिलेला आहे. पण आजकाल असे गडी पुरोगामी विचारवंत म्हणून उदयास आलेले आहे. त्यांना ज्यांनी डाव्या विचारांचे वा चळवळीचे धडे शिकवले किंवा गिरवून घेतले, त्यांनाच हे ढिसमीस करायला निघालेले दिसतात. अन्यथा पुण्य़ाच्या फ़र्ग्युसन कॉलेजातील सार्वजनिक सत्यनारायणाची ‘कथा’ इतकी साग्रसंगीत वाचली गेली नसती, की गाजली नसती. एकेकाळी मुंबईच्या गिरणगावात कम्युनिस्टांचा मोठा दबदबा होता. नुसता राजकारणात नव्हेतर सामाजिक सांस्कृतिक जीवनातही डाव्या विचारांचा ठसा उमटलेला होता. शाहिर अमरशेख, शाहिर गवाणकर असे डाव्या विचारांचे सांस्कृतिक कलादूत गिरणगावावर जादू करीत होते आणि कामधंद्याच्या जागी तर अन्य कुठल्या राजकीय विचारांना प्रवेशही नव्हता. दहीहंडीपासून सार्वजनिक गणेशोत्सवापर्यंत प्रत्येक जागी डाव्यांचाच पुढाकार असायचा आणि तळागाळातील समाजावर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी डाव्या विचारांचे नेते कॉम्रेड धार्मिक सामाजिक उत्सवात पुढाकार घेत होते. त्याचाच एक भाग म्हणून १९५० नंतरच्या काळात कापड गिरण्यांमध्ये कामगारांना सार्वजनिक सत्यनारायणाची पूजा घालण्याचा अधिकार व्यवस्थापनाला मान्य करायला लागण्यासाठी संपाचेही हत्यार कम्युनिस्टांनीच उपसलेले होते. आज त्यांचेच नातु-पणतु त्या पूजेला पुण्याच्या कॉलेजात किंवा अन्यत्र आक्षेप घेताना ऐकल्यावर बघितल्यावर पुलंचा तो घरगडी आठवला.

खरेतर हा स्थानिक मामला आहे आणि त्यात स्वत:ला राष्ट्रीय राजकारणातील नेता म्हणवणार्‍यांनी उडी घेण्याचे कारण नाही. पण शरद पवार थोडे दमलेले असले, मग आजकाल सुप्रियाताईंना आघाडी संभाळावी लागत असते. अन्यथा त्यांनी सत्यनारायणाच्या पूजेविषयी बहुमोल प्रबोधन कशाला केले असते? तुमच्या काय त्या धार्मिक पूजा वगैरे आपापल्या घरात करा. जाहिर ठिकाणी नकोत, असा अनाहुत सल्ला त्यांनी जनतेला देऊन टाकलेला आहे. आपलेच पिताजी इदसाठीच्या इफ़्तार पार्ट्या कुठे साजर्‍या करतात, हे सुप्रियाताईंना ठाऊक नाही काय? की त्यांना इफ़्तार पार्टी हा धार्मिक प्रकार असल्याचे ठाऊक नाही? राहुल गांधींच्या पिढीतले अनेक ताज्या दमाचे नेते माहिती नसलेल्या गोष्टीविषय़ी कमालीची ठाम विधाने करीत असतात. सुप्रियाताई त्याच पठडीतल्या असल्याने बहुधा त्यांना प्रबोधनाची उबळ आलेली असावी. हरकत नाही. पण तसले काही प्रबोधन वगैरे करीत असताना जरा आपल्या पिताजींनाही आवरावे ना? नको तिथे लोकरी टोप्या घालून जाहिर इफ़्तार पार्ट्यांमध्ये ते कशाला जातात? पक्षातर्फ़ेच असल्या पार्ट्यांचे आयोजन कशाला करतात? की इस्लाम नावाचा काही धर्म आहे आणि इदीनिमीत्त दिल्या जाणार्‍या उपवास सोडण्याच्या पार्ट्यांचा धर्माशी संबंध असल्याची माहितीच सुप्रियाताईंना अजून मिळू शकलेली नाही? आणखी एक गोष्ट, असले प्रबोधन इतरेजनांचे करण्यापुर्वी आपल्याच पक्षाचे माजी मंत्री व विद्यमान आमदार जीतेंद्र आव्हाड यांनाही जरा सार्वजनिक जागा किंवा स्थान म्हणजे काय, किंवा धार्मिक सण उत्सव म्हणजे काय, तेही सांगून ठेवायचे ना? कारण आव्हाड फ़ुले शाहू आंबेडकरांचे कार्य म्हणून असलेच नानाविध उद्योग सार्वजनिक ठिकाणी करण्यासाठी खातकिर्त झालेले आहेत. त्यात कोर्टाने हस्तक्षेप केला तर थेट सुप्रिम कोर्टापर्यंत जाऊन सार्वजनिक जा्गा अडवण्याचा व धुडगुस घालण्याचा विक्रम त्यांच्याच खात्यात जमा आहे.

मुंबईच नव्हेतर देशातील सर्वात मोठी उंच दहीहंडी उभारण्याचा व त्यासाठी भसाड्या आवाजात लाऊड स्पीकर वाजवण्याचा कार्यक्रम आव्हाड प्रतिवर्षी करीत असतात. जर सुप्रियाताईंनी तातडीने आव्हाडांना रोखले, तरी ठाणेकर जनता खुश होईल. कारण आव्हाडांच्या दहीहंडीमुळे मोक्याच्या जागी वाहतुकीची कोंडी होते आणि आसपास वास्तव्य करणार्‍या लाखो लोकांचे कान बधीर होण्यापर्यंत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्याचा विस्तार झालेला आहे. की चौकात दहीहंडी उभारून रस्ते व वाहतुक खोळंबवणे आव्हाडांच्या खाजगी घरातील बाहुल्यांचे खेळ आहेत, अशी सुप्रियाताईंची समजूत आहे? पुण्यातल्या कॉलेज कर्मचार्‍यांना वा इतरांना घरातले सण रस्त्यावर आणण्याच्या संदर्भात प्रबोधन करण्यात सुप्रियाताई, आव्हाडांना विसरून गेल्यात की काय? बाकीचे नाही तरी निदान असले उत्सव फ़ुले शाहू आंबेडकरांच्या पठडीतले नसल्याचे तरी या आपल्या उत्साही सहकार्‍याला समजवा ना? खुप उपकार होतील ताई ठाणेकरांवर. बाकी प्रबोधन करणारे पत्रकार वा वाहिन्यांना काय सांगावे? हे लोक प्रबोधनाच्या पलिकडे गेलेले आहेत. त्यांना धर्म म्हणजे काय आणि सत्य म्हणजे काय, त्याचाही पत्ता नसतो. सत बोलरे नार्‍या तर मांडवाला लागली आग, अशी एकूण बुद्धीक्षमता असल्यावर फ़र्ग्युसनही आर्ग्युसन होऊन आर्गुमेन्ट करू लागतो ना? त्यामुळे त्यांना असल्या चर्चा रंगवाव्याच लागतात. पण सार्वजनिक जागी सत्यनारायणाचे कथानक मुळातच मुंबईच्या डाव्या व कम्युनिस्टांनी सुरू केल्याचाही त्यांना थांगपत्ता नसतो. कुठेही हिंदूधर्मियांच्या चेहर्‍यावर त्यांना समाधान स्मित दिसले, की त्यामागे संघ वा सनातन असल्याच्या निद्रानाशाने अशा लोकांची झोप उडत असते. त्यांना दाभोळकर संपादक होण्यापुर्वी ‘साधना’ प्रकाशनाच्या छापखान्यातही सत्यनारायण घातला जाई हे कोणी सांगावे? त्यांचे जग मुळात अंनिस स्थापन झाल्यानंतर सुरू झालेले आहे ना?

पंधरा वर्षापुर्वी विकास देशपांडे या समाजवादी मित्राची पन्नाशी साजरी करायला आम्ही काही जुने मित्र सहकारी पुण्यात जमलेले होतो. माझ्या सोबत भाऊ कोरडेही आला होता. तेव्हा देशात वाजपेयी सरकार होते आणि विषय बोलता बोलता हिंदूत्वाकडे वळला. तर आमचा एक जुना सहकारी राम कांबळे प्रक्षुब्ध होऊन म्हणाला, आपण सगळेच ढोंगी झालोय. इकडे आम्ही गणपती घरी आणला, मग बाबा आढाव आमची हेटाळणी करतात. मग साधना छापखान्यात सत्यनारायण कशाला होतो? असे विचारल्यावर कोणी उत्तर देऊ शकत नाहीत. ही वास्तविकता असते. साधना छापखान्यातल्या कामगारांना निधर्मी तत्वज्ञान सांगण्यात अपेशी ठरलेले शहाणे जगाला धर्माचे थोतांड समजावू लागले, तर त्याचा कितीसा परिणाम होणार आहे? सवाल लोकांची हेटाळणी करण्याचा नसून त्यांना बदलण्याचा आहे. बदलण्यासाठी लोकांना आधी विश्वासातच घ्यावे लागते. हळुहळू त्यांच्यात बदल होत असतो. महात्मा फ़ुल्यांनी दिडशे वर्षापुर्वी अशा रितीने लोकांना दुखावण्याचे कार्य हाती घेतले असते, तर आज त्यांचे नाव घेतले गेले नसते. समाजात मिसळून व सुधारणांसाठी समाजाला राजी करून बदल घडवले जात असतात. श्रद्धा वा भावना दुखावून बदल होत नाहीत. उलट अधिकाधिक लोक परंपरावादी होतात आणि रुढींना चिकटून बसतात. पण कुठलेही विचार अर्धवट वाचून आपल्याला झालेले अपचन इतरांच्या माथी मारण्य़ाला हल्ली बुद्धीवाद समजले जाते. मग असे अर्धवटराव आपल्यालाच ढिसमीस करून टाकायला सज्ज असतात. उद्या त्यांनी फ़ुले शाहू आंबेडकरांनाही असेच ढिसमीस केल्यास नवल वाटणार नाही. नाहीतरी ज्या मेवानीचे पुण्यात भीमा कोरेगावच्या निमीत्ताने आगतस्वागत झाले, त्याने काय दिवे लावलेले आहेत? आंबेडकरांच्या विविध विचारांचे संदर्भ देऊन सवाल केल्यावर त्याने आपल्याला सगळेच आंबेडकर मान्य नसल्याचे बेधडक सांगून टाकलेले होते ना? मग फ़र्ग्युसनवर चाल करून आलेली अवलाद किती वेगळी आहे?

11 comments:

  1. Namaj on roads is what type. This is not objectionable to Congress & NCP.

    ReplyDelete
  2. भाउ खरच आम्हाला जुन्या या गोष्टींचा संदर्भ माहित नसतो ते तुम्हीच सांगू शकता तुम्ही नव्या जुन्या घटनांचे साक्षीदार आहात जोडनारा दुवा आहात सुप्रिया काय पवांरांना पन आधी कितीदा आपन पुनेरी पगडी घातली तेतरी कुठ आठवुन घ्यायचय पनहे कळत नाहीकी हे सर्व तथाकथित पुरोगामी पक्षसध्याsuicidal modeवर का आहेत मला तर वाटतकी कुनीतरी त्यांना झपाटलय जादुटोना केलाय नाहीतर वास्तवाच भान कशाला सुटलय राहुल पासुन सगळेच वेड्यासारखे का बोलतायत

    ReplyDelete
  3. मुळात, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक अंधश्रद्धा निर्मूलन समितीने समजावून घेणे आवश्यक आहे. घरी सत्यनारायण घालणे किंवा नवीन घराची वास्तुशांत करणे, ह्यासारख्या कार्यात तर कित्येकदा श्रद्धेपेक्षाही परंपरेचा भाग जास्त असतो असे मला वाटते. माणूस हा समाजात रमणारा प्राणी आहे आणि म्हणून चार लोकांना बोलावून काहीतरी सणवार साजरे करायला लोकांना आवडतात म्हणूनच साधना मासिकाच्या कार्यालयात सत्यनारायण पूजा घातल्या जातात. आता, जर साधना मासिकाचे अंक खपले नाहीत म्हणून कुणी सत्यनारायणाचा बोल लावले तर ती अंधश्रद्धा जरूर असेल पण केवळ हौस किंवा कर्मचाऱ्यांची पसंती म्हणून सत्यनारायण पूजा केली तर बिघडते कुठे? शेवटी मनाला उत्साह आणि विरंगुळा मिळावा म्हणून करायच्या या गोष्टी आहेत. काही लोक यासाठी अमली पदार्थ घेतात, काही भक्तीचा मार्ग घेतात. मग केवळ ड्रग्ज आणि दारू ह्या खऱ्या भौतिक गोष्टी आणि श्रद्धा ही मानलेली, म्हणून अं नि स श्रद्धेला आक्षेप आणि ड्रग्जचा पुरस्कार करणार का?

    अगदी मानसशास्त्रात पण हे मानले जाते की, प्रत्येक मनुष्य हा थोड्याफार प्रमाणात "मनोरुग्ण" असतोच. पण उपचारांची वेळ तेव्हा येते, जेव्हा ह्या मनोविकारांचा त्रास त्या मनुष्याला आणि त्याच्या कुटुंबियांना होतो. हाच सारासार निकष अंधश्रद्धा निर्मूलन समिती का लावत नाही? कुणी घरात सत्यनारायण घातला आणि प्रसाद दहा लोकांना वाटला, किंवा गणपती बसवला आणि मोदक/लाडू खाल्ले तर इतर कुणालाही त्रास होत नाही -- मग करू द्यात ना लोकांना त्यांचे त्यांचे सण.

    ReplyDelete
    Replies
    1. अनिस ही नास्तिकांची संस्था असून मुळात आस्तिकांच्या श्रद्धा, मग त्या अंध असोत वा नसोत, मोडणे के त्यांचे उद्दिष्ट आहे.

      Delete
  4. भाऊ
    अतिशय अभ्यास पूर्ण लेख.
    धन्यवाद.

    ReplyDelete
  5. मुळात सत्य-नारायणाच्या पूजेचा बाऊ करण्याची गरज नाही. सत्य-नारायणाच्या पूजेला फक्त धार्मिक कार्यक्रम म्हणता येणार नाही तो एक सामाजिक कार्यक्रम आहे. अशा छोट्या छोट्या समारंभामुळे सामाजिक एकोपा (कार्यालयीन एकोपा) वाढीस लागतो.
    गृहनिर्माण संस्थांमध्ये सुद्धा म्हणूनच सत्य-नारायणाची पूजा दरसाल आयोजित केली जाते.
    MNC कंपन्यांमध्ये मध्ये सत्यनारायण पूजा होत नाही...तिथे दिवाळी च्या आधी ट्रेडीशनल डे असतो. तिथे सुद्धा या गोष्टीचा उद्द्येश हा आपापसातील एकोपा वाढवणे हाच असतो.
    सत्यनारायण पुजेची अंधश्रद्धेशी सांगड घालून त्यावर वाद निर्माण करण्याचे जे प्रकार होत आहेत ते पूर्णपणे राजकीय हेतूने भारीत आहेत हे लक्षात घ्यावे आणि या विरोध करणाऱ्या मंडळींकडे दुर्लक्ष करावे.
    खरे गुन्हेगार राजकीय स्वार्थासाठी सार्वजनिक उत्सव साजरे करणारे आहेत. इथे दही हंडी चे उदाहरण देऊन भाऊंनी अगदी योग्य धागा पकडला आहे.
    फुले, टिळकांनी ज्या हेतूने सार्वजनिक उत्सवाचे समर्थन केले होते तो हेतू कधीच मागे पडला आहे....आता उरला आहे फक्त राजकीय स्वार्थ.
    तरी आपण सर्वांनी एकत्र होऊन राजकीय पक्षांना या सार्वजनिक उत्सवांपासून दूर ठेवण्याची वेळ आलेली आहे. अगदी छोट्या पातळीवर, साधेपणाने हे उत्सव साजरे करा पण या राजकीय कोल्ह्यांची देणगी आणि आयोजन स्वीकारू नका.

    ReplyDelete
  6. Bhau
    Je chalu aahe the chalu det. Its good for all Real Indians. These people are digging their own grave, so lets watch & N Joy.

    If someone feels that by any such comments people will stop doing what they are doing since yrs. then its stupidity. Rather this will have reverse effect, now those who aren't doing it publicly will start doing it.

    So let them shout with full volume, they are helping in other way.

    ReplyDelete
  7. ...मुळात सत्यनारायण असा कुठला देव आहे का? कारण ईतिहासात छत्रपति शिवाजी महाराजांनी अमूक एक किल्ला जिंकला म्हणून किंवा आग्र्याहून सुटका झाली म्हणून सत्यनारायण पूजा केली असा कुठे उल्लेख मिळतो का??
    खूपच अलीकडच्या काळात पडलेली ही प्रथा असावी असं वाटतं....

    ReplyDelete
  8. Zabardast Bhau, maza janma 1985 ch aahe ani tya mule mala mahiti navte ki sarvajanik satyanarayana chi pratha communist loka ni keliye

    ReplyDelete
  9. निधर्मी (Secular) व अधर्मी (Nihilist) यातील फरक समजून घ्यायला हवा. निधर्मी म्हणजे सर्व धर्मांवर सारखी श्रद्धा असणारा तर अधर्मी म्हणजे कोठल्याही धर्मावर श्रद्धा नसलेला म्हणजेच कम्युनिस्ट किंवा समाजवादी. सत्यनारायण पूजेला आक्षेप घेणारे अधर्मी आहेत एवढे समजून घेतले की मग पुढे काही चर्चा करण्याची गरज राहणार नाही.

    ReplyDelete