Monday, August 13, 2018

अलविदा सोमनाथदा

सोमनाथ चटर्जी yechury के लिए इमेज परिणाम

सोमनाथ चॅटर्जी यांचे नव्वदीच्या उंबरठ्यावर उभे असताना निधन झाले. मार्क्सवादी पक्षाचा हा बहुधा अखेरचा दिग्गज नेता. पण त्यांच्या निधनानंतर त्या पक्षाकडून कुठलीही उत्स्फ़ुर्त प्रतिक्रीया आली नाही. जे मार्क्सवादी नेते कॉ, गोविंद पानसरे किंवा रोहित वेमुलासाठी बाकीची कामे बाजूला ठेवून धावत कोल्हापूर वा हैद्राबादला पोहोचले होते, त्यांच्याच पक्षाचा व्यापक पाया घालण्यासाठी जनमानसात स्वत:ला गाडून घेणार्‍यांपैकी एक, असे सोमनाथदांचे जीवन होते. पण आजच्या त्यांच्याच वारसांना त्यांच्या निधनाने काही वाटू नये काय? १९७१ सालात संसदीय राजकारणात आलेले सोमनाथदा लोकसभेत प्रथमच निवडून आले आणि २००९ सालात त्यांची ही कारकिर्द लोकसभेचे सभापती म्हणून संपुष्टात आली. ती त्यांनी वा निवडणूकीने संपुष्टात आणली नाही, तर त्यांनीच उभ्या केलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नव्या तरूण नेतृत्वाने संपुष्टात आणली. कारण वर्षभर आधी संसदेत गाजलेल्या भारत-अमेरिका अणुकरार या वादातून सोमनाथदांचे पक्ष नेतृत्वाशी पटलेले नव्हते. त्या कराराला विरोध करताना पक्षाने युपीएच्या मनमोहन सरकारचा पाठींबा काढून घेतला होता. त्याचे पालन करीत सोमनाथदांनी सभापतीपद सोडून पक्षाच्या भूमिकेशी सुसंगत अशी विरोधी भूमिका घ्यावी, असा नेतृत्वाचा आग्रह होता. पण पक्षीय भूमिकेला झुगारून आपल्या सभापतीपदाची व संसदेची शान राखताना सोमनाथ चॅटर्जी शहीद झाले होते. त्यांची पक्षातून हाकालपट्टी झाली आणि पुढल्या काळात त्यांना राजकीय अज्ञातवासात जावे लागले. डाव्या चळवळीची तिथे शोकांतिका पुर्ण झाली. तळागाळाशी वा जनमानसाशी कुठलाही संपर्क नसलेल्या नव्या पिढीतल्या पुस्तकी विद्यापीठीय नेतृत्वाने त्यांचा बळी घेतला. पण प्रत्यक्षात तो सोमनाथदा या एका व्यक्तीचा राजकीय बळी नव्हता, तर पक्षातल्या लोकशाहीसह पक्षाचाच बळी घेतला गेला होता.

१९९६ सालात सोमनाथदांना सर्वोत्तम संसदपटू म्हणून सन्मानित करण्यात आले, तेव्हा आपला आदर्श डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी असल्याचे त्यांनी खुल्या मनाने सांगितलेले होते. त्यातून ते पक्षाच्या विचारधारेसह संसदीय राजकारणाला किती बांधील होते, त्याची खात्री पटते. मुळात स्वातंत्र्यपुर्व काळातील प्रसिद्ध वकील निर्मलचंद्र चॅटर्जी यांचे सुपुत्र असलेले सोमनाथदा इंग्लंडमधून कायद्याचे उच्चशिक्षण घेऊन भारतात आले आणि कायद्याचा व्यवसाय करताना सार्वजनिक जीवनात आले. वडील हिंदू महासभेचे असताना त्यांनी डाव्या विचारांची दीक्षा घेतली आणि मार्क्सवादी पक्षातून आपली राजकीय कारकिर्द सुरू केलेली होती. १९६७ सालात बंगालमध्ये डाव्या चळवळीने खुप मोठी झेप घेतली आणि त्यातला एक उमदा नेता म्हणून सोमनाथदा पुढे आले. १९७१ सालात प्रथमच लोकसभेची मध्यावधी निवडणूक झाली आणि त्यात लोकसभेवर प्रथम निवडून आलेले सोमनाथदा पुढे दहावेळा लोकसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले. त्यांचा पराभव एकदाच राजीव लाटेत नवख्या कॉग्रेस उमेदवार ममता बानर्जी यांच्याकडून झाला. पुढे आपला मतदारसंघ बदलून सोमनाथदा सलग लोकसभेत निवडून येत राहिले. डाव्या आघाडीचा बंगाली राजकारणात भक्कम पाया घालणार्‍या ज्योती बसू, हिरेन मुखर्जी अशा दिग्गजांचे ते सहकारी व सोबती होते. जनजीवनात पक्षाला स्थान मिळवून देण्यासाठी त्या पिढीने उपसलेल्या कष्टांची आजच्या येच्युरी वा प्रकाश-वृंदा करात अशा पिढीला कल्पनाही नाही. त्यांच्यासाठी राजकीय संघटना व मतदारांचे पाठबळ आयते आलेले होते. म्हणूनच २००८ सालात सोमनाथदांना पक्षातून हाकलून लावताना, नेत्यांना पक्षाच्या भवितव्याचीही फ़िकीर नव्हती. पण मार्क्सवादी पक्ष वा डाव्या आघाडीला टिकवून ठेवू शकणारा तो अखेरचा दुवा होता. त्याचीच हाकालपट्टी झाली आणि डावी आघाडी क्रमाक्रमाने ढासळत गेली.

१९९६ सालात त्या कोसळण्याला आरंभ झालेला होता आणि २००८ सालात त्याचा शेवटचा अध्याय येच्युरी-करात यांनी लिहीला. १९९६ सालात प्रथमच कॉग्रेस लोकसभेत सर्वात मोठाही पक्ष होऊ शकला नाही आणि भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. वाजपेयींचे तेरा दिवसांचे सरकार कोसळले होते आणि पर्याय म्हणून सर्व पक्ष एकत्र येऊन नवे सरकार बनवले जात होते. तेव्हा सर्वाधिक अनुभवी प्रशासक म्हणून बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी पंतप्रधानपद स्विकारण्याचा आग्रह धरला गेला, त्यांचीही त्यासाठी तयारी होती. पण उथळ अकलेचे नवे मार्क्सवादी येच्युरी व करात यांनी त्याला कडाडून विरोध केला. स्वपक्षीय बहूमत नसलेल्या सरकारचे नेतृत्व करायचे नाही, असा दंडक घातला गेला आणि पक्षशिस्त म्हणून ज्योतीबाबूंनी माघार घेतली. मात्र त्यांनी आपले विरोधी मत जाहिरपणे नोंदवले होते. पक्षाची ही हिमालायाएवढी मोठी घोडचुक असल्याचे ज्योतीबाबू म्हणाले होते. पण त्यांनी पक्षाचा आदेश मानला होता. ती डाव्यांच्या र्‍हासपर्वाची सुरूवात होती. तो र्‍हास सोमनाथदांची हाकालपट्टी होऊन संपला. कारण वंगालच्या राजकरणात पुढे ममतांच्या तृणमूल कॉग्रेसचा उदय १९९८ सालात झाला आणि २००८ सालात सोमनाथबाबूंना पक्षाच्या उथळ नेत्यांच्या विरोधात बंडाचा झेंडा खांद्यावर घ्यावा लागला. वर्षभरात झालेल्या लोकसभा निवडणूकीत कॉग्रेसशी आघाडी करून ममतांनी डाव्या आघाडीला बंगालच्या बालेकिल्ल्यातच लोळवले. आणखी दोन वर्षांनी विधानसभा निवडणूकीतही डाव्यांची सत्ता गेलीच. पण त्यांचा मुख्यमंत्रीही पराभूत झाला. याची मिमांसा वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकेल. पण त्याचे मुख्य कारण ज्योतीबाबू वा सोमनाथदा यांच्यासारखे पायाचे दगडच येच्युरी-करात अशा दिवट्यांनी उखडून टाकायचे पाप केलेले होते. त्याची मोठी किंमत त्या पक्षाला मोजावी लागलेली आहे. आज त्यांचे नामोनिशाण बंगालच्या राजकारणातून पुसले गेले आहे.

ज्या बंगालमध्ये २००० साल उजाडण्यापर्यंत भाजपाचा एकही आमदार स्वबळावर निवडून आणणे शक्य नव्हते, तिथे आज भाजपा डाव्यांपेक्षा शिरजोर पक्ष होऊन बसला आहे. ममता डाव्यांना खिजगणतीत धरत नाही आणि आपली सर्व शक्ती व सक्ती भाजपाच्या विरोधात जुंपताना दिसत आहेत. ही येच्युरी करातांची किमया आहे. त्यांनी सोमनाथदा यांच्यासारखे पायाचे दगड उखडून टाकण्याचे जे कर्तृत्व गाजवले, त्याच पुण्याईवर भाजपा आज बंगाल व त्रिपुरात पाय रोवून उभा राहू शकला आहे. ही वास्तविकता समजून घेतली, तर सोमनाथदा यांची महती लक्षात येऊ शकेल. दिसायला हे एक नाव आहे. पण ती एक व्यक्ती नसून एका पिढीचा अध्याय आहे. कुठल्याही संघटना संस्थांना भरभराटीला आणायला एका पिढीने पाळामुळांसारखे स्वत:ला गाडून घ्यावे लागते. तेव्हा पानाफ़ुलांचा फ़ळफ़ांद्यांचा पसारा बहरत असतो. त्या फ़ळाफ़ुलांना जमीनीत गाडून घेणार्‍या पाळामुळांची कदर नसली, तर झाडाचा भर ओसरू लागतो. त्यावर पोसलेल्या बांडगुळांनाच झाडाचा गाभा समजून बसले, मग झाड मरणासन्न होऊन जाते. डाव्या चळवळीची तीच शोकांतिका होऊन बसली आहे. जनता, सामान्य लोक व जमिनीशी संपर्क नसलेली विद्यापीठीय बांडगुळे, या चळवळीला फ़स्त करून बसली आहेत. सोमनाथदांचा अशाच बांडगुळी राजकारणाने बळी घेतला. त्यांच्या रुपाने तेवणारी नव्या पालवीची अपेक्षाही संपुष्टात आलेली आहे. नव्या पिढीला या इतक्या मोठ्या वटवृक्षाकडून काही घेता आलेले नसेल, तर तो सोमनाथदांचा अंत नसून डाव्या चळवळ व मार्क्सवादी पक्षाचा शेवट आहे. देखण्या दिवाणखान्यात मिरवणार्‍या शोभेच्या झाडांना वटवृक्षाची महत्ता कधी समजली आहे? सोमनाथदांची महत्ता येच्युरी वा आजच्या हल्लागुल्ला करणार्‍या युवा पिढीला कुठून समजावी? त्यांच्या अंत्ययात्रेत लाल सलामच्या गर्जना केल्या जातील. पण त्या सोमनाथदांच्या अचेतन देहापेक्षाही निर्जीवच भासतील ना?



4 comments:

  1. Atishay yogya shradhanjali dilit somnathda na bhau

    ReplyDelete
  2. सोमनाथदा १० वेळा लोकसभेत निवडुन आले होते हे आजच्या डावे नेते बघता नवल वाटते येचुरी करात हे स्वता निवडुन येउ शकत नाहीत ती मुळ डावी चळवळ पन नाही आता.नास्तिक डाव्यांना भारतात जिहादींच पाठीराखे समजतात या पक्षाचे मुळ असलेल्या चीनमध्ये जिनपिंग कोनत्याही धर्माचे लाड करत नाहीत परवाच तिथे मशीदीचा एकच घुमट ठेवुन बाकी पाडले मुस्लिम निदर्शन करतायत पन सरकार ठाम आहे बाकी बाबीत पन करडी नजर असते

    ReplyDelete
  3. उत्कृष्ट लेख.

    ReplyDelete
  4. सोमनाथदा यांना ही खरी श्रध्दाजली. सोमनाथदांचे चरित्र आपण समोर आणले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमी शिवाय अंत्ययात्रेची मीडियाने पण जास्त दखल घेतली नाही. असो हल्लीच्या राजकारणात असेच चालायचे.

    ReplyDelete