गेल्या डिसेंबर महिन्यात कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांची राहुल गांधींनी पक्षातून हाकालपट्टी केली होती. ती आता मागे घेतली असून, अय्यर पक्षात परतले आहेत. अर्थात तेव्हाही त्यांची सहा वर्षासाठी हाकालपट्टी झाली होती आणि अय्यर यांनीही पक्षात परतण्याचा विश्वास तेव्हाच व्यक्त केलेला होता. त्यांचे शब्द अखेर खरे ठरले असून, त्यानंतर पक्षाध्यक्ष झालेल्या राहुल गांधींनी आपलेच शब्द खोटे पाडून दाखवले आहेत. डिसेंबर महिन्यात गुजरात विधानसभेची निवडणूक रंगात आली होती आणि त्याच मुहूर्तावर अय्यर यांनी पक्षाला हानिकारक ठरेल अशी भाषा वापरली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका समारंभात नेहरूंवर टिका केल्याने चवताळलेले अय्यर यांनी मोदींना नीच अशा शब्दात शिवीगाळ केलेली होती. त्यावर गदारोळ झाला आणि त्याला उत्तर नसल्याने राहुल गांधींनी अय्यर यांची पक्षातून हाकालपट्टी केली होती. अशा रितीने पक्षशिस्त व भाषेच्या मर्यादांचा भंग आपण सहन करणार नसल्याची गर्जना राहुलनी केलेली होती. पण आठ महिन्यातच गर्जना विरघळली आहे आणि राहुलनी हाकालपट्टी मागे घेतली आहे. त्यातही काही नवे नाही. अशा गोष्टी तात्पुरत्या असतात आणि लौकरच त्या मागेही घेतल्या जात असतात. तसे नसते तर त्या हाकालपट्टीनंतर अय्यर यांच्या निवासस्थानी झालेल्या एका गुप्त बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित राहिले नसते. किंवा त्यांना जाब विचारल गेला असता. पण तसे काही झाले नाही. याचा अर्थच राहुलनी तेव्हा टिकेचा धुरळा खाली बसावा म्हणून हाकालपट्टीचे नटक केलेले होते आणि आता धुरळा विसरला गेल्यावर अय्यर यांना सन्मानाने पुन्हा पक्षात स्थान दिलेले आहे. पण विषय तेवढ्यापुरता नसून बहुधा अय्यर यांना राहुलनी आपले सल्लागार चाणक्य म्हणूनच माघारी आणलेले असावे. कारण आगामी लोकसभेसाठी राहुलनी योजलेली रणनिती अय्यर यांची खास जुनी योजना आहे.
२०१६ सालच्या आरंभी तामिळनाडू व बंगालच्या विधानसभा निवडणूका झाल्या होत्या आणि त्याचे निकाल लागल्यानंतर अय्यर यांनी कॉग्रेसच्या आनंदाचे जसे वर्णन केलेले होते, तेच आता राहुल यांनी कॉग्रेसचे धोरण म्हणून स्विकारलेले आहे. तेव्हा त्या दोन्ही राज्यात शून्यवत असलेल्या भाजपाचा पुरता धुव्वा उडालेला होता. तिथे पुर्वीपासूनच भाजपाची फ़ारशी संघटना नाही की लोकमतावर भाजपाचा प्रभाव नाही. म्हणूनच मोदींनी कितीही भाषणे केली वा अमित शहांनी कितीही प्रतिष्ठा पणाला लावली, म्हणून भाजपाला लक्षणिय प्रगती करणे अशक्य होते. भाजपाची दोन्ही राज्यात पुर्वीपेक्षा मते वाढलेली असली तरी मुठभरही जागा जिंकण्यापर्यंत मजल गेली नव्हती. त्यामुळे मणिशंकर अय्यर कमालीचे सुखावले होते. त्या निकालावर प्रतिक्रीया देतानाही त्यांनी आपल्या उरात न मावणारा आनंद पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलेला होता. पण त्या दोन्ही राज्यात कॉग्रेसलाही कुवतीइतके यश मिळालेले नव्हते. सहजिकच कॉग्रेस नेता असूनही अय्यरना कसला अनंद झाला होता? पत्रकारांनी तोच प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना अय्यर म्हणाले होते, कॉग्रेस विजयी यशस्वी होण्याचा मुद्दाच नाही. भाजपाला पराभूत करणे हा विषय आहे आणि त्या दोन्ही राज्यात भाजपा पराभूत झालेला आहे. मग कॉग्रेससाठी मुद्दा काय होता? तर आपला पक्ष वाढवणे किंवा सशक्त करणे, हे कॉगेसचे धोरण असू शकत नाही. तर भाजपाला अपशकून करणे हे कॉग्रेसचे उद्दीष्ट असले पाहिजे, अशी काहीशी अय्यर यांची भूमिका होती. म्हणूनच ते भाजपाच्या पराभवाने इतके सुखावले होते, की स्वपक्षाच्या दयनीय पराभवाची त्यांना क्षिती नव्हती. पुढली लोकसभा निवडणूक राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस लढवणार आहे आणि राहुल गांधींनी योजलेली व्युहरचना वा रणनिती काहीशी तशीच आहे. मग अय्यर यांच्यापेक्षा चांगला सल्लागार त्यांना कुठला सापडू शकेल?
मध्यंतरी हैद्राबाद येथे एका खास जागी राहुल गांधी यांनी काही संपादक ज्येष्ठ पत्रकार व कंपन्यांच्या प्रमुखांशी संवाद साधला होता. तिथे बोलताना त्यांनी कॉग्रेसची २०१९ साठीची रणनिती उघड केली. आपल्याला पंतप्रधान होण्याची घाई नाही. नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यापासून रोखणे. हे आपले उद्दीष्ट असल्याने राहुलनी अत्यंत स्पष्ट भाषेत सांगितले होते. नुसती भाषा तशी नव्हती तर त्यांनी आकड्यातही आपले समिकरण सांगितलेले होते. भाजपाला २३० च्याही खाली जागा मिळाल्या तर पक्षातील बंड व मित्रपक्षांच्या दबावामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. २०१९ साठी कॉग्रेसला तितकेच ध्येय गाठायचे आहे. त्यासाठी प्रादेशिक व लहानमोठ्या राजकीय पक्षांना सोबत घेऊन भाजपाला २३० च्या आत रोखणे, हे आपले उद्दीष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर मग पंतप्रधान पदाचे दावेदार कोण आणि राहुल कधी पंतप्रधान होणार, असाही प्रतिप्रश्न विचारला गेला. तेव्हाही त्यांनी विरोधकांना संधी मिळाली तर कोणीही पंतप्रधान होऊ शकतो. कॉग्रेस वा राहुल त्यासाठी आग्रही नाहीत, असेही स्पष्टीकरण दिलेले होते. ही अय्यरनिती झाली. आपल्याला काय मिळणार त्याच्याशी कर्तव्य नाही. आपण ज्याला शत्रू मानतो, त्याची संधी हुकायला हवी, किंवा त्याचे नुकसान व्हायला हवे अशी ही रणनिती आहे. बाकीच्या जुन्याजाणत्या कॉग्रेस नेत्यांना भाजपाला अपशकून करण्यापेक्षा कॉग्रेसला सत्ता मिळवण्यात रस आहे. त्याला अपवाद एकच नेता आहे ते मणिशंकर अय्यर होत. या रणनितीला कुठलाही ज्येष्ठ नेता पाठींबा देत नसल्याने बहुधा राहुलनी अय्यरना पक्षात पुन्हा आणलेले असावे. त्यांच्या व अय्यर यांच्या भूमिका एकजीव झालेल्या आहेत. देश वा पक्षाचे काय होईल त्याच्याशी दोघांना कर्तव्य नसून, मोदी नावाच्या व्यक्तीद्वेषाने दोघेही कमालीचे भारावलेले आहेत. त्यामुळे़च ही चमत्कारीक वाटणारी रणनिती पुढे आलेली आहे.
त्यातही काही गैर शोधण्याचे कारण नाही. इंदिराजींचा द्वेष करणारेही अशाच पद्धतीने विचार करायचे. इंदिराजी संपल्या तर आपल्याला संधी मिळेल, अशी त्याकाळात एकत्र यायला धडपडणार्या विरोधी पक्षीयांची ठाम भूमिका असायची. पण इंदिराजी पराभूत झाल्यावर देश वा राजकारण कोणी चालवायचे, याविषयी त्यांच्यापाशी कुठले उत्तर नसायचे. राहुल व अय्यर तसाच विचार करीत आहेत. मात्र त्यात त्यांनी काही गोष्टी गृहीत धरल्या आहेत. २३० पेक्षा जागा कमी झाल्यास भाजपात बंडखोरी उफ़ाळून येईल व मोदी विरोधात पक्षातलेच अनेक नेते उभे ठाकतील, हा आशावाद त्यामागे आहे. पण अशा रितीने राजकीय बंड होऊ शकले असते, तर कॉग्रेसमध्येही इतक्यात बंड व्हायला हवे होते. लागोपाठ पराभव अंगावर ओढवून आणणार्या राहुल वा सोनियांना पक्षातला कोणी आव्हान कशाला देऊ शकलेला नाही? तर बंडखोरी व्यक्तीगत पातळीवर ठिक असते. पण जबाबदारी घेण्याची किती लोकांची तयारी असते? मोदींना हरवू शकणारा कोणी नेता विरोधी पक्षात कोणाला मिळत नसेल, तर भाजपात तरी २३० जागा मिळवू शकणारा अन्य कोण नेता शिल्लक आहे? ११६ पासून भाजपाला २८२ पर्यंत घेऊन जाण्याची किमया मोदींनीच केलेली आहे आणि अनेक विधानसभा पादाक्रांत करण्यासाठी झपाटल्यासारखे काम शत्रुघ्न वा यशवंत सिन्हा करू शकत नाहीत. मग बंड कोण करणार? शंभरही जागा कॉग्रेसला मिळवता येणार नसतील, तर त्यांच्या नेतृत्वाखाली अन्य कुठले पक्ष सरकार स्थापन करायला पुढे येतील? अय्यर किंवा राहुल यांची ही मानसिकताच पराभवाची तपस्या करणारी आहे. त्यांना मोदी हरवत नसतात. ते मुळातच मनाने हरलेले असतात. मतदार त्यावर मतदानातून शिक्कामोर्तब करतात. म्हणूनच अय्यर यांच्या पक्षात माघारी परतण्याला महत्व आहे. २०१९ लोकसभेत दणकून आपटण्याची राहुलनी चालवलेली ती तयारी असू शकते.
मणिशंकर अय्यर काँग्रेस मध्ये परतले / परत बोलवून घेतले हा शुभशकुन मानायचा का ? असल्यास कोणाचा भाजप का काँग्रेस ?
ReplyDeleteभाउ एक निरीक्षन खर ठरल तर काॅंगरेस किंवा विरोधी यासाठी चिंतेची गोष्ट आहे यु ट्युब वर मोदीविरोधी खुप चॅनल आहेत ते मोदींवर कांगरेसचे विषय घेउन टिका करत असतात पन त्याला लाइक काॅमेंट करनारे फक्तमुस्लिमच आहेत हे कस काय? त्या वेबजरसर्व विषय घेत असतील तर मोदींवर नाराज असलेले सर्व लोक बघायला हवेत पन तस होत नाही आणि एक परवा एका चॅनलवर बुलढाण्यामधील दुर गावचा शेतात पेरणी करनारा शेतकरी दाखवला होता तो मोदींना मत देनार म्हनत होता कारन विचारल तर मोदींना मुसलमान जरा दबुन राहतात हे नेमक कारन सांगितल मारतात भेदभाव करतात अस नाही बोलला दबुन असतात खर कारन सांगितल इतर बाबतीत म्हनाला की ते हमीभाव आत्तहत्या कांगरेसच्या काळत होत होत्या परत आली तरी होत राहतील अस बोलला ही मानसीकता तुम्ही परवा लेखात लिहीली होती की हिंदुना अपमान नकोय ते इतक खोलवर रुजलय की दुर्गम शेतकरीला पन कळल
ReplyDelete