Sunday, August 19, 2018

थोडे गप्प रहाल?

Image result for आम्ही सारे दाभोळकर

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला पाच वर्षे पुर्ण होत असतानाच त्यांचा मारेकरी हाती लागल्याचे सीबीआयने जाहिर केले आहे. अर्थात यापुर्वीही असे दावे पोलिस, विशेष तपास पथक आणि इतरांनी केलेले आहेत. पण त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. जणू या हत्येचे राजकारण करण्याला मीठमसाला पुरवण्यापुरत्या बातम्या झळकावण्यात आल्या. यावेळी एक मोठा फ़रक असा आहे, की पकडलेल्यापैकी दोघांनी आपण दाभोळकर हत्येमध्ये सहभागी असल्याची कबुली दिलेली आहे. म्हणजे तसा सीबीआयचा व पोलिसांचा दावा आहे. त्याची सुरूवात मुंबईनजिक नालासोपारा येथे झाली. तिथे वैभव राऊत नावाच्या व्यक्तीला घरी धाड घालून एटीएसने पकडले. त्याच्या घराची झडती घेताना काही स्फ़ोटके सापडली आणि त्याची जबानी घेताना हाती आलेल्या माहितीच्या आधारे आणखी दोघांना अटक झाली होती. त्यापैकी एकाने दाभोळकरांच्या हत्येत सहभागी असल्याचे व आपल्या सहकार्‍याचे नाव कथन केले. ती माहिती या पथकाने सीबीआयला कळवली व त्यांनी सचिन अणदुरे याला ताब्यात घेतले. अधिक तपास करता त्याने गुन्ह्याची कबुली दिलीच. पण आपणच दाभोळकरांवर गोळ्या झाडल्याचेही कबुल केले. निदान सीबीआयचा तसा दावा आहे. यापुर्वी ज्यांना अटक झाली वा ताब्यात घेण्यात आले, त्यांनी तशी कुठलीही कबुली दिल्याचा कोणी दावा केला नव्हता. नुसत्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. वावड्या उडवल्या जात होत्या. मग तेवढ्या आधारावर सनातन वा हिंदू दहशतवादाचा डंका पिटण्यात पुरोगाम्यांनी धन्यता मानलेली होती. यापैकी कोणालाही प्रत्यक्ष दाभोळकरांचा मारेकरी वा त्यामागचा सुत्रधार मिळण्याची कधी गरज वाटली नाही. आरोपासाठी निमीत्तावरच सगळे खुश होते.

इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. शरद कळसकर याच्याकडून सचिन अणदुरेचे नाव समोर आले आणि यात पकडलेले नवे संशयित कुठेही फ़रारी नव्हते, की दडी मारून बसलेले नव्हते. ते आरामात गेली पाच वर्षे आपापल्या नित्यजीवनात रमलेले होते आणि उजळमाथ्याने वावरत होते. इतका मोठा गुन्हा केल्यावर पळून जाणे वा दडी मारून बसणे, ही प्राथमिक बाब असते. पण त्यांना असे कुठे पळून जायची गरज भासली नाही. खरेच हे मारेकरी असतील, तर ते इतके निर्धास्त कशाला असावे? या प्रश्नाचे उत्तर महत्वाचे आहे. एक तर ते निर्दोष असावेत. किंवा ज्या पद्धतीने तपासकाम चालू होते आणि बातम्या चर्चा रंगलेल्या होत्या, त्यांनीच या मारेकर्‍यांना निश्चींत केलेले असावे. मागल्या निदान साडेचार वर्षात या विषयात जितक्या चर्चा झाल्या वा बातम्या रंगल्या, त्यावर विश्वास ठेवायचा; तर अणदुरे वा कळसकर यात खुनी असू शकत नाहीत. कारण आधीच्या तपासात भलतीच नावे समोर आलेली होती व भलतेच संशयित पकडण्यात आलेले होते. त्यांना पकडल्यानंतर धागेदोरेही हाती लागल्याचा दावा करण्यात आलेला होता. पण नव्यापैकी एकाचेही नाव कुठूनही समोर आलेले नव्हते. पण दुसरी बाजू अशी, की आधी झालेली धरपकड पुरोगामी व अंनिस यांना खुश करणारी होती. पण त्यात कसलेही तथ्य नसावे. केवळ अंनिस व बोंबा मारणार्‍यांना खुश करण्यासाठी तपास चालू असावा आणि त्यांना समाधानी करण्यासाठीच कुणाचीही धरपकड झालेली असावी. याचा एकत्रित अर्थ असा, की अशाच उपटसुंभ बोंबल्यांमुळे प्रत्यक्ष मारेकरी शोधण्यात व तपासकामात नको तितके अडथळे आणले गेलेले होते. योग्य मार्गाने तपास होण्यात ‘आम्ही सारे दाभोळकर’ सर्वात मोठा अडथळा बनलेले होते. गेली दोन वर्षे तो गदारोळ कमी झाला आणि मग खर्‍या तपासाला सुरूवात झाली. मगच मारेकरी हाती लागलेले असावेत.

अशा घटनांच्या बातम्या ठळकपणे झळकत असतात आणि आपोआप त्यातल्या खर्‍या गुन्हेगारांना तपासकामाचा सुगावा लागत असतो. सहाजिकच तपासाचा विचका उडालेला बघून, हे आरोपी निश्चींत झालेले असावेत. अंनिसचे भुरटे जितका गदारोळ करतील, तितके आपण सुरक्षित असल्याची खात्रीच त्यांना झालेली असावी. म्हणून ते आपल्या नित्यक्रमात रममाण होऊन गेलेले असावेत. ज्यांची आ्ता धरपकड झालेली आहे, त्यांचे मित्र परिचित व शेजारीपाजारी ते किती सामान्य नागरिक होते, त्याची ग्वाहीच देत आहेत. त्याला आरोपींच्या चारित्र्याचा दाखला मानण्याचे कारण नाही. पण त्यातून त्यांच्या निवांत जगण्यातली सहजता लक्षात येते. बाकी जगाला गुन्हेगाराचे अंतरंग ठाऊक नसते. पण चोराच्या मनात चांदणे म्हणतात, तशी साशंकता त्याच्या वागण्यात बोलण्यात दिसतच असते. अस्वस्थता लपवाछपवी दिसायची रहात नाही. पण तपासाची दिशा स्पष्ट असेल, तर आपल्याला कुठलाही धोका नसल्याचा आत्मविश्वास निर्धास्त करीत असतो. तसाच निर्धास्तपणा यात दिसतो. मग त्याला जबबदार कोण? तपासकामात व्यत्यय आणणारे व उठसूट घोषणाबाजी करून पोलिसांना विचलीत करणारे त्याला जबाबदार नाहीत काय? पुरोगाम्यांना सनातन संस्था व तिच्या साधकांना पकडण्याची इतकी उतावीळ झालेली होती, की खरे मारेकरी सुटले तरी चालतील. किंबहूना खरे मारेकरी त्यांना नकोच होते. सनातनवाल्यांना पकडण्याचा आग्रह होता. आताही या आरोपींनी गुन्हा कबुल केल्याची माहिती समोर आलेली असली, तरी आपल्या संघटनात्मक संबंधांचा कुठलाही खुलासा केलेला नाही. अजून त्याचे स्पष्टीकरण यायचे आहे. म्हणूनच यातला बोलविता धनी वा सुत्रधार हाती लागण्यापर्यंत उतावळ्यांनी आपली अक्कल पाजळण्याचा उत्साह आवरणे गरजेचे आहे. जे समोर आले आहे, त्यावरून राजकारणाचा फ़ड रंगवण्याची गरज नाही.

कारण मुद्दा दोनतीन मारेकरी वा त्यांचे साथीदार पकडण्याचा नसून, यामागचे कारस्थान उलगडण्याची गरज आहे. कुठल्याही संघटनेला बदनाम करण्यापेक्षाही त्यातले कारस्थान उघड होण्याला महत्व आहे. अन्यथा अशी कोणीही खुनाची कबुली देऊन खर्‍या सुत्रधाराला वाचवू शकतो. तो तपासाचा व कायद्याच्या राज्याचा पराभव असेल. आज कबुली देणारा नंतर उलटू शकतो आणि खटलाही उभा रहाण्यापुर्वीच गडबडून जातो. शिवाय खरे कारस्थानी मोकळे राहिले तर आणखी निरपराधांचा बळी जाण्याचा धोका असतो. या विषयात ‘आम्ही सारे’ नामक तमाशा झाला नसता व पोलिसांना मोक्ळेपणाने तपास करता आला असता, तर केव्हाच हे मुक्त फ़िरणारे मारेकरी हाती लागले असते. कदाचित पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्याही नसत्या. पण आणखी एक गोष्ट झाली नसती. या हत्याकांडावरून मोठे राजकारणही झाले नसते. त्याच राजकारणाने व त्यातून चाललेल्या तोंडपाटिलकीने ह्या मारेकर्‍यांना निवांत उजळमाथ्याने जगता आले, ही वस्तुस्थिती आहे. कुणाच्याही लढ्यामुळे वा तपासाने हे आरोपी हाती लागलेले नाहीत. एका वेगळ्य़ाच प्रकरणातले धागेदोरे शोधताना पोलिसांच्या जाळ्यात वैभव राऊत हाती लागला आणि त्याचाही मागोवा घेताना कळसकर व अणदुरे यांच्यापर्यंत तपास यंत्रणा पोहोचलेल्या आहेत. आंदोलनाचे तमाशे करणार्‍यांमुळे इतका विलंब झाला हे विसरता कामा नये. दुसरी अतिशय महत्वाची बाजू म्हणजे चारपैकी तीन हत्या कॉग्रेसी सत्ता असताना झालेल्या होत्या आणि उलगडा होताना राज्यात हिंदूत्ववादी समजल्या जाणार्‍यांचे सरकार सत्तेत आहे. म्हणूनच त्याचे राजकारण करण्याची अजिबात गरज नाही. त्यामुळे कदाचित हे उलगडत आलेले हत्याकांड पुन्हा गुढरहस्य होऊन अंधार्‍या गल्लीत निघून जाण्याचा धोका आहे. तेव्हा निदान पाच वर्षांनी दाभोळकरांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्याच अनुयायी चहात्यांनी आपल्या उतावळेपणाला लगाम लावण्याची कृपा करावी. पोलिस तपास आणि न्यायालयात गुन्हा सिद्ध करणे, हे बैठकीत निषेधाचे प्रस्ताव संमत करण्याइतके सोपे काम नसते.

7 comments:

  1. भाउ खरच काही कळत नाहीये काय चालुय या प्रकरनात काय होइल ते पन महित नाही खुप राजकारन आहे गुतांगुंत आहे त्यामुळ गप्प राहनच बर आज एक गृहित धरुन भलतच समोर यायच पन कोनी ैऐकनार नाही

    ReplyDelete
  2. पूर्वी ' ए.टी.एस ' ने गुन्हेगारांना पकडण्यासाठी जाळे विणले होते असे सान्गतात. आता ' सी.बी.आय ' ने त्याचे स्वतःचे जाळे विणले आहे असा त्यांचा दावा आहे. ह्या दोन्हीही जाळ्यात हे तपासणारेच सारखे पाय अडकून पडत आहेत की काय असा भास होतो. भाऊ .....' अंनिसचे भुरटे ' हा शब्द प्रयोग फार आवडला. या भुरट्याना ' मिरवायचीच ' इच्छा जास्त व पेपरात ' फोटू ' छापून येण्याचीही तीव्र इच्छा असावी. फुकटचा ' टी.शर्ट ' आणि फुकटचा ' बैनर ' आणि वर नाश्ता , चहा वेगळेच. त्यातही झोपेतून उठून.....केस न विंचरता... चुरगळलेले कपडे घालून व खांद्यावर एक शबनम पिशवी लटकवली की एकदम ' फुरोगामी ' चे बिरुद लागते ते वेगळेच.

    ReplyDelete
  3. खरे खुनी सापडावेत असे खुद्द हमीद आणि मुक्ता दाभोळकरना सुद्धा वाटत नसावे.

    ReplyDelete
  4. पोलिसांच्या व्हर्जनवर फारसा विश्वास नाही.

    खुनानंतर काही दिवसांनी प्रत्यक्षदर्शींच्या वर्णनावरून दोन खुन्यांची चित्रे रेखाटली होती. आतापर्यंत ज्यांना ज्यांना संशयावरून पकडलंय, त्यांचे चेहरे व रेखाचित्रे यात कोणतेही साम्य नाही.

    खुनानंतर काही महिन्यांनी नागोरी व खंडेलवाल नावाचे शस्त्रविक्रेते खुनाच्या संशयावरून पकडले होते. कोणताही पुरावा न मिळाल्याने त्यांना ९० दिवसानंतर जामीन मिळाला.

    नंतर विनय पवार व सारंग अकोलकर हे सनातनचे कार्यकर्ते संशयित खुनी म्हणून जाहीर झाले. त्यांची रेखाचित्रेही प्रसिद्ध झाली. ते आजतगायत मिळालेले नाहीत.

    नंतर डॉ. वीरेंद्र तावडे नावाच्या सनातनच्या कार्यकर्त्याला खुनाच्या आरोपाखाली अटक केली. तो मागील २ वर्षे विनाजामीन तुरूंगात आहे.

    आता ही नवीन माणसे पकडली आहेत. दाभोळकरांच्या खुनाला ५ वर्षे पूर्ण होण्यास फक्त २ दिवस असताना खुनी सापडल्याचे जाहीर होणे हा योगायोग नाही. आपल्यावरील टीकेची धार बोथट करण्यासाठी हे एक नवीन नाटक असावे.

    उद्या खुनाला ५ वर्षे पूर्ण होण्याच्या दिवशी कमी आरडाओरडा व्हावा यासाठी नवीन बकरे पकडले आहेत. २ वर्षांनी हे सुद्धा जामीनावर सुटतील.

    याआधीचे सुरवातीचे दोन अनोळखी चेहरे, नागोरी आणि खंडेलवाल, विनय पवार व सारंग अकोलकर, समीर गायकवाड व वीरेंद्र तावडे हे अजूनही संशयित खुनी आहेत. त्यांच्याविरूद्ध अजूनतरी पुरावा मिळालेला नाही. आता काही नवीन माणसे पकडली आहेत. हा खेळ सुरूच राहील.

    ReplyDelete
  5. "सावरकर टिळक आगरकर, आम्ही सारे दाभोलकर" अशा घोषणा हे विवेकवादी समाजसुधारक कधी देतील का?

    ReplyDelete
  6. असं म्हणतात , कधी कधी तोंड उघडण्यापेक्षा ते बंद ठेवण्यात शहाणपणा असतो . आता पुरोगामी आणि शहाणपणा यांचा दूरान्वये तरी संबंध आहे का?

    ReplyDelete
  7. आतापर्यंतचा तपास आणि सद्याच्या बातम्यात फरक नाही. अधिकारी म्हणून अधिकारच जाहिरात जास्त आहे. न्यायालयात टिकणार नाही. साफ नियत....

    ReplyDelete