Wednesday, August 1, 2018

नरेंद्र मोदी पत्रकारांशी बोलावेच कशाला?

Image result for modi media cartoon

नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन किंवा त्यांनी लोकसभेत बहूमत मिळवून आता चार वर्षापेक्षा अधिक काळ लोटलेला आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केलेला एक बदल म्हणजे परदेशी दौर्‍यावर जाताना पत्रकारांचा लवाजमा घेऊन जाण्याची प्रथा मोडीत काढली. अन्यथा ती एक पद्धतच होऊन गेलेली होती. पंतप्रधान परदेशी जाणार म्हटल्यावर त्यात काही डझन पत्रकारांना परदेशवारी आयती घडून जायची. मग त्या पत्रकारांना अशा वारीत असलेले अधिकारी व राजकीय नेत्यांशी सलगी करण्याची संधी मिळत असे. त्यातून पत्रकार व राजकीय नेत्यांसह शासकीय अधिकार्‍यांचे सगेसंबंध निर्माण व्हायचे. थोडक्यात युपीएच्या काळात असे काही ठेवणीतले पत्रकार आणि सरकार यांच्यातली लक्ष्मणरेषा धुसर होत गेली. अनेक पत्रकार थेट सत्तादलालीचे हस्तक बनुन गेले. त्याचा पर्दाफ़ाश नीरा राडिया टेप्समधून झालेला आहे़च. सहाजिकच सरकारी खर्चाने चाललेला हा कुंभमेळा बंद करणे रास्तच होते. पण त्याखेरीजही पंतप्रधान अन्य वेळी पत्रकारांशी बोलत नाहीत, की मुलाखती देत नाहीत अशी कुरबुर कायम चाललेली असते. त्याचा अर्थ मोदी पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला घाबरतात, असाही त्याचा अर्थ लावला गेला. त्यात किती तथ्य आहे ते पत्रकारांनाच माहित. कारण त्यामुळे मोदींचे काही बिघडलेले नाही की सामान्य जनतेचेही काही बिघडलेले नाही. याचा अर्थ यापुर्वीचे पंतप्रधान अधूनमधून पत्रकारांशी बोलत असायचे किंवा सरसकट मुलाखती द्यायचे, असे अजिबात नाही. क्वचितच असे प्रसंग यायचे. पण गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासूनच मोदींनी पत्रकारांशी अबोला धरला. त्यामुळे आता पंतप्रधान झाल्यावर त्याचा सतत उल्लेख होत असतो. मात्र त्यात तथ्य नाही. एकदोन वाहिन्या व परदेशी पत्रकारांना मोदींनी सविस्तर मुलाखती दिलेल्या आहेत आणि सतत जनतेशी त्यांचा संपर्क चालूच असतो. मग ह्या अबोल्याचे रहस्य काय?

२००२ सालात गुजरातमध्ये दंगल झाली आणि त्यानंतर मोदींना कोंडीत पकडण्याचे कंत्राट घेतल्यासारखी माध्यमे व ठराविक नामवंत पत्रकार वागले. मोदींना राक्षस वा सैतान म्हणून पेश करण्याची जणु माध्यमांची शर्यतच या काळात लागलेली होती. सहाजिकच अशा पत्रकारांना मोदी टाळू लागले. त्याचा अर्थ पत्रकारांच्या प्रश्न वा सरबत्तीला मोदी घाबरलेले नव्हते. पण त्याच त्याच प्रश्नांना तीच तीच उत्तरे देऊन त्यांना कंटाळा आलेला होता. तरीही अधुनमधून त्यांनी अशा मुलाखती दिल्या होत्या. पण त्यातून निष्पन्न काहीच होत नव्हते. पत्रकारांचे प्रश्न बदलत नव्हते, की त्यांना दंगलीच्या पलिकडले काही विचारायचेच नव्हते. मग त्यांचा व आपला वेळ वाया घालवण्यात काय अर्थ असू शकतो? त्यामुळे मोदींनी पत्रकारांना टाळण्याचा पवित्रा घेतला. त्याची दोन उदाहरणे देता येतील. कुठल्याशा वाहिनीसाठी करण थापर मोदींची मुलाखत घेणार होता आणि पहिलाच प्रश्न त्याने दंगलीविषयी काढला. तिथेच मोदींनी मुलाखत थांबवली. कारण आधी ठरल्याप्रमाणे दंगलीविषयी कुठलाही प्रश्न विचारणार नसल्याचे थापरने वचन दिलेले होते. पण तिथूनच सुरूवात केली आणि मोदींनी मुलाखतच सोडून दिली. तेच नंतर २०१२ च्या गुजरात विधानसभा प्रचारात झाले. मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये इंडीयाटुडेच्या राहुल कन्वरला त्यांनी प्रवेश अशाच अटीवर दिलेला होता. तरीही त्याने दंगलीचा विषय उकरून काढला आणि मोदींनी मुलाखत थांबवली. पुढे लोकसभा निवडणूकीपुर्वी इंडियाटुडेच्या एका समारंभात प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम होता आणि जावेद अन्सारी नावाच्या पत्रकाराने तोच प्रश्न काढला. त्याला मोदींनी दिलेले उत्तर सर्वांसाठी सर्वकाळ सारखेच आहे. या प्रश्नांची उत्तरे शेकडो वेळा देऊन झालेली असून तरीही उत्तर हवे असेल, तर इंटरनेटवर जाऊन बघावी असे मोदींचे उत्तर होते. यावरून लक्षात येते, की पत्रकारांना मोदींची मुलाखत घ्यायची नसून फ़क्त दंगलीच्या खपल्या काढायच्या असतात.

आजकालच्या वाहिन्यांच्या मुलाखती बघितल्या तर त्यात पाहुण्याच्या मनातले काही काढून घेण्यापेक्षा त्याला तिथे आमंत्रित करून अपमानित करण्याला प्रधान्य दिले जाते. म्हणजे आपण इतक्या मोठ्या पदावरील व्यक्ती वा नेत्याला कसे फ़ैलावर घेतले, त्याचे प्रदर्शन त्या पत्रकाराला मांडायचे असते. कुठल्याही वाहिनीच्या पत्रकाराचे प्रश्न व बोलण्याचा आव बघितला, तर समोरचा पाहुणा तद्दन मुर्ख असून आपण त्याचे कान उपटत असल्याचा थाट असतो. त्याची उत्तरे झुगारून त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला जात असतो. अशाच एका मुलाखतीमध्ये तेव्हा अर्थमंत्री असलेल्या प्रणबदा मुखर्जींनी करण थापरला नेमक्या शब्दात झापले होते. तुला एकामागून एक नुसते प्रश्न विचारायचे आहेत आणि उत्तर मात्र कुठलेही ऐकायचा संयम तुझ्यापाशी नाही, असे त्यांनी सुनावल्यावर थापरचा नखा उतरला होता. तसेच हल्ली राजदीप सरदेसाईच्या बाबतीत प्रणबदांना करावे लागलेले होते. त्यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमीत्ताने त्यांची राजदीप मुलाखत घेत होता आणि तेव्हा त्याच्या आगावूपणाला चपराक देताना प्रणबदा म्हणाले, तुझ्या चॅनेलवर चमकण्याची मला अजिबात हौस नाही. तुला मुलाखत हवी आहे. पण तू कोणा ऐरागैर्‍याशी बोलत नसून, एका माजी राष्ट्रपतीशी बोलत आहेस याचे भान ठेव. हे शब्द ऐकल्यावर या बेमुर्वतखोर शहाण्याचा नक्षा उतरला आणि त्याने तिथेच माफ़ी मागून नंतर सभ्यपणाने ती मुलाखत पुर्ण केली होती. मोदींना नेमक्या अशा पत्रकारांशी बोलायचे नाही. कारण या लोकांना पंतप्रधान वा मोदींचे मनोगत लोकांसमोर मांडण्यात स्वारस्य नसून, पंतप्रधानाला आपण कसे सरळ केले, त्याचा टेंभा शा मुलाखतीतून मिरवायचा असतो. पाहुण्याला बळीचा बकरा बनवायचा असतो. ज्यांना प्रसिद्धीच्या हव्यासापोटी तशी किंमत मोठी वाटत नाही, ते त्यात सहभागी होतात. मोदींना अशा प्रसिद्धीची अजिबात गरज उरलेली नाही.

मागल्या लोकसभा प्रचारापुर्वीच मोदींनी देशभरातील माध्यमे व त्यांचे मुखंड आपल्यावर शिकारीसारखे तुटून पडणार, याची खुणगाठ बांधलेली होती. म्हणूनच नव्याने अस्तित्वात आलेल्या सोशल मीडियातून मोदींनी बस्तान बसवले होते. आपला एक अफ़ाट अनुयायी निर्माण करून ठेवलेला होता. त्याच्याशी थेट संवाद साधून मोदींनी आपल्या जनसंपर्काचे स्वतंत्र माध्यम उभारले होते. सहाजिकच प्रचलीत मुख्य प्रवाहातील माध्यमे त्यासमोर तोकडी व लंगडी पडू लागली आणि प्रेक्षक वाचक वर्गात आपले स्थान टिकवण्यासाठी माध्यमांना मोदींच्या मागे मागे पळण्याची नामुष्की आली. निवडणूकांचा मोसम सुरू झाला आणि मोदींची लोकप्रियता आपापल्या वाहिनीला वापरता यावी, म्हणून बहुतांश वाहिन्या व वर्तमानपत्रांची तारांबळ उडाली. पण माध्यमांचे परमेश्वर किंवा सुपरस्टार म्हणवून घेणार्‍या कुणालाही मुलाखत द्यायची नाही, असा कटाक्ष ठेवूनच मोदींनी या माध्यमांना व संपादक पत्रकारांना शरणागती पत्करायला भाग पाडले. त्यांनी सर्वात आधी कुठल्याही वाहिनीपेक्षा वाहिन्यांना बातम्या पुरवणा‍र्‍या वृत्तसंस्थेला प्रदीर्घ मुलाखत दिली. तीच एकमेव मुलाखत असली तरी वृत्तसंस्थेची सेवा घेणार्‍या सर्वच वाहिन्यांना उपलब्ध होती आणि मग स्पर्धेसाठी ती जवळपास प्रत्येकाला दाखवावीच लागली. पुढे मतदानाचे दिवस संपत आले आणि प्रत्येक वाहिनी व संपादकांची मोदींच्या मुलाखतीसाठी तारांबळ उडालेली होती. त्या अगतिकतेचा लाभ उठवित मोदींनी बहुतेक वाहिनींच्या स्टार पत्रकाराला वगळून दुय्यम पत्रकाराला मुलाखत देण्यास मान्यता दिली. त्यातून त्यांनी त्या माध्यमांना त्यांची त्रुटी दाखवून दिली. माध्यमांना मोदींची गरज असून त्यातून मिळणार्‍या प्रसिद्धीसाठी माध्यमे गरजवंत नसल्याचे सिद्ध केले. दुर्दैव असे, की त्यातला बोध अजून अनेक पत्रकारांच्या मेंदूत शिरलेला नाही.

आज सोशल माध्यमे विस्तारली आहेत आणि प्रचलीत माध्यमांची माहिती क्षेत्रातली मक्तेदारी संपुष्टात आलेली आहे. तांत्रिक प्रगतीमुळे कोणीही सामान्य माणुस चक्क वर्तमानपत्र वा चित्रणातून जगापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा व स्वस्त होऊन गेला आहे. प्रसिद्धीसाठी कुणाला माध्यमांची गरज उरलेली नाही. त्याची मोदींना पक्की जाण आहे. त्यांनी सर्व माध्यमे अतिशय कुशलतेने वापरण्याची कला साध्य केलेली आहे. सार्वजनिक जीवनातील म्होरक्यांना प्रसिद्धीची गरज असते. दंगली नंतरच्या कोंडीला फ़ोडताना मोदींनी हे कौशल्य हस्तगत केले आणि पत्रकारांच्या राजकारणाला असा शह दिलेला आहे, की आज माध्यमे व पत्रकारांची सार्वजनिक क्षेत्रातली सर्व मक्तेदारी निकालात निघालेली आहे. पुर्वी लोकांपर्यंत पोहोचण्याचा वाहिन्या वा वर्तमानपत्रे म्हणजे पत्रकार हा एकमेव मार्ग होता. तोच निकालात निघाल्यावर मोदींनी त्याच पत्रकारांची पत्रास कशाला ठेवावी? आपली अवहेलना व अपमान सोसून ती प्रसिद्धी कशाला मागावी? ‘मनकी बात’, सोशल मीडिया किंवा जाहिरसभा यातून मोदी सतत थेट जनतेच्या संपर्कात असतात. त्यात लोकांशी विचारांची देवाणघेवाणही करीत असतात. मग त्यात मध्यस्थ नाही म्हणून तक्रार कशाला हवी? मध्यस्थ नेहमी गफ़लत करण्याची शक्यता असते. त्याची गरजच काय? शिवाय ज्यांना जनता व नेता यांच्यात दरी निर्माण करायची आहे आणि दिशाभूलच करायची आहे; त्यांना मध्ये घ्यायचेच कशाला? म्हणून मोदी पत्रकारांशी बोलत नाहीत. तशी त्यांना गरज उरलेली नाही. वडाची साल पिंपळाला लावण्याला कोणी पत्रकारिता समजत असेल, तर ती त्यांनाच लखलाभ होवो. मोदीच कशाला, आजकाल अनेक नेते वा सार्वजनिक क्षेत्रातील लोकांना पत्रकारांची गरज वाटेनाशी झाली आहे. ती स्थिती पत्रकारांनीच स्वत:वर आणलेली आहे. म्हणून मोदी पत्रकारांशी बोलत नाहीत. कारण हे माध्यम आता मोदींसाठी तरी कालबाह्य होऊन गेले आहे.

13 comments:

  1. उतरत्या विवेचन.नेहमींप्रमाणें.

    ReplyDelete
  2. भाऊ एकदम छान लेख
    मुळात याचे कारण काय
    तर या दिवसाची मिडिया ही व्यवसायिक झलेली आहे.पेड न्यूज़,टीआरपी .देशपेक्षा माझा फायदा किती होतोय.या गोष्टी ना आज असामान्य महत्व प्राप्त झलेले आहे.मोदिनी या गोष्टी फार पूरवी ओळखलेला आहेत .त्यामुळे मुलखती तर सोडाच पण प्रसरनाचे हक्क सुध्हा त्यानी दुरदर्शनला दिलेले आहेत.त्यातुन त्यांचे दोन हेतू साध्या होतात एक आशा पत्रकरना टाळता येते आणि दुसरं दुरदर्शंचा फायदा.त्यामुळे मोदी या सारवाना 2019 मध्ये सुधा पुरुन उरेल एवढे मात्र नक्की

    ReplyDelete
  3. भाऊ तुम्ही म्हणताय ते खरंच आहे ,४ वर्षात मोदींनी या मीडिया ला कस जागेवर आणलाय याचा पुरावा एक म्हणजे BARC नावाची मीडिया रेटिंग करणाऱ्या संस्थेने निरीक्षण केलाय कि मोदींची छबी टीव्ही वर दिसली कि चॅनेलचा रेटिंग वाढत ,राज्यात मोदी असतील तरी त्या लोकल चॅनेल च रेटिंग वाढत.,म्हणून जाहिराती मिळवण्यासाठी का होईना विरोधी चॅनल पण मोदींना दाखवतात ,२०१९ साली हे प्रमाण नक्कीच वाढणार ,मोदी त्या वेळी इतरांचे space घेणार ते सुद्धा पत्रकारांना न पाळता फुकट

    ReplyDelete
  4. भारतात तरी राजकारण्यांनी मीडिया ना वापरता आपली बात पोहोचवणं शक्य झालय ,त्याच श्रेय अर्थात मोदींना ,इतर आता नक्कल करतायत ,उदा राहुल ते आता ट्विटर द्वारे बोलतात .पूर्वी आपणच सर्व जाणते आहोत असा मिरवणाऱ्या पत्रकारांना social मीडिया अक्षरशः बदनून काढते ,कि काहींनी ac बंद केलीत .ते भाजप ला जबाबदार धरतात पण असा नाहीये,लोक खोटे बोलण्याची शिक्षा देतात.

    ReplyDelete
  5. अविश्वास ठररावाने तर मोदींन जनतेपर्यंत पोहचण्याची अायती संधी उपलब्ध करुन दिली.मग काय मोदींनी त्याचा कसा उपयोग करुन घेतला हे सर्व देशाने पाहिले आहे.काय गरज पडलीय मोदींना जनतेपर्यंत पोहचण्यासाठी असल्या पत्रकारांची?

    ReplyDelete
  6. वडाची साल पिम्पळाला लावण्यात कौशल्या प्राप्त केलेले ' सुमार ' केतकरही त्यामुळेच ' खान्ग्रेस ' मध्ये प्रवेशकर्ते झाले.

    ReplyDelete
  7. Dear Mr. Torsekar , I am regular reader of "Jagta Pahara " The problem I found is the tyepes are too small and it is very difficult to read it so I hereby request you that increase the size of the type on PC and mobile

    ReplyDelete
    Replies
    1. Manoj, it would be more convenient if you use zoom / magnify option on your browser rather than requesting author to change his settings.

      Delete
  8. I would think that the last line is applicable to almost everybody... Not just generators of news, but also consumers of news...

    ReplyDelete
  9. चाळीस लाख बांगला देशींवर चा लेख येण्याची वाट पहात आहे

    ReplyDelete
  10. Ata bhau ch modi bhakt zalyasarakha vatatay

    ReplyDelete
  11. भाऊ मी देखील अवैध बांगलादेशी वर तुमच्या लिखाणाची प्रतिक्षा करतोय...

    ReplyDelete