Friday, August 31, 2018

नक्षल्यांचा ‘तहलका’ झाला काय?

tarun tejpal के लिए इमेज परिणाम

या आठवडाभर नक्षली मठाधीशांना पकडल्यावर गहजब करणार्‍यांना तरूण तेजपाल आठवतो? आता त्यालाही पाच वर्षे होऊन गेलीत. साधारण याच आसपास २०१३ सालात ते प्रकरण गाजले होते. मोदी पंतप्रधान नव्हते आणि युपीएचे सरकार देशात होते. अशावेळी गोव्यात तेजपालने त्याच्या तहलका माध्यमसमुहाच्या वतीने एक भव्य सेमिनार भरवला होता आणि त्याच्याच वर्तमानपत्रात काम करणार्‍या एका तरूण पत्रकार महिलेचे लैंगिक शोषण झाल्याचा गवगवा झाला होता. गोवा पोलिसांनी त्यावर गुन्हा दाखल केला आणि तपास आरंभला होता. हा तेजपाल नक्षल्यांसारखाच दिल्लीकर बुद्धीमंत आणि विचारवंत पुरोगाम्यांचा लडका होता. सहाजिकच त्याच्या बचावाला अनेकजण बुद्धीच्या माकडउड्या मारीत पुढे आले होते आणि बिचार्‍या त्या पिडीतेच्या मदतीला को्णीही पुढे यायला राजी नव्हता. तेव्हा तरूण तेजपालने केलेला दावा कोणाला आठवतो काय? आपण पुरोगामी सेक्युलर आहोत आणि म्हणूनच गोव्यातले भाजपा सरकार आपल्याला मुद्दाम सुडबुद्धीने वागवत आहे, असा त्याचा प्रत्यारोप होता. मात्र गोवा पोलिस तात्काळ त्याला पकडायला गेलेले नव्हते आणि तेजपालने भूमिगत होऊन नक्षली कार्यशैलीची साक्ष दिलेली होती. पोलिसांनी त्याला फ़रारी घोषित केले नव्हते. पण तरीही आपल्या मागचा ससेमिरा टाळण्यासाठी तेजपालने अटकपुर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तोही फ़ेटाळला गेला. परंतु त्याच्यामागे पोलिस नसले तरी तेजपाल बिळातून बाहेर यायला राजी नव्हता. अशावेळी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकारांसमोर येऊन सांगितले, की त्या मुलीशी तेजपालने केलेले चाळे लिफ़्टच्या सीसीटिव्हीमध्ये पकडले गेले असून पोलिसांनी ते ताब्यात घेतलेले आहेत. त्यानंतर तेजपाल शेफ़ारला आणि बिळातून बाहेर येऊन त्याने पोलिसांनाच उलटे आहान दिलेले होते. पुढे काय झाले? काही आठवते?

लिफ़्टमधले सीसीटिव्ही चित्रण मिळाल्याचे पर्रीकरांनी सांगितले आणि तेजपाल जोशात आला. त्याने उलट आव्हान असे दिले, की चित्रण असेल तर थेट प्रक्षेपण करून टाका. जगाला दिसेल की आपण त्या मुलीशी कुठलाही अतिप्रसंग केलेला नाही. इथेच तेजपाल थांबला नाही. त्याने आपण गोव्यात येऊन पोलिसांसमोर हजर होणार असल्याचे सांगितले आणि तो हजर झालाही. कारण आपल्या विरोधात कुठलाही पुरावा पोलिसांकडे नसल्याचा त्याला आत्मविश्वास होता. कोर्टात हजर होताच आपली पुराव्याअभावी सुटका होणार, याविषयी त्याच्या मनात काडीमात्र शंका नव्हती. एकाहून एक मोठे वकील त्याने गोव्याच्या कोर्टात हजर ठेवलेले होते. पण कोर्टामध्ये हजर झाल्यावर त्याला जामिन मिळाला नाही. तर पोलिसांना त्याची हवी तेवढी कस्टडी कोर्टाने देऊन टाकली. कारण पत्रकारांसमोर जो पुरावा मुख्यमंत्री पर्रीकरांनी घोषित केला होता, तसे लिफ़्टमधले कुठलेही चित्रण पोलिसांपाशी नव्हते. कारण लिफ़्टमध्ये सीसीटिव्ही कॅमेराच नव्हता. मग कोर्टासमोर पोलिसांनी कुठला पुरावा दिला होता? कुठला पुरावा निर्विवाद होता? तर तेजपाल त्या मुलीचा पाठलाग करून तिच्याशी लगट करीत असल्याचे लॉबीतील चित्रण उपलब्ध होते आणि पोलिसांनी तेच ताब्यात घेतले होते. सहाजिकच लॉबीतील कॅमेराविषयी तेजपालला गाफ़ील ठेवण्यासाठीच पर्रीकरांनी पत्रकार परिषदेत लिफ़्टमधल्या चित्रणाचा पुरावा सांगून त्याला पुर्ण गाफ़ील केलेले होते. गुन्हे तपासाच्या कामात ही लबाडी अनेकदा केली जाते. गुन्हेगाराला गाफ़ील केले, मग त्याच्या आत्मविश्वास वाढतो आणि तो आगावूपणे आपल्या पायांनी सापळ्यात चालत येत असतो. सहासात महिने या प्रकरणाचा खोदून तपास करणार्‍या पुणे पोलिसांना यात गुंतलेली मोठी नावे बघूनच सावधपणे पावले उचलणे भाग होते. पण त्याहीपेक्षा त्यांना अधिकाधिक गाफ़ील करणे भाग झाले असावे. मग कोर्टात उडालेला फ़ज्जा हाच एक सापळा नसेल काय?

पुरेसे कागदपत्र नाहीत. भक्कम पुरावे नाहीत. नुसत्याच गावगप्पा ऐकून पोलिसांनी धरपकड केली; असे म्हणायची मुद्दाम सोय ठेवली गेली काय? अतिरीक्त पोलिस महासंचालक त्याचा तपास करण्यात गुंतले आहेत. त्यांच्याकडून इतकी फ़ालतू चुक, अटक व कोर्टाच्या बाबतीत होऊ शकेल असे वाटत नाही. उलट जाणिवपुर्वक अशा चुका पोलिसांनी केल्या असाव्या काय? यातून सगळी गॅन्ग बिळातून बाहेर यावी आणि कोर्टातून रिमांडला नकार मिळाल्यावर त्या गॅन्गला गदारोळ करू द्यायचा, हा मुळातच खेळला गेलेला पोलिसी डाव नाही ना? कारण त्या अटकेला सुप्रिम कोर्टाने स्थगिती देऊन आरोपींना नजरकैदेत ठेवण्याचा अभूतपुर्व निर्णय दिलेला आहे. अशी कुठलीही कायदेशीर तरतुद नाही. म्हणजेच पोलिसांचा दावा कोर्टाला अमान्य वा फ़डतूस वाटला असता, तर तिथल्या तिथेच आरोपींना जामिन देऊन वा सुटका करून विषय संपवला गेला असता. पण कोर्टाने नजरकैदेत ठेवायचा मधला मार्ग शोधला आहे. म्हणजेच भक्कम पुरावे समोर आणायची संधी पोलिसांना दिलेली आहे. सगळे नाही तरी शुक्रवारी पत्रकार परिषदेत परमींदर सिंग यांनी मांडलेले पुरावे, गरजेच्याही पलिकडले आहेत. त्यामुळे जेव्हा ह्या गोष्टी पुढल्या सुनावणीत कोर्टासमोर येतील, तेव्हा सातही आरोपींना निश्चीतपणे पोलिसांच्या कोठडीत पाठवले जाणार आहे. कारण प्रथमदर्शी इतका पुरावा पुरेसा असतो. पण त्या निमीत्ताने छुपे नक्षल समर्थक चव्हाट्यावर आणायला, ही खेळी पुरेशी ठरलेली आहे. तात्काळ अटकेला मोकळीक दिली असती, तर याच भंपक लोकांनी सरन्यायाधीशांवरही आरोप केले असते. तसा तमाशा यावर्षीच्या आरंभी आधीच होऊन गेलेला आहे. सहाजिकच पहिली फ़ेरी त्यांना जिंकू दिली, तर त्यांना निदान आपल्याच तोंडाने कोर्टाचे गुणगान करणे भाग झाले आहे. उद्या निकाल विरुद्ध गेल्यास त्यांना कोर्टावर पक्षपाताचा आरोप करायला आता जागा राहिलेली नाही.

जी टोळी सरन्यायाधीशाच्या अधिकारालाही आव्हान देते आणि त्यांच्यावरही महाअभियोग भरायच्या गमजा करते, तिला आज देशाचे कोर्टही वचकून आहे. याला दहशत म्हणतात. म्हणूनच पोलिसांनी लावलेला हा सापळा असू शकतो. मुद्दाम अपुरे पुरावे आणि पहिली बाजी मारून जाण्याची संधी दिलेली असू शकते. त्यात बाजी मारली, की फ़ुशारलेले पुरोगामी भुरटे शेफ़ारून जाऊन कोर्टाच्या निकालाचा आधार घेऊन न्यायाचे गुणगान करणार. दुसर्‍या डावात कोर्टाने उलटा निर्णय दिल्यावर मात्र त्यांना प्रत्यारोप करण्याची संधी उरत नाही. हा डाव असू शकतो. पण त्या निमीत्ताने अनेकजण आता उघडे झाले आहेत. त्यातून आणखी कोणाकोणावर पाळत ठेवावी आणि कोणाचे धागेदोरे शोधावे, ते चेहरे आता समोर आलेले आहेत. सहासात महिने चाललेला तपास आणि हजारो इमेल वगैरे चाळल्यावर इतक्या सहजासहजी आरोपी निसटण्याची शक्यता नसते. पण जाणिवपुर्वक त्यांना सुटायला देण्याचाही डाव मात्र खेळला जाऊ शकतो. जे पुरावे दोन दिवसांनी अतिरीक्त महासंचालक पत्रकारांसमोर ठेवतात, ते पहिल्या दिवशी हाती नव्हते असे कोणी म्हणू शकत नाही. मग जे पत्रकारांसमोर शुक्रवारी मांडले, तेच दोन दिवस आधी कोर्टात मांडायचा आळस कशाला करण्यात आला? त्या़चे कुठलेही सुटसुटीत उत्तर मिळत नाही. म्हणूनच मग ही जाणूनबुजून केलेली चुक वाटते. एखाद्या जोशात फ़टकेबाजी करणार्‍या फ़लंदाजाला मुद्दाम फ़ुलटॉस टाकावा आणि षटकार मारण्याच्या सापळ्यात ओढा,वे तसाच काहीसा हा प्रकार नाही काय? इथे नक्षल्यांचा तेजपाल करण्याचा डाव खेळला गेला नाही असे आज कोणी म्हणू शकत नाही. कोर्टाने अपुर्व असा नजरकैदेचा निवाडा दिला, तोच कोर्टालाही हे लोक निरपराध नसल्याची शंका असल्याचा सज्जड पुरावाच आहे. आता पुढल्या सुनावणीत कोण षटकार मारतो आणि कोणाचा उंच झेल उडतो ते बघूया.

‘जनहितार्थ’ नुसते मुद्दे



* भीमा कोरेगावच्या पुर्वी एक दिवस पुण्यात शनवारवाड्यासमोर एल्गार परिषद भरली होती आणि त्यात तथाकथित २५० सामाजिक संघटनांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आला.

* वर्षारंभी भीमा कोरेगाव येथील स्मारकाच्या अभिवादनाला लोक जमले असताना हिंसाचार उफ़ाळला आणि त्यात फ़टांगळे नावाच्या तरूणाची हत्या झाली. दुकाने, गाड्या जाळल्या गेल्या. सगळीकडे तात्काळ हिंदूत्ववादी लोकांवर आरोपसत्र सुरू झाले.

* कोणा महिलेने पिंपरी चिंचवड भागात संभाजी भिडेगुरूजी व मिलींद एकबोटे यांच्यावर आरोप करणारी तक्रार नोंदवली. तपास सुरू झाला आणि एकबोटेंना अटक झाली तर भिडेगुरूंजींना मुख्यमंत्र्यांनीच विधानसभेत क्लीन चीट दिली.

* हिंसाचाराच्या काळात आपण भीमा कोरेगाव परिसरातही नसल्याचा खुलासा करताना भिडेगुरूजींनी त्यावेळी सातारा जिल्ह्यात एका कार्यक्रमात असल्याचे सांगितले. आज राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंतराव पाटिल यांच्या दिवंगत मातोश्रींच्या श्राद्ध सोहळ्यात त्यावेळी उपस्थित असल्याचा भिडेगुरूजींचा दावा पवारांचे सहकारी जयंतरावही खोडून काढू शकलेले नाहीत.

* नंतर एल्गार परिषदेत जातीय सलोख्याला धक्का लावणारे व चिथावण्या देणारे साहित्य, पुस्तिका वाटल्या गेल्या आणि चिथावणीखोर भाषणे झाल्याची तक्रार विश्रामबाग वाडा पोलिस ठाण्यात अक्षय बिक्कड व तुषार दामगुडे या दोघा तरूणांनी नोंदवली.

* भीमा कोरेगावचे राजकीय भांडवल करून प्रकाश आंबेडकर व अन्य काहीजणांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्यातूनही बराच हिंसाचार उफ़ाळला. अनेक शहरातील जनजीवन विस्कळित झाले. काही दिवस प्रकाश आंबेडकर व त्यांचे सहकारी संभजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन करीत राहिले. पुढे त्यांचा उत्साह संपला. आता सर्वजण विषयच विसरून गेलेले होते.

* मध्यंतरी एकबोटे यांना अटकपुर्व जामिन नाकारला गेला व अटकही झाली. पुढे काही झाले नाही आणि कोर्टाला त्यांनाही जामिनावर मुक्त करावे लागले. यापैकी कोणी भीमा कोरेगाव हिंसाचारात हिंदूत्ववादी वा धारकरी यांच्या कुठला सहभागाचा पुरावा देऊ शकले नाही. आरोप करायचे आणि पुरावे सरकार पोलिसांनी शोधून काढायसाठी आंदोलन करायचे, हाच खाक्या राहिला. मात्र दामगुडे व बिक्कड यांच्या रितसर तक्रारीची चौकशी व तपास होत राहिला.

* जुन महिन्यात प्रथमच भीमा कोरेगावच्या हिंसाचारासाठी व त्यामागे कारस्थान असल्याचे धागेदोरे मिळाल्याचा दावा करून पुणे पोलिसांनी काही नक्षलवादी व माओवादी लोकांची धरपकड केली. त्यांच्या घरावर किंवा इतरत्र घातलेल्या धाडीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजीव गांधी यांच्याप्रमाणे घातपाती हत्या करण्याच्या कारस्थानाचे तपशील मिळाले. जुन महिन्यात या लोकांना अटक झाली होती. तिथून सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा, वरवरा राव इत्यादी नावे पुढे आली.

* योगायोग काही कमी नाहीत.. याच दरम्यान एल्गार परिषदेत सहभागी उमर खलीद याची सहयोगी शेहला रशीद हिचा एक ट्वीट वादग्रस्त होता. संघ व नितीन गडकरी मिळून नरेंद्र मोदींची हत्या करणार आणि त्याचे खापर मुस्लिम व कम्युनिस्ट गटांवर फ़ोडणार, असा तो ट्वीट होता. गडकरींनी त्यावर खटला भरण्याचा इशारा दिल्यावर शेहलाने तो ट्वीट विनाविलंब मागे घेतला. पुढे जाऊन संघवाल्यांना उपहासही कळत नाही अशी टिप्पणीही केलेली होती.

* गंमतीची गोष्ट अशी, की वकील गडलिंग आणि अन्य काही लोकांच्या पत्रापत्रीत पंतप्रधानाच्या हत्येचा डाव मांडला जातो आणि जवळपास त्याच दरम्यान शेहला तशाच अर्थाचा ट्वीट करते? नंतर उपहास म्हणून शेपूट घालते? एकाला हा विनोद वाटतो आणि दुसर्‍यांना तसेच पोलिसांना सापडलेले पत्र, म्हणजे सुडबुद्धीचे कारस्थानी खोटे पुरावे वाटतात? ७ जुनला हे पत्र मिळाल्याचे पोलिस म्हणतात आणि ९ जुनला शेहला त्याच अर्थाचा ट्वीट करते?

* त्या काही नक्षली व समर्थकांना ताब्यात घेऊन पोलिस तपास पुढे नेतात आणि ३१ ऑगस्टला महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांची सेवानिवृत्तीची मुदत वाढवली जाते. जनहितार्थ त्यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जाते. योगायोग म्हणजे त्याच दरम्यान देशाच्या पाच राज्यात महाराष्ट्र पोलिस अनेक संशयित नक्षलींच्या घरी धाडी घालून त्यांना ताब्यात घेतात. त्यावरून गदारोळ सुरू होतो.

* मुदतवाढ मिळालेले डी. डी. पडसलगीकर हे महाराष्ट्र केडरचे सर्वात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी असून दिर्घकाळ ते केंद्रीय सेवेत राहिलेले आहेत, प्रामुख्याने गुप्तचर खात्यात त्यांनी प्रदिर्घ सेवा दिलेली आहे. तिथून थेट मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून आले व काही काळापुर्वी महासंचालकपदी बसले. त्यांच्या निवृत्तीच्या मुहूर्तावरच नक्षली सुत्रधारांची सार्वत्रिक धरपकड होते आणि ‘जनहितार्थ’ पडसलगीकरांना आणखी तीन महिने राज्याच्या पोलिस सेवेत कायम राखले जाते.

* दिर्घकाळ गुप्तचर खात्याची सेवा आणि मोक्याच्या क्षणी त्यांना मिळालेली ‘जनहितार्थ’ मुदतवाढ, यांचा आजच्या घडामोडीत काही परस्पर संबंध असू शकतो का?

* ह्या धरपकडीमध्ये जी कागदपत्रे हाती लागलेली आहेत, त्यात परदेशातून हत्यारे आयात करण्याचा व वितरणाचाही विषय आलेला आहे आणि वैभव राऊतला नालासोपार्‍यात पकडल्यापासून एकाच पिस्तुलाचा विषय चघळला गेलेला आहे. त्याला इतके खुन पाडण्यासाठी कुठून व कोणी पिस्तुल पुरवले, त्याविषयी मात्र रहस्य कायम राखण्यात आलेले आहे. एक आठवडा सनातनच्या धरपकडीसाठी गाजवला गेला अणि पुढल्या़च आठवड्यात त्याच महाराष्ट्र पोलिसांनी नक्षली सुत्रधारांच्या मुसक्या बांधल्याने गदारोळ सुरू झाला.

* शेहला रशीद गंमत म्हणून पंतप्रधानांच्या हत्येचे ट्वीट करते. पोलिसांना तशा तयारीची कागदपत्रे नक्षल सुत्रधारांच्या संगणकात सापडतात. जनहितार्थ गुप्तचर खात्याचा दांडगा अनुभव असलेल्या अधिकार्‍याला मुदतवाढ दिली जाते. हे सगळे योगायोग आहेत? की येऊ घातलेल्या मल्टीस्टारर चित्रपटाचा फ़क्त ट्रेलर आहे? हे अनेक महत्वाचे मुद्दे कुठल्या उथळ खळखळाटाच्या चर्चेत वाहिन्यांवर दिसले नाहीत, ऐकायला मिळाले नाहीत. म्हणूनच हे एका मोठ्या भयंकर गुढ रहस्यमय कोड्याचे विखुरलेले तुकडे वाटतात. कधीतरी ते तुकडे क्रमवारीने सुसंगत मांडायचा प्रयत्न करूया ना?

Thursday, August 30, 2018

क्रांती चिरायू होवो!



सव्वा दोन वर्षापुर्वी मुलीच्या आग्रहाखातर आम्ही सिक्कीमचा दौरा करायला गेलेले होतो. त्यासाठी बंगालच्या उत्तरेस सिलीगुडी जिल्ह्यातील बागडोगरा विमानतळापर्यंतच हवाई प्रवास शक्य असतो. पुढे तिथून गंगटोक सिक्कीमपर्यंत भूमार्गाने गाडीने प्रवास करावा लागतो. त्यासाठी खाजगी टॅक्सी व बसेस आहेत. अशाच एका टॅक्सीवाल्याने आम्हाला गंगटोकला नेले आणि त्याच्याशी गप्पा मारताना आम्हाला बागडोगरा विमानतळापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर नक्षलबाडी असल्याचे कळले. पुढे त्याच्याशी दोस्ती झालेली असल्याने त्यानेच पुन्हा बागडोगराला आणायचे मान्य केले होते. सिक्कीम उरकून माघारी आलो, तेव्हा विमानाच्या उड्डाणाला चार तास बाकी होते. म्हणून त्याला म्हटले थोडे पैसे जास्त घे, पण आम्हाला झटपट नक्षलबाडीला नेवून आण. त्याने मान्य केले आणि नक्षलबाडीला पोहोचलो, तर कुठेही कम्युनिस्टांचा लालबावटा नव्हता, की कुठली माओवादाची खुण नव्हती. ड्रायव्हरला मात्र आमच्या नक्षलबाडी आग्रहाने चकीत केले होते. कारण कोणीही प्रवासी पर्यटक तिकडे फ़िरकत नाहीत. तेव्हा त्याला पाच दशके जुन्या कहाण्य़ा सांगून चारू मुजूमदार, कनु सन्याल, जंगल संथाळ यांचे स्मारक बघायचे असल्याचे समजावले. तर तो हसू लागला. कारण असे कुठले स्मारक नाही. पण एका आडोशाला रस्त्यालगत काही पुतळे असल्याचे त्याने सांगितले. आम्ही उत्साहीत झालो, तर तोही हसू लागला. नक्षलबाडीचा बाजार व गर्दी तुडवित त्याने कशीबशी गाडी गावाबाहेर काढली आणि रेल्वेरुळांच्या समांतर नेवून आम्हाला एका ओसाड जागी स्मारक दाखवले. त्याचा फ़ोटो इथे मुद्दाम टाकला आहे. एक उंच पाईपचा ध्वजस्तंभ आणि सात ओबडधोबड अर्धपुतळे तिथे उघड्यावर रिमझिमणार्‍या पावसात उभे होते. बाकी आसपास कोणी नव्हते आणि मागल्या बाजूला शेताडी पसरलेली होती. कालपरवा काही लोकांची नक्षली म्हणून धरपकड झाल्यावर तो क्षण आठवला.

काही मिनीटे तिथे थांबलो होतो. फ़ोटोही काढले आणि माघारी विमानतळावर येताना ड्रायव्हरने नक्षलबाडीची सध्यस्थिती कथन केली. आता तिथे कोणी कम्युनिस्ट उरलेला नाही की चळवळ वगैरे शिल्लक राहिलेली नाही. कित्येक वर्षापासून तिथे कॉग्रेसचा आमदार निवडून येतो आणि आता त्याचा प्रतिस्पर्धी तृणमूल कॉग्रेसवाला आहे. बाकी लालबावट्याचे काही नामोनिशाण शिल्लक नाही. पत्रकारितेच्या उमेदवारीच्या काळात कधीतरी कॉम्रेड चारू मुजूमदार यांच्या निधनाची बातमी लिहीलेली होती. १९७० च्या दशकात ही आरंभीची नक्षलवादी मंडळी भूमिगत गनिमी युद्ध लढवत होती आणि त्यातला कॉम्रेड चारू मुजूमदार दुबळ्या प्रकृतीचा होता. हृदयविकार हा त्याला जडलेला आजार असल्याचे त्या बातमीत म्हटलेले होते. अखेरीस तो पकडला गेला आणि काही दिवसातच त्याचा पोलिस कस्टडीत मृत्यू झाला. त्याचीच ती बातमी होती. देशात सशस्त्र क्रांती करण्यासाठी त्याने हत्यार उपसलेले होते आणि भारतीय संविधान झुगारून लालक्रांतीशी बांधिलकी मानणार्‍यांनी त्याला साथ दिली होती. त्यातून वर्गशत्रूंचा नायनाट करण्याचा निर्धार केलेल्या या सहकार्‍यांनी नक्षलबाडीत जमिनदारांचे हत्याकांड करून आपल्या क्रांतीला आरंभ केला होता. तिथून मग ह्या रक्तरंजित इतिहासाला सुरूवात झाली. त्या हत्याकांडाने देश हादरून गेला होता आणि त्या गावाच्या नावावरून त्या हिंसक चळवळीला नक्षलवादी असे नाव मिळाले. त्या हत्याकांडाचा शोध पोलिस यंत्रणा घेत असताना अनेक जागी तशी हिंसा सुरू झाली आणि चारूचे सहकारी ज्या प्रदेशातले होते, तिथे तशा हिंसक घटनांची पुनरावृत्ती सुरू झाली. आरंभी क्रांतीकारकांची समिती असे नाव असलेल्या त्या संघटनेला पुढे माओवादी लेनिनवादी अशी अनेक उपनावे जोडली गेली. पण जिथून त्याची सुरूवात झाली तिथे आज त्याचे नामोनिशाण उरलेले नाही.

पण हा विषय फ़क्त नावापुरताही नाही. त्या क्रांतीसाठी चारू मुजूमदार व अनेकजणांनी आपल्या सुखवस्तु जीवनावर लाथ मारून त्यात उडी घेतलेली होती. कुठल्याही क्षणी पोलिस वा सेनादलाच्या गोळीचे बळी व्हावे लागेल, ते मान्य करून त्यांनी हा मार्ग चोखाळला होता. जमिनदार वा मध्यमवर्गिय सुखासिन जीवनाचा त्याग करून ते लढ्यात उतरले होते आणि त्यांचे इतर सहकारीही तितकेच जीवावर उदार झालेले होते. त्या काळात आजच्या सारखे मानवाधिकार नावाचे हत्यार त्यांना उपलब्ध झालेले नव्हते. म्हणूनच लौकरच त्या सशस्त्र लढ्याला इंदिरा सरकारने चिरडून काढले. चकमकी वा दिसेल तिथे गोळ्या घालण्याच्या मोहिमेतून काही वर्षातच नक्षली चळवळ नेस्तनाबुत झाली. पण संपलेली नव्हती, सुप्तावस्थेत गेलेली होती. कोवळ्या किशोर वयात नव्या जाणिवा जग झुगारून देण्याला प्रवृत्त करीत असतात. त्याच जाणिवा जग उलथून पाडण्याची चिथावणीही देत असतात. अशा वयातील मुलांसाठी मग चारू मुजूमदार व नक्षली क्रांती कायम भुरळ घालणारी परिकथा बनून गेली तर नवल नव्हते. त्या स्वप्नांनी भारावलेल्या अनेकांनी पुढल्या काळात आपली रणनिती बदलली आणि देश व व्यवस्था उलथून पाडण्यासाठी नवनवे मार्ग चोखाळले. त्यात मानवाधिकार सुविधा, हे हत्यार बनवले गेले. कायद्याचे आडोसे घेऊन गनिमी युद्धाची एक नवी फ़ळी उभारण्यात आली. ‘काही तरी तुफ़ानी करू या’ अशा वयात येण्याच्या कालखंडातील उर्मींना खतपाणी घालून इच्छुकांना साहसी संधी उपलब्ध करून देण्याची मोहिम उभारली गेली. त्याच वेळी विविध राज्यातले आदिवासी, खेडूत, पिडीत, वंचित यांनाही न्यायासाठी सशस्त्र लढ्याने आमिष दाखवले गेले. हळुहळू त्याला परदेशी मदतही मिळू लागली आणि सत्तेसाठी लाचार असलेल्यांकडून सरकारी अनुदानाचे पैसेही अशा मोहिमांसाठी वळवण्याची योजना यशस्वी होत गेली.

Image may contain: basketball court

१९६७ सालात वंचित, पिडीत व सर्वहारा वर्गाची असलेली ही चळवळ पन्नास वर्षात आता अनेक गटात विभागली गेलेली आहे. त्यापैकी एक भाग हातात हत्यार घेऊन बळी जायला सज्ज असलेला गरीब घरातल्या तरूण मुली महिला यांचा आहे. दुसरा गट कम्युनिस्ट तत्वज्ञानाने भारावलेला सुशिक्षित बुद्धीवादी वर्ग आहे. तिसरा गट आपापले राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अशा चळवळी व त्यांच्या हिंसक कुवतीचा कौशल्याने वापर करून घेणारा आहे. त्याच्याही पलिकडे चौथा गट अशा मार्गाने भारतीय संस्था व प्रशासन व्यवस्थेला सुरूंग लावण्यासाठी परदेशी शक्तींना मदत करणारा मतलबी वर्ग आहे. जीवावर उदार होऊन क्रांतीसाठी मरणारी फ़ौज त्यांची खरी ताकद किंवा कच्चा माल आहे. त्याच बळावर असे इतर गट आपली राजकीय सौदेबाजी करीत असतात. भूमिगत राहून गनिमी युद्ध करताना खर्‍या लढवय्यांना आपल्या मुठीत ठेवण्याचे मोठे काम जे संभाळू शकतात, त्यांच्या मदतीने शहरात व उच्चभ्रू वर्तुळात मिरवणारे अनेक फ़ॅशनेबल क्रांतीकारक आता नक्षल समर्थक झालेले आहेत. कारण आता तो एक किफ़ायतशीर धंदा झालेला आहे. कालपरवा ज्यांची धरपकड झाली ते असे सुखव्स्तु नक्षलवादी आहेत. गनिमी युद्धात फ़सलेले व भूमिगत जीवन कंठणार्‍यांचे ‘मदारी’ म्हणून ते वाडगा फ़िरवून कमाई करीत असतात. गोळ्या झेलून मरणार्‍यांच्या मानवी हक्कांसाठी लढण्याचे नाटक रंगवून हे लोक, शहरात चैनमौजेचे सुखवस्तु जीवन कंठत असतात. शेकड्यांनी नक्षली आजवर मारले गेलेले आहेत. पण त्यांच्या मृत्यूसाठी कधी इतका गदारोळ हलकल्लोळ माजवला गेला नाही. पण त्यांच्या जीवावर मौजमजा करणार्‍यांना धक्का लागण्याची चिन्हे दिसताच किती आकांत मांडला गेला आहे ना? कॉम्रेड चारू मुजूमदारच्या भाषेत अशा क्रांतीकारकांना बुर्ज्वा म्हटले आहे. पण चर्चा गदारोळ असा चाललाय, की कोणी जीवावर उदार झालेले सामान्य नक्षलीच सुळावर चढायला निघालेले आहेत.

क्रांती चिरायू होवो! कॉम्रेड चारू मुजूमदार लाल सलाम! चेअरमन माओ लाल सलाम!

Wednesday, August 29, 2018

जोडलेले जग, तुटलेली माणसे

संबंधित इमेज

एक बातमी काळजाला घरे पाडणारी वाचनात आली. पालघर येथे वास्तव्य असलेल्या एका पारशी वृद्ध जोडप्याची एकुलती एक मुलगी लग्न होऊन अहमदाबादला आहे. तिचे आईवडील खुप थकलेले आणि त्यांची देखभाल करायला कोणीच नाही, म्हणून नोकर आहेत. त्यापैकी आईचा अलिकडेच मृत्यू झाला, म्हणून शेजार्‍यांनी मुलीला कळवले. तर तिने पालघरला येणे अशक्य असल्याने अंत्यसंस्कार उरकून घेण्याचा शेजार्‍यांना सल्ला दिला. इतकेच नाही. अंत्यसंस्काराचा विधी आपल्याला व्हिडीओद्वारे दाखवायलाही सांगितले. बिचार्‍या शेजार्‍यांनी आपुलकीच्या नात्याने त्या मुलीची इच्छा पुर्ण केली. पण त्याहीआधी आई खुप आजारी असल्याने एकदा तिला शेवटचे बघायला यावे म्हणून पित्याने मुलीला फ़ोनवर सांगितले, तर मुलीने नकार दिला होता. कारण तेव्हा ती कन्या बाहेर कुठे फ़िरायला गेलेली होती. अंत्यसंस्कारासाठी तात्काळ येणे अशक्य असेल कदाचित. पण नंतरही दोन दिवसात मुलगी तिकडे फ़िरकली नाही. शेजार्‍यांनी तिला कळवण्याचा प्रयत्न केला असता तिने येण्याची गरज नसल्याचे सांगून संपर्क तोडला. या बातम्या अंगावर शहारे आणतात. कारण त्यातून आजच्या जगाचा वा माणूसकीतला विरोधाभास काळजाला घरे पाडणारा आहे. असे म्हणतात, की विविध साधने उपकरणे व संपर्काच्या व्यवस्थांनी जग जवळ आणले व जोडले गेले आहे. आपल्या जन्मदातीची अंत्ययात्रा दुरवरूनही मुलीला प्रत्यक्ष बघता आली, ही त्यातील जमेची बाजू नक्कीच आहे. पण त्यातली अलिप्तता वा त्रयस्थता भयभीत करणारी आहे. मुलीला आईविषयी कुठली आस्था वा माया नव्हती. एखादे थेट चित्रण प्रक्षेपण बघावे, त्यापेक्षा त्यात काही अधिक नव्हते. हेच त्या मुलीच्या वागण्यातून समोर आले. मग जग जोडले याचा अर्थ माणसे तुटली असाच नाही का होत? याला यांत्रिक तांत्रिक प्रगती म्हटले जाते. पण प्रत्यक्षात त्यातून रक्ताची नात्याची माणसेही तुटून गेलेली नाहीत काय?

असाच आणखी एक किस्सा आहे. मुंबईच्या एका उच्चभ्रू वस्तीमध्ये वास्तव्य करणार्‍या लोकांना एका बंद घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने जगणे अशक्य झाले. ते घर दार वाजवूनही कोणी उघडत नव्हता. तर पोलिसांना बोलवावे लागले. त्यांनी दार फ़ोडून आत प्रवेश केला तर तिथे वास्तव्य करणारे वृद्ध गूहस्थ दोनतीन दिवस बेवारस मरून पडलेले आढळले. त्यांचा मृतदेह कुजल्याने दुर्गंधी सुटलेली होती. मोलकरणीकडून नातलगांचा पोलिसांनी शोध घेतला तर त्यांचा मुलगा व सून परदेशी जाडजुड पगाराची नोकरी करीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मुलाशी संपर्क साधला तर त्याला पित्याच्या अंत्यविधीला येण्यास सवड नव्हती. पोलिसांनी व अन्य शेजार्‍यांनी अंत्यविधी उरकून घ्यावेत. कारण आपल्याला कामातून सवड नाही, असे मुलाने सांगितले. फ़ार कशाला, आपल्याला पित्याच्या मालमत्तेतले काही नको. पोलिसांनीच त्याचीही विल्हेवाट लावावी, असे त्याने सांगून टाकले. ही दोन प्रसिद्ध झालेली प्रकरणे आहेत. पण भारतातल्या अनेक शहरातल्या शेकडो घरात असेच आज तुटलेले संबंध आहेत. आत्मियता आपुलकी माया हे शब्द शब्दकोषात शिल्लक राहिलेत. त्याला आपण प्रगती उन्नती अशी नावे दिलेली आहेत. माणसातला माणुसकी नावाचा अवयव जणू नामशेष होऊन गेला आहे. व्हीडीओ फ़ोन, नेटवर्क, ऑनलाईन हे शब्द आता आपल्या सार्वजनिक व व्यक्तीगत जीवनाचे अभिन्न अंग होऊन गेले आहेत. पण इतरांशी संपर्क साधताना आपण माणूस किती राहिलोय? उपकरणातून आपली नाती, प्रेम, भावना जोडल्या जातात. पण प्रत्यक्ष माणसाचा संपर्क सहवास आपल्याला नकोसा होऊन गेला आहे. आपण आजकाल सुखीसमाधानी व्हायचे विसरून गेलो आहोत. आपण आता आयुष्य एन्जॉय करतो. ते कसे करावे याचेही मार्ग कुणा कंपनीने ठरवलेले असतात. आपण नातीगोती, भावभावना असल्या मानवी जाणिवांना पारखे झालेले आहोत.

आयुष्यभर पालक आपल्या पुढल्या पिढीसाठी राबत रहातो. त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि आपल्या आयुष्यात खावे लागलेले टक्केटोणपे मुलांच्या वाट्याला येऊ नयेत, म्हणून पालक आयुष्य खर्ची घालतो. पण जेव्हा त्याची परतफ़ेड करायची वेळ येते, तेव्हा मुले कुठे असतात? परदेशी वा अन्य कुठे दुर जाऊन वसलेली असतात. त्यांना आपल्याच जन्मदाते पालकांविषयी कुठलीही आत्मियता उरलेली नसते. त्यासाठी मुलांनाही दोषी मानण्याचे कारण नाही. भौतिक सुखांच्या अतिरेकाचे महात्म्य आपणच त्यांना शिकवलेले रुजवलेले नसते का? ही स्थिती श्रीमंत पालक वा सुखवस्तु कुटुंबातलीच नाही. घडणारे गुन्हे वा विसंवादाकडे बघितले, तर माणसे आपले माणुसपण हरवून बसलेली दिसतील. कालपरवा मराठा मोर्चात सहभागी झालेला एक तरूण औरंगाबादला नदीत उडी टाकून मोकळा झाला. तेव्हा कोणी त्याला वाचवायला पुढे सरसावला नाही. उलट त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊन तो घुसमटत मृत्यूशी झुंजताना, शेकडो सहकारी त्याचा जयजयकार करीत होते. व्हिडीओ घेण्यात मग्न होते. रस्त्यावर चौकात कुठे मुली महिलांची छेड काढली जाते वा अब्रु लुटली जाते. तेव्हा बघे उभे असतात, पण हस्तक्षेप करायची हिंमत कोणी दाखवत नाही. नंतर न्यायासाठी आवेशात आरोळ्या ठोकल्या जातात, हे आजकालचे संस्कार झालेले आहेत. आपण कशाला नसत्या भानगडीत पडायचे, हा कौटुंबिक सामाजिक संस्काराचा मूलमंत्र झाला आहे. मग दाभोळकरांच्या हत्येनंतर ‘आम्ही सारे दाभोळकर’ असे फ़लक घेऊन मिरवले जातात. पण प्रत्यक्षात असाच कोणी भरगर्दीत किंवा चौकात मारला जात असताना पुढे येण्याची इच्छाही आपण गमावून बसलो आहोत. जे घरात होते, तेच समाजात इतरत्रही अनुभवायला मिळत असते. प्रत्येक बाबतीत सरकारने अमूक करावे, तमूक करावे अशी आपण आता मानसितता बनवल्याचा तो परिणाम आहे.

मध्यंतरी अशीच एक बातमी वाचनात आली. शाळेतून मुलांना समाजशिक्षण म्हणून कुठल्या वृद्धश्रमात भेटीसाठी नेण्यात आलेले होते. त्यापैकी एका विद्यार्थिनीला तिथे आपली आजीच बघून रडू फ़ुटले. त्या किशोरवयीन मुलीला तिच्या जन्मदात्यांनी कोणते संस्कार दिलेले आहेत? आजीला अन्य कुणा नातलगाकडे ठेवलेले आहे असे घरात तिला सांगण्यात आले होते आणि प्रत्यक्षात आजीला उचलून वृद्धाश्रमात भरती करण्यात आलेले होते. आपल्याच जन्मदात्यांनी स्वत:च्या आईला कुठल्या दुर्घर जागी आणून बेवारस फ़ेकून दिलेले आहे, हे अनुभवणार्‍या त्या मुलीला कुठल्या आपुलकी वा मायेचे संस्कार मिळत असतील? आणखी दहापंधरा वर्षांनी तिचेच जन्मदाते वृद्ध होतील, तेव्हा त्यांच्याशी कसे वागावे, याचे धडेच यातून मिळत नसतात काय? जगण्यातल्या गरजा आणि चैनमौज यातला फ़रकच पुसट होऊन गेला आहे. अमूकतमूक गोष्ट आवडली म्हणून हवी असते आणि ती मिळवण्यासाठी आपल्याला कष्ट करायची गरज वाटेनाशी झाली आहे. आपल्यापाशी नसेल आणि हवीच असेल तर हिसकावून घ्यावी, किंवा कुठल्याही भल्याबुर्‍या मार्गाने ती मिळवावी. त्यासाठी चोरी करावी किंवा मुडदाही पाडायला हरकत नाही. हा स्वभाव किंवा संस्कार बनत गेला आहे. घरात गैरलागू मार्गाने मिळवलेले पैसे, लाचखोरी याविषयी इतके उजळमाथ्याने बोलले जात असते, की चांगुलपणा हा मुर्खपणा असल्याची समजून नकळत मनावर बिंबवली जात असते. आपल्या भावना, इच्छांना प्राधान्य देताना इतरांच्या गरजा, हक्क वा भावनांची पायमल्ली करण्याला चतुराई मानले जाऊ लागले आहे. मग त्याचे असे विकृत परिणाम वेगवेगळ्या स्वरूपात समोर येत असतात. माणुस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि त्याला इतरांना समजून घेऊन सुखदु:खात सहभागी होऊनच जगणे भाग असते, हे आपण आता विसरून गेलेले आहोत.

सहाजिकच अशा बातम्या कानावर येतात किंवा वाचनात येतात, तेव्हा आपल्या अंगावर शहारा येत असतो. वाहिन्यांवरच्या मालिका बघून त्यातले मानवी संबंध बघून डोळ्यात अश्रू येतात. पण ते किती खरे आहेत? कारण कमीअधिक तशीच परिस्थिती घरोघर पसरलेली आहे. आपण आत्मकेंद्री माणूस होत चाललो आहोत आणि त्याचा परिणाम म्हणून मग एका मर्यादेपर्यंत आपल्याला नातीगोती हवी असतात. जेव्हा ती नाती जबाबदारी वा कर्तव्याचा बोजा घेऊन समोर येऊ लागतात, तेव्हा पहिल्या फ़टक्यात ती तुडवायला आपण सज्ज असतो. मालमत्तेसाठी सख्ख्या भावंडांनी पाडलेले मुडदे वा आईबापांची केलेली फ़सवणूक, ह्या गोष्टी आता नित्याच्या होऊन गेलेल्या आहेत. पण कधीतरी आपल्यालाही अगतिक होऊन कोणाकडे तरी आशाळभूतपणे बघावे लागेल, याचे भान सुटलेले आहे. पुर्वी शंभर वर्षे जगू आशा कल्पनेने लोक आयुष्याकडे बघत होते आणि नातवंडे सोडा पतवंडेही बघायची इच्छा बाळगून जगायचे. आज अनेकांना नातवंडाचे तोंड बघायलाही अगतिक व्हावे लागते. प्रत्येकजण आजच्या पुरता मनसोक्त जगायला इतका उतावळा झालेला आहे, की त्याला कालची फ़िकीर नाही आणि उद्या उजाडणार नाही, असाच समज झाला आहे. त्यातून ह्या दुर्दैवी घटनांच्या सापळ्यात आपण गटांगळ्या खाऊ लागलो आहोत. म्हणून अशा बातम्या वाचून आपल्या काळजात चर्र होते, परंतु असेच काही आसपास घडत असताना आपण नामानिराळे असतो. दिसत असूनही डोळे झाकून घेत असतो. ते भयंकर असले तरी आपल्या जवळपास येणार नसल्याची समजूत आपल्याला अधिकच बेफ़िकीर बनवत असते. तो अमेरिकेतला मुलगा आणि ती अहमदाबादची मुलगी आपल्या अंतरंगातही दबा धरून बसलेली असते. आपण डोळे उघडून त्यांच्याकडे बघायची हिंमत करू शकत नाही. कारण जग जोडताना माणसे तुटत गेली आहेत आणि जग माणसांनी बनलेले आहे, त्याचाच आपल्याला विसर पडला आहे.

Tuesday, August 28, 2018

तेव्हा वय किती होते?

rahul on sikh riots के लिए इमेज परिणाम

आजी आमच्या लहानपणीच्या उचापतींवर तक्रार करताना मालवणी भाषेत म्हणायची, माजो बाबा काय करी, तर असलेला नाय करी. म्हणजे कुठल्याही गोष्टीची नासाडी केली, मग हे विश्लेषण असायचे. अर्थात लहान मुलांविषयी यापेक्षा अधिक तक्रार कोणी करू शकत नाही. कारण समज कमी असलेल्या मुलांकडून आणखी काय अपेक्षा केली जाऊ शकते? सहाजिकच अशा मुलांपासून किंमती वस्तु वा अपायकारक गोष्टी आठवणीने दुर राखल्या जातात. राहुल गांधी पक्षाध्यक्ष झाल्यापासून खुपच आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्या आक्रमकतेमुळे आजीचे ते शब्द हल्ली नेहमीच आठवू लागलेले आहेत. जितके म्हणून राहुल गांधींच्या प्रतिमा संवर्धनाचे काम पक्षाने हाती घ्यावे, तितका हा मुलगा त्यांचे प्रयत्न मातीमोल करून टाकतो. अर्थात त्यात काहीच नवे नाही. दिडदोन वर्षापुर्वी त्याने प्रशांत किशोर या देशातील सर्वोत्तम निवडणूक चाणक्यालाही धुळीस मिळवून दाखवले होते. किंबहूना उत्तरप्रदेश कॉग्रेसला एकहाती जिंकून देण्यासाठी रणनिती बनवण्याचे कंत्राट प्रशांतने घेतले, तेव्हाच त्याने आपली अब्रु धुळीस मिळवण्याचा धोका पत्करला आहे, असे भाकित मी केलेले होते. उत्तरप्रदेश विधानसभेसाठी प्रत्यक्ष मतदान होण्यापुर्वीच राहुलने प्रशांतची पुर्ण वाट लावून टाकलेली होती. तेवढ्यावरच भागलेले नव्हते. अखेरचा प्रयास म्हणून प्रशांतने समाजवादी पक्षाशी आघाडी करून बघितली, तर राहुलने आपल्या सोबतच अखिलेश यादवलाही जमिनदोस्त करून टाकले. म्हणूनच आता कुठल्याही परिस्थितीत कॉग्रेसशी हातमिळवणी करायला अखिलेश राजी होत नाही. तर अशा सर्वज्ञानी पक्षाध्यक्षाला परदेशी नेवून अनिवासी भारतीयांसमोर पेश करण्याचे पाप मुळातच इतर ज्येष्ठ कॉग्रेस नेत्यांचे होते. त्यात राहुलचा काय गुन्हा होता? त्याने आपल्या परीने तिथेही यथेच्छ गोंधळ घातला. त्याच्या वयाला पेलवणारे काम नसेल तर राहुलचा दोष काय?

परदेशात अनेक लोकांशी जाहिर संवाद करताना वा मुलाखती देताना राहुलनी आपल्या ज्ञानाची कवाडे इतकी सताड उघडून टाकली, की नंतर चिदंबरम यांच्यापासून थेट सुरजेवाला यांच्यापर्यंत अनेकांना राहुल चौदा वर्षाचा तर होता, असले खुलासे करावे लागले. ब्रिटन येथील संवादात राहुलने अकारण मधमाशांचे मोहळ उठवून दिले. तिथे कोणी त्याला १९८४ च्या शीख हत्याकांडाचा प्रश्न विचारला, तर त्याविषयी गप्प रहाणे शहाणपणाचे होते. पण मुळातच शहाणा असलेल्या राहुलने गप्प कशाला रहावे? गप्प रहायचे नसेल, तर त्याने तिथल्या तिथे तेव्हा आपण अवघे चौदा वर्षाचे होतो आणि बाहेर काय घटना घडतात आपल्याला ठाऊकही नव्हते; असे प्रतिपादन करायला काही अडचण नव्हती. पण आज आपले वय किती आणि शिखांची कत्तल झाली, तेव्हा आपले वय किती होते, त्याचा हिशोब कोणी मांडायचा? सहाजिकच हा प्रयत्न राहुलने यशस्वीरित्या मातीमोल करून दाखवला. ज्यामुळे पक्षाची व राहुलची प्रतिमा उजळ व्हावी म्हणून प्रयत्न केलेला होता, त्यातच त्याने पक्षाला अडचणीत आणुन दाखवले. आता चिदंबरम वा अन्य कॉग्रेसी जाणते नेते राहुल दंगलीच्या वेळी अवघा चौदा वर्षाचा असल्याचा खुलासा करीत आहेत. म्हणूनच शिख दंगलीविषयी राहुलला जबाबदार धरणे योग्य नसल्याचीही सारवासारव करीत आहेत. पण हे राहुलला कधी कळायचे? शिवाय आणखी प्रश्न असा येतो, की गांधी हत्येच्या वेळी राहुल गांधींचे वय किती होते? कारण शिख हत्याकांडाविषयी राहुल जितकी ठामपणे विधाने करतात, तितक्याच खात्रीपुर्वक ते गांधीहत्येविषयी देखील बोलत असतात. मग गांधीहत्येच्या वेळी राहुलचे वय किती होते? त्याचाही खुलासा चिदंबरम यांच्यासारख्यांनी करायला नको काय? शंभर वर्षापुर्वी कधीतरी अमेरिकेत कोकाकोला बनवणारा माणूस लिंबू सरबत विकत असल्याची इत्थंभूत माहिती राहुलपाशी असते, तर शीख हत्याकांड वा गांधी हत्येचे काय घेऊन बसलात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रत्येक परदेश दौर्‍यात तिथे कामानिमीत्त वा कायमस्वरूपी स्थायिक झालेल्या भारतीयांशी संवाद साधण्याचे तंत्र सुरू केले. म्हणून त्यांना तितकेच समर्थ उत्तर देण्यासाठी कॉग्रेसने आपले पंतप्रधान पदाचे उमेदवार राहुल गांधींनाही तशाच पद्धतीत पेश करण्याचा केलेला प्रयास योग्यच होता. परंतु आपला उमेदवार म्हणजे विनोदाचा बादशहा असल्याचे लपवावे कसे, याचा कॉग्रेसच्या चाणक्यांना न सुटलेला प्रश्न आहे. सहाजिकच ते जितका म्हणून राहुलची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करतात, तितक्याच वेगाने राहुल आपल्यासह पक्षाची प्रतिमा धुळीस मिळवण्यासाठी राबत असतात. त्यातून मग अशा केविलवाण्या स्थितीत पक्षाला जावे लागत असते. परदेशात राहुलनी अतिशय आत्मविश्वासाने बालिशपणा करून दाखवला, त्यासाठी त्यांचे कौतुक करावेच लागेल. तुम्ही पंतप्रधान असता, तर डोकलामचा प्रश्न कसा सोडवला असता, असा प्रश्न कोणी विचारला. तर राहुलनी अतिशय प्रामाणिकपणे आपल्याला डोकलामविषयी कसलीही माहिती नसल्याचे सांगून टाकले. म्हणजे कुठलाही तपशील वा माहिती नसताना आपण बेछूट आरोप करीत असल्याचे कबुल केले. हा प्रामाणिकपणा कौतुकाचा नाही काय? बाकी पक्ष उघडा पडला हा वेगळा विषय आहे. जर्मनीच्या पंतप्रधान अंजेला मरकेल वा आणखी कुणा राष्ट्रप्रमुखाने राहुलनी मागितलेली भेट नाकारली. कारण असल्या माणसाशी काही खाजगीत बोलले, तर तो बाहेर जाऊन वाटेल तशी मुक्ताफ़ळे उधळण्याची भिती त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. अर्थात त्याची कॉग्रेसने पर्वा करण्याचे काही कारण नाही. सवाल देश वा पक्षाचा नसून नेहरू-गांधी खानदानाची भलावण करण्याचा आहे. त्यासाठी कॉग्रेस रसातळाला गेली तरी बेहत्तर. समस्या बिचार्‍या पुरोगामी व समविचारी पक्षांसाठी आहे. कारण त्यांना झळ सोसून राहुलचे समर्थन करावे लागते आहे.

कधीकाळी कॉग्रेस पक्ष नुसता देशव्यापी संघटनाच नव्हती, तर तिची एक कार्यकारिणीही होती. त्या कार्यकारीणीमध्ये दिग्गज नेते असायचे आणि ते देशासमोरच्या अनेक प्रश्न समस्यांवर उहापोह करायचे. पक्षाचीच नव्हेतर देशाची ध्येयधोरणे ठरवण्यासाठी या नेत्यांच्या नियमित बैठका व्हायच्या. त्यात काय चर्चा झाली वा कोणते निर्णय झाले, त्याची माहिती घेण्यासाठी पत्रकारांची झुंबड उडत असे. पण दोन दशकापुर्वी सोनिया गांधी कॉग्रेसच्या अध्यक्ष झाल्या आणि कॉग्रेस कार्यकारिणीला फ़क्त आपल्या अध्यक्ष वा नेत्यांच्या चुका कशा देशहिताच्या आहेत, त्याचे खुलासे देण्यापुरतेच काम शिल्लक राहिले. त्याहीपेक्षा महत्वाचे काम म्हणजे नेत्याच्या नाकर्तेपणाचे गुणगान करून त्यालाच कर्तबगारी ठरवण्याच्या कुशाग्र बुद्धीला कार्यकारिणीत स्थान मिळू लागले. आता तर राहुल गांधी पक्षाध्यक्ष झालेले आहेत. त्यानंतर पक्षाच्या पराभवातला नैतिक विजय समजावून सांगू शकतील, त्यांनाच कार्यकारिणी व संघटनेत महत्वाचे स्थान मिळत असते. सहाजिकच एकूण कॉग्रेस कार्यकारिणी व नेतृत्व आता चौदा वर्षाचे होऊन गेलेले आहे. त्या वयातला गोंधळ व धरसोडवृत्तीचा आपल्याला नित्यनेमाने अनुभव येत असतो. या परदेश दौर्‍यात राहुलनी कोणता मुर्खपणा केला, त्याचे खुलासे विचारायला पत्रकारांची झुंबड उडाली आणि सगळी कॉग्रेस राहुलच्या चुकांना समजूतदारपणा ठरवण्याच्या कामाला जुंपली गेली. हेच आता पक्षकार्य बनुन गेले आहे. रोजच्या रोज राहुलनी काहीतरी नवा मुर्खपणा करायचा वा मुक्ताफ़ळे उधळायची आणि पक्षाने सारवासारव करण्याचे काम हाती घ्यायचे, हा परिपाठ झाला आहे. चिदंबरम वा तत्सम लोकांची विधाने व खुलासे ऐकले असते, तर इंदिराजी, यशवंतराव, चंद्रभानु गुप्ता किंवा त्या काळातले दिग्गज किती केविलवाणे होऊन गेले असते, त्याची कल्पनाच आंगावर शहारे आणते.

Monday, August 27, 2018

उत्तरप्रदेशची तुट बंगाल भरणार?

kureel on mamta के लिए इमेज परिणाम

बंगलोर येथे कुमारस्वामी यांच्या शपथविधीला हात उंचावून दोन डझन विरोधी पक्षांचे नेते उभे रहाताच अनेकांना उकळ्या फ़ुटलेल्ल्या होत्या. आता ३१ टक्के मतांवर भाजपा किंवा मोदी पुन्हा देशाची सत्ता मिळवू शकत नाहीत, याविषयी त्यांच्या मनात शंकाही उरलेली नव्हती. नशिब त्यांच्या हाती नव्हते आणि भारतीय राज्यघटनेने मोकळीक दिलेली नाही. अन्यथा अशा उतावळ्यांनी राहुल गांधी वा तत्सम कोणाचा पंतप्रधान म्हणून शपथविधीही उरकून घेतला असता. अर्थात मनातले मांडे खायचे असले तर कोरडेच खाण्याचा दळाभद्रीपणा कशाला करायचा? चांगले तुप लावून खरपूस भाजून खायला कोणाची हरकत नसते. कारण त्यात मांडे बनवावे लागत नाहीत, की तुपाचाही खर्च होणार नसतो. सहाजिकच विरोधी एकजुटीचा विजय अपरिहार्य असल्याच्या भ्रमाने भाजपाचे काहीही वाकडे होण्याची भिती अमित शहा वा मोदींना वाटण्याचे काही कारण नाही. मात्र अशा एकजुट वा मतविभागणी टाळण्याचे प्रयास काही तुट निर्माण करू शकतात, याची त्यांनाही जाणिव आहे. म्हणून तर अमित शहा बंगालमध्ये २२ जागा जिंकण्याची भाषा बोलत आहेत. त्याची टिंगल होणे स्वाभाविक आहे. कारण बंगालमध्ये आता कुठे भाजपाने आपले पाय रोवायला आरंभ केला आहे आणि ममतांनी त्याला चांगला हातभारही लावला आहे. त्यात काही तथ्य नसते तर अकस्मात बंगालमध्ये हिंदू सण सार्वत्रिक साजरे करण्याची नवी स्पर्धा डावे पक्ष व तृणमूल कॉग्रेसमध्ये कशाला जुंपली असती? आता हे दोन्ही पक्ष वाजतगाजत रक्षाबंधनाचे उत्सव साजरे करणार आहेत. कारण भाजपाच्या काही संघटना जन्माष्टमी जोरात साजरा करणार आहेत. हा हिंदू धार्मिक ज्वर बंगालमध्ये प्रथमच दिसू लागला आहे. किंबहूना त्याचे कारणच अमित शहांची भाषा आहे. भाजपाला तिथे अधिक जागा स्वबळावर मिळण्याच्या भितीनेच पुरोगामी पक्षांना हिंदूधर्मियांचा उमाळा आला आहे. त्याचा विरोधी एकजुटीशी संबंध काय?

गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत भाजपाने अतिशय योजनाबद्ध रितीने एक एक मताची जुळणी करून उत्तरप्रदेशात अभूतपुर्व यश मिळवले होते. त्यानंतर विरोधकांना आपल्या मतविभाजनाचा लाभ भाजपाला मिळत असल्याचा साक्षात्कार झाला. ऐंशी टक्के जागा मिळवताना भाजपाने आपल्या मतांची टक्केवारी चाळीसच्या जवळपास नेवून ठेवली आहे. त्याला धक्का द्यायचा तर अखिलेशचा समाजवादी व मायावतींचा बसपा एकत्र यायला हवेत. पण त्यांची बेरीजही भाजपाला तुक्यबळ नाही. म्हणून त्यात अजितसिंग यांचे लोकदल आणि कॉग्रेसलाही समाविष्ट व्हावे लागेल. ते जितके शक्य असेल तितकेच भाजपाला धक्का देणे शक्य आहे. पण त्यांचे एकत्र येणे आव्हानात्मक नसले तरी भाजपाला लोकसभेच्या ८० पैकी ७१ जागा एकहाती जिंकणेही सोपे नाही. सहाजिकच कितीही जमेची बाजू असली, तरी ७१ पैकी किमान दहावीस जागा भाजपाच्या तिथे घटणार, हे अमित शहांचे गृहीत आहे. सहाजिकच तो घाटा अन्य राज्यातून भरून काढण्याला पर्याय नाही. त्यासाठीच शहांनी पक्षाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यापासून अनेक राज्यात भाजपाचा नव्याने विस्तार व पाया घालण्याचे काम हाती घेतले होते. म्हणूनच मागल्या दोन वर्षात पारंपारिक विरोधकांना सोडून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बानर्जी नगण्य वाटणार्‍या भाजपाच्या मागे हात धुवून लागल्या आहेत. देशाच्या कानाकोपर्‍यात कुठेही भाजपा विरोधात खुट्ट वाजले, तरी ममता तिथे धाव घेऊन जातात. त्यामुळे त्यांना पंतप्रधान पदाचे वेध लागलेत असा अनेकांचा समज झालेला आहे. पण वस्तुस्थिती तशी अजिबात नाही. ममतांना आपलाच बालेकिल्ला बंगालमध्ये आपल्यापेक्षा मोदींची लोकप्रियता वाढत असल्याच्या भयाने पछाडलेले आहे. म्हणून त्या बंगालबाहेरही मोदींवर टिका करण्यासाठी सवड काढून धावत असतात. ती दिल्लीत जाण्यासाठी नव्हेतर बंगालमध्ये टिकण्याची कसरत आहे.

वास्तविक असे अनेक प्रश्न व समस्या आहेत, की ज्यामुळे ममतांना डाव्यांचा बालेकिल्ला उध्वस्त करून बंगालची सत्ता पादाक्रांत करण्यात यश आले. त्याचे कारण तिथे बांगलादेशी घुसखोर व मुस्लिम दहशतवाद लोकांना भेडसावत होता. त्याकडे मतपेढी म्हणून डावे किंवा कॉग्रेस ढुंकून बघायला राजी नव्हते आणि ममतांनी तेच मुद्दे उचलून धरले. मग त्यांना अबोल मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत गेला. पण सत्तासुत्रे हाती आल्यावर त्यांनी त्या समस्यांना हात घातला नाही. कारण डाव्या पक्षांना ज्या दहशतीचा व घुसखोरीचा लाभ मिळत होता, तो देणार्‍या प्रवृत्ती आश्रयासाठी ममतांच्या वळचणीला आल्या. त्यांना मतदान करणार्‍यांचा पुरता भ्रमनिरास झाला. पण विरोधी पक्ष म्हणून कॉग्रेस किंवा डावे त्या हिंदू बहुसंख्यांकांचे दुखणे मान्य करून लढायला राजी नव्हते. सहाजिकच ममतांनी ज्यांना वार्‍यावर सोडून दिले होते, ते मतदार भाजपाकडे आशेने बघू लागले. केवळ ते मतदारच नव्हेतर आज तृणमूल वा कॉग्रेस व डाव्या पक्षात असलेले अनेकजण तसे आहे़त. त्यांना कुठल्यातरी केंद्रीय वा राजकीय पक्षाचा आधार या दहशतवादाच्या विरोधात हवा आहे. अमित शहा व भाजपा यांनी त्याच मतदाराची मशागत करायचे काम हाती घेतले आणि बघता बघता भाजपाची शक्ती बंगालमध्ये वाढलेली आहे. ते ओळखलेल्या ममतांनी संघर्षाचा पवित्रा घेऊन हिंदूंना भयभीत करण्यासाठी आक्रमक मुस्लिम नेत्यांपेक्षा हिंदूंवरच्या अन्यायाला रोखण्यासाठी सत्ता वापरली असती, तरी भाजपाला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नसता. पण तसे केल्यास मतपेढीचे मॅनेजर असलेल्या काही मुल्लामौलवींचा रोष पत्करावा लागला असता. तिथेच ममता अडखळल्या आणि आज भाजपाने तळागाळापर्यंत मुसंडी मारलेली आहे. ती वरकरणी नजरेत भरणार नाही. पण मतदानाचे निकाल लागतील, तेव्हा बंगालचा त्रिपुरा झालेला दिसेल. ह्याला उत्तरप्रदेशची तुट भरून काढणे म्हणता येईल.

२००९ सालात असाच चमत्कार तृणमूलने घडवला होता आणि कॉग्रेसला सोबत घेऊन लढताना डाव्यांना पाणी पाजले होते. दोन वर्षांनी विधानसभेत तर डाव्यांचे मुख्यमंत्री भट्टाचार्यांचाही पराभव झाला होता. पण तो होईपर्यंत कोणाला डाव्यांचा बालेकिल्ला डळमळला असल्याचा थांगपत्ता लागलेला नव्हता. नेमक्या त्याच स्थितीत आज बंगालचा भाजपा आहे आणि म्हणून अमित शहा ४२ पैकी २२ जागा जिंकण्याची भाषा बोलत आहेत. किंबहूना त्यात किती तथ्य आहे, त्याची प्रचिती ममतांच्या वागण्या बोलण्यातूनच येत असते. ती अस्वस्थता मोदी सरकारविषयीची नसून बंगाल हातून निसटण्याची चिंता आहे. म्हणून मग हिंदूंना चुचकारणे व मुस्लिमांनाही लालूच दाखवणे, अशी दोन टोकाची कसरत ममतांना करावी लागते आहे. आजही विधानसभेत डावे आणि कॉग्रेस मोठे पक्ष असताना त्यापेक्षाही नगण्य असलेल्या भाजपाच्या विरोधात ममतांनी म्हणून सगळी शक्ती झोकून दिलेली आहे. यातला आणखी एक पैलू असा आहे, की तृणमूलचे अनेक दुय्यम व कनिष्ठ नेतेही ममतांना कंटाळले असून भाजपाच्या वहात्या गंगेत उडी घ्यायला सज्ज बसलेले आहेत. सत्तांतराची नुसती चाहूल लागली तरी ममतांचा पक्ष उत्तरप्रदेशातल्या सपा बसपासारखा बारगळत जाण्याची शक्यता ममतांना भेडसावू लागली आहे. त्यांना दिल्लीतील मोदी सरकार पराभूत करण्यापेक्षा आपले बंगालचे राज्य टिकावण्याची चिंता लागलेली आहे. उलट मोदी-शहा उत्तरप्रदेश वा इतर उत्तर भारतीय राज्यातून भाजपाला येणारी २०-३० जागांची तुट बंगाल-ओडिशा अशा नव्या राज्यातून भरून काढण्यासाठी कामाला लागलेले आहेत. मतविभागणी शक्य नसल्याने आणखी एकदोन राज्यात नव्या ३०-४० जागा वाढवून आपले एकपक्षीय बहूमत टिकवण्याचे हे नियोजन शहांनी चार वर्षापुर्वीच सुरू केलेले आहे. पण हात उंचावून अभिवादनात गुंतलेल्यांना त्याचे भान कुठे आहे?

वडापवाले आणि एस्टीवाले

MSRTC strike passengers के लिए इमेज परिणाम

गेल्या वर्षीच्या दिवाळी मोसमातली गोष्ट आहे. ऐन सणासुदीच्या तीनचार दिवसात एस्टीच्या कर्मचार्‍यांनी संपाचे हत्यार उपसले आणि लोकांचे गावोगावी खुप हाल झालेले होते. कारण आजही महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात दुर्गम भागात एस्टी हेच लोकांच्या प्रवासाचे स्वस्त व मस्त साधन आहे. दिवाळी हा सण लोक शहरातून गावी येतात-जातात. त्यातही भाऊबीजेच्या दिवशी तर बंधूभगिनी आपापल्या सोयीनुसार एकमेकांच्या घरी ओवाळणीसाठी येजा करतात. नेमका तोच मुहूर्त साधून कर्मचार्‍यांनी संप केला आणि त्यासाठी सणाच्या दिवशी या कर्मचार्‍यांना शिव्याशाप खाण्याची वेळ आलेली होती. लोक कुणासाठी थांबत नाहीत आणि संपामुळे सणाचे दिवस पुढेमागे होऊ शकत नाहीत. सहाजिकच त्याही अडचणीवर मात करून लोकांनी आपला सण साजरा केला. पुढे सण संपतानाच तो संप बारगळला. पुन्हा एस्टी बसेस सुरू झाल्या आणि जनजीवनाची गाडी रुळावर आली. मग लोकांनी काय केले? त्या एस्टीवर बहिष्कार घातला काय? सणाच्या निमीत्ताने लोकांनी जे अन्य पर्याय वापरले होते, तिकडेच लोक कायमचे वळले आणि एस्टी सेवा मोडीत काढली गेली काय? त्या अडचणीच्या वेळी खाजगी प्रवासी वाहतुक करणार्‍या बसेस, जिपा किंवा अन्य वहाने याकडे लोक कायमचे वळले काय? नसतील, तर शिव्याशाप दिलेल्या त्याच एस्टी बसकडे लोक कशाला वळले? हे सामान्य लोक आपल्या सोयीसुविधा वा अन्य आवडनिवड कशी करत असतात? नेमका तोच निकष सामान्य लोकांच्या राजकीय मताचा व निवडीचा असतो. त्यासाठी कुठला वेगळा निकष वा मोजपट्टी नसते. म्हणूनच संपामुळे एस्टी निकालात निघाली असा कोणी निष्कर्ष काढणार असेल, तर त्याला मुर्खात काढावे लागते. तात्पुरती सोय किंवा अडचणीच्या वेळासाठी निवडलेला पर्याय, ही कायमची पर्यायी व्यवस्था असू शकत नाही.

अशा संपाच्या वा अडचणीच्या वेळी लोक बर्‍याच बाबतीत पर्याय शोधत असतात. दुर्गम भागात वा खेड्यापाड्यात लहान वहाने व खाजगी जिपांमधून दाटीवाटीने प्रवासी वाहतुक चालते. पश्चीम महाराष्ट्रात सातारा पुणे कोल्हापुरात त्याला वडाप म्हटले जाते. हे जिपावाले एस्टीच्या स्टॉप वा थांब्यापाशी प्रतिक्षा करीत उभे असतात. बसच्या तिकीट दरात पण जागेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून चार पैसे मिळवत असतात. ती सोय नसते, पण पर्याय असतो. बसला विलंब होत असेल आणि गर्दीचा काळ असेल, तेव्हा त्यांचा धंदा होत असतो. अन्यथा त्यांच्या जिपगाडीत कोणी हौसेने बसत नाही. कारण वेळेची बचत असली तरी तो प्रवास दुविधा अधिक असते. म्हणून मग एस्टीला शिव्याशाप देणाराही पुन्हा त्याच बसकडे वळतो. त्याचा अर्थ एस्टी ही बससेवा फ़ार आरामदायी वा सुखद वगैरे नसते. पण वडापपेक्षा सुखद असते. नेहमीची असते. परवडणारी असते. अशा बाबतीत एक आणखी अनुभव सांगितला पाहिजे. बसच्या प्रतिक्षेत असलेल्यांन हे जिपावाले लगेच निघणार म्हणून आपल्या गाड्यांमध्ये बसवत असतात. पण त्यांना हवे तितके प्रवासी मिळण्यापर्यंत गाडी कधी सुटत नाही. कारण तो हिशोब त्यांनाही परवडणारा नसतो. पण शक्यतो बसच्या येण्यापुर्वी अशा गाड्या सुटतात. सहाजिकच गाडीत बसवूनही गाडी सुटत नाही म्हणून खोळंबलेला प्रवासी जिपवाल्याच्या नावाने उद्धार करीत असतो. पण त्याचीही नजर मागून एसटीची बस येते किंवा काय, याची चहुल घेत असते. तशी बस आली, तर तात्काळ जिपांमध्ये घुसमटलेले प्रवासी उतरून बसकडे पळ काढतात आणि अर्धापाऊण तास फ़िरून त्यांना जमा करणारा जिपवाला ओशाळवाणा होऊन जातो. त्याचा धंदा बुडालेला असतो. लोक त्याच्यावरही बहिष्कार घालत नाहीत. कारण अडचणीच्या वेळी असलीच सेवा त्यांच्या मदतीला धावून येत असते. मात्र अनेकदा त्याची मोठी किंमत मोजावी लागत असते.

अडलेल्या प्रवाशांची कोंडी करून संपाच्या वेळी हे खाजगी प्रवासी वाहतुक करणारे अधिक पैसे घेत असतात. त्यात जिपवाले येतात तसेच खाजगी बससेवा पुरवणारेही येतात. त्यांच्यासाठी मोजावी लागणारी किंमत एस्टीची महत्ता सामान्य नागरिकाला सांगत असते. थोडक्यात एस्टीला कितीही शिव्या द्याव्या. पण दुसर्‍या दिवशी त्याच बसमध्ये बसायला पर्याय नसतो. ती आवडनिवड नसते. चोखंदळपणे केलेली निवड नसते. तोच प्रकार राजकारणातही असतो. भारताच्या सामान्य नागरिक मतदाराला अजून आपल्या मनासारखा राजकीय पक्ष वा संघटना मिळालेली नाही. तशा अनेक संघटना कल्पनेत असल्या तरी प्रत्यक्षात नसल्याने ज्या काही टाकावू गोष्टी उपलब्ध आहेत, त्यातून अधिक उपयुक्त कोण त्याची निवड करावी लागत असते. समोरून एस्टीची बस येताना दिसत असून वा समोर थांबलेली असताना, कुठलाही प्रवासी हट्टाने जिपच्या दगदगीत बसायला जात नाही. उलट जिपमध्ये बसलेला असतानाच एस्टी आली तर उठून एस्टीकडे पळत जातो. निवडणूकीत मतदार तसाच पर्याय शोधतो किंवा उमेदवार किंवा राजकीय पक्ष निवडत असतो. व्यवहारी भाषेत आपण त्याला लोकप्रियता असे नाव दिलेले असले, म्हणून निवडून येणारे लोकप्रिय नसतात. किंवा लोकांनी हौसेने अपेक्षेने त्यांना निवडलेले नसतात. अनेकदा तर अन्य कुठला नालायक नको, म्हणून त्यापेक्षा कमी त्रसदायक ठरेल अशा उमेदवाराची लोकांनी निवड केलेली असते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे २००९ सालात मनमोहन सोनियांच्या सरकारला लोकांनी दुसर्‍यांदा दिलेला कौल होता. त्यांचे सरकार उत्तम नव्हते आणि तरीही त्यांना मायावती, मुलायम, लालू वा डाव्यांचा ससेमिरा सहन करावा लागत होता. त्यांच्या जाचातून मनमोहन सरकारला सुटका मिळेल, असेच तेव्हा मतदान झाले होते. कारण त्यापेक्षा बरा पर्याय नव्हता आणि तेही सरकार लालू मायावतींच्या कोडीत जाण्याचा धोका जनतेला नको होता.

पाच वर्षांनी त्याच मतदाराने नरेंद्र मोदींना स्पष्ट बहूमताने सरकारमध्ये आणून बसवले, त्याला मग लोकप्रियता असे नाव देण्यात आले. पण ती मोदींची लोकप्रियता असण्यापेक्षा सोनिया मनमोहन यांच्यापासून हवी असलेली मुक्ती होती. त्याचा परिपाक म्हणून लोकांनी इतक्या मोठ्या संख्येने व प्रमाणात मोदींच्या भाजपाला मते दिली व सत्ताही दिली. पण त्याच मतदाराने दहा वर्षापुर्वी एकत्र आलेल्या कॉग्रेसप्रणित युपीएलाही निवडलेले होते. वाजपेयींच्या सरकारला सतावणार्‍या मित्रपक्षांच्या आघाडीपासून लोकांना मुक्ती हवी होती आणि त्याचा लाभ सोनियांनी उठवला होता. ममता वा जयललिता यांच्यासारखा त्रास कॉग्रेसला दिला गेला, तेव्हा डाव्यांसह लालू मुलायमनाही लोकांनी झटकून कॉग्रेसला कौल दिला होता. मात्र त्याची सोनिया कॉग्रेसला इतकी मस्ती चढली, की त्यांच्यापासून मुक्ती करणारा कोणी देवदूत सामान्य मतदार दोनतीन वर्षे शोधत होता आणि तो पर्याय मोदींच्या रुपाने समोर आला. त्याला लोकप्रियता म्हणता येत नाही. देवेगौडांपासून मनमोहन सिंग व वाजपेयी सरकारपर्यंत अनेक अनुभव घेतलेल्या जनतेने म्हणूनच मोदींना स्पष्ट बहूमताने सत्तेवर बसवले. त्याची दोन कारणे होती. मनमोहन सरकारच्या कारकिर्दीत माजलेल्या अनागोंदीपासून लोकांना मुक्ती हवी होतीच. पण सरकार चालवणार्‍याला कोणी दोनचार खासदाराचा पक्षही ओलिस ठेवतो, त्यापासून शासनकर्त्यालाही मुक्ती देण्याची जनतेची इच्छा मोदींना इतके मोठे यश देऊन गेली. मग त्याकडे बघून अभ्यासक विश्लेषक म्हणू लागले, लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि मोदींना त्याची पुर्तता करताना दमछाक होईल. ज्यांना मोदींचा विजय वा बहूमताचे भाकित करता आलेले नव्हते, किंवा मोदींच्या अपयशाची पुरेपुर खात्री होती, त्यांना जनतेच्या अपेक्षा कुठून कळल्या? तर ती अशा लोकांची फ़क्त समजूत असते व तोच निष्कर्ष म्हणून जनतेच्या माथी मारण्याचा उद्योग होत असतो.

कालपरवा इंडिया टुडे या नियतकालिकाने एक मतचाचणी केली व तिचे निष्कर्ष सादर केले. त्यानुसार मोदींची लोकप्रियता घसरल्याचा दावा केलेला आहे. त्यांनी घेतली त्या चाचणी वा त्यावर आधारीत निष्कर्षांना खोटे पाडण्याची गरज नाही. पण अशाच चाचण्या पाच वर्षापुर्वी झालेल्या होत्या आणि तेव्हाही मोदींची लोकप्रियता सर्वाधिक होती. पण त्यांच्या भाजपाला बहूमत मिळण्याची शक्यता अगदी मतदान संपून गेल्यावरही कुठल्या चाचणीला सांगता आलेली नव्हती. फ़ार कशाला ज्या डझनभर लहानमोठ्या पक्षांना मोदी व भाजपाने सोबत घेऊन एनडीए नावाची आघाडी बनवलेली होती, तिलाही बहूमतापर्यंत जागा द्यायला एखादा अपवाद करता कुठली चाचणी वा अभ्यासक तयार नव्हता. प्रत्यक्षात निकाल समोर आले तेव्हा सर्वांचीच दातखिळी बसलेली होती. असे काही झाले, मग हेच विश्लेषक चमत्कार झाल्याचे अगत्याने सांगत असतात आणि तेच लोक मोठ्या उत्साहात विज्ञानाचे कौतुक सांगून चमत्कार ही भोंदूगिरी असल्याचाही दावा हिरीरीने करीत असतात. व्यवहारात हा चमत्कार नसतो आणि त्यामागे कुठले विज्ञानही नसते. ती सामान्य मतदाराने परिस्थितीनुसार केलेली आवड किंवा निवड असते. ते मतदान लोकप्रियतेवर आधारलेले नसते. तर तात्कालीन सोय व उपलब्ध पर्याय यावर त्याचे गणित अवलंबून असते. म्हणून चाचण्या व विश्लेषणे तोंडघशी पडत असतात. भारतीय मतदारासाठी चांगले पर्याय उपलब्ध असते, तर अशा चाचण्या यशस्वी होऊ शकल्या असत्या. एस्टीला पर्याय म्हणून परवडणारी खाजगी वाहतुक सेवा किंवा आरामबस उपलब्ध असत्या, तर एस्टीवरचा नागरिकांचा राग शिव्याशापापुरता मर्यादित राहिला नसता आणि एस्टी निकालात निघाली असती. तसाच सत्ताधारी पक्ष नालायक निकामी असेल तर टिकणारा त्यापेक्षा थोडासा उजवा पर्यायही लोकांना शाश्वत वाटतो आणि त्याची निवड होते. तेव्हा मोदींच्या बाबतीत हेच झाले आणि आजची मोदींची लोकप्रियता त्यापेक्षा मोठी नाही.

यातल्या पोटनिवडणूकांचे संदर्भ अनेकजण अगत्याने आपल्या विश्लेषणात देत असतात. ते दिवाळीतल्या एस्टी संपासारखे तात्कालीन असतात. तशा परिस्थितीने वडाप करणारे तात्पुरत्या अधिक कमाईने खुश होतात. पण परिस्थिती नित्याची झाली, मग त्यांना फ़ाके मारत बसावे लागत असते. भारतातल्या विरोधी पक्षांची स्थिती आज नेमकी तशी आहे. लोकसभेच्या निवडणूकीला आठ महिने राहिले आहेत आणि अजून विरोधक गर्जना करतात, त्या एकजुटीची वा आघाडीची साधी पुर्वतयारीही झालेली नाही. जागावाटपाचा विषयही चर्चेत आलेला नाही. परिणामी जिपमध्ये बसलेला प्रवासी जसा एस्टी येण्याची चाहुल घेत थांबलेला असतो, तशी लोकमताची स्थिती आज आहे. सणासुदीला सामान्य लोक अडलेनडले तरी असतात. निवडणूकांमध्ये मतदार नडलेला नसतो. त्याच्यासमोर एस्टी व वडापची जिप किंवा आरामदायी खाजगी बस असे सर्वकाही हजर असते. त्यातली खर्चिक खाजगी बस परवडणारे मुठभर त्या बसमध्ये जाऊन बसतात, तर समान दरात प्रवास जिप व एस्टीत होणार असल्यामुळे प्रवासी जिपकडे पाठ फ़िरवतात. मोदी सरकारची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्यांनी मागल्या साडेचार वर्षात उत्तम कामगिरी केलेली नसेल. पण मनमोहन यांच्या तुलनेत खुपच चांगले सरकार चालविले आहे. थोडक्यात मतदारासमोर आरामदायी बसचा पर्याय मुळातच उपलब्ध नाही. उरले दोन पर्याय. त्यातला एक आहे विरोधी आघाडीचा पैसे देऊनही चेंगराचेंगरीत घुसमटून प्रवास करण्याचा आणि दुसरा आहे, तितकेच पैसे खर्चून निदान मोकळ्या अंगाने प्रवास करण्याचा. आपण शाश्वत सत्ता चालवू शकतो, हे मोदींनी चार वर्षात दाखवले असेल, किंवा युपीएपेक्षा कमी भ्रष्टाचार वा गैरकारभाराला स्थान नसलेले सरकार चालवले असेल, तर मतदाराने कुणाकडे आशेने बघायचे? हतबल मनमोहन की ठामपणे काम करणारे मोदी?

अर्थात मुजोरी सत्तेमुळे येते आणि त्याला भाजपाही अपवाद नाही. पण युपीए वा अन्य विरोधकांच्या बेछूट बेशिस्तीपेक्षा मोदी सरकार लोकांना सुसह्य वाटलेले असेल, तर विरोधकांची डाळ शिजणार कशी? नुसत्या चाचण्या वा बेताल आरोप अशा लढतीमध्ये बाजी मारून देत नसतात. पोटनिवडणूका व कुठल्याही सर्वत्रिक निवडणूकांचा हाच फ़रक असतो. म्हणून तर २०१४ नंतर २८ पोटनिवडणूकांपैकी भाजपा फ़क्त पाच जागी जिंकल्या, हे अगत्याने सांगितले जाते. पण त्याच कालावधीत किमान २० विधानसभा व शेकड्यांनी महापालिका व स्थानिक संस्थांच्या निवडणूका झाल्या. त्यात कोणी बाजी मारली? त्याचा तपशील विश्लेषक लपवून ठेवणार असतील, तर मोदींचे नुकसान होत नाही, तुमच्या चाचण्या व त्यांचे निष्कर्ष फ़सत असतात. सहाव्यांदा गुजरात विधानसभा भाजपाने जिंकली आणि कर्नाटकात एका मुदतीनंतरही कॉग्रेसला सत्ता टिकवता आली नाही. त्याच काळात भाजपाने राजस्थान उत्तरप्रदेशात लोकसभेच्या जागा पोटनिवडणूकीत गमावल्या ना? कारण पोटनिवडणूकीत मतदार नगरसेवक, आमदार वा खासदार निवडून देत असतो. उलट सार्वत्रिक निवडणूकीत पक्ष वा मुख्यमंत्री पंतप्रधान निवडले जात असतात. हा महत्वाचा संदर्भ सोडल्यास सगळ्या अभ्यासकांचा त्रिपुरा होऊन जातो. पुढल्या लोकसभेत असाच बंगाल वा ओडिशाचा त्रिपुरा होऊन गेला, तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण आजकाल चाचणी व राजकीय भूमिका यांची सरमिसळ झालेली आहे. त्याचे प्रत्यंतर विश्लेषणातही येते. कालपरवा इंडिया टुडे वाहिनीवर चाचणीसंबंधी चर्चा चालू असताता भाजपाने गमावलेल्या पोटनिवडणूकांचे आकडे फ़टाफ़ट मांडले गेले आणि त्याच कालावधीत जिंकलेल्या विधानसभांचे आकडे भाजपा प्रवक्त्याला सांगावे लागत होते. ते बघुन मला आमच्या खेड्यापाड्यातल्या वडापवाले आणि राजकीय विश्लेषकांची तुल्यबळ स्पर्धा चालू असल्याचे लक्षात आले.

Sunday, August 26, 2018

ऐका ‘सत्य’नारायणाची कथा



पु. ल. देशपांडे यांच्या कुठल्यातरी एका कथेत घरगडी साक्षरता वर्गात जात असतो आणि अधूनमधून ते त्याची विचारपूस करत असतात. त्याने लिहीण्यावाचण्यात किती प्रगती केली, त्याचा आढावा घेत असतात. मग एकेदिवशी तो गडी म्हणतो आता सही करता यायला लागली. त्यासाठी त्याची पाठ थोपटल्यावर लेखक विचारतात, पुढे काय? तर गडी उत्तरतो, मास्तरला ढिसमीस करून टाकला. हा प्रकार दिर्घकाळ हास्याचे फ़वारे निर्माण करून राहिलेला आहे. पण आजकाल असे गडी पुरोगामी विचारवंत म्हणून उदयास आलेले आहे. त्यांना ज्यांनी डाव्या विचारांचे वा चळवळीचे धडे शिकवले किंवा गिरवून घेतले, त्यांनाच हे ढिसमीस करायला निघालेले दिसतात. अन्यथा पुण्य़ाच्या फ़र्ग्युसन कॉलेजातील सार्वजनिक सत्यनारायणाची ‘कथा’ इतकी साग्रसंगीत वाचली गेली नसती, की गाजली नसती. एकेकाळी मुंबईच्या गिरणगावात कम्युनिस्टांचा मोठा दबदबा होता. नुसता राजकारणात नव्हेतर सामाजिक सांस्कृतिक जीवनातही डाव्या विचारांचा ठसा उमटलेला होता. शाहिर अमरशेख, शाहिर गवाणकर असे डाव्या विचारांचे सांस्कृतिक कलादूत गिरणगावावर जादू करीत होते आणि कामधंद्याच्या जागी तर अन्य कुठल्या राजकीय विचारांना प्रवेशही नव्हता. दहीहंडीपासून सार्वजनिक गणेशोत्सवापर्यंत प्रत्येक जागी डाव्यांचाच पुढाकार असायचा आणि तळागाळातील समाजावर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी डाव्या विचारांचे नेते कॉम्रेड धार्मिक सामाजिक उत्सवात पुढाकार घेत होते. त्याचाच एक भाग म्हणून १९५० नंतरच्या काळात कापड गिरण्यांमध्ये कामगारांना सार्वजनिक सत्यनारायणाची पूजा घालण्याचा अधिकार व्यवस्थापनाला मान्य करायला लागण्यासाठी संपाचेही हत्यार कम्युनिस्टांनीच उपसलेले होते. आज त्यांचेच नातु-पणतु त्या पूजेला पुण्याच्या कॉलेजात किंवा अन्यत्र आक्षेप घेताना ऐकल्यावर बघितल्यावर पुलंचा तो घरगडी आठवला.

खरेतर हा स्थानिक मामला आहे आणि त्यात स्वत:ला राष्ट्रीय राजकारणातील नेता म्हणवणार्‍यांनी उडी घेण्याचे कारण नाही. पण शरद पवार थोडे दमलेले असले, मग आजकाल सुप्रियाताईंना आघाडी संभाळावी लागत असते. अन्यथा त्यांनी सत्यनारायणाच्या पूजेविषयी बहुमोल प्रबोधन कशाला केले असते? तुमच्या काय त्या धार्मिक पूजा वगैरे आपापल्या घरात करा. जाहिर ठिकाणी नकोत, असा अनाहुत सल्ला त्यांनी जनतेला देऊन टाकलेला आहे. आपलेच पिताजी इदसाठीच्या इफ़्तार पार्ट्या कुठे साजर्‍या करतात, हे सुप्रियाताईंना ठाऊक नाही काय? की त्यांना इफ़्तार पार्टी हा धार्मिक प्रकार असल्याचे ठाऊक नाही? राहुल गांधींच्या पिढीतले अनेक ताज्या दमाचे नेते माहिती नसलेल्या गोष्टीविषय़ी कमालीची ठाम विधाने करीत असतात. सुप्रियाताई त्याच पठडीतल्या असल्याने बहुधा त्यांना प्रबोधनाची उबळ आलेली असावी. हरकत नाही. पण तसले काही प्रबोधन वगैरे करीत असताना जरा आपल्या पिताजींनाही आवरावे ना? नको तिथे लोकरी टोप्या घालून जाहिर इफ़्तार पार्ट्यांमध्ये ते कशाला जातात? पक्षातर्फ़ेच असल्या पार्ट्यांचे आयोजन कशाला करतात? की इस्लाम नावाचा काही धर्म आहे आणि इदीनिमीत्त दिल्या जाणार्‍या उपवास सोडण्याच्या पार्ट्यांचा धर्माशी संबंध असल्याची माहितीच सुप्रियाताईंना अजून मिळू शकलेली नाही? आणखी एक गोष्ट, असले प्रबोधन इतरेजनांचे करण्यापुर्वी आपल्याच पक्षाचे माजी मंत्री व विद्यमान आमदार जीतेंद्र आव्हाड यांनाही जरा सार्वजनिक जागा किंवा स्थान म्हणजे काय, किंवा धार्मिक सण उत्सव म्हणजे काय, तेही सांगून ठेवायचे ना? कारण आव्हाड फ़ुले शाहू आंबेडकरांचे कार्य म्हणून असलेच नानाविध उद्योग सार्वजनिक ठिकाणी करण्यासाठी खातकिर्त झालेले आहेत. त्यात कोर्टाने हस्तक्षेप केला तर थेट सुप्रिम कोर्टापर्यंत जाऊन सार्वजनिक जा्गा अडवण्याचा व धुडगुस घालण्याचा विक्रम त्यांच्याच खात्यात जमा आहे.

मुंबईच नव्हेतर देशातील सर्वात मोठी उंच दहीहंडी उभारण्याचा व त्यासाठी भसाड्या आवाजात लाऊड स्पीकर वाजवण्याचा कार्यक्रम आव्हाड प्रतिवर्षी करीत असतात. जर सुप्रियाताईंनी तातडीने आव्हाडांना रोखले, तरी ठाणेकर जनता खुश होईल. कारण आव्हाडांच्या दहीहंडीमुळे मोक्याच्या जागी वाहतुकीची कोंडी होते आणि आसपास वास्तव्य करणार्‍या लाखो लोकांचे कान बधीर होण्यापर्यंत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्याचा विस्तार झालेला आहे. की चौकात दहीहंडी उभारून रस्ते व वाहतुक खोळंबवणे आव्हाडांच्या खाजगी घरातील बाहुल्यांचे खेळ आहेत, अशी सुप्रियाताईंची समजूत आहे? पुण्यातल्या कॉलेज कर्मचार्‍यांना वा इतरांना घरातले सण रस्त्यावर आणण्याच्या संदर्भात प्रबोधन करण्यात सुप्रियाताई, आव्हाडांना विसरून गेल्यात की काय? बाकीचे नाही तरी निदान असले उत्सव फ़ुले शाहू आंबेडकरांच्या पठडीतले नसल्याचे तरी या आपल्या उत्साही सहकार्‍याला समजवा ना? खुप उपकार होतील ताई ठाणेकरांवर. बाकी प्रबोधन करणारे पत्रकार वा वाहिन्यांना काय सांगावे? हे लोक प्रबोधनाच्या पलिकडे गेलेले आहेत. त्यांना धर्म म्हणजे काय आणि सत्य म्हणजे काय, त्याचाही पत्ता नसतो. सत बोलरे नार्‍या तर मांडवाला लागली आग, अशी एकूण बुद्धीक्षमता असल्यावर फ़र्ग्युसनही आर्ग्युसन होऊन आर्गुमेन्ट करू लागतो ना? त्यामुळे त्यांना असल्या चर्चा रंगवाव्याच लागतात. पण सार्वजनिक जागी सत्यनारायणाचे कथानक मुळातच मुंबईच्या डाव्या व कम्युनिस्टांनी सुरू केल्याचाही त्यांना थांगपत्ता नसतो. कुठेही हिंदूधर्मियांच्या चेहर्‍यावर त्यांना समाधान स्मित दिसले, की त्यामागे संघ वा सनातन असल्याच्या निद्रानाशाने अशा लोकांची झोप उडत असते. त्यांना दाभोळकर संपादक होण्यापुर्वी ‘साधना’ प्रकाशनाच्या छापखान्यातही सत्यनारायण घातला जाई हे कोणी सांगावे? त्यांचे जग मुळात अंनिस स्थापन झाल्यानंतर सुरू झालेले आहे ना?

पंधरा वर्षापुर्वी विकास देशपांडे या समाजवादी मित्राची पन्नाशी साजरी करायला आम्ही काही जुने मित्र सहकारी पुण्यात जमलेले होतो. माझ्या सोबत भाऊ कोरडेही आला होता. तेव्हा देशात वाजपेयी सरकार होते आणि विषय बोलता बोलता हिंदूत्वाकडे वळला. तर आमचा एक जुना सहकारी राम कांबळे प्रक्षुब्ध होऊन म्हणाला, आपण सगळेच ढोंगी झालोय. इकडे आम्ही गणपती घरी आणला, मग बाबा आढाव आमची हेटाळणी करतात. मग साधना छापखान्यात सत्यनारायण कशाला होतो? असे विचारल्यावर कोणी उत्तर देऊ शकत नाहीत. ही वास्तविकता असते. साधना छापखान्यातल्या कामगारांना निधर्मी तत्वज्ञान सांगण्यात अपेशी ठरलेले शहाणे जगाला धर्माचे थोतांड समजावू लागले, तर त्याचा कितीसा परिणाम होणार आहे? सवाल लोकांची हेटाळणी करण्याचा नसून त्यांना बदलण्याचा आहे. बदलण्यासाठी लोकांना आधी विश्वासातच घ्यावे लागते. हळुहळू त्यांच्यात बदल होत असतो. महात्मा फ़ुल्यांनी दिडशे वर्षापुर्वी अशा रितीने लोकांना दुखावण्याचे कार्य हाती घेतले असते, तर आज त्यांचे नाव घेतले गेले नसते. समाजात मिसळून व सुधारणांसाठी समाजाला राजी करून बदल घडवले जात असतात. श्रद्धा वा भावना दुखावून बदल होत नाहीत. उलट अधिकाधिक लोक परंपरावादी होतात आणि रुढींना चिकटून बसतात. पण कुठलेही विचार अर्धवट वाचून आपल्याला झालेले अपचन इतरांच्या माथी मारण्य़ाला हल्ली बुद्धीवाद समजले जाते. मग असे अर्धवटराव आपल्यालाच ढिसमीस करून टाकायला सज्ज असतात. उद्या त्यांनी फ़ुले शाहू आंबेडकरांनाही असेच ढिसमीस केल्यास नवल वाटणार नाही. नाहीतरी ज्या मेवानीचे पुण्यात भीमा कोरेगावच्या निमीत्ताने आगतस्वागत झाले, त्याने काय दिवे लावलेले आहेत? आंबेडकरांच्या विविध विचारांचे संदर्भ देऊन सवाल केल्यावर त्याने आपल्याला सगळेच आंबेडकर मान्य नसल्याचे बेधडक सांगून टाकलेले होते ना? मग फ़र्ग्युसनवर चाल करून आलेली अवलाद किती वेगळी आहे?

राफ़ायल नामे पेट्रोल-डिझेल

राफेल डील के लिए इमेज परिणाम

संसदेच्या मागल्या पावसाळी अधिवेशनात एक मोठा चमत्कार घडला होता. सहसा अविश्वास प्रस्ताव हा अधिवेशनाच्या अखेरीस चर्चेला येत असतो. विश्वास प्रस्ताव असेल तर तो आरंभी येत असतो. हा प्रस्ताव अविश्वासाचा होता तरीही सभापतींनी सत्ताधारी पक्षाशी मसलत करून तात्काळ स्विकारला आणि लगेच चर्चेलाही घेतला. तोपर्यंत राहुल गांधी रानोमाळी ओरडत फ़िरत होते की पंधरा मिनीटे मला संसदेत बोलू द्या, मोदींना पळता भूई थोडी होईल. राहुल अविश्वास प्रस्तावाच्या वेळी तब्बल पाऊण तास बोलले आणि पंतप्रधान मोदींच्या चेहर्‍यावरची माशीही हलली नाही. अखेरीस आपले भाषण संपल्यानंतर राहुल गांधीच पंतप्रधानांच्या आसनापर्यंत गेले व त्यांनी मोदींना बसल्या जागी मिठी मारून ती माशी हलवली. नंतर या चर्चेला उत्तर देताना मोदींनी राहुलची यथेच्छ खिल्ली उडवली. अर्थात आता अशा टवाळीची सवय राहुलच्याही अंगवळणी पडलेली आहे. म्हणून त्यांनीच आपल्या भाषणात ‘मला पप्पू म्हणा’ अशी कबुली देऊन टाकली होती. पण हल्ली तो काळ निघून गेलेला आहे. राहुल पप्पू असल्याचे जनतेने स्विकारलेले आहे. पण त्यांच्या नादाला लागून किती शहाणे बुद्धीमंतर पप्पू होतात, याकडे लोकांचे लक्ष असते. तर अविश्वास प्रस्तावाच्या त्या चर्चेदरम्यान बहुतांश वाहिन्यांनी समांतर चर्चाही चालवलेल्या होत्या आणि त्यात एका मराठी सर्वज्ञानी बुद्धीमंताने राहुल क्षेपणास्त्र घेऊन जोरदार लढत असल्याचीही भाषा केलेली असते. थोडक्यात आपणही राहुल सोबत पप्पू झाल्याची कबुली दिली होती. कारण अशा बुद्धीमंतांना राफ़ायल हे डिझेल आहे की पेट्रोल आहे, त्याचेही आता भान उरलेले नाही. राहुलनी आपल्या आरोपबाजीनेच ते सिद्ध केलेले आहे. जे लोक नित्यनेमाने मोदींच्या भाषणातल्या चुका शोधण्यासाठी जाडजुड भिंग घेऊन सज्ज बसलेले असतात, त्यांना राफ़ायल विमानाच्या किंमती कळतात का?

मागल्या चारपाच महिन्यापासून राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या राफ़ायल विमान खरेदीला लक्ष्य केले आहे. ही खरेदी युपीए सरकार असताना व्हायची होती आणि तेव्हा ज्या किंमतीत विमाने खरेदी व्हायची होती, त्यापेक्षा अधिक किंमत मोजून ही खरेदी आता मोदी सरकारने केल्याच दावा राहुल सातत्याने करीत असतात. परंतु ते रोज काय बोलतात आणि रोजच्या रोज काय बदलतात, किती बदलतात, त्याची कोणी दादफ़िर्याद घेतली आहे काय? मागल्या चारपाच महिन्यात राहुलनी राफ़ायल विमानांच्या मोदी सरकारने केलेल्या खरेदीचे आकडे तपासले, तर कोणाच्याही मनात शंका येईल, की राहुल विमानाविषयी बोलत आहेत की पेट्रोल डिझेलच्या किंमतीविषयी बोलत आहेत? कारण दहापंधरा वर्षात होणारी मोठी खरेदी व त्याच्या किंमती दैनंदिन स्वरूपात बदलत नसतात. आज एक भाव आणि दुसर्‍या दिवशी भलताच भाव, असे कधी विमानांच्या खरेदीत होऊ शकत नाही. कारण ह्या खरेदी व्यवहारात अनेक महिने वर्षे घासाघीस चालते आणि अखेरीस किंमत ठरली, मग प्रत्यक्षातली देवाणघेवाण अनेक वर्षे चालू असते. पण राहुल गांधीचे क्षेपणास्त्रांनी चालले आरोपा़चे युद्ध जगावेगळे आहे. त्यात राफ़ायल विमानाच्या किंमतीमध्ये दैनंदिन चढउतार येत असतात. कुठल्या जाहिरसभेत बोलताना राहुल गांधी राफ़ायल विमान खरेदीत जी किंमत सांगतात, ती संसदेत बोलताना बदललेली असते आणि नंतर इतर कुठे भाषण करताना आणखीनच बदललेली असते. ‘इंडिया टुडे’ नावाच्या एका माध्यम समुहाने मग राहुल गांधींच्या बाजारात राफ़ायल विमानाच्या किंमतीतले चढउतार शोधण्याचा अभ्यास केला, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. एकवेळ भारतातल्या भाजी बाजारातले किरकोळ कांदा बटाटा भाज्यांचे भाव स्थीर असतील. पण राहुलच्या राफ़ायलचे दर प्रतिदिन व तासातासाला बदलत असतात.

चार महिन्यात राहुल गांधींनी मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करताना राफ़ायल विमानाच्या किंमती चार वेळा बदल केला आहे. ह्या किंमती मोदींच्या काळातील नसून युपीए सरकारने ठरवलेल्या विमानाच्या खरेदीसंबंधी आहेत. म्हणजे मनमोहन सरकारने किती वेळा व किती व्यवहार केले, असाही प्रश्न उपस्थित होतो. जर हा व्यवहार एकदाच झालेला असेल तर विमानाची एकदाच ठरलेली किंमत राहुलना सांगता आली पाहिजे. ती सतत पुढल्या आरोपामध्ये बदलता कामा नये. पण गेल्या एप्रिल महिन्यापासून राहुल हा विषय चघळत आहेत आणि त्यांच्या भाषणांचा वा आरोपांचा आढावा घेतला, तर राफ़ायल विमानाच्या किंमती पेट्रोल डिझेलच्या गतीने बदलत असल्याचे दिसते. २९ एप्रिल रोजी कॉग्रेसने दिल्लीत आक्रोश मेळावा भरवला होता आणि त्यात हा विषय राहुलनी प्रथम काढला. तेव्हा ते म्हणाले होते, मनमोहन सरकार असताना हेच राफ़ायल विमान ७०० कोटी रुपयांना एक, याप्रमाणे खरेदी करायचे ठरले होते. पण मध्यंतरी सरकार बदलले आणि सत्तेत आलेल्या मोदी सरकारने तब्बल १५०० कोटी रुपये एक अशा दराने विमान खरेदीचा करार केला. म्हणजेच प्रत्येक विमानामागे ८०० कोटी रुपयांची अफ़रातफ़र झालेली आहे. सहाजिकच २०-३० विमानांच्या खरेदीत अब्जावधी रुपयांचा घोटाळा झाला. देशाच्या इतिहासातला तो सर्वात मोठा घोटाळा असल्याचा जाहिर शोध राहुलनी लावलेला होता. विमानाच्या मूळ किंमतीपेक्षाशी शंभर कोटी रुपये अधिक मोजले जाणार असतील, तर त्याला घोटाळाच म्हणावे लागणार ना? पुढले दोन महिने राफ़ायल विमानांच्या किमंती राहुल बाजारात स्थिर होत्या. ज्याला कोणाला विमान हवे, त्यांना राहुल ते १५०० कोटी रुपयात विकायला तयार बसलेले होते. पण त्यांच्या दुर्दैवाने कोणी ग्राहक आला नाही आणि सर्वच विमाने तशीच धुळ खात पडून राहिली.

अगदी कर्नाटक विधानसभा प्रचारातही राहुल राफ़ायल विमाने विकायचा प्रयत्न करीत होते आणि ती घ्यायला कोणीच राजी नव्हता. ना कोणी मोदींची १५०० कोटी रुपयाची विमाने घ्यायला राजी होता, की मनमोहन सरकारची ७०० कोटी रुपयांची विमाने घ्यायला राजी होता. त्यामुळे राहुलना लाटका माल पद्धतीने विमानांच्या किंमती खाली आणुन जाहिर सेलच्या बाजारात उतरावे लागले. जुलै महिन्यात त्यांनी मनमोहन सरकारच्या राफ़ायल विमानांच्या किंमती जवळपास २० टक्क्यांनी कमी करून ५२० कोटी रुपयांना राफ़ायल विमानांची विक्री सुरू केली. ती स्वस्त आणि मस्त असल्याचे लोकांना पटावे, म्हणून मोदी सरकारच्या राफ़ायलच्या किंमतीही खुप चढवून प्रत्येकी १६०० कोटीपर्यंत वर नेल्या. त्यासाठी अन्य कुठे जाण्यापेक्षा राहुलनी लोकसभेतच टपरी मांडली आणि लाटका माल विकायला काढला. अर्थात राहुलचा माल खोटा असल्याचा ओरडा संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी तिथेच जाहिर करून टाकले आणि राहुल बाजार उठला. एकही विमान तिथेही विकले गेले नाही. मग काय करायचे? मग तीन आठवड्यांनी राहुल छत्तीसगड राज्याची राजधानी रायपूर येथे गेलेले होते. तिथल्या मेळाव्याला चांगली गर्दी बघून त्यांनी पुन्हा राफ़ायल विमानांचा पेटारा उघडला आणि किंचीत भाव चढवून ग्राहकांचा शोध सुरू केला. लोकसभेत मनमोहन मॉडेलची राफ़ायल विमाने ५२० कोटी रुपयांना विकायला काढलेली होती, ती रायपूरला ५४० कोटी रुपयांना विकत राहुल गांधी रस्त्यावर बसलेले होते. मात्र त्यांना रायपूरमध्येही कोणी ग्राहक भेटला नाही, निराश व्हावे लागले आणि तो विमानांचा ताफ़ा घेऊन राहुल पुन्हा दिल्लीला परतले. आपल्या सहकारी सवंगड्यांना गोळा करून त्यांनी सल्लामसलत केली आणि पुढला आठवडे बाजार कुठे आहे, त्याची विचारपुस केली. तो हैद्राबादला असल्याचे कळले.

१३ ऑगस्ट रोजी हैद्राबादला कॉग्रेस पक्षाची जत्रा तिथे भरणार होती आणि आपल्याला तिथे घासाघीस करून राफ़ायल विमान विकता येईल असा आत्मविश्वास त्यांच्यापाशी होता. म्हणून त्या विमानांचा ताफ़ा घेऊन राहुल हैद्राबादला पोहोचले आणि त्यांनी कुठल्याही लिलावात कमीअधिक भाव करावा, तसे दोनचार मिनीटाच्या भाषणात राफ़ायलच्या किंमतीत पुन्हा फ़ेरबदल करून टाकले. भाषणात राहुल म्हणाले, ‘लोकसभेत मी पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला. राफ़ायल विमानाच्या किंमतीत ५२६ कोटीवरून १६०० कोटी रुपये इतकी वाढ कशामुळे झाली? पण मोदींनी काहीही उत्तर दिले नाही.’ म्हणजे राहुल यांनी एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत चार महिन्यात मनमोहन सरकारच्या व्यवहारातील राफ़ायल विमानांच्या किंमतीतच चारवेळा बदल केला. आरंभी ७०० कोटी असलेली किंमत दोन महिन्यांनी ५२० कोटी रुपये केली व नंतर त्यात वाढ करून ५४० कोटी इतकी चढवून अखेरीस ५२६ कोटी केली. मोदी सरकारने राफ़ायल किती किंमतीत खरेदी केली, ते राहुलना सत्तेबाहेर असल्याने ठाऊक नसेल कदाचित. अन्य कुणा कॉग्रेस नेत्यांनाही माहिती असणार नाही. पण मनमोहन सरकारच्या मंत्र्यांना निदान त्यांच्या सरकारच्या काळातील राफ़ायलच्या विमानांची नेमकी किंमत ठाउक असेल की नाही? की फ़्रान्स व मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या दरम्यान झालेल्या बोलण्यात ठरलेली किंमत राहुल यांच्या इच्छेनुसार वेळोवेळी बदलत राहिल, असा करार युपीए सरकारने केलेला होता? मनमोहन सरकारने ही खरेदी करताना विमानाच्या किंमती राहुलच्या मनात येतील तशा बदलण्याची काहीशी अट घातली असल्याशिवाय हे बदल कसे शक्य आहेत? राहुलना लोक पप्पू म्हणतातच. पण असल्या बाजारात आपला माल विकायला बसलेल्यांचाही म्हणूनच आता पप्पू होऊन गेला आहे. कारण यांना विमान आणि पेट्रोल डिझेलच्याही किंमतीतला फ़रक कळत नाही, हे लोकांच्याही लक्षात आलेले आहे.

Saturday, August 25, 2018

तुम्ही झालात करोडपती



पाच वर्षापुर्वी फ़ेसबुक ब्लॉग या सोशल मीडियात, मी काही तरूण मित्रांच्या आग्रहामुळे आलो. तेव्हा हे माध्यम इतके प्रभावी आहे असे वाटलेले नव्हते. नव्या पिढीच्या गंमती म्हणूनच मी याकडे त्रयस्थपणे बघत होतो. चार दशकाहून अधिक काळ पत्रकारिता करताना बहुतांश मुख्य प्रवाहातील वर्तमानपत्रे व नंतरच्या उपग्रहवाहिन्या यांच्यातून तसा बहिष्कृत असलेला मी एक पत्रकार. तथाकथित पुरोगामीत्व किंवा त्यातली टोळीबाजी यामुळे बहिष्कृत राहिलो. कारण त्यांच्या अजेंडानुसार चालणार्‍या पत्रकारितेच्या पठडीत मी बसू शकत नव्हतो. पण ज्याची चार दशकाहून अधिक काळ पर्वा केली नाही, त्याविषयी आता दु:ख करण्याचे काही कारण नव्हते. अशा वेळी मुरलीधर शिंगोटे यांच्या आग्रहाखातर ‘पुण्यनगरी’ दैनिकात दैनंदिन स्तंभलेखन सुरू केले आणि प्रथमच मुंबईबाहेर दुरच्या ग्रामीण जिल्हा पातळीवर माझे लिखाण पोहोचू लागले. त्यातून माझी ओळख नव्याने आकार घेऊ लागली. पण ‘पुण्यनगरी’ तथाकथित उच्चभ्रू पत्रकारितेच्या बाहेरचे दैनिक होते आणि त्याचा कोणी उच्चभ्रू वाचक असेल, असे मलाही माहिती नव्हते. पण तसे वाचक होते आणि त्यापैकीच तिघा तरूणांनी मला सतत पाठपुरावा करून सोशल मीडियात आणले. आयुष्यभर शाईच्या लेखणीने लिहीण्याचा हट्ट केलेल्या मला बॉलपेनही आवडत नव्हते, तर संगणकावर टाईप करण्याची गोष्ट सोडूनच द्या. ईमेलपुरता मी लॅपटॉप वापरत होतो. इंजिनीयरींगच्या या मुलांनी चिकाटीने मला मराठी टायपिंगमध्ये ओढले आणि माझ्या नकळत मला त्यातून सोशल मीडियात आणले. त्यांनीच फ़ेसबुक व ब्लॉग सुरू करून दिला आणि काही महिन्यात मी स्वतंत्रपणे नियमित ब्लॉग लिहू लागलो. आधी इतरत्रचे लेख टाईप करू लागलो आणि तेच ‘उलटतपासणी’ या ब्लॉगवर टाकत होतो. पण ऑगस्ट २०१३ नंतर ‘जागता पहारा’ हा ब्लॉग नित्यनेमाने लिहीणे सुरू केले. आता त्याला पाच वर्ष झाली आहेत. कुठवर आलो तिथून? एक कोटी हिटस?

नव्या युगातील माध्यमाची ही खासियत आहे, इथे आपल्याला जे मांडायचे आहे, त्यासाठी कुठले बंधन नाही. कुठल्या भांडवलाची वा यंत्रणेची गरज नाही. मालकाची गुलामगिरी नाही, की वितरण मार्केटींगची अगतिकता नाही. फ़ेसबुक व ब्लॉग या माध्यमातून तुम्ही प्रस्थापित भांडवली गुंतवणूकीच्या मक्तेदार माध्यमांना खुले आव्हान देऊ शकता. त्यांना पर्याय देऊ शकता. पत्रकारितेची वा अभिव्यक्तीची गळचेपी असल्या कांगाव्याची गरज नाही. भारतात आता कोट्यवधी स्मार्टफ़ोन आणि त्याहून अधिक संगणक व इंटरनेट उपभोक्ता झालेले आहेत. त्यांना आवडणारे वा पटणारे किंवा त्यांच्या बुद्धीला पचणारे, चालना देणारे लिहू शकत असाल, तर त्यात कोणीही अडथळा आणू शकत नाही. वाचक आणि लेखक यांच्यात कोणी भिंत उभी करू शकत नाही. ‘जागता पहारा’ने मला हा साक्षात्कार घडवला आहे. कारण या पाच वर्षात या ब्लॉगने तब्बल एक कोटी हिटसचा पल्ला पार केला आहे. याचा आरंभ किरकोळच होता. त्याची जाहिरात करून घ्यायला पैसे नव्हते की लेखकांचा ताफ़ाही जमवण्याची माझी कुवत नव्हती. त्यामुळेच एकहाती ब्लॉग चालवणे अपरिहार्य होते. आपल्यापाशी प्रयत्न, लेखणी व बुद्धी यापलिकडे कसलेली भांडवल वा साधने नाहीत, याचे भान ठेवून मी कामाला लागलेलो होतो. आज पाच वर्षांनी त्याचे समाधान वाटते. कारण नुसत्या ब्लॉगवर दिसणार्‍या हिटसचा आकडा महत्वाचा नाही, तर त्याच ब्लॉगला शेअर करणारे, कॉपीपेस्ट करून माझे लिखाण लाखो लोकांपर्यंत पोहोचवणारे हजारो चहाते वाचक तयार झाले आहेत. त्यासमोर ब्लॉगवर दाखवला जाणारा हिट्सचा आकडा खुपच नगण्य आहे. हिमनगाचे टोक असा तो आकडा आहे. जेव्हा कुठेही जाहिर कार्यक्रमाला किंवा व्याख्यानाच्या निमीत्ताने जातो, तिथे ब्लॉग वाचणार्‍यांची होणारी गर्दी वा मिळणारे प्रेम, या आकड्यापेक्षाही मोठी गोष्ट आहे.

या माध्यमात वा तांत्रिक क्षेत्रात काम करणार्‍यांच्या मते किमान तीनचार हजार व्हाट्सअप ग्रुपवर माझे लेख प्रतिदिन कॉपीपेस्ट होतात. काही तालुका जिल्हापत्रे माझे लेख परस्पर छापून टाकतात. फ़क्त महाराष्ट्रात भारतातच नव्हेतर जगभर माझा ब्लॉग वाचला जातो. त्यांच्याही प्रतिक्रीया ईमेल वा अन्य मार्गाने येत असतात. खेरीज समाजातील अनेक मान्यवर नामांकित लोकांच्या प्रतिक्रीया हिंमत वाढवणार्‍या असतात. त्यांची नावे इथे देणे मला योग्य वाटत नाही. कारण त्यांनी व्यक्तीगत रुपाने पाठ थोपटली आहे किंवा प्रोत्साहन दिलेले आहे. ते जाहिरात करण्यासाठी नाही. तर त्यांनाही माझ्या ब्लॉगवरील लेखातून काहीतरी उपयुक्त मिळाले असेल. त्यांचे कौतुक अभिमानास्पद आहे. या ब्लॉगची वाटचालही सांगण्यासारखी आहे. एक कोटी हा आकडा नजरेत भरणारा आहे. पण तिथेपर्यंत पोहोचताना पाच वर्षे लागलेली आहेत. त्यापैकी ६० लाख हिटस अवघ्या शेवटच्या सोळा महिन्यातल्या आहेत. म्हणजेच ४० लाखाचा आकडा आधीच्या ४४ महिन्यातला आहे. सरासरी एक लाख दर महिना असा तो आकडा पडतो. पण तोही फ़सवा आहे. पहिल्या वर्षभरात दरमहा वीसतीस हजारही हिटस मिळत नव्हत्या किंवा रोजचा आकडाही हजाराच्या मागेपुढे असायचा. एका महिन्यात एक लाख हिट्स मिळवण्यातच दोन वर्षे निघून गेली होती आणि पुढे हळुहळू त्याला वेग येत गेला. दरमहा दोन लाखाचा पल्ला गाठण्यासाठीही आणखी दिड वर्षाचा कालावधी लोटला. पावणे चार वर्षे होत असताना अचानक एका लेखाने थेट तीन लाखाचा पल्ला गाठून देण्याइतकी झेप घेतली, त्यातून मला व्हायरल होणे म्हणजे काय, त्याचा साक्षात्कार घडला. ‘मच्छीका पानी’ अशा शीर्षकाचा तो लेख होता आणि तिथून ब्लॉगला जी चालना व गती मिळाली, ती थांबायला वा घटायला तयार नाही. तो महिना होता मे २०१७.

या पाच वर्षात ब्लॉगवर आता चोविसशे लेख लिहून झाले आहेत आणि त्याचे श्रेय त्याचे अगत्याने वाचन करणार्‍यांना आहे. पण ब्लॉगची गंमतही इथे सांगायला हवी. वर्तमानपत्रासाठी लिहीलेला लेख त्या दिवसापुरता असतो आणि साठवणार्‍यांच्या पलिकडे बाकीच्या लोकांसाठी तो रद्दी होऊन जाते. पण ब्लॉगवरला लेख दिर्घकालीन असतो. कारण तो तिथेच रहातो आणि चिकित्सक शोध घेणार्‍या वाचकांच्या प्रतिक्रीया नंतर कधीही येऊ शकतात. आणखी एक गंमत अशी, की ‘जागता पहारा’वरला सर्वाधिक वाचला गेलेला लेख मुळातच सोळा महिने शिळा होता. म्हणजे त्याचे असे झाले, की मालेगाव स्फ़ोटातील आरोपी कर्नल पुरोहित यांना जामिन मिळाल्याची बातमी आली आणि विवेक साप्ताहिकासाठी लिहीलेला सोळा महिने जुना लेख आठवला. अश्विनी मयेकरने मला त्या़चे स्मरण करून दिले आणि तो ब्लॉगवर प्रकाशित न केलेला लेख मी त्याच दिवशी संध्याकाळी टाकला. पण त्याची खासियत अशी होती, की सोळा महिन्यापुर्वीच मी लिहीलेले मुद्दे मान्य करून पुरोहितांना जामिन मिळाला होता. आजही तोच सर्वाधिक वाचला गेलेला लेख आहे. पत्रकारितेत विषय शिळा जुना होतो. पण त्यात मांडलेले मुद्दे अभेद्य व नेमके असतील, तर विषय शिळा होण्याचा संबंध येत नाही. याची ही नवी जाणिव ब्लॉग लेखनातून मिळाली. तुमच्या लिखाणात आशय व विषय असेल, तर आजच्या युगात अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुणाचे लाचार राहू शकत नाही. त्या़ची कोणी गळचेपी करू शकत नाही, याचा हा जीताजागता पुरावा आहे. अर्थात ज्यांना स्वातंत्र्य व अधिकार हक्क कुबड्या वाटतात, त्यांना स्वातंत्र्याचे पाय किती भक्कम व मजबूत असतात, त्याची जाणिव कधीच होऊ शकत नाही. या यशाचे खरे मानकरी तुम्ही सगळे माझे मित्र चहाते व जीवलग वाचक आहात. मी फ़क्त लिहीले. ते वाचण्यासाठी ब्लॉगवर येऊन आकडा तुम्हीच फ़ुगवत नेला आहे. अन्य माध्यमातून व्हायरल कॉपीपेस्ट शेअर करून इतका पल्ला तुम्हीच तर गाठला आहे. अभिनंदन मित्रांनो!

Friday, August 24, 2018

नरसिंहराव आणि अटलजी

rao vajpayee के लिए इमेज परिणाम

अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने व्याकुळ झालेला भारत देश बघताना त्यांचे राजकीय समकालीन व माजी पंतप्रधान नरसिंहराव यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. राजीव गांधी यांच्या घातपाती निधनामुळे कॉग्रेसमध्ये जी नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठी निवृत्तीत गेलेले नरसिंहराव पुन्हा क्रियाशील राजकारणात परतले आणि ज्येष्ठ म्हणून त्यांना कॉग्रेस अध्यक्ष बनवण्यात आलेले होते. तेव्हाही गांधी घराण्याचे निष्ठावंत नारायणदत्त तिवारी व अर्जुनसिंग यांनी सोनियांच्या निवासस्थानी धरणे धरून त्यांनीच पक्षाचे नेतृत्व स्विकारावे म्हणून आग्रह धरला होता. पण मुले लहान असल्याने सोनियांनी ती मागणी फ़ेटाळून लावली होती. पर्यायाने राव यांच्याकदे नेतृत्वाची धुरा आलेली होती. सहाजिकच निवडणूका पुर्ण झाल्यावर पंतप्रधान पदही त्यांच्याच वाट्याला आले. पण त्यांनी सोनियांच्या रिमोटनुसार कारभार केला नाही आणि ते रोषाला पात्र झालेले होते. पुढे जेव्हा सोनियांनी काही दरबारी हाताशी धरून पक्षाची सुत्रे आपल्या हाती घेतली त्यानंतर राव यांना बहिष्कृत करण्यात आले. नवे नेतृत्व आले मग जुन्याचे महत्व संपुष्टात येते ही जगरहाटीच आहे. पण ज्याने पाच वर्षे पक्षाची व देशाची धुरा संभाळली, त्याच्या वाट्याला पुढल्या काळात स्वपक्षातच आलेली लाजिरवाणी व अपमानास्पद वागणूक जगाच्या इतिहासात अपुर्व मानावी लागेल. पंतप्रधान म्हणून पायउतार झाल्यापासून अवघ्या आठ वर्षात राव यांचे निधन झाले आणि मारणोत्तर त्यांच्यावर सूड घेण्य़ाची एकही संधी सोनियांनी सोडली नाही आणि राव यांना अपमानित होऊन इहलोकीचा   निरोप घ्यावा लागला होता., आज देश अटलजींसाठी अश्रू ढाळत असताना व त्यांना सर्व इतमामाने निरोप दिला जात असताना अपमानित नरसिंहरावांचे स्मरण म्हणूनच अगत्याचे ठरावे. देशाच्या राजकीय व सार्वजनिक जीवनातील सभ्यतेचा गळा त्यांच्या अपमानाने घोटला गेला होता.

राव यांना ९ डिसेंबर २००४ रोजी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना एम्स या इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तिथेच चौदा दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर माजी पंतप्रधान म्हणूअन सरकारी व शाही इतमामाने त्यांना निरोप दिला जावा ही अपेक्षा सर्वांचीच होती. ती भारताची परंपरा राहिलेली आहे. पण नरसिंहराव तितके सुदैवी नव्हते. कारण देशात पुन्हा त्यांच्याच पक्षाच्या हाती सततसुत्रे आली असली, तरी पक्षाची सुत्रे सोनिया गांधींच्या हाती गेलेली होती. राव यांचे पुत्र प्रभाकर यांनी आपल्या पित्याची दिल्ली हीच कर्मभूमी असल्याने त्यांच्यावर तिथे अंत्यसंस्कार व्हावे म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे मागणी केली होती. सिंगही त्याला तयार होते. पण ते शक्य झाले नाही. कारण रिमोटवर चालणार्‍या सरकार वा पंतप्रधानाला आपले निर्णय घेता येत नाहीत. परिणामी नरसिंहराव यांचे पार्थिव त्यांची जन्मभूमी असलेल्या आंध्रप्रदेशची राजधानी हैद्राबादला पाठवण्याचा निर्णय घेतला गेला. दिल्लीत इस्पितळातून त्यांचे पार्थिव निवासस्थानी आणले गेले आणि तिथून थेट विमानतळावर हैद्राबादसाठी रवाना करण्यात आले. त्यांचे अंत्यसंस्कार हैद्राबादला झाले आणि तिथे तात्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग अर्थमंत्री चिदंबरम, संरक्षणमंत्री प्रणब मुखर्जी व गृहमंत्री शिवराज पाटिल औपचारिकता म्हणून उपस्थित राहिले. भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते म्हणून लालकृष्ण अडवाणी तिथे अगत्याने गेले होते. पण ज्या पक्षाची राव यांनी आयुष्यभर सेवा केली त्याच्या अध्यक्षा सोनिया गांधी तिथे फ़िरकल्याही नाहीत. फ़ार कशाला राव यांचे पार्थिव राजधानी दिल्लीतील कॉग्रेसच्या मुख्यालयातही आणण्याला प्रतिबंध घालण्यात आला होता. वाजपेयींच्या वाट्याला आलेला शोक व समारंभ म्हणूनच राव यांची आठवण करून देणारा आहे. कारण गेली चौदा वर्षे वाजपेयी सार्वजनिक जीवनापासून अलिप्त राहिलेले होते.

कुणाला वाटेल की सोनिया गांधी वा कॉग्रेसच्या द्वेषमूलक राजकारणाची आठवण करून देण्यासाठीच या आठवणी करून दिल्या जात आहेत. पण आज नाहीतर त्याही भारताच्य सुपुत्राच्या आठवणी कधी व कोणी सांगायच्या? कॉग्रेसच्या मागल्या दोन दशकाच्या कारभारात व कार्यक्रमात कधी कुठे आपल्या या पाच वर्षे पंतप्रधानपदी बसलेल्या नेत्याचा उल्लेखही येत नाही. जणू नरसिंहराव नावाचा पंतप्रधान भारतात कधी झाला नाही आणि तसा कोणी व्यक्ती कॉग्रेसच्या इतिहासातही नसावा अशीच एकूण स्थिती आहे. राव यांना दिल्लीत अंत्यसंस्कार नाकारणार्‍या सोनिया होत्या हे अवघ्या दिल्लीला ठाऊक आहे. पण त्याचा पुरावा कोणी देऊ शकणार नाही. बोफ़ोर्स घोटाळ्याची महत्वाची कागदपत्रे राव यांच्याच कारकिर्दीत भारताला मिळाली आणि त्याचा बभ्रा झाल्यापासून सोनिया त्यांच्यावर नाराज होत्या आणि आपल्या निष्ठावंत हस्तकांकरवी त्यांनी राव यांच्यावर यथेच्छ शरसंधान केलेले होते. म्हणूनच नंतरच्या काळात पक्षाची सुत्रे हाती घेतल्यापासून सोनियांनी या ज्येष्ठ नेत्याला व माजी पंतप्रधानाला कायम दुर्लक्षित केले, नुसते दुर्लक्षितच केले नाही, तर कॉग्रेसच्या सर्व नोंदी व इतिहासातूनच नरसिंहरावांची पाच वर्षे पुसून टाकण्याचा कायम आटापिटा केला, तो अगदी मरणोत्तरही चालू राहिला. म्हणूनच राव यांना दिल्लीत हक्काचे अंत्यसंस्कार नाकारले गेले आणि त्यांच्या पार्थिवालाही पक्ष कार्यालयात ‘पाऊल’ टाकू देण्यात आले नाही. द्वेषाचा यापेक्षा कुठला मोठा व धडधडित पुरावा आवश्यक असतो? योगायोग असा की पाच वर्षानंतर त्याच आंध्रप्रदेशचे कॉग्रेस मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे अपघाती निधन झाले तेव्हा त्याच सोनिया गांधी अगत्याने हैद्राबादला अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिल्या होत्या. मग नरसिंहराव यांच्याच बाबतीत अपवाद कशाला केला होता? याच पार्श्वभूमीवर या आठवड्यात अटलजींसाठी देश का हळहळला त्याकडे बघावे लागते.

आटलजीं विरोधी नेता आणि नरसिंहराव पंतप्रधान होते. पाकिस्तानने एका जागतिक व्यासपीठावर काश्मिरचा मुद्दा उकरून काढला होता आणि तिथे भारत सरकारची बाजू मांडण्यासाठी जाणार्‍या शिष्टमंडळाचे नेतृत्व राव यांनी विरोधी नेता अटलजींकडे सोपवले होते. तात्कालीन परराष्ट्रमंत्री दिनेश सिंग रुग्णशय्येवर पडलेले होते आणि ती जबाबदारी मोठ्य विश्वासाने राव यांनी विरोधी नेत्यावर सोपवली. परराष्ट्र राज्यमंत्री सलमान खुर्शीद अटलजींचे सहकारी म्हणून त्या शिष्टमंडळात सहभागी झालेले होते. हा राजकारणातला सभ्यपणा व समन्वय सोनियांच्या हाती पक्षाची व देशाची सुत्रे जाण्यापर्यंत कायम होता. आज त्याच देशाचा माजी मंत्री मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जाऊन मोदी हटावसाठी मुशर्रफ़ यांची मदत मागतो. ही इतकी उलथापालथ कुणामुळे व कशामुळे झालेली आहे? लोकसभेत प्रथमच निवडून आल्यानंतर १९९९ सालात सोनियांनी वाजपेयी सरकारवर इतक्या शेलक्या भाषेत झोड उठवली होती, की त्यांच्यासारखा भीष्माचार्यही विच़्हलीत झाला होता. सोनियांच्या भाषणातील ते भेदक शत्रूवत शब्द मुद्दाम उल्लेखून वाजपेयींनी भारतीय राजकारणात विष कालवले जात असल्याचे सभागृहाच्या तेव्हाच नजरेत आणून दिले होते आणि अवघ्या पाच वर्षांनी त्याचा अनुभव खुद्द कॉग्रेसच्याच माजी पंतप्रधानाला म्हणजे नरसिंहरावांना मरणोत्तर घ्यावा लागला. ज्यांना आपल्याच दिवंगत पंतप्रधान व ज्येष्ठ नेत्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याइतका द्वेष करता येतो, त्याच मातेच्या पोटी जन्माला आलेला आजचा कॉग्रेस अध्यक्ष लोकसभेत मोदींना कृत्रीम मोठी मारून प्रेमाचे संदेश देतो, यावर कोण कशाला विश्वास ठेवणार ना? उलट अटलजींना मिळालेला सन्मानजनक निरोप तपासून बघितला पाहिजे. कुठल्या माजी पंतप्रधानाला अथवा अन्य कुणा मोठ्या नेत्याला पक्ष व जनतेने अशी आदरांजली वाहिलेली आहे?

मध्यंतरी देशात एक असहिंष्णुता बोकाळत चालल्याचा खुप गवगवा झालेला होता. विद्यमान पंतप्रधान मोदी कसे वाजपेयींपेक्षा असहिष्णू आहेत, त्यावरून चर्चासत्रे रंगवली गेली व जात आहेत. पण नरसिंहराव आणि अटलजी यांच्या या मरणोत्तर अनुभवातूनच सत्य समोर येत असते आणि त्यातला फ़रक लोकांना कळण्यासाठी अशा दु:खद प्रसंगीही त्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याची गरज भासत असते. आज नरेंद्र मोदी आपल्या कृतीतून नेहरूंच्या कारकिर्दीच्या खाणाखूना पुसून टाकत असल्याचा सरसकट आरोप होत असतो. पण ज्या धाडसी पंतप्रधानाने देशाला आर्थिक गर्तेतून काढण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतले व आर्थिक सुधारणांचा पराक्रम यशस्वी करून दाखवला, त्याचा कोणता मान कॉग्रेसने राखला होता? आजही आर्थिक सुधारणांचे श्रेय कॉग्रेसवाले अगत्याने घेत असतात. पण त्या सुधारणांचा जनक म्हणून मनमोहन सिंग यांना पेश केले जाते. पण चुकूनही नरसिंहराव यांचा उल्लेख कोणी कॉग्रेसवाला करीत नाही. नेहरूंच्या दुरदृष्टीने गुणगान करणार्‍यांना राव यांनी भारताला एकविसाव्या शतकात खेचून आणण्यासाठी केलेल्या धाडसी निर्णयाच्या पाऊलखूण क्रुरपणे पुसून टाकण्यातली सूडबुद्धी कशी दिसत नाही? त्याच राव यांनी अणुस्फ़ोटाची तयारी करून ठेवली होती आणि त्याची पुर्तता अटलजींनी आपल्या हाती सुत्रे आल्यावर केली. या दोन नेत्यांनाच संपवण्याच्या द्वेषमूलक राजकारणाने भारतीय सार्वजनिक जीवनातील सहिष्णूतेचा गळा घोटला गेला होता. त्याचे श्रेय सोनियांना जाते. सोनिया राहुल यांना नरसिंहरावांच्या कर्तबगारीने भयभीत केले होते. म्हणून पदोपदी त्यांना त्या गुणी नेत्याच्या पाऊलखुणा पुसण्य़ाची गरज वाटली. नरेंद्र मोदींना पदोपदी मरणोतरही अटलजींचे स्मरण करून त्यांचेच गुणगान करण्यात कधी कमीपणा वाटलेला नाही की आपल्या छोटेपणाची शरम वाटलेली नाही. दोन समकालीन नेते व माजी पंतप्रधानांच्या मरणोत्तर अनुभवाची नोंद म्हणूनच अगत्याची व आवश्यक वाटली. अगदी वेळ योग्य नसली तरी त्याचे स्मरण करून देणे अपरिहार्यच आहे.

Thursday, August 23, 2018

झेन पोरी, लाजवलंस ग!



बुधवारी सकाळी मध्य मुंबईतल्या परळ भागात क्रिस्टल टॉवर या गगनचुंबी इमारतीच्या बाराव्या मजल्यावर अकस्मात आगडोंब उसळला होता. तेव्हा त्या इमारतीत वास्तव्य करणार्‍या अनेक कुटुंबांची तारांबळ उडालेली होती. कारण तिथली अग्निशमन व्यवस्था नादुसरुस्त होती आणि कोणाला काय करावे ते सुचत नव्हते, की माहिती नव्हते. अशावेळी सोळाव्या मजल्यावर वास्तव्य करणार्‍या सदावर्ते कुटुंबातली बारा वर्षाची कन्या झेन गाढ झोपलेली होती. तिच्या वडीलांनी आपल्या बाथरूमधला गिझर तपासला तर त्यातून धुर येत होता. ते बघूनच झेनची आई घाबरली आणि टाहो फ़ोडून रडू लागली. त्या आवाजाने झेनची झोप मोडली आणि ती खडबडून जागी झाली. तिने आसपास बघितले आणि काय झाले आहे त्याचा अंदाज घेतला. फ़्लॅटचे दार उघडले तर समोरच्या जिन्यातून धुर येत होता आणि जवळ वास्तव्य करणारे शेजारीही सैरावैरा पळत आक्रोश करीत होते. अशा प्रसंगात बारा वर्षाच्या शाळाकरी मुलीने काय करायला हवे होते? नुसता एका बारा वर्षाच्या मुलीचा चेहरा समोर आणा आणि तिला अशा प्रसंगात झोकून द्या. क्षणात आपल्या डोळ्यासमोर काय चित्र उभे राहिल? आईबाप व शेजारीपाजारी यांचा आक्रोश बघून तीही बालिका टाहो फ़ोडून घाबरलेली तुम्हाला दिसू लागेल. जीवाचा आकांत करताना भासेल. पण झेन सदावर्ते त्याला अपवाद होती. ती तितक्या जीवघेण्या परिस्थितीलाही घाबरली नव्हती आणि आता आपणच ही परिस्थिती संभाळू शकतो, अशा आत्मविश्वासाने कामाला लागली. तिने पुढल्या काही मिनीटात मृत्यूच्या दाढेतून सतरा प्रौढ व वृद्धांना सुखरूप बाहेर काढून दाखवले. ह्याला विद्यमान शहरी जीवनातला चमत्कार मानावा लागेल. या चिमुरडीने नुसते कोणाचे प्राण वाचवलेले नाहीत, तर देशातल्या एकाहून एक मोठ्या विद्वान, शासकीय अधिकारी व राज्यकर्त्यांना लाज वाटण्याची स्थिती निर्माण करून ठेवली आहे.

अशा स्थितीत आग वरच्या दिशेने सरकत असते. बाराव्या मजल्यावरच्या आगीचे लोळ वरच्या दिशेने म्हणजे सोळाव्या मजल्याकडे येत होते आणि म्हणूनच जिन्याचा वा लिफ़्टचा उपयोग नव्हता. अग्निशमन दलाच्या मदतीशिवाय सुटका नव्हती. पण ती बाहेरची मदत येईपर्यंत आपला जीव अक्षरश: ‘मुठीत’ धरून जीवंत रहाण्याला सर्वाधिक महत्व होते. त्यासाठी कुठल्या सुविधा नव्हत्या, तर जे काही उपलब्ध होते, त्यातूनच चतुराईने उपयुक्त साधने उभारण्याला पर्याय नव्हता. आगीचा धुर घुसमटून मारून टाकतो, म्हणजे श्वसनाला प्रतिरोध करतो. आसपासच्या हवेत कार्बनचे प्रमाण वाढलेले असते आणि पर्यायाने प्राणवायूचे प्रमाण नगण्य होऊन जाते. म्हणून घुसमटून प्राणवायू अभावी माणसाचा मृत्यू झटकन होऊन जातो. अशा वेळी सुती कपडा ओला करून नाकतोंडाच्या भोवती गुंडाळला, तर धुर श्वसनात आला तरी त्यातील कार्बनचे कण ओल्या फ़डक्याला चिकटून बसतात आणि वस्त्रगाळ हवा फ़ुफ़्फ़ुसात पोहोचणे शक्य होते. भले यात प्राणवायूचे प्रमाण कमी असेल. पण कार्बनचे प्रमाण अत्यल्प झाल्याने धुरापासून बचाव होतो आणि घुसमटून येणारे मरण दुर लोटता येते. पुढली वा बाहेरची मदत मिळण्यापर्यंत माणसाला जगवता येते, झेन सदावर्ते या चिमुरडीने अत्यंध धीरोदात्त राहून क्रिस्टल टॉवरला आगीने वेढा घातला असताना एवढेच केले. कारण लहानपणी तिसरीत असताना शाळेमध्ये तिला असले काही कोणी शिकवलेले होते. प्रत्यक्ष प्रसंग ओढवला तेव्हा चारपाच वर्षापुर्वी अजाण वयात गिरवलेले धडे अंमलात आणले आणि केवळ त्यामुळेच १७ प्रौढवृद्धांना जीवदान मिळून गेले. कारण ते सर्वजण अग्निशमन दलाची शिडी व मदत येण्यापर्यंत जीवंत राहू शकले. झेनचे प्रसंगावधान महत्वाचे आहेच. पण त्यापेक्षा आपल्या पुस्तकी ज्ञानाच्या पलिकडे जाऊन त्याचा प्रसंगी योग्य वापर करण्याचा तिचा विवेक कौतुकास्पद आहे.

आता अर्थातच झेनचे सार्वत्रिक कौतुक होईल आणि महापौर, मुख्यमंत्री वा पंतप्रधानांनाही तिची पाठ थोपटावी असे़च वाटेल. अवघ्या परिसरात तिच्या छायाचित्रासह भव्यदिव्य फ़लक लागतील आणि माध्यमातून तिच्या गुणगानाला पारावार रहाणार नाही. मुद्दा झेनच्या कौतुकाचा वा प्रसंगावधान राखण्याचा मुळातच नाही. इवल्या पोरीने अशा प्रतिकुल प्रसंगात जो विवेक दाखवता आला, त्याचाच दुष्काळ आपल्या देशात व बुद्धीवादी प्रांतात पडला आहे. ती सर्वात मोठी चिंताजनक बाब झालेली आहे. बारा वर्षाच्या झेन सदावर्तेपाशी जे प्रसंगावधान आहे आणि प्रतिकुल स्थितीत सकारात्मक प्रतिसाद देण्याची बुद्धी आहे, तिचा दुष्काळ आपल्या देश समाजाला भेडसावतो आहे. त्याच इमारतीत नव्हेतर मुंबईत अशा अनेक आगी लागत असतात आणि त्यात अनेकांचा बळी जातच असतो. मग आपल्याकडे महापालिका, सरकार अग्निशमन दल अथवा अन्य शासकीय यंत्रणांना गुन्हेगार ठरवण्याची स्पर्धा सुरू होते. ते करताना आपण सगळे आपले प्रौढत्व, जबाबदार्‍या विसरून झेनच्या आईसारखे रडारड सुरू करत नाही काय? टाहो फ़ोडून रडणारी झेनची जन्मदाती वा अन्य आसपासचे शेजारी, यांनाही त्या क्षणी काय नाही व किती दुर्दशा भोवताली पसरली आहे, तेवढेच दिसत होते. पण झेन ही बारा वर्षाची कोवळी पोर, त्यातही आशेचा किरण शोधू शकली. घरातले सुती कपडे व ते भिजवायला असलेले पाणी, या मृत्यूच्या जबड्यातून अनेकांना बाहेर काढू शकेल, हा विचार तिच्या मनात आला. त्याचा अर्थ काय नाही त्यापेक्षाही काय आहे, त्याकडे डोळसपणे बघण्याची व त्यांचा उपयोग अशा संकटात करण्याची सकारात्मक बुद्धी शाबुत होती. जेव्हा बाहेर शेकडो कॅमेरे आगीचे लोळ दाखवून मृत्यूच्या सापळ्याचे कौतुक सांगत दाखवत होते, तेव्हाच ही चिमुरडी त्या मृत्यूला आव्हान देत एकाकी धावपळ करीत होती.

झेनच्या हाती कुठली साधने नव्हती आणि त्या इमारतीचा बिल्डर वा सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी हाती असूनही त्यांनी अक्षम्य चुका केलेल्या होत्या. पण वेळ त्यांच्या नावाने शंख करण्याची नव्हती. आपल्या वडीलधार्‍यांचाही धीर सुटलेला असताना इतक्या धीराने वागण्याची या पोरीची कुवत मोठी होती. हातात अधिकार वा साधनेही नसताना दुर्दम्य इच्छाशक्तीने तिने प्रसंगाचा सामना केला. तिला काय माहिती होते वा शिकवलेले होते, तेही दुय्यम आहे. मुद्दा घेतलेले ज्ञान व शिक्षण यांचा नसून, योग्य प्रसंगी त्यांचा उपयोग करण्याचा आहे. अन्यथा कितीही शिकलेले असा, ते ज्ञान पुस्तकात रहाते आणि संकटाचे बळी होण्याला पर्याय नसतो. झेन सदावर्तेने जे खुप आधी शिकलेले होते, त्याचा खर्‍या संकटात उपयोग केला आहे आणि तितके ज्ञान कुठूनही आज उपलब्ध आहे. इंटरनेट वा वाहिन्यांवरून आपल्याला सतत असले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जात असतात. त्यामुळे झेनला माहिती होते, ते इतरांनाही ठाऊक असायला अजिबात हरकत नव्हती. इतरही ते शिकलेले असतील. पण शिकलेले वापरण्यासाठी आपलीच विवेकबुद्धी निर्णायक असते. आजकालची बुद्धीमान हुशार माणसे आपली बुद्धी वापरायचेच विसरून गेली आहेत. म्हणूनच आपल्याला मृत्यूने वेढलेले असतानाही इतर कोणाच्या माथी खापर फ़ोडण्यात धन्यता मानतात आणि आपलाच बळी जाऊ देतात,. ह्या घटनेनंतर झेनला एका वाहिनीवर ऐकली. तिथली निवेदिका किती बुद्दू असावी? ज्यांना वा़चवले, त्यांनी तुझे आभार मानले काय, असा निर्बुद्ध सवाल तिने झेनला केला आणि ती चिमुरडी उत्तरली, ते सर्व घाबरलेले व बिथरलेले होते. तेव्हा आभार वगैरे मानण्याच्या स्थितीतही नव्हते. हे प्रसंगाचे भान असते, जे वाहिनीच्या कॅमेरासमोर मुलाखत देतानाही त्या कोवळ्या बालिकेला होते आणि प्रश्न विचारणार्‍या थोराड निवेदिकेला नव्हते. म्हणून झेन कौतुकाची आहे.

ही चिमुरडी नुसती धीरोदात्त व दुर्दम्य इच्छाशक्तीची मुर्ती नाही. आपल्या कर्तव्याचे श्रेय घेण्याचीही तिला गरज वाटलेली नाही. आज आपल्या समाजात इतक्या तरतम बुद्धीची किती मान्यवर माणसे उरलेली आहेत? कुठे रस्त्याचे काम केले वा बगिच्या बनवला, तर त्याचे श्रेय घेण्यासाठी मोठे फ़लक लावणारे नगरसेवक. इतर कुठल्या कामासाठी आपलीच पाठ थोपटून घेणारे आमदार मंत्री आपल्याला सगळीकडे दिसतील. त्यांच्या नाकर्तेपणाला दोष देऊन जगण्यातल्या वा योजनेतल्या त्रुटी ठळकपणे दाखवणार्‍या अभ्यासक, पत्रकार, जाणकारांचाही आपल्या समाजात तुटवडा नाही. सगळीकडे नकारात्मकता व नाकर्तेपणाचा इतका डोंगर उभा आहे, की त्याच्याआडून विधायक सकारात्मक विवेकाचा सूर्य डोकावायलाही घाबरत असावा. कुठली नैसर्गिक आपत्ती असो किंवा अपघात घातपात असो, आपण कसे हतबल आहोत आणि आपल्या हाती काहीच नसल्याचे सांगणार्‍यांचे जमाव चहूकडून आपल्याला घेरून उभे आहेत. त्यात म्हणूनच झेन सदावर्ते हा अपवाद आहे. तो नुसता कर्तबगार नाही, तर अंधारालाही प्रकाशित करणारा आशेचा किरण आहे. कुणा प्रसिद्ध कविच्या ओळी आहेत, ‘माना के अंधेरा घना है, लेकिन दिया जलाना कहा मना है?’ क्रिस्टल टॉवरच्या आगीने तसाच एक दिवा फ़क्त त्या १७ लोकांना दाखवलेला आहे. देशभरच्या नकारात्मकतेने हतबल होऊन गेलेल्या बुद्दीला व शहाण्यांनाही आशेचा किरण दाखवलेला आहे. झेन पोरी, तू दाखवलेला दिवा व त्याचा प्रकाश बघण्यासाठी या देशाच्या बुद्धीचे डोळे तर उघडे असायला हवेत ना? पण तू निराश होऊ नकोस. तुझ्यामुळे शेकड्यांनी चिमुरड्या झेन प्रभावित होतील. आपल्यातल्या सकारात्मकतेने या देशाला प्रकाशित करून टाकतील. कुठल्याही संकटात धीराने उभे राहून विवेकाने विचार करून प्रसंगावर मात कशी करावी, याचा धडा तुझ्याकडून गिरवताना आम्हाला आपलीच लाज वाटतेय आणि तुझा अभिमान वाटतोय.

नसत्या उठाठेवी

siddhu tharoor के लिए इमेज परिणाम

पाकिस्तानात नुकतेच सत्तांतर झाले आणि तिथल्या नव्या पंतप्रधानांच्या शपथविधीसाठी पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू अगत्याने उपस्थित राहिले. सिद्धू आज राजकारणात असतील, पण मुळात तो एक क्रिकेटपटू आहे आणि म्हणून पाकचे नवे पंतप्रधान इमरान खान यांनी सिद्धूला आमंत्रित केलेले होते. अर्थात इमरान स्वत:च माजी क्रिकेटपटू असल्याने त्याने आपल्या समकालीन परदेशी खेळाडूंना आमंत्रित करणे स्वाभाविक आहे. म्हणूनच त्याने सिद्धूच नव्हे तर कपील देव आणि सुनील गावस्कर अशा इतर नामवंत भारतीयांनाही बोलावले होते. पण त्या दोघांनी त्यामागचे राजकीय डावपेच ओळखून तिकडे जायचे टाळले. खरे तर ते दोघेही कुठे राजकारणात नाहीत. म्हणूनच व्यक्तीगत जीवनात त्यांनी इमरानच्या शपथविधीला जाणे कोणाला खटकलेही नसते. पण भारतीय जनतेच्या भावना ओळखून त्यांनी तिथे जायचे टाळले. त्याची उलटी बाजू अशी, की सिद्धू राजकारणात असल्याने अशा बाबतीत त्याने अधिक काळजी घ्यायला हवी होती. पण कुठल्याही बाबतीत सिद्धू कधीच गंभीर राहिला नाही. म्हणूनच अनेकदा निवडून येणारा उमेदवार असूनही भाजपाने त्याला बाजूला सारण्याचा निर्णय काही वर्षापुर्वी घेतला होता. कॉग्रेसने त्याला पक्षात स्थान दिले व आपल्या पंजाबी खंबीर नेत्याचा रोष पत्करूनही मंत्रीपदही दिले. मात्र त्याचे भान सिद्धूला अजिबात नाही. म्हणूनच टाळणे शक्य असूनही त्याने पाकिस्तानला जाण्याची मुळातच चुक केली. पण त्याच्याही पुढे जाऊन तिथे पाकच्या लष्करप्रमुख जनरल बाजवा यांची गळाभेट करण्याचाही आगावूपणा केला. ज्या माणसाच्या आदेशावर भारतात व घातपात होतात आणि शेकड्यांनी भारतीय सैनिक शहीद झालेले आहेत, त्याच्याशी गळाभेट कुणाही भारतीयाला खटकणारीच असते. पण त्याचे भान ठेवण्याइतका सिद्धू हा गंभीर माणूस कुठे आहे? त्याने पक्षाला अकारण अडचणीत आणलेले आहे.

लोकशाही अध्यक्षीय असो किंवा संसदीय असो, त्यात नेहमी सत्ताधारी पक्ष टिकेचे लक्ष्य होत असतो. सहाजिकच भारतीय राजकारणात मागल्या चार वर्षात सातत्याने भाजपा टिकेचे लक्ष्य झाला असेल, तर नवल नाही. पण त्याचीच दुसरी बाजू अशी आहे, की तितक्याच सातत्याने प्रमुख विरोधी पक्ष मानला जाणार्‍या कॉग्रेस पक्षालाही टिकेचे लक्ष्य व्हावे लागते आहे. हा विचित्र विरोधाभास आहे. कारण कुठलीही मोठी सत्ता व निर्णय हाती नसलेल्या पक्षावर टिका होण्याचे कारण नसते. पण कॉग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यातही अपवाद करून दाखवला आहे. सिद्धू त्यापैकी एक आहे. आपण व्यक्तीगत पातळीवर इमरानचे आमंत्रण स्विकारले असे त्याने कितीही म्हटले असले, तरी खुद्द त्याच्याच मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पहिली झोड सिद्धूवर उठवली. हे मुख्यमंत्री भारतीय हवाई दलाचे निवृत्त कॅप्टन आहेत. म्हणूनच त्यांना भारतीय शहीद जवानांच्या यातना वेदना कळतात. नुसताच वाचाळवीर असलेल्या सिद्धूला त्याचा गंधही नसतो. म्हणूनच त्याने पाकिस्तानला जाण्याची चुक केली व पुढे गळाभेट करून जखमेवर मीठ चोळण्याचा आगावूपणा केला आहे. पंजाब हा भारतातील सेनादलाच्या निवृत्त वा विद्यमान सैनिकांचा सर्वात अधिक भरणा असलेला समाज आहे. म्हणूनच तितक्या प्रमाणात अधिक लोकसंख्या दुखावली जाते. त्याचे भान अमरिंदर यांना आहे. अर्थात हा विषय एका पंजाब प्रांतापुरता मर्यादित नसून देशभर पसरलेल्या आजीमाजी जवान व शहीदांच्या आप्तस्वकीयांच्या दुखण्याचा आहे. सहाजिकच पुढे येऊन कुणी कॉग्रेस नेता सिद्धूचे समर्थन करू शकलेला नाही. मग असा प्रश्न पडतो, की सिद्धू वा तत्सम कॉग्रेस नेत्यांना असल्या उचापती करण्याचे कारणच काय? पक्षाला चार मते मिळवून देण्याची यांची कुवत नाही आणि संघटनात्मक कौशल्यही नाही. अशा रंगल्या तोंडाची चेहर्‍यांची कॉग्रेसला गरज काय आहे?

हे लोक आपल्या कृतीतून वा बोलण्यातून पक्षाची लोकप्रियता वाढवण्यापेक्षा असलेली विश्वासार्हता संपवत असतात. मग आधीच पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या कॉग्रेस पक्षाचे भवितव्य काय असेल? मध्यंतरी गुजरात निवडणूकीच्या भरात मणिशंकर अय्यर या ज्येष्ठ नेत्याची यासाठीच पक्षातून हाकालपट्टी करावी लागली होती. आता त्याला पक्षात पुन्हा स्थान दिलेले असले तरी सिद्धू वा शशी थरूर असले उचापतखोर कमी नाहीत. शशी थरूर हे भारतीय राजकारणात येण्यापुर्वी संयुक्त राष्ट्रसंघातले एक अधिकारी म्हणून काम केलेले मुत्सद्दी आहेत. पण भारतीय राजकारणात त्यांच्या बोलण्यावागण्याने त्यांनी आपल्या पक्षाला सतत अडचणीत आणलेले आहे. त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पद मृत्यू व त्याचा खटला त्यांच्या डोक्यावर तलवार टांगून उभा आहे. अशावेळी तरी त्यांनी आपल्याला आवरले पाहिजे. पण तेही सिद्धूच्या पलिकडे पोहोचलेले उचापतखोर आहेत. गेल्या आठवड्यात त्यांचे समकालीन राष्ट्रसंघाचे सचिव कोफ़ी अन्नान यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित रहाण्यासाठीही थरूर यांना न्यायालयाची परवानगी घेऊन परदेशी जावे लागले. तिथे गेल्यावर अन्य देशात भरकटणारे थरूर मुळचे केरळी असून तिरुअनंतपुरम हा त्यांचा लोकसभेत निवडून आलेला मतदारसंघ आहे. अन्नान यांच्या निधनापुर्वीच केरळ अतिवृष्टी व महापुरच्या गर्तेत लोटला गेला होता. तिकडे पाठ फ़िरवून शशी थरूर विदेशी भटकत राहिले आणि त्या चुकीवर प्रश्न विचारले गेले, तेव्हा त्यांनी आपण केरळला परदेशी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असल्याची थाप ठोकून दिली. ती खरी ठरवण्यासाठी आपण केरळच्या मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय करूनच हे काम करीत असल्याचेही थरूर यांनी बेधडक सांगून टाकले. सहाजिकच त्यांचा खोटेपणा मुख्यमंत्र्यांना जाहिरपणे सांगावा लागला. मुळात याची काय गरज असते?

सिद्धू असोत किंवा थरूर, अय्यर; अशा लोकांना आपले नसलेले महत्व जगाला दाखवून देण्याची इतकी हौस असते, की ते लोक आपल्यासकट पक्षाला व सहकार्‍यांनाही अडचणीत आणत असतात. आपला प्रभाव वा महत्ता सिद्ध करण्यासाठी अशा कर्तृत्वहीन लोकांना नेहमीच काहीतरी उचापती वा उठाठेवी कराव्या लागत असतात. ते माध्यमातून व प्रसिद्धीतून आपले कर्तृत्व गाजवण्याच्या नादात नको ती उठाठेव करून बसतात आणि पक्षाला सारवासारव करण्याची नामुष्की येत असते. थरूर किंवा सिद्धू यांनी आपल्या पक्षाला कोणते योगदान दिले, हा मुळातच संशोधनाचा विषय आहे.. थरूर परदेशातून आल्यावर थेट कॉग्रेस नेता बनले आणि सिद्धू भाजपात आपली कारकिर्द सुरू करून नंतर कॉग्रेसमध्ये दाखल झाले. त्यांना तात्काळ अधिकारपदे मिळालेली आहे. पण खरेच या लोकांची भारतीय राजकारणात काही उपयुक्तता आहे काय? प्रसिद्धी माध्यमात झळकणारे चेहरे, यापेक्षा त्यांचे सार्वजनिक जीवनातील योगदान शून्य आहे. पण त्यांना सामावून घेण्यासाठी त्यांच्या पक्षाला कितीतरी किंमत मोजावी लागत असते. सत्तेत आलेल्या भाजपासाठी ती किंमत भले आज परवडणारी असेल. पण सत्तेला वंचित झालेल्या व पुनरागमनासाठी धडपडणार्‍या कॉगेस पक्षाला अशा उठाठेवी करणारे वा उचापतींनी नुकसान करणारे कसे परवडू शकतात? राहुल गांधी अशा लोकंना का भरती करतात आणि त्यातून पक्षाचे पुनरुज्जीवन कसे होणार आहे, ते म्हणूनच रहस्य बनलेले आहे. अशाच उठाठेवींनी पक्षाला नित्यनेमाने अडचणीत आणणार्‍या दिग्वीजय सिंग यांना अलिकडे गप्प केल्याने जी पोकळी निर्माण झाली, त्याची भरपाई अशा नमुन्यांना पक्षात स्थान देऊन राहुल गांधी करू इच्छितात काय? कारण ह्या लोकांमुळे पक्षाची संघटना उभी रहायला कुठे मदत होत नाही. पण जे मित्रपक्ष कॉग्रेसच्या समर्थनाला येतात, त्यांनाही अशा उचापतखोरांमुळे कॉग्रेसचे समर्थन अवघड होत चालले आहे.

भारतात लोकशाही आहे आणि आजही विविध मतचाचण्या होतात. त्यात साडेचार वर्षे उलटून गेल्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेला ओहोटी लागलेली नसल्याचे निष्कर्ष काढले जातात. तेव्हा त्याच पंतप्रधानाला आव्हान देऊ बघणार्‍यांनी आपली कुठे चुक होते आणि कुठे दुरूस्ती केली पाहिजे, याचा विचार करण्याची गरज असते. बारकाईने बघितले तर मोदींची लोकप्रियता सिद्धू, थरूर, अय्यर अशा दिवाळखोरांच्या उचापतीमध्ये सामावलेली आहे. कारण त्यांच्यामुळे विरोधात असून कॉग्रेसपक्ष सातत्याने टिकेचे लक्ष्य होत असतो. पक्षाची धोरणे वा भूमिका यापेक्षा अशा लोकांच्या खुळेपणाने कॉग्रेसला अडचणीत यावे लागते. तितकी मोदींची मतदाराला अधिक उपयुक्तता वाटू लागते. साधारणपणे कुठल्याही लोकशाहीत विरोधी पक्ष जितका दुबळा किंवा बेताल असतो, तितकी सत्ताधारी पक्षाची लोकप्रियता अधिक असते. मोदी वा भाजपा त्याला अपवाद नाहीत. त्यांना आपल्या चुका कबूल करण्याची वा झाकण्याचीही गरज असल्या कॉग्रेस नेत्यांनी ठेवलेली नाही. कॉग्रेस पक्षातल्या या बाजारबुणग्यांना बाजूला केल्याशिवाय त्याचे पुनरूज्जीवन शक्य नाही. कारण असे लोक जागा अडवून बसलेले असतात आणि म्हणूनच पक्षातल्या इतर गुणी लोकांना आपले कर्तृत्व दाखवण्याची संधीही मिळत नसते. अशीच काहीशी स्थिती पाच वर्षापुर्वी भाजपाची होती. तिला बाजूला सारत मोदींसारखे नेतृत्व मुसंडी मारून पुढे आले नसते, तर भाजपाला २०१४ मध्ये इतके मोठे यश वा सत्ता मिळाली नसती. दहा वर्षाच्या अपयशातून भाजपाचा कार्यकर्ता व दुय्यम नेतॄत्वाला त्याचा साक्षात्कार झाला आणि त्यातून नव्या नेतृत्वाचा शोध सुरू झाला. त्यातून नरेंद्र मोदी हा चेहरा पुढे आला. चित्र पालटत गेले. आज कॉग्रेसला या उठाठेवी करणार्‍यांना लगाम लावण्याचीही बुद्धी सुचत नसेल, तर त्या पक्षाला नजिकच्या काळात कुठले भवितव्य असू शकते?

Wednesday, August 22, 2018

गांधी रोज मारला जातो.

Tushar Gandhi along with supporters in Pune. (Photo: PTI)

गांधीजींचे पणतु तुषार गांधी यांनी यावर्षीच्या दाभोळकर स्मृतीदिनाच्या सोहळ्यात भाग घेतला होता. पुण्यात ओंकारेश्वर पुलापासून सानेगुरूजी स्मारकापर्यंत जमलेले लोक हाती फ़लक घेऊन मिरवणूकीने चालत गेले आणि दाभोळकर हत्येचा सरकारला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा असल्याचे सांगण्यात आले. नंतर झालेल्या भाषणात तुषार गांधी यांनी नवा गांधीवाद कथन केला. उपस्थितांना तो भावलाही. यात जे गांधीविचार मांडले गेले, ते ऐकून गांधीजींनी गोडसेने गोळ्या झाडण्याचीही प्रतिक्षा केली असती काय, अशी शंका येते. कारण भविष्यात आपल्या नावावर इतका भंपकपणा व थिल्लर गोष्टी प्रतिष्ठीत केल्या जाण्याच्या भयाने महात्माजींनी आपली इहलोकीची यात्रा कदाचित आधीच गुंडाळली असती. माणुस किती बेताल व बिनबुडाचे बोलू शकतो, त्याचा ‘तुषार’ म्हणून या पणतुचे वक्तव्य बघावे लागेल. देशात रोज गांधीजी मारले जातात, असे याने सांगितले. त्यात तथ्य जरूर आहे, पण रोज मारले जाणारे गांधी आधुनिक गोडसेकडून मारले जात नाहीत, तर गांधीनामाचा जप करणारेच गांधीहत्या करीत असतात. कारण एका बाजूला गांधी हा विचार असल्याचा डंका पिटला जात असतो आणि दुसरीकडे त्या विचाराला पार्थिव ठरवण्यासाठी आकांडतांडव चालू असते. गांधी हा विचार असता तर त्याला गोडसे मारू शकत नव्ह्ता आणि त्या विचाराला मारल्याचा आक्रोश तुषारसहित इतरांना करावा लागला नसता. किंबहूना कोणीही कुणाचाही विचार मारू शकत नाही, हेच सत्य आहे. म्हणून तर ज्यांच्यावर सतत हत्या व हननाचे आरोप मागली सत्तर वर्षे चालू राहिले, त्यांचा विचार फ़ैलावत गेलेला आहे. कारण त्यांचाही अन्य कुणाला पटणारा विचारच आहे. गांधींचा विचार तितका प्रभावी असता, तर त्यावर गोडसे समर्थकांना मात करता आली नसती. पण त्या गोडसेचे स्तोम तुषार सारख्यांनीच माजवलेले आहे. त्यांनी रोजच गांधी मारण्यासाठी सतत गोडसे जीवंत ठेवलेला आहे.

दाभोळकर यांच्या मारेकर्‍याला पकडले आहे. पण कोर्ट व कायदा त्याला शिक्षा देऊ शकत नाही. कारण हत्या करणार्‍या संस्थेचीच एक शाखा राज्य करते आहे, अशी ‘मुक्ता’फ़ळे त्यांनी उधळली आहेत. यांना सरकार, कायदा वा राज्य वगैरे काही कळते किंवा नाही, याचीच शंका येते. कारण जेव्हा दाभोळकरांची हत्या झाली, तेव्हा तर अशा ‘मारेकर्‍यांच्या राजकीय शाखे’चे राज्य नव्हते ना? तरीही दाभोळकरांची हत्या झाली. तुषार गांधी वा महात्मा गांधींचा वारसा सांगणार्‍यांचे राज्य असलेल्या कर्नाटकात आणखी दोघांच्या हत्या झाल्या. मग तिथेही राज्य करणारे गांधीहत्येचे वारसदार आहेत काय? त्यात शोधले तर तथ्य जरूर आहे. कारण या लोकांचा दावा मान्य केला तर गांधी हा विचार असतो आणि त्या विचारांची हत्या मागल्या सात दशकात पुरोगामी व कॉग्रेसने सातत्याने रोजच्या रोज केलेली नाही का? प्रत्येक धोरणातून व कृत्यातून गांधी रोजच मारला गेला आहे. आपल्या मृतदेहावरून फ़ाळणी करावी लागेल, असा इशारा देणार्‍या गांधींच्या गळी देशाची विभागणी ज्यांनी मारली, त्यांनी गांधी विचाराला मारले नव्हते काय? भारत खेड्यात रहातो म्हणणार्‍या गांधीजींकडे पाठ फ़िरवून शहरांची बेछूट बकाल वाढ करणार्‍यांनी गांधींचा विचारच मारलेला नाही काय? सार्वत्रिक पातळीवर अशी गांधी विचाराची हत्या होत राहिली आणि तुषारसारखा पणतु त्यांनाच टाळ्या पिटुन पाठींबा देत राहिला नव्हता काय? तेव्हा गांधी हत्या रोज होते, हे निखळ सत्य आहे. पण मजेची गोष्ट अशी, की त्या गांधीविचारांच्या मारेकर्‍यांना कुठली शिक्षा कुठल्या कायद्याने वा न्यायालयानेही दिलेली नाही. अर्थात गांधी हा विचार असेल तरची ही गोष्ट आहे. पण असल्या विधान वक्तव्यातून हे दिवाळखोर उरलासुरला गांधी समाजातून उखडून फ़ेकत आहेत. गोडसेने मारूनही न मेलेला विचार, नामशेष करायचे काम इमानेइतबारे पार पाडीत आहेत.

‘लोकांच्या मनात प्रचंड विष पेरले गेले आहे. विषारी आणि विखारी विचारधारेपासून तरुणांना लांब नेले पाहिजे, त्यासाठी बुद्धिप्रामाण्यवादी विचार रुजवला पाहिजे.’ हे आणखी वैचारिक ‘तुषार शिंतोडे’ आहेत. सात दशके देशात गांधीवादी पक्ष राज्य करत होते. मग त्यांनी लोकांच्या मनात विष व विखार पेरायच्या कामाला रोखले कशाला नाही? की तेव्हाही कुठल्या कोर्टाने त्यात अडथळे आणलेले होते? मुद्दा त्याच्याही पुढला आहे. हे सर्व होत असताना तुषार सारखे दिवटे पणतु व इतर भंपक गांधीवादी लोक कुंभकर्णाच्या झोपा काढत घोरत पडलेले होते. कारण गांधीवादी सरकारने यांना विविध अनुदानातून ऐषरामाच्या सुखसोयी उभ्या करून दिलेल्या होत्या, तो ऐषाराम चालू असताना इतर कुठे कोण विषपेरणी करतो आहे, किंवा विखाराचे पीक काढतो आहे, त्याकडे बघायला कोणाला सवड होती? तुषारसारख्यांचे लक्ष कुठे असते, त्याची त्यानेच एकदा जाहिर कबुली दिली आहे. समोर काय आहे ते डोळ्यांना दिसत असले, म्हणून आपण बघतोच असे नाही. आपल्या मनाला व मेंदूला बघायचे आहे तितकेच बघत असतो. सहाजिकच तुषार गांधी आपल्या पणजोबा वा गांधीविचाराकडे कशा नजरेने बघतात, याला महत्व आहे. एकदा ट्वीटरवर भाष्य करताना याच तुषारने म्हटलेले होते, ‘मला विम्बल्डन खेळणार्‍या मुली बघायला आवडतात. पण माझे भलत्याच बॉलकडे लक्ष असते.’ ज्याला टेनिस कुठल्या चेंडूने खेळतात हे खेळ वा सामना दिसताना देखील बघता येत नाही, त्याला गांधी विचार वा तत्वज्ञान कुठून बघता येणार वा समजू शकणार ना? ते त्याचे सोशल मीडिया खाते खरे की खोटे ठाऊक नाही. पण परवा त्याने जी मुक्ताफ़ळे उधाळली ती तशाच लायकीची नाहीत काय? त्यामुळे भारतातल्या करोडो लोकांना भावलेला गांधी आणि अशा भुरट्यांचा गांधी, यात जमिन अस्मानाचा फ़रक असतो. तुमच्या आमच्यासाठी गांधीविचार वा महात्मा असेल पण तुषार वा अन्य गांधीवादी भंपकांसाठी ती एक मालमत्ता असते. ऐषारामाची सोयसुविधा असते. मग ती रोजच मारली जाणार ना?

दाभोळकर, कलबुर्गी वा गौरी लंकेश म्हणूनच गांदीवादी राजसत्ता असतानाच मारले जातात. नुसते मारले जात नाहीत, तर त्यांचे मारेकरीही पकडले जात नाहीत. कशाला व कोणी पकडायचे? रोजच्या रोज गांधीहत्येचे भांडवल करण्याची सुविधा गांधी मरण्यातच सामावलेली असेल, तर तुषारसहीत अन्य कुणा गांधीभक्ताला गांधी जगवण्याची इच्छा तरी कशाला असणार ना? गांधीविचार उक्तीकृतीच्या सांगडीतून सुरू होत असतो. केल्याने होत आहेरे आधी केलेची पाहिजे, हा गांधीविचाराचा पाया आहे आणि तुषारला त्याचाही पत्ता नाही. तिथे जमलेल्यांना तरी कुठे पत्ता होता? म्हणून मग हे जगाला उपदेश करीत फ़िरत असतात. अंधश्रद्धा संपली पाहिजे. तरूणांना विषारी विचारापासून लांब नेले पाहिजे. विद्वेषाच्या संस्कृतीतून दुर न्यायला हवे आहे. हे सर्व हवे आहे. कोण देणार आहे? हे सर्व कोण करणार आहे? तुषार वा पुण्यतिथीसाठी जमलेले यापैकी काही करणार नाहीत. अन्य कोणी केले पाहिजे. इतरांनी काय करावे याची यादी तयार आहे. पण आपण काय करायचे त्याचा पत्ता नाही. कृतीतून जगासमोर आदर्श निर्माण करायचे, त्याला गांधी म्हणतात. हेही अशा शहाण्यांना ठाऊक नाही. सर्वात कडी म्हणजे हा तुषार म्हणतो, कोर्ट कायदा न्याय शिक्षा देऊ शकत नाही. लोकांनीच शिक्षा दिली पाहिजे. लोकांनी दिलेली शिक्षा म्हणजे काय असते रे तुषार? जमावाचा न्याय म्हणजेच लोकांनी दिलेली शिक्षा असते ना? कोणी गोमांस बाळगले खाल्ले म्हणून झालेल्या सामुहिक हत्या, किंवा मुले पळवल्याच्या समजूतीतून झालेले जमावाचे हल्ले, या दिडशहाण्याला न्याय वा शिक्षा वाटते काय? ही गांधीवादाची आजची शोकांतिका आहे. ज्याला गांधीविचार अजून उमजलेला नाही व आशयही कळलेला नाही, तो दाभोळकर स्मृतीदिनी गांधीवाद सांगत होता. बाकी ‘आम्ही सारे’ नंदीबैल होऊन माना डोलवित होते. यापेक्षा गांधीहत्या आणखी काय वेगळ्या स्वरूपातली असू शकते?