Saturday, December 22, 2018

बंगाल: नवे सिंगूर आणि नंदीग्राम

mamta singur dharana के लिए इमेज परिणाम

इंदिराजींनी देशावर लादलेल्या आणिबाणीला आता ४३ वर्षे उलटून गेली आहेत. पण त्यावेळच्या भयानक अनुभवांचा मागमूस कुठेही नसताना, रोजच्या रोज अघोषित आणिबाणी देशात असल्याच्या वल्गना नित्यनेमाने चालू असतात. प्रत्यक्षात तशी कुठे लक्षणे दिसली, तर मात्र अशा वल्गना करणार्‍यांची बोबडी वळलेली असते. तसे नसते तर बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बानर्जी यांनी भाजपाच्या त्यांच्या राज्यात चालविलेल्या मुस्कटदाबीवर केव्हाच हलकल्लोळ माजला असता. कारण मागल्या दोन वर्षात अनेक भाजप कार्यकर्त्यांचा हत्या झालेल्या असूनही त्यावर माध्यमातून वा बुद्धीजिवी वर्गातून हुंकारही उमटलेला नाही. आता तर ममतांनी घटनाही गुंडाळून ठेवत चक्क मनमानी सुरू केली आहे. भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी बंगालमध्ये रथयात्रा काढून आपल्या पक्षाचे राजकीय कार्यक्रम योजण्याची मोहिम हाती घेतली. तर त्याला कायदेशीर परवानगी नाकारण्यापर्यंत ममतांची मजल गेली आहे. एखाद्या नोंदणीकृत पक्षाला अशा रितीने कार्यक्रमाला परवानगी नाकारणे, कुठल्या लोकशाही स्वातंत्र्याचे लक्षण असू शकते? इंदिराजींनी आपल्या विरोधातील आवाज दडपण्यासाठी १९७५ सालात अशीच कार्यशैली अवलंबलेली होती, पण त्यासाठी निदान घटनेचा आधार घेऊन आणिबाणी घोषित केली होती. त्याअंतर्गत विरोधातील सर्व पक्षांच्या जाहिर वा बंदिस्त कार्यक्रमांना प्रतिबंध घातला होता. ममतांना त्याचीही गरज भासलेली नाही. त्यांनी पोलिस कायदे बेछूट वापरून भाजपाची मुस्कटदाबी चालविलेली आहे. अखेरीस प्रत्येक वेळी भाजपाला न्यायालयात जाऊन आपल्या कार्यक्रमाची परवानगी कोर्टाच्या आदेशाने मिळवावी लागते आहे. पण त्यात कोणाला आणिबाणी किंवा स्वातंत्र्याची गळचेपी दिसलेली नाही. यातच एकूण बुद्धीवादी दुटप्पीपणा लक्षात येऊ शकतो. पण त्यांच्याकडून कसलीही अपेक्षा बाळगता येत नाही. मुद्दा भाजपाच्या गळचेपीचा नसून, ममतांचा दुबळ्या स्मृतीचा आहे.

दहा वर्षापुर्वी ममता स्वत:च अशा अवस्थेतून गेलेल्या आहेत. किंबहूना तेव्हाच्या डाव्या आघाडी सरकारने त्यांची अशीच मुस्कटदाबी केली. म्हणून त्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊ शकल्या आहेत. तेव्हा मोठा पक्ष असूनही कॉग्रेस डाव्यांच्या अरेरावी किंवा गुंडगिरी विरोधात लढायला पुढे येत नव्हता. कुठल्याही चळवळीला वा नाराजीच्या सुराला डावे उमटूही देत नव्हते. अशा वेळी ममतांनी ते काम आपल्या हाती घेतले आणि एकाकी झुंज सुरू केली होती. त्यांनी आपल्या झुंजीतून लोकांना जागवलेच नाही, तर जगासमोर डाव्यांच्या गुंडगिरीचा मुखवटा टरटरा फ़ाडून टाकला होता. सक्तीने शेतकर्‍यांच्या जमिनी डाव्या सरकाराने ताब्यात घेतल्या आणि त्यावर न्याय मागण्याचा प्रयत्न करणार्‍यांना पोलिस व पक्षीय गुंडांच्या मदतीने चिरडण्याचा पवित्रा घेतला होता. त्या सिंगूर गावात हिंसाचाराचा भडका उडाला होता, तिथेच जाऊन ममतांनी मुक्काम ठोकला व धरणे धरलेले होते. त्यांना सहानुभूती व्यक्त करायला मेधा पाटकर वगैरे काही स्वयंसेवी लोक निघाले असताना, रोखण्यात आलेले होते. म्हणून ममता संपल्या नाहीत की त्यांचा आवाज दडपता आला नाही. त्यांच्या मागे तिथला जमिन बळकावला गेलेला गावकरी एकदिलाने उभा राहिला आणि हळुहळू डाव्यांच्या गुंडगिरीने भयभीत झालेला बंगाली नागरिकही उभा रहात गेला. कारण त्याला न्याय मागायला जाण्यासाठी कायदा व पोलिस कार्यरत राहिलेले नव्हते, तेच सत्ताधारी डाव्यांचे दलाल हस्तक बनले होते. अशा वैफ़ल्यग्रस्त भयभीत बंगाली जनतेला ममतांची लढत आपली वाटली आणि लोकमत त्यांच्या बाजूला वळत गेले. पण त्याचा सुगावाही सत्तेची मस्ती चढलेल्या डाव्या पक्षांना लागला नाही. तिथे त्यांच्या शेवटाची सुरूवात झालेली होती. त्यानंतर आलेल्या लोकसभेच्या पहिल्या म्हणजे २००९ च्या निवडणूकीत बंगाली जनतेने डाव्यांना धडा शिकवला होता. पण झिंग चढलेल्यांचे डोळे कधी उघडतात काय?

२००९ च्या लोकसभा निवडणूकीत डाव्या आघाडीचा दणदणित पराभव झाला आणि मोठ्या संख्येने ममतांच्या पक्षाला व त्यांचा मित्रपक्ष कॉग्रेसला लोकांनी मते दिली होती. मग दोन वर्षांनी विधानसभेची निवडणूक आली, तेव्हा त्याच आघाडीने डाव्यांना सत्ताभ्रष्ट करून टाकले. नुसती डाव्या आघाडीची सत्ता व बहूमत गेले नाही, तर मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य व अनेक मंत्रीही त्यात आपापल्या जागी पराभूत झाले. त्यासाठी ममतांनी काय केले होते? त्यांना काही करावेच लागलेले नव्हते. त्यांच्या विजयासाठी बंगालभर डाव्या आघाडीने पोसलेले गुंड व पक्षपाती शासन यंत्रणाच ममतांसाठी खरे काम करीत होती. त्या गुंडगिरी व पक्षपाती शासन व्यवस्थेचा खरा बंदोबस्त करायचा, तर सत्तेची सुत्रे डाव्या आघाडीकडून काढून घेतली पाहिजेत, इतकेच लोकांना उमजलेले होते आणि लोकांनी विधानसभेत तसेच केले. बंगालमध्ये साडेतीन दशके अभेद्य वाटणारा डाव्यांचा बालेकिल्ला असा बघता बघता ढासळला. तो उध्वस्त करण्यासाठी ममतांना फ़ारमोठे राजकीय आंदोलन वा संघटना उभारावी लागली नाही. पोलिस व गुंड यांनी नागरिकांना इतके घाबरून टाकले होते, की एक दिवसही डाव्यांची सत्ता नको; अशी मतदाराची मानसिकता तयार झाली होती. फ़क्त डाव्यांना आव्हान देणारा कोणी पक्ष व नेता लोकांना हवा होता. नदीग्राम व सिंगूरच्या घटनाक्रमाने तो नेता ममतांच्या रुपाने समोर आला. त्याला राजकारणात उभे करण्यासाठी आवश्यक असलेली किरकोळ पक्ष संघटना तितकी ममताकडे होती. तीच पुरेशी ठरली. ममतांनी ज्याला उमेदवारी दिली, त्याला मतदाराने भरभरून मते दिली आणि डावी आघाडी उध्वस्त होऊन गेली. ते आपले यश ममतांना आत्मशक्ती वाटली, तरी वास्तवात तो डाव्यांच्या गुंडगिरी व अनागोंदीने बेचैन झालेल्या मतदारांचा घोळका होता. आता नेमकी ती़च स्थिती ममतांच्या पक्षाने व पक्षपाती कायदा यंत्रणेने आणली आहे. ताजी घटना त्याचा पुरावा आहे.

कुठलेही धड कारण न देता ममता सरकारने रथयात्रेला परवानगी नाकारल्यावर भाजपा हायकोर्टात गेला. मग त्या न्यायासनाने नुसती भाजपाला परवानगी दिली नाही, तर दहा वर्षे मागच्या गुंडगिरी व मनमानी दहशतवादाचे नवे रुप म्हणजेच ममता सरकार होय, असा निर्वाळाच कोर्टाने दिला आहे. इतका विक्षिप्त वा मनमानी निर्णय सरकार घेऊ शकत नसल्याचे मतप्रदर्शन हायकोर्टाने केलेले आहे. आता तेच ताशेरे काढून टाकण्यासाठी ममतांना मुख्य न्यायाधीशांकडे धाव घ्यायची वेळ आलेली आहे. पण मुद्दा तो नाहीच. आपल्या विरो्धातला आवाज चेपून कुणालाही लोकमत जिंकता येत नाही. त्यासाठी लोकांचा विश्वास संपादन करावा लागतो. ममतांनी आपल्या पक्षाच्या नावाखाली चाललेल्या गुंडगिरीला लगाम लावला असता, तर त्यांना भाजपाच्या वाटेत अडथळे आणण्याची गरज भासली नसती. पण आपण कशामुळे सत्तेत आलो, तेच विसरलेल्या ममतांनी भाजपाचे काम सोपे करून ठेवले आहे. पराभवाने व सत्ता गमावल्याने खचलेला मार्क्सवादी पक्ष ममतांच्या विरोधातील नाराजी संघटित करण्याच्या स्थितीत राहिलेला नाही आणि कॉग्रेसपाशी तितकी संघटना नाही. त्याचा लाभ भाजपाला मिळालेला आहे. लोकांच्या नाराजीला राजकीय रंग देण्याची भूमिका घेऊन भाजपा मागली दोन वर्षे काम करू लागला आणि तॄणमूलच्या हैदोसाने भयभीत झालेली जनता भाजपाच्या भोवती जमा होऊ लागली आहे. तिला दिलासा देऊनही भाजपाला रोखता येईल. जे ममता विरोधात डाव्यांना करता आले असते. पण तेव्हा त्यांना सत्तेची मस्ती चढलेली होती आणि आज ममतांची झिंग उतरेनाशी झाली आहे. त्यामुळे त्या डाव्या आघाडीच्या पावलावर पाऊल टाकून पुढे चालल्या आहेत, तर भाजपा खुद्द ममताचे अनुकरण करत अवघ्या बंगालचा सिंगूर नंदीग्राम बनवण्याची रणनिती आत्मसात करतो आहे. मग त्याचे फ़ळ कोणाला कसे मिळेल?

6 comments:

  1. Bhau,courtane avghya 24 tasat punha parwangi nakarli ahe.ashaweli yanche Ramshastri Gangobatatya hotat.Ekjat sagle haramkhor ekmukhane modivirodh karat ahet.media kiti khotardepana karte yache udaharan nehmipramane aj mediane Gadkarinchya jababdari ghenyachya vaktavyachi wadachi sal pimplala lavli ahe.sahkari sanstha nivdnukit yashala davedar sagle astat tase apyashachihi jababdari ghya ASE mhatlele Vidhan Modi,shaha jodila chiktavnyacha agocharpana kela ahe.ashamule udya kutrehi tangdi war karnanr nahi ya 'thevlelya' bhukkad patrakaranwar!

    ReplyDelete
  2. खरच तेलंगाणातील अपयश कसे झाकुन टाकलय मिडियाने,आणि ते किती स्पष्ट आहे तीन राज्यातील विजयाइतक काठावर नाही.

    ReplyDelete
  3. ममता आधीच्या कम्युनिष्ट सरकारची पद्धत अवलंबत आहे. तिच्या सरकारचे पतनही तिने अवलंबलेल्या पद्धतीनेच होईल.

    ReplyDelete
  4. भाऊ तुम्ही लिहिलेत ते खरं आहे पण भाजपाकडे बंगालमध्ये चेहरा नाही अन्यथा अधिक फायदा झाला असता.

    ReplyDelete
  5. Apratim lekh. Ha lekh Rashtriya patlivar jayla hava. Hindimadhe bhashantar Karun Rashtriya patlivar jau dya

    ReplyDelete