१९८८ सालात बोफ़ोर्सच्या तोफ़ा सीमेपेक्षा राजकारणात धडाडत होत्या आणि त्यात अकारण नाव गोवले गेल्याने अलाहाबाद येथून लोकसभेत निवडून आलेल्या अमिताभ बच्चन याने राजिनामा दिलेला होता. त्या घोटाळ्याला वाचा फ़ोडणार्या माजी अर्थमंत्री व संरक्षणमंत्री विश्वनाथ प्रताप सिंग, यांची पंतप्रधान कॉग्रेस अध्यक्ष राजीव गांधी यांनी पक्षातून हाकालपट्टी केलेली होती. सगळे विरोधी पक्ष सिंग यांच्याभोवती एकवटले होते आणि मग अलाहाबादची पोटनिवडणूक जाहिर झाली. ते राजकीय वळण ठरले आणि सर्वपक्षीय उमेदवार म्हणून सिंग तिथूनच लोकसभेला उभे राहिले. त्यावेळी जगाचे लक्ष तिथे वेधलेले होते आणि त्यापुर्वी आठ वर्षे आधी भारतात मतचाचण्यांचे युग आलेले होते. जनता पक्ष बुडाल्यावर झालेल्या मध्यावधी लोकसभेच्या निवडणूकीत पुन्हा इंदिराजी बहूमताने निवडून येतील; असे कोणाला वाटलेले नव्हते. तेव्हा प्रणय रॉय नावाचा एक तरूण आकडेशास्त्रज्ञ निवडणूक मतचाचणीच्या अभ्यासात उतरला होता. त्याने ‘इंडिया टुडे’ पाक्षिकात इंदिराजींच्या कॉग्रेस गटाला स्पष्ट बहूमतच नव्हेतर तीनशेहून अधिक जागा मिळतील, असे भाकित केले होते. ते तात्कालीन राजकीय अभ्यासकांना इतके अविश्वसनीय वाटलेले होते, की छापणार्या पाक्षिकाच्या संपादकांनीही त्या विश्लेषणाच्या अखेरीस ‘संपादक याच्याशी सहमत नाहीत’ अशी टिप टाकलेली होती. पण ते भाकित खरे ठरले आणि नंतर १९८४ सालात म्हणजे इंदिरा हत्येनंतरच्या लोकसभा निवडणूकीत पुन्हा प्रणय रॉयने राजीव कॉग्रेसला चारशेहून अधिक जागा मिळण्याचे भाकित केले होते. तेही खरे ठरले आणि राजीवनी नंतरच्या काळात दुरदर्शनवर असे कार्यक्रम करण्याची संधी प्रणय रॉयला दिली. त्यानेच या अलाहाबाद पोटनिवडणूकीत सिंग यांना एक लाखाहून अधिक मते मिळणार असल्याचे भाकित एक्झीट पोल घेऊन काढलेले होते. तो भारतातील पहिलावहिला एक्झीट पोल होता. शुक्रवारी राजस्थान व तेलंगणाचे मतदान संपल्यावर डझनभर वाहिन्यांनी जे एक्झीट पोल सादर केले, तेव्हा प्रणयचा तो पहिला एक्झीट पोल आठवला.
त्या निवडणूकीत कॉग्रेसने सिंग यांच्या विरोधात अलाहाबाद येथे लालबहादुर शास्त्री यांचे चिरंजीव अनिल शास्त्री यांना उमेदवारी दिलेली होती. खरोखरच व्ही. पी. सिंग यांनी मतमोजणीत शास्त्री यांचा एक लाखाच्या फ़रकाने पराभव केला होता, त्याचे महत्व असे, की तो पहिलाच एक्झीट पोल होता आणि तंतोतंत खरा ठरला होता. ९९ हजार आणि काही मतांच्या फ़रकाने सिंग विजयी झाले होते. त्यामुळे एक्झीट पोलवर माझा विश्वास बसला. नंतरच्या काळात अनेक वाहिन्या आल्या आणि मतचाचण्या घेणार्याही अनेक संस्था कंपन्या स्थापन झाल्या. चाचण्या घेण्याचे पेवच फ़ुटले. अलिकडे तर वाहिन्या अनंत झाल्यात आणि मतचाचणीकर्त्यांची संख्याही वारेमाप झाली आहे. पण ज्याने हे तंत्र भारतात आणले व प्रस्थापित केले; तो प्रणय रॉय त्यापासून दुर झाला आहे. मात्र त्याच्या तुलनेत को्णीही तितका अचुक अंदाज वर्तवणारा समोर येऊ शकलेला नाही. अर्धा डझनहून अधिक चाचण्या व त्यांचे निष्कर्ष शुक्रवारी समोर आले आणि त्यातले आकडे व फ़रक चक्रावून सोडणारे होते. कुठे मतांच्याही बाबतीत अचुक अंदाज देणारा प्रणय रॉयचा तो पहिला एक्झीट पोल आणि कुठे आजचे एक्झीट पोल; असे वाटून गेले. एक लाखाच्या फ़रकाने सिंग जिंकतील इतका अचुक अंदाज त्याने दिलेला होता. उलट शुक्रवारी जे अंदाज समोर आले, त्यात कुठल्याही विधानसभेत शून्यापासून दोनशेतिनशेपर्यंत जागा कुठलाही प्रमुख पक्ष जिंकत असल्याचे अंदाज? ह्याला एक्झीट पोल म्हणायचे तर रस्त्यावर पोपट घेऊन बसणार्याने निवडणुकांचे भाकित कशाला करू नये, असेच वाटले. इतकेही स्वातंत्र्य घेऊ नये, की लोकांसमोर आपण हास्यास्पद होऊन जाऊ. राजकीय विश्लेषक आणि चाचणीकर्ता यात जमिन अस्मानाचा फ़रक आहे. विश्लेषक आपले अंदाज व्यक्त करतो आणि चाचणीकर्ता मतांचे नमूने घेऊन काही समिकरणाच्या आधारे आकडे मांडतो. ती मांडणी किमान तर्कशुद्ध नसेल तरी तर्कसुसंगत असावी. इतकीही अपेक्षा करायची नाही काय?
शुक्रवारी संध्याकाळी मटाच्या वेबसाईटवर जी बातमी होती, त्यात महा एक्झीटपोल म्हणून जे कोष्टक छापलेले आहे, त्याची गंमत बारकाईने समजून घेतली पाहिजे. उदाहरणार्थ तेलंगणा या राज्यात काय होईल? तर कॉग्रेस आणि मित्रपक्षांना २७ ते ५३ आणि तेलंगणा समितीला ५४ ते ८५ जागा मिळतील, असे भाकित आहे. यात विधानसभेच्या जागा किती? तर ११९ जागांमध्ये बहूमताला ६० जागा पुरतात. त्यात कॉग्रेसला २७ ते ५३ म्हणजे किमान २७ आणि कमाल ५३ यातला फ़रक किती आहे? दुपटीचा? तेलंगणा समितीला ५४ ते ८५ म्हणजे ३१ जागांचा कमीअधिक फ़रक? ह्याला पोरकटपणा नाहीतर काय म्हणायचे? कमीअधिक पाचसहा जागांचा फ़रक असेल तरी ठिक आहे. पण २६ आणि ३२ जागांचा किमान-कमाल फ़रक असलेला एक्झीट पोल म्हणजे काय असते? उद्या मतमोजणी झाल्यावर २५ जागा मिळाल्या तरी तुमचा पोल खरा आणि ५५ मिळाल्या तरी खराच ना? एका पक्षाला कमाल जागा तितक्या दुसर्याला किमान? यातला मध्य काढला तर कॉग्रेसला ४० आणि तेलंगणा समितीला ७० असे सांगायला काय हरकत आहे? पण तसे केल्यास समितीला बहूमत मिळून जाते ना? आणि उद्या कॉग्रेस बहूमताच्या दारात जाऊन उभी ठाकली, तरी तोच पोल बरोबर म्हणायला मोकळे. आम्ही ५३ म्हटले होते आणि ५७ जागा कॉग्रेसला मिळाल्या, हा अंदाज वा चाचणी असण्यापेक्षा ‘पोपट’पंची झाली ना? हेच कमीअधिक प्रमाणात अन्य राज्यांच्याही बाबतीत करण्यात आलेले आहे. हा प्रकार प्रथमच झालेला नाही. मागल्या आठदहा वर्षात विविध विधानसभा लोकसभा चाचण्यांच्या बाबतीतही तेच घडत आलेले आहे, डझनभर चाचण्या येतात आणि त्यातला कोणी तरी लॉटरी लागल्यासारखा खरा ठरतो. पुढल्या खेपेस तो तोंडघशी पडलेला असतो. लोकसभेला चाणक्य म्हणून कुणा संस्थेच्या पोलने मोदींना बहूमत दाखवले होते आणि नंतर तो सततब तोंडघशी पडलेला आहे, आता काही वेगळे होण्याची कोणाला शक्यता वाटते काय?
आता राजस्थानचे बघूया. भाजपा ६० ते ९३ आणि कॉग्रेस ९१ ते १३७ जागा दाखवलेल्या आहेत. अंदाजात ३३ आणि ४६ इतका जबरदस्त फ़रक असू शकतो? याला सरासरी म्हणायचे असेल तर सरासरीची नविन व्याख्या बनवायला हवी. कोणी अशा चाचण्यांकडून शंभर टक्के नेमकी संख्या अपेक्षित नाही. पण कुठल्या राज्यामध्ये कुठला पक्ष जोरात आहे आणि कुठला पक्ष मार खाऊ शकतो, इतकीच सामान्य लोकांची अपेक्षा असते. जेव्हा अटीतटीची लढाई असते, तेव्हा कुठल्याही बाजूला पारडे फ़िरू शकते आणि ते फ़िरले तर लोकांची तक्रारही असणार नाही. अनेकदा असे झालेले आहे. उदाहरणार्थ छत्तीसगड विधानसभेत भाजपाने तिनदा सत्ता मिळवली, तरी कधीच ९० पैकी ५० च्या फ़ार पुढे झेप घेतलेली नाही. प्रत्येक वेळी अटीतटीची लढाई होऊन काठावर का होईना भाजपाने सत्ता हस्तगत केली आहे. त्याच्या उलट स्थिती राजस्थानची आहे. तिथे १९९८ नंतर कॉग्रेसला एकदा सत्ता मिळाली तरी बहूमत हुकलेले होते आणि अपक्षांच्या मदतीने २००८ सालात कॉग्रेसने सत्ता संपादन केलेली होती. थेट दोन पक्षातच संघर्ष असलेल्या जागी दोनतीन टक्के मतांनीही मोठे सत्तांतर होऊन जाते. कारण नुसती मतांची संख्या वा टक्केवारी, आकडे सिद्ध करायला अपुरे असतात. ही मते व टक्केवारी मतदारसंघात कशी वाटली गेलेली असते, त्याप्रमाणे जागांचे निकाल लागत असतात. उदाहरणार्थ हल्लीच झालेल्या कर्नाटक विधानसभेत कॉग्रेसला संख्येने अधिक मते व टक्केवारी मिळालेली आहे. त्यापेक्षा एक टक्का भाजपाची मते कमी आहेत. पण कॉग्रेसला २० जागा कमी तर भाजपाला जास्त मिळाल्या. भाजपाचे बहूमत पाचसहा जागांनी हुकले. कारण कॉग्रेसची मते सर्व मतदारसंघात सारखी विभागली गेलेली आहेत आणि भाजपाची मध्य उत्तर व किनारी कर्नाटकात संचित झालेली मते होती. म्हणूनच तिथेही एक्झीट पोलचा बोजवारा उडालेला होता.
ओपिनियन पोल आणि एक्झीट पोल यात आणखी एक फ़रक आहे. तो तेव्हाच तीन दशकापुर्वी प्रणय रॉयने स्पष्ट करून सांगितलेला होता. ओपिनियन पोल मतदान होण्यापुर्वी खुप आधी झालेला असतो. तेव्हा मतदानाची मनस्थितीही नसते. पण मतदान झाल्यावर घेतलेल्या चा़चणीत फ़ारसे लपवायचे उरलेले नसते. म्हणून एक्झीट पोल अचुक असायला हवा. तसा नसेल तर त्यालाही ओपिनियन पोल म्हणायला हवे. इथे छत्तीसगडमध्ये भाजपाला २६ ते ४६ आणि कॉग्रेसला २९ ते ६० अशा जागा दाखवल्या आहेत. वीस आणि तीस जागां कमीअधिक? हा सगळा मग पोरखेळ होऊन जातो. थोडक्यात हे पोल बघितले मग काय वाटले? तुम्हाला एक प्राणी दाखवला आणि विचारले हा कोणता प्राणी आहे? तर तुम्ही सोपे उत्तर द्यायचे. तो उडाला तर पक्षी नक्की असेल आणि बुडाला तर बेडूक समजायचा. यापेक्षा असल्या एक्झीट पोलचा दुसरा काही अर्थ निघू शकतो का? लागोपाठच्या अनेक विधानसभात हेच आपण बघत आलो. एक मात्र निश्चीत, असे पोल व अंदाज आले की निकालानंतर खर्या आकड्यांपेक्षाही अशा अंदाजांचे राजकारण जोरात सुरू होते. त्यातून मग मतदान यंत्रात गडबड होती, असे दावे प्रतिदावे सुरू होतात. आताही मतमोजणीपुर्वीच एव्हीएमविषयी शंका घेतल्या गेल्या आहेत. उत्तरप्रदेश विधानसभा निकालानंतर त्या सुरू झाल्या होत्या. पण तशा तक्रारी पंजाबच्या निकालानंतर केल्या गेल्या नाहीत. उद्या मतमोजणीनंतर म्हणजे मंगळवारी दुपारी निकाल स्पष्ट झाल्यावर काय होते, ते बघणे मनोरंजक असेल. डझनभर पोलपैकी कोणाचा तरी खरा ठरेल आणि मग तोच आपला अदाज कसा शास्त्रशुद्ध होता, त्याचे दावे चाचणीकर्ता करू लागेल. अर्थात खरे ठरण्याची चतुराई वर स्पष्ट केली आहेच. एका पक्षाला २७ किंवा ५७ जागा मिळाल्या तरी तोच पोल खरा ठरणार ना? ह्या उथळपणामुळेच तीन दशके मागचा प्रणय रॉय आणि त्याने आरंभलेला एक्झीट पोल आठवला.
भाऊ तुमचा अंदाज काय? नेमके आकडे नसतील तरी चालेलं पण कोणत्या राज्यात कोण आघाडीवर आहे ते तरी सांगा.
ReplyDeleteआणखी एक म्हणजे जे काही exit polls चे आकडे आहेत त्यावरून असं दिसतंय कि निकालाच्या दिवशी जर भाजप जिंकली (खास करून मप्र छग मध्ये भाजप जिंकेल असं मला वाटतंय) तर सर्व विरोधी पक्षाना evm वर खापर फोडता येईल. म्हणजे लोकांच्या मनात अजून संशय. त्यामुळे बऱ्याच exit polls चे result doubtful वाटतं आहेत.
जर काँग्रेस जिंकत असते तर आतापर्यंत त्यांच्या वाचाळ नेत्यांनी महा गठबांधन च्या अन्य नेत्यांना मोठ्या वल्गना करून धमकवायला सुरू ही केले असते। तसे अजून घडले नाहीये याचा अर्थ समजून घेतला पाहिजे । 😄
Deleteभाऊ तुमच काय मत आहे? कोंण निव्डुन येईल? तुम्ही बरेच दिवस ब्लॉग लिहला नाही मला वाट्ते की तुम्ही सुद्धा तिक्डेच अस्ताल।
ReplyDeleteखरय भाउ कर्नाटक मधे पण असे उलटसुलट एक्झिट पोल आले होते.ज्यांनी भीत भीत त्रिशंकु दाखवले ते बरोबर ठरले.
ReplyDeleteभाउ बरेचसे पोल आणि हासु्द्धा भाजप शुन्य दाखवतोय हे कस काय?
ReplyDeleteBhau what is ur opinion @ 5 state election? Plz reply
ReplyDeletebhau tumch andaz kay aahe te sanga me tumacya matas sahmat aahe kiman aani kamal chi sarasari ha atyuttam andaz.
ReplyDeleteExit poll चे जर एकांगी आकडे दिले (तसे प्रत्यक्षात असले तरी) तर मग रोज छापायचं काय हा प्रश्न पडतोच ना ?
ReplyDeleteमग काही तरी confusion छापून द्यायचं, मग रोज रकाने भरता येतात आणि पुढल्या महिन्याच्या पगाराची सोय होते 😝😝
भाऊ एक तक्रार आहे.
ReplyDeleteतुम्ही कुठल्याही comment वर प्रतिक्रिया देत नाही.
भावु तुमचा स्वताच्या काय अभ्यास आहे आणि काय अंदाज आहे ते सांग प्रत्येक निवडणुकीनंतर एक्सिट पोल आणि ओपिनियन पोल कशे चुकीचे आहे है वाचून कंटाला आला आहे
ReplyDeleteभाऊ या तिन्ही राज्यात जवळपास 75 टक्के मतदान झाले आहे म्हणजे 2014 पासून मोदी आणि शहा यांनी मतदान टक्केवारी वाढावी हा प्रयत्न सुरू केला तो आता स्थिरावला आहे म्हणजेच विधानसभेला जिथे 75 टक्के मतदान होते तिथे लोकसभेला नक्कीच 80 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान घडवून आणले जाणार आहे अशा स्थितीत जिथे मोदी आणि राहुल अशी थेट लढत आहे अशा मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड महाराष्ट्र उत्तर प्रदेश हिमाचल दिल्ली या राज्यात निकाल 2019 मधे काय लागणार हे सांगायला कोणत्याही पोल पंडितांची गरज नाही अधिक अमित शहा यांनी ईशान्य भारत ओरिसा बंगाल आंध्र या ठिकाणी पक्षाच्या काहींना काही जागा निवडून येतील अशी तजवीज केली आहे त्यामुळे 2019 मध्ये भाजप 300 आणि nda 350 अशी स्थिती नक्की आहे पण उथळ प्रसार माध्यमातून अशा चर्चा घडवून आणल्या जात नाहीत त्यामुळे आपण म्हणता तसे या exit poll ची विश्वासहर्ता शून्य आहे
ReplyDeleteमाझ्या मते राजस्थान येथे भाजपला बहुमत नक्की मिळणार
ReplyDeleteप्रणय रॉय, यांची व त्यांच्या चैनेलची परिस्थिती व काविळ झालेल्या व्यक्तींचा दृष्टिकोन पाहिला तर, "कोण होतास तू, काय झालास तू". तेव्हा दूरदर्शन वर सतत २-३ दिवस ,प्रणय रॉय व विनोद दुवा या दुकलींने, निवडणूक चर्चा अशी रंगतदार होऊ शकते, तेही सरकारी दूरदर्शन वर, हे सप्रमाण सिद्ध केले होते.सत्तांतर घडले होते.
ReplyDeleteआता पत्रकारिता ही मालक धार्जीणी झाली आहे. पढवलेला पोपटच जणू.
कधी कधी You Tube वर पाकिस्तानात होत असलेल्या राजकीय चर्चा पहायला मिळतात. त्यांचा दर्जा इथल्या मानाने खूपच उच्च दर्ज्याच्या असतात.
I also see pak media on you tube you are right.whatever they speak at least we can listen not overlap speaking. And quality is also good
DeleteMP/CHG - BJP, RJ- INC Kathavar
ReplyDeleteHere is my take on results it may go completely wrong as well but this is what it is.
ReplyDeleteMP : Congress 115/BJP 105
CG: Congress 45/BJP 42
Rajasthan : congress 140/BJP 50
Mizoram: Congress clear majority
Telangana: based on news papers it's 50/50 %
AmitG
Hahaha
ReplyDeleteMazya exit poll pramane
Telanganat saglya pakshanna 0 te 119 jaga miltil