मी कधीच कोणाला कसल्या शुभेच्छा देत नाही. हे आजवर अनेकदा सांगून झाले आहे. पण जेव्हा आपण एखाद्याला इच्छा असूनही कसली मदत करू शकत नाही आणि त्याचा सत्यानाश उघड्या डोळ्यांनी बघण्याची पाळी येते; तेव्हा त्याला शुभेच्छा देण्यापेक्षा अधिक काही आपल्या हाती उरलेले नसते. कारण अशी व्यक्ती स्वत:च विनाशाकडे धावत सुटलेली असते. साक्षात इश्वरही त्याला त्या विनाशापासून वाचवू शकत नसतो. म्हणूनच २०१४ च्या आरंभी किंवा २०१३ च्या अखेरीस एका लेखातून मी तेव्हाचे उदयोन्मुख राजकीय नेते अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा दिलेल्या होत्या. कारण हा होतकरू नेता आपलाच कपाळमोक्ष करून घ्यायला धावत सुटलेला होता. त्याला प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या वारेमाप पोरकट प्रसिद्धीचा इतका मोह झालेला होता, की त्याने दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर लाथ मारलीच. पण त्याच्याकडे भावी नेता म्हणून बघणार्यांची पुरती निराशा करून टाकलेली होती. १९७७ सालचा जनता पक्षाचा प्रयोग नक्कीच फ़सला होता. पण आणिबाणी विरुद्धच्या त्या लढाईत जे अनेक युवक उदयास आले, त्यातून पुढल्या तीनचार दशकात समाजाच्या विविध घटकांना नेतॄत्व देऊ शकतील, असे नेते उदयास आलेले होते. लालू यादव, मुलायम यादव, रामविलास पासवान, देवेगौडा वा प्रमोद महाजन अशी ती पिढी होती. लोकपाल आंदोलनाने पुन्हा एकदा वैफ़ल्यग्रस्त समाजातील तरूण पिढी आपली अलिप्तता सोडून राजकीय घडामोडीकडे वळली होती आणि त्यातून नवे नेतृत्व उदयास येण्याची पुर्ण शक्यता होती. पण तिला आकार येण्यापुर्वीच केजरीवाल यांनी नसत्या उठाठेवी करून त्या आंदोलनाचा व त्यातून निर्माण झालेल्या अपेक्षांचा चुराडा करून टाकला. म्हणूनच त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्या केजरीवाल पुरत्या मर्यादित नव्हत्या, तर त्या तरूणाला हरभर्याच्या झाडावर चढवून सार्वजनिक जीवनात येऊ बघणार्या नव्या पिढीची भृणहत्या करणार्या संपादक विचारवंतांसाठीही होत्या. कारण त्यातून त्यापैकी अनेकांशी इतिश्री होताना मला दिसत होती.
२०१४ च्या लोकसभा निवडणूकीचे वेध पाच राज्यांच्या विधानसभा मतदानातून लागलेले होते. त्यात तीन विधानसभा भाजपाने जिंकल्या आणि लोकपाल आंदोलनाचा प्रवर्तक असलेल्या केजरीवाल यांचा प्रभाव असल्याने राजधानी दिल्लीत भाजपाचे बहूमत हुकलेले होते. पण त्याचा वारेमाप गाजावाजा माध्यमातील पत्रकारांनी केला व भाजपाच्या अन्य तीन राज्यातील यशाला झाकोळून टाकण्याचे डाव खेळले. तिथपर्यंत ठिक होते. पण पुढल्या सहा महिन्यात या माध्यमांत दबा धरून बसलेल्या काही मान्यवरांनी जणू मोदी विरोधात आघाडीच उघडली होती. त्यात केजरीवालना मोदींचे आव्हान म्हणून पुढे आणले गेले. त्या अर्ध्या हळकुंडाने केजरीवाल पिवळे झाले तर समजू शकते. पण असल्या पोरखेळात बुडणार्या कॉग्रेससहीत आपली पत्रकारी प्रतिष्ठा व माध्यमांची विश्वासार्हता धुळीस मिळेल, याचेही भान या दिग्गजांना राहिले नाही. त्याच्या परिणामी नरेंद्र मोदी जिंकले व कॉग्रेस निवडणूकीत सफ़ाचाट झाली. हा एक भाग होता. पण त्यात परस्पर अनेक संपादक मान्यवर पत्रकार कुठल्या कुठे बेपत्ता होऊन गेले ना? तेव्हाचे नामवंत प्रणय रॉय, बरखा दत्त, विनोद दुआ, राजदीप सरदेसाई, अनेक वाहिन्या व वर्तमानपत्रे आज नावापुरती उरली आहेत. त्यांना ती प्रतिष्ठा राहिलेली नाही, त्यांना कोणी संपवावे लागले नाही, त्यांनीच आपला आत्मघात ओढवून आणला होता. विश्वनाथन नावाच्या सामाजिक मानसशास्त्रज्ञाने त्याचे विश्लेषण ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकात करताना आपल्या नाकर्तेपणाची कबुलीही दिलेली होती. मोदींनी कॉग्रेसला नव्हेतर माझ्यासारख्या उदारमतवाद्याला कसे पराभूत केले, अशा आशयाचा लेख त्याने लिहीला होता. तो त्याच्यापुरत मर्यदित नव्हता तर एकूणच देशातील बुद्धीवा़दी वर्गासाठी होता. मग तेव्हा जर कुठल्याही निवडणूका न लढता असा वर्ग पराभूत झाला असेल, तर त्यापासून तो काही धडा शिकला की नाही?
आजकाल राफ़ायलच्या नावाने जो शिमगा नित्यनेमाने चालू आहे. त्याचवेळी ऑगस्टा वेस्टलॅन्ड हेलिकॉप्टर खरेदीतला दलाल सीबीआयच्या तावडीत असतानाही त्यावर माध्यमांनी टाकलेला पडदा बघितल्यावर २०१४ चा काळ आठवतो. युपीएने वाजवलेले दिवाळे झाकून मोदींवरचे दंगलीचे आरोप किंवा त्यांच्या कुठल्या क्षुल्लक शब्द वा कृतीवरून वादळे उठावली जात होती. त्याकडे ढुंकूनही न बघता मोदींनी आपली प्रचार मोहिम चालवली व थेट बहूमतापर्यंत मजल मारली. त्यात कॉग्रेससहीत सगळा बुद्धीवादी वर्ग गारद होऊन गेला. मधल्यामध्ये कारण नसताना केजरीवालही खच्ची होऊन गेले. आता पुन्हा लोकसभा निवडणूका जवळ आल्यावर त्याच वर्गाची झोप उडाली आहे आणि तितक्याच हिरीरीने पुन्हा हे सगळे लोक कामाला लागलेले आहेत. तेवढ्याच तावातावाने मोदींना बहूमत मिळवता येणार नाही आणि बहूमत हुकले की दुसरा कोणी पंतप्रधान निवडावा लागेल; असे नवे तर्क रंगवण्याची शर्यत सुरू झाली आहे. तेव्हा केजरीवाल यांच्या कुठल्याही खुळेपणाला अपरंपार प्रसिद्धी दिली जात होती आणि त्यावरच चर्चा चाललेल्या होत्या. पण मोदींच्या होणार्या मोठमोठ्या सभा किंवा त्याला मिळणारा प्रतिसाद झाकून ठेवला जात होता. पण समाज माध्यमातून मोदी लोकांपर्यंत पोहोचू लागले आणि टिआरपी घसरू लागली, तेव्हा मोदींच्या प्रत्येक सभेला मग नित्यनेमाने प्रसिद्धी देण्याची अगतिकता आलेली होती. अखेरच्या टप्प्यात तर माध्यमांना इतकी लाचारी आली, की मोदींनी मुलाखत द्यावी म्हणून वाहिन्यांचे संपादक वाडगा घेऊन फ़िरत होते. त्यांना मुलाखत देताना मोदींनी बहुतेक संपादकांना अंगठा दाखवित दुय्यम पत्रकारांना मुलाखती दिल्या होत्या. त्यातून अशा नामवंत संपादक पत्रकारांची प्रतिष्ठा लयास गेली. मात्र त्यासाठी मोदींना दोषी मानता येणार नाही. ह्या प्रत्येकाने आपल्याच हाताने व प्रयत्नांनी ही दुर्दशा ओढवून आणलेली होती. त्यांना फ़क्त शुभेच्छाच देणे शक्य होते.
आज पाच वर्षे उलटून गेल्यावर त्याच आत्मघातकी मार्गाने माध्यमे व त्यातले दिवाळखोर आत्मघाताला सिद्ध झाले आहेत. अन्यथा त्यांनी राहुल गांधींच्या कुठल्याही खुळचटपणाला इतकी प्रसिद्धी देऊन काहूर माजवले नसते. राफ़ायल किंवा अन्य जे काही आरोप राहुल गांधी नित्यनेमाने करीत असतात, त्यात पाच वर्षापुर्वीच्या केजरीवाल यांच्या बेताल आरोपांपेक्षा किंचीतही फ़रक नाही. अशा बुनबुडाच्या आरोपांनी मोदीना तेव्हा लगाम लावता आला नाही, की मतदारही बहकला नाही. मग आज त्याच बोथट हत्याराने मोदींवर वार होऊ शकेल काय? तो झाला नाही आणि मोदी पुन्हा सुखरूप बहूमताचा पल्ला गाठून गेले, तर काय होईल? पुन्हा एक संपादकांची व नाव कमावलेल्या पत्रकार विचारवंतांनी पिढी गारद होऊन जाईल. कारण विचारवंत पत्रकार किंवा अभ्यासकांचे अस्तित्व त्यांच्या विश्वासार्हतेवर अवलंबून असते. ती कमी झाली वा रसातळाला गेली, मग त्यांच्याकडे लोक ढुंकून बघायला तयार नसतात. कारण निवडणुका लोकमताने जिंकल्या हरल्या जातात आणि प्रसार माध्यमात त्याच्याच सत्यतेला छेद देणार्या गोष्टींवर भर असला, मग त्यांची विश्वासार्हता लयाला जात असते. मोदी सरकारवर कुठलाही भ्रष्टाचार वा गैरकारभाराचा ठाम आरोप कोणी करू शकत नसेल आणि कुठलाही पुरावा समोर आणलेला नसेल; तर आरोपकर्त्याच्या बरोबरच त्याला प्रसिद्धी देणार्यांची विश्वासार्हता संपत असते, केजरीवालच्या बाबतीत तेच झाले होते. आता राहुलच्या आतषबाजीने त्याचीच पुनरावृत्ती चालली आहे. त्याची मतदानातली किंमत राहूल वा कॉग्रेस मोजतीलच. पण त्यामध्ये हकनाक बळी जायला पुढे सरसावलेल्यांना आपण काय मदत करू शकतो? त्यांना शुभेच्छा देण्यापलिकडे आपल्या हाती काही नाही. हवा आणि वातावरण २०१४ सारखे साकार होऊ लागले आहे, त्यात कोणाचे बळी जातात ते पाच महिन्यांनी समोर येईलच. अशा सर्वांना नववर्षाच्या आणि त्यांच्या आत्मघातकी मोहिमेसाठी शुभेच्छा!
ज्यांना तेव्हाचा लेख वाचायचा असेल, त्यांनी खालीस दुवा बघावा
https://bhautorsekar.blogspot.com/2013/12/blog-post.html
खरय, विचारवंतांनी ह्यावर आत्मचिंतन करायला हवे. १९८९ नंतर व्हि पी सिंग पंतप्रधान होऊ शकतात, याचे विश्लेषण करताना ही मंडळी थोडीफार तटस्थता दाखवत होती.
ReplyDeleteआता २०१९ नंतर, त्यांचे पालनकर्तेच निराधार झाले, तर ह्या मंडळींना कोण आसरा देणार. इतक्या दशकांची सरकारी खर्चाने ऐषोआराम करायची सवय पूर्ण पणे सोडावी लागणार.
नवीन वर्षाच्या युवराज राहुल गांधी यांना शुभेच्छा! तुम्हाला सध्याचे सरकार उलथवून टाकण्याचा आनंद प्राप्त लाभो! आणि इतर पक्षांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला त्यांच्याशी सहकार्य करण्याची संधी येवो!
ReplyDeleteहा लेख म्हणजे अतिशय समर्पक शब्दात मांडलेले परखड सत्य आहे. या लेखातील " पण जेव्हा आपण एखाद्याला इच्छा असूनही कसली मदत करू शकत नाही आणि त्याचा सत्यानाश उघड्या डोळ्यांनी बघण्याची पाळी येते; तेव्हा त्याला शुभेच्छा देण्यापेक्षा अधिक काही आपल्या हाती उरलेले नसते. कारण अशी व्यक्ती स्वत:च विनाशाकडे धावत सुटलेली असते." हे वाक्य मला अतिशय आवडले. आपल्या जीवनातही आपल्याला असेच वागावे लागते.कालच माझ्या एका नातेवाईकाने आधीचे कर्ज भरण्याकरिता नवे कर्ज घेतले. हाच प्रकार त्याने आधी ३ वेळा केला आहे. मी अनेकदा समजावून सांगितले पण पालथ्या घड्यावर पाणी. पण यावेळी मी त्याला फक्त शुभेच्छा दिल्या. आत्ता तुमचा लेख वाचल्यावर वरील वाक्य आवडून गेले.
ReplyDeleteझकास!!!!
ReplyDeleteभाउ तुमचे अंदाजखरे ठरतात पाच निवडनुकांवेळी तुम्ही काही लिहिल नाही म्हनजेत तुम्हाला अंदाज होताभाजप हरनारेयते तुमचाह हे भाकीत खरे ठरो वातावरण तसच तयार होतय मोदींनी प्रचार सुरु पण केलाय.
ReplyDeleteChan ahe tumcha blog
ReplyDeleteभाऊ, काल परवा त्या ऑगस्ता वेस्टलॅन्ड प्रकरणात Mitchel christian कडून "Mrs.Gandhi" आणि "son of Italian lady" असे सरळ सरळ उल्लेख होऊन सुद्धा माध्यमां मध्ये शांतता आहे ह्या गोष्टीच आश्चर्य वाटतंय.
ReplyDeleteत्या प्रकरणावर थोडंसं लिहावं हि विनंती.
पण भाउ, 2018 च्या शेवटच्या निवडणुकात पप्पू गांधी च्या केम्ब्रिज अनलिटीका चे डावपेच थोड्या प्रमाणात का असेना पण सफल होताना दिसले. भाजप राजकारणी डावपेचात कोंग्रेस पेक्षा कमी पडला असं दिसतंय का ?
ReplyDeleteWish you all a very happy new year ahead!
ReplyDeleteBhau would like to read something about"Accidental Prime Minister"
भाऊराव,
ReplyDelete२०१९ च्या लोकसभा निवडणुकांची परिस्थिती २०१४ सारखीच आहे. राजस्थान,मप्र, तेलंगण या विधानसभांचे निकाल पाहता भाजपची मतं शाबूत आहेत असं दिसतं. मात्र छत्तीसगडांत भाजपचा मतहिस्सा अचानक खालावला आहे व हा फरक काँग्रेसच्या गोटात दाखल झालेला दिसतो आहे. मला हे चिंताजनक लक्षण वाटतं. पशुपती ते तिरुपती हे लाल बोळकांड मोदींच्या धोरणामुळे छत्तीसगडात कमकुवत झालं होतं. आता राज्य शासन काँग्रेसचं असल्यानं ही नक्षली कीड परत डोकं वर काढू शकते.
यावर विचारविमर्श व्हायला हवा.
आपला नम्र,
-गामा पैलवान
भाऊ या वेळी शुभेच्छा शिवसेनेला द्याव्या लागणार आहेत त्यांची आजची वर्तणूक 2004 ते 2009 मधल्या डाव्या पक्षांशी साधर्म्य असणारी आहे 2009 मध्ये जनतेने डाव्या आघाडीला हाकलून दिले आणि त्यांच्या जागा काँग्रेस आणि upa ला दिल्या. आजच्या नववर्षाच्या सामनातील अग्रलेखाची भाषा पाहता सेना भाजप युती होणे जवळपास अशक्य आहे, अशा स्थितीत महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर इथे लढाई मोदी आणि राहुल गांधी यांच्यात होणार आहे म्हणजेच जनतेला मोदी हवे असतील तर सेनेच्या आजच्या जागा भाजपकडे जातील आणि राहूल गांधी हवे असतील तर काँगेसकडे जातील म्हणून 2019 मध्ये सेनेची स्थिती 2014 मधल्या मायावती यांच्या सारखी होऊ नये म्हणून सेनेला शुभेच्छा द्यायला हव्यात
ReplyDelete