Wednesday, December 5, 2018

सुप्त ॠषी जागे झाले

latur

(फ़ोटो सौजन्य: www.esakal.com/ )

मागले दोनटीन दिवस माध्यमांनी कॉग्रेसचे खासदार कुमार केतकरांना फ़ार प्रसिद्धी दिल्यामुळे दुसरे कुमार विचलीत झालेले आहेत. अन्यथा पुण्यातून थेट लातूरला जाऊन त्यांनी राजकीय भविष्यवाणी केली नसती. तिथे गेल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नसल्याची ग्वाही देऊन टाकलेली आहे. त्यामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडलेला आहे. जरा पुढे दिल्लीला जाऊन सप्तर्षींनी हीच भविष्यवाणी राहुल गांधींना समजावली असती, तर त्यांनी काही दिवस विश्रांती तरी घेतली असती. असो, मुद्दा इतकाच, की अशा भविष्यवाण्या करण्याला अंधश्रद्धा निर्मूलन म्हणतात. कारण ते जिथे बोलत होते, तिथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ पादधिकारी उपस्थित होते आणि त्यांनीही भविष्य ज्योतीष वगैरे भंपक कल्पना असल्याचे सप्तर्षीना समजावलेले नाही. त्यामुळे राजकीय भाकिते वा भविष्यवाणी वैज्ञानिक असावी, असे आपण गृहीत धरणे भाग आहे. आपल्या कटाचा विस्तार करताना केतकरांना कुठले पुरावे द्यावे लागत नसतील, तर सप्तर्षीकडे तरी कोण पुरावे मागू शकतो? अर्थात केतकरांपेक्षा सप्तर्षी खुप जुनेजाणते भविष्यवेत्ते होराभूषण आहेत. सात वर्षापुर्वी त्यांनी आपल्या ‘सत्याग्रही विचारधारा’ मासिकात काही पानांचा अग्रलेख लिहून भारतामध्ये अध्यक्षीय शासनप्रणाली येऊ घातल्याचे भाकित केलेले होते. तेव्हा त्यांच्या समोर कोणी नरेंद्र मोदी वा संघाचा नेता नव्हता. तशी भविष्यवाणी त्यांनी लोकपालचे ‘अत्याग्रही’ अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची ग्रहदशा बघून वर्तवली होती. पण कुमार केतकरांनी व्यापक कारस्थानात सगळी तात्कालीन ग्रहदशा बदलून अण्णांना राजकीय सामाजिक क्षितीजावरूनच गायब करून टाकले. अन्यथा आज कुमार सप्तर्षीना भावी पंतप्रधानाविषयी बोलण्याची वेळच आली नसती. त्यांनी कदाचित नरेंद्र मोदी पुन्हा राष्ट्राध्यक्ष होणार नाहीत, असली भविष्यवाणी केली असती. असो.

कुमार हा केतकर असो की सप्तर्षी असो, त्यांना आपण सकाळी काय बोललो ते संध्याकाळी आठवत नाही. आज का्य लिहीले त्याचा उद्या परवा पत्ता नसतो. त्यामुळे ते बिनधास्त भविष्यवाण्या करीत असतात किंवा व्यापक कारस्थाने शिजवून उपासमारीने मरणार्‍या माध्यमांचे सकस पोषण करीत असतात. त्यामुळेच बहुधा लातूरच्या पत्रकार माध्यमातले कुपोषण संपवण्यासाठी सप्तर्षी तिकडे गेलेले असावेत. कदाचित हल्ली त्यांच्या भोवती फ़ारसे कॅमेरे जमत नाहीत. म्हणून असेल, सप्तर्षी यांना काहीबाही विवादास्पद बोलून आपल्याकडे कॅमेरे आकर्षित करायचे असावेत. अन्यथा असे अतर्क्य विधान त्यांनी कशाला केले असते? लातुरला सप्तर्षी वादग्रस्त बोलले यामागे त्यांचा पवित्र हेतू काय असावा? हे मी समजावण्यापेक्षा खुद्द सप्तर्षीच्याच शब्दात समजून घ्या.

‘भोवती सतत कॅमेरे असतील तर कशाचाही विधीनिषेध राहत नाही. कॅमेर्‍यांची संख्या कमी झाली की अधिक विवादास्पद बोलावे, म्हणजे कॅमेरेवाले धावत येतील हे कळते. मग माणूस काहीबाही बोलून कॅमेरे आकर्षित करू लागतो. सामान्य माणसांना चॅनेल्समधून ज्या प्रतिमा त्यांच्यावर आदळतात तेच वास्तव वाटू लागते.’ असे डॉक्टरांनी अण्णा हजारे यांच्या २०१२ च्या लोकपाल आजाराविषयी केलेले निदान होते. मग आज खुद्द त्यांनाच काय झाले आहे? कॅमेरांची घटलेली संख्या भेडसावते आहे का? ते आपले पुण्य़ातले निधीवादी-गांधीवादी काम सोडून राजकीय भाकिते कशाला करू लागले आहेत? आज ते भावी पंतप्रधानाविषयी बोलत आहेत आणि सहासात वर्षापुर्वी त्यांना देशात अध्यक्षीय प्रणाली येणार असल्याची स्वप्ने पडत होती. त्यांचे तेव्हाचे भाकित वाचा.

’जनलोकपाल बिल आणि त्यासाठी जनआंदोलन नामक बाजारू प्रदर्शन ही अध्यक्षीय लोकशाहीची रंगीत तालीम आहे असा संशय आम्हाला येऊ लागला. त्याला कारण होते. अमेरिकेच्या अध्यक्षाला तेथील सिनेटपेक्षा (संसदेपेक्षा) अधिक अधिकार आहेत. तेथील संसदेने बहुमताने एखादा ठराव संमत केला तरी त्या ठरावाच्या विरोधात अध्यक्षाला निर्णय घेता येतो. अमेरिकेच्या अध्यक्षावर निवडून आलेल्या सिनेटर्समधूनच काहींना मंत्रिमंडळात सदस्य म्हणून घेण्याचे बंधन नसते. त्याच्या मर्जीनुसार कोणत्याही व्यक्तीला तो मंत्रिमंडळात घेऊ शकतो. याचा अर्थ सार्वजनिक जीवनाचा स्पर्श नसलेली मंडळी अमेरिकेच्या जनतेवर राज्य करू शकतात.’

जनलोकपाल बिलासाठी लोकांचे रस्त्यावर उतरणे बाजारू प्रदर्शन, अशी संभावना त्यांनी केली होती. मग हे शहाणे वाहिन्यांवर येऊन जी मुक्ताफ़ळे उधळतात त्याला काय म्हणायचे? कारण त्यांच्या त्या चर्चेत अधूनमधून कमर्शियल ब्रेक जाहिरातीच्या पैशासाठी घेतला जातो, त्याला काय अध्यात्म म्हणतात काय? तो बाजारूपणा नसतो काय? जगभरातून एनजीओ म्हणून गोळा केलेल्या पैशावर जी आंदोलने चालवली जातात, त्याला बाजार नाहीतर काय म्हणतात? ते असो, तेव्हा सप्तर्षींच्या भाकिताचे काय झाले. वर्षभरात अण्णा अंतर्धान पावले आणि जाता जाता केजरीवाल नावाचे नवे पिल्लू सार्वजनिक जीवनात सोडून गेले. देशाची घटना संपुष्टात आली नाही की संसदीय पद्धती निकालात निघाली नाही. आजही शाबुत आहे आणि लौकरच आणखी एक संसदीय निवडणूक व्हायची आहे. मग डॉक्टरांना आलेल्या संशयाचे काय? तर अशा कुमार लोकांना कसलाही संशय येत असतो आणि कशातली व्यापक कटकारस्थान दिसत असते. त्यासाठी कुठला वैज्ञानिक पुरावा लागत नाही किंवा वास्तवाचे भानही असावे लागत नाही. त्यांना वाटले म्हणजे संशय येतो आणि संशय आला म्हणूनच तसे वाटत असते. आता त्यांना वाटले म्हणजे तेच तसेच असणार ना? त्यासाठी पुरावे कशाला मागायचे? वैज्ञानिक पुरावे मागणारे अंधश्रद्ध असतात. निर्मूलनवाल्यांना पुरावे संपवायचे असतात ना? अशी एकूण स्थिती आहे. अशा लोकांना जे काही आवडत नाही व जिथे त्यांना स्थान नसते, त्याला अस्पृष्य घोषित करणे व धर्मबाह्य ठरवणे; ही आपल्या देशातील जुनी सनातन पद्धती राहिली आहे. आजकाल त्यालाच पुरोगामीत्व म्हणतात. म्हणून तेव्हा डॉक्टर संसदीय लोकशाही व संविधान धोक्यात असल्याची भविष्यवाणी करीत होते आणि आता नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नसल्याचीही ग्वाही देत आहेत.

पण जाता जाता त्यांनी आणखी ज्ञानामृत पाजलेले आहे. देशात नवे रस्ते तयार करण्यापलिकडे कुठलीही विकासा़ची कामे चालू नाहीत, असाही शोध त्यांनी लावला आहे. अर्थात रस्ते बांधण्याचे काम तरी त्यांना कसे दिसू शकले, हा चमत्कारच आहे. कारण नकारात्मक बघाय़चे असेल तर रस्तेही दिसायला नकोत ना? कोट्यवधी गावात खेड्यात शौचालये बांधली गेली वा हजारो खेड्यात प्रथमच वीजपुरवठा पोहोचला. त्याला विकास म्हणत नाहीत. सत्तर वर्षांनी गंगेच्या पात्रातून प्रथमच मालवाहू बोटीने मालाची नेआण चालू झाली. त्याला विकास म्हणत नसतात. थेट लोकांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा होऊ लागली, त्याला बहुधा पुरोगामी भाषेत भ्रष्टाचार म्हणत असावेत. लाखो ग्रीब घरात प्रथमच गॅस सिलींडर पोहोचला, त्याला विकास म्हणता येत नाही. कारण त्यातून गरीबी वा दारिद्र्याचे वाटप होत नाही. जिथे गरीबीत लोक खितपत पडलेले असतात आणि वर्षानुवर्षे तसेच नाडले जातात, त्याला पुरोगामी विकास म्हणतात ना? सत्तर वर्षात साधे चांगले रस्ते उभारले जाऊ शकले नाहीत, त्याला सप्तर्षी विकास समजतात. हा निकष असला, मग मोदींच्या काळात देश भकासच झालेला असणार ना? अर्थात स्पर्धा मोदींशी नव्हेतर केतकरांशी असल्याने व्यापक कारस्थान शोधल्याशिवाय त्यांचे निदान संपणार कसे? म्हणून सप्तर्षींनी लातूरात एक अत्यंत गोपनीय कथा पत्रकारांना सांगितली. ती अशी, मोदी प्रचंड मतांनी निवडून आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करण्यासाठी एका मुस्लिम तरुणाचा बळी घेतला. त्या घटनेपासून मी मोदींचा कट्टर विरोधक बनलो. आजवर कुणा मुस्लिम पक्ष वा नेत्यानेही ही धक्कादायक घटना सांगितली नव्हती. आपण सगळे मुर्ख लोक गोमांसाच्या वादातून एका मुस्लिमाची हत्या झाल्याचे ऐकून होतो. पण सप्तर्षींनी खास संशोधन करून विजयानिमीत्त मुस्लिमाचा बळी घेतला गेल्याचा गौप्यस्फ़ोट केलेला आहे. मात्र आपल्या संशोधनाची चो्री केतकरांनी करू नये, म्हणून बहुधा त्यांनी तो खुप दडवून ठेवलेला असावा. अन्यथा केतकरांनी आपल्या भाषणात व्यापक कारस्थानाचा भागामध्ये त्याही गोष्टीचा समावेश केला असता ना?

पण यातली गंमत वेगळीच आहे. मोदींचा विरोधक सप्तर्षी कधी झाले? मुस्लिमाचा बळी पडला म्हणून. यातला सूर असा आहे, की त्यापुर्वी सप्तर्षी जणू मोदीसमर्थक असावेत. विजयासाठी मुस्लिमाचा बळी पडला नसता, तर आजही सप्तर्षी मोदीभक्तच राहिले असते. पण ते त्यांना शक्य नव्हते. कारण त्यांना मोदी व संघाचा मोठा तीटकारा आहे. त्यात मोदी समर्थनाला कुठे जागाच नाही ना? पण मग विजयी झालेल्या पंतप्रधानाला विरोध कसा करायचा, असा प्रश्न पडला असावा. त्यातून मार्ग काढण्यासाठी बहुधा सप्तर्षींनी एका मुस्लिमाला विजयोन्मादात ठार मारले आणि मोदी विरोधासाठी त्यांचा मार्ग मोकळा झाला असणार. त्याचेही कारण आहे. अण्णा आंदोलनाला बाजारू ठरवून अध्यक्षीय शासनाचे भाकित केल्यावर सप्तर्षी सुप्तावस्थेत गेले. ते एकदम लोकसभा निवडणूका संपल्यावरच जागे झाले. बघतात तर काय? अण्णा बेपत्ता, केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झालेले आणि कॉग्रेसचा बोजवारा उडून भाजपाचे नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले. यातून आपली भूमिका नेमकी काय, त्याचा क्रॅश कोर्स त्यानी घेतला असावा. त्याच क्रॅशमध्ये मुस्लिमाचा बळी गेला असावा. पण देशाचे आणि एकूण पुरोगामी सनातन धर्माचे सुदैव, हे सुप्त ॠषी जागे झाले. तात्काळ त्यांनी देशाची व विविध राजकीय पक्षांची ग्रहदशा तपासली आणि मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नसल्याचे भविष्य वर्तवून टाकले. अर्थात आपलीच भविष्यवाणी खुद्द सप्तर्षीच गंभीरपणे घेत नाहीत. तर इतरांनी घेण्याचे काही कारण नाही. पण मनोरंजनाचा खजिना म्हणून त्याकडे बघण्याची सोय कशाला सोडायची? सध्या सिद्धू केतकरांच्या मागून सप्तर्षीही कॉमेडी सर्कसमध्ये सहभागी व्हायच्या मार्गावर असावेत. बरे होईल, कपील शर्मा या प्रतिभासंपन्न विनोदवीराची बारगळलेली कारकिर्द नव्याने आकारास येईल ना?

27 comments:

  1. वाह भाऊ.. शीर्षक एकदम समर्पक आहे.. दोन्ही कुमारांना एकत्रच सुमारपणा करायची हुक्की आलेली असावी.! :-p

    ReplyDelete
  2. भाऊ, कुमार केतकरांना राज्यसभेचे सदस्यत्व मिळाले तेव्हाच हे लक्षात यायला पाहिजे होते पण जरा उशिरानेच आले:

    बघा, मराठीत केतकरांच्या पूर्वी कुणी पत्रकार (तोही काँग्रेसी विचारांचा) झाला नाही असे नाही. विशेषतः टाईम्स वृत्तसमूहात तर ह्या विचारसरणीचे पीकच येत आले आहे. पण तरीही राज्यसभेवर (विधानसभेवर सोडून डायरेक्ट राजसभेवर) कुणाचा नंबर लागला नव्हता कधी. कारण मराठी माणसांना इतका "वट" नव्हता कधी दिल्लीत.

    बरे, असेही नाही कि केतकरांनी दिल्लीत राहून फार मोठे "नेटवर्किंग" केले. प्रामुख्याने म. टा. चे संपादक म्हणून ते मुंबईतच राहिले. तरीही आता त्यांची इतकी दिगंत कीर्ती कशी बरे झाली की त्यांना राज्यसभेची दारे उघडली?

    मला तर वाटते की ह्यामागे कारणे अशी: एक, हल्ली काँग्रेसचे निष्ठावान - नव्हे गांधी खानदानाचे निष्ठावान - खूप कमी राहिलेत. त्यामुळे कुमार आता डोळ्यात भरत चाललेत. दुसरे असे की हा पुरावा आहे की बदलत्या काळात काँग्रेस कडून संघटनात्मक कार्य शून्य असले तरी भाटगिरी हे मुख्य क्वालिफिकेशन प्रमाण धरण्यात येते. आणि तिसरे, कुमारांना लोकसभा किंवा गेला बाजार विधानसभा लढविण्याचे तिकीट द्यायला हरकत नव्हती पण या गृहस्थांना तितकी लोकप्रियता नाही, हे लक्षात घेऊन त्यांना राज्यसभेची खिरापत वाटण्यात आली.

    बरे, त्यांना दिलेले सदस्यत्व केवळ बक्षीस नाही, तर ही एक जॉब ऑफर आहे हे स्पष्ट आहे, कारण सदस्य झाल्याबरोबर CIA लाजेल अश्या तर्हेने कटकारस्थानांची उकल करण्याचा त्यांनी सपाटा लावलाय. षडयंत्र म्हणायचे तर मला हेच वाटते, की कुमारांसारखे अनेक देशी भाषीय हाताशी धरून त्याच्या तोंडाद्वारे सतत कुप्रचार करणे, हे नवीन धोरण सुरु झाले आहे असे वाटते.

    बरे, अपप्रचाराच करायचा तर किमान त्यात तरी थोडी कल्पकता दाखवायची. जसे अमेरिकेत डेमोक्रॅट पार्टी डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय रशियाच्या साहाय्याने झाला असे शाबीत करण्यात गुंतली आहे, त्या धर्तीवर ह्या उल्लू लोकांनी लगेच मोदींचा विजय परकीय शक्तींच्या सहकार्याने झाला असा शिमगा चालू केला आहे. ह्यात रशियाला शिव्या देता येत नाहीत कारण ह्यांच्या देवासमान असलेल्या नेहरू गांधींनी तर रशियाबरोबर मैत्री केली होती. म्हणून आता दुसरी शक्ती शोधणे आले. म्हणून मुजिबूर रहमान यांचे मारेकरी, आणि आणखी कोण कोण, यांच्या नावाने सुपीक कल्पनांचे पीक ही मंडळी काढत सुटली आहेत.

    ReplyDelete
  3. बर केलत भाउ एकेका पुरोगामियाचे खरे रुप उदा सहीत दाखवलेत अजुन खुप जण असेच तारे तोडतायत.मोदी PM झाल्यापासुन बरेचसे लोक राजकीय विश्लेषक झालेत पाठीराखे म्हनतायत की मुळचे काम करा पण कॅमेरा,लाइक्सची नशा काही औरच असते.

    ReplyDelete
  4. भाऊ प्रत्येक शब्द व वाक्य अर्थपुर्व आहे कमी शब्दात अर्थ पुर्ण वाक्य रचना शब्दसंग्रह तोही मराठी तुन असल्या शिवाय करता येत नाही मार्मीक टोले फक्त मराठीतच शक्य आहेत .

    ReplyDelete
  5. सणसणीत चपराक हाणलीत भाऊ तुम्ही

    ReplyDelete
  6. आणि हे "सुमार" सप्तर्षी,व्वा,आता मला खात्रीच पटली,मोदी पुन्हा पंतप्रधान होणार!!!

    ReplyDelete
  7. किती कौमार्यभंग कराल,भाऊ !!!!!!!!!!!!!!!!

    ReplyDelete
  8. सत्तर वर्षांनी गंगेच्या पात्रातून प्रथमच मालवाहू बोटीने मालाची नेआण चालू झाली.

    मोदी सरकारचे हे काम सर्वात जास्त आवडले.

    ReplyDelete
  9. झक्कास। अगदी बिन पाण्याने केली। आणि शलजोडी तून हणले। दोनीही सुमार विझलेले दिवे आहेंत। जेव्हा तेच स्वतःला गांभीर्याने घेत नसतील तर जनतेने तरी का घ्या वे।

    ReplyDelete
  10. दोन्ही कुमारांनी कुमारावस्था अजुनही ओलांडलीच नाही.म.टा . चा सत्यानाश करणारी विभूति म्हणुनच आम्ही केतकरांना ओळखतो.

    ReplyDelete
  11. असत्याग्रही विचारधारा आणि म्हातारे अर्क ...................सध्या सगळे तथाकथित समाजवादी ' बेकार ' आणि भणंग झाल्यामुळे त्यांच्या बुद्धीला ' गंज ' चढलेला आहे. लातूरमध्ये जाऊन आपल्या बुद्धीवर चढलेला गंज अशा प्रकारे खरडून टाकण्याचा हा केविलवाणा प्रयत्न ...या पलीकडे काय बोलणार. कोणी व्याख्यानाला बोलावत नाही तर स्वतःच कोठल्यातरी रंगमंचावर घुसून आपली ' ज्योतिषविद्या ' पोपटाप्रमाणे पाजळल्यासारखी वाटली.

    ReplyDelete
  12. नरेंद्र मोदींवर टीका करता येते. पण सप्तर्षींवर टीका करण्याची जरुरीच नाही. याचे उत्तर सप्तर्षी देऊ शकतात का?

    ReplyDelete
  13. Are Deva bhau vachtana jitke haslo titke fakt atre kiwa p l deshDeshp kiwa Shankar patil yanchya Katha vachtanach haslo

    ReplyDelete
  14. कट कारस्थान पण यांना सोईप्रमाणे दिसतात जसे कि मोदी..RSS... BJP..घटना बदलणार हे त्यांनी फार वर्षापासून सोडलं पिल्लु आहे.तसेच त्याना भिमा कोरेगाव चे नक्क्षलवाद्याचा कट कारस्थान दिसत नही.

    ReplyDelete
  15. भाऊ,अप्रतिम लिखाण,
    बहुतेक कुमार ह्या नावातच ही ,मूर्खपणाची जादू आहे.कितीतरी सुमार बुद्धीचे कुमार दिसतील,(कुमार विश्वास, कुमार सानू,इत्यादि).हे दोघेही मूळचे लालभाई,अगदी लाल कार्ड बाळगणारे. ह्यांच्या घरातच हे साम्यवादी बाळकडू सुरू झाले. ह्यांची पत्रकारिता संशयास्पद,प्रेत्येक ठिकाणी आगावूपणा केल्याने बाहेर पडावे लागले. कै.अशोक जैन अथवा कै अरुण टीकेकर ह्यांना ओळखून होते.
    “हो श्वान गादी वर बैसलेहे शोभे शिराला पगडी तुर्यााची “ हे दिवाण झीप्री ( लाडकी कुत्री) चे वर्णन ह्यांना योग्य आहे

    ReplyDelete
  16. अतिशयमुद्देसूद व अचूक मर्मभेद
    दोन्ही कुमार वस्तुस्थितीला जेव्हा सामोरे जातील तो सुदिन
    भाऊ असेच लिहीत राहा

    ReplyDelete
  17. चड्ढी न काढता नागडे केले आहे भाऊ तुम्ही

    ReplyDelete
  18. शेवटचा परिच्छेद वाचताना हसून हसून पुरेवाट झाली 😂😂😂😂

    ReplyDelete
  19. सुमार बुद्धीचे कुमार

    ReplyDelete
  20. जागा दाखवलीत भाऊ

    ReplyDelete
  21. केटकरांची खासदारकी केवळ याच्यासाठीच असेल की तुम्ही मोदींच्या विरुद्ध लेखणी चालवायची / जनमत तयार करायचे. सबब आता केटकरांची कार्य सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्याने सुरू झाले असे समजावे. पुढे येणाऱ्या काळात आणखी असेच काही आपल्याला ऐकला मिळेल असे वाटते.
    वा ! आपल्या ज्ञानात भर पडणार आहे !

    ReplyDelete
  22. भाऊ, एकदम कडक. यांची लक्तरं झकास वेशीवर आणलीत!

    ReplyDelete
  23. खूपच छान. हा अतिपुरोगामी लोकांवर, ललित भाषेत उत्तम लेख आहे. धन्यवाद. शेअरिंग

    ReplyDelete