Tuesday, April 1, 2014

रामाचे राज्य आणि वनवास



   आगामी लोकसभेच्या निवडणूकीत भाजपाने अनेक मोठ्या ज्येष्ठ नेत्यांना योग्य तो मान दिला नाही, असे सरसकट सांगितले जात आहे. दिसतेही तसेच आहे. पण ज्यांना ज्येष्ठ व जाणते म्ह्टले जाते, त्यांची  अवस्था अशी कशाला व्हावी, याचाही त्यांनी विचार करण्याची गरज आहे. त्यांच्यामुळेच भाजपाला इतके उर्जितावस्थेचे दिवस आले असते, तर त्यांना बाजूला टाकून त्या पक्षाला निवडणूकीला सामोरे जाणेच शक्य झाले नसते. आज ज्यांना अपमानित व्हावे लागल्याची तक्रार आहे, त्यांच्याकडेच मागल्या दोन सार्वत्रिक निवडणूकीत पक्षाची सर्व धुरा होती. त्यांनी संसदेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला कोणत्या थराला आणून ठेवले? यापैकी कुठल्याही ज्येष्ठ नेत्याला एकाद्या मतदारसंघात स्वबळावर निवडून येणे शक्य असेल, तर किंवा त्यांच्याच लोकप्रिय प्रतिमेमुळे आणखी आठदहा खासदार निवडून येणे शक्य असते; तर त्यांना असे बाजूला टाकणे पक्षाला परवडले असते काय? जसवंत सिंग असोत किंवा मुरलीमनोहर जोशी, लालकृष्ण असोत, त्यांनी पक्ष बांधला असे दावे आहेत. पण त्यांनाच कुठला खात्रीचा मतदारसंघ नाही. लोकसभेतील विरोधी नेत्या सुषमा स्वराज यांचा संघटनात्मक पाया कुठे आहे? केवळ उच्चपदी बसल्याने कोणी वरीष्ठ व ज्येष्ठ नेता होत नाही. जनमानसातील त्याच्या प्रतिमेचा लाभ पक्षाला मिळाला पाहिजे. तिथे असे भाजपाचे ज्येष्ठ नेते तोकडे पडले आहेत. म्हणूनच त्यांना बाजूला केल्यावर त्यांचा समर्थक, कार्यकर्ता कोणी तक्रार करायला पुढे आले नाहीत. किंबहूना संघटनात्मक पातळीवर नवे नेतृत्व उदयास येऊ नये, म्हणून दिल्लीच्या या बड्या नेत्यांनी केलेले दरबारी राजकारणच पक्षाला हानिकारक ठरलेले आहे. त्याची अनेक उदाहरणे देता येतील.

   मागल्या विधानसभा निवडणूकीपुर्वी जसवंत सिंग यांनी पक्षाची राजस्थानातील सत्ता टिकावी म्हणून कोणते कष्ट घेतले? मुख्यमंत्री असलेल्या लोकप्रिय नेत्या वसुंधराराजे शिंदे यांना सतावण्याचे उद्योग जसवंत सिंग यांनी केलेले नव्हते काय? ऐन निवडणूकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री व माजी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांच्या कारवायांनी भाजपाला राजस्थान गमावण्याची पाळी आली. नंतरही वसुंधराराजे हिरीरीने विरोधी नेत्याची जबाबदारी पार पाडत असताना तिथून त्यांना हुसकून लावण्याचे डावपेच कोणी खेळले होते? तब्बल तीन वर्षे वसुंधराराजे राजकारणातून बाहेर राहिल्या. अखेरीस पुन्हा राजस्थानातील पक्ष संघटनेला उभारी आणायला त्यांनाच बोलवावे लागले. त्यांच्याच मेहनतीने पुन्हा भाजपा सत्ता व प्रचंड बहूमत मिळवू शकला. त्यात जसवंत सिंग यांचे ज्येष्ठ म्हणून योगदान किती होते? गेले वर्षभर अडवाणी जसे पदोपदी मोदींना अपशकून करण्याचेच डावपेच खेळत आहेत, तसेच खेळ जसवंत मागल्या पाचसहा वर्षात राजस्थानात खेळलेले होते. त्यांना आजवर संभाळून घेतल्यावर आता पुन्हा मुख्यमंत्री झालेल्या वसुंधराराने यांनी ठरवून ही ‘अडचण’ दूर केली आहे. मागल्या आठदहा वर्षात दिल्लीत जी अडवाणी यांच्या विश्वासातली श्रेष्ठी मंडळी दिल्लीत कार्यरत होती, त्यांनी कोणते पक्षकार्य केले; तेही तपासून बघायला हरकत नाही. स्वत: कुठेही जाऊन संघटनात्मक बांधणी त्यापैकी कोणी केलेली नाही. पण राज्यपातळीवर जे नेते पक्षाचा व्याप व पसारा वाढवत असतात, त्यांच्यात बेबनाव भांडणे लावून खेळवणे, यापेक्षा काहीही अधिक केलेले दिसणार नाही. त्यातून मग मध्यप्रदेशात उमा भारती, कर्नाटकात येदीयुरप्पा किंवा उत्तरप्रदेशात कल्याणसिंग अशा तळागाळातून पक्षासाठी राबून आपले नेतॄत्व सिद्ध केलेल्यांचे खच्चीकरण, हेच अशा श्रेष्ठींचे काम राहिले आहे. त्यातूनच मग लोकसभेत पक्षाची सदस्यसंख्या खाली येत गेली.

   आज पुन्हा नव्याने भाजपाला उत्तरप्रदेशात उभारी आलेली आहे आणि त्याचे श्रेय मोदींचे निकटवर्ति अमित शहा यांना दिले जाते. त्यांनी अवघ्या सहासात महिन्यात तिथे जाऊन भाजपाची संघटना पुनरुज्जीवित केली, असेही म्हटले जाते. पण बारकाईने बघितल्यास शहा यांच्या सोबत सर्वत्र एक चेहरा अगत्याने दिसतो. तो आहे कल्याणसिंग यांचा. कलराज मिश्रा व लालजी टंडन अशा केवळ नेत्यांची सरबराई करण्यातून ज्येष्ठ झालेल्यांना बाजूला टाकून अमित शहा यांनी कल्याणसिंग यांना हाताशी धरले आणि पुन्हा त्या मोठ्या राज्यात भाजपाला तरतरी आलेली आहे. पण तो मुद्दा महत्वाचा नाही. आपल्या कारकिर्दीत भाजपाला ८० पैकी ५० हून अधिक जागा सातत्याने तिनदा जिंकून देणार्‍या कल्याणसिंगांचे खच्चीकरण कोणी केले? संघटनेतून त्यांना बाजूला करून दुय्यम कुवतीचे लोक पुढे आणायचे काम ज्यांनी दिल्लीत बसून केले; त्यांना ज्येष्ठ म्हणायचे कशाला? त्यांनी पक्ष उभारला म्हणजे काय? काहीजणांचे मतदारसंघ बदलून वा काहीजणांना घरी बसवून पक्षश्रेष्ठीच्या तावडीतून भाजपाला मुक्त करण्याची ही योजना असावी. ज्या श्रेष्ठींनी मागल्या दहा वर्षात उदयास येणार्‍या नव्या तरूण व मेहनती नेतृत्वाचे खच्चीकरण केले, त्यांनी पक्षाच्या बाहेर जाणे किंवा निष्क्रिय होणे, पक्षाला अधिक लाभदायक असेल ना? उपराष्ट्रपती पद उपभोगलेल्या भैरोसिंह शेखावत यांना लोकसभेची निवडणूक लढवण्य़ाचा मोह सुटू नये आणि त्यांच्याच वयात असलेल्या जसवंत वा अडवाणी यांना आजही तिकीटासाठी रुसून बसायचा हव्यास असावा; यातच त्यांच्या ज्येष्ठतेची केविलवाणी बाजू समोर येते. अशा माणसांचा अपमान वा अवमान कोणी करूच शकत नाही. तेच स्वत:च्या कृतीतून आपला अवमान करून घेत असतात. नव्या पालवीसाठी पानगळ आवश्यकच नसते का? तोच निसर्गनियम असतो ना? राम वनवासाला घाबरत नाही तेव्हा भरतालाही पादुका घेऊन राज्यकारभार करावा लागला, हे रामाचे राजकारण करणार्‍यांना कळू नये यातच सर्वकाही आले.

No comments:

Post a Comment