जसजसा शेवटच्या मतदानाचा दिवस जवळ येतो आहे, तसतसा एक वाद कमालीचा शिगेला पोहोचतो आहे. भाजपाने नरेंद्र मोदी या आक्रमक नेत्याला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केल्यापासून, तोच पक्षातील व देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेता असल्याचा दावा केला आहे. किंबहूना पंतप्रधान म्हणून तोच अधिक समर्थपणे देशाचा कारभार चालवू शकेल, अशी आग्रही भूमिका घेतलेली आहे. तर दुसरीकडे भाजपातही त्याविषयी एकवाक्यता नाही आणि बेबनाव असल्याचे आक्षेप घेतले गेलेले आहेत. पण प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आणि मोदींच्या आक्रमक झंजावाताने रौद्ररूप धारण केले. त्यानंतर मोदींच्या लोकप्रियतेची लाट आल्याचा दावा भाजपा करू लागला आणि तितक्याच आवेशात त्यांचा दावा खोडून काढण्याची स्पर्धा विरोधकात सुरू झालेली आहे. आता तर अर्ध्याहून अधिक जागांसाठी मतदान पुर्ण झाले असून अनेक मतदारसंघात मतदानाची टक्केवारीही वाढलेली आहे. त्यामुळेच इतरांना सुद्धा हा मोदीलाटेचा परिणाम आहे काय, अशी चर्चा करण्याची पाळी आहे. मग त्यांचे दावे प्रतिदावे सुरू झालेले आहेत. खुद्द पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपले मत देऊन झाल्यानंतर आसाममध्ये याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मोदीलाट वगैरे कही नसून माध्यमांनी तसा भ्रम निर्माण केला आहे, असे मनमोहन सिंग म्हणाले. इतर पक्ष व काही राजकीय जाणकारांनीही मोदीलाटेचा साफ़ इन्कार केला आहे. यातून मग सामान्य माणसाने काय समजावे? कारण जोपर्यंत मतमोजणी होऊन निकाल समोर येत नाही, तोपर्यंत या विवादाचा निचरा होणार नाही. पण म्हणून वाद घालणार्यांचे समाधान कसे व्हायचे? तर काही निकष असतात, इशारे व संकेत असतात. तेच लाट असल्यानसल्याची साक्ष देऊ शकतात.
मोदी वा अन्य कुठल्या नेत्याच्या लोकप्रियतेची लाट कशी ओळखावी, त्याच्या काही खुणा वा लक्षणे असायला हवीत आणि ती मान्य करूनच तपास करता येऊ शकेल. भाजपाने प्रचारासाठी व आपल्या पाठीराख्यांना उत्साहीत करण्यासाठी मोदीलाटेचे दावे केलेले असू शकतात. पण त्याकडे पाठ फ़िरवून तपासणी करता येऊ शकेल. समजा भाजपाने असा भ्रम निर्माण केलेला असेल. तर तो विरोधकांनी खोटाच पाडला पाहिजे. त्याचा सोपा उपाय म्हणजे विरोधकांनी आपल्या कृतीतून मोदीलाटेला आपण घाबरत नसल्याचे दाखवून दिले पाहिजे. तशी कृती अलिकडे एकदा तरी दिसली आहे काय? लाट म्हणजे बुडवणारा पाण्याचा लोंढा असतो. ती लाट नाकारून येणारा धोका टाळता येत नाही. त्यामुळेच अशी लाट येताना दिसली वा पाण्याची पातळी चढताना दिसली; म्हणजे तिच्या धोक्यात येणारी माणसे, गावे, वस्त्या कसे वागतात? लाटेने आपल्याला व मालमत्तेला जलसमाधी देऊ नये, म्हणून धावपळ सुरू करतात ना? लाटेला वा पुराला रोखण्याचे उपाय सुरू करतात ना? पूर रोखला पाहिजे, अशी भाषा बोलतात ना? त्यासाठी किनार्यापाशी आधीपासूनच तटबंदी उभारण्याच्या कामाला आरंभ करतात ना? त्यातली घाईगर्दी सहज नजरेत भरणारी असते ना? उलट अशी लाट वा पूर येतच नसेल, तर कोणीही धावपळ करून लाटेला रोखायची भाषा बोलत नाही, की तिच्या बंदोबस्ताला सज्ज होत नाही. मोदीलाटेच्या बाबतीतला अनुभव काय आहे? भाजपाने त्या लाटेवर स्वार व्हायचे ठरवले आहे. त्यामुळेच त्यांना लाट थोपवण्याचे भय नाही. पण उर्वरीत भाजपा विरोधकांचे काय चालले आहे? नुसते विरोधी पक्षच नव्हेत, तर विविध क्षेत्रात कार्यरत असलेले भाजपा-मोदी विरोधक भायभीत झाल्यासारखे मोदींना सत्ता मिळू नये म्हणून आकाशपाताळ एक केल्यासारखे वागत आहेत ना?
जे लोक मोदीलाट नाही म्हणतात, त्यांच्याच तोंडी काहीही करून मोदींना रोखण्याची, थोपवण्याची भाषा कशाला असावी? जी गोष्ट अस्तित्वातच नाही, तिला रोखण्याची भाषा चमत्कारीक नाही काय? बुद्धीमंत, साहित्यिकच नव्हेतर डाव्या सेक्युलर विचारांचे विविधक्षेत्रातील लोक राजकीय अलिप्तता सोडून यावेळी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्यासारखे मोदी विरोधात उतरावे, हे कशाचे लक्षण आहे? मोदीलाट वा तिच्यात वाहून जाण्याचा धोकाच संभवत नसेल, तर इतकी धावपळ कशाला? सोनिया-राहुल गांधीच नव्हेत तर प्रियंका गांधीही थेट मोदींवर हल्ले करीत आहेत. चित्रपट सांस्कृतिक क्षेत्रातील कॉग्रेसचे चहातेही मोदींना विरोध करायला कंबर कसून पुढे आलेले आहेत. इतकी तारांबळ कशाला व्हावी? जो धोकाच अस्तित्वात नाही, त्यापासून आपापला बचाव करण्यासाठी इतकी सार्वत्रिक सज्जता कशाला चालली आहे? एकप्रकारे मोदींच्या लोकप्रियता व लाटेचीच ती कबुली होत नाही काय? सगळ्या प्रचाराचा रोख कसा व कुठे आहे? जणू यावेळच्या निवडणूका सोळावी लोकसभा निवडण्यासाठी नाही. जणू पुढल्या पाच वर्षासाठी कुठल्या तरी पक्षाला बाजूला करून दुसर्या पक्षाला सत्तेवर आणण्याची ही निवडणूक नाही. कुठल्या व्यक्तीला पंतप्रधान करण्याचीही निवडणूक नसावी. तर नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीला पंतप्रधान होऊ द्यायचा नाही, एवढ्यासाठीच यावेऴचे मतदान होत असावे, अशीच एकूण परिस्थिती नाही काय? सव्वाशे वर्षे जुन्या कॉग्रेस पक्षापासून नवजात आम आदमी पक्षापर्यंत प्रत्येक राजकीय विरोधक मोदीला हरवण्यास सिद्ध झालेला आहे. तो केवळ एका मतदारसंघात मोदींना पराभूत करायला कटीबद्ध झालेला नाही, तर पंतप्रधान पदापासून वंचित करायला धडपडतो आहे. ते पद मिळायचे तर लोकसभेत २७२ किमान पाठीराखे निवडून आणणे नेत्याला भाग असते. ती कुवत मोदीत नसल्याची खात्री ज्यांना आहे; त्यांनी रोखण्याची भाषा अहोरात्र कशाला बोलावी? ती भाषा व त्यामागचे भयच मोदीलाट असल्याची कबुली नसते काय? नसेल तर या भयगंडाचे दुसरे कारण काय?
100 % true
ReplyDeleteमोदी लाट आहे या पक्षांना अगोदरच माहित होते म्हणून त्याची धावपळ चालू होती.
ReplyDelete