Wednesday, April 2, 2014

लाटेचे राजकारण म्हणजे तरी काय?



   आजकाल सर्वच भाजपावाले मोदींच्या लोकप्रियतेची लाट देशात असल्याचा दावा करत असतात. त्यातून त्यांना बहूमताचा पल्ला गाठणे सोपे आहे, असेच वाटत असावे. पण अन्य पक्षाचे नेते व पत्रकार मात्र त्यांच्या या दाव्याची खिल्ली उडवत असतात. प्रामुख्याने मतचाचण्य़ांची चर्चा असली किंवा वाराणशीसह बडोद्यातून मोदींच्या उमेदवारीचा विषय निघाला, की मोदी लाटेची टवाळी हमखास होते. पण अशा चर्चेत भाग घेणार्‍या किती पत्रकारांनी यापुर्वीच्या लाटेच्या निवडणूका अनुभवल्या आहेत? माझा १९७७चा या बाबतीतला व्यक्तीगत अनुभव सांगण्य़ासारखा आहे. तेव्हा आणिबाणीमुळे देशात कॉग्रेस विरोधी लोकक्षोभ धुमसत होता आणि चार पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्ष स्थापन केला होता. त्यातून एकास एक उमेदवार कॉग्रेस समोर टाकलेले होते. त्यात रायबरेली येथून इंदिराजींच्या विरोधात पुन्हा राजनारायण जनता पक्षाचे उमेदवार होते. प्रचाराच्या निमित्ताने ते मुंबईत आलेले होते. तेव्हा मी नवखा पत्रकार होतो म्हणायला हरकत नाही. माझा एक अनुभवी सहकारी नारायण पेडणेकर याच्यासह मी मुंबईच्या वरळी जांबोरी मैदानावर राजनारायण यांची भेट घेतली. ओघातच मी त्यांना रायबरेलीत काय होईल असे विचारले आणि क्षणात ते उत्तरले, ‘मै तो जीत चुका हू, बस्स मतदान बाकी है.’ त्या उत्तराने आलेले हसू मी लपवू शकलो नाही आणि कुठलाही राग न धरता राजनारायण म्हणाले, ‘हसो बच्चे, अभी तुम्हे राजनिती समझनी है.’ मग त्यांनी त्यांचे तर्कशास्त्र मला समजावले. ते असे.....

   लोकांचा इंदिराजींवर राग आहे. काहीही करून त्यांना इंदिरेला हरवायचे आहे. पण समोर एकच उमेदवार आहे, तो राजनारायण. आता इंदिरेला हरवायचे, तर राजनारायणला जिंकवावेच लागेल ना? भले लोकांना राजनारायण आवडत नसेल. पण इंदिरेला पाडण्यासाठी त्यांना तोच नालायक निवडावा लागतो. कारण त्याच्या नालायकीपेक्षा इंदिरा खतरनाक आहे, ही लोकधारणा आहे. मला ते तर्कशास्त्र पटले आणि मी तेव्हा दिलेली बातमी मला अजून आठवते. ‘अमेठीमुळे रायबरेली धोक्यात’. माझ्या त्या बातमीने अनेक ज्येष्ठ पत्रकार नाराज झाले, त्यांनी माझे कान उपटले. मलाही तो आगावूपणा वाटला. पण त्याक्षणी मला राजनारायण यांचे तर्कशास्त्र पटलेले होते, हे आजही नाकारणार नाही. नंतर ज्येष्ठाच्य दबावाखाली चुक मान्य केली, तरी मनातल्या मनात मला तसेच होणार हे पटलेले होते. दोन महिन्यांनी लोकसभा निवडणूकीचे निकाल लागले, तेव्हा माझी बातमी नेमकी ठरली होती. दोन्ही जागी मायलेकरांचा पराभव झाला होता. निवडणूकीत लाट असते म्हणजे काय, त्याचा तो धक्कादायक अनुभव होता. कारण कोणालाही इतकी उलथापालथ राजकारणात घडून येईल असे वाटले नव्हते. पण राजकीय अभ्यासक व पत्रकारांचा विश्वास जुन्या अनुभवाने जखडलेला असतो. त्यामुळे समोर घडणारा इतिहास त्याला स्पष्टपणे वाचताना अडथळा येतो. दिसते ते मनाला व अनुभवाला पटत नसते. इंदिराजींना त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभूत करणारी लाट असू शकते?

   हे समजून घ्यायचे, तर राजनारायण यांचे तर्कशास्त्र बारकाईने समजावे लागेल. इंदिराजींना पराभूत करायला लोक उतावळे झालेले होते. ती जनता पक्षाच्या लोकप्रियतेची लाट नव्हती. इंदिरा विरोधी लाट उसळलेली होती. त्यामुळे जो हमखास इंदिरा गांधींना सत्तेपासून बाजूला करू शकेल, त्याचा चेहराही न बघता लोकांनी भरभरून मते दिलेली होती. आज मोदींच्या लोकप्रियतेचा उल्लेख भाजपावाले करतात आणि तितक्याच आवेशात दुसरे त्याला विरोध करतात; तेव्हा त्यांची म्हणूनच कींव येते. त्यांना लाट म्हणजे काय त्याचाच थांगपत्ता नसावा, असे वाटते. पहिली गोष्ट म्हणजे मोदींच्या कारभाराचा देशभरच्या जनतेला कुठलाही अनुभव नाही. त्यामुळेच त्यांच्याविषयी आशाअपेक्षा असल्या, म्हणून त्यांच्या लोकप्रियतेची लाट असू शकत नाही. पण दुसरीकडे मागल्या पाचसात वर्षात कॉग्रेसने केलेल्या कारभाराला जनता विटलेली आहे आणि त्यापासून सुटायला उतावळी झालेली आहे. म्हणजेच कॉग्रेसची सत्ता संपवायला मतदार उत्सुक नक्कीच आहे. पण म्हणून तो मोदींनाच वा भाजपालाच मत देईल असे नाही. कारण समोर जनता पक्षाच्या काळाप्रमाणे एकमेव पर्याय नाही. म्हणूनच तो मतदार भाजपालाही नाकारणारच, असाही अर्थ होऊ शकत नाही. पर्याय म्हणून काय व कोण उपलब्ध आहे, त्यानुसार मतदार आपला कौल देऊ शकतो. तिथे भाजपा प्रभावी पक्ष असेल किंवा सरकार बनवू शकणार्‍या आघाडी पक्षाचा प्रभावी उमेदवार असेल, तर असा उतावळा मतदार त्याच बाजून कौल देऊ शकेल. मोदींनी मोठ्या धुर्तपणे आपल्या प्रचारातून व त्यांच्यावर एकतर्फ़ी होणार्‍या टिकेतून, आपणच एकमेव पर्याय असल्याचे चित्र उभे केले आहे. त्यामुळे ज्यांना लाटेचे राजकारण कळत नाही, ते हिरीरीने मोदींच्या लाटेची भाषा वापरतात किंवा दुसर्‍या बाजूचे तेवढ्याच आवेशात लाट नाकारतात.

   याचे एकमेव कारण म्हणजे लाट कधीच स्पष्टपणे जाणवत नाही, की दिसत नाही. अगदी अलिकडे बंगाल वा तामिळनाडूत किंवा राजस्थान, मध्यप्रदेशात विधानसभा निवडणूकीच्या मतचाचण्या घेऊनही लाटेचा मागमूस कुणाला लागला नव्हता. पण खरेच सरकारविरुद्ध लाट आहे काय, त्याचा सुगावा लागायची एक खूण आहे आणि ती मतदानात दिसू शकते. जर येत्या १० तारखेला पहिल्या फ़ेरीचे मतदान होईल तेव्हा सरासरीपेक्षा पाच ते सात टक्के मतदानात वाढ झाली, तर हमखास समजावे, युपीए सरकारच्या विरोधात मोठी लाट उसळलेली आहे. त्याचा लाभ भाजपा, मोदी वा अन्य प्रादेशिक पक्ष कसे उठवतात, ते निकालातूनच स्पष्ट होईल.

4 comments: