Saturday, April 19, 2014

विनाशकाले विपरीत बुद्धी


   आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू यांना ऐनवेळी पुन्हा एकदा दुर्बुद्धी सुचली आहे. विभाजन झालेल्या आंध्रप्रदेशच्या दोन्ही राज्यात निवडणूका होत आहेत. लोकसभा आणि तेलंगणासह सीमांध्र राज्य विधानसभांच्या निवडणूका व्हायच्या आहेत. त्यात भाजपाने तेलगू देसम पक्षाशी युती केलेली होती. दोन्ही पक्षांनी जागावाटपही उरकले होते. त्यापैकी ज्या जागा भाजपाच्या वाट्याला आलेल्या आहेत, तिथे त्यांनी कोणाला उमेदवारी द्यावी हा भाजपाचा विषय असतो. पण भाजपाच्या उमेदवारावर नायडू यांनी आक्षेप घेतला आहे. भाजपाने काही जागी दुबळे उमेदवार उभे केल्याने तोटा होईल, असा नायडूंचा दावा आहे. त्यातून मग दोन्ही पक्षातली आघाडी तुटण्याच्या बेतात आलेली आहे. वास्तविक नायडू यांचा आक्षेप दुबळ्या उमेदवारांना नसून एकाच भाजपा लोकसभा उमेदवाराच्या बाबतीत आहे आणि त्याला ऐतिहासिक संदर्भ आहे. भाजपाने तेलंगणातील राजमपेट येथून डी. पुरंदेश्वरी यांना उमेदवारी दिल्यामुळे नायडू अस्वस्थ झालेले आहेत. पुरंदेश्वरी अलिकडेच भाजपात सामील झाल्या. लोकसभेचे अखेरचे अधिवेशन संपण्यापर्यंत त्या कॉग्रेसमध्ये होत्या आणि केंद्रीय मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या. राज्य विभाजनानंतर जी पळापळ सुरू झाली, त्यात त्यांनीही कॉग्रेस सोडून भाजपाची कास धरली. या एकाच कारणास्तव नायडू अस्वस्थ झालेले नाहीत. पुरंदेश्वरी या कॉग्रेसी आहेत, यासाठी नायडूंचा आक्षेप नाही, तर त्या चंद्राबाबूंच्या मेहूणी लागतात, हीच खरी पोटदुखी आहे. कारण सासर्‍याला टांग मारून चंद्राबाबूंनी तेलगू देसम पक्ष बळकावला; तेव्हापासून सुरू झालेल्या भाऊबंदकीचे ह भांडण आहे. चंद्राबाबू ते स्पष्ट बोलत नाहीत इतकेच. पण यालाच विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात.

   १९९३ सालात दुसर्‍यांदा रामाराव यांनी आंध्रप्रदेशात बहुमताने सत्ता मिळवल्यानंतर पार्वतीअम्मा नावाच्या महिलेशी दुसरा विवाह केला. त्यामुळे त्यांचे सर्वच कुटुंबीय विरोधात गेले. कन्या व पुत्र सर्वांनीच रामारावांच्या विरोधात बंड पुकारले आणि आमदारांनी त्यांना साथ दिली. त्या बंडाचे नेतृत्व करून चंद्राबाबूंनी तेलगू देसम पक्ष आपल्या कब्जात घेतला होता. पुढे रामारावांचे निधन झाले आणि नायडूंनी बाकीच्या नातलगांना पद्धतशीर बाजूला केले. त्यामुळे रामाराव यांचे पुत्र-कन्या दुरावल्या आणि चंद्राबाबूंना धडा शिकवण्यासाठी त्यापैकी काहीजणांनी कॉग्रेसशी हातमिळवणी केली. त्यात पुरंदेश्वरी यांचाही समावेश होता. तेव्हापासून या दोघांमध्ये वैमनस्य चालू आहे. प्रामुख्याने चंद्राबाबूंचे दुखणे असे, की दहा वर्षे याच घरभेदी राजकारणाने त्यांना राजकीय वनवासात जाण्याची पाळी आली होती. पण अर्थातच केवळ घरभेदीपणाच त्याला कारणीभूत नव्हता. गुजरात दंगलीनंतर एनडीएमधला चंद्राबाबू हा पहिलाच नेता असा होता, ज्याने मोदींचा राजिनामा मागितला होता. त्यासाठी एनडीएमधून बाहेर पडण्याची घाई केली होती. आपल्या लोकप्रियतेच्या नशेत त्यांनी विधानसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणूकांचा जुगार खेळला होता. पण तो महागात पडला होता. कारण भाजपाच्या मदतीशिवाय लढताना त्यांचा दारूण पराभव झाला आणि कॉग्रेसनेते राजशेखर रेड्डी यांनी अन्य डाव्या पक्षांच्या मदतीने मोठा विजय मिळवला. तेव्हापासून नायडू राजकीय वनवासात गेले. मागल्या निवडणूकीतही त्यांना सपशेल पराभव स्विकारावा लागला होता. आता मोदींच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन यशाची चिन्हे दिसत असताना मतचाचण्यांची त्यांना झिंग चढलेली आहे. त्यातून मग त्यांनी भाजपाला अटी घालण्याचा धोका पत्करलेला आहे.

   मतचाचण्यात आधी नायडूंच्या पक्षाला मोठे यश मिळण्याची चिन्हे नव्हती. पण भाजपाशी युती झाल्यापासून एका महिन्यात चाचण्यांचे आकडे तेलगू देसम पक्षाला यश मिळण्याचे संकेत देत आहेत. पण ते यश मोदींच्या लोकप्रियतेसह भाजपाच्या मदतीवर अवलंबून आहे. अन्यथा जगन रेड्डीच्या पक्षाकडून नायडूंना मोठा पराभव सोसावा लागू शकतो. थोडक्यात घरच्या भांडणाच्या आहारी जाऊन नायडूंनी भाजपाशी आघाडी तोडण्याचा पवित्रा घेणे, म्हणजे २००४ सालच्या जु्न्या इतिहासाची पुनरावृत्ती ठरू शकते. कारण चंद्राबाबूंनी कधीच स्वत:च्या प्रतिमा वा लोकप्रियतेच्या बळावर मोठे यश आंध्रामध्ये मिळवलेले नाही. आधी त्यांनी सासर्‍याच्या यशावर आपली पोळी भाजून घेतली होती. त्यानंतर डाव्या मित्रपक्षांना सोबत घेऊन कसेबसे बहूमत जमवले होते. नंतरच्या काळात वाजपेयी सरकारला पाठींबा देऊन भाजपाच्या मदतीने सत्ता टिकवली होती. थोडक्यात स्वबळावर निर्णायक यश मिळवण्याची क्षमता त्यांनी कधीच सिद्ध केलेली नाही. असे असताना पुरंदेश्वरी यांच्याशी असलेल्या घरच्या भांडणाच्या आहारी जाऊन, आता हातातोंडाशी आलेल्या यशाला लाथ मारणे; म्हणूनच विपरीत बुद्धीचा नमूना म्हणावे लागते. याचे दुसरेही कारण आहे. तेलंगणा भागात त्यांचा फ़ारसा प्रभाव नाही आणि पुरंदेश्वरी तिथेच भाजपाच्या उमेदवार म्हणून लढत आहेत. त्यासाठी युती तोडली, तर सीमांध्र राज्यातही नायडू राज्यापुरते विधानसभेत यश मिळवू शकणार नाहीत. पण त्याच युती तुटण्याने त्यांचे प्रतिस्पर्धी जगन रेड्डी बलवान होतील आणि निकालानंतर भाजपाच्या गोटात जाऊन बसले, तर चंद्राबाबूंना पुन्हा राजकारणात आपल्या पायावर उभे रहाणे शक्य नाही किंवा तेलगू देसम पक्षाच जिर्णोद्धार होणे शक्य नाही.

No comments:

Post a Comment