Monday, April 21, 2014

डर के आगे जीत है

  प्रत्येक माणूस आपल्या बुद्धीनुसार विचार करत असतो. ही बुद्धी म्हणजे तरी काय असते? त्याचे आजवरचे अनुभव असतात किंवा त्याने इतरांचे अनुभव ऐकून आपले जे मत बनवलेले असते, त्यालाच बुद्धी म्हटले जाते. त्या बुद्धीच्या आधारे माणूस पुढल्या प्रत्येक गोष्टीचे आकलन करत असतो. पण जेव्हा त्याच्या बुद्धीला आकलन करता येत नाही, असा अनुभव त्याच्या वाट्याला येतो; तेव्हा बुद्धी तोकडी पडते. अशावेळी दोन मार्ग असतात. एक म्हणजे अशा अनाकलनीय गोष्टीविषयी त्याचे कुतूहल जागे होते आणि जितकी क्षमता आहे, त्यानुसार समोरच्या गोष्टीला समजून घेण्य़ाचा प्रयास माणूस करतो. दुसरा मार्ग असतो, त्या अनाकलनीय गोष्टीविषयी भय वाटणे. असे भय त्याला अंधंश्रद्धेकडे ढकलून देते. तिथे मग बुद्धी काम करीनाशी होते. आपली बुद्धी वापरून समोर दिसणार्‍या गोष्टीचा उलगडा करून घेण्यापेक्षा माणूस इतरांच्या अनुभव कथनाचे आंधळेपणाने अनुकरण करू लागतो. म्हणून त्याला अंधानुकरण किंवा डोळे झाकून दुसर्‍याच्या मतावर ठेवलेली श्रद्धा, म्हणून अंधश्रद्धा म्हणतात. मात्र कुठलाही बुद्धीवादी वा शहाणा माणूस स्वत: कितीही अंधश्रद्ध असला, म्हणुन ते उघडपणे मान्य करणार नाही. ही सामान्य माणसाच्या अंधश्रद्धेपेक्षा भीषण कडवी अंधश्रद्धा असते. कारण साधा माणूस त्याला त्याची चुक दाखवून दिली, तरी निरागस मनाने चुक मान्य करून सुधारणा करून घेतो. पण बुद्धीमंताचा मुखवटा लावून वावरणार्‍यांची गोष्ट वेगळी असते. अशी माणसे आपल्या अंधश्रद्धेलाच ज्ञान वा बुद्धीवाद सिद्ध करण्यासाठी युक्तीवादाच्या जंगलात शिरतात. कारण त्यांना आपली चुक कबूल करण्याच्याच भितीने ग्रासलेले असते. अशी माणसे कल्पनेच्या इतकी आहारी जातात, की भ्रमात भरकटू लागतात.

   सध्या देशात लोकसभेच्या निवडणूका होत आहेत आणि त्यात नरेंद्र मोदी हे भाजपातर्फ़े पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. मागल्या एक दिड वर्षात बहुतेक बुद्धीमंतांनी वा प्रामुख्याने सेक्युलर पुरोगामी म्हणवणार्‍या मंडळींनी, मोदींना भारतातील सेक्युलर जनता सत्ता देणारच नाही; अशी छातीठोक भाषा सातत्याने केलेली आहे. पण अलिकडे जसजसे मतदान होऊन चाचण्या व जनमताचे वारे स्पष्ट होऊ लागले; तसतशी या लोकांची भाषा बदलत चालली आहे. कालपर्यंत जे लोक राज्यघटना, लोकशाही, जनता यावर अढळ विश्वास दाखवत होती; तीच मंडळी आता मोदी सत्तेवर येण्य़ाच्या भयाने पछाडलेली दिसत आहेत. त्यांना लौकरच देशात मोदींची सत्ता येऊन हिटलरप्रमाणे फ़ॅसिझम आणला जाईल; अशी भयावह स्वप्नेही पडू लागली आहेत. मग त्याची चाहुल लागल्याचेही दावे केले जाऊ लागले आहेत. मोदी पंतप्रधान झाल्यास देश सोडून पळून जावे लागेल, अशी भाषा वर्षभरापुर्वी काही शहाण्यांनी केलेली होती, तेव्हा त्याबद्दल कोणी सेक्युलर विचारवंत आक्षेप घेत नव्हता. पण आज तशीच भाषा भाजपाच्या एका कुणा दुय्यम नेत्याने वापरली, तर त्यालाच फ़ॅसिझम येऊ घातल्याचा पुरावा ठरवला जात आहे. ज्यांनी सतत देश सोडून जाण्याची भाषा केली होती, त्यांनी कुठे जावे, त्याचे मार्गदर्शन तो दुय्यम नेता करतो, असे का वाटलेले नाही? जितके त्या भाजपा नेत्याचे शब्द आक्षेपार्ह आहेत; तितकीच देशातून परागंदा होण्याची भाषाही मुर्खपणाचीच होती. पण तसे झाले नाही. गुजरातच्या दंगलीबद्दल इतके काहूर माजवण्यात आलेले आहे. पण अजून तिथले ‘दंगलपिडीत’ मुस्लिम तिथेच वास्तव्य करून आहेत. त्यांना देश सोडून परागंदा व्हावे लागलेले नाही. उलट कॉग्रेसी सेक्युलर राज्यातही काही लाख काश्मिरी पंडीत वीस वर्षे विस्थापित म्हणून जगत आहेत. त्यासाठी कोणी फ़ारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला वा गुलाम नबी आझाद या मुख्यमंत्र्यांना फ़ॅसिस्ट म्हटले आहे काय?

   म्हणजे एक अनुभव समोर आहे. लक्षावधी लोक कुटुंबासह परागंदा झालेले आहेत. पण त्यांच्या अवस्थेला परागंदा म्हणायचीही तयारी नाही. पण गुजरातेत असे काहीही घडलेले नाही. तरी मोदी म्हणजे हिटलर, फ़ॅसिस्ट अशी जी समजूत या काही सेक्युलर बुद्धीमंतांनी करून घेतली आहे; तिच्या आहारी जाऊन त्यांना आतापासूनच देशात फ़ॅसिझम आल्याचे भय भेडसावू लागले आहे. समोरच्या वास्तवाची छाननी, तपासणी करायलाही त्यांची बुद्धी तयार नाही. त्यापेक्षा ऐकलेल्या भ्रामक गोष्टींच्या, कथीत कल्पनांच्या आहारी जाऊन बरळण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. यालाच अंधश्रद्धा म्हणतात. जिथे चिकित्सक शोधक बुद्धी कुंठीत होते आणि भ्रमांना सत्य समजून वर्तन केले जाते. जिथे बुद्धीला चिकित्सा करायची इच्छा उरत नाही आणि समजूतीच्याच अंधारात सुरक्षित वाटू लागते; त्यालाच अंधश्रद्धा म्हणतात. भूतबाधा झालेल्या व्यक्तीला तुम्ही कितीही समजावून सांगा, त्याच्यासमोर पुरावे हजर करा, त्याला भयमुक्त करता येत नाही. कारण समजूत हेच त्याच्यासाठी वास्तव असते. त्यामुळे तुम्हाला न दिसणारे भूत त्याला दिसत असते आणि भयभीत सुद्धा करीत असते. कुठल्या वस्तीत वा गावात भूतबाधा झालेली व्यक्ती वा अंगात आल्याने घुमणारा माणूस जे बरळतो, त्यापेक्षा फ़ॅसिझम वा हिटलरशाहीची सध्या चौफ़ेर सुरू असलेली भाषा; तीळमात्र वेगळी आहे काय? गुजरातसह कुठल्याही राज्यात भाजपा वा मोदींच्या वर्तनातून त्याची साक्ष तरी मिळते आहे काय? पण त्या माणसात अनेकांना मुसोलिनी, हिटलर दिसू शकतात. काही लोकांना कुणा बापूमध्ये साईबाबा वा विष्णूचे अवतार दिसतात. त्यापेक्षा असले मोदीग्रस्त किंचीत तरी वेगळे आहेत काय? शंकेला उत्तर असते. संशयावर उपाय नसतो.

No comments:

Post a Comment