Sunday, April 6, 2014

देशभरातील भाऊबंदकी



 कालपरवा़च एक नगण्य बातमी आली. सारण या बिहारच्या लोकसभा मतदारसंघातून साधू यादव या अपक्ष उमेदवाराने माघार घेतली आहे. एका अपक्ष उमेदवाराला किती महत्व द्यायचे, म्हणून ती बातमी फ़ारशी झळकली नाही. पण बारकाईने बघितले तर हा अपक्ष कोणी सामान्य माणूस नसल्याचे लक्षात येईल. साधू यादव हा माजी रेल्वेमंत्री व माजी मुख्यमंत्री लालू यादव यांचा मेहूणा आहे. माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा धाकटा भाऊ आहे. सारणमधून तो आपली बहिण राबडीदेवी यांच्याच विरोधात उभा रहाणार होता. तसा प्रयत्न त्याने भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठीही केला. पण त्याला दाद मिळाली नाही. लालूंनी आपले जुने लोहियावादी सहकारी मुलायम यांचे अनुकरण चालविले आहे. मागल्या दोन दशकात मुलायमनी आपल्या कुटुंबातल्या जवळपास सर्वांनाच राजकारणात आणून सत्तेवर पकड बसवली आहे. मुलगा मुख्यमंत्री, भाऊ मंत्री, दुसरा भाऊ राज्यसभेतील पक्षनेता. पुतण्या व सुन लोकसभा सदस्य; अशी लांबलचक यादी आहे. आणि हे लालू-मुलायम कोणाचे राजकीय वारस आहेत? ज्यांनी १९७७ सालात इंदिरा गांधींना रायबरेलीत पाडले होते त्याच राजनारायण यांचे हे चेले होत. कॉगेस व इंदिराजींवर घराणेशाहीचा पहिला आरोप करून त्यावरच राजकारण खेळणारा देशातला पहिला राजकीय नेता राजनारायण होते. आज त्यांचेच चेले व अनुयायी आपापल्या कुटुंबातच राजकारण सिमीत करू लागले आहेत. मात्र लालूंप्रमाणे मुलायमनी घरात भाऊबंदकी होऊ नये, याची पुरती काळजी घेतली आहे.

   पंजाबमध्ये तर पिता मुख्यमंत्री आणि पुत्र उपमुख्यमंत्री असे सत्तेचे वाटप आहे. त्यामुळे प्रकाशसिंग बादल यांच्या कुटुंबात बेबनाव निर्माण झाला. मुंबईसह बीडच्या चुलता पुतण्यातली जुगलबंदी पंजाबमध्ये बादल कुटुंबातही गाजलेली आहे. चुलता आपल्याला राजकारणात संधी देत नाही, म्हणून दिर्घकाल अकाली दलात काम केलेल्या पुतण्याने मागल्या विधानसभा निवडणूकीत वेगळी चुल थाटली. त्यामुळे अकालींची मते फ़ूटणार असे मानले जात होते. पण तिथल्या पुतण्य़ाने चुलत्याला दगा देऊन त्याचे काम सोपे केले. पुतण्याने अकालींची मते फ़ोडण्यापेक्षा कॉग्रेसच्याच मतात हिस्सेदारी केल्याने बादल सरकार बचावले. त्या पुतण्याच्या पंजाब पिपल्स पार्टीने खाल्लेल्या मतांमुळे कॉग्रेसचे डझनभर उमेदवार थोडक्या मतांनी पराभूत होऊन बादल सरकारला जीवदान मिळाले. ती चुक सुधारण्याचा प्रयास यावेळी कॉग्रेसने केला असून लोकसभेसाठी बादल पुतण्याला सोबत घेतले आहे. त्याच्याशी जागावाटप केले आहे. शेजारी हरयाणा नावाच्या राज्यानेही भाऊबंदकी खुप अनुभवली. देवीलाल तिथले वृद्ध राजकारणी. त्यांनी आपला वारसा ओमप्रकाश चौटाला य मुलाला सोपवला, म्हणून संतप्त झालेल्या रणजित बिंद्रा या मुलाने कॉग्रेसशी जवळीक केली होती. आता चौटाला तुरूंगात आहेत आणि त्यांचे पुत्र राजकीय आघाडी लढवत आहेत. पलिकडे जम्मू काश्मिरमध्ये शेख अब्दुला यांची तिसरी पिढी सत्ता भोगते आहे. शेखसाहेबांचे दिर्घकालीन वारस जावई गुलशहा म्हणून होते. जेव्हा सासरा निवृत्त व्हायची वेळ आली, तेव्हा आपण मुख्यमंत्री होऊ अशी गुलशहांची अपेक्षा होती. पण ऐनवेळी लंडनहून आपला दवाखाना गुंडाळून डॉ. फ़ारुख अब्दुल्ला मुख्यमंत्री पदावर बसायला हजर झाले आणि गुलशहा यांना बंडखोरी करावी लागली होती. कॉग्रेसच्या मदतीने त्यांना औटघटकेची सत्ता मिळाली देखील. पण लौकरच त्यांचे राजकारण कालौघात अस्ताला गेले.

   दक्षिणेत तामिळनाडूमध्ये दोन भावात जुंपलेली आहे. त्यात सर्वात जुना व मूळ द्रविडपक्ष द्रमुक रसातळाला जाण्याची वेळ आलेली आहे. करूणानिधींनी सत्ता व नेतृत्व हाती आल्यानंतर द्रमुकला घराण्याची मालमत्ता बनवले. आधी भाचा मुरसोली मारन, नंतर धाकटा पुत्र स्टॅलिन, त्यानंतर थोरला पुत्र अळागिरी व शेवटी लाडकी कन्या कन्नीमोरी हिला सत्तेवर आणून बसवले. आता त्याच भावंडांमध्ये पक्षाचा कब्जा मिळवण्यावरून हाणामारीचे प्रसंग आलेले आहेत. तोच प्रकार थोड्याफ़ार फ़रकाने बाजूच्या आंध्रप्रदेशात झाला. केवळ योगायोगानेच राजकारणात आलेल्या एन टी रामाराव यांचे जावई आधीपासून कॉग्रेस पक्षात मंत्रीपदी होते. पण १९८३ सालात सासर्‍याने सत्ता मिळवण्यापर्यंत या जावयाने कॉग्रेस सोडली नाही. सत्ता येताच त्याला पक्षनिष्ठेपेक्षा कौटुंबिक बांधिलकी आठवली. त्या जावयाचे नाव चंद्राबाबू नायडू. पुढे १९९४ सालात पुन्हा रामाराव मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी एक कार्यकर्ती लक्ष्मी पार्वती हिच्याशी दुसरा विवाह केला आणि कुटुंबातला कलह चव्हाट्यावर आला. जावई, मुली व पुत्रांनी रामाराव यांच्याविरोधात बंड पुकारले आणि त्यांनाच तेलगू देसम पक्षाच्या आमदारांनी साथ दिल्याने सगळा पक्षच नायडूंच्या हाती गेला. पुढे जावयाने सर्वकाही हडपल्याचे लक्षात आल्यावर दुसर्‍या मुली व पुत्रांनी तेलगू देसम सोडली. हल्लीच पुरंदेश्वरी नावाच्या एका केंद्रिय महिला मंत्री कॉग्रेस सोडून भाजपात गेल्या, त्याही रामाराव कन्याच होत. मुद्दा इतकाच, की बहुतेक भारतीय राजकीय पक्षांना हल्ली घराणेशाही व कुटुंब कलहाने पछाडलेले आहे. कॉग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाण्यात पहाणार्‍या त्यांच्याच जाऊबाई व भाजपा नेत्या मनेका गांधी यांच्यातले विकोपास गेलेले राजकारण, एका स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. उत्तराखंडाचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांना हल्लीच ‘खटल्यातून’ गवसलेला पुत्र, त्यांचा राजकीय वारस असल्याचे त्यांनी जाहिर करावे; यातच असल्या वारश्याची ‘किंमत’ लक्षात येऊ शकते.

No comments:

Post a Comment