सोमवारी पहिल्या फ़ेरीचे मतदान पार पडले आणि सोळाव्या लोकसभेची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पण तसे बघितल्यास अवघ्या सहा जागीच पहिल्या सिवशी मतदान पार पडले. त्यापैकी पाच जागा आसाममधल्या आणि एक जागा त्रिपुरामधली होती. थोडक्यात ज्याला इशान्य भारत म्हटले जाते, तिथेच हे मतदान झाले. सहसा या भागातल्या सहा राज्यातल्या राजकीय घडामोडीची एकूण राष्ट्रीय राजकारणात फ़ारशी दखल घेतली जात नाही. कारण तिथे स्थानिक पक्ष व कॉग्रेस वगळता कोणाचीच स्पर्धा नसते. अपवाद आहे तो त्यातल्या मोठ्या मानल्या जाणार्या आसाम राज्याचा. तिथे भाजपाचे थोडे बळ आहे. त्रिपुरामध्ये अवघ्या दोनच लोकसभेच्या जागा असून मागल्या सात आठ निवडणूकात मार्क्सवाद्यांनीच तिथे निर्विवाद विजय संपादन केला आहे. इतर पक्ष वा भाजपाच्या नेत्यांनी कधी त्या अन्य छोट्या राज्यात प्रचारासाठी वा संघटनेसाठी जाण्याचे कष्टही घेतलेले नव्हते. यावेळी प्रथमच भाजपाचे नेते नरेंद्र मोदी यांनी आसामच नव्हेतर मणिपुर, त्रिपुरा व अरुणाचल अशा राज्यात मोठ्या सभा घेण्यापर्यंत मजल मारली. मणिपुरमध्ये तर त्यांच्या सभेसाठी काही लाखांची गर्दी लोटल्याने कौतुकही झाले. त्याचे कारण असे, की विद्यमान पंतप्रधान मनमोहन सिंग राज्यसभेवर आसामचे प्रतिनिधी म्हणून निवडून येतात. पण आपल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत एकदाही त्यांनी इशान्येकडील राज्यात डोकावण्याची गरज मानली नाही. कदाचित त्यामुळेच पंतप्रधान पदाच्या उमेदवाराला बघायला लोकांची गर्दी लोटलेली असावी. त्याचा परिणाम कितपत होईल, याची जाणकारांनाही शंका होती. सोमवारच्या मतदानाचे आकडे त्याची चुणूक असतील काय? हे आकडे काही सांगतात काय?
आसाममध्ये पहिल्या फ़ेरीत ७५ टक्क्याहून अधिक मतदान झाले आणि त्रिपुरामध्ये ८५ टक्के मतदान झालेले आहे. यातील आसामच्या टक्केवारीला मोठे महत्व आहे. मागल्या २००९ च्या निवडणूकीत तिथे ६९ टक्के मतदान झालेले होते आणि यावेळी त्याच आसाममध्ये सहासात टक्के मतदान वाढलेले आहे. मतदार इतक्या उत्साहात कशामुळे बाहेर पडला त्याला महत्व आहे. या वाढत्या मतदानाला निर्णायक महत्व असते. नेहमीच्या सरासरीने मतदान झाले वा त्यापेक्षा कमी झाले, तर मतदानात निरुत्साह असेच बोलले जाते. पण मतदानाची टक्केवारी वाढते, तेव्हा मतदार बदल करू इच्छीतो असाही अर्थ लावला जातो. आसाममध्ये मागल्या तीन विधानसभा निवडणूका कॉग्रेसने जिंकल्या आहेत. याचा अर्थ तिथले मुख्यमंत्री तरूण गोगोई लोकप्रिय आहेत असा सरळ अर्थ निघतो. पण त्याचीच दुसरी बाजू अशी असते, की त्यांच्यासमोर आव्हान नसेल तर त्यांना वारंवार निवडणूक जिंकणे सोपेच असते. त्या विजयाला त्यांची लोकप्रियता मानणे ही स्वत:चीच फ़सवणूक असू शकते. आसामची स्थिती काहीशी तशीच आहे. सत्ता गमावल्यापासून आसाम गण परिषद नावाच्या स्थानिक पक्षाचे सतत विघटन होत गेले आणि पर्यायी म्हणून पुढे आलेल्या भाजपानेही तिथे पुरेसा जोर लावला नाही. त्यामुळेच जुन्या व संघटित कॉग्रेस पक्षाला प्रत्येक निवडणूकीत सोपा विजय मिळत गेला आहे. झुंजणारा प्रतिपक्ष व उमेदवार नसेल तर विरोधातला मतदार उदासिन होतो आणि त्याचा लाभ सत्ताधारी पक्षाला मिळत असतो. मागल्या सहा महिन्यांपासून मोदी यांनी स्थानिक भाजपाला उभारी देण्याचा व त्यासाठी तिथे मोठी सभा घेण्याचा प्रयास केला, त्याचाच फ़रक पडला असेल, तर वाढलेले मतदान सत्ताधारी कॉग्रेससाठी धोक्याची घंटा आहे.
यावेळी अकस्मात फ़ारसा प्रचार व रणधुमाळी नसताना सहासात टक्के मतदान वाढलेले आहे. असे मतदान वाढते त्याचा अर्थ ते विरोधात जाणारे मानले जाते. पण हा आसामपुरता विषय नाही. काल आणखी काही जागांसाठी मतदान झाले. तोच वाढणार्या टक्केवारीचा कल आजच्या ९१ जागी होणार्या मतदानात राहिला, तर मात्र ही निवडणूक ऐतिहासिक ठरण्याची ती चाहूल असेल. कारण आज चौदा राज्यातल्या ९१ मतदारसंघात मतदान व्हायचे आहे. हे मतांचे प्रमाण आसामप्रमाणेच उत्साहाचे व वाढीव असेल, तर त्याचा सरळ अर्थ केंद्रातील सत्तेच्या विरोधात लोकांच्या संतापाला मताच्या द्वारे वाट करून दिली जाते आहे. जेव्हा असे घडते, तेव्हा समोरचा पर्याय असेल तो स्विकारला जात असतो. तो पर्याय म्हणजे कुठलाही उमेदवार नसतो, तर ज्याच्यामार्फ़त देशाचे सरकार खंबीरपणे चालविले जाईल आणि स्थीर शासन केले जाईल, असा पर्याय लोक निवडतात. आपण तसाच निर्णायक पर्याय असल्याचे चित्र मोदी यांनी मागल्या सहा महिन्यात पद्धतशीरपणे उभे करण्याचा प्रयास केलेला आहे. म्हणूनच आसाममध्ये जो उत्साही मतदानाचा कल दिसला, तसा आजच्या मतदानात दिसला तर देशात परिवर्तनाची लाट आलेली आहे असे खुशाल समजावे. कारण कुठल्याही मतचाचणीपेक्षा आजच्या मतदानाचे आकडे सर्वाधिक प्रामाणिक असतील. कारण हे खरे मतदान आहे. त्यात मतदार मोठ्या उत्साहात बाहेर पडला व त्याने मागल्या वेळेपक्षा सहा आठ टक्के जरी अधिक मतदान केले; तरी त्याचा अर्थ तो सत्तेच्या विरोधातले मत नोंदवत असतो. त्याचा अर्थ असा, की जर आजही ७० टक्के इतके मतदानाचे प्रमाण राहिले तर खुशाल देशात मोदींच्या लोकप्रियतेची लाट आहे असे समजावे. आणि तसे घडले तर भाजपा व एनडीए स्वबळावर बहूमत नव्हे ३०० जागांचा पल्ला ओलांडू शकते, असाही त्याचा अर्थ होईल. म्हणूनच आज १० एप्रिलचे मतदान निर्णायक आहे. मोदी लाट आहे किंवा नाही त्याचा संकेत आज मिळणार आहे.
No comments:
Post a Comment