परवा कायबीइन लोकमत वाहिनीवर एक थक्क करून सोडणारी चर्चा ऐकायला मिळाली. त्या वाहिनीच्या हिंदी आवृत्तीचा राजकीय संपादक भूपेंद्र चौबे भाजपा प्रवक्ता विनय सहस्त्रबुद्धे यांना एक वाराणशीतली समस्या सांगत होता. तिथे चार लाखाच्या घरात मुस्लिम मतदार असून, त्यांच्या मनात मोदींविषयी भय आहे. मोदी तिथे निवडून आले तर काय होईल, अशा भितीने त्या मुस्लिमांना पछाडले आहे. त्यासाठी त्याने एक मजेशीर विरोधाभासी शब्दप्रयोग वापरला. ‘पर्सेप्शनल क्रेडीबिलीटी क्रायसिस’. मराठीत त्याचे रुपांतर सर्वसाधारणपणे संभ्रमातील विश्वासार्हतेचा पेच असे करता येईल. पर्सेप्शन म्हणजे कल्पनेतील बाब वा समजूत. ज्या समजूतीला कुठलाही आधार नसतो, तिला गैरसमज वा अंधश्रद्धा असे म्हणता येईल. अशा भितीपासून त्यांना मुक्त करण्यासाठी मोदी वा भाजपा काय करणार; असा त्याचा ‘आजचा सवाल’ होता. तेच सुत्र पकडून मग चर्चेचे संयोजक निखील वागळे कुमार केतकर या बुद्धीमंत संपादकांना विचारते झाले, ही तर वस्तुस्थिती आहे, त्याचे काय होणार? मग त्याही विद्वान संपादकांनी, ही मोठीच समस्या भाजपासमोर असल्याचे विवरण केले. पण मुद्दा असा, की ती भाजपासमोरची समस्या कशी असू शकते? कारण त्या राजकीय संपादकाच्या मते कुठल्याही परिस्थितीत मोदी तिथून निवडून येणारच आहेत. पण भयापोटी वा संभ्रमापोटी मुस्लिम त्यांना मते देणार नाहीत. पण त्या मुस्लिमांच्या मनात मोदींविषयी विश्वास नाही, त्यावर उपाय शोधायला हवा आहे. त्याची अपेक्षा चुकीची म्हणता येत नसली, तरी ती मोदी वा भाजपासाठी वाराणशी जिंकण्यासाठी समस्या नाही. कारण मोदी जिंकणार याची तोच गृहस्थ ग्वाही देत होता. मग समस्या काय आणि कोणासाठी, असा प्रश्न येतो, त्याचे उत्तर अर्थात चर्चेत विद्वान सहभागी असल्याने त्यांना शोधावेसेही वाटले नाही.
मुद्दा असा, की समजुत वा संभ्रमावर कोणता उपाय असतो? निदान चर्चेत सहभागी झालेले तमाम विद्वान डॉ. दाभोळकरांचे चहाते असल्याने अंधश्रद्धेवर मात कशी करावी, हे आम्ही त्यांना सांगायची गरज नसावी. माणसाला भ्रमातून वा अंधश्रद्धेतून मुक्ती द्यायची असेल, तर त्याच्या समजुती खोट्या पाडणे अगत्याचे असते. ते काम कोणी करावे अशी अपेक्षा आहे? ज्याच्याविषयी मनात भय असते, त्यानेच ते भय दुर करावे; अशी अपेक्षा करताच येणार नाही. समजा कोणाच्या मनात भूताचे भय आहे, तर भूतानेच समोर येऊन त्याविषयीचा भ्रम कसा दूर करायचा? सर्वसामान्य व्यवहारी जगात कुठलीही गोष्ट असणे वा नसणे, याचा निर्णय साक्षीपुरावे यांच्या आधारे होत असतो. विज्ञानाच्या जगात विविध सिद्धांत व सामान्य जीवनात न्यायालयात कायद्याच्या आधारे असे निर्णय होत असतात. मुस्लिमांच्या मनात मोदींचे भय कशामुळे आहे आणि ते कोणी निर्माण केले, असा प्रश्न येतो. आजवर माध्यमातून वा राजकीय आरोपबाजीतून जे ऐकले वा समोर आणले, त्यातून हा भयगंड त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. मोदी वा त्यांच्या कुणा सहकार्याने वाराणशी वा इतरत्र मुस्लिमांच्या मनात तशी भिती घातलेली नाही. उलट मोदींच्याच विरोधकांनी थरारक कथा व बातम्या रंगवून पेश केल्या. त्यातून हा भयगंड निर्माण झालेला आहे. अगदी नेमके सांगायचे, तर असल्या चर्चेत सहभागी होणार्यांनीच असा संभ्रम निर्माण करणार्या बातम्या व चर्चातून तो भयगंड मुस्लिमांच्या मनात निर्माण केलेला आहे. तेव्हा त्यापासून त्यांना मुक्त करायचे असेल, तर ती जबाबदारी त्याच थापाड्या सेक्युलर विद्वानांची आहे. पण आजही असे बुद्धीमंत व पत्रकार तितक्याच आवेशात मुस्लिमांना मोदींची भिती घालण्याचा उद्योग जोमाने करीत असतात.
काही महिन्यांपुर्वी देवबंद या मुस्लिम धर्मपीठाचे म्होरके मौलाना मदनी यांनी त्याची ग्वाही दिलेली होती. मोदींचे भय दाखवून मुस्लिमांची मते उकळायचा धंदा आता पुरे झाला, असे मत मदनी यांनी जाहिरपणे व्यक्त केले होते. त्याच्याही आधी त्याच पीठाचे मौलाना गुलाम वस्तानवी यांनी मोदींच्या प्रगतीबद्दल दोन शब्द चांगले बोलले, तर त्यांच्या विरोधात आघाडी उघडून त्यांची मुस्कटदाबी करण्यात हेच सेक्युलर आघा्डीवर होते. याखेरीज अनेक मुस्लिम पत्रकार व अभ्यासकांचे दाखले देता येतील. ज्यांनी म्हणून भारतातल्या मुस्लिमांच्या मनातून मोदींचे भय काढून टाकायचा प्रयास केला, त्यांची सेक्युलर लोकांनी मुस्कटदाबी केलेली आहे. आणि नेमके तेच लोक आता वाराणशीच्या मुस्लिमांच्या मनातले भय मोदी कसे कमी करणार; असा प्रश्न विचारतात, त्याचे नवल वाटते. की आम्ही भिती घालायचा उद्योग करू आणि तुम्ही भिती काढायचे काम करा; असे त्यांना म्हणायचे आहे? अंधश्रद्धा निर्मूलनाचे ढोल पिटणार्यांचा सर्वात पहिला रोख भिती घालणार्यांच्या विरोधात असतो. आणि त्यातच पुढाकार घेणारे इथे मोदींचे भूत दाखवून मुस्लिमांना घाबरवत असतात. पण त्यांची एक चमत्कारीक अपेक्षा असते. इथे मोदींनी म्हणजे या सेक्युलर विचारवंतांनी जे भूत व त्याची भिती निर्माण केली आहे, त्यानेच भूतबाधेतून मुस्लिमांना मुक्त करावे. हे कसे साध्य होईल? मोदींविषयीची काल्पनिक भिती यांनीच निर्माण केलेली असेल; तर त्यांनीच त्यापासून मुस्लिमांना मुक्ती देण्यात पुढाकार घ्यायला हवा. आता ती भिती काम करीनाशी झाली असून मुस्लिमही या सेक्युलर भोंदू भगतांपासून सावध होत चालले आहेत. किंबहूना त्या चर्चेमध्ये जो शब्दप्रयोग वापरण्यात आला, ती त्यांच्या खोटेपणाची कबुलीच आहे. गेल्या दहा वर्षात मुस्लिमांच्या मनात आपण सेक्युलर भितीचा संभ्रम निर्माण केला, याचीच ही कबुली नाही काय? कारण संभ्रमातील भय वा विश्वासार्हतेचा पेच ही शब्दावली त्यांचीच आहे.
मोदी लाटेचा १ परिणाम म्हणजे , हल्ली IBN लोकमत फारसे कोणी बघत नाही . मुठभर म्हातारे कोतारे युक्रांदीय व स्युडो सेक्युलर पणाचे फायदे मिळणारे लोकच ती वाहिनी बघतात . वागळे चा उतरता काळ सुरु झाला आहे . दाभोलकर हत्येनंतर फार उद्या मारत होता कि जणू सनातननेच दाभोळकर मारले .
ReplyDeleteअंधश्रद्धा निर्मूलनाचे ढोल पिटणार्यांचा सर्वात पहिला रोख भिती घालणार्यांच्या विरोधात असतो. आणि त्यातच पुढाकार घेणारे इथे मोदींचे भूत दाखवून मुस्लिमांना घाबरवत असतात. पण त्यांची एक चमत्कारीक अपेक्षा असते. इथे मोदींनी म्हणजे या सेक्युलर विचारवंतांनी जे भूत व त्याची भिती निर्माण केली आहे, त्यानेच भूतबाधेतून मुस्लिमांना मुक्त करावे. हे कसे साध्य होईल? मोदींविषयीची काल्पनिक भिती यांनीच निर्माण केलेली असेल; तर त्यांनीच त्यापासून मुस्लिमांना मुक्ती देण्यात पुढाकार घ्यायला हवा. आता ती भिती काम करीनाशी झाली असून मुस्लिमही या सेक्युलर भोंदू भगतांपासून सावध होत चालले आहेत. किंबहूना त्या चर्चेमध्ये जो शब्दप्रयोग वापरण्यात आला, ती त्यांच्या खोटेपणाची कबुलीच आहे"...
ReplyDeleteअगदी मर्मावर बोट ठेवलेत... भाऊ.