गेल्या आठवड्यापासून कुठल्याही वर्तमानपत्रात किंवा वाहिन्यांवर येणारी कॉग्रेस प्रवक्त्यांची मते खरी मानायची असतील, तर त्यांना आगामी लोकसभा निवडणूकीत कॉग्रेस पक्षाचे काय होणार याची किंचितही फ़िकीर नाही, असेच म्हणावे लागेल. कारण लागोपाठ येणार्या मतचाचण्य़ांच्या आकड्यात कॉग्रेसची जबरदस्त पिछेहाट होताना दाखवली जात आहे. पण त्यातून पक्षाला कसे वाचवायचे, याबद्दल कोणी कॉग्रेसवाला अवाक्षरही बोलत नाही. अनेक मतदारसंघात कॉग्रेसचे दिग्गज नेते निवडणूक लढवायलाही उभे नाहीत. काहीनी तर उमेदवारी मिळूनही मैदान सोडून पळ काढला आहे. यातून पक्ष कसा सावरायचा, याची कोणाही पक्षनिष्ठाला चिंता वाटायला हवी. कारण चाचण्यांचे आकडे कितीही नाकारले, तरी कॉग्रेसला पुन्हा सत्ता मिळत नाही हे आता प्रत्येक राजकीय जाणकारही मान्य करायला लागला आहे. किंबहूना या लोकसभा निवडणूकीनंतर कॉग्रेसचे भवितव्य काय, असेही प्रश्न विचारले जात आहेत. पण कॉग्रेस नेत्यांच्या बोलण्यात त्याबद्दल थोडीही चिंता नाही. उलट प्रत्येक कॉग्रेसवाला भाजपाच्या भवितव्याविषयी कमालीचा चिंतातूर दिसून येतो. त्याचे कारण नरेंद्र मोदी हेच आहे. या एका माणसाने भाजपा आपल्या मुठीत घेतला असून भाजपाच्या जुन्याजाणत्या नेत्यांना पक्षात काहीच स्थान उरलेले नाही, ही एकच भाषा सातत्याने कॉग्रेसवाल्यांकडून ऐकू येते आहे. हा अजब प्रकार नाही काय? भाजपाच कशाला, आता तर काही कॉग्रेसजनांना रा. स्व. संघाची सुद्धा मोठी फ़िकीर वाटू लागली आहे. मोदीसमोर भाजपा व संघ नामोहरम झालेत म्हणून नित्यनेमाने कॉग्रेसवाले अश्रू ढाळताना दिसतात. तेव्हा मोठेच नवल वाटते. ही पाळी भाजपा व संघावर कोणी आणली? त्याचा विचार कोणी करायचा?
मागल्या बारा वर्षात गुजरातच्या दंगलीचे निमित्त करून भाजपा व संघावर दुगाण्या कोणी झाडल्या? मोदी म्हणजेच संघ आणि गुजरातची दंगल म्हणजे हिंदूत्वाची प्रयोगशाळा असल्याचे आरोप कोण करीत होता? मोदींना त्या दंगलीसाठी ‘मौतका सौदागर’ किंवा सैतान म्हणून दाखवण्याचा ज्यांनी प्रयास केला त्यांनीच आजची मोदींची देशव्यापी प्रतिमा उभी केलेली नाही काय? किंबहूना ज्यांनी म्हणून सेक्युलर मुखवटे लावून मोदींना हिंदूत्वाचा सैतानी चेहरा म्हणून पेश केले; त्यातूनच आजचा नरेंद्र मोदी उदयास आलेला आहे. त्याचे असे भव्यदिव्य अक्राळविक्राळ रुप, संघ वा भाजपाने निर्माण केलेले नाही. तर माध्यमातल्या सेक्युलर पत्रकार, एनजीओचे मुखवटे लावलेले छुपे सेक्युलर आणि विविध सेक्युलर पक्षांनी बारा वर्षे जी मोदी विरोधी मोहिम चालविली त्याच अथक प्रयत्नातून हा नवा हिंदूहृदयसम्राट उदयास आलेला आहे. याच सेक्युलरांच्या दबावाला बळी पडून वाजपेयी व अडवाणी यांच्या नेतृत्वाखालचा भाजपा सेक्युलर मुखवटा लावत गेला. त्यातून संघ व भाजपाचा जो कार्यकर्ता व मतदार निराशाग्रस्त व उदासिन झालेला होता; त्याला हीच मोदींची प्रतिमा भावली आणि त्याला अडवाणी वाजपेयींसह संघाच्या नेतृत्वापेक्षा मोदीच प्रेषित वाटू लागला. त्यातच सेक्युलर नावाने जो सावळागोंधळ राज्यकारभारात कॉग्रेस पक्ष घालत गेला आणि त्याच गोंधळ अराजकाला सेक्युलर म्हणून बाकीच्यांनी डोक्यावर घेतले, त्यामुळे सैतान दाखवलेला मोदी सामान्यजनांना प्रेषित वाटू लागला. कारण ज्या भयंकर अनुभवातून लोकांना जावे लागले आहे, तोच सेक्युलर स्वर्ग असेल, तर मोदींचा हिंदुत्वाचा नरक परवडला, असे म्हणायची पाळी लोकांवर आली. तिलाच आज मोदींची लोकप्रियता म्हटले जात आहे. त्यातून भाजपा मोदींच्या मुठीत गेला आहे.
वाजपेयी अडवाणींना सेक्युलर व्हायला भाग पाडले गेले नसते, तर मोदीचा उदय होऊ शकला नसता, मोदींचा आडोसा घेऊन भाजपाला कोंडीत पकडले गेले नसते, तर भाजपाच्या सामान्य कार्यकर्ता व संघ स्वयंसेवकाला मोदींमध्ये आपला उद्धारक शोधायची वेळ आली नसती. जेव्हा सगळा कार्यकर्ताच मोदींकडे आशेने बघू लागला, तेव्हाच संघ वा भाजपाला मोदींपुढे शरणागती पत्करावी लागली आहे. आणि त्यात मोदींची शक्ती कोणती? तर कुठल्याही सेक्युलर दबाव वा टिकेला झुगारून मोदी आपल्या मूळ भूमिकेशी प्रामाणिक व ठाम राहिले. तिथेच भाजपा व संघ त्यांच्यापेक्षा बुटके होऊन गेले. कारण ज्या सेक्युलरांना खुश करण्यासाठी अडवाणी वाजपेयी स्वत:ला बदलत गेले, त्या सेक्युलरांनी त्यांना कधीच मान्यता दिली नाही. पण त्यांच्याविषयी संघ भाजपाच्या कार्यकर्ते व मतदारांचे प्रेम आटत गेले. त्याचीच उलटी प्रतिक्रिया म्हणून मोदींविषयीचे आकर्षण निर्माण झाले. त्यामुळेच आज ज्यांना भाजपा एका व्यक्तीभोवती कुंठीत झाल्याची चिंता वाटते आहे, त्यांनीच त्या राष्टीय पक्षाला मोदींचा अंकित केले; हे विसरता कामा नये. खरे तर मोदींच्या लोकप्रियतेमुळे भाजपाची स्थिती इंदिराजींच्या कॉग्रेससारखी झाली आहे. १९७० व १९८० च्या काळात कॉग्रेस म्हणजे इंदिरा नावाचे व्यक्तीमत्व, अशी स्थिती आलेली होती. भाजपाचेही आज तेच झाले आहे. तेव्हाही असेच इंदिरा कॉग्रेसला टिकेचे केंद्र बनवले गेले. पण लोकांनी इंदिराजींनाच साथ दिली होती. आज मोदींची अवस्था वेगळी नाही. म्हणूनच इंदिराप्रेमी सेक्युलर विचारवंत आणि कॉग्रेसजनांनी भाजपाची चिंता सोडून थोडे आत्मपरिक्षण करावे. इंदिराजींचा कालखंड आठवून थोडे अध्ययन करावे. मग त्यांना भाजपाची चिंता वा मोदींच्या लोकप्रियतेमुळे भयभीत व्हायचे कारणच शिल्लक उरणार नाही.
No comments:
Post a Comment