Monday, April 21, 2014

सेक्युलॅरिझमचा मृत्यूलेख?



   चार दशकांपुर्वी आमची पिढी जेव्हा पत्रकारीतेत नव्याने उमेदवारी करीत होती, तेव्हा ‘इंडीयन एक्सप्रेस’ इंग्रजी दैनिकात कुलदीप नैय्यर नावाचे ज्येष्ठ पत्रकार Between The Lines नावाचा एक साप्ताहिक स्तंभ लिहीत असत. तेच त्या दैनिकाचे संपादकही होते. मराठीत त्या स्तंभाच्या नावाचा अर्थ होतो. ‘ओळींच्या मधले’. आमच्या पिढीने ज्यांच्याकडून पत्रकारितेचे धडे गिरवले, त्यात नैय्यर एक होते. कारण तेव्हा आजच्याप्रमाणे पत्रकारांचे घाऊक उत्पादन काढणार्‍या पत्रकारितेच्या शिक्षणसंस्था उदयास आलेल्या नव्हत्या. त्या स्तंभाच्या नावातच पत्रकारितेचे गुढ सामावलेले होते. ओळीमधले म्हणजे ज्या लिहिलेल्या व छापलेल्या ओळी असतात, त्यांच्या अक्षरांमध्ये जी मोकळी जागा सुटलेली असते, त्याच पोकळीत बातमी दडलेली असते. सामान्य वाचक अक्षरांच्या ओळी वाचतो. पत्रकाराला त्या अक्षरांच्या व ओळींच्या पोकळीत सामावलेली बातमी वाचता व शोधता आली पाहिजे. आज त्या जुन्या आठवणी चाळवल्या, त्याही इंडीयन एक्सप्रेस व त्याच्या संपादकामुळेच. आज त्या वृत्तपत्राचे संपादक आहेत आमच्या पिढीत ज्येष्ठ झालेले शेखर गुप्ता. आपण त्यांना अनेक इंग्रजी व हिंदी वाहिन्यांच्या चर्चेत सहभागी होताना बघत असतो. खास करून एनडीटिव्ही या वाहिनीच्या मतचाचण्यांच्या कार्यक्रमात गुप्तांचा समावेश असतोच. तर त्याच संदर्भात शेखर गुप्ता यांनी शनिवारी एक प्रदिर्घ लेख लिहीला आहे. त्याचे शिर्षकच चकीत करून सोडणारे आहे. ‘राष्ट्रहित: सेक्युलॅरीझम मेला आहे’.

   भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या कडव्या टिकाकारामध्ये ज्या सेक्युलर विद्वानांचा समावेश होतो, त्यात गुप्तांचे नाव अग्रभागी आहे. मग त्यांनी अशा शिर्षकाचा लेख कशाला लिहावा? त्या लेखाचा संदर्भच मोदींच्या लोकप्रियतेची लाट व त्यामुळे सेक्युलर गोटात उडालेली घबराट असा आहे. गुप्ता म्हणतात, मतचाचण्या वर्तवित आहेत, तसेच उद्या निकाल लागले आणि मोदी यांच्या हाती सत्ता गेलीच; तर सेक्युलॅरिझमचे मृत्यूलेख लिहीणार्‍याची झुंबड उडेल. असे त्यांना का वाटते आहे? तर देशातल्या मोजक्या नामवंत लोकांनी सह्या केलेले धर्मनिरपेक्षता बचावाचे आवाहन गेल्या आठवड्याच्या अखेर प्रसिद्धीस देण्यात आले. त्यातून मोठीच खळबळ बुद्धीमंतांच्या जगात उडालेली आहे. आजवर मोदींना रोखण्यासाठी सेक्युलर समाजसेवक व राजकीय पक्षच पुढे सरसावले होते. त्यांना मागे राहून पाठींबा देणारे विविध क्षेत्रातले मान्यवर राजकीय भूमिका सहसा घेत नसत. आता अर्ध्या मतदारसंघातील मतदान पुर्ण झाल्यावर आणि अनेक चाचण्य़ांनी मोदींना सत्तेचा मार्ग खुला होत असल्याचे दाखवल्यावर; हे मान्यवर चव्हाट्यावर आलेले आहेत. पण त्यांच्या याच आवाहनामुळे गुप्ता वैतागलेले आहेत. त्यांनी असल्या सेक्युलर लढवय्यांच्या डोक्यावरच मोदींच्या वाटचालीचे खापर फ़ोडले आहे. बोलघेवडेपणा, वाचाळता व भेकडपणा यांनी ग्रासलेल्या अशा वर्गानेच मोदींना इतक्या यशाच्या जवळ आणून ठेवले, असा दावा करताना गुप्ता काय म्हणतात? याच आळशी, भेदरट व अन्याय्य, पक्षपाती अनुदारमतवाद्यांनी सेक्युलॅरिझमचे अधिक नुकसान केले आहे. त्यामुळेच त्यांचा उदारमतवाद, सहिष्णूता, लोकशाही आणि देशातल्या संवैधानिक संस्थावरही विश्वास उरलेला नाही. मोदी जिंकणार व त्यांच्या हाती सत्ता जाणार, म्हणजेच सेक्युलॅरीझम संपला, असा आक्रोश सुरू झाला आहे. मग उद्या ते घडेल, तेव्हा हे लोक त्याच धर्मैरपेक्षतेचा मृत्यूलेखही लिहून मोकळे होतील.

   सत्तांतराने देशाची घटना जमीनदोस्त होईल असे ज्यांना वाटते, त्यांनी भयभीत होणे स्वाभाविक आहे. पण त्यांच्या भितीवर गुप्ता यांनी इतक्या घाईगर्दीने ताशेरे कशाला झाडावेत? गुप्ता यांनी चार आठवड्यांनी मतमोजणी होऊन निकाल समोर येण्य़ापुर्वी असा लेख लिहून आपल्याच सेक्युलर सहकार्‍यांच्या विरोधात तोफ़ा डागण्याची घाई कशाला करावी? बातमी तिथेच तर दडली आहे. गुप्ता यांच्या लेखाच्या ओळी व अक्षरे बारकाईने वाचली व तपासली, तर निकालाची प्रतिक्षा त्यांनी कशाला केलेली नाही, त्याचे रहस्य उलगडते. गुप्ता म्हणतात, ‘मागल्याच आठवड्यात एनडीटिव्ही वाहिनीच्या चर्चेत भाग घेताना मी असे म्हणालो होतो’. ते काय म्हणाले तो वेगळा विषय आहे. तो कार्यक्रम मतचाचण्यांचे आकडे व त्यावरील उहापोह करणारा होता आणि त्याचे आयोजन प्रणय रॉय यांनी केलेले होते. रॉय यांनीच पस्तीस वर्षापुर्वी भारतात मतचाचण्यांचे युग सुरू केले आणि त्यांनी काढलेले निष्कर्ष खरे ठरू लागले, म्हणून माध्यमात चाचण्य़ांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. ज्या चर्चेत गुप्ता सहभागी झाले, ती एकमेव चाचणी अशी आहे, की त्यात मोदीप्रणित आघाडीने थेट बहूमताच्या आकड्यापर्यंत मजल मारलेली आहे. सव्वाशे जागांचे मतदान पुर्ण झाल्यानंतर सादर झालेल्या या चाचणीत प्रणय रॉय मोदींना बहूमतापर्यंत घेऊन जातो, तेव्हा भाजपाचे मोदी सरकार नक्कीच येऊ घातले आहे, याविषयी गुप्ता यांची खात्री पटलेली आहे. हीच त्या लेखाच्या ओळी वा अक्षरांच्या पोकळीत दडलेली बातमी आहे. मात्र गुप्ता तसे स्पष्टपणे सांगत नाहीत. तर जे होणारच आहे, त्यासाठी बोलघेवड्या सेक्युलर नेते व बुद्धीमंतांनीच मोदींना कसे सत्तेपर्यंत आणले त्याबद्दल संताप व्यक्त करीत आहेत. किंबहूना आता तरी निष्क्रीय वाचाळता बंद करायचे एकप्रकारे आवाहन करीत आहेत. त्यांच्या म्हणण्यात तथ्य नक्कीच आहे. मी मागल्या दोन वर्षात मोदींचा जो राजकीय क्षितीजावर उदय झाला, त्याचे श्रेय सातत्याने सेक्युलर पोपटपंचीलाच देत आलो आहे. कारण याच पोपटपंचीने मनमोहन सिंग यांचा नाकर्तेपणा व युपीएच्या अराजकावर उपाय म्हणून मोदींकडे बघायची वेळ भारतीयांवर आणली. त्यांनी सेक्युलर विचारधारेचे शुद्धीकरण करण्याचे कुठले प्रयास केले नाहीत, पण घोटाळे व भ्रष्टाचार म्हणजेच सेक्युलर, असे विकृत चित्र निर्माण करायला हातभार लावला. आणि आता तितक्याच घाईगर्दीने हेच वाचाळ सेक्युलॅरिझमचा मृत्य़ूलेखही लिहीतील, असे म्हणूनच गुप्ता म्हणतात.

http://indianexpress.com/article/opinion/columns/national-interest-secularism-is-dead/

No comments:

Post a Comment