Tuesday, April 22, 2014

जाहिरातबाजीची निवडणूक



  लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या मतदानाला आता दोन आठवडे होत आले आहेत आणि साधारण तितकेच दिवस भाजपा हा एकखांबी तंबू झाल्याची टिका कॉग्रेसने सुरू केल्याला झाले असावेत. आजवरच्या निवडणूकांमध्ये प्रत्येक पक्षाने आपल्या आश्वासने किंवा नेतृत्वाच्या गुणवत्तेचे कौतुक करणार्‍या जाहिराती केल्याच होत्या. पण आजच्या कालखंडात जितक्या प्रमाणात जाहिरातीचा प्रभाव पडलेला दिसतो आहे; तितका आजवर कधीच दिसला नव्हता. कदाचित ही पहिलीच भारतीय निवडणूक अशी म्हणता येईल, की ज्यावेळी एखादा माल वा उत्पादन म्हणावे; त्याप्रमाणे पक्षाचे नेते किंवा भूमिका मतदार ग्राहकाला जाहिरातबाजीतून विकायचा प्रयास होतो आहे. त्यामुळेच कॉग्रेसने भाजपाला एकखांबी तंबू कशाला म्हणावे, त्याचा हेतू समजून घेणे अगत्याचे ठरावे. तसे बघितल्यास कॉग्रेस पक्षातही सोनिया किंवा राहुल हेच नेते असून त्यांच्याच इशार्‍यावर सर्व सुत्रे हलत असतात. म्हणजेच त्याही पक्षाला एकखांबी तंबूच म्हणावे लागेल. पण तोच पक्ष केवळ पंतप्रधान पदाचा उमेदवार पुढे केला, म्हणून भाजपावर उलटा आरोप करतो आहे. तोच आरोप कॉग्रेसवर होऊ शकतो, याची पुर्ण जाणीव असूनही असा आरोप सातत्याने कशाला व्हावा? त्याचे कारण भाजपाच्या जाहिरातबाजीत दडलेले आहे.

   ‘अबकी बार मोदी सरकार’ अशी भाजपाच्या जाहिरातीची घोषणा आहे. त्यामुळेच त्यात भाजपाचे नावही नाही, याची टवाळी केली जात आहे. त्याचे कारण आपल्यापाशी कर्तबगार व उत्तम प्रशासक नेता आहे, असेच भाजपाला सुचवायचे आहे. पहिल्या दिवसापासून भाजपाच्या प्रचाराचे तेच सुत्र आहे. मोदी म्हणजे दुर्दम्य आशावाद; असे चित्र त्यातून मतदारापुढे उभे करण्याची योजना त्यामागे होती. त्यालाच इंग्रजीमध्ये ब्रॅन्डींग असे म्हणतात. एक घोषणा व त्यातले मोजके शब्द, अनेक प्रकाराने जनमानसात बिंबवले जातात, की लोकांना त्याची भुरळ पडू लागले. अर्थात नुसत्या जाहिरातीने लोकमत जिंकता येत नसते. २००४ सालात भाजपाने अशीच ‘इंडिया शायनिंग’ जाहिरात केलेली होती. ती साफ़ फ़सली. मग आताची मोदींची जाहिरात लाभदायक ठरेल, याची हमी कशी देता येईल? त्याचे उत्तर ब्रॅन्डींगमध्ये आपल्याला सापडू शकते. जाहिरातीने लोकांच्या मनात कुतूहल निर्माण करता येते. तिकडे लोकांचे लक्ष वेधून घेता येते. पण जेव्हा लोक त्या व्यक्ती वा उत्पादनाकडे वळतात; तेव्हा त्यांनाही त्यात ‘दम’ असल्याची जाणिव व्हावी लागते. जाहिरातीमुळे फ़सलो नाही, अशी लोकांची धारणा असावी लागते. गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून जे काही काम मोदींनी केले आहे, त्याची जोड देत मोदी आपली भाषणे करीत असतात. दुसरीकडे युपीए कारभारामुळे गांजलेल्या जनतेच्या मनात आशा निर्माण करीत असतात. त्या आशा पुर्ण करायच्या तर ‘मोदी सरकार’ हवे; अशी समजूत आपोआपच तयार होत असते. मग ती अपेक्षा पुर्ण करायची, तर लोकांनीच आपले मत मोदींच्या झोळीत टाकावे आणि त्याला सुरूवात करावी, असे अपरोक्ष सुचवलेले असते. जाहिरातीचा परिणाम त्यातून साधला जाऊ शकतो.

   सत्ता आपल्या हाती दिल्यास आपण काय केले, त्याची चुणूक मोदी गुजरातच्या घडामोडीतून सुचीत करतात. नेमकी त्याच्या उलटी परिस्थिती कॉग्रेस पक्षाची आहे. मोदींपेक्षा अधिक आकर्षक आश्वासने राहुल गांधी आपल्या भाषणातून देताना दिसतात. पण त्यांच्याच पक्षाकडे दहा वर्षे सत्ता असूनही त्यापैकी काय झाले, असा प्रश्न आपोआप निर्माण होतो. कारण विद्यमान कॉग्रेस सरकारच्या घोटाळे व भ्रष्टाचाराच्या कहाण्यांनी मागली तीन वर्षे गाजलेली आहेत. सहाजिकच कॉग्रेसच्या जाहिराती व राहुलची आश्वासने; यांच्याशी अनुभव जुळत नाहीत. तिथे जाहिरातीचा पराभव होतो. दहा वर्षात आपण जनतेसाठी काय केले, त्याची जंत्री जाहिरातीमध्ये आहे आणि राहुलही भाषणातून सांगतात. पण त्यावरील खर्चाचे आकडे सांगून भागत नाही. त्या योजना व धोरणांचा अंमल आणि त्याचा जनतेला आलेला अनुभव मोलाचा असतो. तिथेच कॉग्रेसच्या जाहिरातींची फ़सगत होते. त्यांच्या अपयश व त्यातून आलेल्या भ्रमनिरासावर मोदी स्वार झालेले आहेत. तिथेच ब्रॅन्डींग प्रभावी ठरत असते. पाच वर्षाच्या सत्तेनंतर ‘शायनिंग इंडीया’ जनतेच्या अनुभवाला येत नव्हती. म्हणून दहा वर्षापुर्वी भाजपाची जाहिरातबाजी फ़सली होती. नेमकी त्याचीच पुनरावृत्ती आज कॉग्रेसच्या बाबतीत होत आहे. आम्ही गरीबांसाठी केले आणि गरीबांसाठीच पुढेही खुप काही करणार आहोत; ह्या आश्वासनांनी म्हणूनच मतदार प्रभावित होऊ शकलेला नाही.

   पण अशा जाहिरातबाजीचा लाभ भाजपाला मिळू शकणार असला, तरी त्याचा धोकाही फ़ार मोठा आहे. ज्या प्रकारची लोकप्रियता अशा ब्रॅन्डींगमधून मोदींनी संपादन केलेली आहे; त्यातून त्यांनी सामान्य जनतेच्या मनात अभूतपुर्व अपेक्षाही निर्माण केलेल्या आहेत. तुम्ही बारकाईने मोदींची भाषणे ऐकली; तर आज भेडसावणारे बहूतेक प्रश्न व समस्या सोडवणे अशक्य अजिबात नाही, असाच त्यांचा एकूण सुर असतो. त्यामुळेच युपीएच्या निष्क्रीयतेला कंटाळलेला मतदार त्यांच्याकडे आकर्षित होतो आहे. पण म्हणूनच ‘मोदी सरकार’ येताच अल्पावधीत मोठाच चमत्कार घडेल; अशी अपेक्षाही त्यातून तयार होते आहे. त्यामुळेच मग पहिल्या वर्षभरात मोदींना खुप काही परिणामकारक बदल घडवून दाखवावा लागणार आहे. राजकीय गुंतागुंत व साठमारीतून मोदी त्या अपेक्षा कितीशा पुर्ण करू शकतील? नाही तर तोच मतदार जाहिरातीने फ़सलेल्या ग्राहकासारखा संतापून उलटण्याचा धोकाही मोठाच आहे.

No comments:

Post a Comment