Thursday, April 10, 2014

वाराणशी अमेठीच्या लढतीचा विचका


   अखेर कॉग्रेसने वाराणशीमध्ये आपला उमेदवार जाहिर केला आहे. अजय राय नावाचा हा उमेदवार तसा फ़ारसा प्रसिद्ध नाही. पण योगायोगाने तोच एकमेव स्थानिक उमेदवार म्हणावा, अशीही वस्तुस्थिती आहे. वाराणशी हा मतदारसंघ पुर्वीपासून भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. तिथून पक्षाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी निवडून आलेले होते. पण त्यांना कानपूरला पाठवून वाराणशीतून मोदींना उभे करण्याचा निर्णय भाजपाने घेतला. नरेंद्र मोदी हे भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. त्यांना गुजरातमधून निवडून येणे सहजशक्य आहे. पण उत्तरप्रदेशमधून पक्षाला अधिक जागा मिळवायच्या असल्याने आपल्या आक्रमकतेचे प्रदर्शन घडवण्यासाठी मोदींना वाराणशीत आणले गेले. त्याचे खरे कारण पुर्व उत्तरप्रदेशमध्ये ४० जागा याच वाराणशीमुळे प्रभावित होतात. शिवाय भोवताली असलेल्या अनेक जागांवर मोदींचा प्रभाव पडेल, असा त्यामागचा हेतू आहे. पण त्याच कारणास्तव वाराणशी मोक्याचा मतदारसंघ झाला. प्रसिद्धीसाठी मोदींच्या विरोधात लढण्याची आधीपासून डरकाळी केजरीवाल यांनी फ़ोडलेली असल्याने त्यांनीही तात्काळ मोदींना वाराणशीत जाऊन पराभूत करण्याची घोषणा करून टाकली. ती कोणीच गंभीरपणे घेतलेली नाही, हा भाग वेगळा. पण म्हणूनच इतर पक्षांना वाराणशीत कंबर कसून उभे रहाण्याचा प्रसंग आला आहे. कारण सर्वच बड्या पक्षात एकमेकांच्या मोठ्या नेत्यांना सुरक्षितपणे संसदेत निवडून आणण्याचे संगनमत आहे, असा केजरीवाल आरोप करतात. म्हणूनच मग कॉग्रेसला तिथे महत्वाचा नेता पाठवण्याची भाषा बोलावी लागली. मात्र अखेरच्या क्षणी कॉग्रेसने माघार घेतलेली दिसते. मोठा नेता टाकण्यापेक्षा स्थानिकच नेता पुढे करण्यात आला.

   अर्थात हा मुद्दा केवळ कॉग्रेसपुरता नाही. खरेच तमाम सेक्युलर पक्षांना मोदींपासून देशाला इतकाच धोका आहे असे वाटत असेल, तर त्यांनी एकत्रितपणे एक संयुक्त उमेदवार मोदींच्या विरोधात टाकायला हवा होता. असे प्रथमच व्हायचे नव्हते.  दहा वर्षापुर्वी एनडीएची सत्ता होती, तेव्हा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी लखनौ मतदारसंघात उभे होते. त्यांच्या विरोधात बंडखोरी केलेल्या जेठमलानी यांच्या अपक्ष उमेदवारीला कॉग्रेसने पाठींबा दिलेला होता. तेव्हाही अन्य पक्षांनी जेठमलानी यांचे वाजपेयी विरोधात समर्थन करावे, यासाठी कॉग्रेसने प्रयत्न केले होते. पण त्याला समाजवादी व बसपा यांनी दाद दिलेली नव्हती. अर्थात वाजपेयींना पराभूत करणे जेठमलानींना शक्यच नव्हते. पण निदान सेक्युलर एकजुटीची प्रतिकात्मक साक्ष देता आली असती. आता देखिल केजरीवाल यांचा उत्साह बघता ते आटापिटा करून मोदी विरोधात झुंज देतील, यात शंका घेण्याचे कारण नाही. मोदींना वाराणशीत पराभूत करणे सोपे नक्कीच नाही. पण मुद्दा शेवटी झुंज देण्याचा असतो. ती झुंज जो कोणी देणार असेल, त्याच्या पाठीशी तमाम विरोधकांनी उभे रहाणे शहाणपणाचेच असते. पण तशी स्थिती नाही. मायावती व मुलायम यांनी आधीच आपले उमेदवार जाहिर केलेले होते आणि केजरीवाल यांनी अन्य कुणाशी मसलत केल्याशिवायच आपली उमेदवारी घोषित केली आहे. तरीही त्यांना बिनशर्त पाठींबा इतरांनी देण्यात कसलीच अडचण नव्हती. निदान सेक्युलर मानल्या जाणार्‍या मतांचे विभाजन व्हायचे टाळता आले असते आणि लढत रंगतदार झाली असती. आता भाजपा वगळता प्रमुख चार पक्षाचे आणखी उमेदवार समोर आल्यानंतर मोदी यांचे काम सोपे झालेले आहे. म्हणूनच केजरीवाल बातम्यातून निवडणूक रंगतदार बनवतील. पण खरोखरीची लढत होण्याची शक्यता संपलेली आहे.

   काहीसा हाच प्रकार राहुल गांधीच्या अमेठी मतदारसंघातही झालेला आहे. तिथे आम आदमी पक्षाचे नेते कवी कुमार विश्वास यांनी तीन महिन्यापासून तळ ठोकला आहे. मनापासून त्यांनी तिथे चांगली लढत देण्याची तयारी केली आहे. पण भाजपाने तिथे लोकप्रिय अभिनेत्री स्मृती इराणी यांना उभे करून लढत तिरंगी केली आहे. आधीच हा गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो, तिथे लढत व्हायची, तर राहुल विरोधातली मते विभागली जाता कामा नयेत. यापुर्वी सहसा अशा जागी महत्वाचे नाव पुढे केले जात नसे. पण तिथे आपचाच आगावूपणा नडलेला आहे. भाजपा-कॉग्रेस एकमेकांच्या नेत्यांना सुखरूप निवडून आणण्यासाठी हमखास पडणारे उमेदवार उभे करतात, हा आरोप सातत्याने होत राहिला. भाजपा इराणीसारखा मोहरा अमेठीत आणणार नाही, याची खात्री असल्यानेच तो आगावूपणा झाला होता, आता तोच महाग पडणार आहे. आधी भाजपा-कॉग्रेस संगनमताचा आरोप करणारे विश्वास आता तक्रार करू लागले आहेत. कारण त्यांच्यापेक्षा अमेठीत भाजपाची ताकद अधिक आहे. म्हणजेच चार महिन्यांची मेहनत घेऊनही आप पक्षाला दुसर्‍या क्रमांकाचीही लढत देता येणार नाही. मजेची गोष्ट म्हणजे इतरत्र रोडशो करून गर्दी खेचणारे केजरीवाल अमेठीकडे फ़िरकलेले नाहीत. तिथे विश्वास एकाकी पडलेले आहेत. त्यांना कार्यकर्ते वा मनुष्यबळ तुटपुंजे असल्याने धावपळ करावी लागते आहे. म्हणजेच अमेठीत राहुल गांधी यांच्याशी खरीखुरी लढत होऊच शकणार नाही. आणि झाली तरी टिव्हीवरची ‘तुलसी बहू’ म्हणून लोकप्रिय असलेला चेहरा स्मृती इराणी अधिक मते घेऊन जातील. विश्वास यांनी त्या लढतीत नावापुरतेही लढण्याची शक्यता संपलेली आहे. जणू भाजपाने राहुल यांना पराभूत करण्यापेक्षा आम आदमी पक्ष व त्याच्या उमेदवाराची हवा काढण्यासाठीच अमेठीमधून असा ‘नावाजलेला’ उमेदवार टाकला आहे असेच म्हणावे लागते.

No comments:

Post a Comment