साधारण दिड महिन्यापुर्वी वेदप्रकाश वैदिक नावाच्या इसमाने माध्यमात खुप धुमाकुळ घातला होता. सहसा कधीही वाहिन्यांवर न दिसलेला हा माणूस, अकस्मात सर्वच वाहिन्यांवर अहोरात्र दिसू लागला. कारण तो पाकिस्तानात जाऊन तोयबाच्या संस्थापक सईद हाफ़ीझला भेटला होता. मुंबईवर कसाब टोळीला पाठवून भीषण हल्ला करणार्या व त्यातून निष्पाप निरपराध दिडशेहून अधिक लोकांचे बळी घेणार्या हाफ़ीझला वैदिक भेटलाच कशाला? तर म्हणे त्याला नवे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मैत्रीचा पुष्पगुच्छ घेऊन तिकडे पाठवल्याचा गवगवा झालेला होता. आधी त्या दोघांचे मस्त गप्पा मारतानाचे फ़ोटो प्रसिद्ध झाले. मग ह्या वैदिकच्या पाक वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीचे चित्रण प्रक्षेपित होऊ लागले. पण बाकीचा सरकारी सरंजाम सोडून मोदींनी यालाच कशाला परस्पर तिकडे पाठवले आणि कोणते मैत्रीचे आश्वासन घेऊन हाफ़ीझकडे पाठवले; त्याचा काहीही खुलासा होत नव्हता. कारण वैदिक मोदींशी कुठला संबंध असल्याचे मान्य करीत नव्हता. सरकार वा भाजपाकडूनही वैदिक आपला कोणी असल्याचे मान्य केले जात नव्हते. खुपच गवगवा झाल्यावर एक एक भानगडी बाहेर येऊ लागल्या. त्यानुसार मोदी व वैदिक यांच्यातला दुवा कोणता, तर त्याचे योगगुरू रामदेव बाबा यांच्यासोबत असलेले फ़ोटो आणि त्यांच्याशी असलेली जवळीक. तेवढ्या बळावर वैदिक व मोदी यांचा संबंध जोडला होता. पण वास्तवात हा इसम एकाहून एक कट्टर मोदी विरोधकांच्या सोबत व सहकार्याने पाकिस्तानात पोहोचल्याचे पुरावे उघड होऊ लागले. त्यावर मग घाईगर्दीने पडदा टाक्ण्यात आला. ज्या संस्थेने ह्या शिष्टमंडळाला पाकिस्तानात बोलावले व वैदिकची त्यात वर्णी लागली, त्याचे सुत्रधार पाक हेरसंस्थेचे मुखीया असल्याचे धागेदोरे उघडकीस येऊ लागले आणि सर्वच मोदी विरोधकांची तारांबळ उडाली. कारण वैदिकच्या नावाने उठवलेला धुरळा त्यांचीच तोंडे माखू लागला.
असो, वैदिकाने तिकडे जाऊन काय केले? तर म्हणे सईद हाफ़ीजला मोदींची बाजू समजावून सांगितली. मोदींच्या वतीने हाफ़ीजला भारतात येण्याचे आमंत्रण दिले. मात्र पुरावे व साक्षी समोर आल्यावर वैदिक याने आपल्याच परीने असा सगळा उद्योग केल्याचे निष्पन्न होत गेले. पण मुद्दा तितकाच नव्हता. भारताचा एक नंबरचा शत्रू मानला गेलेल्या हाफ़ीजपर्यंत वैदिक पोहोचलाच कसा? कारण त्याच्या डोक्यावर अमेरिकेने दहशतवादी म्हणून करोडो रुपयांचे बक्षीस लावलेले आहे. त्यामुळेच हाफ़ीजला कोणी पाकिस्तानी पत्रकारही सहजगत्या भेटु शकत नाही. त्याचे वास्तव्याचे घर किंवा तोयबा व जमात उद दावा संघटनांच्या कार्यालयांनाही पाक लष्कर व पोलिसांचे कडेकोट संरक्षण आहे. त्यामुळेच थेट पाक लष्कर व गुप्तहेर संस्थेच्या पुर्वसंमतीखेरीज हाफ़ीज कोणाला भेटू शकत नाही. असे असताना वैदिक तिथपर्यंत सहज पोहोचला कसा? ज्या मोदीविरोधकांच्या मदतीने वैदिक पाकिस्तानला पोहोचला त्यांनाही हाफ़ीजपर्यंत पोहोचणे शक्य नसताना वैदिकने हा पल्ला गाठला कसा? त्याचे गुढ अजून उकललेले नाही. कारण मोदींशी त्या भेटीचा संबंध जोडता येत नाही म्हटल्यावर तमाम शोधपत्रकार व वाहिन्यांना वैदिकाचे कौतुक संपले. सहाजिकच हाफ़ीजविषयीही पुढे काहीच कानावर आलेले नाही. गेल्या दहा वर्षात असे क्वचितच घडले असेल. सईद हाफ़ीज भारताच्या विरोधात काही बोलला नाही वा त्याने काश्मिरच्या संबंधाने गरळ ओकली नाही, असे होतच नाही. मग गेल्या महिनाभरात काश्मिरचे फ़ुटीरवादी, त्यांनी भारताच्या इच्छेविरुद्ध पाक राजदूताची भेट घेणे, मग त्याच कारणास्तव भारत पाक बोलणीच रद्द होणे; अशा किती तरी घडामोडी घडल्या आहेत. पण बरळण्याचे इतके विषय असताना हाफ़ीज कुठे दडी मारून बसला आहे? हाफ़ीजने अकस्मात दिड महिन्यापासून मौनव्रत कशाला धारण केले आहे? झाले तरी काय त्या सईद हाफ़ीजला?
वैदिकच्या भेटीनंतर आठवडाभर तरी हाफ़ीज मोकाट बोलत होता. भारत वा मोदी विरोधात वक्तव्ये देत होता आणि काश्मिर तर त्याचा लाडका विषय. मग महिनाभर नियंत्रण रेषेवर धुमाकुळ चालू आहे, काश्मिरचा विषय ऐरणीवर आलेला आहे आणि खुद्द पाकिस्तानात अराजक माजले आहे. अशा सुपिक मोसमात सईद हाफ़ीजने मौन कशाला घेतले आहे? तो अकस्मात कुठल्या अज्ञातवासात गेला आहे? चमत्कारीक गोष्ट नाही काय? दीड महिन्यापुर्वी ज्या हाफ़ीज-वैदिक भेटीवरून इतके वादळ उठले होते, तो आता कुठे अंतर्धान पावला आहे? त्याची कुठलीच मिमांसा कशाला होत नाही? तेव्हा मोदी व हाफ़ीज यांच्यात संबंध जोडणार्यांची मती आता कशाला कुंठीत झाली आहे? चौकसपणा हा पत्रकाराच गुणधर्म असतो. मग आता भारतातली सगळी पत्रकारीता झोपा काढते आहे काय? खरे तर आताच शंकासुरांनी प्रश्नांचा भडीमार करायला हवा ना? वैदिकला पाठवून त्याच्याशी छुपी मुत्सद्देगिरी करणारे पंतप्रधान मोदी, काश्मिरी फ़ुटीरवादी पाक राजदुताशी बोलले म्हणून बोलणी कशाला रद्द करतात? असा तरी प्रश्न विचारला जायला नको का? चकार कुठे सवाल नाही? वैदिकचे सोडून द्या हाफ़ीजविषयी तरी कुतूहल? दोन वर्षापुर्वी जयपूरात गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवादाचे भय दाखवले, तर त्यांचे विनाविलंब अभिनंदन करणारा सईद हाफ़ीज, आज जिलानी वा मिरवेज पाक दूतावासात गेल्यावरही गप्प कशाला? किमान त्याने मोदींची निर्भत्सना तरी करावी ना? वेदिक बेपत्ता आणि हाफ़ीजचे कुठे नावनिशाण नाही? किती महत्वाची बातमी आहे ना? पण भारतीय पत्रकार वा वाहिन्यांना त्यात बातमीही दिसू का नये? भारत-पाक यांच्यात लढाई व्हावी, त्यांच्यात हाणामारी व्हावी, यासाठीच सातत्याने अल्लाची प्रार्थना करणार्याविषयी इतकी उदासिनता कशाला आहे? कुछ तो गडबड है भाई.
इथेच वैदिक नावाचे रहस्य अधिक गडद होते. पाकिस्तानला जे शिष्टमंडळ गेले त्यात एकाहून एक मोदी विरोधकांचा भरणा होता आणि त्यांनी ऐनवेळी वैदिकला सोबत घेतले. कोणीतरी मोदी सरकारचा निकटवर्ती दाखवायचा, म्हणून त्यात वैदिकला घेतले गेले. तिथे पोहोचल्यावर वैदिक सईदला भेटू शकतो? सईद हाफ़ीजशी ती भेट वैदिकसाठी फ़ार मोलाची नसेल, पण ज्यांना हाफ़ीजशी दुष्मनी करायची असेल त्यांना अशी भेट महत्वाची नाही काय? त्याला कोणाच्या मार्फ़त भेटावे, कुणाशी संपर्क केल्यावर हाफ़ीजपर्यंत पोहोचता येते. त्याच्या वास्तव्याच्या जागा कोणत्या? त्याच्या सोबत कोण व किती अंगरक्षक असतात? अशी खुप नाजूक महिती वैदिकच्या त्याच भेटीने उघड झालेली नाही काय? इतक्या चक्रव्युहातून हाफ़ीजपर्यंत पोहोचलेला वैदिक त्याला इजा पोहोचवू शकत नव्हता. पण तिथल्या परिसराचे निरीक्षण जर करू शकला ना? गोपनीयता ही अशा सुरक्षेत वावरणार्यांसाठी सर्वात नाजूक माहिती असते. वैदिकसारख्या अनोळखी व्यक्तीला भेटताना सईद हाफ़ीजने त्याच गुप्ततेचा भंग केला ना? त्या दोघांची भेट होणे वा त्यात बोलले जाणारे विषय दुय्यम होते. त्यातला एकजण पाकिस्तानसाठी अत्यंत सुरक्षेचा नाजूक मामला आहे. त्याच्या लपायच्या सुरक्षित जागा प्रथमच उघडकीस आल्या ना? त्यातून मग सईदचे अड्डे वा निवासाची जागा गोपनीय राहिलेली नाही. आपोआपच ती जागा सुरक्षित राहिलेली नाही. त्यामुळे हाफ़ीज आपल्याच देशात आणि आपल्याच खास सुरक्षा घेर्यात असुरक्षित झाला आहे काय? अमेरिकेने सईदला ओसामाप्रमाणे मारण्याची घोषणा आधीच केली आहे. त्यांच्यासाठी आवश्यक असलेली माहिती वैदिकला भेटण्यातून उघड झालेली असेल काय? अन्यथा सईदला अंतर्धान पावण्याचे कारण काय? जिहादच्या व कत्तल हिंसेच्या धमक्या देणारा हाफ़ीज, आता आपल्याच जीवाला घाबरून कुठल्या बिळात दडी मारून लपला आहे? त्याच्या मौनाचे रहस्य काय आहे? की आपले सुरक्षा कवच भेदले गेल्याने त्याची झोप उडाली आहे?