Wednesday, December 13, 2017

राजकारणातले ‘लाज’कारण

pawar modi in baramati के लिए इमेज परिणाम

आपल्या वाढदिवसाचे निमीत्त साधून जाणता नेता शरद पवार यांनी मंगळवारी नागपूर येथील विधानसभेच्या अधिवेशनावर मोर्चा काढलेला होता. अर्थात आता एकट्याच्या बळावर काही करण्याइतके पवारसाहेब शक्तीशाली नेता राहिलेले नाहीत, की त्यांच्या पक्षापाशी तितके संख्याबळ राहिलेले नाही. जेव्हा अशी स्थिती येते तेव्हा साहेबांना पक्षाचा विसर पडतो आणि पुरोगामी विचारांचे स्मरण होत असते. सहाजिकच त्यांनी नागपूरच्या ‘हल्ला बोल’ मोर्चासाठी अशा तमाम लहानमोठ्या नगण्य पक्ष व संघटनांची मोट बांधली तर नवल नाही. अशा मोर्चात त्यांचेच प्रमुख भाषण झाले आणि त्यांनी जुन्या आवेशात फ़डणवीस सरकारला खुप दमदाटी केलेली आहे. नाव अर्थात शेतकर्‍यांचे कामगारांचे व गरीबांचे असले, तरी दुखणे पवारांचे व्यक्तीगत व पक्षीय स्वरूपाचेच आहे, शेतकर्‍यांनी सरकारशी असहकार पुकारावा असे म्हणत त्यांनी आपणही गांधीवादी असल्याचे दाखवून दिले. सरकारची देणी देऊ नका असे आवाहन त्यांनी शेतकर्‍यांना केलेले आहे. पण मुद्दा तशी देणी किती असतात आणि त्यावर सरकार किती विसंबून असते, असा आहे? दिर्घकाळ सत्तेतच बसलेल्या शरद पवारांना शेतकर्‍याच्या अशा असहकारावर सरकार नमून जाऊ शकत नाही, हे नेमके कळते. मग असल्या फ़ुसक्या धमक्या देऊन साहेब कोणाची दिशाभूल करीत आहेत? पण मुद्दा त्याही पलिकडला आहे. असल्या घोषणा व इशारे पवारांसाठी अजिबात नवे नाहीत. पण त्याच सभेत वा मोर्चात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लाज वाटण्याचाही विषय आणला. इतर कोणाला कसली लाज वाटावी, याची एक लांबलचक यादीच साहेबांकडे सज्ज आहे. पण त्यापैकी कुठल्या बाबतीत आपणही लाज बाळगायला हवी, त्याची छाननी त्यांनी एकदा तरी करावी ना? मनमोहन सिंग यांच्यावर आरोप करायची मोदींना लाज वाटायला हवी आणि पवारांना कशाचीही लाज बाळगण्याचे कारण नाही काय?

नरसिंहराव यांच्या मंत्रीमंडळात पवार संरक्षणमंत्री होते आणि तेव्हा महाराष्ट्रात विरोधी पक्षाचा नेता म्हणून गोपिनाथ मुंडे कार्यरत होते. अशावेळी मुंडे यांनी पवारांवर अनेक गंभीर आरोपांची सरबत्ती केलेली होती. त्यापैकी किती आरोपाचा खुलासा साहेबांना देता आलेला होता? प्रत्येक वेळी असा विषय वा आरोप आला मग पवार पाठ फ़िरवून पुढे निघून गेलेले आहेत. फ़ार कशाला ते मुख्यमंत्री असताना त्यांनीच लोकसत्तेत ‘लोकापवादाला भ्यायचे कशाला’ असा सवाल करणारा लेखच लिहीलेला होता. त्याचा अर्थ काय होतो? लोकापवाद म्हणजे काय? लोकांमध्ये आपल्याविषयी काय बोलले जाते किंवा वदंता काय आहे, त्यावर आपली अब्रु लाज टिकून असते, यालाच पवारांनी त्या लेखातून छेद दिला होता. लोक काहीही बोलतात, म्हणून विचलीत होण्याचे कारण नाही. नेहरू गांधी यांनी आपल्या परीने शुचिर्भूत राजकारण केले असेल, पण आजच्या जमान्यात त्यांच्या इतके शुद्ध व पवित्र राजकारण कसे शक्य नाही, याचा पाढाच तेव्हा १९९४ सालात पवारांनी लोकसत्तेच्या लेखातून वाचला होता. मग आज त्यांची स्मृती त्यांना दगा देऊ लागली आहे काय? की त्यांच्या एकूण आकलनाचे निकष बदलून गेले आहेत? मुंडे वा खैरनार यांनी लाज वाटण्यासारखे अनेक आरोप त्यावेळी पवारांवर केलेले होते आणि त्यापैकी कशाचाही खुलासा साहेबांनी केलेला नव्हता. मग त्याची त्यांना लाज वाटली नव्हती की लाजेचे राजकारणात काहीही काम नाही, अशी त्यांची तेव्हा समजूत होती? कुणावर आरोप करताना सारासार बुद्धी वापरली जावी ही अपेक्षा चुकीची मानता येणार नाही. पण तो नियम एकट्या नरेंद्र मोदींना लागू शकत नाही. भारतीय राजकारणातल्या प्रत्येकाला लागू असला पाहिजे आणि त्यातून शरद पवारांनाही सवलत मिळता कामा नये. मग मोदींना लाज वाटण्यासाठी पवारांनी आपल्या कृतीतून लाज म्हणजे काय, त्याचा धडा घालून द्यायला नको काय?

मुंडे यांनी त्या काळात पवारांवर एक गंभीर आरोप केलेला होता. तेव्हा पवार संरक्षणमंत्री होते आणि त्यांच्या सेवेत असलेल्या संरक्षण खात्याच्या एका विमानाने मुंबईस आलेले होते. त्यांच्या विमानाला राजशिष्टाचाराची सवलत असल्याने त्याची झाडाझडती घेतली जात नव्हती. अशा विमानातून पवार कोणाला वाराणशीहून मुंबईला घेऊन आले होते? अनिल शर्मा नावाचे दोन शार्पशूटर त्यांच्या सोबत विमानातून मुंबईला आल्याचा मुंडे यांचा आरोप म्हणूनच गंभीर होता आणि पवारांनी त्याविषयी कधीही माफ़ी मागितली नाही. किंवा लाज वाटल्याचे कबुल केलेले नव्हते. आपल्या सोबत कोण होते वा कोण असतात, त्याची आपल्याला माहिती नव्हती, असे सांगून पवारांनी तेव्हा हात झटकले होते. अनिल शर्मा नावाची ही दुकली तेव्हा दाऊद टोळीचे शार्पशूटर म्हणून कुख्यात होती आणि त्यांना आपण सुरक्षित मुंबईत आणल्याबद्दल शरद पवार यांना काडीमात्र खेद नव्हता की खंत नव्हती. तात्कालीन महापौर आर आर सिंग आपल्या सोबत होते आणि त्यांच्यसोबत आणखी कोण होते, आपल्याला ठाऊक नसल्याचे सांगून वेळ मारून नेण्यात आली. त्यावरून तात्कालीन राजकारणात खुप काहूर माजले होते. ही अभिमानास्पद गोष्ट होती काय? अशा रितीने आपली जबाबदारी झटकणार्‍याने अन्य कोणाला लाजेचे धडे घालून देणे कितपत योग्य आहे? मनमोहन सिंग यांनी एका गैरलागू बैठकीला उपस्थित रहाण्याचा प्रमाद केला म्हणून मोदींनी त्यांच्याकडे बोट दाखवले आहे. माजी पंतप्रधान म्हणून आपल्या पदाची शान राखण्यात सिंग तोकडे पडत असतील तर आरोप करणार्‍यांचा दोष नसतो. आपली शान व मान कसा राखावा हे पवारांनी जरा माजी राष्ट्रपती प्रणबदा मुखर्जी यांच्याकडून शिकावे. राजदीप सरदेसाई या उथळ पत्रकाराने प्रश्नांची सरबत्ती केल्यावर प्रणबदांनी त्याला संभाळून बोल व वाग, असे तिथल्या तिथे सुनावले होते. मनमोहन यांना ते औचित्य पाळता आले आहे काय?

मणिशंकर अय्यर याच्यासारख्या अत्यंत उथळ व बेछूट नेत्याने आमंत्रित केलेल्या मेजवानीला मनमोहन हजेरी लावतात, तेव्हा तिथे येणार्‍या लोकांमुळे आपल्याच प्रतिमेला धक्का लागेल किंवा नाही, याचा विचार त्यांनी करायचा असतो. तसा त्यांनी केला असता तर सिंग त्या मेजवानीला गेले नसते की त्यांच्यावर कोणी आरोप करू शकला नसता. हे प्रकरण उघडकीस आल्यावर प्रथम मनमोहन सिंग यांनी जाहिर माफ़ी मागायला हवी व आपण देशाच्या अब्रुचे धिंडवडे उडवण्यास मदत केल्याची क्षमा मागायला हवी. शंकराच्या पिंडीवर विंचू चढलेला असेल तर त्याला मारण्यासाठी चप्पल वापरली म्हणजे पिंडीला कोणी चपलेने मारतो असे होत नाही. मनमोहन सिंग दगडाच्या पिंडीइतके बधीर व निर्जीव असतील, तर त्यांचा कुठला सन्मान वा अपमान असू शकत नाही. त्यांच्यासाठी अन्य कुणी गळा काढण्याचीही गरज नाही. ज्या व्यक्तीला देशाचा पंतप्रधान म्हणून आपली व्यक्तीगत प्रतिष्ठा कधी संभाळता आली नाही, त्याची अन्य कोणी प्रतिष्ठा राखण्याचा विषय कुठे येतो? पण पवारांना त्यांच्याविषयी आत्मियता वाटणे स्वाभाविक आहे. त्यांच्यावरही असे आजवर आरोप झालेत, त्या दुखण्यावरची खपली निघालेली असू शकते. निवृत्तीच्या वयात वासरात किती लुडबुडावे, यालाही मर्यादा असतात. अडवाणी केसरी होईपर्यंत प्रतिक्षा करण्याची लाज कोणाला वाटली पाहिजे? ज्याच्या हातून सत्कार घेतला, त्याला दोन दिवस उलटल्यावर बालीश मुख्यमंत्री संबोधण्याने आपण अगदीच बालीश ठरतो, हेही साहेबांना आजकाल उमजेनासे झाले आहे काय? मोदी बारामतीत आले असताना पवारांचे बोट धरून राजकारणात आलो म्हणाले. तेव्हा खुश झालेल्या पवारांना आज लाज वाटली पाहिजे. मोदी चुकले असतील, तर आपण कोणाला बोट पकडू दिले, त्याची तरी लाज वाटली पाहिजे की नाही? असे काही बोलून आपण आपल्याच अब्रुचे धिंडवडे काढतोय याचेही साहेबांना भान सुटलेले आहे काय?

12 comments:

  1. This is out of frustration. Is Pawar want to copy JP ? Before emergency JP appealed Police not to obey wrong orders. Here He is provocating farmers as if he can not understand practical difficulties faced by CM

    ReplyDelete
  2. भाऊ
    गुजरात निवडणुक व विधानसभा अधिवेशन चा मौका साधून सरकारचे चांगले काम बदनाम करण्याचा व स्वतः चे हित साधण्याचा विरोधकांचा उद्योग ओपन केल्याबद्दल धन्यवाद .

    ReplyDelete
  3. देणी देऊ नका, बिल भरू नका हे लोकांना सांगणे याला काय म्हणायचे समजत नाही. आपण लोकांना फुकट खा असे सांगतो असे वाटते. राज्याच्या दृष्टीने हे फारच वाईट आहे. आपणच लोकांना ऐतखाऊ बनवत आहोत. हे कोणाच्या फायद्याचे नाही. फार वाईट वाटले हे कळल्यावर. हे अपेक्षित नव्हते.

    ReplyDelete
  4. खरे आहे सर, पण यांना लाज नाही.
    (महा)राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष! जोमानं सुरू झालेल्या या पक्षाचे घडय़ाळ 'बंद' पडत आलंय. तरीही त्यांच्या साहेबांसकट त्यांच्या चेल्यांना असं वाटतंय की, आपल्यासारखी 'वेळ' कुणालाच 'साधता' येत नाही!
    स्थापनेपासून सत्तेला चिकटलेल्या या पक्षाची सध्याची प्रतिमा ही भ्रष्ट सत्ता, संपत्तीचा माज आणि हम करेसो कायदा अशी झालेली आहे.
    सर्वसामान्य कार्यकर्त्यांपेक्षा गुंडा मंत्र्यांना हाताशी धरून कारभार करण्यावर भर असलेल्या या पक्षाचा चेहरा विशिष्ट जातीचा, विशिष्ट प्रांताचा आणि दादागिरीचा आहे. तो जाणीवपूर्वक पोसलेला, आणि आपण सत्तेत येण्यासाठीच जन्माला आलोय, हा दर्प आहे.
    वरील सर्व वाक्य संजय पवार यांच्या लाेकसत्ता मधील लेखावरून साभार, जाे नंतर लाेकसत्ताच्या वेबसाईटवरून चार दिवसातच काढुन टाकण्यात आला हाेता.

    ReplyDelete
  5. महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणात गेली चार दशके आपल्या विविध 'खेळीं'नी त्रिकोणाचा चौथा कोन बनून राहिलेल्या साहेबांच्या नावावर अनेक भल्याबुऱ्या गोष्टी आहेत. त्यातला सगळय़ात पहिला गुण म्हणजे इंग्रजीत ज्याला 'अनप्रेडिक्टेबल' असा 'सोफिस्टेकेटेड' शब्द आहे- ज्याला शुद्ध मराठीत 'बेभरवशाचा' असा विश्वासघातकी अर्थ आहे, असा गुण. दुसरा म्हणजे- पवार हिशेब चुकते करतात. तिसरा- ज्याच्या खांद्यावर हात ठेवतील, त्याला खांद्यासकट मानेपर्यंत कधी गाडतील, सांगता येत नाही. राजकारणातून प्रचंड संपत्ती, मालमत्ता वगैरे करूनही कागदाचा एक कपटा पुरावा म्हणून सापडणार नाही याची दक्षता घेणार. सापडलाच, तर कोणीतरी तिसराच माणूस सापडतो आणि चौथा तुरुंगात जातो. साहेबांना विविध क्षेत्रांतले मित्र, भाट, पे-रोलवर असावेत असे पत्रकार, लेखक, कवी, नाटक-सिनेमावाले सर्वच आहेत. त्यामुळे त्यांना 'जाणता राजा' अशी उपाधीही दिली जाते. साहेबांच्या वाढदिवशी कवी भूषणलाही आपल्या प्रतिभेची लाज वाटेल अशी स्तुतिसुमने प्रत्यक्ष आणि ग्रंथरूपाने उधळली जातात. साहेब एकत्रित काँग्रेसमध्ये होते तेव्हापासून 'विश्वासार्ह नसलेलं व्यक्तिमत्त्व' म्हणून काँग्रेसमध्ये ओळखले जायचे. (तसे ते कुठेही गेले तरी हे संबोधन कायम राहते.)

    ReplyDelete
  6. भाऊ अगदी शालजोडीतुन हाणला, पण साहेबांचे उथळ की उठवळ राजकारण फार फार पूर्वीपासून चालू आहे आणी आता अधोपरी ते काही बोधप्रद ह्या वयात करतील ह्याची सुतराम शक्यता नाही.☺

    ReplyDelete
  7. भाऊ क्या मारा है..
    लाजवाब!!!!!
    ज्यावेळी शप नी सोनिया गांधी च्या विदेशी मुद्द्या वरुन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा या महाराष्ट्रीयन नेत्या विषयी जरा अभिमान वाटला होता.. ते चुकले जेव्हा राजीव गांधीच्या निधनाने पंतप्रधान पदाची नेमणूक करायची होती तेव्हा शप काँग्रेस मध्ये होते व या मुरब्बी नेत्याने मीच पंतप्रधान पदाला लायक आहे असे ऊद्गगार काढले तिथेच ते फसले. कारण त्यावेळी त्यांच्या एवढा 150-200 आमदार 30-35 खासदार निवडुन आणणारा एकही नेता भारत वर्षांत नव्हता. व शप सोनियां ना डोईजड होतील अशी भिती होती म्हणुन शप चा पत्ता कट्ट झाला परंतु कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हणुन त्यांनी मोका साधुन राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. पण परत त्याच काँग्रेस बरोबर सत्तेत सामील झाले तेव्हा का लाज सोडली?

    ReplyDelete
  8. Bhau te jau dya
    Pan Nagpurla he morche chalu hote tevha tevha Sinchan Ghotalyache 4 FIR zale ashi batmi aahe.

    Kaka tyala vachavnar ka aata?

    ReplyDelete
    Replies
    1. पुतण्या आणि मित्रमंडळींना बळी देण्याची तयारी पूर्ण झाली असा अर्थ निघतो

      Delete
  9. याच पवारांनी एकदा निवडणुकीत, शेतकऱ्यांना फुकट विजेचं आश्र्वासन दिले होते. निवडुन आल्यावर ६ महिन्यात सवलत बंद केली. वर र्निलज्जपणे टिव्ही व पेपरमध्ये सांगितले की," निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळण्यासाठी दिलेली नसतात."

    ReplyDelete
  10. सुप्रियाताईंनी शेती मधून काही कोटींचे उत्त्पन्न मिळवले होते.आजही मिळवत असतीलच. खरतर त्यांनी आणि जाणत्या राजाने आम्हाला पण त्याचे रहस्य सांगावे. किंबहुना महाराष्ट्र आणि देशाच्या शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील.

    उगाच या वयात नसती उठाठेव करण्या पेक्षा एवढे जरी केले तरी पुरेसे आहे.

    ReplyDelete