Saturday, December 9, 2017

बालेकिल्ला म्हणजे काय?

modi gujarat cartoon के लिए इमेज परिणाम

गुजरात विधानसभेची निवडणूक खरेतर दुरंगी आहे. कारण तिथे कुठलाही तिसरा पक्ष उभाच राहिलेला नाही. म्हणजे नाव घेण्यासाठी जदयु किंवा शिवसेना व राष्ट्रवादी असे पक्ष मैदानात जरूर आहेत. पण त्यांची कोणाला दखलही घ्यावीशी वाटलेली नाही. गंमत म्हणजे ज्यांचा कुठलाही पक्ष नाही, पण जे कॉग्रेसला मदत करायला सज्ज झालेले आहेत, अशा तीन तरूण नेत्यांवर एकूण माध्यमात अधिक चर्चा झालेली आहे. दलितांचा नेता म्हणून उना घटनेनंतर नावारूपास आलेला जिग्नेश मेवाणी वा पाटिदार आरक्षणाने ज्याला ओळख दिली तो हार्दिक पटेल, यांचा जितका गवगवा आहे, तितकी कोणी राष्ट्रवादी वा शिवसेनेची दखल घेतलेली नाही. कारण त्यांची इतकी ताकद नाही हे गृहीत आहे. मागल्या दोनतीन दशकात तिथे भाजपाने मोठी मुसंडी मारून सत्ता मिळवली आणि जी राजकीय जागा व्यापली; त्याचा कोणी हिशोब करत नाही. म्हणून मग निवडणूकीचे पडघम वाजू लागले की मोदींना आव्हान असल्याचा गदारोळ सुरू होतो आणि निकाल लागले, मग मोदींचा करिष्मा कायम असा निष्कर्ष काढून पुढल्या पाच वर्षासाठी गुजरातवर पडदा पाडला जातो. एकूणच मोदीप्रेमी व मोदी विरोधक अशा दोन गटात अभ्यासक वा पत्रकार विभागले असल्यामुळे गुजरातच्या राजकारणाचे कधीच डोळस विश्लेषण होत नाही. आज तिथे भाजपा भले शिरजोर असेल, पण तत्पुर्वी स्थिती काय होती आणि भाजपाला आजचे स्थान कशामुळे प्राप्त झाले आहे, त्याकडे कोणी बघायलाच राजी नसेल तर दुसरे काय व्हायचे? हिंदूत्व किंवा हिंदूत्वाची प्रयोगशाळा असे सोपे उत्तर पुढे करून विषय संपवला जातो. म्हणून ती वस्तुस्थिती नाही की ती राजकीय विभागणी नाही. गुजरातच्या भाजपा वा मोदी प्रभावाचा हिंदूत्वाशी काडीमात्र संबंध नाही. ती सर्व बिगर कॉग्रेसवादी राजकारणाची किमया आहे.

आज जो भाजपा गुजरातमध्ये इतका बलदंड पक्ष होऊन बसलेला आहे, तिथे त्या पक्षाला तीन दशकापुर्वी नगण्य स्थान होते. मग तेव्हा तिथे हिंदू लोकसंख्या नव्हती की दंगली होत नव्हत्या काय? १९७४ असो किंवा १९८९ साल असो, तिथे जुन्या समाजवादी वा जनता दलाच्या कुबड्या घेऊन भाजपा वा जनसंघाला राजकारण करावे लागलेले आहे. तरीही त्यांना एकत्र येऊन कॉग्रेसला पराभूत करणे सोपे जात नव्हते. समाजवादी हा गुजरातमधला प्रमुख विरोधी वा बिगर कॉग्रेसी पक्ष होता. अर्थात समाजवादी म्हणजे आजचा मुलायमचा आहे तसा तेव्हा तो मुस्लिम पक्ष नव्हता. तर त्यात पुरोगामी विचारांचा प्रभाव होता आणि तोच कॉग्रेसला समांतर वा पर्यायी पक्ष होता. १९७०-९० पर्यंतच्या दोन दशकात हळुहळू भाजपाने तिथे आपले हातपाय पसरायला आरंभ केला. तेव्हा बिगर कॉग्रेसी राजकारणात समाजवादी पुढे होते. आज जितक्या आवेशात भाजपावाले कॉग्रेस विरोधात बोलतात, तितक्याच आवेशात घराणेशाही वा नेहरू घराण्याला समाजवादीच शिव्याशाप देत होते. भाजपाने त्यांच्या सोबत जाऊन गुजरातमध्ये आपले बस्तान बसवण्याचा कार्यक्रम हाती घेतला. १९९० सालात त्याच जनता दलाचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल भाजपाचा पाठींबा घेऊन सत्तेवर आरुढ झालेले होते आणि दोन वर्षात त्यांनी थेट आपल्या सरकारसह कॉग्रेस पक्षात उडी घेतली. परिणामी गुजरातच्या जनतेसमोर भाजपा सोडून दुसरा काहीही पर्याय उरला नाही. ज्याला बिगर कॉग्रेस म्हणून लोकांनी निवडले होते, त्याच जनता दलीयांनी कॉग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला. मग त्यांना कॉग्रेस विरोधात मते देणार्‍यांनी कुठे जायचे? कोणाच्या तोंडाकडे बघायचे? अशा मतदाराला मग कॉग्रेस विरोधासाठी एकमेव पर्याय शिल्लक राहिला होता, तो भाजपाचा. त्यातून भाजपाचा गुजरातमधील प्रभाव वाढत गेला. त्याचा हिंदूत्वाशी काहीही संबंध नाही.

गुजरातमध्ये भाजपाचा विस्तार हा प्रामुख्याने बिगर कॉग्रेसी राजकारणाचा परिणाम आहे. तिथे पारंपारिक जे विरोधी पक्ष होते, त्यात समाजवादी पक्षाचा जोर होता. पण त्या पक्षाचे नेतृत्व कधीच हुकमी बिगर कॉग्रेसी नव्हते. आपल्या सोयीनुसार त्यांनी सतत कॉग्रेस सोबत चुंबाचुंबी केलेली होती. म्हणूनच मतदाराची सातत्याने फ़सवणूक होत गेली, निवडणूका आल्या, मग तावातावाने कॉग्रेस विरोधात बोलणारे नंतरच्या काळात त्याच कॉग्रेसशी हातमिळवणी करीत राहिलेले होते. १९८९ सालात व्ही पी सिंग यांच्या नेतृत्वाखाली पुर्वाश्रमीच्या समाजवादी गटाने व संघटना कॉग्रेसने जनता दल म्हणून नवे रुप धारण केले. तोपर्यंत हे नाटक यथासांग पार पडत राहिले होते. तेव्हा भाजपाच्या मदतीने चिमणभाई पटेलांचे जनता दल सरकार सत्तेत होते आणि रथयात्रा रोखली गेल्याने भाजपाने पाठींबा काढून घेतला. चिमणभाई अडचणीत आले आणि त्यांना कॉग्रेसने बाहेरून पाठींबा देऊन सत्ता टिकवली. त्याचा आधार घेऊन पुढल्या काळात चिमणभाई सगळा पक्ष घेऊनच कॉग्रेसवासी झाले. त्यांना मते देणार्‍या मतदाराची ही शुद्ध फ़सवणूक होती. कारण त्या मतदाराने भाजपा विरोधासाठी चिमणभाई वा जनता दलाला मतदान केलेले नव्हते. मग आपल्याला फ़सवणार्‍या पक्ष वा नेत्याविषयी मतदाराने काय करावे? तो मतदार रस्त्यावर येऊन कोणाची कॉलर पकडत नाही वा त्याला मारहाण करत नाही. तो पुढल्या निवडणूकीची प्रतिक्षा करीत असतो आणि मताचा शिक्का मारण्याची संधी आली, की दिशाभूल करणार्‍या पक्षाला वा नेत्या धडा शिकवत असतो. गुजरातच्या मतदाराने १९९५ सालात तेच केले होते. त्याने कॉग्रेस विरोधी मते घेऊन आपली दिशाभूल करणार्‍या चिमणभाईंना व त्यांना पक्षात सामावून घेणार्‍या कॉग्रेसला चांगलाच धडा शिकवला. तिथून गुजरातमध्ये भाजपाची कारकिर्द सुरू झाली. निकालाच्या आकड्यांचा अभ्यास केला तरी त्याची प्रचिती येऊ शकते.

१९७४ सालात भाजपा नव्हेतर जनसंघ होता आणि त्याला जनता आघाडीत सहभागी होऊनही केवळ १८ आमदार निवडून आणणे शक्य झाले होते. १९८० च्या निवडणूकीत त्या जागा ९ आमदारांपर्यंत खाली आल्या. १९८५ सालात तर इंदिरा हत्येमुळे सहानुभूतीची लाट होती आणि कॉग्रेसने अफ़ाट यश मिळवले. तेव्हा भाजपाला केवळ ११ आमदारांची मजल मारता आली. मात्र या सर्व काळात गुजरातच्या स्थानिक राजकारणातून अन्य पक्ष जसे कॉग्रेस विरोधी जागा मोकळ्या करीत गेले; तशी भाजपाची शक्ती वाढत गेलेली होती. १९९० सालात पुन्हा जनता दलाशी युती करताना भाजपाचा प्रभाव इतका वाढला होता, की जवळपास जनता दलाशी तुल्यबळ जागा भाजपा मिळवू शकला आणि १९९५ सालात तर भाजपाने स्वबळावरच बहूमतापर्यंत पल्ला गाठला. १९८५ ते १९९५ अशा दहा वर्षात भाजपाची भरमसाठ वाढ ही प्रामुख्याने कॉग्रेस विरोधातील मते गोळा करण्यातून झालेली आहे. मतदाराला हा पक्ष एकच गोष्ट पटवू शकला होता, की कुठल्याही स्थितीत आपण कॉग्रेसच्या बरोबर हातमिळवणी करणार नाही. परिणामी अन्य कुठल्याही पक्षाच्या सहानुभूतीदारात शंका होती, की आपला पक्ष कॉग्रेसच्या वळचणीला जाईल का? त्याला भाजपा हेच उत्तर असल्याचे जनमानसात ठसवण्याचे काम भाजपाने उत्तम पार पाडलेले होते. तुम्हाला कॉग्रेस नको असेल, तर एकमेव भाजपाच स्विकारावा लागेल, हा विश्वासच भाजपाला गुजरातमध्ये बळ मिळवून देत गेला. हिंदूत्ववादी असणे ही त्यातली दुय्यम गोष्ट होती. तेच देशाच्या अन्य राज्यातही झालेले आहे. भाजपाचा विस्तार मुळात बिगर कॉग्रेस पक्ष म्हणून झालेला आहे आणि जिथे पारंपारिक जुन्या बिगर कॉग्रेसी पक्षांनी कॉग्रेसशी चुंबाचुंबी केली; तिथेच भाजपा एकमेव बिगर कॉग्रेसी पक्ष म्हणून विस्तारत गेलेला आहे. आता तर कॉग्रेसही दुबळी होऊन गेल्याने भाजपा शिरजोर वाटते इतकेच.

उलट गुजरातमधील कॉग्रेसची स्थिती तपासून बघता येईल. इंदिरा हत्येनंतर कॉग्रेसला विक्रमी जागा मिळाल्या होत्या. पण पाच वर्षात त्याची पुरती घसरगुंडी होऊन गेली. नंतरच्या काळात कॉग्रेसला स्थानिक प्रादेशिक नेतृत्व मिळाले नाही आणि अन्य पक्षातले नेते आमदार पळवून आणण्यावरच कॉग्रेसची मदार राहिली. चिमणभाई पटेल वा शंकरसिंग वाघेला, अशा नेत्यांना इतर पक्षातून आणून कॉग्रेसने कशीबशी गुजराण केलेली आहे. पण स्वपक्षीय स्थानिक नेतृत्व विकसित करण्याला कॉग्रेसने कधीच प्राधान्य दिले नाही. नेमकी तशीच काहीशी स्थिती अन्य राजकीय पक्षांची आहे. तिथे ज्या पक्षांनी आपले काही स्थान आहे, त्यांनी नवे नेतृत्व उभे करून राज्यात आपले बलस्थान निर्माण करण्याचा कुठलाही प्रयास केलेला नाही. निवडणूका आल्या म्हणजे राळ उडवून द्यायची आणि पुढल्या काळात संघटना व पक्षाकडे लक्षही द्यायचे नाही; हा अन्य पक्षांचा खाक्या राहिला आहे. म्हणूनच मरू घातलेला कॉग्रेस पक्ष टिकून आहे आणि तिसरा कुठला राजकीय पर्याय नसल्याने तिथे दोन पक्षातच निवडणूका लढवल्या जात असतात. ज्यांना मोदी वा भाजपा नको असेल, त्यांना नाईलाजाने कॉग्रेसला मते द्यावी लागतात. पण त्या आपोआप मिळू शकणार्‍या मतांच्या पलिकडे जाऊन आपला जनमानसातला हिस्सा वाढवण्याचे कष्ट कॉग्रेसने घेतलेले नाहीत. संघटनात्मक विस्ताराला कधी प्राधान्य दिलेले नाही. परिणामी राज्यात स्वबळावर विजयापर्यंत मजल मारणे भाजपाला सहजशक्य झालेले आहे. आम आदमी पक्षाने तीन वर्षापुर्वी तसा प्रयत्न करून बघितला. त्यात सातत्य राखले असते तर आज गुजरातच्या मतदाराला तिसरा पर्याय मिळाला असता. त्यात भाजपाला पराभूत करणे यावेळी शक्य नव्हते, तरी भाजपाला नव्या दमाने आव्हान होऊ शकणारा पर्यायी पक्ष उदयास आला असता. कारण मतदार हिंदूत्ववादी नसतो की सेक्युलरही नसतो. तो भाजपालाही बांधील नसतो. अन्य पर्याय नसल्यामुळे भाजपासाठी गुजरात हा बालेकिल्ला होऊन बसला आहे.

3 comments:

  1. भाऊ
    सही एकदम मस्त..
    गेली 14 वर्षे मोदींना गुजरात दंगली वरुन मिडियावाल्यानी वनवास भोगायला लावला आहे. आणि तरीही मोदी एवढे सहन करुन हा माणूस निग्रहाने ऊभा राहिला. बरं यात कोणत्याही प्रकारे वैयक्तिक फायदा प्राॅपर्टी, स्वीस बँकेत पैसे, भाऊ, मेव्हणे, मेव्हणी अशा नातेवाईकांना पण कोणत्याही प्रकारे फायदा करून घेतला नाही.
    याचे अप्रूप, आश्चर्य लाॅजवासी देशवासियांना वाटत नाही. ही एक मोठी शोकांतिका आहे.
    अनेक चॅनेल मिडियावाले बुमर व एनजीओ, पुरोगामी व राजकीय विरोधक व शासकीय यंत्रणा, न्यायाधीश, न्यायालये(यांनी 10-12 वर्षे लांबवली) पुर्ण ताकतीने मोदींना घेरुन नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. व मुस्लिम विरोधी म्म्हणुन हिणवले.
    परंतु या मोदी नावाच्या अजब माणसाने एका बाजुने नेटाने सहन करत दुसर्या बाजुने विकास कामे पण आणि सामान्य माणसाच्या समस्या पण सोडवल्या.
    गुजरात शेती विकासाचा रेट पण चायनाच्या पुढे नेला. नर्मदा धरण, जलधारा योजना यांनी गुजरात ला इतर राज्याना खुप मागे टाकले. रोड, विज पाणी व शांतता याची पण चोख व्यवस्था ठेवली.

    आपण भारतीय कीती स्वार्थी व निच आहोत हे दाखवून देत आहोत.
    मिडियावाले ची बिहार युपी इलेक्शन वेळी जशी मोदी विरोधात कोल्हेकुई केली तशी आता गुजरात मध्ये करत आहेत.

    या देशाचा जो कोणी विकास करण्याचा प्रयत्न केला/नेतृत्व आले त्याला घेरुन, नेस्तनाबूत व डिफेम करुन आयुष्यातुन उठवला.
    यामागे निश्चित अशी रणनीती आहे.
    या देशाची जनता कायम पंगु राहिल व त्यांच्या कडे बोट दाखवून विकास रोखणे सहज शक्य झाले आहे. (आजच गुजरात मधील व्यापारी जिएसटी बद्दल प्रश्न विचारल्या वर फुटपाथ वर झोपणार्या चे नाव घेत होता तर दुसरी कडे इथुन 15 किलोमीटर वर नेवर्क नाही तर डिजिटलायझेशन मोदी कसे करणार हे विचारून दिशाभूल करत आहे कारण त्या व्यवसायीकाला टॅक्स चोरी करता येणार नाही ही खरी पोटंदुखी आहे) पंरतु मिडियावाले सामान्य मतदारांना गुमराह करण्याचा प्रयत्न करत आहेत.
    गुजरातच्या 2012 इलेक्शन मध्ये पण असेच मोदीना घेरले होते. पण यावेळी हार्दिक पटेला ऊभे करुन परत एकदा जातीय राजकारणाचा डाव टाकला आहे व मिडियावाले प्रचंड ताकतीने मोदी व भाजपला पराभुत करायला जुडले आहेत..
    आणि अशा मोक्याच्या वेळी
    याची फळे सर्वांत जास्त गुजरात व्यवसायीकांना मिळाला. व गुजरात ने मोदी सारखा कणखर, स्वछ, दुरदृष्टी व राष्ट्रवादी, राष्ट्रभक्त नेता देशाला मिळाला.
    परंतु हेच व्यवसायीक आज नोटबंदी, व जिएस्टी मुळे वैयक्तिक फायद्या साठी मोदींना आडवे करायला निघाल्याचे चित्र निर्माण करून सामान्य माणसाला/मतदाराला गुमराह करत आहेत.
    मोदी भाजपचा गुजरात मध्ये पराभव झाला की 2019 ला भाजपला रोखता येईल हे निश्चित करुन रणनीती आखली आहे.
    परंतु या देशाची लोकशाही कांद्या डाळीच्या भावाने डळमळु शकते हे पक्के माहित आहे तशीच ती मोदींच्या भाजपला गुजरात मध्ये रोखले की केंद्रात पण धुळ चारता येईल ही निश्चित खुणगाठ बांधली आहे. पण या देशद्रोहींना मोदी हे नुसते आज गुजरात चे नेते नाहीत तर पुर्ण देशाचे नेतृत्व तर आहेच पण जगाचे पण एक महत्वाचे नेतृत्व झाले आहे हे विसरले आहे.
    त्याचमुळे 2019 मध्ये परत पुन्हा देशवासी मोदी सारख्या खमक्या (सर्जीकल स्टाईक, डोकलाम मधील रणनीती, देशाच्या संरक्षण defence विषयी पावले, शेतकरी ना युरीया, गरिबांना गॅस व सिलिंडर, विज पाणी व राज्य पातळी वर शिवराज चौहान, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणीस दिले आहे जे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहे) नेतृत्वा पाठीशी एकदिल होऊन ऊभा राहुन. परत पंतप्रधान पदावर बसवेल. कारणं भारता सारख्या खंडप्राय देशाचा कायापालट व्हायला कमीत कमी एक दिड दशक लागेल हे सामान्य माणसाला निश्चित माहिती आहे. यामुळे जर भाजपचा पराभव गुजरात मध्ये झाला तर याचा दुरगामी परिणाम म्हणुन इतर देशवासि (लाॅजवासि सोडुन) घेऊन 2019 मध्ये परत 360 चा आकडा पार करतील.
    त्यामुळे या मिडियावाल्यांचा पुढील प्लान काय आहे हे मोदी शहा जोडगोळी राजकीय द्रुष्टीने माहिती आहे बरोबरच सामान्य माणसाला पण अच्छे दिन साठी नाही पण सच्चे दिन या छोट्याशा स्वार्था मुळे माहिती आहे.
    भाऊ आपले लेख याची झलक वारंवार देत असतात. व त्यामुळेच लोकप्रिय आहे आणखी होत आहे.
    एकेएस

    ReplyDelete
  2. गुजरातमध्ये जनसंघ-भाजप १९८५ पर्यंत नक्कीच बलिष्ठ नव्हता. पण नंतर परिस्थिती पालटली. उत्तर भारतात झाले त्याप्रमाणे समाजवाद्यांचा र्‍हास झाल्यानंतर काँग्रेसविरोधी मते भाजपकडे गेली हा फायदा भाजपला १९९० नंतर झालाच. तरीही मला वाटते आणखी काही गोष्टींचा अंतर्भाव करायला हवा.

    १९७० च्या दशकापासूनच जनसंघाने राज्यात आपले स्थान निर्माण करायचा शिस्तबध्द प्रयत्न सुरू केला होता. मोदींनी २०१४ ची निवडणुक जिंकल्यावर ते दिल्लीला पंतप्रधान म्हणून जाणार हे नक्की झाल्यावर त्यांना गुजरात विधानसभेत निरोप देण्यात आला होता. त्यावेळी विरोधी पक्षनेते होते काँग्रेसचे शंकरसिंग वाघेला. मोदींच्या निरोप समारंभात वाघेलांना भरून आले होते. त्याचे कारणही तसेच होते. वाघेलांनी आठवण सांगितली की १९८० च्या दशकात त्यांनी नरेंद्र मोदींना मागे घेऊन स्कुटरवरून गुजरात पिंजून काढला होता आणि पक्षाचा प्रचार केला होता. त्यावेळी वाघेला हे पक्षाचे कितीतरी मोठे नेते होते आणि मोदींना फार कोणी खिजगणतीत धरत नव्हते. हळूहळू वाघेला आणि इतर वरीष्ठ नेत्यांच्या प्रयत्नांना यश येऊ लागले.

    १९८७ मध्ये नरेंद्र मोदींना अहमदाबाद महापालिकेच्या निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली होती. या निवडणुका भाजपने जिंकल्या. तसेच सौराष्ट्रमधील मालियाची पोटनिवडणुकही जिंकली. या दरम्यानच शहाबानो प्रकरण, अयोध्येतील मंदिराचे कुलूप उघडणे यामुळे हिंदुत्वाचे वारे वाहू लागले होते. त्याचा फायदा भाजपला झाला. त्यातच १९८९ च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरच अयोध्येत प्रस्तावित राममंदिराचा शीलान्यास झाला. या पार्श्वभूमीवर भाजपने १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये २६ पैकी १२ जागा जिंकून आपला वाढलेला प्रभाव सिध्द केला होता. त्यावेळी भाजपची जनता दलाशी युती झाली होती पण लढवलेल्या १२ पैकी सगळ्या जागा भाजपने जिंकल्या होत्या हे विशेष.

    तेव्हा मला असे वाटते की गुजरात नंतर भाजपचा बालेकिल्ला झाला यामागे भाजप कार्यकर्त्यांनीही परिश्रम घेतले होते याचा वाटा खूप महत्वाचा आहे. जनता दलाची मते त्यात मिळून आणखी फायदा झाला. तरीही एक गोष्ट नमूद कराविशी वाटते. भाजप कार्यकर्त्यांचे जाळे तसे अनेक राज्यांमध्ये होते. अयोध्या प्रकरण-शाहबानो यामुळे वातावरण सगळ्या देशात तापले होते. पण त्याचा फायदा भाजपला गुजरातमध्ये जास्त का झाला असावा आणि इतर राज्यात तितक्या प्रमाणावर का झाला नसावा? याचे कारण (माझ्या मते) हे की गुजरातमध्ये हिंदू आणि इतर धर्मीय यांच्यातील राहणीमानात बराच फरक आहे. गुजरातमध्ये समाज बर्‍यापैकी शाकाहारी (आणि जैन धर्माच्या प्रभावामुळे थोडा कट्टर शाकाहारी) तर अन्य धर्मीय अर्थातच मांसाहारी. बंगालमध्ये हिंदू-मुस्लिम यांच्या राहणीमानात तितका फरक नाही. बंगालमध्ये अगदी ब्राह्मणही मासे खातात. बंगाली साहित्याला हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजातील साहित्यिकांचे योगदान होते. तशी परिस्थिती गुजरातमध्ये नव्हती आणि 'आम्ही विरूध्द ते' ही दरी गुजरातमध्ये राहणीमानात खूप फरक असल्यामुळे अधिक खोल होती. अशा परिस्थितीत गुजरातमध्ये भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अधिक पाठिंबा मिळणे शक्य झाले. अर्थात हा माझा तर्क आहे. तो कितपत बरोबर आहे याची कल्पना नाही.

    ReplyDelete
  3. एक नंबर विश्लेषण आहे भाऊ अगदी सोप्या आणि सरळ भाषेत हेअगदी खर आहे की मतदार मतदारच असतो

    ReplyDelete