Saturday, December 9, 2017

पाच वर्षातला फ़रक

Image result for modi maulvi topi

मागल्या २२ वर्षात गुजरातमध्ये कुठलाच बदल झाला नाही की विकास झाला नाही, या भूमिकेतून कॉग्रेस व राहुल गांधी यांनी दोन महिन्यापुर्वी निवडणूक प्रचाराला सुरूवात केली होती. वादासाठी राहुलचा हा आरोप मान्य करूयात. गुजरात बदलला नसेल. पण खुद्द कॉग्रेस तरी नक्कीच बदलली आहे. कारण मागल्या सतरा वर्षात प्रथमच गुजरातमध्ये दंगल वा मुस्लिम हा विषय कुठल्या कुठे बेपत्ता झाला आहे. आज अनेकांना एक गोष्ट आठवत नाही. अगदी आपल्याला सर्वात शहाणे समजणार्‍या पत्रकार वाहिन्यांनाही विस्मृतीचा झटका आलेला आहे. मागल्या विधानसभा निवडणूकीत हेच लोक एका मौलवीचे चित्रण लाखो वेळा सातत्याने प्रक्षेपित करीत होते. आज तो मौलवी आणि तशा मुस्लिम टोप्या घातलेले लोक कोणीही वाहिनी कटाक्षाने दाखवायचे टाळत आहे. हा महत्वपुर्ण बदल नाही काय? त्या निवडणूकीत मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी महिनाभर राज्यव्यापी सदभावना यात्रा काढलेली होती. त्या यात्रेच्या एका सोहळ्यात एक मौलवी त्यांच्यापर्यंत व्यासपीठावर पोहोचला आणि त्याने मोदींना इस्लामी टोपी देऊ केली होती. पण मोदींनी नम्रपणे ती टोपी नाकारली होती. त्या सगळ्या प्रचारात मोदी कुठेही हिंदू मुस्लिम शब्द बोलत नव्हते, तर फ़क्त साडेपाच कोटी गुजराती समाजाच्या विकासाच्या प्रगतीच्या गोष्टी बोलत होते. उलट प्रत्येक विरोधक व पत्रकार मोदींना केवळ मुस्लिम टोपी कशाला नाकारली, म्हणून एकच प्रश्न सातत्याने विचारत होता. तेव्हा गुजरातला विकासाची गरज नव्हती आणि तिथले सर्व प्रश्न केवळ मुस्लिम टोपी घालून सुटणार होते काय? नसेल तर तो प्रश्न लाखभर वेळा कशाला विचारला गेला होता आणि आज तोच प्रश्न वा विषय गायब कशाला झाला आहे? आज कोणी मुस्लिम वा टोपीविषयी कशाला बोलत नाही?

थोडक्यात बाकी काही बदल मोदी व भाजपाच्या कारकिर्दीत झालेला नसेल, तरी एक मोठा मूलभूत फ़रक मागल्या पाच वर्षात पडलेला आहे आणि तो म्हणजे मुस्लिम व्होटबॅन्क नावाचे थोतांड निकालात निघालेले आहे. आज कोणी किती मुस्लिमांना उमेदवारी दिली असा प्रश्न भाजपाला केलेला नाही, किंवा कॉग्रेसनेही किती मुस्लिम उभे केलेत याची चर्चा कुठे कानावर आलेली नाही. पाच वर्षात एक मोठा बदल राजकीय विश्लेषणात व कॉग्रेसच्या राजकीय आकलनात आलेला आहे आणि तो म्हणजे गुजरातमध्ये मुस्लिम लोकसंख्या ८-९ टक्के आहे, याचे तमाम सेक्युलर पुरोगाम्यांना पुरते विस्मरण होऊन गेलेले आहे. कुठल्या बातमीपत्रात मुस्लिमांचा उल्लेख येत नाही. किंवा कुठल्या वाहिनीच्या निवडणूक बातम्यांमध्ये मुस्लिम टोप्या घातलेले पुरूष वा बुरखेधारी महिलांना कोणी दाखवत नाही. गुजरातच्या जुन्या दंगलीत बेघर झालेले लोक किंवा तिथे हिंदू मुस्लिम, अशी पडलेली दुफ़ळी कोणाला आठवेनाशी झाली आहे. मोदी वा भाजपाने हा किती मोठा बदल मागल्या पाच वर्षात घडवून आणला आहे ना? एकूणच पुरोगामी व कॉग्रेसी विचारसरणीत हा आमुलाग्र बदल झालेला आहे. त्यांना आता मुस्लिमांच्या न्यायाची वा हक्काची फ़िकीर राहिलेली नाही. तर हिंदू मंदिरे व त्याला भेटी देण्याचे अगत्य पुरोगाम्यांना वाटू लागलेले आहे. त्या कालखंडात मोदींनी कुठल्या मंदिराला भेट दिली, तर त्याला हिंदूत्व चिकटवणारेच आता राहुलच्या मंदिर भेटीविषयी प्रश्न विचारत नाहीत. उलट राहुल व त्यांचे कुटुंबिय कसे शिवभक्त वगैरे आहेत, त्याची कौतुके सांगितली जात असतात. बदल असा क्रमाक्रमानेच होत असतो. हळुहळू देशाचा प्रश्न हिंदू मुस्लिमांचा नसून कुठलीही धर्माची टोपी घातल्याने त्या धर्माच्या लोकांना न्याय मिळतो, असल्या भ्रमातून पुरोगामी बाहेर पडलेले असतील, तर त्याचे श्रेय मोदींना द्यावेच लागेल.

गेल्या २२ वर्षात भाजपाने काय केले किंवा गुजरातमध्ये काय झाले, असा प्रश्न विचारणार्‍यांना आपल्या आयुष्यात व विचारात किती बदल झाला आहे, त्याचेही भान नसेल तर त्यांची कींव करावी लागेल. कारण बदल गुजरातच्या मतदारात वा भाजपात झालेला नाही. ते आपल्या जागी तसेच आहेत आणि शहाण्यासारखा विचार करू शकत आहेत. बदल झाला आहे, तो पुरोगामी म्हणवणार्‍या शहाण्यांमध्ये झालेला आहे. त्यांना हिंदू मुस्लिम हा वादाचा विषय नसल्याचा साक्षात्कार प्रथमच झाला आहे. त्यामुळे चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात, तसे हे लोक आज दंगलीचा विषय बाजूला ठेवून मोदींना विकासाविषयी प्रश्न विचारत असतात. पाच वर्षापुर्वी मोदी सातत्याने विकास व प्रगतीच्या गोष्टी बोलत होते, तेव्हा यापैकी किती लोकांना विकासाचा तपशील ऐकून घेण्याचा संयम होता? उलट भाजपा वा मोदींनी किती विकासाच्या गोष्टी केल्या तरी हे पुरोगामी लोक कुठूनही विषय मुस्लिम व दंगलीकडे घेऊन यायचे. त्यांना असल्या प्रश्नांचे उत्तर तेव्हाही गुजरातच्या मतदाराने दिलेले होते आणि नंतर दिड वर्षांनी देशभरच्या मतदाराने चोख उत्तर देऊन चपराक हाणलेली होती. त्याला तीन वर्षे उलटून गेल्यावर आता हे लोक मोदींना विकासाच्या विषयावर बोलायचा आग्रह धरत आहेत. मग मोदी कधी त्या विषयावर बोलत नव्हते? तुमची ऐकण्याची तयारी होती काय? असा प्रश्न कोणी केलाच तर मोदी यांना सुनावत होते, तुमची सुई २००२ मध्येच अडकून पडलेली आहे आणि गुजरात कधीच पुढे निघून आलेला आहे. मग मुद्दा असा येतो, की मोदींनी काय बोलावे किंवा काय विषयाचा उहापोह करायचा, हे मोदींना स्वातंत्र्य नाही काय? विरोधकांना हव्या त्या विषयावर बोलण्याचीच सक्ती घटनेने व लोकशाहीने मोदींवर केलेली आहे काय? नसेल तर असली बाष्कळ बडबड तेव्हा कशाला चालली होती? आणि आज विकास कशाला आठवला आहे?

जगाचा इतिहास तपासला तर शहाण्यांनी कधी इतिहास घडवला नाही किंवा बदलला नाही. सामान्य लोकांनी व त्यांना प्रिय असलेल्या नेत्यांनी जे कर्तृत्व गाजवले त्यातून जगाचा चेहरामोहरा बदलत राहिला आहे. शहाण्यांना त्याचा साक्षात्कार होईपर्यंत जग आणखीनच बदलून गेलेले असते. इतिहासाचे विश्लेषण करणार्‍यांना कधी इतिहास घडत असताना त्याचे आकलन झाल्याचाही इतिहास नाही. वर्तमान समजून घेण्यापेक्षा कायम इतिहासात रमलेल्यांना वर्तमानाचे आकलन होत नाही. म्हणूनच त्यांना त्यात बदलत चाललेला इतिहास ओळखता येत नाही. मात्र सामान्य जनतेला तो बदल कळत असतो आणि त्यात सामान्य लोक उत्साहाने सहभागी होत असतात. त्या गडबडीत आपणही किती बदलून गेलो, तेही ज्यांना उशीरा उमजते, त्यांना शहाणे म्हणून मिरवण्याची हौस असते. म्हणूनच पाच वर्षापुर्वी गुजरात कसा बदलत होता, ते ज्यांना उमजलेले नव्हते; त्यांना आजही गुजरात किती बदलून गेला आहे, ते अजून समजलेले नाही. आपल्यातला बदल त्यांना समजू शकलेला नाही. तसे नसते, तर त्यांनी विकासावर मोदी का बोलत नाहीत, असा खुळचट प्रश्न विचारला नसता. ‘इंडियाटुडे’ वाहिनीचा कार्यकारी संपादक राहुल कन्वल आपल्या ट्वीटमध्ये म्हणतो, इतर राज्यांपेक्षा गुजरातमध्ये निवडणूकांची बातमीदारी करणे सुखदायक असते. इथे रस्ते सुसज्ज आहेत, सर्वत्र अनेक सुविधा आहेत. धावपळ नाही, तारांबळ नाही. इतक्या सुखासमाधानाने जर त्याला बातमीदारी करता येत असेल, तर विकासाचाच तो परिणाम असल्याचे त्याच्या डोक्यात कशाला शिरत नाही? कारण तो तथाकथित बुद्धीमंत आहे आणि त्याला डोळ्यांना दिसणारे वा ज्ञानेंद्रियांना अनुभवणारे सत्य समजून घेता येत नाही, म्हणून तो बुद्धीमान असतो. ही देशातल्या पत्रकार, माध्यमे, जाणकार व विश्लेषकांची शोकांतिका होऊन बसली आहे.


9 comments:

  1. भाऊ,
    उत्तुंग षटकार!

    ReplyDelete
  2. भाऊ निवडणूकीच्या गोंधळात हे बिटवीन द लाईन्स तुम्ही अधोरेखित केलात...आपले आभार

    ReplyDelete
  3. अगदी बिटवीन द लाईन्स गोष्टी अधोरेखित केल्यात..आपले आभार

    ReplyDelete
  4. कमाल लिहिलंय भाऊ!

    ReplyDelete
  5. भाऊ मुस्लीम मतपेढीला सगळ्यात पहील्यादा अमित शहांनी 2014 मधे उत्तर प्रदेशात सुरुंग लावला 80 मधून 73 जागा 1991 च्या अयोध्या लाटेतही आल्या नव्हत्या 2017 मधे परत त्याची पुनरावृत्ती झाली अमित शहा यांचे भारतीय राजकारणातील योगदान हेच आहे की त्यांनी मुस्लीम मतपेढीची किंमत शुन्य करून टाकली आहे

    ReplyDelete
  6. हाहाहा ठेवणीतली हाणली की भाऊ,घोष वाक्य एकदम चपखल बसते इथे हां, नाहीतरी देऊ की हाणू नाठाळाच्या :D

    ReplyDelete
  7. भाऊ
    सही एकदम मस्त..
    गेली 14 वर्षे मोदींना गुजरात दंगली वरुन मिडियावाल्यानी वनवास भोगायला लावला आहे. आणि तरीही मोदी एवढे सहन करुन हा माणूस निग्रहाने ऊभा राहिला. बरं यात कोणत्याही प्रकारे वैयक्तिक फायदा प्राॅपर्टी, स्वीस बँकेत पैसे, भाऊ, मेव्हणे, मेव्हणी अशा नातेवाईकांना पण कोणत्याही प्रकारे फायदा करून घेतला नाही.
    याचे अप्रूप, आश्चर्य लाॅजवासी देशवासियांना वाटत नाही. ही एक मोठी शोकांतिका आहे.
    अनेक चॅनेल मिडियावाले बुमर व एनजीओ, पुरोगामी व राजकीय विरोधक व शासकीय यंत्रणा, न्यायाधीश, न्यायालये(यांनी 10-12 वर्षे लांबवली) पुर्ण ताकतीने मोदींना घेरुन नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. व मुस्लिम विरोधी म्म्हणुन हिणवले.
    परंतु या मोदी नावाच्या अजब माणसाने एका बाजुने नेटाने सहन करत दुसर्या बाजुने विकास कामे पण आणि सामान्य माणसाच्या समस्या पण सोडवल्या.
    गुजरात शेती विकासाचा रेट पण चायनाच्या पुढे नेला. नर्मदा धरण, जलधारा योजना यांनी गुजरात ला इतर राज्याना खुप मागे टाकले. रोड, विज पाणी व शांतता याची पण चोख व्यवस्था ठेवली.

    आपण भारतीय कीती स्वार्थी व निच आहोत हे दाखवून देत आहोत.
    मिडियावाले ची बिहार युपी इलेक्शन वेळी जशी मोदी विरोधात कोल्हेकुई केली तशी आता गुजरात मध्ये करत आहेत.

    या देशाचा जो कोणी विकास करण्याचा प्रयत्न केला/नेतृत्व आले त्याला घेरुन, नेस्तनाबूत व डिफेम करुन आयुष्यातुन उठवला.
    यामागे निश्चित अशी रणनीती आहे.
    या देशाची जनता कायम पंगु राहिल व त्यांच्या कडे बोट दाखवून विकास रोखणे सहज शक्य झाले आहे. (आजच गुजरात मधील व्यापारी जिएसटी बद्दल प्रश्न विचारल्या वर फुटपाथ वर झोपणार्या चे नाव घेत होता तर दुसरी कडे इथुन 15 किलोमीटर वर नेवर्क नाही तर डिजिटलायझेशन मोदी कसे करणार हे विचारून दिशाभूल करत आहे कारण त्या व्यवसायीकाला टॅक्स चोरी करता येणार नाही ही खरी पोटंदुखी आहे) पंरतु मिडियावाले सामान्य मतदारांना गुमराह करण्याचा प्रयत्न करत आहेत.
    गुजरातच्या 2012 इलेक्शन मध्ये पण असेच मोदीना घेरले होते. पण यावेळी हार्दिक पटेला ऊभे करुन परत एकदा जातीय राजकारणाचा डाव टाकला आहे व मिडियावाले प्रचंड ताकतीने मोदी व भाजपला पराभुत करायला जुडले आहेत..
    आणि अशा मोक्याच्या वेळी
    याची फळे सर्वांत जास्त गुजरात व्यवसायीकांना मिळाला. व गुजरात ने मोदी सारखा कणखर, स्वछ, दुरदृष्टी व राष्ट्रवादी, राष्ट्रभक्त नेता देशाला मिळाला.
    परंतु हेच व्यवसायीक आज नोटबंदी, व जिएस्टी मुळे वैयक्तिक फायद्या साठी मोदींना आडवे करायला निघाल्याचे चित्र निर्माण करून सामान्य माणसाला/मतदाराला गुमराह करत आहेत.
    मोदी भाजपचा गुजरात मध्ये पराभव झाला की 2019 ला भाजपला रोखता येईल हे निश्चित करुन रणनीती आखली आहे.
    परंतु या देशाची लोकशाही कांद्या डाळीच्या भावाने डळमळु शकते हे पक्के माहित आहे तशीच ती मोदींच्या भाजपला गुजरात मध्ये रोखले की केंद्रात पण धुळ चारता येईल ही निश्चित खुणगाठ बांधली आहे. पण या देशद्रोहींना मोदी हे नुसते आज गुजरात चे नेते नाहीत तर पुर्ण देशाचे नेतृत्व तर आहेच पण जगाचे पण एक महत्वाचे नेतृत्व झाले आहे हे विसरले आहे.
    त्याचमुळे 2019 मध्ये परत पुन्हा देशवासी मोदी सारख्या खमक्या (सर्जीकल स्टाईक, डोकलाम मधील रणनीती, देशाच्या संरक्षण defence विषयी पावले, शेतकरी ना युरीया, गरिबांना गॅस व सिलिंडर, विज पाणी व राज्य पातळी वर शिवराज चौहान, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणीस दिले आहे जे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम आहे) नेतृत्वा पाठीशी एकदिल होऊन ऊभा राहुन. परत पंतप्रधान पदावर बसवेल. कारणं भारता सारख्या खंडप्राय देशाचा कायापालट व्हायला कमीत कमी एक दिड दशक लागेल हे सामान्य माणसाला निश्चित माहिती आहे. यामुळे जर भाजपचा पराभव गुजरात मध्ये झाला तर याचा दुरगामी परिणाम म्हणुन इतर देशवासि (लाॅजवासि सोडुन) घेऊन 2019 मध्ये परत 360 चा आकडा पार करतील.
    त्यामुळे या मिडियावाल्यांचा पुढील प्लान काय आहे हे मोदी शहा जोडगोळी राजकीय द्रुष्टीने माहिती आहे बरोबरच सामान्य माणसाला पण अच्छे दिन साठी नाही पण सच्चे दिन या छोट्याशा स्वार्था मुळे माहिती आहे.
    भाऊ आपले लेख याची झलक वारंवार देत असतात. व त्यामुळेच लोकप्रिय आहे आणखी होत आहे.
    एकेएस

    ReplyDelete