Thursday, December 14, 2017

घाबरावे, पण कोणाला?

teesta setalvad to be probed के लिए इमेज परिणाम

काही वर्षापुर्वी एक गोष्ट वाचली होती. अमेरिकेच्या कुठल्या नाट्यगृहात अब्राहम लिंकन यांच्या जीवनावरील एक नाटकाचे अनेक प्रयोग सातत्याने चालले होते आणि त्यात लिंकन यांची भूमिका करणारा अभिनेता अप्रतिम अभिनय करीत होता. पण सतत तोच प्रयोग व अभिनय करताना तो भूमिकेच्या इतका आहारी गेला, की त्याला आपणच लिंकन असल्याचा भ्रम झाला होता. एका प्रयोगानंतर तो तशाच वेशभूषेत नाट्यगृहातून बाहेर पडला आणि लोक त्याच्याकडे चमत्कारीक दृष्टीने बघू लागले. पण त्याला अशा नजरांची वा प्रतिक्रीयांची अजिबात पर्वा नव्हती. तो लिंकन असल्याच्या थाटात वागत बोलत होता. अखेरीस रस्त्यावर खुप गडबड होऊ लागली म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले, तेव्हा त्याची बोबडी वळली. पोलिसांनी त्याची कसुन चौकशी केली आणि अखेरीस यांत्रिक तपासणीही केली. तर मजेची गोष्ट अशी उघडकीस आली, की यंत्रानेच त्याला लिंकन ठरवले होते. पोलिसांना घाबरून तो आपण लिंकन नसल्याचे सांगू लागला, तर यंत्राने दाखवले की तो खोटे बोलत आहे. त्याचे कारण असे होते, की त्याला मनोमन आपण लिंकन असल्याचे वाटत होते आणि पोलिसांच्या भयाने तो मनातले सत्य नाकारत होता. पुण्यात जुन्या काही पुरोगामी कलावंतांचा मेळा भरला होता आणि तिथे सतिश आळेकर या ज्येष्ठ नाटककाराने केलेल्या वक्तव्यामुळे ही गोष्ट आठवली. आळेकर, पुष्पा भावे अशी मंडळी मुळातच पुरोगामी पठडीतली आहेत. त्यामुळे त्यांनी आजवर जे काही भ्रम जगाला सांगितले त्यातून जग आता बाहेर पडले असले तरी त्या भ्रमातून बाहेर पडायला हीच मंडळी घाबरलेली आहेत. त्यामुळे त्यांना देशात ज्या विचारांचे सरकार आहे त्याची भिती वाटू लागली आहे. थोडक्यात खोटे बोलण्याची सवय लागल्याने त्यांना खरे बघायची वा ऐकायची भिती वाटू लागली असेल, तर नवल नाही.

योगायोग असा, की अलिकडेच निरंजन टकले नावाच्या पुरोगामी इसमाने एक लोणकढी थाप मारली आणि त्याचा खुप गवगवा अशा पुरोगामी टोळीने केला होता. त्याचा बुडबुडा फ़ुटला तरी यापैकी अनेकांना आपल्या थापा लोकांना पटल्या असल्याचे भ्रम होत असतील म्हणून काही बिघडत नाही. अशी वाह्यात बडबड किंवा लिखाण जीवावर उदार होऊन टकले यांनी केल्याचाही साक्षात्कार हरि नरके सारख्या दिवाळखोरांना झाला. त्यांना जीव धोक्यात घालणे आणि कुणाचे तरी पैशाचे पाकिट खिशात घालणे यातलाही फ़रक उमजत नसावा. मुद्दा इतकाच, की सत्य लोकांपासून लपवले जाते त्याला घाबरायचे असते. सत्याचा अपलाप होतो, त्यामुळे भयभीत व्हायला हवे. पण जे स्वत:च खोट्याचा व्यापार करतात, त्यांना खोट्यावर गदा येऊ लागली मग भय सतावू लागले तर नवल नाही. दोन दशकापुर्वी पुष्पा भावे रोज उठून न्यायालयाचे दार ठोठावत होत्या आणि सोबत शीला किणी नावाच्या महिलेला घेऊन जात होत्या. त्या महिलेचा पती रमेश किणी पुण्याच्या अलका टॉकीजमध्ये शंकास्पद रितीने मृतावस्थेत आढळला होता. तर त्याचा खुन व राज ठाकरे यांनीच केल्याचा शोध पुष्पा भावे यांनी लावला होता आणि तेच कोर्टात सिद्ध करण्यासाठी त्या उठसुट कोर्टात जात होत्या. अखेरीस सर्व प्रकारचे तपास होऊनही काही सिद्ध झाले नाही, तेव्हाही पुष्पा भावेंनी तेच नाटक रंगवल्यावर कोर्टाने त्यांना हाकलून लावले होते. पुढे शीला किणींचे काय झाले, त्याची दखलही भावेंना घ्यावीसे वाटले नाही. जोवर किणीच्या मुडद्याचे राजकीय भांडवल करून लोकांना शिवसेनेविषयी भयभीत करता येत होते, तोवरच शीला किणींचा उपयोग पुष्पा भावे यांनी करून घेतला आणि आपल्या जाज्वल्य पुरोगामीत्वाची साक्ष दिलेली होती. या लोकांना नेहमी सत्याची सतत भिती वाटत असते. त्याचा आणखी एक पुरावा आळेकर मुक्ताफ़ळे उधळत असतानाही समोर आलेला आहे. पण त्याची कुठे बातमीही आली नाही.

सहा डिसेंबर रोजी बाबरी पाडली गेली आणि त्याच दिवशी कोलकात्यात घाशीराम कोतवालचा प्रयोग असल्याचे आळेकर कौतुकाने आठवून सांगतात. यावर्षी त्या दिवशी त्या घटनेला पंचवीस वर्षे झाल्याचेही त्यांना आठवते. पण यावर्षी त्याच दिवशी सुप्रिम कोर्टाने एका विषयात निकाल दिला, त्याचा मागमूस कुठल्याही वर्तमानपत्रात दिसू नये, याची त्यांना भिती वाटलेली नाही. २००२ पासून गुजरात दंगलीचे भांडवल करून कोट्यवधी रुपयांची माया जमवणार्‍या तीस्ता सेटलवाड, यांच्या त्या धंद्यातील अफ़रातफ़रीची चौकशी करण्याचा मार्ग सुप्रिम कोर्टाने ६ डिसेंबरला एक निकाल देऊन मोकळा केला. मागल्या सात वर्षापासून ती चौकशी रोखून धरण्यात आली होती. गुजरात दंगल व अन्य प्रकरणात नरेंद्र मोदी व भाजपाच्या नेत्यांना खोट्या पुराव्यांच्या आधारे गोवण्याचा धंदा तीस्ताने मागली अनेक वर्षे चालविला होता. त्यात तिचा खास साथीदार असलेल्या रईस खान पठाण याने आपल्याच चौकशीची मागणी केली आहे. तीस्ताने आपल्याकडून खोटे साक्षीदार कसे बनवून घेतले त्याची त्याने कबुली दिलेली आहे. त्यानुसार कोर्ट व न्यायपालिकेच्या फ़सवणूकीचा तपास करण्याचा निर्देश अहमदाबादच्या सत्र न्यायालयाने दिलेला आहे. त्यानुसार नोंदण्यात आलेला गुन्हा व तपास रोखण्यासाठी तीस्ताने सतत न्यायालयातील डावपेच वापरले आणि ती चौकशी रोखून धरलेली होती. गुजरात हायकोर्टाने त्याला स्थगिती देण्यास नकार दिला आणि तीस्ताने सुप्रिम कोर्टात दाद मागितली होती. तिथे स्थगिती मिळवल्याने तीस्ता उजळमाथ्याने वावरत होती. आता ६ डिसेंबर रोजी तिचा स्थगितीचा अर्ज सुप्रिम कोर्टाने फ़ेटाळून लावल्याने तीस्ताच्या खोटेपणाची चौकशी व तपास करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मात्र त्या महत्वपुर्ण निकालाची बातमी देशातल्या कुठल्याही मुख्य वर्तमानपत्र वा वाहिनीने दिली नाही, दोन दिवसांनंतर टाईम्स नाऊवर ही बातमी शनिवारी झळकली.

ज्यांना भिती वाटते त्या लोकशाहीवादी लोकांना माध्यमांच्या या स्वयंघोषित गळचेपीची भिती वाटायला हवी. जेव्हा अविष्कार किंवा सत्यकथनाची गळचेपी होते, तेव्हा कलाकाराने बोलले पाहिजे असे आळेकर म्हणतात. त्यांना तीस्ताच्या विरोधातली बातमी देशातल्या प्रमुख माध्यमांनी दडपून टाकल्याची भिती अजिबात वाटलेली नाही. त्यांना भिती कसली वाटते आहे? तर अशा भामट्यांनी व भुरट्यांनी दडपून टाकलेल्या बातम्या व सत्येही उजेडात आणायची मोकळीक आजच्या कारभारात मिळालेली आहे. मागल्या पंधरा वर्षात कुठल्याही कारणास्तव तीस्ताने कोर्टात धाव घ्यावी आणि त्यात गुजरात सरकारच्या वा मोदींच्या विरोधात एक शब्द जरी उच्चारला गेला, तरी त्याची सर्व वाहिन्या व वर्तमानपत्रात मोठी बातमी होत असे. पण तीस्ताने उभारलेले हे खोटेपणाचे व खोट्या साक्षीपुराव्याचे मायाजाल उघडकीस येणार म्हटल्यावर सर्व माध्यमे चिडीचुप झाली आहेत. आपण आजवर दडपलेले सत्य जगासमोर येण्याने पुरोगामी भयभीत झाल्यास नवल नाही. म्हणून तर निरंजन टकले यांचा धडधडीत खोटारडेपणा प्रकाश बाळ यांनी जगासमोर कथन केल्याने नरके विचलीत होतात आणि सत्य समोर येण्याचा मार्ग सुप्रिम कोर्टाने खुला केल्यावर आळेकर आदी मंडळी भयभीत होऊन जातात. गुजरातच्या दंगलीत होरपळलेल्या अनेक गरीब मुस्लिमांना न्याय देण्याच्या नावाखाली खोटे साक्षीदार बनवण्यात आले आणि त्यांच्याकडून कोर्‍या कागदावर सह्या घेऊन वाटेल ते आरोप लिहून काढण्यात आल्याचा हा मामला आहे. त्याची वाच्यता कुठल्या इंग्रजी वा मराठी वर्तमानपत्रात नसावी, ही बाब कुठल्याही प्रामाणिक पत्रकार कलाकार वा बुद्धीमंतांना चिंतीत करून गेली पाहिजे. पण जे कोणी असे मिरवतात, तेच मुळात तोतया असले तर त्यांना आपले पाप चव्हाट्यावर येण्याच्या भितीने ग्रासले तर नवल नाही ना?

11 comments:

  1. या मंडळींचे असेच आहे. खोटे बोल पण रेटून बोल असे बीजेपीचे लोक करतात असे सांगत असतात हे लोक पण स्वतःचे मात्र झाकून ठेवायचे. हा एक खेळ झाला आहे त्यांचा. स्वतः पॉवर मध्ये नसले की असे उद्योग करावयाचे व पॉवर मध्ये असल्यास खोट्या केसेस टाकून मोदी, बीजेपी व त्यांच्या माणसांना अडकवून ठेवायचे. हा नाद लागला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ही बातमी सांगणे या सर्वांना जड जात आहे. ही चौकशी झाल्यावर काय बाहेर येणार आहे हे फक्त जाहीर होण्याची वाट बघत आहोत. दूध का दूध होऊ दे लवकर.

    ReplyDelete
  2. Extremely truthful and studious.

    ReplyDelete
  3. आज एक अजुन निकाल आलाय तिची गोठवलेली मालमत्ता मोकळी करायला कोर्टाने नकार दिलाय

    ReplyDelete
  4. हे निरंजन टाकले म्हणजे तेच ना सावरकरांवर चिखलफेक करणारे? Savarkar: A Lamb Lionized असा लेख लिहिला होता! तेव्हाच त्यांच्या पोटातली जळजळ कळली होती

    ReplyDelete
  5. भाऊ,
    "निरंजन टकले यांचा धडधडीत खोटारडेपणा प्रकाश बाळ यांनी जगासमोर कथन केला" ज्यामुळे नरके विचलीत झाले.
    या प्रकाश बाळ व नरके दोघांच्या लेखांच्या लिंक्स कृपया पाठवाल का ?
    बाळांना उपरती झाल्याचे वाचून बरे वाटले. त्यामुळे तो लेख वाचावयास वाटतो.
    बराच सर्च केला ,पण मला काॅम्प्यूटर मधले बेताचेच कळते त्यामुळे मला सापडला नाही. म्हणून तुम्हाला विनंती करतोय.

    ReplyDelete
  6. भाऊ ,,,,,,,,,,,नेहमी प्रमाणे मस्त लेख !! एकदम खडखडीत , मार्मिक ( टू द पॉईंट ) विश्लेषण !!............................. हे पुरोगामी उंदीर आता कोठल्या बिळात लपायचे याच्याच शोधात आहेत. ..........गिरीश कर्नाड , सतीश आळेकर , पुष्पा भावे.... यादी फार मोठी आहे. या लोकांना उदरनिर्वाहासाठी पैसे कोण आणि कसे देत याबद्दलही माहिती बाहेर यायला हवी. फोर्ड फाउंडेशन ते विविध ' एन.जी.ओ ' ........यांनी पोसलेली हि ' बांडगुळे ' आहेत. या बांडगुळांची पिढी जस जशी लयाला जाईल तस तसे नवीन पिढीतले ' वास्तव वादी ' यांची जागा घेतील अशी प्रार्थना व आशा करणे एव्हढेच आपल्या हाती.

    ReplyDelete
  7. Hi, could you please provide a link where Niranjan Takle has been proven false. I tried looking for it but could not find.

    ReplyDelete
  8. फारच मर्मभेदी!

    ReplyDelete
  9. मनाला विचार करायला लावणारा एक उत्तम लेख

    ReplyDelete