Friday, December 29, 2017

चौकशी नावाचा बकासूर

kamla mill fire के लिए इमेज परिणाम

कमला मिल कंपाऊंड या मध्यमुंबईच्या एका आलिशान परिसरात गुरूवारी रात्री अग्नितांडव झाले आणि त्यात पंधरा लोकांची आहुती पडलेली आहे. प्रत्येक मोठा राजकारणी व मान्यवराने तात्काळ त्यविषयी दु:ख व्यक्त केले आहे आणि बहुतेक राजकारण्यांनी चौकशीची मागणीही केलेली आहे. किंबहूना त्याच्याही पुढे जऊन काही नेत्यांनी गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशीही मागणी केली आहे. तुम्हीआम्ही अचंबित झाल्यासारखे या घटनेकडे बघत आहोत. त्या नेते मान्यवरांपासून थेट आपल्यापर्यंत सगळेच किती निर्ढावलेले कोडगे झालो आहोत ना? प्रामाणिकपणे आपल्या छातीवर हात ठेवून, आपल्यातला कोणीतरी म्हणू शकतो काय, की चकित होण्याइतकी ही अशक्य कोटीतली गोष्ट होती? तो अपघात होता असा निर्वाळा आपण देऊ शकतो काय? जिथे सर्व सुरक्षा व सावधानतेचे नियम पाळले जातात, अशी एक तर जागा मुंबईत शिल्लक आहे काय? मुंबई्चे नागरिक वा देशातील तमाम लोक किती प्रामाणिकपणे आपल्या कर्तव्याचे पालन करत असतात? नियमाचे व कायद्याचे अथांग जंगल गेल्या सत्तर वर्षात आपण उभे केले आहे. पण त्यातला एक एक नियम व कायदा तोडायला आपणच किती उत्सुक व उतावळे झालेले असतो? त्यातून अशा दुर्घटनांना आमंत्रण देत असतो. म्हणूनच पर्यायाने त्यात जेव्हा कोणाचा बळी जातो, तेव्हा आपण सगळे एक सुरात न्यायाची, चौकशीची वा कोणी गुन्हेगार असतील त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी अगत्याने करीत असतो. कारण यातले काही होणार नाही व होऊही नये, अशीच आपली प्रामाणिक इच्छा असते. त्यातून एक नवा आधुनिक बकासूर आपण जन्माला घातला आहे. त्याला आजचे जग चौकशी या नावाने ओळखते, या बकासुराने मागल्या सत्तर वर्षात अशा कित्येक दुर्घटना, भानगडीम, अफ़रातफ़री वा घोटाळे खाऊन फ़स्त केलेले आहेत.

एलफ़िन्स्टन रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाच्या चौकशीचे पुढे काय झाले? अशा शेकड्यांनी दुर्घटना वा भानगडींचे पुढे काय झाले आहे? त्यातून पुन्हा तशा घटनाच घडू नयेत, म्हणून कुठली पावले उचलली गेली आहेत? आताही मुख्यमंत्र्यांनी विनाविलंब या घटनेच्या चौकशीची घोषणा करून टाकली आहे. थोडक्यात चौकशी नावाच्या बकासुराला आणखी एक गाडाभर खाणे पाठवून देण्यात आलेले आहे. आणखी दोन दिवस आरडाओरडा चालेल आणि २०१८ सालच्या स्वागतासाठी अशाच कुठल्या अन्य मृत्यूच्या सापळ्यात मुंबईभरचे श्रीमंत वा त्यांचे आप्तस्वकीय तितक्याच उत्साहाने हजेरी लावणार आहेत. त्यापैकी कोणालाही दोन दिवसांपुर्वी कमला मिल परिसरात पंधरा लोकांची आहुती पडल्याचे स्मरणही असणार नाही. ते गोंगाट करून नववर्षाचे स्वागत करणार आहेत, नाचणार थिरकणार आहेत. प्रत्येकजण आपापल्या ऐपत व कुवतीनुसार आपापला मृत्यूचा सापळा शोधून त्यात झोकून देणार आहे. यात कुठे कुठे मृत्यूचे सापळे उभे आहेत, त्याची तिथे झोकून देणार्‍यांना पर्वा नसेल, तर त्यातूनच आपली तुंबडी व तिजोरी भरून घेणार्‍यांना कसली पर्वा असेल? का असावी? तुम्हाला मृत्यूची इतकीच ओढ लागलेली असेल आणि आपल्याच सुरक्षेची फ़िकीर नसेल, तर त्यातून कमाई करणार्‍यांना कशाला काळजी असावी? आपण आपापल्या परीने कमालीचे बेशरम व ढोंगी झालेलो आहोत. मात्र आपला तोच विकृत चेहरा लपवण्याची सातत्याने काळजी घेत असतो. मग त्यातून आपले अंग झटकण्यासाठी आपल्याला कोणी तरी गुन्हेगार शोधावा लागतो. कधी तो रेल्वेमंत्री वा स्थानिक पुढारी असतो. तर कधी तो कुठल्या पक्षाचा नेता वा प्रशासनाचा पैसेखाऊ अधिकरीही असू शकतो. त्याच्या माथी खापर फ़ोडले, मग आपल्याला गंगास्नान केल्यासारखे पापमुक्त झाल्याची अनुभूती होते आणि पुन्हा नवा बेशरमपणा करायला आपण सोवळे होऊन जातो.

भ्रष्ट लबाड लूटारू दुसरा कोणी तरी असतो. आपण सत्याचे पुतळे असतो. त्यामुळे आपल्यातून तसेच लोकप्रतिनिधी निर्माण होत असतात. इतकी प्राणघातक सोय ह्या कोणा मालकाने केली, म्हणून आज तो गुन्हेगार आहे. पण तिथे चैन करायला आलेल्यांनी तर पैसे मोजून मरण विकत घेतले आहे. इवल्या अपुर्‍या अरुंद जागेत पन्नासहून अधिक आलिशान भोजनालये आहेत म्हणतात. श्रीमंती व उच्चभ्रू मेजवान्यांसाठी तिथे सूर्य मावळल्यावर झुंबड उडायची म्हणे. तिथे आगीचा बंब येण्यासाठी पुरेशा रुंद रस्ता व जागाही नव्हती. ह्याला फ़क्त त्या हॉटेलचा मालक जबाबदार आहे? इतके पैसे मोजून चैन करायला जाणारे, खेड्यातून आलेले उपाशीपोटी अडाणी नक्कीच नसतात. चांगल्या महागड्या शाळा कॉलेजातून शिक्षण घेतलेले महाभागच तिथे येत असतात ना? मग त्यांना तिथल्या असुरक्षित वातावरणाचा सुगावा लागू शकत नसेल, तर त्यांची बुद्धी व शिक्षण काय चुलीत घालायचे असते? पाचव्या मजल्यावर जाण्यासाठी कुठलाही सुरक्षित मार्ग नाही वा कोंदट जागांमध्ये दाटीवाटीने थाटलेली ही आलिशान हॉटेले; म्हणजे साक्षात मृत्यूचे सापळे असल्याचे समजायला सामान्यबुद्धी पुरेशी आहे. पण झगमगाटाची भुरळ पडलेल्यांची बुद्धी कितीशी काम करणार? आता पालिकेवर, अग्निशामक दल वा सरकारवर खापर फ़ोडणे सोपे आहे. पण ज्यांची सारासार बुद्धी मेलेली आहे, त्यांनीच त्यात उडी घेण्याचा दोष तर पालिका वा कायद्याला देता येत नाही ना? भ्रष्ट घोटाळेबाजांनी मृत्यूचे सापळे उभे केलेत यात शंका नाही. पण त्यात झोकून देण्याला मौजमजा समजणार्‍यांना किती निष्पाप म्हणता येईल? लाच देणाराघेणारा गुन्हेगार आहे़च. पण त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागणारे, हे ज्यांच्या सामान्यबुद्धीलाही बघून लक्षात येत नाही, ते निरपराध कसे? विकतचे मरण घेंणारे स्वत:च्याच खुनाची सुपारी देणारे नसतात काय?

अर्थात इतके सत्य बोलायची हिंमत आपण खुप पुर्वीच गमावून बसलेलो आहोत. पण आता हे सत्य कोणी बोलायला गेला, तर ते ऐकून घेण्याचीही हिंमतही आपल्यात उरलेली नाही. म्हणूनच असे बोलणार्‍यावरच हल्ले होऊ शकतील. मृतांविषयी तरी सहानुभूती दाखवा असा शहाणपणाही शिकवला जाऊ शकेल. कारण आपण आजकाल पक्के बेशरम होऊन गेलो आहोत. आपल्याच जीवावर बेतलेले आहे, तरी सत्य बोलायला व ऐकायला आपण घाबरून जात असतो. त्याला सुशिक्षीतपणा वा सुसंस्कृत असणे मानले जा्ते आज. मग यापेक्षा काय वेगळे घडणार आहे? ज्यांनी सुविधा उभारायच्या त्यांनी सुरक्षेचे उपाय योजावेत, हे सत्य आहे आणि ती त्यांची जबाबदारी नक्कीच आहे. पण समोरच्याने उभारलेली सुविधा सुरक्षित नाही, हे दिसत असतानाही बेभान होऊन त्यातही मौज शोधण्यार्‍यांचा वाली कोण असू शकतो? आपल्यालाच साधेसुधे नियम पाळता येत नाहीत. नियम मोडण्यात आपल्याला पुरूषार्थ वाटत असेल, तर त्यातून कोणी नफ़ेखोर व्यापारी धंदा शोधत असला, तर त्याला एकाट्याला गुन्हेगार मानता येणार नाही. अशा लोकांनी आपल्या बेपर्वाईला कच्चा माल बनवून भ्रष्टाचार, लाचखोरी वा लूटमारीचे व्यवसाय उभे केलेले आहेत. त्यातले गिर्‍हाईक आपण आहोत. डोळे झाकून माल खरेदी करण्यात व त्याचीच अधिक किंमत मोजण्यातली आंधळी श्रीमंती, आपल्याला अधिकाधिक गाळात घेऊन चालली आहे. त्यामुळे असे मृत्यूचे सौदागर उदयास आलेले आहेत. अशी आलिशान खर्चिक वाढदिवसाची पार्टी त्या कुणाच्या रहात्या गच्चीवरही होऊ शकली असती. पण त्यांना श्रीमंतीचेच प्रदर्शन मांडण्याच्या हव्यासातून ही अशी असुरक्षित व्यवस्था उभी राहिली आणि पुढली अपरिहार्य दुर्घटना घडली. त्यातली बेपर्वाई वा प्रदर्शनकारी हव्यासाकडे काणाडोळा करून कोणी सुरक्षित होऊ शकणार नाही. आपण सगळे चौकशी नावाच्या बकासूराचे घास होऊन जाण्याला मग पर्याय उरत नसतो.

2 comments:

  1. भाऊ अतिशय परखड व प्रामाणीक लेख . पण सर्वसामान्य लोकांना किती पटेल शंका आहे .

    ReplyDelete
  2. नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे देण्याचे सौजन्य पण आजकाल राहिले नाही.
    ना महापौर राजीनामा देत, ना महापालिका आयुक्त देत ना मुख्यमंत्री.

    ReplyDelete