१९७० च्या दशकात ब्रिटनमध्ये हुजूर पक्ष अगदीच मरगळलेला होता आणि मजूर पक्ष जोरात होता. तिथली लोकशाही दोन पक्षात विभागली गेलेली असल्याने एका पक्षाला मरगळ आली की दुसरा पक्ष शिरजोर वाटू लागतो. पण केवळ एका पक्षात मरगळ असल्याने दुसर्या पक्षाला लोक उचलून धरतात असेही नसते. दुसर्या पक्षाचा नेता किती आक्रमकपणे लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतो, यालाही महत्व असते. म्हणूनच पक्षाची संघटना व पक्षाचे नेतॄत्व निवडणूकीच्या रणांगणात अत्यंत महत्वाच्या बाबी असतात. १९७० च्या आरंभी हुजूर पक्षात नेतृत्वाचा अभाव असल्यानेच मजूर पक्षाचे दुबळे नेतृत्वही बाजी मारून जात होते. त्याला १९७५ नंतर धक्का बसला. कारण तिथे हुजूर पक्षाचे नेतृत्व मार्गारेट थॅचर या महिलेकडे आले आणि त्यांची आक्रमक अशीच ओळख होती. त्यांनी पुढल्या काही वर्षात असा दणका लावला की मजूर पक्षाला सत्ता संभाळणेही अशक्य होऊन बसले. त्यांच्या आक्रमक नेतृत्वाने पुढल्या म्हणजे १९७९ च्या निवडणूका जिंकल्या आणि जी सत्ता मिळवली, त्यानंतर कोणी हुजूर पक्षाला आता पराभूत करू शकत नाही, अशीच धारणा निर्माण झाली होती. पण त्यात तथ्य नव्हते. मॅगी थॅचर अजिंक्य नव्हत्या, तर मजूर पक्षाचे नेतृत्व कालबाह्य झालेले होते आणि लोकांना जाऊन भिडण्याची क्षमता गमावून बसलेले होते. म्हणून मॅगीबाई तब्बल चार सार्वत्रिक निवडणूका सहज जिंकून गेल्या होत्या. मग त्यावर उपाय सापडेना, तेव्हा मजूर पक्षाला जाग आली आणि त्यांनी आत्मपरिक्षण सुरू केले. आपला पक्ष लोक का नाकरतात वा मॅगीबाईंना कौल कशाला देतात, त्याचा शोध घेतला गेला. त्यातून मजूर पक्षात झालेला पहिला महत्वपुर्ण बदल होता तो नेतृत्वाचा! त्या पक्षाने टोनी ब्लेअर नावाचा नव्या तरूण नेत्याकडे पक्षाची सुत्रे सोपवली आणि त्यानेच मजूर पक्षाला सत्तेपर्यंत आणुन दाखवले होते.
राजकारण हा हौसेचा खेळ नाही, तो अतिशय गंभीर मामला असतो. तिथे आपले सर्वस्व झोकून दिले तरच यश मिळवता येते. नशिबावर अवलंबून काहीही साध्य होत नसते. अगदी नशिब कितीही तुमच्या बाजूने असले तरी एखादा कष्टाळू नेता तुम्हाला धुळ चारू शकत असतो. टोनी ब्लेअर यांच्याकडे मजूर पक्षाचे नेतृत्व योगायोगाने आले. पण त्यांनी पक्षाचा चेहरामोहरा पुढल्या तीन वर्षात असा बदलला की मजूर पक्ष थेट सत्तेपर्यंत जाऊन भिडला. त्यातली जादू ब्लेअर यांच्या नेतृत्वात नव्हती तर काळानुसार बदलण्याची त्यांची क्षमताच पक्षाला गाळातून बाहेर काढू शकलेली होती. १९७०-८० च्या जमान्यातला मजूर पक्ष व त्याच्या धोरण भूमिकांना ब्लेअर यांनी पुरता फ़ाटा दिलेला होता. जगात मुक्त अर्थव्यवस्था व जागतिकीकरण आलेले होते आणि त्याचा परिणाम ब्रिटनमध्येही दिसत होता. त्यानुसार पक्षाला आपले जुने आग्रह सोडून भूमिका घेण्याची गरज होती. ब्लेअर यांनी ते धाडस केले. त्यातून त्यांच्या पक्षाला नवी उभारी येत गेली. मागल्या दिडदोन दशकात पक्षाच्या कोणत्या चुका झाल्या व मतदार आपल्यापासून कशामुळे दुरावला, त्याचा अभ्यास करून ब्लेअर यांनी पक्षाचा पवित्रा बदलला. हळुहळू त्याचा प्रभाव जनमानसात पडत वाढत गेला आणि १९९७ सालात ब्लेअर या तरूण नेत्याने ब्रिटनची सत्ता मिळवली. त्यात त्याच्या तरूण असण्यापेक्षाही काळाशी सुसंगत राजकीय भूमिका घेण्याची लवचिकता उपयुक्त ठरलेली होती. आज भारतात नरेंद्र मोदी यांच्या राजकीय आव्हानाला सामोरे जाण्याचा विचार करणार्यांची नेमकी तिथेच कोंडी झालेली आहे. ते आजही विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात अडकून पडलेले आहेत आणि राजकारण २०१७ मध्ये येऊन पोहोचलेले आहे. त्याच्याशी सुसंगत भूमिका व पवित्रे घेण्याचा विचार विरोधकांना सुचलेला नाही, तिथे सगळा घोटाळा होऊन बसलेला आहे.
वाजपेयी अडवाणी यांच्या जमान्यातील भाजपा आणि २०१३ नंतर मोदींच्या नेतृत्वाखाली उभारी घेतलेला भाजपा; यातला फ़रकही अजून अनेक विरोधकांना उमजलेला नाही. त्याहीपेक्षा मोठी शोकांतिका म्हणजे राजकीय अभ्यासक म्हणून मिरवणार्यांनाही अजून एकविसाव्या शतकातल्या वास्तविकतेला सामोरे जाण्याची हिंमत झालेली नाही. नरेंद्र मोदी देशाला एकविसाव्या शतकातील गरजांनुसार घेऊन निघालेले आहेत आणि त्यांचे विरोधक आजही विसाव्या शतकातील समस्यांसाठीचा जाब विचारत बसलेले आहेत. बेरोजगारी, गरीबी, महागाई या आजच्या समस्या नाहीत किंवा वास्तवात सामान्य जनतेला भेडसावणार्या समस्या नाहीत. खेड्यापाड्यापर्यंत मोबाईल फ़ोन पोहोचलेले आहेत आणि कुठल्याही खेड्यातल्या दुकानात मिनरल वॉटरच्या बाटल्या सहज खरेदी करणारे एसटीचे प्रवासी आपण बघत असतो. त्या जमान्यात बेरोजगारी महागाई हे शब्द हास्यास्पद असतात. समस्यांचे स्वरूप बदललेले आहे आणि लोकांच्या नित्यजीवनातील गरजाही बदलून गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर नव्या भूमिका व पर्याय मांडण्याची गरज आहे. सत्ताधारी कुठल्या भांडवलदाराला झुकते माप देतात वा कंपन्यांना जमिनी देतात, असल्या आरोपाची भीषणता कधीच संपलेली आहे. गरीबी व महागाईचे निकष बदलून गेलेले असतील, तर गांजलेल्या सामान्य माणसाला नव्या संमस्यांशी झुंजण्यास प्रवृत्त करावे लागेल. नुसते आरोप व चिखलफ़ेक करून मते मिळवण्याचा जमाना संपलेला आहे. सहाजिकच मोदी वा भाजपाला मतदार कौल कशामुळे देतो आहे, किंवा विरोधकांना मतदार कशामुळे नकार देतो आहे, त्याचा शोध घेण्याची गरज आहे. थोडक्यात दोन मिनीटात शिजणारी मॅगी नुडल्स खाऊन निवडणूका जिंकण्याची सोय राहिलेली नाही. निवडणूका अतिशय स्पर्धात्मक झालेल्या असून एक एक मताची बेगमी करण्याला प्राधान्य आलेले आहे.
कॉग्रेसने आधीच्या दहा वर्षात उत्तम कारभार केला असता, तर लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली नसती, की त्यावर स्वार होऊन मोदी पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू शकले नसते. ती सत्ता हाती आल्यापासून मोदींनी अधिकाधिक लोकसंख्येला खुश करण्याचा किंवा किमान लोकांची नाराजी पत्करण्याचा पवित्रा घेतलेला आहे. नोटाबंदी किंवा जीएसटी यांच्यामुळे लोकांना ज्या समस्या भोगाव्या लागल्या, त्यात दिलासा देण्यासाठी वेळोवेळी मोदी सरकारने बदललेले निर्णय त्याचे द्योतक आहे. उलट युपीएच्या कालखंडात एकामागून एक निर्णय व धोरणांवर लोकांचा असंतोष समोर येत असतानाही कॉग्रेस सरकार ढिम्म राहिलेले होते आणि सत्ताधार्यांनी जनभावनेचा कडेलोट होऊ दिलेला होता. ती संधी मोदी सरकारने विरोधकांना दिलेली नाही. म्हणूनच मोदी विरोधातले राजकारण करताना आजच्या पिढी व जनतेच्या काळजाला हात घालू शकेल असे विषय निवडण्याची गरज आहे. तिथेच तमाम विरोधक तोकडे पडत आहेत. ते अजून राममंदिर व मशिदीच्या वादातून वा हिंदू मुस्लिम भेदभावातून बाहेर येऊ शकलेले नाहीत. किंबहूना तीच मोदी व भाजपासाठी जमेची बाजू झालेली आहे. कारण या विरोधकांचा अजेंडा भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यापुरता मर्यादित आहे आणि त्यामुळे आपल्या जगण्यातील समस्या प्रश्नांचा निचरा कसा होणार, त्याचे स्पष्टीकरण जनतेला मिळू शकलेले नाही. त्यांनी काही नाही तरी एक टोनी ब्लेअर शोधून काढावा आणि मॅगीचे नुडल्स खावून पोट भरण्याचे उद्योग थांबवावेत. तरच विरोधी राजकारणाला काही भवितव्य असेल. अन्यथा पुढल्या काही निवडणूका मोदी हे मॅगी थॅचर यांच्याप्रमाणेच विजय संपादन करीत जातील आणि विरोधकांना आपल्या चुका उमजण्यापर्यंत त्यांचीच एक पिढी निकालात निघालेली असेल. राहुल गांधी हे त्यावरचे उत्तर नक्कीच नाही, हे आज म्हणता येईल.
आजच्या विषयाला मॅगी चे उदाहरण मस्त ...
ReplyDeleteKhup chhan bhau
ReplyDeleteपरफेक्ट
ReplyDeleteमस्त भाउ
ReplyDelete