Tuesday, December 26, 2017

द्रविडी शोकांतिका

TTV wins के लिए इमेज परिणाम

तामिळनाडूच्या आर के नगर या मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणूकीत वरकरणी बघितले तर दिनाकरन या अपक्ष उमेदवाराने अण्णाद्रमुक व द्रमुक अशा प्रमुख द्रविडी पक्षाचा पराभव केला असे वाटेल. अर्थात त्याने पैशाचे वाटप करून ही बाजी मारली, असा आरोप झाला आहे आणि तो नवा नाही. एप्रिल महिन्यात तसेच झाले होते आणि मतदान ऐनवेळी रद्द करण्यात आलेले होते. म्हणूनच त्यात नवे काहीही नाही. पैसे वाटणे वा अमिषे दाखवणे ही बाब आपल्या मतदानात जुनीच आहे. पण हजारो मतदारांना नुसते पैसे वाटून इतकी मतेही मिळवता येत नाहीत, हेही तितकेच सत्य आहे. म्हणूनच पैशाचा आरोप करून ह्या निकालाला नाके मुरडण्यात अर्थ नाही. उलट त्यापेक्षा त्याची मिमांसा करण्याने काही लाभ होऊ शकेल. ह्यात दिनाकरन याने फ़क्त दोन द्रविडी पक्षांना पराभूत केलेले नाही, तर त्याचवेळी देशातील तथाकथित राजकीय अभ्यासक व विश्लेषकांचेही थोबाड फ़ोडलेले आहे. कारण हे मतदान चालू असताना किंवा त्याच्या आधी गुजरातच्या निकालापासून चाललेली मतदानाची विश्लेषण पुरती ढासळून टाकलेली आहेत. २ जी घोटाळ्यातून युपीए वा द्रमुकला क्लिन चीट मिळाल्याच्या दाव्याचा पुरता फ़ज्जा उडाला आहे़च. पण अण्णाद्रमुकच्या मतविभागणीने द्रमुकला लाभ होईल, ही अपेक्षाही फ़ोल ठरलेली आहे. पित्याच्या नेतॄत्वाचा वारसा घेऊन निघालेल्या स्टालीन यांचे मनसुबे उध्वस्त झाले आहेत आणि जयललितांच्या खमकेपणाचा साक्षात्कार घडवणारा नेताच तामिळी जनतेला हवा असल्याची ग्वाही यातून मिळालेली आहे. नैतिक विजयाचे पुरते धिंडवडे या निकालाने काढलेले आहेत आणि म्हणूनच दिनाकरन सहज इतक्या मोठ्या फ़रकाने का विजयी होऊ शकला, हे शोधण्याची व समजून घेण्याची गरज आहे. तोच अम्माचा वारस असल्याचे हे प्रमाणपत्र बिलकुल नाही, हेही समजून घेतले पाहिजे.

जयललिता या मतदारसंघातून अनेकदा विधानसभेत निवडून आल्या, तरी त्यांच्या अपरोक्ष तिथली सर्व व्यवस्था व कारभार शशिकला व त्यांचे कुटुंबिय संभाळत होते. सहाजिकच तिथे तरी अण्णाद्रमुकपेक्षाही शशिकला यांच्या मन्नारगुडी टोळीचाच जनमानसावर प्रभाव होता आणि त्याचा पुरता लाभ दिनाकरन यांना मिळालेला आहे. तर मध्यंतरी ज्या घडामोडी झाल्या, त्यात पुढाकार घेऊन शशिकला यांना झुगारण्याची हिंमत करणार्‍या कुणाही अण्णाद्रमुक नेत्यापाशी स्वत:ची अशी कोणतीही प्रतिमा नसल्याचे यातून सिद्ध झाले. त्यांनी दिनाकरन यांच्याशी लढत देण्यासाठी मधूसुदनन या ज्येष्ठ वृद्ध नेत्याला पुढे केलेले होते. पण त्याला मतदारसंघामध्ये कोणीही ओळखत नव्हता आणि अगदी पक्षाचे दोन पानांचे निवडणूक चिन्हही त्याला वाचवू शकले नाही. कारण मतदार शशिकला कुटुंबाशी परिचित व निष्ठावान होता. आणखी एक गोष्ट अशी, की ऐन मतदान चालू असताना २ जी घोटाळ्याचा निकाल आल्यावर द्रमुक व कॉग्रेसने त्याचे राजकीय भांडवल करण्याला प्राधान्य दिले होते. पण चारपाच तास निकाल जाहिर झालेला असूनही त्याचा किंचीतही लाभ द्रमुकला मिळू शकला नाही. पैशाचे वाटप किंवा दिनाकरन यांच्यावर पडलेल्या आयकराच्या धाडी यामुळेही मतदानावर प्रभाव पडला नाही. थोडक्यात भ्रष्टाचार वा पावित्र्य यांचा मतदानाशी काडीमात्र संबंध नसतो, असेही म्हणता येईल. पण त्यात बुद्धीमंतापेक्षा सर्वसामान्य लोकांची समजूत भिन्न आहे. शहाण्यांना जितका निष्कलंक नेता वा माणूस हवा म्हणून आग्रह धरला जातो, तितकी सामान्य माणसाची अजिबात अपेक्षा नसते. त्याला किमान भ्रष्ट व गरजेनुसार कामी येणारा लोकप्रतिनिधी हवा असतो. इतकाच त्याचा अर्थ आहे. अन्यथा दिनाकरन व द्रमुक यात कितीसा फ़रक होता? म्हणून तर कोर्टाच्या निकालानंतर डंका पिटलेल्या नैतिक विजयाचे सर्व पाच पोटनिवडणूकात देशाच्या विविध राज्यात दिवाळे वाजलेले आहे.

दिनाकरन यांच्या विजयाने व द्रमुकची अनामत रक्कम जप्त झाल्यामुळे एक गोष्ट साफ़ झाली. तामिळनाडू राज्यात जयललितांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी जशीच्या तशी कायम आहे आणि अण्णाद्रमुकचा वा द्रमुकचा कोणीही नेता ती भरून काढण्याच्या कुवतीचा नाही. अम्माच्या जागी निवडून आला म्हणून दिनाकरन भासवतात, तितकी पक्षाची धुरा संभाळण्याची त्यांचीही कुवत नाही. मतदाराने स्थानिक कारणास्तव त्यांना निवडून दिलेले असले, तरी त्याची तशीच पुनरावृत्ती अवघ्या तामिळनाडूत होईल, असे समजणे मुर्खपणाचे आहे. म्हणजेच कमल हासन वा रजनीकांत असे जनमानसावर जादू करू शकणार्‍यांसाठी चांगला संकेत मिळालेला आहे. पण त्यात उतावळेपणा करून आधीचे दोन महिने नाचलेल्या कमल हासन याची पोटनिवडणूक काळात बोलती बंद होती आणि रजनीकांत याने अत्यंत सावधपणे राजकारणात येण्याची तयारी चालविली आहे. या निकालाने रजनीकांतला पोषक असा संदेश दिलेला आहे. अण्णाद्रमुकला स्वपक्षाची जागा टिकवता आलेली नाही आणि मतविभागणीकडे आशाळभूतपणे बघणार्‍या द्रमुकच पुरता मुखभंग झालेला आहे. तर दिनाकरन यांच्यापाशी राज्यव्यापी प्रतिमा नाही. दरम्यान आखाड्यात उडी घेतलेल्या विशाल या अभिनेत्याचा व अम्माची भाची दिपा ह्यांचे अर्ज फ़ेटाळले गेले होते. त्यांची त्यामुळे मूठ झाकलेली राहिली असे म्हणता येईल. कारण तसे झाले नसते तर त्यांनाही इथे पराभूतच व्हावे लागले असते. असा कुठलाही उतावळेपणा रजनीकांतने दाखवलेला नाही आणि दिनाकरनच्या उचापतींनी त्याच्या नव्या पक्षाच्या बांधणीला उपकारक चित्र निर्माण होण्याची शक्यता वाढलेली आहे. दिनाकरन आता सत्ताधारी अण्णाद्रमुकमध्ये दुफ़ळी माजवणार आणि अनेक नेते आमदार सेल्व्हम व स्वामी यांना सोडून दिनाकरनच्या गोटात दाखल होऊ शकतात.

थोडक्यात द्रमुक व अण्णाद्रमुक हे दोन्ही प्रादेशिक पक्ष विकलांग झालेले असून तामिळनाडूला कोणी राज्यव्यापी नेताच उरलेला नाही. अशावेळी कमल हासन रजनीकांत यांना उत्तम संधी आहे. पण उतावळेपणाने अनेक गोष्टी आधीच बोलून व मोक्याच्या वेळी गप्प बसून हासन याने संधी मातीमोल केली आहे. तर रजनीकांत शांतपणे आपल्याला योग्य मुहूर्त मिळण्याच्या प्रतिक्षेत दबा धरून बसलेला आहे. या पोटनिवडणूकीने त्याला तशी संधी व पोषक वातावरणाची चाहुल दिलेली आहे. दिनाकरन यांच्या राजकारणात सेल्व्हम वा स्वामी अशा ज्येष्ठ अण्णाद्रमुक नेत्यांना स्थान असू शकत नाही. म्हणजेच पक्षात बेबनाव निर्माण झाल्यास अशा नेत्यांना परागंदा व्हावे लागणार आहे. त्यांचा अनुभव लक्षात घेतला तर रजनीकांतला तशाच नेत्यांची गरज भासणार आहे. थोडक्यात अण्णाद्रमुकचे निराश्रीत नेते व लोकप्रिय रजनीकांत हे परस्परांची गरज होणार आहेत. यापुर्वी असे रामचंद्रन व जयललितांच्याही बाबतीत झाले आहे. त्यांनी राजकारणात उडी घेतल्यावर आधी विरोध करणारे काही मुरब्बी द्रविडी नेते त्यांच्या गोटात नंतर दाखल झाले व त्यांनीच त्या नव्या पक्षाचा राजकारणात भक्कम पाया घातलेला होता. आता तशीच वेळ पुन्हा आलेली असून दिनाकरनला शरण जाऊन उपयोग नसल्याने सेल्व्ह्म व स्वामी यासारखे अनेक नेते पुढल्या घडामोडीत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करू बघतील. रजनीकांतसाठी तोच राजकारणात उडी घेण्याचा मुहूर्त असेल. त्यामुळे करुणानिधी व जयललिता युगाचा अस्त सुरू झालेला असेल आणि रजनीकांत नावाचे नवे वादळ तामिळनाडूत घोंगावू लागलेले असेल. दिनाकरन यांच्या निवडीने त्याचेच संकेत दिले आहेत आणि मग अशा नव्या प्रादेशिक पक्ष वा नेत्यामागे राष्ट्रीय पक्षांना फ़रफ़टत जावे लागले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नसेल. नैतिक विजय त्या वादळात कुठल्या कुठे हरवून गेला आहे.

3 comments:

  1. अत्यंत सुंदर विश्लेषण भाऊ.

    ReplyDelete
  2. वा फारच मार्मिक अन् वस्तुनिष्ठ

    ReplyDelete