कोणीतरी तुमच्यासाठी सापळा लावलेला आहे आणि तो उधळून लावण्याच्या नादात, तुम्ही त्या सापळ्यात आरामात धावत आता घुसलात, तर त्याला शहाणपणा म्हणता येत नाही. गेल्या चार वर्षात नरेंद्र मोदी वा त्यांचा भाजपातील चमू अतिशय धुर्तपणे कॉग्रेस वा विरोधकांसाठी असेच सापळे लावत असतात आणि कॉग्रेससह त्यांचे बुद्धीमान पुरोगामी शहाणे त्या सापळ्यात धावतच जाऊन अडकतात, असा अनुभव आलेला आहे. मग तो कुठल्या निवडणूकीचा असो किंवा वादग्रस्त ठरलेल्या विषयाचा असो. हेच सातत्याने घडलेले असेल तर मणिशंकर अय्यर यांनी केलेली शिवीगाळ असो, किंवा त्यांच्या निवासस्थानी पाकिस्तानी नेत्यांशी झालेले कॉग्रेसी गुफ़्तगू असो. नुसत्या द्वेषाने प्रेरीत झालेला अतिशहाणा मणिशंकर अय्यर हा खरे तर मोदींचा सर्वात महत्वाचा मोहरा ठरलेला आहे. सध्या गाजत असलेल्या पाक व कॉग्रेसी संगनमताचा विषयही तपासून बघता येईल. सुरूवात कुठून झाली? ६ डिसेंबर रोजी कुठल्या एका वाहिनीला प्रतिक्रीया देताना मणिशंकर अय्यर यांनी मोदींना ‘नीच किसम का आदमी’ अशी शिवीगाळ केली. त्याच्या आदल्या दिवशी त्यांच्या घरी एक मेजवानी झाली व त्याला पाकिस्तानी राजदूतासह भारताचे माजी पंतप्रधान उपस्थित होते. ही बैठक गोपनीय असू शकत नाही. तिथे वाहतुक वळवण्यात आलेली होती, म्हणजेच पोलिसांनाही काही महत्वाच्या व्यक्ती तिथे जमणार असल्याची पुर्वकल्पना होती. त्याची माहिती गुप्तचरांमार्फ़त भारत सरकार व पर्यायाने मोदींपर्यंत गेलेली असणार. पण त्याचा ओझरताही उल्लेख कुठे मोदींनी केला नाही. उलट नंतरची ‘नीच’ घटना मात्र अगत्याने प्रचारसभेत वापरून घेतली. त्याच सभेत मोदी आदल्या रात्रीच्या छुप्या बैठक मेजवानीचा उल्लेख आरोप करू शकले असते. परंतु त्यांनी तसे केले नाही आणि त्याचाच एक सापळा बनवला.
पहिल्या दिवशी मोदींनी मणिशंकर अय्यर यांच्या शिव्याशापांना फ़ोडणी दिली आणि त्याचा खुलासा करताना राहुलसह कॉग्रेसच्या नाकी दम आला. अखेर तो दिवस मावळत असताना अमणिशंकर अय्यर यांची पक्षातून हाकालपट्टी करण्याची घोषणा कॉग्रेसला करावी लागली. थोडक्यात विषय इतका उलटला, की नुसते खुलासे करून भागत नव्हते, तर अय्यरना बाजूला सारावे लागले होते. मग दुसर्या दिवशी म्हणजे त्या गुप्त बैठकीला तीन दिवस उलटून गेल्यावर एक ब्रेकिंग न्युज पसरवण्यात आली. मणिशंकर अय्यर यांच्या घरात मेजवानी झाली व त्यात गुजरात विधानसभा निवडणूकीत मोदींना संपवण्याचे कारस्थान शिजल्याचा आरोप पुढे करण्यात आला. हेतू असा होता, की कॉग्रेसने तात्काळ त्याचा इन्कार करून टाकावा. झालेही तसेच! कॉग्रेसने माजी परराष्ट्र राज्यमंत्री आनंद शर्मा यांनी कॅमेरासमोर येऊन मणिशंकर यांच्या घरी अशी कुठलीही गुप्त बैठक कॉग्रेस व पाकिस्तानी यांच्यात झाल्याचा साफ़ इन्कार करून टाकला. उलट मोदी जनतेत अफ़वा पसरवित असल्याचा प्रत्यारोप शर्मा यांनी केला. वास्तविक तसा कुठलाही खुलासा करण्यापुर्वी शर्मा वा कॉग्रेसच्या अन्य नेत्यांनी अय्यर वा मनमोहन सिंग यांच्याशी संपर्क साधला असता, तर खुप बरे झाले असते. म्हणजे अशी बैठक झाली किंवा नाही, याची आधी पक्षातच खातरजमा होऊन गेली असती आणि इन्कार करण्यापेक्षा त्या बैठकीत काहीही देशविरोधी शिजलेले नाही, असे साफ़ सांगून टाकता आले असते. पण तितका संयम आजच्या कॉग्रेसी नेत्यांपाशी आहे कुठे? कशाचाही इन्कार वा कशालाही दुजोरा देण्यासाठी कॉग्रेसी नेते इतके उतावळे झालेले असतात, की त्यांना आपल्यासमोर सापळा लागलेला आहे याचेही भान नसते. परिणामी मोदी वा भाजपाने लावलेल्या सापळ्यात हे शहाणे अलगद येऊन अडकतात. शर्मा तसेच त्यात फ़सले.
रविवारी म्हणजे दहा तारखेला त्यांनी अय्यरच्या घरी मेजवानी बैठक झाल्याचा साफ़ इन्कार केला आणि त्याच बाबतीत सोमवारी अशी बैठक वा मेजवानी घेण्यासाठी सरकारच्या परवानगीची गरज काय, असा प्रतिप्रश्न केला. म्हणजे रविवारी शर्मा ज्याचा इन्कार करत होते, त्यालाच दुसर्या दिवशी दुजोरा देत होते. त्यालाही पर्याय कुठे होता? त्यांना दुजोरा द्यायला मोदींनी भाग पाडले नाही. त्या गुप्त बैठकीला हजर असलेल्या काही पाहुण्यांनीच जाहिर खुलासे केल्यावर शर्मा तोंडघशी पडले. जनरल दीपक कपूर, अशा काही उपस्थितांनी तिथे भारत-पाक संबंधावर चर्चा झाली. पण गुजरातविषयी कोणी काही बोलले नाही, असे जाहिर कथन केले. मग तिथे उपस्थित असलेल्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना गप्प बसणे शक्य नव्हते. म्हणूनच त्यांनी मोदींना पत्र लिहून आपल्यावर गैरलागू आरोप केल्याची माफ़ी मागण्याची मागणी केली. पण त्याच पत्रातून अशी बैठक झाल्याची कबुली दिली गेली होती आणि आनंद शर्मा यांचे दात घशात गेले होते. राहिला मुद्दा अशा लपवाछपवीचा. ह्यात काही नवे नाही. डोकलामचा विषय गाजत असताना अकस्मात राहुल गांधी आपल्या घर कुटुंबकबिल्यासह चिनी दूतावासात गेलेले होते आणि त्यावर कोणीतरी प्रश्न उपस्थित केला. तेव्हाही अशीच फ़टफ़जिती झालेली होती. आधी कॉग्रेसतर्फ़े अशा भेटीचा साफ़ इन्कार करण्यात आला आणि पुढे चिनी राजदूतांनीच राहुल सोबत घेतलेला फ़ोटो सोशल माध्यमात टाकल्यावर कॉग्रेसची नाचक्की झालेली होती. याचा अर्थ इतकाच होतो, की कॉग्रेस पक्षात कुठला नेता काय करतो व कोणाकडे जाऊन काय दिवे लावतो, याचाही थांगपत्ता पक्षाच्या पदाधिकार्यांना नसतो आणि ते बिचारे पक्षाची अब्रु झाकण्यासाठी प्रत्येकवेळी बळीचे बकरे होत असतात. उंदरासारखे त्यांना सापळ्यात ओढून त्यांची तारांबळ उडवणे, हा आता मोदींसाठी खेळ होऊन बसला आहे.
साडेतीन वर्षापुर्वी लोकसभेच्या निवडणुका ऐन रंगात आलेल्या असताना एका प्रचारसभेत नरेंद्र मोदींनी असाच एक गौप्यस्फ़ोट केला होता. राष्ट्रसंघाच्या बैठकीसाठी जगभरचे नेते अमेरिकेत न्युयॉर्कला जमलेले होते आणि तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यांनी काही निवडक पत्रकारांना चहापानासाठी आमंत्रित केले होते. तिथे त्यांनी भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांची ‘पाणवठ्यावर रडणारी बाई’ या शब्दात खिल्ली उडवली असा तो गौप्यस्फ़ोट होता. त्याविषयी भारतीय माध्यमात फ़ारशी चर्चा झाली नव्हती. पण पाकिस्तानी माध्यमे व वाहिन्यांवर चविष्ठ चर्चा रंगलेल्या होत्या. त्याचा उल्लेख करून मोदी आपल्या प्रचारसभेत म्हणाले, किमान तिथे हजर असलेल्या भारतीय पत्रकारांनी तरी निषेध म्हणून शरीफ़ यांच्या चहापानातून निघून यायला हवे होते. हे सांगताना मोदींनी कुठल्याही भारतीय पत्रकाराचे नाव घेतले नव्हते, की ओझरता उल्लेखही केलेला नव्हता. सहाजिकच तात्काळ भारतीय वाहिन्यांवर त्यावरून गदारोळ सुरू झाला. अपवाद होती एकमेव वाहिनी तिचे नाव आहे एनडीटीव्ही! त्याची तात्कालीन संपादक बरखा दत्त तणतणत कॅमेरासमोर हजर झाली आणि आपण त्या चहापानात नसल्याचे घसा कोरडा करून सांगू लागली. जर बरखा तिथे नव्हती तर तिला खुलासा देण्याची काय गरज होती? कारण मोदींनी तिचे नाव घेतलेले नव्हते. पण नंतर घेतले तर? त्यापुर्वीच बरखाला आपला खुलासा द्यावा लागला होता. कारण ती तिथे हजर होती. याला सापळा म्हणतात. पुढल्या काळात त्यांनी असे कित्येक सापळे कॉग्रेस व आपल्या विरोधकांसाठी लावलेले आणि त्यात हे सर्व विरोधक गुण्यागोविंदाने फ़सत राहिलेले आहेत. मग त्याच पठडीतले आनंद शर्मा वा आणखी कोणी पुरोगामी विचारवंत नेते फ़सत राहिले तर आश्चर्य कसले ना? सापळा असा असतो की आपुलीच प्रतिभा भासे आपुलीच वैरी.
सुंदर अप्रतिम
ReplyDeleteभाऊ
ReplyDeleteमस्त लेख ;कॉंग्रेसने नेहमीच दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांना बदनाम केले आहे .त्याचीच फळे आता भोगत आहेत .
भाऊ हा एकदम शाल जोडीतला आणि सणसणीत चपराक आहे,
ReplyDeleteएक सापळा मोडीभक्तांसाठी पण आहे आणि त्याचा उल्लेख कोणी करत नाही आहे....स्वतः माजी पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री खुर्शीदने सांगितले आहे की ते RAW च्या प्रमुखाला पण भेटले आहेत...त्याबद्दल काय मत आहे? पठाणकोटला मोदीने ISI च्या agent ला अधिकृतरित्या प्रवेश दिला तेव्हा का नाही लेख लिहिला?
ReplyDeleteप्रतिसादामध्ये सुद्धा आपण त्यात सापळा कसा आहे ते वर्णन केल्यास चालू शकते.
Deleteनमोरुग्ण असण्यास हरकत नाही.. पण स्वतःच्या देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेख योग्य पद्धतीने करणे अपेक्षित आहे.. आणि तुम्हाला कळलेल्या सापळ्याचं स्पष्टीकरण द्या..
Deleteलेखाचे नावच खूप भारी आहे.अर्थातच लेखही तेवढाच प्रभावी आहे.मोदींना जगातले राजकारणी का मानतात हे भारतीयांनी विशेषत: विरोधकांनी समजून घ्यायला हवे.
ReplyDelete