Friday, December 15, 2017

दुसरा केजरीवाल नकोरे बाप्पा?

anna kejriwal के लिए इमेज परिणाम

अण्णा हजारे पुन्हा मैदानात उडी घेत आहेत. २०११ सालात त्यांनी अरविंद केजरीवाल व अन्य काही समाजसेवी संस्थांच्या वतीने लोकपाल मागणीसाठी देशात मोठे आंदोलन छेडले होते. तेव्हा वास्तविक अण्णा हा देखाव्याचा गणपती म्हणून मंडपात बसवलेला होता. मात्र ते अण्णांना अजून समजलेले नाही. दिल्लीत तेव्हा अण्णांना कोणी ओळखत नव्हते आणि केजरीवाल टोळीला तसाच कोणी बिनचेहर्‍याचा गांधीवादी पुतळा हवा होता. शिवाय त्याच्यापाशी आठदहा दिवस उपास करण्याची कुवत असायला हवी होती. अण्णा त्या पात्रतेत बसत असल्याने त्यांना अकस्मात उचलून दिल्लीला नेण्यात आले आणि लोकपाल आंदोलनाची नांदी करण्यात आली. त्यांच्या मागे काय काय चालू होते, त्याचा अण्णांनाही थांगपत्ता नव्हता. बिचार्‍या अण्णांना वाटले होते, आपल्याकडे अवघ्या देशाची जनता कोणी प्रेषित अवतरला म्हणून बघते आहे. वास्तवात केजरीवाल या धुर्त माणसाने मुठभर दिल्लीकर पत्रकार व माध्यमकर्मींना हाताशी धरून रान पेटवलेले होते. पुढे जेव्हा त्यात यश संपादन केले, तेव्हा अण्णांची केजरीवालांना गरज उरली नाही आणि त्यांनी नम्रपणे अण्णापासून फ़ारकत घेतली. त्याचा कुठलाही तोटा केजरीवाल यांना झाला नाही. अण्णांच्या मागून एक स्वच्छ चारित्र्याच्या तरूण नेता अशी त्यांची प्रतिमा उभी राहिली होती. म्हणूनच केजरीवाल बाजूला झाल्यानंतर अण्णांना कुठलेही दुसरे लक्षणिय आंदोलन उभे करता आलेले नाही. किंवा त्यांच्या वक्तव्यांचीही कोणी दखल घेत नाही. मात्र या उत्तरपूजा उरकून विसर्जित झालेल्या गणपतीला आपले अवतारकार्य संपले असल्याची जाणिव अजून झालेली नाही. त्यातूनच त्यांना अधूनमधून आंदोलनाच्या घोषणा करण्याची उबळ येते. आता तशाच आंदोलनाची घोषणा अण्णांनी केली असून त्यातून नवा कोणी केजरीवाल निपजू नये, असे मत त्यांनी व्यक्त केलेले आहे.

सवाल इतका सोपा आहे, की पहिलाच केजरीवाल कशाला निर्माण झाला होता? अण्णा त्या आंदोलनात वा चळवळीत किती स्वतंत्र व स्वयंभू होते? इतक्या जवळून अशा बदमाश लोकांच्या टोळीत वावरताना अण्णांना त्यापैकी एकही बदमाश भामटा ओळखता कशाला आला नाही? की नुसता आपला जयजयकार ऐकून अण्णा खुश झाले होते? आपण महाराष्ट्रात किती व कोणत्या मंत्र्यांच्या विकेट घेतल्या, ते अण्णा पाच वर्षापुर्वी अगत्याने सांगत होते. पण पुढे त्यांच्याच लोकपाल आंदोलनातून सत्तेपर्यंत आलेल्या केजरीवाल यांनी राजरोस भ्रष्टाचार व लूटमार केली; तेव्हा एक दिवस जंतरमंतर येथे जाऊन धरणे धरण्याचीही हिंमत अण्णा दाखवू शकले नाहीत. बाकी लबाड बदमाश लोकांची गोष्ट बाजूला ठेवा. केजरीवाल हे अण्णांचे राजकीय उत्पादन आहे. मध्यंतरी त्यांच केजरीवाल यांनी मेहुण्याच्या नावाने असलेल्या कंपनीला कुठल्याही कामाशिवाय दहा कोटी रुपये खोटी बिले बनवून दिल्याच्या बातमीचा गवगवा झालेला होता. सध्या ते प्रकरण पोलिसांच्या तपासात अडकलेले आहे. तेव्हा अण्णांना त्याचे प्रायश्चीत्त घेण्याचीही बुद्धी कशाला झाली नाही? अण्णा प्रसिद्धीसाठी किती हपापलेले आहेत, त्याची वारंवार प्रचिती आलेली आहे. दिल्लीत ममता बानर्जी यांनी अण्णांची भेट घेतली व रामलिला मैदानावर एका मेळाव्याची घोषणा केलेली होती. पण तिथे केजरीवाल करू शकले तितकी गर्दी ममतांना जमवणे शक्य झाले नाही. तर अण्णांनी तिथे पाठ फ़िरवली होती. मैदान अण्णांच्या मोठ्या छायाचित्रांनी भरलेले होते. पण तुरळक गर्दी असलेल्या त्या मेळाव्याला अण्णा आले नाहीत. बिचार्‍या ममतांनी त्यानंतर अण्णांचा नाद सोडून दिला. मध्यंतरी पाच वर्षात नुसत्या पत्रकारांना बातम्या देण्यापलिकडे अण्णा कुठले आंदोलन छेडू शकले आहेत? त्यांना कुठल्या बाबतीत लोकांपर्यंत जाऊन भिडण्याची हिंमत झाली आहे?

आता अकस्मात त्यांना पुन्हा लोकपालची आठवण झालेली आहे. मग त्यासाठी मोदी सरकारच्या विरोधात तोफ़ा डागण्याचा आव अण्णांनी आणलेला आहे. लोकपालचा कायदा संमत झालेला असला तरी अजून त्याची नेमणूक मोदी सरकारने केलेली नाही, हा आरोप सत्य आहे. पण मग त्यासाठी साडेतीन वर्षे अण्णा कसला मुहूर्त शोधत बसलेले होते? त्यांनी यापुर्वीच त्यासाठी आंदोलनाच्या आखाड्यात उडी कशाला घेतलेली नव्हती? की मागल्या खेपेस लोकसभा निवडणूकीला दिड वर्ष असताना रामलिला सुरू झाली, म्हणून आताही तोच मुहूर्त साधून अण्णांनी नवी गर्जना केलेली आहे? पत्रकारांना खळबळ माजवायला उपयुक्त शब्दावली उच्चारली, मग प्रसिद्धी जरूर मिळते. पण जनमताचा पाठींबा त्यातून येत नसतो. मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांचाही पाठींबा अण्णांनी घ्यायला हरकत नाही. केजरीवालांनी अतिशय धुर्तपणे तो डाव खेळला होता आणि आपले अस्तित्व वेगळे राखलेले होते. कारण त्यांना नंतर त्याच लोकप्रियतेवर स्वार होऊन राजकारण खेळायचे होते. यात केजरीवाल यशस्वीही झाले. पण अण्णांना असे काही करायचे नसेल, तर नुसत्या आंदोलनातून काय साधले जाणार? त्यांना त्यात यशस्वी व्हायचे असेल तर दुसरा कोणी तितकाच धुर्त मतलबी केजरीवाल शोधण्याची गरज आहे. तशाच भामट्याला हाताशी धरून आंदोलनाचा देखावा उभा करावा लागेल. एकट्या अण्णांची प्रतिमा वा राजकीय सामाजिक पत तितकी नाही, की देश पेटून उठावा, किंवा निदान तसा देखावा उभा राहू शकेल. मग आता अकाली अण्णांनी उगाच आंदोलनाचे पवित्रे घेत नवे नाटक उभे करून काय साधणार आहे? केजरीवाल ज्यांना इतक्या सहज वापरून गेले, त्यांच्याकडे लोक कुठल्या आशेने बघणार आहेत? राजकीय भामट्यांनी वापरून फ़ेकून देण्याच्या पात्रतेचे आपण एक सामान्य मोहरे आहोत हे अण्णांच्या लक्षात अजून आलेले नाही, हे दुर्दैव आहे.

तेव्हाही जंतरमंतर येथील पहिल्या धरण्याला मोठा प्रतिसाद माध्यमातून मिळाला, तेव्हा अण्णा खुप फ़ुशारलेले होते. सरकारी कारभाराची व्याख्या सांगताना त्यांनी गुजरातकडे बघा म्हणजे विकास काय असतो ते कळेल, असे विधान केलेले होते. तर त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या तथाकथित समाजसेवी संस्थांच्या भुरट्यांनी अण्णांना दमदाटी केलेली होती. गुजरातचे कौतुक अण्णांनी बंद केले नाही तर लोकपाल आंदोलनातून बाहेर पडावे लागेल, असे अनेकांनी अण्णांना बजावले आणि अण्णा चिडीचुप गप्प बसले होते. कारण त्या आंदोलनात अण्णा हा पुजेपुरता मांडलेला गणपती होता. त्याने उपोषण करावे आणि वहाव्वा घ्यावी. आपले मन वा मत बोलण्याची मुभा नव्हती. तेव्हाच अण्णांनी त्या आंदोलनातील आपले स्थान ओळखायला हवे होते आणि त्यातून बाजूला होणे योग्य ठरले असते. पण मिळणारी प्रसिद्धी व प्रतिष्ठा यांनी भारावलेल्या अण्णांना मोह टाळता आला नाही. पुढे घडले ते अपरीहार्यच होते. आधी अनेकजण त्यांना सोडून गेले होते आणि अखेरीस केजरीवालही गेले. आता अण्णा एकाकी पडलेले आहेत आणि लोकपालच्या देखाव्यातून मनाने बाहेर पडणे त्यांना अजून साध्य झालेले नाही. म्हणूनच त्यांना अधूनमधून लोकपाल नावाचे नवे आंदोलन छेडण्याची उबळ येत असते. पण त्यातून दुसरा केजरीवाल नको असे बोलण्याची गरज काय? पहिल्याच वेळी केजरीवाल नसता, तर अण्णांच्या लढ्याला इतकी प्रसिद्धी तरी मिळाली असती काय? जो देखावा उभा राहिला तो कुठून उभा राहिला असता? अण्णांना प्रेषित म्हणून घडवणारे केजरीवाल असतात आणि त्यांना झटकून कोणाला अण्णा म्हणून मिरवता येत नसते. त्यामुळे दुसरा केजरीवाल नको म्हणायला अर्थ नाही. पुन्हा तितका गाजावाजा करून घ्यायचा असेल, तर अण्णांनी दुसरा केजरीवाल आधी शोधावा आणि मगच आंदोलनाचा झेंडा हाती घ्यावा.

7 comments:

  1. भन्नाट विश्लेषण भाऊ. तुम्ही हे जे काही सांगत आहेत याची आम्हाला कल्पनाच नव्हती. 2011 साली अण्णांचा आवाज बंद केला होता ! बापरे हे भयंकरच.

    ReplyDelete
  2. आधी होता वाघ्या.
    दैवयोगे झाला पाग्या
    त्याचा येळकोट जाईना!!!
    ����

    ReplyDelete
  3. अण्णा हे पूजेसाठी मांडलेला गणपती, भाऊ खरोखर त्या आंदोलना मागे इतके राजकारण आसेल आसे स्वप्नात देखील वाटले नव्हते. अत्यंत सुंदर लेख.

    ReplyDelete
  4. anna never realized he is getting used by these people, not least but important AAP is another MNS in Delhi

    ReplyDelete
  5. इथे समोर मनमोहन नाहित तर मोदी शहा आहेत. त्यांनी सध्या केजरीवाललाच गप केले आहे.तिथे अण्णांची काय कथा.लोक म्हनतायत आंदोलन नको कारन केजरीवाल पैदा होइल इतकी बदनामी झालीय त्यांची

    ReplyDelete
  6. गुळाचा गणपती आहेत अण्णा. लोकांना ही फिल्म आता स्मरत नाही म्हणून चटकन कनेक्शन लागत नाही .

    ReplyDelete
  7. बरोबर भाउ
    पण लोकपाल न नेमण्यात सससदिय नियमावलिचाच तिढा आहे. कारण अधिकृत विरोधि पक्ष म्हणुन मान्यता मिळण्यासाठि कुणाहि एक पक्षाचे 70-72 खासदार निवडुन येणे आवश्यक आहे. मात्र आजच्या तथाकथित विरोधकापैकि कुणाकडेहि ते सख्याबळ नाहि.

    नियमाप्रमाणे लोकपालाच्या नेमणुकित अधिकृत विरोधि पक्ष नेत्याचा सहभाग असणार आहे.

    आज हे शक्य नाहि म्हणुन लोकपाल नियुक्ति झालेलि नाहि.
    हि बाब अण्णाना समजत नाहि का?
    नसेल तर उगा लोकाचि दिशाभुल करणारे आदलन कशाला?

    का आता आण्णा खागरेसच्या हातचि बाहुलि बनुन नाचणार आणि समाजसेवेचा कड शमवणार?

    ReplyDelete