Sunday, December 31, 2017

विझणारा पुरोगामी दिवा

ramachandra guha के लिए इमेज परिणाम

"The whole problem with the world is that fools and fanatics are always so certain of themselves, and wiser people so full of doubts."  - Bertrand Russell

स्वत:ला विचार करणारे म्हणून विचारवंत समजणार्‍यांची हीच गोची असते, की त्यांना कुठल्याही बाबतीत ठामपणा स्विकारता येत नाही. ते कायम शंकाग्रस्त असतात. उलट मुर्ख किंवा माथेफ़िरू नेहमीच आपल्या भूमिकांविषयी ठाम असतात. बर्ट्रांड रसेल या बुद्धीमंतानेच असे विधान करून ठेवलेले आहे आणि तो त्याचा विचारवंतांमध्ये वावरण्यातून आलेला अनुभव असावा. किंबहूना तशीच काहीशी भूमिका रामचंद्र गुहा यांनी वैफ़ल्यग्रस्त होऊन सहा महिन्यापुर्वी मांडलेली आहे. गुहा हे इतिहासकार व लेखक म्हणून पुरोगामी वर्तुळात ख्यातकिर्त आहेत. देशातल्या तमाम पुरोगाम्यांप्रमाणेच त्यांच्याही मनात नरेंद्र मोदी बहूमत जिंकून पंतप्रधान झाल्याचे वैषम्य आहे. आपण इतके सातत्याने मोदी विरोधात अफ़वा पसरवून, खोटेनाटे आरोप करूनही तो माणूस पंतप्रधान होतो, याची वेदना त्यांना कधी लपवता आली नाही. त्यांच्यासारख्या कॉग्रेसने पोसलेल्या बहुतांश विचारवंतांची तशीच वेदना आहे. सहाजिकच त्यातून कॉग्रेसच आपल्याला बाहेर काढू शकेल, असा आशावाद त्यांनी जोपासला असला तर नवल नाही. पण गुहा हे मोजक्या अशा पुरोगाम्यांपैकी आहेत, की अजून त्यांची विवेकबुद्धी क्षीण स्वरूपात का होईना कार्यरत असावी. म्हणूनच त्यांचा उत्तरप्रदेश विधानसभेत भाजपाच्या प्रचंड विजयाने भ्रमनिरास झाला आणि त्यांनी वैफ़ल्यग्रस्त होऊन एक मुलाखत दिलेली होती. त्यात त्यांनी केलेले निदान काहीसे योग्य आहे. मोदी वा भाजपाच्या विजयाला त्या लोकांची मेहनत जितकी उपयुक्त ठरलेली नाही, तितका पुरोगामी मुर्खपणा व आततायीपणा कामी आला असल्याची कबुलीच गुहांनी त्या मुलाखतीत दिली आहे. मोदी विरोधाच्या नशेत देशातले पुरोगामी कसे देशद्रोहापर्यंत वाटचाल करत गेले, त्याचीही मिमांसा गुहा यांनी केली आहे. कुलभूषण जाधवच्या आई व पत्नीला राक्षसी वागणूक पाकिस्तानमध्ये मिळाल्यानंतरचे इथले पुरोगामी मौन गुहांच्या मिमांसेची आठवण करून देणारे आहे.

रामचंद्र गुहा म्हणतात, भारतीय डाव्यांमध्ये दोन मतप्रवाह होते. त्यातला कम्युनिस्ट प्रवाह कधीच देशप्रेमी वा राष्ट्रवादी नव्हता. ते बहुतांश सोवियत युनियन वा चीनशी एकनिष्ठ होते. पुढल्या काळात त्या निष्ठा क्युबा, व्हिएतनाम अशा बदलत गेल्या. दुसरा प्रवाह समाजवादी चळवळीचा होता. त्यांचे देशावर प्रेम होते आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत त्यांचाच पुढाकार होता. आपला देश व समाज अधिक सुखी व समतावादी होण्याकडे त्यांचा कल होता. प्रामुख्याने म्हणूनच हिंदू समाजवादी उदारमतवादी बहुसंख्य हिंदू समाजात प्रभावशाली होते. नंतरच्या काळात समाजवादी चळवळ भरकटत गेली आणि त्यांनी देशप्रेम वा राष्ट्रनिष्ठा वार्‍यावर सोडून दिल्यामुळे, राष्ट्रवादाची संपुर्ण जागाच त्यांनी उजव्यांना मोकळी झाली. उदारमतवादाच्या आहारी गेलेल्या पुढल्या पिढीतील समाजवादी लोकांचे दोन गट झाले. त्यातला एक गट परिवारवादाच्या आहारी जाऊन (यादव) घराणेशाहीत घुसला आणि दुसरा गट हिंदू समाजात स्वत:विषयी तिरस्कार निर्माण करण्यासाठीच राबत राहिला आहे. त्यातून राष्ट्रवादाची सगळी भूमीच उजव्यांना आंदण दिली गेली आहे. जयप्रकाश नारायण, कमलादेवी चटोपाध्याय वा राममनोहर लोहिया यांच्यासारख्यांना बहुसंख्य अशा हिंदू समाजात असलेली प्रतिष्ठा, आजच्या समाजवाद्यांनी पुरती लयास घालवली आहे. मुस्लिम समाजात उदारमतवादाला कधीच स्थान नव्हते आणि हिंदू समाजातील उदारमतवादी लोकांनी हिंदूमध्ये असलेले स्थान गमावले आहे. त्यामुळे राष्ट्रवाद ही उजव्या किंवा हिंदूत्ववादी वर्गाची मक्तेदारी झाली आहे. किंबहूना ती जागाच समाजवादी लोकांनी भाजपा वा तत्सम लोकांना आंदण देऊन टाकली आहे. याचा अर्थ असा, की आता उदारमतवादी समाजवादी राष्ट्रप्रेमी राहिलेले नाहीत आणि कम्युनिस्ट तर कधीच देशप्रेमी नव्हते.

गुहा यांच्या उपरोक्त विधाने व विवेचनाचा अर्थ इतकाच होतो की आपल्या भूमिका, वक्तव्ये किंवा चळवळीतून उदारमतवादी समाजवादी वर्गाने बहुसंख्य भारतीयांच्या मनात शंका व संशय निर्माण केला आहे. त्यातून त्यांच्याकडे लोक देशद्रोही म्हणून बघू लागले आहेत. त्याच्याच परिणामी उजव्या लोकांकडे राष्ट्रप्रेमाची मक्तेदारी गेली आणि तमाम पुरोगामी उदारमतवादी देशद्रोही, अशी प्रतिमा होऊन गेली आहे. आता अर्थातच गुहा यांना कोणी मोदीभक्त म्हणू शकेल, कारण ती आजकालची पुरोगामी फ़ॅशन झालेली आहे. पुरोगाम्यांच्या चुका वा मुर्खपण दाखवला, की तो बघण्यापेक्षा समोरच्याला मोदीभक्त वा हिंदूत्ववादी ठरवणे सोपे असते. आपल्यात काही सुधारणा करण्याचे कष्ट टाळले जातात. त्यापासून मुक्ती मिळते. पण त्यामुळेच जनमानसात पुरोगाम्यांची देशद्रोही अशी प्रतिमा ठळक होत गेली आहे. ती पुसून काढण्यापेक्षा आजकालचे सेक्युलर ती अधिक पक्की करण्यालाच हातभार लावत असतात. आपली प्रतिमा सुधारण्याचे बाजूला राहिले. असे लोक भाजपा वा हिंदूत्ववादी लोकांना डिवचण्यासाठी अधिकाधिक मुस्लिमवादी वा पुढे पाकिस्तानवादी होत गेलेले आहेत. त्यातूनच मग मोदी विरोध वा भाजपा विरोध म्हणजे पाकिस्तानचे समर्थन, इतकी घसरगुंडी होऊन गेलेली आहे. आज लोहिया असते तर त्यांनीही पाक राजदूत व मनमोहन यांच्या छुप्या मेजवानीवर सवाल उपस्थित केले असते. पण त्यांचाच वारसा सांगणारे मात्र त्या मेजवानीचे समर्थन करण्यासाठी आपली बुद्धी झिजवताना दिसत आहेत. त्यातून या लोकांनी आपला शहाणपणा कुठे गहाण ठेवला आहे, असा प्रश्न पडतो. तर त्याचेही कारण आहे. लोहिया वा त्यांच्या कालखंडात हा समाजवादी मतप्रवाह चळवळीत उतरून काम करत होता आणि लोकांमध्ये वावरत होता. आजच्या जमान्यातल्या समाजवादी लोकांचा सामान्य जनतेशी काडीमात्र संबंध उरलेला नाही. म्हणून त्यांना जनमानसातील प्रतिमेची कसलीही फ़िकीर नाही.

मध्यंतरी म्हणजे १९८० नंतरच्या काळात पुर्वाश्रमीच्या बहुतेक समाजवादी नेते व कार्यकर्त्यांचा ओढा परदेशी अनुदानावर पोटपाणी चालवणार्‍या समाजसेवी उद्योगाकडे  वळला आणि लोकांपासून त्यांचा संबंध संपत गेला. माध्यमातून प्रसिद्धी व त्यातूनच चळवळीचा देखावा उभा करण्यात ही चळवळ मर्यदित होऊन गेली. त्यापैकीच काहींनी माध्यमात किंवा विद्यापीठात मोक्याच्या पदावर बस्तान मांडून विचारवंत किंवा समाजाचे धुरीण असल्याचे चित्र उभे करण्यात धन्यता मानली. असे विविध गट एकमेकांना सहाय्य करीत दिर्घकाळ समाजाच्या माथी आपला शहाणपणा मारत राहिले. त्यांची कसोटी मग मतदानात व राष्ट्रीय भूमिकांच्या परिक्षेला लागली. उजव्यांना वा हिंदूत्ववादी संघटना पक्षांशी दोन हात करणे शक्य नसल्याने अशा समाजवादी उदारमतवादी लोकांनी मुस्लिम वा ख्रिश्चन धर्मांधतेलाही शरण जाण्यासाठी मागेपुढे बघितले नाही. त्यामुळेच कधीकाळी तलाक विरोधात आंदोलन करणार्‍या समाजवादी वारशाला झुगारून लोहिया जयप्रकाशांचे वंशज तिहेरी तलाकची पाठराखण करताना दिसत आहेत. पाकिस्तानचे समर्थन करून ‘भारत तेरे तुकडे होगे’ अशा घोषणांच्याही समर्थनाला उभे रहाताना आपण बघू शकतो. कारण कसोटीच्या वेळी काय भूमिका घ्यावी, प्राधान्याचे विषय कसे ओळखावे, याचेही भान त्यांना उरलेले नाही. भाजपा वा रा. स्व. संघ यांना विरोध करताना भारतीय राष्ट्रीय भावनेलाही विरोध करण्यापर्यंत हे लोक कधी जाऊन पोहोचले, त्याचा त्यांनाही अजून पत्ता लागलेला नाही. भाजपाला हरवण्यासाठी भारताला हरवून पाकिस्तानला विजयी करण्यासाठीही झटण्यास हे लोक मागेपुढे बघायला आता तयार नाहीत. कारण तसे केल्यास बहुतांश भारतीय जनताच आपल्या विरोधात जाईल, याचीही त्याला फ़िकीर राहिलेली नाही. साध्या भाषेत त्याला दिवाळखोरी म्हणतात. बुद्धीजिवी भाषेत त्याला बौद्धिक दिवाळखोरी म्हणतात.

कसला राष्ट्रवाद? कुठले राष्ट्रप्रेम? असले सवाल अलिकडल्या काळात सातत्याने विचारले जात असतात. त्याला लोक मतातून उत्तर देत असतानाही डाव्यांना किंवा समाजवादी लोकांना अक्कल येत नाही. तर त्यांचे डोके ठिकाणावर नाही, असेच म्हणावे लागेल. कारण लोकशाहीत लोकमत सर्वोपरी असते. त्याच मतांच्या बळावर बहूमत व सत्ता मिळत असते. किंबहूना म्हणूनच लोकमत मोदींच्या बाजूला अधिकाधिक वळत गेलेले आहे. देशद्रोह्यापेक्षा इतर कुठलाही राजकारणी चालला, असे़च मग लोकांना वाटत असेल, तर गैर काय? पाकिस्तान भारतीय जवानांना रोजच्या रोज सीमेवर गोळ्या घालणार आणि भारतात घातपाती पाठवून उचापती करणार. पण इथले समाजवादी हिंदू दहशतवादाचा डंका पिटून कांगावा करीत रहाणार, हे लोक कसे चालवून घेतील? सामान्य माणसे व्यवहारी असतात आणि त्यांना बुद्धीवादी युक्तिवाद समजत नाही. गुहा त्याच दुखण्याकडे बोट दाखवत आहेत. देशातल्या राजकारणात मोदींची लोकप्रियता वाढलेली नाही, तर सामान्य माणसाला पुरोगाम्यांनीच देशद्रोहाचा पवित्रा घेऊन आपल्या विरोधात उभे केलेले आहे. त्याचा परिणाम म्हणून मोदी जिंकलेले दिसतात. पुरोगामी उदारमतवादी लोकांनी आपला देशद्रोही पवित्रा झटकून टाकला पाहिजे. हेच गुहा मिमांसा करून सांगत आहेत. पण कुठलीही गोष्ट समजून घेण्यापेक्षा नाकारण्यातच आपला शहाणपणा सामावलेला असल्याची समजूत करून बसलेल्यांना कोणी जागे करावे? आत्महत्येमध्ये संजीवनी शोधणार्‍यांना कोण कसे वाचवू शकेल? अशा डाव्या उदारमतवादाचा अस्त अपरिहार्य आहे. कारण तो झेंडा खांद्यावर घेतलेल्यांना आपल्या अस्तित्वाचा हेतू वा कार्यकारणभावच उमजलेला नसेल, तर त्यांचे भवितव्य काय असू शकते? राजकीय क्षितीजावरून त्यांचा सूर्य कधीच मावळला आहे. सामाजिक जीवनात त्यांचा कधी अस्त होतो ते बघायचे.

17 comments:

  1. "राजकीय क्षितीजावरून त्यांचा सूर्य कधीच मावळला आहे. सामाजिक जीवनात त्यांचा कधी अस्त होतो ते बघायचे."

    Agadi Tasech Hovo Tarach Hya Deshala Aankhin Changle Divas Yetil Hyachi Khatri Aahe.

    Vinod R. Mulye

    ReplyDelete
  2. very accurate analysis of how Samajaadi's lost their political ground and handed over to BJP with their own suicidal anti national policies.

    ReplyDelete
  3. खरय भाउ.कालच एका शहान्याने शिवराज पाटिल कसे विचारवंत आहेत असे तारे तोडले.लोक म्हनु लागले की मुंबइवर हल्ला झाला असताना कपडे बदलत बसनार्या विचारी मानसाचा काय उपयाेग तरी पन हा पुरोगामी मानुस हट्ट न सोडता लोंकानाच डाफरत राहीला कठिनच ााहे यांच

    ReplyDelete
  4. भाऊ याच पुरोगामित्वाचे नवे स्वामी, गुजरात चे त्रिमूर्ती. त्यांच्यापैकी एक भीमा कोरेगाव मध्ये झालेल्या इंग्रज मराठा लढाईचा जो विजयस्तंभ आहे तिथे इंग्रजांचा न झालेला विजय साजरा करणार आहेत...(यावर आपण एक लेख लिहावा ही अर्थातच माझी विनंती आहे आपल्याला)
    या अश्या जाणीवपूर्वक हिंदू आणि भारत विरोधी भूमिकेमुळे च हा दिवा लवकरात लवकर विझणार आहे. मतपेटीतून लोकंच तो विझावातील. आणि मोदी फार काही न बोलता जिंकत राहतील.

    ReplyDelete
    Replies
    1. हो खरच... काय आहे ही भीमा कोरेगावची घटना... बऱ्याच लोकांना माहिती नाही त्याबद्दल... कृपया त्यावर एक सविस्तर लेख लिहावा...

      Delete
    2. Facebook var ek sanket kulkarni mhanun profile ahe. Te London la rahtat. Tyanni London chya British library madhil assal kagadpatranvarun 7 lekh lihile ahet. Te tumhi vachu shakta.

      Delete
  5. कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ.हे पुरोगामी चळवळखोर मूळच्या समाजवादी चळवळींच्या नाशास कारणीभूत होणार आहेत,पापाचे धनी होणार आहेत.

    ReplyDelete
  6. ‘जमाते पुरोगामी’ टोळीतील २०३ तथाकथित उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष लोकांनी दहशतवादी कसाब याच्यावर दया दाखवावी म्हणून तत्कालीन राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. यापैकी किती जण कुलभूषण जाधव यांच्या वतीने बोलण्यास तयार आहेत ?

    भारत हा कदाचित एकमेव देश आहे जेथे पाठीत खंजीर खुपसणारे देशद्रोही जास्तीत जास्त प्रमाणात सापडतील. जिहादचा नावाखाली ज्यांनी असंख्य निरपराध लोकांचे प्राण घेतले आहेत अशा दहशतवाद्यांबद्दल दया व आस्था दाखविणारे लोकही येथेच सापडतील.

    स्वतःला उच्चभ्रू व मानवाधिकारवादी म्हणवून घेणाऱ्या या लोकांची ही जमात निधर्मी म्हणविणाऱ्या राजकीय पक्षांनी स्वातंत्र्य मिळाल्यापासून पोसली आहे. भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली हे देशद्रोही खुलेआम दहशतवादी व गुन्हेगारांची बाजू उचलून धरत आले आहेत. देशविघातक संघटना तसेच परदेशी स्वयंसेवी संस्थांकडून या लोकांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आला आहे. भारतात जेव्हा अतिरेकी, नक्षलवादी आणि माओवाद्यांवर कठोर कारवाई केली जाते तेव्हा या मानवतावादी लोकांना कंठ फुटतो पण आमच्या सीमेवरील जवानांवर हल्ला केला जातो तेव्हा हे लोक मूग गिळून शांत बसलेले असतात.

    कसाब याच्यासाठी दयेचा अर्ज करणारे हेच लोक संसदेवर हल्ला करणाऱ्या दहशतवादी अफजल गुरु याची शिक्षा रद्द व्हावी म्हणून आघाडीवर होते. यातील अनेक लोक कॉंग्रेसच्या शासनकाळात राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य होते हे विशेष तर आहेच पण या समितीचे अध्यक्षपद बहुसंख्य काळ सोनिया गांधी यांच्याकडे तेव्हा होते हे आणखी विशेष होय.

    दहशतवादी कसाब याच्यावर दया दाखवावी म्हणून तत्कालीन राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करणाऱ्या २०३ लोकांपैकी काही लोक असे आहेत -

    अरुणा रॉय – डाव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्या, राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या माजी सदस्या.

    निखिल डे - डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते, अरुणा रॉय यांचे जवळचे मदतनीस.

    हर्ष मंडेर- सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे सदस्य.

    आकार पटेल- अमेरिकेतील अॅमेनस्टी इंटरनॅशनलचे संचालक, मानवी हक्क कार्यकर्ते.

    नंदिता दास- नटी

    शंकर सेन- निवृत्त संचालक, राष्ट्रीय पोलीस अकादमी.

    डॉ. वॉल्टर फर्नांडिस - ईस्टर्न सोशल रिसर्च सेंटर.

    रिचा मिनोच - सदस्य सचिव, जन अभियान संस्थान, हिमाचल प्रदेश.

    रिम्पल मेहता- जवाहरलाल नेहरू डॉक्टरल फेलो, जादवपूर विद्यापीठ (याच विद्यापीठात भारतविरोधी घोषणा दिल्या जातात)

    जावेद इकबाल- पत्रकार

    संपूर्ण यादी पुढील संकेतस्थळावर पहाण्यास मिळेल : http://ratthes.blogspot.in/2013/02/list-of-people-who-signed-ajmal-kasabs.html

    आता, यापैकी किती लोक कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात बोलले आहेत ? कुलभूषण जाधव यांना दिल्या जात असलेल्या अमानवी वागणुकीबद्दल तसेच कुलभूषण जाधव यांच्या वृद्ध आई व पत्नीला पाकिस्तानने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीविरूद्ध यापैकी किती जणांनी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेकडे तक्रार नोंदवली आहे ? दहशतवादी व गुन्हेगार यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या या लोकांना मानवाधिकार कार्यकर्ते म्हणण्याऐवजी दहशतवादी अधिकार कार्यकर्ते म्हणणे सर्वथाः योग्य आहे.

    ‘भारत तेरे टुकडे होंगे’ असे म्हणणाऱ्या, भारतीय सैनिकांना खुनी व बलात्कारी म्हणणाऱ्या कन्हैया कुमार, उमर खालिद यांना या लोकांनी उघड उघड पाठींबा दिला आहे. भारताच्या शूर सैनिकांनी जीवावर उदार होऊन केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची ‘नाटक’ म्हणून संभावना करणाऱ्या डाव्या पक्षांचा या लोकांना कायम पाठींबा मिळत आला आहे.

    अशा लोकांना धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवादी म्हणून संबोधले जाणे योग्य आहे का याचा निर्णय आपण घ्यायचा आहे.

    - पोस्टकार्ड न्यूज या संकेतस्थळावरील ऐश्वर्या यांच्या लेखाच्या आधारे.

    ReplyDelete
  7. मुळातच पुरोगाम्यांकडे जनतेला द्यावे असे काही राहिले का?
    पुरोगामी आता अस्सल जातीयवादी बनलेले आहेत. लोकांची दिशाभूल करण्यात ते पटाईत आहेत. परकीय मदतीने स्वतःचे पेरेस्ट्रोईका चे दुकान मांडून बसले आहेत.

    ह्या पुरोगामी लोकांना देशाशी काहीही घेणेदेणे नाही. तरुण पिढीने यांच्या नादाला लागून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये.

    जगाच्या पाठीवर आपला देश हे एकमेव उदाहरण असावं, की ज्यावर जवळपास एक हजार वर्षे परकीय लोकांनी सत्ता गाजवली. तरीही आपण आजही काहीही शिकायला तयार नाही.

    ReplyDelete
  8. साधारणतः 2003,2004 ची गोष्ट आहे. पुरोगामी विचारांचे आकर्षण होते. मग वेगवेगळ्या लोकांना भेटून ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण लवकरच भ्रमनिरास झाला.
    एका पुरोगामी विचारांच्या संस्थेत गेलो . तिथे काही त्यांनी पुस्तके दिली. त्यातल्या एका पुस्तकात समान नागरी कायद्या बद्दल लेख होता. त्यातील एक वाक्य साधारणतः असे होते की, "....तर मग आता लक्षात आले असेल की हिंदुत्ववाद्यांना सनाका का येतो?"
    एकीकडे महिला सक्षमीकरणच्या बाता करायच्या. समानतेच्या गोष्टी सांगायच्या. आणि प्रत्यक्षात वेगळच काहीतरी करायचं.

    दत्तप्रसाद दाभोलकर यांच व्याख्यान ऐकलं. त्यात त्यांनी सरदार सरोवर , नर्मदा नदी प्रकल्प या जे बोलले होते ते सुरवातीला खटकले होते. मग त्या बद्दल माहिती मिळवली . त्यांचे म्हणणे नंतर पटले.

    मेधाताई पाटकर न्यूयॉर्क मध्ये जाऊन काय करतात? कोण त्यांना पैसा पुरवत?
    काही पुरोगामी असे होते की त्यांची मुले(मुलगा, मुलगी) अमेरिकेत किंवा इतरत्र स्थायिक झाले होते. आणि इथे त्याच अमेरिकेच्या नावाने , भांडवलदारांच्या नावाने खडे फोडण्यात आघाडीवर होते. आजही आहेत.
    या लोकांचे बोलावते धनी कोण आहेत? हे सर्वसामान्य लोकांना समजले पाहिजे. या लोकांचे खरे रूप जनतेला समजणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  9. A Communist system cannot tolerate another political party or ideology. Therefore, perhaps only after they exterminate all of their opponents, they would accept "free speech" from their supporters.

    ReplyDelete
  10. नेहमीप्रमाणे अप्रतिम विवेचन

    ReplyDelete
  11. एका मराठी मुलाने माझ्याशी वाद घातला होता - राष्ट्रवाद चांगली गोष्ट असती तर बाबासाहेबांनी संविधानात त्याबद्दल गौरवोद्गार काढले असते, त्यांनी त्याबद्दल काही लिहिले नाही म्हणजे राष्ट्रवाद चांगली गोष्ट नाही - कुराणात नाही म्हणजे जगात असू शकत नाही त्याचं तऱ्हेचे बोल होते. त्याला विचारलं, सेक्युलर आणि समाजवादी सुद्धा त्यांनी लिहिलेले शब्द नाहीत, त्यावर उत्तर नाही .

    ReplyDelete
  12. लेख तर छान आहेच पण प्रतिक्रिया देखील अभ्यासपूर्ण आहेत

    ReplyDelete
  13. लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही अभ्यासपूर्ण

    ReplyDelete
  14. प्रश्न : भारताच्या इतिहासलेखनावर डाव्या इतिहासकारांनी अवाजवी प्रभाव टाकला आहे आणि इतर विचारधारांचे दमन केले आहे, यावर तुमचे म्हणणे काय आहे?
    रामचंद्र गुहा : मी त्यांच्याशी काही प्रमाणात सहमत आहे. आपल्याकडे मार्क्सिस्ट गट होता. ज्याचे विद्यापीठांवरती नियंत्रण होते. इंदिरा गांधींनी बहुमत वाचवण्यासाठी भारतीय कम्युनिस्टपक्षाची मदत घेतली. आणि त्याबदल्यात इंदिरा गांधींनी ICHR, NCERT वरती कम्युनिस्टपक्षाला ताबा घेऊ दिला. काही प्रमाणात ते खरे आहे व त्याबद्दल आवाज उठवला गेला पाहिजे. तिथे जास्त मोकळेपणा आला पाहिजे. निरोगी लोकशाहीवादी चर्चा आणि वादासाठी आपल्याला डावे, उदारमतवादी आणि परंपरावादी (conservative) असे सर्व विचारप्रवाह आवश्यक आहेत. भारतातील अडचण ही आहे की भारतात परंपरावादी बुद्धिजीवी जवळ जवळ नाहीतच. आणि जोपर्यंत संघ उजव्या विचारधारेची जागा व्यापून आहे तोपर्यंत ते नसणारच. कारण संघाची भूमिका मुळातूनच बुद्धिजीवीविरोधी (anti- intellectual) आहे. इतर लोकशाही देशांमध्ये (फ्रान्स, अमेरिका, जर्मनी) परंपरावादी बुद्धिजीवी आहेत. जे विचारपूर्वक आपली मते मांडतात. गहन अभ्यास करतात. जे पारंपरिक मूल्ये-कुटुंब-समाजव्यवस्था-सभ्यता-सौंदर्य यांचे महत्त्व मांडतात. अभिजात संगीत आणि अभिजात कला का महत्त्वाची आहे, हे मांडतात.
    वरील आरोपांच्या संदर्भात डाव्यांनी वैचारिक वादांमध्ये केवळ उजव्यांचेच नाही तर उदारमतवाद्यांचेही दमन केले, हे काही प्रमाणात खरे आहे... तुम्हाला बुद्धिजीवी म्हणून मोठी कामगिरी करायची असेल तर तुम्हाला अभ्यासपूर्वक लेख, निबंध लिहावे लागतील. आणि कोणताही उजवा बुद्धिवादी हे काम करायला तयार नाही. भारतातील उजवे बुद्धिवादी एकतर आळशी आहेत किंवा असहिष्णू आहेत. पण बुद्धिजीवी काम मेहनतीचे काम आहे. त्यात विचार, विश्लेषण, संशोधन, मनन, स्वत:च्या चुका सुधारण्याची क्षमता, स्वत:चा दृष्टिकोन व्यापक करणे, दुसऱ्याचे ऐकणे इ. गोष्टी येतात. चक्रवर्ती राजगोपालाचारी उजव्या बुद्धिजीवींसाठी आदर्श मानले जाऊ शकतील अशी व्यक्ती आहे... राज्यव्यवस्थेचा हस्तक्षेप कमी असावा असे त्यांचे मत होते. कुटुंब, समाज, परंपरा यांचे महत्त्वाचे स्थान आहे, असे त्यांचे मत होते. राजाजींकडून उजव्या बुद्धिजीवींना प्रेरणा मिळू शकेल. (आजचा सुधारक, सप्टेंबर-ऑक्टो. २०१६)

    ReplyDelete
  15. प्रश्न : भारताच्या इतिहासलेखनावर डाव्या इतिहासकारांनी अवाजवी प्रभाव टाकला आहे आणि इतर विचारधारांचे दमन केले आहे, यावर तुमचे म्हणणे काय आहे?
    रामचंद्र गुहा : मी त्यांच्याशी काही प्रमाणात सहमत आहे. आपल्याकडे मार्क्सिस्ट गट होता. ज्याचे विद्यापीठांवरती नियंत्रण होते. इंदिरा गांधींनी बहुमत वाचवण्यासाठी भारतीय कम्युनिस्टपक्षाची मदत घेतली. आणि त्याबदल्यात इंदिरा गांधींनी ICHR, NCERT वरती कम्युनिस्टपक्षाला ताबा घेऊ दिला. काही प्रमाणात ते खरे आहे व त्याबद्दल आवाज उठवला गेला पाहिजे. तिथे जास्त मोकळेपणा आला पाहिजे. निरोगी लोकशाहीवादी चर्चा आणि वादासाठी आपल्याला डावे, उदारमतवादी आणि परंपरावादी (conservative) असे सर्व विचारप्रवाह आवश्यक आहेत. भारतातील अडचण ही आहे की भारतात परंपरावादी बुद्धिजीवी जवळ जवळ नाहीतच. आणि जोपर्यंत संघ उजव्या विचारधारेची जागा व्यापून आहे तोपर्यंत ते नसणारच. कारण संघाची भूमिका मुळातूनच बुद्धिजीवीविरोधी (anti- intellectual) आहे. इतर लोकशाही देशांमध्ये (फ्रान्स, अमेरिका, जर्मनी) परंपरावादी बुद्धिजीवी आहेत. जे विचारपूर्वक आपली मते मांडतात. गहन अभ्यास करतात. जे पारंपरिक मूल्ये-कुटुंब-समाजव्यवस्था-सभ्यता-सौंदर्य यांचे महत्त्व मांडतात. अभिजात संगीत आणि अभिजात कला का महत्त्वाची आहे, हे मांडतात.
    वरील आरोपांच्या संदर्भात डाव्यांनी वैचारिक वादांमध्ये केवळ उजव्यांचेच नाही तर उदारमतवाद्यांचेही दमन केले, हे काही प्रमाणात खरे आहे... तुम्हाला बुद्धिजीवी म्हणून मोठी कामगिरी करायची असेल तर तुम्हाला अभ्यासपूर्वक लेख, निबंध लिहावे लागतील. आणि कोणताही उजवा बुद्धिवादी हे काम करायला तयार नाही. भारतातील उजवे बुद्धिवादी एकतर आळशी आहेत किंवा असहिष्णू आहेत. पण बुद्धिजीवी काम मेहनतीचे काम आहे. त्यात विचार, विश्लेषण, संशोधन, मनन, स्वत:च्या चुका सुधारण्याची क्षमता, स्वत:चा दृष्टिकोन व्यापक करणे, दुसऱ्याचे ऐकणे इ. गोष्टी येतात. चक्रवर्ती राजगोपालाचारी उजव्या बुद्धिजीवींसाठी आदर्श मानले जाऊ शकतील अशी व्यक्ती आहे... राज्यव्यवस्थेचा हस्तक्षेप कमी असावा असे त्यांचे मत होते. कुटुंब, समाज, परंपरा यांचे महत्त्वाचे स्थान आहे, असे त्यांचे मत होते. राजाजींकडून उजव्या बुद्धिजीवींना प्रेरणा मिळू शकेल. (आजचा सुधारक, सप्टेंबर-ऑक्टो. २०१६)

    ReplyDelete