हमे तो अपनों ने लूटा गैरों में कहाँ दम था.
हमारी कश्ती भी वहा डूबी जहाँ पानी कम था
राहुल गांधी व त्यांच्या कॉग्रेसची अवस्था नेमकी कशी आहे, त्याचे इतके सुंदर व नेमके वर्णन बहुधा दुसरे कुठे मिळू शकत नाही. एखाद्या बुडीत जाणार्या संस्था वा संघटनेला डुबणार्या जहाजाची उपमा दिली जात असते. जेव्हा असे जहाज बुडण्याची शक्यता निर्माण झालेली असते, तेव्हा त्यातील अनावश्यक ओझे कमी करण्याचा प्रघात आहे. म्हणजे एक एक करून नको असलेले सामान जहाजातून बाहेर फ़ेकून देतात. कारण किनारा लागेपर्यंत किंवा सुरक्षित कुठेतरी पोहोचण्यापर्यंत, जहाजाला वाचवणे अगत्याचे असते. पण कॉग्रेस ही अशी डुबती नौका आहे, जिथे अनावश्यक बोजा व ओझी ठासून भरलेली आहेत आणि जे कोणी ती नौका वाचवू शकतील. त्यांनाच उचलून बाहेर फ़ेकून दिले जात असते. राहुल गांधी अशी बुडती नौका वाचवायला निघालेले आहेत. सहाजिकच अशा नौकेला बुडण्यासाठी कुठल्या चक्रीवादळाची गरज नाही की खोल समुद्रातही फ़सण्याची गरज नाही. अगदी उथळ पाण्यातही कॉग्रेसची नौका बुडत चालली आहे. तसे नसते तर दिग्गीराजा, मणिशंकर अय्यर वा कपील सिब्बल अशा एकाहून एक निरूपयोगी माणसांना राहुलनी असे उराशी कशाला धरून ठेवले असते? उपरोक्त काव्यामध्ये त्याचेच वर्णन आलेले आहे. कॉग्रेसला मागल्या निवडणूकीत नरेंद्र मोदी वा भाजपाने हरवले असे उगाच मानले गेले आहे. वास्तवात मोदी वा अन्य कुठल्या पक्षात तितकी हिंमत नाही किंवा क्षमताही नाही. कॉग्रेसला तिच्यातच सहभागी असलेल्या एकाहून एक नमूनेदार नेत्यांनी धाराशायी केलेले आहे. बाहेरच्या कोणी कॉग्रेसला घायाळ वा जखमी करण्याचीही गरज नव्हती, इतके हे नमूने एकाहून एक जबरदस्त आहेत. आताही कपील सिब्बल या नेत्याने राहुलच्या कॉग्रेसला सुप्रिम कोर्टाच्या सुनावणीतच खड्ड्यात घातले आहे. अयोध्या व बाबरी प्रकरणातल्या सुनावणीत या अतिशहाण्याने कॉग्रेसला अकारण असेच तोंडघशी पाडलेले आहे.
मंगळवारी अयोध्या अपिलाची सुनावणी सलग सुरू व्हायची होती. त्यात सुन्नी वक्फ़ बोर्डाचे वकील म्हणून कपील सिब्बल हजर झाले आणि त्यांनी ती सुनावणीच दोन वर्षे पुढे ढकलून देण्याची मागणी खंडपीठाकडे केली. ह्या प्रकरणाचा लोकसभा निवडणुकीवर प्रभाव पडण्याची शक्यता असल्याने पुढली म्हणजे २०१९ लोकसभा निवडणूक संपण्यापर्यंत ह्या प्रकरणाची सुनावणी होऊच नये, अशी मागणी सिब्बल यांनी केली. किंबहूना ती मान्य झाली नाही, तर आपण सुनावणीवर बहिष्कार घालू अशी धमकीही कोर्टाला देऊन टाकली. कुठलाही वकील कोर्टाला वा न्यायाधीशांना अशा उर्मट भाषेत धमकी वा इशारा देऊ शकत नाही. न्यायासाठी तुम्ही कोर्टासमोर उभे असता, तेव्हा नम्रपणे आपली बाजू मांडावी अशी अपेक्षा असते. तसा संकेत असतो. पण राहुलचा आशीर्वाद आपल्या माथ्यावर आहे म्हटल्यावर सिब्बल यांना आपण देशातले नव्हेतर जगातले सर्वात मोठे न्यायाधीश असल्याचा भ्रम झालेला आहे. म्हणून ते कोणालाही हिंदू ठरवू लागले आहेत आणि कोणालाही हिंदू धर्मातून डच्चू देण्यापर्यंतही त्यांची मजल गेलेली आहे. मोदी रोज मंदिरात जात नाहीत म्हणून त्यांनी कधीचाच हिंदू धर्म सोडला असल्याचा निवाडा अलिकडेच सिब्बल यांनी दिलेला होता. तर राहुल व गांधी खानदान शिवभक्त असल्याचे सांगत त्यांनी आपल्या हिंदूत्वाचा डंका पिटलेला होता. पण तेच सिब्बल कोर्टात हजर झाले आणि त्यांना हिंदू धर्माची व मंदिराची कमालीची भिती वाटू लागली. त्यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर हा देशालाच धोका असल्यापर्यंत मजल मारली. गुजरातमध्ये चांगल्या जागा मिळवण्यासाठी राहुल प्रत्येक मंदिराच्या पायर्या झिजवत आहेत आणि आता सिब्बल यांनी मंदिराचाच भारताला धोका असल्याचे सांगून टाकलेले आहे. मग कॉग्रेसने त्याचे कुठल्या तोंडाने समर्थन करावे?
सिब्बल यांच्या अशा बेताल बोलण्याचा विरोध करणे कॉग्रेसला शक्य नव्हते. म्हणूनच मग पळवाट काढण्यात आली. कपील सिब्बल सुप्रिम कोर्टात कॉग्रेसचे वकील म्हणून बोलत नव्हते, तर त्यांनी सुन्नी वक्फ़ बोर्डाचे वकील म्हणून सदरहू मागणी केलेली आहे. त्याचा कॉग्रेसशी वा राजकारणाशी काहीही संबंध नाही, असा खुलासा पक्षातर्फ़े करण्यात आला. पण पक्षात एकटे़च सिब्बल कुठे नमूना आहेत? एकाहून एक नमूने राहुल व सोनियांनी गोळा करून ठेवलेले आहेत. एकाला झाकावे तर दुसरा शेण खातोच ना? तसेच झाले. कारण पक्षाने ती भूमिका वा मागणी सुन्नी वक्फ़ बोर्डाची असल्याचा खुलासा केला खरा. पण त्याच बोर्डाचा मुळातला पक्षकार हाजी महबुब याने तो खुलासा साफ़ फ़ेटाळून लावला. आपण वकील म्हणून सिब्बल यांना असे काही मांडायला पुढे केलेले नाही. अयोध्येतील वादाचा राजकारणाशी काही संबंध नाही आणि सुन्नी मुस्लिमांनाही तात्काळ या विषयाचा निवाडा हवा आहे. सिब्बल यांनी सुनावणी टाळण्याची घेतलेली भूमिका वा केलेले निवेदन त्यांच्या कॉग्रेस पक्षाचे धोरण आहे वक्फ़ बोर्डाचे नाही; असे हाजी महबुब यांनी पत्रकारांना सांगून टाकले. सहाजिकच आता सिब्बल दोन्हीकडून फ़सले आहेत. त्यांनी आपल्या सोबतच राहुलच्या कॉग्रेस पक्षाला खड्ड्यात घातले आहे. एका बाजूला राहुल आपल्या सौम्य हिंदूत्वाच्या जानव्यातून हिंदू मते मिळवण्यासाठी दाताच्या कण्या करीत आहेत आणि तिकडे कोर्टात सिब्बल राहुलच्या हिंदूत्वाला जाळिदार मुस्लिम टोपी चढवून नमाज पढायला बसवित आहेत. त्यामुळे कॉग्रेसची पुरती तारांबळ उडाली तर नवल नाही. हाजी महबुब यांच्या खुलाशानंतर कॉग्रेसवाल्यांना तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. कारण राहुलना वाचवावे तर सिब्बलना नाकारावे लागणार आणि सिब्बल तर राहुलचे लाडके पात्र आहे. मग करायचे काय?
मागल्या दोनतीन वर्षात सिब्बल यांनी ज्यांचे म्हणून वकीलपत्र घेतले, त्या प्रत्येकाला त्यांनी गोत्यात घातले आहे आणि आपल्या बेताल वक्तव्यांनी व युक्तीवादातून स्वपक्षाला अशीलाला गोत्यात आणण्याची त्यांची ख्याती तयार झालेली आहे. कन्हैयाकुमार, रोहिंग्या वा तिहेरी तलाक अशा प्रत्येक खटल्यात त्यांना सुप्रिम कोर्ट वा अन्य कुठल्या तरी न्यायाधीशांकडून चपराक खावी लागलेली आहेच. आगदी अलिकडेच तिहेरी तलाकचा खटला त्यांनी हरवून दाखवला आहे. अशा लोकांना सोबत घेऊन राहुल कॉग्रेसचा जिर्णोद्धार करायला निघालेले आहेत. मग कॉग्रेसचे भवितव्य काय असेल हे सांगण्यासाठी कोणा कुडमुड्या ज्योतिषाची गरज आहे काय? आपल्याच गळ्यात हार घालून कत्तलखान्याकडे धावत सुटलेल्या बोकडाला कोणी वाचवू शकत नाही. कपील सिब्बल, मणिशंकर अय्यर असे एकाहून एक नमूने असल्यावर राहुल गांधींच्या कॉग्रेसला नामशेष करण्यासाठी भाजपाला वेगळे कष्ट घेण्याची काय गरज उरणार आहे? दया येते, ती अशा दिवाळखोरांच्या मुर्खासारख्या बडबडीचे समर्थन करणार्या पुरोगामी शहाण्यांची! कारण अशा प्रत्येक खेळीतून व मुक्ताफ़ळातून हे नमूने त्या शहाण्यांच्या बुद्धीची कसोटी घेत असतात. मागल्या दोन महिन्यात राहुल गांधींनी मोदींच्या नाकी कसा दम आणलेला आहे. ते समजावण्यात बहुतांश पुरोगामी शहाण्यांची बुद्धी खर्ची पडलेली आहे. आता कपील सिब्बल वा मणिशंकर अय्यर यांच्यासारख्या बेताल बोलणार्यांच्या बळावर राहुल गोत्यात आल्यावर खरी अब्रु जाते आहे ती पुरोगामी विचारवंतांची. कारण लोकांसमोर हे राजकारणी कधीच बेअक्कल ठरलेले आहेत. त्यांना लोकांनी बेदखल करून टाकलेले आहे. सवाल राहुलचे सार्वजनिक वकीलपत्र घेतलेल्या बुद्धीमंतांचा आहे. ते अशा दिवाळखोरांची बाजू मांडताना आणखी किती वस्त्रहरण करून घेणार इतकाच प्रश्न आहे. कारण कॉग्रेसची नौका डुबण्यासाठी वादळ व खोल समुद्राची गरजच नाही ना?
Modiji ni aaj ha mudda pracharat ghetla pan.
ReplyDeleteअश्या मूर्खां करीता भाऊ कशाला आपली लेखणी पाजळता
ReplyDeleteलिहले नाही तर आपल्याला कसे कळणार....मीडिया दाखवेल का अस विश्लेषण...
Deleteभाऊ,
ReplyDeleteखूप वास्तवदर्शी लिखाण.किती बरं होईल जर हे काँग्रेस नेतृत्व समजून घेतील? असंही आपण म्हणू शकत नाही...
नेतृत्व आहेच कुठे??
भाऊ हे सोडा हो... हे लोक आहेतच बावळट..
ReplyDeleteतुम्ही थोड ट्रम्प त्यात्यांबद्दल लिहा.. ते काय म्हणतायत US ambassy बद्दल.. जरा ते राजकारण भारी वाटतय ह्यापेक्षा..
उत्तम
ReplyDeleteआपल्याच गळ्यात हार घालून कत्तलखान्याकडे धावत सुटलेल्या बोकडाला कोणी वाचवू शकत नाही. hasun hasun melo bhau ya wakyawar !!!
ReplyDeleteराहुलचे हिंदुत्वाचे सोवळे टिकणार नव्हतेच. बिगर अंघोळीच्या कपिल सिब्बल यांनी ते मोडलेच.आधीच तकलादू असलेले राहुल बाबांचे सोवळे टिकवताना आता नकी नऊ येणार काँग्रेसच्या!!
ReplyDeleteApratim lekh ahe Bhau. Bin paanyani vapan kelay. Hahahaha
ReplyDeletehaha 1 no.
ReplyDelete