Tuesday, September 4, 2018

दगडफ़ेके, वकील, साहित्यिक

stone pelters के लिए इमेज परिणाम

काश्मिरातले भाजपा-पीडीपी संयुक्त सरकार कोसळले आणि नंतरच्या काळात तिथे लष्करी कारवाईत होणार्‍या दगडफ़ेकीला मोठा आळा बसला. शासकीय यंत्रणेत बसलेल्या जिहादी सहानुभूतीदारांना चाप लावला गेला आणि त्याचे परिणाम त्वरेने दिसून आलेले आहेत. आणखी एक गोष्ट इथे मुद्दाम नमूद केली पाहिजे. महबुबा सरकार कोसळले आणि शासन यंत्रणा राज्यपालांच्या माध्यमातून पुर्णपणे केंद्राच्या अखत्यारीत आली. मग हुर्रीयत नावाचा बागुलबुवा संपुष्टात आला. गेल्या दोन महिन्यात आपल्याला दगडफ़ेकीचे प्रकार आणि हुर्रीयतचा तमाशा फ़ारसा बघायला मिळालेला नाही. कारण कुठलेही युद्ध अनेक पातळ्यांवर किंवा आघाड्यांवर लढवले जात असते. त्यात फ़क्त सैनिकच नसतात. तर हत्याराशिवायही सेनेला लढायला हातभार लावणारे अनेक घटक कार्यरत असतात. अनेकदा त्यांना तुम्ही सैनिक वा सेना दलाचेही म्हणू शकत नसता. पण तेही युद्ध प्रयासातले महत्वाचे घटक असतात. जो नियम खर्‍या युद्धाला लागू होतो, तोच गनिमी वा घातपाती युद्धालाही लागू होतो. त्यात नुसतेच सैनिक असून भागत नाही, तर अशा विविध घटकांची जाळी उभारावी लागतात. त्यात हेरखाते येते, तसेच सामग्री वा रसद पुरवणाराही मोठा घटक आवश्यक असतो. नक्षली वा जिहादी युद्ध त्याला अपवाद नाही. म्हणूनच हुर्रीयत वा दगडफ़ेके यांच्याकडे सामान्य नागरिक वा जमाव म्हणून बघता येत नाही. ते राजकीय संघटनाही नसतात, तर ज्यांच्यावर हल्ला करतात, त्यांचे शत्रूसैन्य म्हणूनच त्यांच्याकडे बघावे लागत असते. त्यांनाही तशीच वागणूक द्यावी लागत असते. जे काम काश्मिरात दगडफ़ेके करतात, तेच नक्षली युद्धामध्ये शहरी पांढरपेशे नक्षलवादी करीत असतात. प्रत्यक्ष युद्ध लढणार्‍यांना मदत वा घातपात अशी जबाबदारी त्यांना पार पाडायची असते. ते ज्या बाजूचे असतात, त्यांच्या विरोधातील कारवाईत अडथळे आणणे, हे त्यांचे काम असते.

काश्मिरात भारत सरकार वा कुठला राजकीय पक्ष जिहादी मुजाहिदीनांशी दोन हात करत नाही. ते काम स्थानिक पोलिस, तपास यंत्रणा वा भारतीय लष्कराचे जवान करीत असतात. त्यांना स्थानिक पातळीवरील विविध प्रशासकीय संघटना वा अधिकारी कर्मचारी मदतही करीत असतात. नेमके तेच काम जिहादींना संकटातून सोडवून आणण्यासाठी दगडफ़ेके व हुर्रीयतचे लोक करीत असतात. हुर्रीयतवाले कुठलेही शस्त्र हाती घेत नाहीत, तर युवकांची व लोकांची माथी भडकावण्याचे काम करतात. त्यातून जो प्रक्षोभ माजवला जातो, त्याच्या परिणामी चकमकीत गुंतलेल्या भारतीय जवानांवर दगडफ़ेक रुपाने होत असतो. अशा युवकांना प्रवृत्त करण्यापासून आवश्यक ते पैसे वा साहित्य पुरवण्याचेही काम हुर्रीयतसारख्या संघटना पार पाडत असतात. सहाजिकच अशा कुठल्याही पांढरपेशा हुर्रीयतवाल्याचा थेट हिंसाचारात सहभाग आहे, असे कागदोपत्री वा पुराव्यानिशी सिद्ध करणे कायदा प्रशासनाला शक्य होत नाही. वरकरणी ही माणसे सभ्य सुसंस्कृत सुशिक्षितच असतात. पण त्यांच्या कामामधून हिंसचाराला चालना मिळत असते. त्याला युद्धशास्त्रामध्ये रसद पुरवणारी यंत्रणा म्हटले जाते. शत्रूच्या सैन्याला हैराण करून सोडले, मग त्याला लढणे अशक्य होऊन जाते. पर्यायाने समोरच्या शत्रूला उसंत मिळते वा शिरजोर होणेही शक्य होते. तेच काम हुर्रीयत व दगडफ़ेके करतात. इथे नक्षली युद्धात शहरातले अनेक समर्थक लोक साळसूदपणे पांढरपेशे राहून त्या घातपाती युद्धाला हातभार लावत असतात. विविध कार्यक्रमातून वा प्रयत्नातून पैसे जमा करणे, छुप्या घातपात्यांचे सुसुत्रिकरण अशा जबाबदार्‍या त्यांच्याकडून पार पाडल्या जात असतात. छुप्या युद्धात गुंतलेल्यांना उजळमाथ्याने समाजात वावरता येत नाही. फ़ोन वगैरेने संपर्क साधणेही अशक्य असते. ती कामगिरी अशा पांढरपेशा लोकांकडून पार पाडली जाते.

याखेरीज आणखी एक युद्धाची आघाडी अशीच कार्यरत असते, तिचे काम कायदेशीर व लोकशाही संसदीय मार्गाने शत्रूला हैराण करून सोडणे. त्यात वकील, विचारवंत, साहित्यिक, पत्रकार, कलावंत इत्यादींचा समावेश होत असतो. समाजाची दिशाभूल करणे वा बेदिली माजवण्यापासून गैरसमजांचे धुके निर्माण करण्याच्या कामी अशा फ़ळीला जुंपलेले असते. थोडक्यात लोकशाही वा कायद्याने दिलेल्या सवलतींचा उपयोग शासनाच्याच विरोधात करून कायद्याच्या शासनालाच नामोहरम व बेजार करून टाकण्याचे काम त्यांनी करायचे असते. गुजरात दंगलीपासून कुठल्याही राज्यातील नक्षली जिहादींच्या बाबतीत सातत्याने न्यायायलाचे अडथळे उभे करणारी एक प्रचंड फ़ळीच आपल्याला आढळून येईल. याकुब मेमन, अफ़जल गुरू यांच्या फ़ाशीत अडथळे आणताना तेच लोक पुढे सरसावलेले दिसतील. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या काळात मोदींना विविध चौकश्या वा खटल्यात गुंतवून बदनाम करण्याच्या मोहिमा त्यांनीच चालविलेल्या दिसतील. तशाच वकील विचारवंतांना आपापल्या वाहिन्या वा वर्तमानपत्रातून वारेमाप प्रसिद्धी देणारे ठराविक पत्रकार संपादक आढळून येतील. तेच मग पाकिस्तानशी बोलणी करण्याचा हट्ट वा काश्मिर पाकला देऊन टाकावा असा आग्रह धरताना दिसतील. तेच इशरत जहानच्या न्यायासाठी आकाशपाताळ एक करताना दिसतील. हे सर्व कारताना ते कधी नक्षलवादी डरकाळ्या फ़ोडाणार नाहीत वा कुठल्या राजकीय विचारांचा डंकाही पिटणार नाहीत. मानवाधिकार, नागरी अधिकार असले मुखवटे लावून वावरताना दिसतील. पण ते ज्यांच्या बाजूने उभे रहातात वा ज्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, त्यावरून त्यांची राजकीय जात लक्षात येऊ शकते. ती काश्मिरातील दगडफ़ेक्यांची असते किंवा नक्षली समर्थकांचीच असते. हे आता सामान्य लोकांनाही समजू लागलेले आहे. पण माध्यमात किंवा वैचारिक क्षेत्रात वावरणार्‍या नक्षली हस्तकांना अजून ही भामटेगिरी चालेल अशी आशा आहे.

पोलिसांनी सनातनच्या चारपाच लोकांना पकडले वा त्यांच्या घरावर धाडी घातल्या. तर जेव्हा त्यांना कोर्टात हजर केले, तेव्हाच त्यांचे वकील काही करू शकलेले होते. पण कालपरवा शहरी नक्षली म्हणून चारपाच लोकांची धरपकड झाली, तेव्हा अटक होण्यापुर्वीच अनेक हायकोर्टात व थेट सुप्रिम कोर्टात डझनावारी वकील धावलेले होते. एकाहून एक नामवंत वकीलांची कोर्टात नक्षलींना धक्काही लागू नये म्हणून झुंबड उडालेली होती. तीच झुंबड याकुब मेमनला फ़ाशीतून वाचवण्यासाठी झाली होती. थोडक्यात काश्मिरात भारतीय सेनेच्या जवानांना चकमकीच्या काळात मागून धोंडे मारणारे दगडफ़ेके आणि इथे शहरी भागातल्या नक्षली व जिहादी विरोधातल्या कायदेशीर कारवाईत अडथळे उभे करणार्‍यात नेमका काय फ़रक आहे? कोणी त्या अटकेतील संशयितांना गोळ्या झाडत नव्हता की कोठडीत बंद करून चाबकाचे फ़टकारे मारत नव्हता. निदान कोर्टात हजर करण्यापर्यंत तरी संयम नको काय? पण आधीच एक फ़ळी कोर्टात पोहोचली आणि दुसरी माध्यमांच्या कॅमेरात घुसून थेट पोलिस व शासनालाच गुन्हेगार ठरवू लागली. अशा भडीमाराला उत्तर देण्याइतकी सरकारचीही सज्जता नसावी, यातून नक्षली समांतर शासन यंत्रणा किती खोलवर रुजलेली व पसरलेली आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. समाजजीवनाची किती क्षेत्रे व विभागात या लोकांनी आपले बस्तान बसवलेले आहे, त्याची कल्पना येऊ शकते. काश्मिरात दगडफ़ेक्यांचा आभास उभा केला जातो आणि इथे सभ्य मुखवटे लावून नक्षली कारवाया चालतात. त्याच्या सुत्रधारांना नुसता धक्का लागला, तरी किती उंदिर बिळातून बाहेर आले, त्याची यातून साक्ष मिळालेली आहे. यातला फ़रकही लक्षात येऊ शकतो. ज्या वकीलांची फ़ी मोठ्या कंपन्यांनाही परवडणार नाही, ते वकील अशा नक्षलींच्या बचावासाठी कोर्टात धावले. मग हा किती मोठा पैशाचा खेळ असेल?

1 comment:

  1. ज्या वकीलांची फ़ी मोठ्या कंपन्यांनाही परवडणार नाही, ते वकील अशा नक्षलींच्या बचावासाठी कोर्टात धावले. मग हा किती मोठा पैशाचा खेळ असेल?

    ReplyDelete