Monday, September 24, 2018

बाबासाहेब ते आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर के लिए इमेज परिणाम

हे शीर्षक वाचून अनेकांचा गोंधळ होईल. कारण बाबासाहेब म्हटले, की आंबेडकर हे गृहीत आहे. पण त्या महापुरूषाला कुठल्या नावाची वा पदवी पारितोषिकाची गरज नव्हती. अशी स्वयंभू माणसे आपल्या कर्तृत्वानेच इतक्या उंचीवर पोहोचलेली असतात, की त्यांच्या कामातूनच त्यांचा साक्षात्कार जगाला होत असतो. पण तशी स्थिती प्रकाश आंबेडकर यांची नसते. त्यांना आपल्या नावातून, वारश्यातूनच आपली ओळख सांगावी किंवा दाखवावी लागते. हे वेगळेपण इथेच येऊन थांबत नाही. सध्या सगळेच नातु पणतू वा पुतणे जावई कर्तबगार पुर्वजांची पुण्याई मातीमोल करायला निघालेले आहेत. म्हणून मग बाबासाहेब आणि आंबेडकर यातला फ़रक सांगणे अगत्याचे होऊन जाते. कांशिराम मायावती यांना कोणी बाबासाहेबांचे वारस म्हणून ओळखत नाही. पण विचारांचा राजकीय वारसा तपासला, तर त्यांनी बाबासाहेबांचे स्वप्न मोठ्या प्रमाणात पुर्ण करण्यासाठी कष्ट घेतले. त्यात चांगले यशही मिळवलेले आहे. महाराष्ट्रापासून शेकडो मैल दुरच्या उत्तरप्रदेशात त्यांनी बहुजन समाज पक्ष ह्या रिपब्लिकन असा उल्लेखही नसलेल्या नावाची संघटना उभारून ‘सत्ताधारी जमात व्हा’ या बाबासाहेबांच्या स्वप्नाला साकार करण्यात चांगली मजल मारली. उलट त्याच बाबासाहेबांचे खरेखुरे घरगुती वारस मात्र याच्या त्याच्या पक्षाशी आघाड्या करून काही जागा पदरात पाडून घेण्यासाठी आशाळभूतपणे प्रतिक्षा करीत बसलेले आहेत. हा बाबासाहेब आणि आंबेडकर यातला फ़रक आहे. या आंबेडकरांना पक्ष उभा करता आला नाही मतविभागणीचे बाबासाहेबांचे सुत्र अंमलात आणता आले नाही. असे लोकच विचारांना मालमत्ता बनवून दिवाळखोरी ओढवून आणत असतात. म्हणून मग त्यातला मुलभूत फ़रक उलगडून सांगावा लागतो. आज ओवायसीच्या पक्षाबरोबर आघाडी्साठी सज्ज झालेल्या प्रकाश आंबेडकरांना देशातल्या आघाड्या कुणाच्या प्रेरणेतून सुरू झाल्या, ते तरी ठाऊक आहे काय?

सध्या आपल्याकडे आंबेडकरांचा भारीप बहुजन महासंघ वा त्याच्याही पुढे जाऊन वंचित बहुजन आघाडी असली चर्चा चाललेली आहे. ही आघाडी हैद्राबादच्या ओवायसी बंधूंच्या मुस्लिम पक्षाशी हात मिळवून लढणार आहे. त्यातही कॉग्रेसच्या सोबत जाण्यासाठी आंबेडकर उत्सुक आहेत. मात्र अजून तरी कॉग्रेसने त्यांना दाद दिलेली नाही. त्याचे कारणही उघड आहे. स्वबळावर कुठल्याही मुठभर जागा जिंकण्याची क्षमता आंबेडकरांना अजून प्राप्त करता आलेली नाही. १९८९ सालात फ़ुटलेल्या रिपब्लिकन गटांच्या नेत्यांमधील गटबाजीला झुगारत नवी राजकीय आघाडी त्यांनी उभारण्याचा प्रयास सुरू केला. तेव्हापासून मागल्या तीन दशकात अनेक प्रयोग करून झालेले आहेत. त्यातूनच मग दलितांच्या पलिकडे वंचित वा भटक्या आदिवासी समुदायालाही आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यातूनच भारीप बहुजन महासंघाचा उदय झाला. पण त्यालाही कुठल्या मोठ्या जनमानसावर प्रभाव पाडता आला नाही. योगायोग असा, की त्याच दरम्यान उत्तर भारतात कांशिराम यांनी नेमके तेच बाबासाहेबांचे विचार घेऊन एकहाती प्रयोग सुरू केले आणि दलित पिछड्या वर्गाला संघटित करताना कुठल्याही तातडीच्या यशाची अपेक्षा बाळगली नाही. त्यापेक्षा आपला मतदार गोळा करून त्याला निष्ठावान पक्षीय पाठीराखा बनवण्याचे अपरिमीत कष्ट उपसले. त्याचीच फ़ळे मायावती चाखत आहेत. निवडून येण्यापेक्षाही अन्य कुठल्या पक्षांना दलित मतांचा गठ्ठा पराभूत करू शकतो, ही दहशत त्यांनी निर्माण केली आणि क्रमाक्रमाने बसपा उत्तर भारतातील दखल घेण्यायोग्य पक्ष होऊन गेलेला आहे. प्रकाश आंबेडकर असोत किंवा अन्य कुठल्याही दलित पक्ष वा रिपब्लिकन गटाला इथे महाराष्ट्रात तितकीही मजल कित्येक दशकात मारता आली नाही. कारण त्यांना बाबासाहेबांची राजनिती व रणनिती कधी समजूनही घ्यावीशी वाटली नाही.

दलित मते वेठबिगारासारखी आपल्या मागे ठेवण्याची राजनिती कॉग्रेसने दिर्घकाळ वापरली. म्हणून उत्तर भारतातून कॉग्रेस घाऊक मतांवर आपले बहुमत लोकसभेमध्ये मिळवत राहिली होती. त्याला शह देण्याची कल्पना पहिल्याच सार्वत्रिक निवडणूकीनंतर बाबासाहेबांनी सविस्तर मांडली होती आणि त्यातून रिपब्लिकन पक्षाची कल्पना पुढे आणलेली होती. मोदी ३१ टक्के मतांवर देशाची सत्ता बळकावुन बसले असल्याचे पांडित्य हल्ली सगळे पुरोगामी बोलत असतात. त्या अल्प टक्के मतांवर देशाची सत्ता बळकावण्याची चलाखी ओळखणार्‍या पहिल्या राजकीय नेत्याचे नावही योगायोगाने बाबासाहेबच होते. म्हणूनच त्यांनी विखुरलेल्या विरोधी पक्षांच्या विभागल्या जाणार्‍या ६५-७० टक्के मतांना एकत्र करून कॉग्रेसला पराभूत करणारा राजकीय पक्ष स्थापण्याची कल्पना मांडलेली होती. अमेरिकेप्रमाणे इथेही द्विपक्षीय लोकशाहीची संकल्पना त्यात होती. त्यासाठी तात्कालीन ज्येष्ठ नेते विचारवंतांशीही बाबासाहेबांनी विचारविनिमय केलेला होता. तो जागांसाठी नव्हता तर राजकीय राष्ट्रीय पर्याय उभा करण्य़ासाठी होता. मतविभागणी संपवून जनतेला पर्याय देण्याचीच ती संकल्पना होती. याच दरम्यान म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा डोके वर काढत होता आणि त्याच संदर्भात प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबासाहेबांची भेट व मुलाखत घेतली होती. तेव्हा बाबासाहेबांनी दिलेला सल्ला व दाखवलेली दिशा, आजही आघाडीच्या राजकरणाला तितकीच उपयुक्त आहे. सगळ्या पक्षांनी आपल्या विचारधारा व अहंकार गुंडाळून एकदिलाने एकत्र कॉग्रेस विरोधात लढा. अन्यथा हे लबाड कॉग्रेसवाले तुम्हाला मराठी राज्य देणार नाहीत, असे बाबासाहेबांनी बजावले होते. ती मुलाखत ‘प्रबोधन’मध्ये छापून आली आणि संयुक्त महाराष्ट्र समितीची मुहूर्तमेढ ठरली होती. आज मतविभागणीचे पांडित्य सांगणार्‍यांना त्याचा लवलेश तरी उमजला आहे काय?

कालपरवाच या नव्या आघाडीविषयी चर्चा करताना व मत व्यक्त करताना प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसवर दुगाण्या झाडल्या आहेत. भाजपाला एकत्र येऊन हरवायचे असेल, तर निदान स्वत:ला पुरोगामी म्हणवणार्‍यांनी तरी एकदिलाने एकत्र येण्य़ाची व फ़क्त भाजपाला पराभूत करण्याविषयी एकसुरात बोलायला नको काय? एवढेही या नातवाला उमजलेले नसेल, तर त्याने आघाडी कोणाशीही करावी किंवा जवळीक कुठल्याही पक्षाशी करावी. ना त्याचा काही लाभ शक्य आहे, ना भाजपाचे नुकसान शक्य होईल. नुसती नेत्यांची डोकी एकत्र येऊन वा काथ्याकुट करून, कुठलीही आघाडी प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकणार नाही. त्यासाठी शक्ती हवी आणि ती नसेल तर मित्रांना एकत्र आणताना त्यांच्या दोषांचा पाढा तरी वाचू नये, इतके भान असायला हवे. अन्य पक्ष व राष्ट्रवादीचे अनेक नेते संभाजी भिडे यांचे समर्थक वा पुरस्कर्ते असल्याने त्यांच्याशी आघाडी शक्य नसल्याची ग्वाही देण्यापासून ही आघाडी सुरू होते. तिचे पर्यवसान कशात होऊ शकणार आहे? विचारधारा गुंडाळून खुंटीला टांगा आणि आधी कॉग्रेसला पराभूत करा, ही बाबासाहेबांची शिकवण आहे. मग तीच भाजपाला हरवण्यासाठी वापरण्यात काय अडचण आहे? कुठलाही शिरजोर वाटणारा शत्रू वा प्रतिस्पर्धी पराभूत करणे शक्य नसेल, तर त्याला निदान हतबल वा नामोहरम करण्याला रणनिती म्हणतात. तिथेच प्रकाश आंबेडकर तोकडे पडलेले आहेत. राष्ट्रवादीच काय, अपरिहार्य असेल तर शिवसेनेलाही सोबत घेऊन भाजपाशी मुलाबला करावा लागेल. १९५७ च्या निवडणूकीमध्ये कम्युनिस्ट व सोशलिस्टांनी हिंदू महासभेलाही सोबत घेतलेले होते आणि म्हणूनच कॉग्रेसला दाती तृण धरून शरणागत व्हावे लागलेले होते. नुसत्या आकड्यांची गणिते मांडून कॉग्रेस पराभूत झाली नव्हती. १९६७ सालात त्याचाच उत्तर भारतात मोठा प्रयोग यशस्वी झाला होता.

बाबासाहेबांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष त्यांच्या हयातीत स्थापन होऊ शकला नाही, की त्याची पुर्ण सज्जताही झालेली नव्हती. त्यांच्या निर्वाणानंतर त्यांचे अनुयायी आपसात भांडत बसले आणि मधू लिमये वा डॉ. राममनोहर लोहियांसारखे नेते दुरावले. पण त्याच लोहियांनी १९६७ सालात त्याच बाबासाहेबांच्या भूमिकेचा पुढला टप्पा उत्तेरतील अनेक राज्यात सादर केला. संयुक्त विधायक दल नावाच्या आघाड्या अनेक राज्यात स्थापन केल्या आणि त्यातही कम्युनिस्ट व पुरोगामी पक्षांचाही समावेश होता. आज देशातला मोठा पक्ष मानला जाणार्‍या भाजपाचा तात्कालीन अवतार जनसंघही अशा आघाडीत सहभागी झाला होता. पण त्या आघाड्या नंतरच्या लाथाळ्या झाल्याने टिकल्या नाहीत. त्यातील बेदिली व हाणामारीने कॉग्रेसला नवी संजिवनी मात्र दिलेली होती. तेच १९७७ नंतर आणि १९८९ नंतर झाले. तिथून मग अशा आघाडीतून भाजपाने अंग काढून घेतले आणि आपल्या बळावर कॉग्रेसला देशव्यापी पर्याय उभा करण्याचा चंग बांधला. त्याचेच परिणाम आज दिसत आहेत. मध्यंतरी पुरोगामी म्हणवणार्‍या पक्षांनी भाजपा विरोधी आघाड्या उभ्या करण्यातून व त्यात कॉग्रेसला सहभागी करून घेताना आपलाच अवतार संपुष्टात आणला. पुरोगाम्यांच्या अशा आत्मघातकी राजकारणाने कॉग्रेसला नवे जीवदान मिळत गेले. तरी उपयोग झाला नाही. कारण आघाडीच्या जागी कॉग्रेसला पर्याय म्हणून भाजपा राष्ट्रीय पक्ष होत गेला. निवडणूका आल्या, मग आघाड्यांच्या चुली मांडायच्या आणि निकालानंतर मोडून टाकायच्या; हाच खेळ करण्यात प्रकाश आंबेडकरांसारखे नेते संपून गेलेले आहेत. पण त्यापैकी कोणाला त्या दुष्टचक्रातून बाहेर पडायची इच्छा कधी झालेली नाही. उलट भाजपाची गोष्ट आहे. त्यांना मदोन्मत्त कॉग्रेसला लोळवायचे होते. त्यांनी १९८४ नंतर प्रयत्नपुर्वक विविध समजघटकांना जोडून व त्यात नेतृत्व उभे करून पर्याय निर्माण केला. तेच मायावती व कांशिरामचे म्हणता येईल.

कांशिरामही कुठल्या तरी प्रस्थापित पक्षात जाऊ शकले असते, किंवा मायावतींनाही तशा तडजोडी करता आल्या असत्या. पण त्यांनी गरजेनुसार तडजोडी करतानाही आपला मतदार वाढवत नेणे आणि अधिकाधिक समाजघटक संघटनेत सामावून घेण्याची चतुराई कुशलतेने केली. विचारांशी तडजोड केली नाही, पण राजकीय गरज लक्षात घेऊन प्रसंगानुसार लवचिकताही दाखवलेली होती. अगदी एका टोकाला जाऊन भाजपाशी हातमिळवणी करण्याचे धाडस त्यांनी दाखवले, तसेच भाजपाशी संबंध तोडण्य़ाची हिंमतही दाखवली होती. आपले सहकारी सोडून जाण्याला त्यांनी प्राधान्य दिले नाही. आताही तीन विधानसभांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत, त्यामध्ये मायावतींना सोबत घेण्यासाठी कॉग्रेस प्रयास करत आहे आणि मायावती त्यांना अटी घालत आहेत. प्रकाश आंबेडकर वा अन्य रिपब्लिकन नेत्यांना महाराष्ट्रात असा वरचष्मा कधी दाखवता आलेला आहे? कारण त्यांनी कधी आपल्या शक्तीचा साक्षात्कार मतदानातून दाखवलेला नाही. आपण निवडून येऊ शकत नसलो तरी पाडायला कमी करीत नाही, हा धाक मायावतींनी उत्तरेत निर्माण केला. त्याची फ़ळे चाखत आहेत. उलट दिर्घकालीन वारसा असूनही आंबेडकर वा अन्य रिपब्लिकन गटांना आपापली मतांची बेगमीही करायची आजवर गरज भासलेली नाही. त्यांना जागावाटप हवे असते आणि त्यासाठीच आघाड्या हव्या असतात. इथे महाराष्ट्रात मायावती फ़ारशा फ़िरकतही नाहीत. पण भारीपपेक्षाही मते अधिक मिळवतात, ह्याचा विचार तरी होणार आहे काय? लोकसंख्येत दलित किती आहेत, त्यापेक्षाही रिपब्लिकन वा भारीपचे मतदार किती आहेत, त्यावर राजकीय गणिते बांधली जातात आणि सौदेबाजीही होऊ शकत असते. नुसते अवसान आणणार्‍यांना खेळवले जात असते. तो बाबासाहेबांचा वारसा असू शकत नाही. पुण्याईपेक्षा बाबासाहेबांच्या विचार व राजनितीचा वापर महत्वाचा असतो.

आज जी भाषा प्रकाशजी बोलत आहेत, तीच २००९ साली शिर्डीतून पराभूत झाल्यावर रामदास आठवले यांच्याही तोंडी होती. त्यांनीही भाजपा व कॉग्रेस वगळून तिसरी आघाडी उभी करण्यात पुढाकार घेतला होता. रिडालोसच्या त्या प्रयोगातून काय साधले? वर्षभरातच आठवले यांनी शिवसेना भाजपा यांच्याशी जवळीक सुरू केली होती. मात्र त्यांनी असो, की त्याहीपुर्वी प्रकाशजींनी केलेला असा प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही. कारण जितक्या आक्रमकरितीने पक्ष व संघटना उभारणीचे काम व्हायला पाहिजे. त्याला यापैकी कोणीच कशी प्राधान्य दिले नाही. रिपब्लिकन वा आंबेडकरी समाज व मतदार भरपूर आहे. पण त्याला एका विचार वा संघटनेला बांधील करून राजकारणात पाय रोवून उभे करण्याचे प्रयासच झाले नाहीत. त्यामुळे मग आता ओवायसींच्या वळचणीला जाण्याची वेळ आली. त्यांचीही शक्ती मोठी नाही. पण मुस्लिम वस्त्या व दाट वस्तीपुरत्या आपल्या अनुयायांचा दबाव त्यांनी यशस्वीपणे उभा केला आहे. त्यांना म्हणून दोन आमदार निवडून आणता आले. ओवायसींच्या अनेकपट आंबेडकरी शक्ती आहे. पण मायावती कांशिराम यांच्याप्रमाणे तिला एकत्र करण्याची मेहनत घेणारा नेता इथे जन्माला आलेला नाही. म्हणून बाबासाहेबांचा तो अनुयायी नेतृत्वहीन होऊन विस्कळीत पडला आहे. संख्याबळ असूनही भरकटला आहे. आपल्या महान आजोबांनी दिलेला दृष्टांत नातवाला उमजलेला नाही आणि अन्य नेते म्हणून मिरवणार्‍यांच्या डोक्यात शिरलेला नाही. हे आंबेडकरी समाजाचे दुर्दैव आहे. दलित पॅन्थर हा उद्रेक वेगळी वाट शोधणारा होता. पण त्याला पानेफ़ुलेफ़ळे येण्यापुर्वीच तो कोमेजला. आता चालल्यात त्या नुसत्या कसरती आहेत. पुन्हा एकदा तशी उसळी मारून कोवळ्य़ा वयातले पॅन्थर वा दलित नेतृत्व उभे राहिल्यास बाकीच्या राजकीय पक्षांना त्यांच्यासमोर शरणागत व्हावे लागेल. पण तशी चिन्हे आज तरी दिसत नाहीत.

13 comments:

  1. आदरणीय भाऊ लेख आवडला.
    मी पुण्यात रहातो.गेली अनेक महिने मी पाहतोय की दलित समाजाच्या वस्त्यांमधून कम्युनिस्ट संघटना कार्यकर्त्यांन सोबत डफली वाजवत क्रांतीच्या घोषणा व गाणी म्हणत संघटन करत आहेत.दलित समाजातील तरुणांसोबत संपर्क वाढवत आहेत.

    ReplyDelete
  2. भाउ पुर्वीची मायावतींची मुलाखत आठवली रुबरुमधील राजीव शुक्लाने घेतलेली तेव्हा युपी राजकारणात चमकत होत्या तेव्हा राजीवने प्रश्नके केला की तुमची तुलना इंदिरा गांधीची तुलना होतेय तेवा मायावती तोडत म्हनाल्या की तुलना करु नका त्या गांधीवादी होत्या मी आंबेडकरवादी आहे त्याना पुर्न माहित होत की आपला मतदार कोन आहे आजही त्या काॅंगरेसपासुन दुरच अाहेत

    ReplyDelete
  3. भाऊ कभी आप जोगेंद्रनाथ मंडल के साथ मुस्लिम लीग और पाकिस्तान द्वारा किये गए व्यवहार भी प्रकाश डालना चाहिए, जिससे इन कथित दलित नेताओं की आँखे खुलेगी. जोगेंद्रनाथ वह नेता थे जिन्होंने बाबासाहब को संविधान सभा में अपनी जगह पर भेजा था. वे बंगाल में दलित राजनीति का सबसे बड़ा चेहरा थे. उन्होंने सदा कांग्रेस और हिंदुओ की कीमत पर लीग और मुस्लिम हितों को बढ़ावा दिया था. किन्तु एक बार लीग का पाकिस्तान निर्मित होने का सपना पूरा होते ही उन्होंने बंगाल के दलितों को मार पीट कर मुस्लिम बनाना शुरू कर दिया था. जोगेन्द्रनाथ जब तक कुछ समझते तब तक उनकी जाति के ज्यादातर लोंगो को या तो लीग ने मारपीट कर निकाल दिया या उन्हें मुस्लिम बना दिया था. खुद जोगेन्द्र नाथ १९५० में भारत भाग कर आये और १९६७ में गुमनाम मौत मरे.

    ReplyDelete
  4. अभ्यासपुर्ण....

    ReplyDelete
  5. भाऊ धन्य आहे तुमच्या स्मरणशक्तीची आणि एकूण विवेचन पद्धतीची. हे असे विवेचन नेमके आणि संदर्भ सहित कुठेच वाचायला मिळत नाही.छापील वृत्तपत्रे म्हणजे “ह्यांना टोला दिला,” त्यांनी इशारा दिला, “जनता नाराज,” पालक मंत्री गैरहजर इत्यादि कट्टा पातळीच्या पुढे जात नाही आणि अग्रलेखा बद्दल तर काही बोलूच नये. ते दुर्लक्ष करण्याच्या लायकीचे असतात --------तुम्ही लिहीत रहा

    ReplyDelete
  6. जे घडत आहे त्यात अनपेक्षित असे काहीच नाही.
    थोडा सखोल विचार केला असता कोणालाही यामागचे राजकारण उमगेल.
    जसा म.न. से. पक्ष शिवसेनेची मते फोडण्यासाठी निर्माण केला गेला होता तसाच ओवेसी यांचा पक्ष हा काँग्रेस ची मते फोडण्याकरिता भा. ज. पा. कडून निर्माण केला गेला होता.
    काँग्रेस च्या हातून सत्ता हिसकावून घेणे हे समान उद्दिष्ट्य BJP आणि AIMMM चे आहे.
    AIMMM हे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी BJP ला मदत करत आहे जे त्यांच्या नाटकी आणि अंदाजित (Predictable) वर्तनावरून सिद्ध होते.
    RPI भाजपाबरोबर गेली आणि आहे, प्रकाश आंबेडकर ओवेसी बरोबर जात आहेत.
    म्हणजे सरशेवटी दलित जनतेचे नेतृत्व करणारे पक्ष भाजपा च्या छत्राखाली एकवटत आहेत.
    आता हे एकवटणं दलित जनतेसाठी लाभदायी ठरेल की आत्मघातकी हे येणारा काळच ठरवेल.

    ReplyDelete
  7. Bhau
    Prakashji not having that much attachment against poor people.He cannot campare with Kashiramji.He was great leader

    ReplyDelete
  8. प्रकाश आंबेडकर हा मनुष्य हा अगदी अलीकडे अलीकडे उजेडात आणला गेला आहे होय आणला गेला आहे मी मुद्दाम म्हणतो आहे कारण त्याच्या भीमा कोरेगाव वरील पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये तो म्हणाला होता की मला असे सांगण्यात आलेले आहे. याचाच अर्थ त्याचा बोलविता धनी कोणीतरी वेगळा आहे हे स्पष्ट आहे. केवळ आंबेडकरांच्या घराण्यामध्ये जन्माला येऊन जसे त्यांचे विचारांचा वारसा कुणाला मिळत नाही अगदी तसेच आपण मारलेले सर्व टोमणे उत्तम आहेत मग ते पुतणे असोत किंवा पणतू असोत

    ReplyDelete
  9. भाऊ रिडालोस चा Full Form आठवत नाही कृपया सांगावा

    ReplyDelete
  10. Ek Tallakh Budhicha Manus Bhetala...................

    ReplyDelete
  11. आता डोळेे ऊघडाय लागलेत

    ReplyDelete
  12. डाव्या पक्षानी दलित चळवळ केव्हाच हायजॅक केलेली आहे.

    ReplyDelete
  13. श्री भाऊ इथे एक मुद्दा तुम्ही घेतला नाहीत दलित म्हणजे एक विशिष्ट जात त्या पलीकडे पँथर ला जात आले नाही आजही तीच परिस्थिती आहे, त्यापेक्षा उजव काम कै सावरकर नि केलं आज एक तर जाती जातीतील अंतर वाढत चालले आहे , लोक उलट अजूनच जातीच्या कोषा त अडकत चालेल त अशा स्थितीत आबेडकर वाद्यांना कस यश मिळेल

    ReplyDelete