Sunday, September 2, 2018

नना, माझी एक आई



( वरच्या फ़ोटोत मधोमध दिसतेय ती नना )

काल आप्पा वढावकरने आपल्या मित्राच्या वाढदिवसाचे निमीत्त साधून त्याचा ननासोबतचा फ़ोटो टाकला होता. तो बघून तिची आठवण आली आणि डोळ्यात पाणी आले. नना म्हणले नलिनी राम वढावकर. आप्पाची जन्मदाती. मी तिच्यापर्यंत पोहोचलो, तेव्हा तिचा संसार नायगावच्या बीडीडी चाळीत तळ मजल्यावरच्या दोन खोल्यांमध्ये थाटलेला होता. त्या चाळीचा अर्धा तळमजला केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याचे कुठलेसे केंद्र होते आणि नना तिथे नर्स म्हणून कार्यरत होती. त्यातल्या आठ खोल्यांपैकी रस्त्या बाजूच्या दोन्ही खोल्या वढावकर कुटुंबाला क्वार्टर म्हणून मिळालेल्या होत्या. तिथून जवळच एका चाळीत वास्तव्य करणारा आनंद रघुनाथ चव्हाण उर्फ़ आंद्रू हा माझा रुपारेल कॉलेजातला सहकारी. तेव्हा तो सत्यवान माने या ढोलकीनवाजाच्या लोकनाट्याचा मॅनेजर म्हणून काम करत होता आणि त्यात आप्पा हार्मोनियम वाजवायलाही जात असे. त्यातून आप्पाची ओळख झाली आणि ती त्याच्या घरापर्यंत जाऊन पोहोचली. मी नव्याने पत्रकारितेल लुडबुड करू लागलेला होतो. हळुहळू इतका घरोबा झाला की अनेकदा कित्येक तास माझा अड्डा तिथेच नायगावला पडलेला असायचा. अप्पाचा धाकटा भाऊ संजीव आणि थोरली लग्न झालेली बहिण संध्या. शिवाय घरात आप्पाचे वडील दादा असायचेच. इतका निरागस माणुस आयुष्यात कधी बघितला नाही. माझ्यासारख्या बेसुर्‍या भुरट्याला अगत्याने संगीत शिकवायचा प्रयास त्यांनी चालविला होता आणि मी त्यात अजिबात लक्ष देत नसल्याचे इतर सर्वांना ठाऊक होते. पण कोणी दादांना विचलीत केले नाही आणि पुढल्या काळात मी दादा हार्मोनियम घेऊन बसलेले असताना खोलीत जायचे शिताफ़ीने टाळत आलो. त्याविषयी एकदा ननानेच दादांना झापले होते. त्या भामट्याला काय शिकवत बसलात. तो हुल देतोय तुम्हाला. ही होती नना. तिच्या शिव्याच प्रशतीपत्र असायच्या.

आप्पा व संजीव यांच्याशी गट्टी जमलेली होती आणि पर्यायाने तिथे मुक्काम असल्याने संध्यालाही मला बरदाश्त करावे लागत होते. रस्त्याच्या पलिकडे रमेश डेकोरेटर्स ही तिची सासुरवाडी. तेव्हा तिचा मुलगा स्वप्नील अवघा वर्षभराचा असेल आणि ‘डोलकर दर्याचा राजा’ हे गाणे खुप गाजत होते. त्याचे विडंबन मी संध्याच्या मुलाचे नाव घेऊनच केले होते. ‘स्वप्नील पवार, पवार; ओढतोय चिलमीत गांजा; तरी आई म्हणते, अजून लहान माझा राजा‌‌ऽऽऽऽऽ’. ते ऐकून मनसोक्त हसतानाच ननाने पाठीत घातलेला धपाटा अजून विसरलो नाही. मग घरात कोणीही नात्यातले आले आणि मी असलो, तर नना अगत्याने मला ते विडंबन म्हणायला लावायची. मीच कशाला आप्पा वा संजीवचे सगळे उनाड मित्र ननाने पोरांसारखे संभाळलेले होते. कितीही मस्ती करणारे वा अतरंग असले, तरी ननासमोर कोणाला लक्ष्मणरेषा ओलांडायची कधी हिंमत झाली नाही. मी पत्रकार झालो होतो आणि शब्दांचे खेळ शिकत होतो. विडंबन बडबडागीते बनवत होतो. याचे तिला खास कौतुक होते. कधी तसाच संध्याकाळी ऑफ़िसला निघालो असेन, तर अगत्याने दोन घास खाल्ल्याशिवाय तिने बाहेर पडू दिले नाही. कधीही घरी येऊन धडकलो तर विनाविलंब उठून चहा करून दिल्याशिवाय रहात नसे. मला चहा थोडा कोमट लागतो आणि मग तिच्या शिव्या चहात बुडवून खाव्या लागायच्या. मेल्या नालायक ह्या शिव्या हक्काच्या होत्या. आपण इतके उठून ताजा चहा करून दिला आणि हा थंड करून पितो, याचा मायाळू संताप किती सहजसुलभ असायचा, हे बघितलेल्यांनाच समजू शकते. हळुहळू वढावकर कुटुंबातले सगळेच नातेगोते माझे आपले होऊन गेले. त्यात मावश्या आत्या मामाचे सगळे सगेसोयरे आपोआपच आले. ननाच्या थोरल्या बहिणीची ताईची मोठी मुलगी एकदा अशीच ननाकडे आली आणि तिथे मला बघून गडबडून गेली.

ती रुपारेलमध्ये पदवी शिक्षण घेत असताना तिने मला बघितलेला आणि माझी ख्याती गुंड टपोरी अशीच होती. हा गुंड इथे मावशीच्या घरी काय करतोय, हे तिच्या चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह कोणालाही सहज वाचता आले असते. पण शेजारच्या खोलीत गेल्यावर ननाने तिला माझी नवी ओळख सांगितली, तरी तिच्या मनातले संशयाचे मळभ लौकर दुर झालेले नव्हते. आता मला तिचे नाव आठवत नाही. पण तिचाच एकमेव भाऊ अतुलही दरम्यान गट्टीतला मित्र झालेला होता. एकदा समोर संध्याच्या घरी सत्यनारायण वगैरे काही होते आणि पंगती बसवल्या उठवल्या जात होत्या. मलाही आमंत्रण होते. संध्या छान नऊवारी साडी नेसून सजलेली होती आणि थोरामोठ्यांच्या पायाही पडलेली होती. नेमका त्याच पंगतीला मी बसलेला होतो आणि सगळ्यांचे अर्धे जेवून झाले, तरी मी पानातल्या एकाही पदार्थाला हात लावलेला नव्हता. प्रत्येकजण येऊन मला आग्रह करत होता. पण मी हट्टी तसाच बसून, संध्याला विचारा म्हणून प्रत्येकाला पिटाळून लावत होतो. संध्या पण तितकीच हट्टी. ती पंगतीतल्या सर्वांना आग्रह करत फ़िरत होती. पण माझ्या जवळपास फ़िरकत नव्हती. अखेरीस कोणीतरी ही समस्या ननाच्या कानावर घातली आणि ती माझ्यापर्यंत येऊन धडकली. मला जेवून घेण्यासाठी ननाने दम भरला, तेव्हा मी माझी अडचण तिला सांगितली, तर ती चिडली. चावटपणा करू नकोस म्हणून ती मलाच दम भरू लागली. पण मी तितकाच हट्टी होतो. म्हणालो मग बोलावलेच कशाला? मान राखायचा नसेल तर आमंत्रण कशाला द्यायचे? वगैरे युक्तीवाद करूत तसाच बसून होतो. तर मिटवण्यासाठी नना संध्याकडे गेली आणि त्यांच्यातही बोलाचाली रंगली. संध्याही आईशी हुज्जत करू लागली. माझ्याकडे बोट दाखवून वाद घालू लागली. शेवटी तिला ननाने माझी अट मान्य करायला लावली आणि मगच मी जेवलो होतो. संध्यानेही शिव्या मोजूनच मला जेवू घातले होते.

मुद्दा असा होता, की संध्या माझ्यापेक्षा दोन महिन्यांनी लहान होती आणि त्या तारखेमुळे मी तिच्यापेक्षा मोठा म्हणजे वडीलधारा होतो. तर इतर वडीलधार्‍यांप्रमाणे तिने या समारंभात माझ्याही पाया पडून माझे आशीर्वाद घेतले पाहिजेत, असा माझा हट्ट होता. तो ऐन पंगतीत बसून मी संध्याला पेचात पकडलेले होते. तिथे हजर सगळ्यांना माझा हलकटपणा कळत होता. पण संध्या यजमानीण होती आणि अतिथीचा सन्मान राखण्याखेरीज तिला पर्याय नव्हता. ननालाही माझा वाह्यातपणा कळत होता. थोडक्यात सगळी गंमत होती. नेहमी संध्याला मी मोठा असल्याचे ऐकवायचो. ती म्हणायची दोन महिन्यांनी कोणी मोठा वडीलधारा होत नसतो. तोच माझा मुद्दा तिच्या गळी उतरवण्याची लबाडी समारंभात कोंडी करून मी साधली होती. हा सहळा प्रकार इतका जाहिर झालेला होता. की संध्यानेही अखेरीस तोंडदेखला मला नमस्कार केला. पण शिव्याशाप देतच. ‘मेल्या जेव आता एकदाचा’ असे म्हणतच संध्या नमस्काराला वाकली होती. ननाने मला ती बाजी मारून दिली होती. नाहीतर संध्या काय कमी हट्टी नव्हती. वालाचं बिरडं किंवा माशाची आमटी वगैरे केलेली असेल तर मी येण्याची चाहूल लागली तरी ननाने माझ्यासाठी राखुन ठेवलेली असे. संध्या, आप्पा, संजीव अशा जन्म दिलेल्या मुलांइतकीच आपुलकी ननाने माझ्यासह आम्हा सर्व मित्रांना दिली. एकाच गोष्टीचे वैषम्य कायम राहिले. मी अमेरिकेत अकरा महिने राहून परतलो. त्याच दिवशी ननाने या जगाचा निरोप घेतला. अपरात्री मी मुंबई विमानतळावर उतरलो आणि त्यापुर्वी काही तास तिने जग सोडलेले होते. मला शेवटचे तिला बघता यावे म्हणून तिने चोविस तास वाट बघितली नाही, ही बोचणी कायम राहिली आहे. कारण मुंबईतली दुसर्‍या दिवशीची सकाळ उजाडली, ती़च मुळात नना गेल्याची माझ्या बहिणीकडून मिळालेल्या बातमीने. तेवढ्या एका गोष्टीसाठी ननाचा राग येतो. मायेने दिलेल्या तिच्या शिव्यांना पारखा झालो. यासारखे आयुष्यातले दु:ख नाही. कारण जन्मदात्या आईपेक्षाही अशा अनेक मित्रांच्या आयांनीच मला खुप लाडावून ठेवलेले होते.

4 comments:

  1. भाऊ, सिद्धहस्त लेखक आहात तुम्ही!साध्या साध्या आठवणी सुद्धा किती वाचनीय होतात!खूप छान.

    ReplyDelete
  2. भाउ ते फोटोतील तुम्ही आहात काय तरुणपनीचे तुम्च्या आठवणी छान आहेत

    ReplyDelete