Thursday, September 27, 2018

पुश करा, खुश रहा

पुश करो खुश रहो के लिए इमेज परिणाम

कुठल्याही विषयात माणसाला सोपी उत्तरे आवडत असतात. ज्याला आपण शॉर्टकट म्हणतो. उदाहरणार्थ मोदींना पराभूत करायला वा रोखायला कंबर कसून उभ्या ठाकलेल्या प्रत्येकाला आज खात्री आहे, की राफ़ायल विमान खरेदी मोदी सरकारला डुबवणार आहे. असे त्यांना कशाला वाटत असावे? त्याचे उत्तर राजीव गांधींच्या कारकिर्दीत खरेदी झालेल्या बोफ़ोर्स तोफ़ांच्या व्यवहारात आहे. कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आणि त्यामुळे त्यांचे सरकार लोकांनी पाडले, असे एक राजकीय अभ्यासकांचे आवडते गृहीत आहे. लोक भ्रष्टाचाराला विटले होते आणि म्हणूनच त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाचा प्रेषित म्हणून आलेल्या विश्वनाथ प्रताप सिंग यांना भरभरून मते दिली. राजीव गांधींनी मते व सत्ता म्हणून गमावली, हेच ते गृहीत आहे. पण त्यात वास्तव किती आहे? राजीव गांधी सत्ता गमावून बसले यात शंका नाही. पण बोफ़ोर्समुळे त्यांची मते कमी झाली, हे धडधडीत असत्य आहे. पराभव जागांमुळे झालेला होता आणि तरीही राजीवना त्यापुर्वी कॉग्रेसला मिळायची त्याच्याच नजिक जाता येईल इतकी मते मिळालेली होती. मुळात १९८४ सालात इंदिरा हत्येमुळे राजीवना विक्रमी मते मिळालेली होती. सहानुभूतीमुळे १९८० च्या ४२ टक्के मतांमध्ये फ़क्त साडेसात टक्के वाढ मिळाली होती. त्यात १९८९ सालात नऊ टक्के घट झाली. पण त्यामुळे पराभव झाला नव्हता. तो करण्यासाठी अनेक घटक कारणी लागले होते. कॉग्रेसमधून सिंग वगैरे बाहेर पडले होते, त्यांनी जनता पक्षात विलीन होऊन जनता दल पक्ष स्थापला होता. त्यात देवीलाल चरणसिंग असे इतर घटक सहभागी झाले होते. खेरीज सोबतीला भाजपा व डाव्यांशीही युती आघाडी व जागावाटप उरकण्यात आले होते. त्याचा एकत्रित परिणाम होऊनही कॉग्रेस-राजीव यांना ४० टक्केमते मिळालेली होती. म्हणजेच मतविभागणी टाळल्याने राजीव गांधींनी सत्ता गमावली होती. बोफ़ोर्समुळे नाही.

१९८९ मध्ये राजीवनी पराभूत होताना जितकी मते मिळवली, तितकी नंतर नारसिंहराव किंवा सोनिया गांधींना सत्ता बळकावतानाही मिळू शकलेली नाहीत. त्यामुळे बोफ़ोर्स घोटाळ्याने कॉग्रेसची वा राजीव गांधींची सत्ता गेली हा परसवण्यात आलेला भ्रम आहे. २००४ व २००९ मध्ये सोनियांनीही अनेक पक्ष सोबत घेऊन मतविभागणी टाळण्याचा यशस्वी प्रयोग केला. सत्ताही मिळवली. पण त्यांना कधी ३० टक्केच्या पुढे झेप घेता आली नाही. आज तर कॉग्रेसची दुर्दशा २० टक्क्याच्याही पुढे जाण्याची राहिलेली नाही. अर्थात तो विषय वेगळा आहे. सध्या राहुल गांधी पित्याला संपवणार्‍या विश्वनाथ प्रताप सिंगांची नक्कल करीत आहेत. बोफ़ोर्स व भ्रष्टाचार निर्मूलनाचा प्रेषित, असा त्यांचा आवेश असतो आणि बाकीचे मोदी विरोधक त्या जंजाळात गुरफ़टून गेलेले आहेत. माध्यमेही राफ़ायल हे मोदींचे बोफ़ोर्स होणार असल्याच्या टिमक्या वाजवण्यात रंगलेली आहेत. या प्रत्येकाला खुळी आशा आहे, की राफ़ायल बोफ़ोस्रसारखे मोदींवर उलटणार आणि मोदी पंतप्रधान पदावरून हटणार. पण मुळातच बोफ़ोर्स प्रकरणात तसे झालेलेच नसेल, तर राफ़ायलचा बोफ़ोर्स होऊनही हाती काय लागणार आहे? उलट बोफ़ोर्सचा धडा घ्यायचा असेल, तर अशा आरोपांनी काहीही राजकारण सिद्ध होत नाही, इतकाच तो पाठ आहे. त्यापेक्षा सामान्य लोकांच्या जीवनाला भेडसावणार्‍या प्रश्नांवर काहूर माजवून अधिक यश मिळवता येते आणि सत्ताधारी कोसळू शकतात. त्याचाच दुसरा भाग असा, की मोदी वा भाजपाला राफ़ायल जितके रंगत जाईल, तितके हवेच असणार. कारण त्याचा मते घटण्याशी संबंध नसल्याचे त्यांच्या निवडणूक अभ्यासकांनाही पक्के ठाऊक आहे. शिवाय बोफ़ोर्समध्ये जितके प्रथमदर्शनी पुरावे समोर आले होते, त्याचा लवलेशही आज राफ़ायलमध्ये नाही. मग त्यावर काहूर माजवून चिखलफ़ेकीची हौस नक्कीच भागवली जाईल. पण हाती धुपाटणे सोडून काहीही येणार नाही.

राजकारणातले व निवडणूकीतले अनेक भ्रम नेहमी राजकीय पक्ष व नेत्यांसाठी प्रभावशाली असतात. तसे नसते तर सगळ्या पुरोगामी पक्षांनी मोदी व त्यांच्या मुस्लिम द्वेषाचे अकारण भांडवल करून आपल्याच पायावर कुर्‍हाड कशाला पाडून घेतली असती? मुस्लिम एकगठ्ठा मते मिळाली मग सहज जिंकता येते, हा तसाच एक भ्रम होता. मुस्लिम व्होटबॅन्क असू शकते, पण त्याचा पडसाद म्हणून हिंदू व्होटबॅन्कही उभी राहू शकणार नाही, असाही एक भ्रम कायम जपला गेलेला आहे. म्हणून तर गेल्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी कुत्तेका पिल्ला, मौलवीची मोदींनी नाकारलेली टोपी, अशा गोष्टींचे नको तितके भांडवल प्रसार माध्यमातून करण्यात आले. त्याचाच विपरीत परिणाम होऊन अधिकाधिक संख्येने हिंदू मतदार मोदींकडे सरकत गेला. असे विषय टाळले असते, तर मोदींना १७ टक्के मतांवरून ३१ टक्के मतांपर्यंत झेप घेणे अजिबात शक्य नव्हते. पण राजकीय भ्रम शहाणपणाला गहाण टाकत असतो आणि खुळेपणाला प्राधान्य द्यायला भाग पाडत असतो. त्यामुळेच राहुल गांधीच नव्हेतर बहुतांश मोदी विरोधक राफ़ायलच्या आहारी गेलेले आहेत. आपल्याला आता राफ़ायलच वाचवू शकेल, याची त्यांना पुरेपुर खात्री आहे. कारण बोफ़ोर्सने राजीवना बुडवल्याचाही भ्रम त्यांनीच जोपासलेला आहे. सहाजिकच जितका राफ़ायलचा डंका पिटला जाईल, तितका पेट्रोल डिझेल दरवाढीचा विषय विरोधकांकडून दुर्लक्षित राहिल. परिणामी विरोधकांना जनतेच्या प्रश्नांची फ़िकीर नाही, तर आपापले राजकीय सूड उगवण्यात ते रमलेले असल्याची लोकभावना निर्माण होईल. कारण राफ़ायलचा डोंगर कितीही पोखरला तरी त्यातून गडबडीचा उंदिरही निघू शकणार नाही, याची मोदींना खात्री आहे. मात्र त्यात विरोधकांची शक्ती व उर्जा अनाठायी खर्च होणार आहे. मग त्यात मोदींनी व्यत्यय कशाला आणावा?

बोफ़ोर्सपेक्षा २जी, कोळसाखाण वा राष्ट्रकुल स्पर्धांचे घोटाळे मनमोहन सरकारला धुळ चारू शकलेले नव्हते. त्यापेक्षाही मागल्या सरकारच्या काळातील अनागोंदी आणि दिवाळखोरी लोकांच्या आयुष्याला भेडसावू लागलेली होती. यांच्यापेक्षा कोणी राक्षसही परवडला, अशी मानसिकता जनतेत फ़ैलावली होती. त्याने खरा बदल घडवला होता. थोडक्यात घोटाळ्यांचा मुखवटा असला तरी असली चेहरा अनागोंदी व गैरकारभाराचा होता. लोकांच्या जीवनात युपीए सरकारने अनिश्चीतता व अस्थीरता आणली होती. त्यात घोटाळ्यांची भर पडली इतकेच. राफ़ायलमध्ये तर त्याही तुलनेत घोटाळा भ्रष्टाचार म्हणावे असे काहीही समोर आलेले नाही. नुसता संशयाचा धुरळा उडवण्याचा खेळ अहोरात्र चालू आहे. अशा अनुभवातूनच मोदी गुजरातमध्ये आरंभीचे राजकारण शिकले. दंगलीचे आरोप, विविध कोर्टनियुक्त तपासपथके, आरोपांचा अखंड भडिमार; असे धडे मोदींनी बारा वर्षे गिरवले आहेत. त्यावर संघटनात्मक शक्ती व थेट लोकसंपर्क, असला उपाय त्यांनी शोधला आहे. सहाजिकच बिनबुडाच्या आरोपांनी ज्याला राजकारणात इतके काही दिलेले आहे, तो तशाच आरोपांच्या सरबत्तीने घाबरेल की सुखावेल? निवडणूक मतदानाची आकडेवारी व राजकीय समिकरणेच बोफ़ोर्समुळे राजीव सत्ता गमावून बसले नसल्याची साक्ष देत असतील, तर राफ़ायलने मोदी भयभीत होण्याचे काहीही कारण उरत नाही. मात्र त्याच आरोपबाजीत विरोधक गुंतवले गेले, तर खर्‍या प्रश्नांना बगल दिली जाऊ शकते आणि त्याची कुठल्याही सत्ताधारी पक्षाला नेहमीच गरज असते. तेच काम विरोधकांनी कर्तव्य भावनेने हाती घेतलेले असेल, तर सत्ताधारी खुश असणार ना? त्या कुठल्या जाहिरातीप्रमाणे मोदी मनोमन म्हणत असतील, ‘पुश करा, खुश रहा’. अमूक केले मग मच्छरांचा त्रास संपला, असे कितीही म्हटले जात असते तरी त्यात तथ्य नसते. पण म्हणतात ना? मन बहलाने के लिये खयाल अच्छा है गालिब.


6 comments:

  1. भाउ भोपाळमधे मोदींनी हेच बोललेपन कुनाच्या लक्षात आल नााही कांगरेसला झोंबायला हवय खर ते म्हनाले "कह दिजीेेेए अपने सलाहकारोंसे जितना किचड उछालोगे उतना कमल खिलेगा" सलाहकार म्हनजे अहमद पटेलांनी जे गुजरातमधे असाच त्रास दिला होता तरी मी जिंकलौ ते नेमके कोण हे करतय ते जाणुन आहेत

    ReplyDelete
  2. भाऊ आपली स्मरणशक्ती अत्यंत चांगली असून तुम्हाला योग्य वेळी योग्य त्या गोष्टी आठवतात आणि त्याचे तर्कसुसंगत विश्लेषण करता येते हाच आपल्यामध्ये आणि इतर अभ्यासकांमध्ये असलेला मूलभूत फरक आहे. बिंदू अनेकांना माहिती असतात परंतु ते योग्य क्रमाने जोडण्याची कला फक्त आपल्या जवळच आहे आणि त्याला आपला दांडगा अनुभव कारणीभूत आहे यात वादच नाही. आपण बिंदू जोडून भविष्य भूतकाळ आणि वर्तमान काळ यांना व्यापून टाकणारे एक अद्भुत चित्र उभे करतात जे अत्यंत सुस्पष्ट असते.

    ReplyDelete
  3. Save करून ठेवावा असा लेख .

    ReplyDelete
  4. रेस २ चित्रपटामधे सैफ अली खान म्हणतो की "मै दांव घोडे पर नही जॉकी पर लगाता हूं. इसीलिये मैने अपने जॉकी को छोडकर बाकी सब जॉकी को खरीद लिया"

    कधीकधी शंका येते की मोदींनी काँग्रेस चे सगळे राजकीय अभ्यासक विकत तर नसतील घेतले?

    ReplyDelete
  5. Superb analysis and presentations

    ReplyDelete
  6. श्री भाऊ तुम्ही सरळ सरळ मोदी विरोधकांना काय करायचं हे शिकवताय

    ReplyDelete