Wednesday, September 12, 2018

गॉड आणि सैतान

kerala nuns protesting के लिए इमेज परिणाम

हुशार माणसे आपल्यासाठी चतुराईने मोठमोठे खड्डे खणून ठेवतात. तसे नसते तर आता चर्च व नन हा विषय इतका भडकला नसता. अशा गोष्टी कुठल्याही संघटित धर्ममार्तंडांकडून होतच असतात. अर्धशतकापुर्वी आचार्य अत्रे यांनी ‘बुवा तिथे बाया’ नावाचे नाटक लिहीले होते आणि ते तुफ़ान चाललेले होते. पुण्यानजिकच्या कुठल्या मठातील हा महाराज अनेक महिलांचे लैंगिक शोषण करीत असे. त्याविरुद्ध ‘मराठा’ दैनिकातून आचार्य अत्रे यांनी झोड उठवली होती. मात्र त्याचे फ़ारसे काही बिघडले नव्हते. योगायोगाने नंतर त्याच गावातील एका रहिवाश्याशी ओळख झाली आणि त्याला मी मुद्दाम विचारले होत्ते, साहेबांनी नाटकात रंगवलेले कथानक किती खरे व वास्तववादी होते? तर त्याने ते कथानक शंभर टक्के योग्य व खरे असल्याचा निर्वाळा दिला. मी चकीतच झालो. कुणीही होईल. मग मी विचारले, त्या बुवाला तुम्ही गावातून हाकलून का लावले नाही? त्याला झोडपून कशाला काढले नाही? तर तो मख्खपणे उत्तरला, ते महाराज होते आणि आपण त्यांना चुकीचे कसे म्हणायचे? ते करतील ते योग्यच असणार ना? एकदा देवाचा अवतार म्हणून तुम्ही कोणाला स्विकारले, किंवा कोणी देवाचा संदेश घेऊन आल्याचे मान्य केले, मग त्याच्याबाबतीत शंका संशय घेण्याला जागा नसते. अर्थात हा अंधश्रद्धेचा भाग मानला जातो, पण बुद्धीवादी जगात तरी पुरावे, सच्चाई, वास्तव यांच्याही कोणाला कर्तव्य असते? एकदा आपण कोणाला भगवंत किंवा प्रेषित मानले, मग त्याचे गुणगान करण्यापलिकडे आपल्या हाती काही रहात नाही. आपली बुद्धी निकामी झाली मग अंधश्रद्धा सुरू होत असते आणि आपण आपल्या मानलेल्या भगवंताचा आहारी जात असतो. कोणी त्याला अल्ला, गॉड, जीझस वा परमेश्वर समजतो, तर कोणी त्याला मार्क्स वा माओ, आईनस्टाईन म्हणून पुजत असतो. बाकी वर्तन आचरणात काडीमात्र फ़रक नसतो.

काही महिन्यांपुर्वी काश्मिरात कठुआ इथे एका बालिकेवर सामुहिक बलात्कार झाला होता. तसाच काहीसा प्रकार नंतर उत्तरप्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात झाला. तेव्हा जे लोक बलात्काराने चवताळून उठले होते, त्यापैकी कोणालाही आज केरळातील ख्रिश्चन धर्मीय साध्वींवरच्या बलात्काराची फ़िकीर नाही. त्याही महिला आहेत आणि जर त्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेला असेल, तर तितक्याच अगत्याने या स्त्रीवादी लोकांनी हिरीरीने पुढे लायला हवे होते. पण झाडून सगळे मूग गिळून गप्प आहेत. कारण स्वाभाविक आहे. कुठलाही बलात्कार, अत्याचार, गुन्हा हा विविध धर्म व राजकीय, जातीपाती यांच्या निकषावर ठरवला जात असतो. जर तो गुन्हा करणारा आपला बुवा असेल, तर त्याविषयी भक्तीभावाने बोलायचे असते. किंवा मौन धारण करायचे असते. तो कोणी मुल्लामौलवी असेल वा ख्रिश्चन धर्मिय फ़ादर धर्मोपदेशक असेल, तर गप्प राहिले मग तुम्ही पुरोगामी होता. कारण त्यामुळे संघ वा हिंदूत्ववादी शक्तींना बळ मिळण्याचा धोका असतो. हे आधुनिक पुरोगामी विज्ञान आहे. कुठल्याही धर्मतत्वाचा आधार इश्वर आणि सैतान असतात. त्यातल्या इश्वराला प्राप्त करण्यासाठी आपण सैतानाचे शत्रू व्हावे लागते. मग इश्वर भले कल्याण कराणारा नसला वा अत्याचार करणारा असला, तरी बेहत्तर. आपल्याकडून सैतानाला मदत होता कामा नये. तसे काही होणार असेल, तर निमूट इश्वराचे अत्याचारही गुणगान करीत सोसायचे असतात. यात इश्वर आणि सैतान बिचारे कुठेही येत नाहीत, किंवा ते असल्याचा कुठला पुरावा अजून विज्ञानानेही दिलेला नाही. पण त्याची कुणाला गरज असते? आपण आहारी गेलेलो असलो, मग सैतानाचे शत्रू म्हणून सर्वकाही सोसायला पर्याय उरत नाही. सामान्य लोकांनी फ़क्त सोसायचे असते आणि इश्वर वा सैतानाच्या दलाल प्रतिनिधींची हुकूमत निमूट मानायची असते.

रामरहिम वा आसाराम बापू यांच्या बाबतीत जितका कल्लोळ झाला होता, त्यापेक्षा केरळातील ख्रिश्चन धर्मोपदेशकांचे उपदव्याप कुठे कमी आहेत? खरेतर धर्माच्या संघटनांनी व संस्थांनी त्यांना वेसण घालायल पुढे यायला हवे होते. पण जे आसाराम वा रामरहिमच्या संस्थांनी केले, त्यापेक्षा चर्चने कही वेगळे केलेले नाही. आसाराम वा रामरहिमच्या हस्तक गुंडांनी तक्रार करणार्‍यांची मुस्कटदाबी केली आणि इथेही तेच चालू आहे. पण त्यावर राजकीय सामाजिक क्षेत्रातील सुधारकांच्या प्रतिक्रिया मात्र एकदम भिन्न आहेत. तीन वर्षापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाव बेटी पढाव’ अशी घोषणा देऊन आपल्या मुलीसोबतचे सेल्फ़ी सोशल मीडियात टाकण्याचे आवाहन केलेले होते. तेव्हा हा माणूस मुलींवर पाळत ठेवणारा आहे, जपून फ़ोटो टाका; असे कम्युनिस्ट पार्टीच्या विदुषी कविता कृष्णन यांनी टवीटरवर जाहिर आवाहन केलेले होते. आज त्यांच्याच पक्षाचे केरळात राज्य आहे आणि एका ख्रिश्चन साध्वीने तक्रार करूनही न्याय मिळताना मारामार होत आहे. याच विदुषीची सहकारी महिला आयोगाची प्रमुख म्हणते, होतात चुका. म्हणून काय प्रत्येकाला फ़ाशी द्यायचे का? कसा न्यायनिवाडा आहे ना? मोदी-शहांवर संशय पसरवणारी एक ध्वनिफ़ित माध्यमे ऐकवत होती. कॉग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेऊन पोलिस तपासाची मागणी केलेली होती. मार्क्सवादी पक्षाच्या वृंदा करात, कविता कृष्णन अशा महिला त्यात आघाडीवर होत्या. पण आज त्यांच्याच पक्ष नेत्यावर पक्षातल्याच महिलेने बलात्कार व लैंगिक शोषणाचा आरोप केला असताना, त्या गप्प आहेत. पोलिस तपासाची गोष्टच सोडून द्या. पक्षांतर्गत चौकशी होईल असे म्हणून पांघरूण घातले जात आहे. कारण अंधश्रद्धा धर्मापुरत्या नसतात. तीही एक विचारधाराच असते. एकाला डावे पुरोगामी असे नाव आहे, तर दुसर्‍याला उजवे प्रतिगामी संबोधले जाते. बाकी आचरण सारखेच असते.

प्रत्येक धर्माचे पंथाचे व विचारसरणीचे मठधीश असतात आणि ते आपल्या भक्तांचे शोषण करीत असतात. एकदा आपण भक्तीला लागलो, मग बुद्धी गहाण ठेवायची असते आणि बुवा म्हणतील त्याची री ओढायची असते. बुवांचे अन्याय अत्याचार हाही प्रसादच असतो. ज्याला तो उमजत नाही, त्याला हद्दपार करायचा असतो. आता देखील या नन आंदोलनात उतरल्या असताना, त्यांच्यावरच चिखलफ़ेक करणारे कोणी बाहेरचे नाहीत. कालपर्यंत त्यांचे आदरणिय असलेले धर्ममार्तंड आहेत. रामरहिम वा आसारामच्या बाबतीत काय वेगळे होते? जेव्हा अध्यात्माचा उद्योग व्यवसाय होतो किंवा संघटना होऊ लागते; तिथेच त्यातला देवाचा अंश संपलेला असतो. किंबहूना तोच नियम कुठल्याही राजकीय, सांस्कृतिक वा सामाजिक कामालाही लागू होतो. कारण संघटना व संस्था जशा विस्तारत जातात, तसा त्यात व्यापार घुसणे अगदी अपरिहार्य असते. त्यातून मग बर्‍यावाईट वृत्ती शिरकाव करून घेत असतात. त्यातून कुठला धर्म, पंथ, संस्था वा संघटना निसटू शकत नाही. सत्ता अधिकार आपल्याच सोबत मस्ती व मुजोरी घेऊन येत असतात. अत्याचार अन्याय ही त्यांचीच संतती असते. आज ख्रिश्चन फ़ादर असेल, उद्या मौलवी किंवा बुवा असतील. राजकीय क्षेत्रात तर हा नेहमीचाच भाग आहे. बिहारमधल्या बालिकांवरील अत्याचार अजून शिळा विषय झालेला नाही. मुद्दा इतकाच, की त्याविषयी तावातावाने बोलणारे आपल्याच घाणीविषयी मात्र मौन धारण करतात. आपल्या घाणीवर पांघरूण घालायचे उद्योग साळसुदपणे करीत असतात. एकूण काय सामान्य माणसाला कुठले तरी तत्वज्ञान वा भक्तीमध्ये गुंतवून शोषण करण्याचे उद्योग हजारो वर्षे निर्वेधपणे चालू आहेत. आज इकडला राक्षस असतो आणि उद्या तिथला सैतान असतो. बाकी देवाच्या अस्तित्वाला सैतान राक्षस आवश्यक असतात ना?

7 comments:

  1. भाउ कठुआ वेळी हेच सांगितल होत की सर्वधर्मामात असे लोक असतात तेखरच होतपन त्यायावेळी हिंदुधर्माला नावे ठेवनारे आतागप्प आहेत त्यांची शांतता त्या्च्या आवाजापेक्षा जास्त ओरडतेय

    ReplyDelete
  2. असे लोक फक्त धर्मात असतात अस नाही तर सगळीकडेच असतात गाॅडफादर. ाावाचा गाजलेला हाॅलीवुडपटात एक सीन आहे की १२-१३ वर्षाच्या मुलीची आई मुलीला चक्क निर्मात्याकडे सोपवते ती मुलगी आतुन ओरडत असते आई हात चोळत उभी असते ती बाहेर आल्यावर काम मिळनार म्हनुन लगेच खुश होुन मुलीला घोुन जाते बाॅलीवुडमधो पन हे होतच पन त्याविषयी इथे कोन बोलत नाही पन फुटकळ नट्या ज्या स्वतादेखील बळी असतात त्या कठुआ वेळी प्लेकार्ड नाटक करतात जावेद अख्तर ने कठुआ वेळी ३८ ट्विट केले होते आता गप आहे मोदी सरकारनुळे यांचा दुटपीपना बाहेर तरी पडतोय नाहीतर हे असच चालुय

    ReplyDelete
  3. कठुआ ुनाव वेळी मिडीया दुसरी काही बातमी नाही अस २४ तास ७ दिवस कवर करत होता आता एकदोन सोडता बाकी गप्प आहे कारन रेप महिला वगेरे यांच पडलेल नाही तर पैसे कोन देतो विचारसरनीला सुट होते की नाही हेच बघतात भारतात बु्दधीजीवी ही फार भयानक जमात झालीय कोनी नादी लागू नये

    ReplyDelete
  4. छान लेख लिहिला आहे ...

    ReplyDelete
  5. साधारण ५ वर्षांपूर्वी कै. जयललिता या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री असताना सदगुरु शंकराचार्य याना त्यांच्या मठातून पोलिसांनी पकडून नेले होते. कारण हेच. पण ना आरोप सिद्ध झाला ना कि कोणी पीडितेने माध्यमांसमोर येऊन मुलाखत दिली होती. तेंव्हा हे सगळे पुरोगामी भामटे ' चेकाळले ' होते. पण हा आत्ताचा पुरोगामी ' माध्यम शांतता / सन्नाटा ' बरेच काही बोलून जातो आहे.

    ReplyDelete
  6. श्री भाऊ फारच खर लिहिता तुम्ही पुरोगाम्यांची पंचाईत होऊन जाते (जर ते तुमचा blog वाचत असरील)

    ReplyDelete
  7. Hya news la kharo kharich coverage (electronic mediat tari)nahi. Aplya lekha mule samajale dhanyawad

    ReplyDelete