Sunday, September 9, 2018

लढण्यापुर्वीच माघार?

diggi kamalnath jyotiraditya के लिए इमेज परिणाम

गेल्या रविवारी ‘द सन्डे गार्डीयन’मध्ये एक बातमी वाचायला मिळाली. दोन महिन्यात तीनचार राज्यांच्या विधानसभा निवडणूका होऊ घातल्या आहेत आणि त्याच संबंधातली ही बातमी आहे. यापैकी तीन विधानसभा भाजपा व कॉग्रेस अशा दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्षांसाठी निर्णायक महत्वाच्या आहेत. तिन्ही राज्ये भाजपाकडे असून तिथली सत्ता टिकवली तर सहा महिन्यांनी येणारी लोकसभा निवडणूक भाजपासाठी आशादायक व सोपी होऊन जाणार आहे. उलट कॉग्रेसला यापैकी राजस्थानात पाच वर्षापुर्वी सत्ता गमावण्याची पाळी आली होती आणि मध्यप्रदेश छत्तीसगड या दोन राज्यात तर कॉग्रेसला लागोपाठ पंधरा वर्षे नामुष्की पत्करावी लागते आहे. सहाजिकच यापैकी एकदोन राज्यात तुटपुंज्या संख्येने जरी कॉग्रेसने सत्ता बळकावली, तरी पुढल्या लोकसभेसाठी विरोधकांना आपल्या नेतृत्वाखाली एकत्र येण्यास कॉग्रेस भाग पाडू शकते. म्हणूनच ही तीन राज्ये दोन्ही पक्षांसाठी अटीतटीची लढाई आहे. भाजपाचे पक्षाध्यक्ष अशा लढाईची वर्षभर आधीपासून जमवाजमव करतात. त्यामुळे भाजपाने काय काय उरकले आहे, ते अजून गुलदस्त्यात आहे. पण तिन्ही राज्यात मुख्यमंत्री जनसंपर्क यात्रा नावाच्या मोहिमेवर आधीच रुजू झालेले आहेत. कॉग्रेसनेही जमवाजमव सुरू केली असली, तरी ती उमेदवारांची निवड व विविध गटातल्या हाणामार्‍या रोखण्याची कसरत आहे. पराभव आणि दिर्घकाळ सत्ता हाती नसतानाही कॉग्रेसमधील नेते कशासाठी आपसात लाथाळ्या करीत असतात, हे कधीच न उलगडणारे रहस्य आहे. पण त्यावर मात करण्याच्या गर्जना सध्याच्या नव्या नेतॄत्वाने सुरू केल्या आहेत. मग ही सुरूवात कोणती आहे? तर मध्यप्रदेशातील २३० पैकी ८० जागचे उमेदवार येत्या आठवड्यात कॉग्रेस जाहिर करणार आहेत. ही आघाडी आहे की पिछाडी आहे, तेच समजत नाही. कारण हे उमेदवार लौकर जाहिर करण्याचे तर्कशास्त्र चकीत करणारे आहे.

गार्डीयनच्या बातमीनुसार या ८० जागांचे उमेदवार लगेच जाहिर केले जातील, त्यायोगे त्यांना आपल्या मतदारसंघात प्रचार करायला अधिक वेळ मिळू शकेल, असे त्या पक्षाच्या एका नेत्याने सांगितले आहे. त्या रणनितीचा खुलासा करताना हा कॉग्रेस नेता म्हणतो, ह्या ८० जागा कॉग्रेससाठी अवघड आहेत आणि तिथली लढत भलतीच कष्टाची आहे. थोडक्यात या अशक्य कोटीतल्या जागा आहेत अशी कबुली या निवेदनातून स्पष्ट होते. आणखी एक बाब लक्षणिय आहे. या ८० जागा अशा आहेत, जिथे एकाहून अधिक तिकीटाचे दावेदार नाहीत. म्हणूनच तिथली उमेदवारी लगेच जाहिर करण्यात कुठली अडचण नाही. पण त्याचाच दुसरा अर्थ असा, की कॉग्रेसपाशी या जागी हिरीरीने लढू शकणारे कोणी उमेदवार नाहीत. जो येईल त्याला लगेच तिकीट देण्याखेरीज कॉग्रेससमोर अन्य पर्याय नाही. विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या लक्षात घेतली तर या ८० जागांचे महत्व लक्षात येऊ शकते. ते समजून घेतले मग रणनिती कुठे फ़सते आहे, त्याचाही उलगडा होऊ शकतो. २३० जागांपैकी ८० जागा म्हणजे एकतृतियांश इतकी संख्या होते. तितक्या जागी कुठल्याही यशाची अपेक्षा कॉग्रेसच्या स्थानिक नेतॄत्वालाच नाही. याचा अर्थ तितक्या जागा त्यांनी भाजपा जिंकणार म्हणून आधीच गृहीत धरलेले आहे. तेवढ्या जागा वगळल्या तर कॉग्रेसला लढण्यासाठी १५० जागा शिल्लक उरतात आणि त्यातून बहूमत म्हण्हे ११६ जागा कॉग्रेसला जिंकणे भाग आहे. थोडक्यात उरलेल्या दिडशेपैकी प्रत्येक जागा जिंकण्यासाठी कंबर कसायला पर्याय नाही. ही रणनिती असेल तर भाजपाला किमान बहूमत मिळणार हे त्यामागचे गृहीत असू शकते. कारण ८० जागा प्रतिस्पर्ध्याने आधीच दिलेल्या असल्या तर भाजपाला बहूमतासाठी उरलेल्या दिडशेपैकी फ़क्त ४० जागा जिंकल्या तरी सत्ता सहज मिळून जाणार आहे. हे कसले समिकरण वा रणनिती आहे?

पंधरा वर्षांनी भाजपाला मध्यप्रदेशातील सत्तेतून हुसकावून लावणार्‍यांची ही भाषा थक्क करणारी नाही काय? लोकमत भाजपा वा शिवराजसिंग चौहान यांच्या विरोधात खवळलेले असेल, तर विरोधातला प्रमुख पक्ष कॉग्रेससाठी सर्वच्या सर्व २३० जागा लढण्यायोग्य होतात आणि त्यातून किमान १७०-१८० जागा जिंकण्याचा मनसुबा असला पाहिजे. अमूकतमूक विरोधाचा बालेकिल्ला म्हणून सोडून देता येत नसतो आणि लोकमत इतके सत्ताधारी पक्षाच्या विरोधात गेलेले असेल, तर विरोधकांच्या गोटात प्रत्येक जागेसाठी पाचसात इच्छुकांची झुंबड उडालेली असायला हवी. तिकीटावरून हाणामार्‍या झाल्या मग कॉग्रेस प्रवक्ते नेहमी आपल्या पक्षाच्या लोकप्रियतेचे प्रतिक म्हणून तिकडे बोट दाखवत असतात. मग आता ही झुंबड नसल्यास लोकमत कोणाच्या बाजूने असल्याचे लक्षण मानायचे? कुठल्याही सत्ताधारी पक्षासाठी जनतेला सामोरे जाण्यासाठी शेवटचे एक वर्ष किंवा काही महिन्यांचा अवधी उपलब्ध असतो. पण विरोधी पक्षाला मात्र पुढल्या निवडणूका जिंकण्यासाठी एकेका जागी बस्तान बसवण्यासाठी पुर्ण पाच वर्षे हाताशी असतात. इथे तर कॉग्रेसला पंधरा वर्षाचा कालावधी मिळालेला आहे आणि त्यात तीन लोकसभा व दोन विधानसभांमध्ये आपल्या त्रुटी व चुकांची पावती मिळालेली होती. मग त्याचा अभ्यास करून सज्ज व्हायला अखेरच्या वर्षात किंवा दोनचार महिन्यात धावाधाव कशाला करावी लागते आहे? त्याचे उत्तर कोणी नेता देत नाही. कारण कुठेही संघटना उरलेली नाही आणि सर्व पातळीवर नुसती तोंडपाटिलकी करणार्‍यांचा भरणा झालेला आहे. मान खाली घालून पक्षाचे काम करणारे व मतदाराला जाऊन भिडणारे लोकच कॉग्रेसपाशी उरलेले नाहीत. त्यामुळे नुसत्या जाहिराती व प्रचारावर पक्षाला विजय व सत्ता मिळवून देण्याच्या वल्गना करण्याला नेतृत्व अशी उपाधी लावली जात असते.

‘आंधी’ चित्रपटात इंदिराजींचे पात्र रंगवलेले आहे. त्या मतदारंघातला एक पक्षाचा बुजुर्ग इरसाल नेता म्हणून पात्र ओमप्रकाश याने रंगवलेले होते. निवडणूका जिंकून ती नायिका सुचित्रा सेन हेलिकॉप्टरमध्ये बसताना कार्यकर्त्यांना निरोप देते, तेव्हा ओमप्रकाशच्या तोंडचे वाक्य कॉग्रेसच्या विजयी परंपरेचे लक्षण होते. ‘आगले चुनावतक जिंदा रहेंगे तो सेवामे हाजीर होंगे.’ हा कॉग्रेसचा कार्यकर्ता होता. त्याला उमेदवारी वा पदाचा सोस नव्हता. आपल्या पक्षाला जिंकून देण्यासाठी निवडणूक काळात राबणे व नेत्याला विजयी करून देणे, असे कर्तव्य मानून सुखी असलेला ओमप्रकाश आता कॉग्रेसमध्ये औषधालाही उरलेला नाही. तो कोणी साधूसंत दाखवलेला नव्हता, तर आपल्या परिसरात दबदबा असलेला आणि स्थानिक राजकारणाची गुंतागुंत जाणून पक्षाची पाळेमुळे होऊन रहाण्यात धन्यता मानणारा वर्ग होता. असे लोक इरसाल व बनेलही होते. पण त्यांच्या खांद्यावर बसूनच दिल्लीतली सत्ता कॉग्रेसने प्रदिर्घकाळ मिळवलेली होती. त्यांच्या क्षेत्रातील त्यांची सुभेदारी मक्तेदारी जपलेली होती आणि बदल्यात त्यांनी दिल्लीश्वरांच्या सिंहासनाला लागणारी कुमक वेळोवेळी पुरवलेली होती. तालुका-जिल्हा व राज्य पातळीवरचे हे स्थानिक नेतृत्व कॉग्रेसश्रेष्ठी नावाच्या कोणीतरी उखडून टाकले आणि कॉग्रेसचा वटवृक्ष बघता बघता उन्मळून कोसळण्याची पाळी आली. अमित शहा किंवा भाजपा आपली पाळेमुळे खोलवर रुजवत वाटचाल करतो आहे आणि त्यात पदाची लालसा वा सत्तेची आकांक्षा असलेल्यांना स्थान नाही. त्यांना सत्तापदे जरूर दिली जातात. पण पक्षसंघटनेत अशा लोकांना चंचूप्रवेशही मिळत नाही. म्हणून प्रत्येक जागा लढवायची होऊन जाते आणि कुठलीही जागा सोडून देण्याचा विषयही चर्चेला येत नाही. उत्तरप्रदेश, त्रिपुरा असो किंवा आपला हक्काचा प्रदेश असलेले गुजरात कर्नाटक असोत, तिथली भाजपाच्या नेतृत्वाची व संघटनेची मेहनत विसरून त्या पक्षाला पराभूत करता येणार नाही.

2 comments:

  1. भाऊ जरा वेगळे!इंधन दरवाढीबाबत तुमचं मत जाणून घेण्याची इच्छा आहे

    ReplyDelete
  2. Andhiche udaharan Sundar. To chitrapat Tarakeshwari Sinha yanchyavar adharit hota. Tyavar Indirajinche chamche ragavle.

    ReplyDelete