Thursday, September 20, 2018

बाजारबुणगे आणि रा. स्व. संघ

opposition unity के लिए इमेज परिणाम


Sunil Tambe
3 August at 23:32 ·
प्लासी ते सांगली

बंगालचा शेवटचा नबाब सिराज उद्दौला मातला होता. नबाबाचं सैन्य ब्रिटीश सैन्याच्या दुप्पट होतं. नबाबाचा वझीर, मीर जाफर ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला फितूर झाला. ५० हजार सैनिकांची फौज घेऊन तो ब्रिटीश सैन्याला येऊन मिळाला. ब्रिटीशांच्या कवायती फौजेपुढे नबाबाच्या सैनिकांची दाणादाण उडाली. भाजपच्या सुसंघटीत, केंद्रानुवर्ती पक्षसंघटनेपुढे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बेशिस्त, स्वार्थलोलूप, संधीसाधू सरदारांची दाणादाण उडते आहे. अनेक मीर जाफर आपआपली कुमक घेऊन भाजपच्या गोटात दाखल झाले.
एकनाथ खडसे यांना आणि त्यांच्या कुटुंबियाना भाजपने भरपूर दिलं पण शक्ती भाजप संघटनेची होती. खडसेंची नव्हती.
आपला तामझाम सांभाळला जाईल याची हमी मिळाल्यावर काँग्रेस व राकाँ चे अनेक सरदार, दरकदार भाजपच्या वळचणीला जातील पण ते शरणार्थी असतात, निर्णय घेणारे वा भाजपला दिशा देणारे नसतात.
सांगलीमध्ये भाजपचा खासदार, आमदार, पंचायत समित्या, नगरपरिषदा होत्या, मराठा आंदोलन चरमसीमेवर असताना भाजपला सांगलीमध्ये यश मिळालं आहे.
कदम, दादा, आबा, जयंतराव अशा गटा-तटात काँग्रेस व राकाँ विभागली गेली होती.
केंद्रीय पक्ष वा संघटनेचं नियंत्रण त्यांच्यावर नाही. त्यांच्या निष्ठा आपआपल्या गटाला आहेत, विचारधारा वा पक्षसंघटनेला नाहीत.
कवायती फौज आणि बाजारबुणगे वा सरदार यांच्या फौजांमध्ये हा फरक असतो.
.....................
विरोधकांची जागा व्यापण्याची शक्ती सोडाच पण उमेदही डाव्या, पुरोगामी राजकीय पक्षांकडे उरलेली नाही. त्यामुळे मतदारांपुढे 2 पर्याय आहेत—बंगालच्या नबाबाच्या फौजेत दाखल होणं किंवा ब्रिटीशांच्या कवायती फौजेला पाठिंबा देणं.
(फ़ेसबुकारून)

RSS के लिए इमेज परिणाम

माझ्या गेल्या आठदहा वर्षातल्या लिखाणातून मी सातत्याने आजच्या पुरोगाम्यांना झोडून काढलेले आहे. त्यांना अनेक शब्दातून ठोकून काढलेले आहे. पण त्याचा अर्थ मी कधी पुरोगामी विचारांची अवहेलना केलेली नाही. किंबहूना मला जे काही पुरोगामीत्व माहिती आहे, किंवा उमेदीच्या काळात ज्येष्ठांकडून पुरोगामी धडे मी गिरवलेले आहेत, त्याविषयी माझ्या मनात कुठल्याही शंका नाहीत. पण आजकालचे पुरोगामी वर्तन व युक्तीवादाची किळस येण्यापर्यंत घसरण झालेली आहे. पुरोगामी विचार आपल्या जागी आहेत आणि त्यांचे लेबल लावून चक्क प्रतिगामीत्व लोकांच्या समोर पेश केले जात असते. अशा पुरोगामी झुंडी वा दिवाळखोरांना कितीही नावे ठेवली, तरी मी कधीही त्यांना ‘बाजारबुणगे’ हा शब्द वापरला नव्हता. सुनीलने अतिशय सहजगत्या त्या शब्दाचा उपयोग केला आहे. किंबहूना मलाही ते़च सांगायचे असेल. पण तो शब्द वापरण्याची हिंमत झाली नसेल. कारण मी बघितलेले खरेखुरे जुने पुरोगामी विचारवंत, राजकीय नेते, कार्यकर्ते कधीच बाजारबुणगे नव्हते. ते अतिशय मेहनती व विवेकी होते. आपल्या बुद्धीने चालणारे प्रामाणिक लोक होते. आज पुरोगामी म्हणून भुरटेगिरी करणार्‍यांमध्ये त्याचा लवलेश आढळून येत नाही. म्हणूनच सुनील तांबेने योजलेला शब्द नेमका आहे. बाजारबुणगे म्हणजे पुर्वीच्या लढाया युद्धामध्ये प्रत्यक्ष न लढणारे वा कसोटीच्या प्रसंगी बोजा बनून व्यत्यय आणणार्‍या खोगीरभरतीसाठी हा शब्द वापरला जात असे. अशा प्रत्यक्ष युद्धासाठी निरूपयोगी असलेल्या परंतु युद्धप्रयासाला बोजा बनणार्‍यांमुळे मोठमोठ्या फ़ौजाही पराभूत झाल्या आहेत. आज पुरोगामी लढाईची पिछेहाट नेमकी तिथेच झालेली आहे. किंबहूना मोदी-शहांच्या शिस्तबद्ध राजकीय कार्यकर्ता फ़ौजेसमोर पुरोगामी बाजारबुणग्यांची मोठी संख्या व सेना टिकाव धरू शकलेली नाही, अ्साच सुनीलच्या पोस्टचा आशय आहे.

साडेचार वर्षापुर्वी नरेंद्र मोदी व भाजपाने इतके मोठे राजकीय यश का मिळवले आणि नंतरच्याही राजकीय संघर्षात पुरोगामी म्हणवणार्‍यांचा पदोपदी पराभव कशामुळे होत गेला, त्याचे सुनील इतक्या मोजक्या व नेमक्या शब्दातले विश्लेषण मलाही आजवर करता आलेले नाही. सुनीलने ते नेमके केलेले आहे. पण ज्यांच्यासाठी त्याने ते विश्लेषण केले, त्यांना त्यातला आशय किती समजला, त्याची शंका आहे. कारण सुनीलचे चहाते व अनुयायी बहुतांश पुरोगामी व कडवे आहेत. त्यांनी माझ्या अनेक पोस्ट वा प्रतिक्रिया वाचून उफ़राटी वक्तव्ये केलेली आहेत. पण माझ्यापेक्षा त्यांच्या नाकर्तेपणाला सुनीलने नावे ठेवली, तिथे मात्र यापैकी प्रत्येकाने ‘लाईक’चे चिन्ह टाकून, त्याच पोस्टला म्हणजे बाजारबुणगे या अपशब्दाला डोक्यावर घेतलेले होते. याचा एक अर्थ असा होतो, की त्यापैकी कोणाला मुळची पोस्ट वा मजकूर समजून घ्यावा असे वाटले नाही, की त्याचा अर्थही लागलेला नसावा. सुनील हा समाजवादी पुरोगामी असल्याने त्याने काहीही लिहीले तरी ते पुरोगामी. पुरोगामीत्वासाठी उपयुक्त असल्याचे डोळे झाकून मान्य केल्याने, आपण मोठे पुरोगामी कर्तव्य बजावल्याची धारणा त्यांच्यामध्ये असावी. अन्यथा त्यातले मोदी-शहांचे कौतुक त्यांना आवडण्याचे काहीही कारण नाही. तशीच त्यातली पुरोगाम्यांची शेलक्या भाषेत केलेली अवहेलना त्यांना सोसण्यापलिकडला विषय आहे. पण तशी कुठली उफ़राटी प्रतिक्रीया सुनीलच्या पोस्टवर दिसली नाही. यातून आजच्या पुरोगामीत्वाची पातळी लक्षात येऊ शकते. मोदींच्या यशाचे कौतुक केल्यावर झटपट त्यावर भक्ती़चा शिक्का मारण्यासाठी उतावळ्या झालेल्या याच लोकांना, सुनीलने केलेले कौतुक कशाला टोचले नाही? तर त्यातला आशय विषय समजून घेण्याच्या विवेकबुद्धीला त्यांनी चाट दिलेली आहे. ती देऊ शकेल, तोच आज पुरोगामी म्हणून प्रमाणित होऊ शकतो, ही त्या वर्गाची शोकांतिका आहे.

सुनीलची ती पोस्ट मी दोनतीनदा वाचून काढली, शेअर पण केली. गेल्या पाच वर्षातल्या राजकारणात मोदी-शहा ही जोडगोळी वा संघप्रणित भाजपा कशाला इतका यशस्वी होतोय, त्याचा मोजक्या शब्दात उलगडा होऊन गेला. यात भाजपाची जमेची बाजू आणि पुरोगामी म्हणून सतत कंठशोष करणार्‍या विरोधकांची दुबळी बाजू; सहज लक्षात येऊन गेली. किंबहूना त्याच्याही पुढे जाऊन येत्या लोकसभा वा अन्य निवडणूकीत पुन्हा पुरोगामीत्वाचे पाखंड या लोकांना कशाला वाचवू शकणार नाही, त्याचाही खुलासा होऊन गेला. ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीचे मोजके, पण कवायती सैन्य आणि सिराज उद दौलाची बाजारबुणग्यांची विस्कळीत बेशिस्त फ़ौज, यांच्यातली ही लढाई आहे. शिस्त असलेले कार्यकर्ते व त्यांची कायमस्वरूपी उभी असलेली खडी फ़ौज, कुठल्याही चौपट पाचपट मोठ्या संख्येच्या जमावाला पांगवू शकत असते. कुठल्याही शहरात वा भागात दंगल माजते, तेव्हा तिथे जमावाच्या तुलनेत किरकोळ असलेली सेना वा पोलिसांच्या तुकड्या लौकरच शांतता प्रस्थापित करतात. कारण ती लढाई प्रत्यक्षात दोन जमावांमध्येच असते आणि त्यातला एक जमाव शिस्तबद्ध संघटना असते. तर दुसरा जमाव संख्येने मोठा असला, तरी प्रत्यक्षात ती नुसती गर्दी असते. त्यात एकमेकांविषयी आस्था नसते, की कुठले समान उद्दीष्ट घेऊन तो जमाव एकत्र आलेला नसतो. कुठल्या तरी क्षणिक कारणाने त्यांना उद्दीपित केलेले असते आणि त्याची उत्स्फ़ुर्त प्रतिक्रीया म्हणून ती विस्काळीत लोकसंख्या जमावात रुपांतरीत झालेली असते. लढणे वा प्रतिकार संघर्ष वगैरे असे कुठलेही प्रशिक्षण त्या जमावला मिळालेले नसते. शिस्तीची फ़ौज त्यात कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी पुर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेली असते. ब्रिटीशांची फ़ौज आणि नबाब सिराज उद दौलाच्या सैन्यामध्ये हा नेमका फ़रक होता आणि त्याचीच पुनरावृत्ती आज भारतीय राजकारणात होत आहे.

9 comments:

  1. एक वेगळा पन अतिशय विचारप्रवर्तक लेख

    ReplyDelete
  2. लोकमत हा पुर्न कांगरेसी पेपर आहे त्यानी आज संपादकीयमधे कांगरेसला कस घरानेशाही मुळ ग्रहन लाागल आहे तियामुळ राहुलला कशी अडचन होतेयहे लिहिलय पन त्यांना स्वता राहुलपन त्याचेच प्रतीक आहे ते मानवत नाही कुना तालुका पातळीची घरानेशाहूमुळ काॅंगरेसमधे नाकरर्ते लोक येता तयाचा त्रास होतेय पन राहुल काही न करता अध्यक्ष झाला तर महान पंरपंरेचा पाइक वाटतो विरोधाभास किती एकाच अग्रलेखात

    ReplyDelete
  3. भाऊ काँग्रेस पक्षाची संघटना पूर्णपणे संपली आहे.राजदीप सरदेसाई शेखर गुप्ता कुमार केतकर प्रसन्न जोशी अशी माध्यमातील मंडळी सध्या काँग्रेसची बाजू जनतेत मांडत आहेत परंतु सोशल मीडिया मुळे या लोकांच्या खोट्या प्रचाराचा आता काहीही उपयोग काँग्रेसला होत नाही उत्तर प्रदेश तामिळनाडू पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये हा पक्ष आता औषधाला पण शिल्लक नाही काँग्रेस आणि त्यांचे पुरोगामी समर्थक 2004 सारखा काही चमत्कार होइल आणि परत सत्ता मिळेल अशा खोट्या आशेवर सध्या आशाळभूत होऊन वाट पहात बसले आहेत आणि मूर्खासारखी संघाला शिव्यागाळी करून संघासारखी कार्यकार्त्यांची संघटना अलगदपणे भाजपच्या मागे उभी करत आहेत त्यामुळे मोदींनी उगाच नाही काँग्रेस मुक्त भारताची घोषणा केली आहे राहूल गांधींचे पुरोगामी सल्लागार यामध्ये मोदी आणि शहा यांना पूर्ण मदत करत आहेत

    ReplyDelete
  4. दिल्ली येथील विज्ञान भवनात संघाचे सरसंघचालक मा. मोहनजी भागवत यांची दोन दिवस संघाची माहिती देणारी व्याख्यानमाला आणि तिसऱ्या दिवशी प्रश्नोत्तरे असा कार्यक्रम झाला या प्रश्नोत्तरांमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न विचारला गेला nota विषयी संघाची भूमिका काय आहे त्यावर श्री मोहनजी भागवत यांनी स्पष्टपणे सांगितले की notala संघाचा विरोध राहील आता ज्या संघटनेकडे समाजाशी संपर्क असलेले काही कोटी स्वयंसेवक आहेत त्या संघटनेचे प्रमुख notala विरोध करतात याचा अर्थतरी या पुरोगामी बिनडोक लोकांना कळतो का? संघ द्वेषाची भांग प्यायलेले काँग्रेस आणि कम्युनिस्ट माध्यमातून गांधीहत्या,स्वातंत्र्य लढा असे अजून सत्तर ऐशी वर्षांपूर्वीच्या इतिहासात रमलेले आहेत आणि सरसंघचालक आजच्या आव्हानांबद्दल बोलत आहेत संघप्रमुखांची इच्छा ही स्वयंसेवकांसाठी आज्ञा असते 2013 मध्ये दसरा उत्सवात संघ प्रमुखांनी शत प्रतिशत मतदानाची अपेक्षा व्यक्त केली आणि सगळी यंत्रणा मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी कामाला लागली आणि पुढचा चमत्कार सगळ्यांना दिसला ज्यांना आपण शत्रू मानले आहे त्यांची बलस्थाने माहिती करून घ्यायची असतात एवढी देखील अक्कल या पुरोगामी मूर्खांना नाही 2004 मध्ये जसा भाजपला पराभव अपेक्षित नव्हता तसा काँग्रेसला देखील विजय अपेक्षित नव्हता 1999 ते 2004 या काळात भाजपचे अध्यक्ष नामधारी होते आणि पक्षावर खरी पकड लालकृष्ण अडवाणी यांचीच होती आणि अडवाणी सरकारमध्ये उपपंतप्रधान देखील होते आता मात्र पक्ष संघटनेचे 24 तास काम करणारा अमित शहा यांच्या सारखा शक्तिशाली अध्यक्ष भाजपकडे आहे त्यामुळे 2004 ची पुनरावृत्ती करणे काँगेसला शक्य नाही या कोठल्याही गोष्टींचा विचार न करता मोदी आणि संघाला शिव्या घालत बसणे हीच यांची रणनीती असेल तर काँग्रेस मुक्त भारत हा दिवस दूर नाही

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर.मूळ लेखाला समर्पक जोड.

      Delete
    2. शत:प्रतिशत खरे

      Delete
  5. Accurate analysis of khan-gress condition.thanks,Bhau Kaka.

    ReplyDelete
  6. Accurate analysis of khan-gress condition.thanks,Bhau Kaka.

    ReplyDelete
  7. मला एक प्रतिक्रिया वाचायला मिळाली ती लिंक देत आहे.
    https://www.facebook.com/156601587757685/posts/2205965069487983/

    ReplyDelete