Friday, September 7, 2018

जाने कहॉ गये वो दिन?

Image result for R K STUDIO

बाहेर गावाहून मुंबईला येणार्‍या बहुतांश एस्टी बसेस पनवेल वाशी मार्गाने येतात आणि दिर्घकाळ मुंबईतील त्यांचा पहिला स्टॉप चेंबूरचा राहिला आहे. आता त्याला चेंबूर म्हणतात. पण १९७० च्या जमान्यात जेव्हा या दूरपल्ल्याच्या बसेस सुरू झाल्या, तेव्हा कंडक्टर प्रवाश्यांना चेंबूर आले असे कधीच म्हणायचा नाही. तो ओरडायचा आरके स्टुडिओ! म्हणजे राज कपूरचा स्टुडिओ. आजही चुकलामाकला कंडक्टर तेच शब्द उच्चारतो. मागल्या पाऊण शतकात चेंबुरची तीच ओळख राहिलेली आहे. अजूनही दोनतीन दशके त्या भागाला त्याच नावाने ओळखले जाईल. पण हळुहळू त्याची ओळख पुसली जाईल. ज्या भूमीने व तिथल्या वास्तुने स्वातंत्र्योत्तर काळात नव्या भारताला स्वप्न दाखवणारे शेकडो चित्रपट निर्माण केले; त्यालाच आरके स्टुडिओ म्हणून ओळखले गेले. मुळात राजकपूर हेच एक स्वप्न होते. गरीबीत जगणार्‍या व शेकडो समस्यांशी झुंजत जीवनात आनंद निर्माण करायला धडपडणार्‍या करोडो भारतीय तरूणांना त्याने स्वप्न बघायला शिकवले. अभिनयातून, कथेतून, गाण्यातून, प्रणयातून त्याने आधुनिक भारतीय तरूण पिढीला एकविसाव्या शतकाच्या दारात आणूस सोडण्याची मोठी कामगिरी बजावली. त्या राजकपूरची ही कर्मभूमी. कालपरवा बातमी वाचली, तोच आरके स्टुडिओ आता विकायला काढलेला आहे. राजकपूरच्या मुलांना तो अधिक काळ चालवणे व्यवहार्य राहिले नाही असे वाटत असल्याने, त्यांनी योग्य किंमत आल्यास तो विकून टाकण्याचा विचार चालविला आहे. पित्याने दोन पिढ्यांना दाखवलेले स्वप्न त्याच्याच मुलांसाठी आता फ़क्त एक विकावू मालमत्ता उरली आहे. कारण गेल्या वर्षी लागलेल्या भयंकर आगीमध्ये तो स्टुडीओ जळून भस्मसात झाला होता. आता त्याचे भग्नावशेष म्हणण्यापेक्षाही राखरांगोळी तितकीच तिथे शिल्लक उरली आहे. पन्नाशी सत्तरीतल्या भारतीय पिढीचे स्वप्न राखरांगोळी म्हणून विकले जाणार आहे.

sushama uzbek woman के लिए इमेज परिणाम

कालपरवाची गोष्ट आहे. भारताच्या विद्यमान परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज उझबेकिस्तान या देशाच्या दौर्‍यावर गेलेल्या होत्या आणि तिथे एका महिलेशी त्यांची भेट झाली. त्या पन्नाशीतल्या सामान्य उझबेकी महिलेने सुषमाजींना भारतीय म्हणून ओळखले आणि एक हिंदी चित्रपट गीत म्हणायला सुरूवात केली. राजकपूरच्या ‘श्री ४२०’ या चित्रपटातले ते गीत होते. ‘इचक दाना बिचक दाना’. १९५० च्या दशकातील हा चित्रपट आणि तेव्हाचे राजकपूरचे चित्रपट फ़क्त भारतीयांनाच वेड लावून गेले नव्हते. भाषेत मोठा फ़रक असूनही मध्य आशिया व रशिया अरबी प्रदेशात राजकपूरचे चित्रपट लोकप्रिय झालेले होते. त्याच्या चित्रपटातल्या गीतांनी भाषामर्यादा ओलांडून जगात धमाल उडवलेली होती. अनेक देशात त्याच्या गाण्यांचे गायन स्थानिक गायकांनी चालविलेले होते आणि ते लोकप्रियही असायचे. असा राजकपूर १९८८ सालात इहलोक सोडून गेला. तेव्हा आरके स्टुडीओ हे एक स्वप्न होते. अमिताभ बच्चन, अनुपम खेर किंवा अनिल कपूर यांनी आपल्या अनेक मुलाखतीतून आरके स्टुडीओ म्हणजे कसे अजब स्वप्न होते, त्याच्या कहाण्या सांगितलेल्या आहेत. तो स्टुडीओ जर अशा एकाहून एक दिग्गज कलावंत सुपरस्टारसाठी स्वप्न असेल, तर तिथे चित्रण झालेले पडद्यावर बघणार्‍यांसाठी ते किती मयसभा वाटणारे स्वप्न असेल, याची कल्पना केलेली बरी. अशा वास्तु जरूर कुणाच्या तरी खाजगी मालकीच्या असतात आणि त्यांचे कौटुंबिक वारसही असतात. पण वारस आणि वारसा यांच्यात काही फ़रक असतोच. राजकपूरच्या तिन्ही मुलांनी रुपेरी पडद्यवर येऊन पित्याचा वारसा चालवण्याचा प्रयत्न केला, त्यातला ॠषिकपूर यशस्वी स्टार झाला. बाकी दोघांना फ़ारसे यश मिळाले नाही. पण त्यापैकी एकालाही पित्याची चित्रपट निर्मिती पुढे नेता आली नाही, की स्टुडीओ चालवता आला नाही. सहाजिकच वारसा टिकला नाही पण वारसा हक्क शिरजोर ठरला आहे.

राजकपूरचे पिताजी पृथ्वीराज कपूर रंगमंच कलाकार होते आणि त्यांनीही चित्रपटात कामे केली. अनेक भूमिका गाजल्या. तोच वारसा घेऊन पडद्यावर येणार्‍या राजने आपल्या बळावर चित्रपट निर्मिती केली आणि अभिनयाच्या क्षेत्रातही नाव कमावले. त्यातून त्याने हा स्टुडीओ उभारला. मिळालेला पैसा पैसा त्यात ओतून अत्यंत दर्जेदार स्टुडीओ त्याने उभारला होता. तिथे त्याचेच नव्हेतर इतर निर्माते दिग्दर्शकांचेही चित्रपट निर्माण झाले. आपल्या अनेक चित्रपटांत वापरलेल्या अनेक वस्तु, वेशभूषा वा नायिकांचे ड्रेस राजकपूरने जपून ठेवलेले होते. तिथे एकप्रकारचे म्युझियमही होते. आवारा चित्रपटातील नर्गिस व राजकपूर यांच्या प्रणयी दृष्याचे प्रतिक त्याने आपल्या स्टुडीओचे मानचिन्ह करून टाकलेले होते. राजकपूर नुसता अभिनेता दिग्दर्शक निर्माता नव्हता. त्याला संगीताची उत्तम जाण होती आणि चित्रणानंतर त्याचे तुकडे जोडून संकलन करण्याचेही कौशल्य त्याने आत्मसात केलेले होते. तो स्वत:च एक स्टुडीओ किंवा संस्था होता म्हणायला हरकत नाही. शोमन म्हणजे प्रेक्षकाला गुंगवून सोडणारा कलाकार, ही त्याची खरी ओळख होती. म्हणूनच आरके स्टुडीओ हे त्याचे खरे स्मारक होते. त्याचेच कशाला त्याच्या समकालीन चित्रपट रसिक, प्रेक्षक व त्या पिढीच्या उमेदीचे ते प्रतिक होते. कदाचित त्याच्या मुलांना त्यातला आत्मा ओळखता आला नाही. म्हणून असेल राजकपूर गेल्यावर तो स्टुडीओ नुसता उद्योग धंदा होऊन बसला आणि बदलत्या काळात टिकून रहाणारी व्यवस्था व सज्जता उभारली गेली नाही. तिथेच आरके स्टुडिओचा अंतकाळ जवळ आलेला होता, गेल्या वर्षी त्याचे भस्मसात होणे केवळ उपचार असावा. की मालमत्तेत गुंतलेला बाजारभावानुसारचा पैसा हवा म्हणून तो स्टुडीओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडू दिला गेला असेल? कोणी सांगावे? कारण तसा आगीत वा अन्य कारणांनी मरण पावलेला तो एकमेव स्टुडीओ नाही.

१९६९ सालात बेळगावच्या प्रश्नावरून शिवसेनेने मुंबई पेटवली होती. त्यात परळच्या एमडी कॉलेज लगतचा कारदार स्टुडीओ असाच भस्मसात होऊन गेला. आरके लगत पुर्वी भगवानदादांचा आशा स्टुडीओ होता. अजूनही लोकांना वेड लावणारा ‘अलबेला’ चित्रपट काढून कर्जबाजारी झालेल्या पालवांना तो विकावा लागला. नायगाव दादरच्या फ़ाळके रोडवर रुपतारा व रणजित स्टुडीओ होते. त्यांची अवस्था आज काय आहे देवजाणे. पश्चीम उपनगरात बॉम्बे स्टुडीओ, फ़िल्मीस्तान प्रकाश असे अनेक स्टुडीओ होते. आता त्यांची काय अवस्था आहे? बांद्रा पश्चीमेला समुद्रापासून जवळच महबुब स्टुडीओ होता. स्वातंत्र्योत्तर भारताची दुरावस्था व त्यातून उभारी घेणारा भारत, यांचे जळजळित चित्रण करून किर्ती मिळवणारा ‘मदर इंडिया’ त्याच स्टुडीओत महबुब खान त्यांनी निर्माण केलेला होता. हा आधुनिक भारताचा इतिहासच आहे. पण त्याच्या खाणाखुणा नष्ट होत चालल्या आहेत. गुलामीतून मुक्त झालेल्या नवजात देशाला व तिथल्या जनतेला नवी उभारीची शिकवण देणारे मनोरंजक पण शिकवण देणारे चित्रपट याच स्टुडीओत जन्माला आलेले होते. ‘जिस देशमे गंगा बहती है’ हा राजकपूरचा चित्रपट किंवा मदर इंडिया हा महबुब खानचा चित्रपट, अन्याय विरुद्ध न्यायाच्या लढाई व सच्चाईच्या संघर्षाचीच कहाणी सांगणारे होते. म्हणूनच त्यांना विसाव्या शतकाच्या उत्तरार्धाचा इतिहास मानावे लागते. त्यातला एक अध्याय आरके स्टुडीओ आहे. पण तोही पुसला जाऊ घातला आहे. राजकपूरच्याच जिस देशमेच्या भूमिकेत एका गाजलेल्या गीतामधली ओळ आहे. ‘कविराज कहे, न ये ताज रहे, न ये राज रहे, न ये राजघराना.’ पित्याच्या तोंडचे मुकेशने गायलेले व शैलेंद्राने लिहीलेले हे शब्द, राजच्या मुलांनीच खुप मनावर घेतलेले दिसतात. अन्यथा त्यांनी कुठल्याही प्रयत्नाशिवायच पिता व घराण्याचे नाव पुसून टाकण्याचा पवित्रा कशाला घेतला असता?

राजकपूरने या स्टुडीओसाठी किती कष्ट उपसले. त्यानेच नव्हेतर तेव्हा त्याची लाडकी नायिका व त्याची प्रेयसी मानली जाणारी नर्गिस, यांनी आपले स्वप्न म्हणून मिळकतीतला कितीतरी पैसा या वास्तुच्या उभारणीत खर्च केला. त्यांच्यावर अपार प्रेम करणारे चहाते व प्रेक्षक रसिकांनीही त्यांच्या अभिनय व चित्रपटांना दाद देऊन त्याला हातभारच लावलेला होता ना? मग ही वास्तु एका कुटुंबाची मालमत्ता कशी होऊ शकते? भले तिची मालकी त्या कुटुंबाकडे असेल. पण वारसा त्या चहाते आणि प्रेक्षकांकडेच असतो. त्याची मालकी जोपासना व जपणूकीसाठी असते. ती जबाबदारी असते. त्या दोघांवर चित्रित केलेले एक मुंबईच्या पावसातले चित्रगीत आहे. ‘प्यार हुवा इकरार हुवा’. त्यात पुढे दोघे एकसुरात म्हणतात, ‘हम न रहेंगे, तुम न रहोगे, फ़िरबी रहेगी निशानीया’. त्यात समोरच्या फ़ुटपाथवर तीन लहान मुले रेनकोट घालून खेळत असतात. ती राजकपूरचीच मुले होती. ती आजही हयात आहेत. पण त्यांना त्या गीतातून पित्याने सांगितलेला संदेश बहुधा लक्षात आलेला नसावा. मग त्यांनी स्टुडिओ विकायला काढला तर नवल कुठले? कदाचित राजकपूर त्यांचा जन्मदाता पिता असेल. पण त्याचवेळी तो लाखो करोडो भारतीयांच्या स्वप्नांचा सुद्धा जनक होता आणि तो स्टुडीओ अशा स्वप्नांची जन्मभूमी होता. ती मुंबईची एक महत्वाची ओळख होती व आहे. पण राजकपूरचीच मुले ती ओळख पुसून टाकायला निघालेली आहेत. इब्न खालदून नावाचा इतिहासकार म्हणतो, कुठल्याही साम्राज्याची स्थापना करणार्‍याच्या तिसर्‍या पिढीकडून ते साम्राज्य बुडवले जाते. कारण त्या पिढीला संस्थापकाचे कष्ट व पराक्रमाची प्रतिष्ठा व अभिमान उरलेला नसतो. करीना कपूर, करिष्मा कपूर वा रणवीर कपूर या तिसर्‍या पिढीला पृथ्वीराज आणि तैमूर यात्ला फ़रक उमजणार नसेल, तर आरके स्टुडीओची महत्ता कुठून कळावी? मग राजकपूरच्या अखेरच्या महत्वाकांक्षी चित्रपट ‘मेरा नाम जोकर’मधले बोल आठवतात. त्याने असे भविष्य बघितलेले होते का तेव्हाच?

जाने कहॉ गये वो दिन

9 comments:

  1. वाचून वेदना होतात, पण काय करणार!

    ReplyDelete
  2. << आवारा चित्रपटातील नर्गिस व राजकपूर यांच्या प्रणयी दृष्याचे प्रतिक त्याने आपल्या स्टुडीओचे मानचिन्ह करून टाकलेले होते.>> Not awara but Barasat, & not only studio, but also R.K.films.

    ReplyDelete
  3. जे श्री भगवंतांचे असते तेवढेच चिरकाल टिकणारे असते. बाकी मायेतले शिलालेख ही काळाच्या ओघात नष्ट होतात. हा तर फक्त स्डिटुओ होता. कित्येक सम्राट आले आणि गेले. काहींना लोक लवकर विसरले काहींना उशिरा.

    ReplyDelete
  4. करीना आणि ताईमुर चे उदाहरण अत्यंत चपखल भाऊ

    ReplyDelete
  5. राजकपूर लहान असताना वडिलांच्या बरोबर जयप्रभामधे गेला होता भालजींनी त्पाच्याकडून एक लहानशी भूमिका करून घेतली. परतताना त्याचा मोबदलाही पृृृथ्विराजना त्यांच्या इच्छेविरुध्द दिला खाऊ म्हणून.वडलांनी पण ते पैसे ठेव म्हणून ठेवले आणि मोठा झाल्यावर राजला दिले
    या पैशांत त्पाला स्टुडिओसाठी जमीन घेता आली.
    ही हकीगत मी कोणत्या पुस्तकांत वाचली आहे ते मात्र आठवत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. Hi hakigat Bhaljinche aatmcharitra 'Sadhi Manas' madhe aleli aahe. Bhaljini 5000/- rupye tyakali dile aani tyach paishat rajajini r.k. cha shriganesha kela.

      Delete
  6. स्टुडिओ विकण्याचा निर्णय त्यांच्या व्यक्तिगत निर्णय आहे.

    ReplyDelete
  7. भाऊराव,

    एका अर्थी झालं ते बरं झालं ! भालजी पृथ्वीराजांचे जानी दोस्त. पृथ्वीराजांच्या मनात राजला चित्रपटात काम करू द्यायचं नव्हतं. केवळ भालजींच्या आग्रहामुळेच तो या क्षेत्रात आला. भालजींसारख्या कट्टर देशभक्ताच्या सहवासात राज कपूर वाढला. आणि आज त्याची नात करीना कपूर आपल्या मुलासाठी निरपराध्यांच्या रक्ताच्या नद्या वाहवणाऱ्या तैमूरचं नाव ठेवते. भालजी, पृथ्वीराज, खुद्द राज यांना काय वाटलं असतं ?

    स्टुडियो विकल्यावर भालजींशी असलेला अखेरचा धागा तुटणार आहे. एका अर्थी झालं ते बरं झालं, नाहीका ?

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete