Thursday, September 6, 2018

कृष्णाष्टमीतले वस्त्रहरण



मुळातच दहीहंडी किंवा गरबा वगैरे समारंभांचे आयोजन करणे हे राजकारण्यांचे काम नाही. लगेच त्याच्या विरोधात इफ़्तार पार्ट्यांचे आयोजन योग्य काय, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचेही उत्तर तेच आहे. इफ़्तार किंवा अन्य कुठल्याही धार्मिक समारंभाचे आयोजन राजकीय नेत्यांनी पक्षांनी करायचे काही प्रयोजन नाही. अर्थात त्यांना वाटत असेल तर अशा समारंभात पाहुणे म्हणून त्यांनी भाग घ्यायला कोणी आक्षेप घेणार नाही. पण त्यांनी पुढाकार घेऊन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या फ़ंदात पडू नये. पण अलिकडल्या काळात धर्माच्या नावाने कायम शिमगा करणारेच वेगवेगळे मार्ग काढून धार्मिक समारंभाचे खर्च उचलण्यापासून त्याचे प्रायोजक होण्यापर्यंत उचापती करीत असतात. मग त्यांच्यावर राम कदम होण्याची पाळी येत असते. कारण तिथे जमलेली गर्दी बघून त्यांचा तोल सुटत जातो आणि आपल्या जबाबदार्‍यांचे भान रहात नाही. कर्तव्याची जाण उरत नाही. तसे नसते तर देखण्या अभिनेत्री बोलावून आपणही नाचण्यापर्यंत आमदार राम कदम यांची मजल गेली नसती. पुढे वैफ़ल्यग्रस्त प्रियकरांना नाकारणारी मुलगी पळवून नेण्यास मदत करण्याचे ‘आश्वासन’ देण्यापर्यंत घसरण झाली नसती. आता राम कदम यांनी कितीही सारवासारव केली, म्हणून त्यात तथ्य नाही. हौदसे गयी वो बुंदसे नही आती अशी हिंदीतली उक्ती आहे. त्यामुळे आपण तिथे बोलत असताना अनेक पत्रकार उपस्थित होते आणि कोणी आक्षेप घेतला नव्हता, असे बोलण्यात अर्थ नाही. आपले वाक्य संदर्भ तोडून दिशाभूल होते, असेही सांगण्यात तथ्य नाही. कारण कुठल्याही संदर्भाने त्या वाक्याचा अर्थ बदलत नाही. प्रामुख्याने कदम ज्या पक्षाचे प्रवक्ते आहेत, त्या पक्षाला त्याची गंभीर दखल घ्यावीच लागणार आहे. कारण या उथळ नेत्याने आपल्याच पंतप्रधानाला तोंडघशी पाडलेले आहे.

तीन वर्षापुर्वी लालकिल्ला येथून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाव बेटी पढाव’ अशी घोषणा दिलेली होती. अर्थात त्यात नवे काहीच नव्हते. यापुर्वीही अनेक नेत्यांनी स्त्री भृणहत्येच्या विषयावर आवाज उठवलेला आहे. पण नरेंद्र मोदी यांनी त्याच्याही पुढे जाऊन एक विधान केलेले होते. मुलींनी घराबाहेर पडत असताना संभाळून रहा. उशिरा बाहेर राहू नका. समाजात मिसळताना जपून रहा. लोकांशी वागताना सभ्यतेच्या मर्यादा राखा; असले सल्ले दिले जातात. पण घरातली हीच वडीलधारी मंडळी आपल्या मुलांना कधी कुठले सभ्यतेचे संस्कार व सल्ले कशाला देत नाहीत? मुलींच्या बाबतीत होणारे गुन्हे मुलींच्या मोकळेपणाने वागण्यापेक्षा मुलांच्या गैरवर्तनातून व बेताल वागण्यातून होत असतात. सहाजिकच आपल्या मुलांना अधिक शहाणे व सभ्य वागण्याचे सल्ले घरातूनच दिले पाहिजेत, असा उपदेश पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यातून केलेला होता. तेव्हाही राम कदम भाजपाचे आमदार होते आणि आजही आहेत. सध्या तर ते मुंबई भाजपाचे प्रवक्ता आहेत. सहाजिकच पक्षाच्या भूमिका व नेत्यांच्या धोरणाला अधिक सुटसुटीत करून सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. असे असताना दहीहंडीच्या कार्यक्रमात त्यांनी उधळलेली मुक्ताफ़ळे, त्यांच्यापेक्षा पक्षासह नेतृत्वाची लक्तरे काढणारी आहेत. कारण जगात राम कदम यांची ओळख व्यक्ती म्हणून नाही, तर एका पक्षाचे जबाबदार नेता व प्रवक्ता अशी आहे. ती दहीहंडी त्यांनी व्यक्तीगत घरचे कार्य म्हणून उभारलेली नव्हती, तर पक्षाच्या प्रचार प्रसारार्थ योजलेला कार्यक्रम होता. सहाजिकच तिथे जे काही होत असेल वा बोलले गेले असेल, त्याची परस्पर जबाबदारी भाजपवरच येत असते. त्यामुळेच इतर कोणापेक्षाही भाजपाच्या नेतृत्वाने परवा जे काही घडले, त्याची सर्वाधिक गंभीरपणे दखल घेतली पाहिजे व कारवाई केली पाहिजे. राजाभाऊ क्षमायाचना, दिलगिरीने मनात रुजलेली मलीनवृत्ती साफ़ होते काय?

जमलेल्या गर्दीला हसवण्यासाठी गंमतीशीर बोलणे अपरिहार्य असते, खुसखुशीत बोलणेही स्वाभाविक आहे. पण त्याचे संदेश लोकांपर्यंत काय जातात व त्यातून सामान्य बुद्धीचे लोक काय स्विकारतात, याला महत्व असते. ज्याला त्याचे भान असते त्याला नेता म्हणतात. वयात येणार्‍या मुलामुलींना विरुद्ध लिंगी आकर्षण असणे नवे नाही आणि त्या किशोरवयात कुणाच्याही प्रेमात पडण्याला पर्याय नसतो. पण प्रेमात पडणे म्हणजे आवडलेल्या मुली मुलावर सक्ती करणे, असा अजिबात होत नाही. तर दुसर्‍याची सहमती व स्विकार याला प्रेम म्हणत असतात. नुसते आवडणे ही एकतर्फ़ी गोष्ट असते आणि समोरच्याचा अव्हेर किशोरवयात दुखणारी जखम असते. तर अशा दुखावलेल्या प्रियकराला समजावणे व खर्‍याखुर्‍या प्रेमाची शिकवण देण्याला महत्व आहे. ती समज हरवत गेल्यामुळे देशाच्या कानाकोपर्‍यात एकतर्फ़ी प्रेमातून तरूण मुलींवर होणार्‍या प्राणघातक हल्ले व लंगिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेदिवस वाढत गेलेले आहे. त्यालाच पायबंद घालण्यासाठी पंतप्रधानांनी देशाला उद्देशून भाषण करताना वयात येणार्‍या तरूण मुलांना समजावण्याचा आग्रह पालकांकडे धरलेला होता. पण त्यांच्याच पक्षाचा नेता मात्र त्याच्या विपरीत काही मुलांना शिकवतो आहे. तर ती नुसती पक्षाच्या धोरणाची विटंबना नसून पक्षशिस्त पायदळी तुडवण्याचा प्रकार आहे. म्हणूनच अशा विधानासाठी राम कदम यांच्यावर तात्काळ पक्षानेच कारवाई करायला हवी होती. दुर्दैवाने ते घडले नाही म्हणूनच राम कदम नंतर सारवासारवी करणारा खुलासा करू शकलेले आहेत, चुक मान्य करून माफ़ी मागण्याचे सौजन्य त्यांनी दाखवलेले नाही. म्हणूनच त्यांच्यावर पक्षाने कठोर कारवाईचा बडगाच उगारला पाहिजे. कारण हा नुसता महिला विषय नाही, तर पक्षाच्या सर्वोच्च नेत्याच्या विचार भूमिकांचीच पायमल्ली आहे.

अर्थात असे विषय जेव्हा राजकीय आखाड्यात आपल्या सोयीनुसार वापरले जातात, तेव्हा त्याचा अधिकच चुथडा होत असतो. मध्यंतरी कोग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांच्या अनैतिक संबंधांविषयी एक चित्रण चव्हाट्यावर आलेले होते. मग कॉग्रेसने त्यांना काही काळ प्रवक्ता म्हणून माध्यमांपासून दुर ठेवलेले होते. तर कुठल्या तरी प्रकरणात बलात्कार्‍यांना कठोर फ़ाशीची शिक्षा देण्याचा विषय निघाला, तेव्हा ज्येष्ठ समाजवादी नेते मुलायमसिंग यांनी बच्चोसे गलती हो जाती है, असे म्हणून बलात्कारही किरकोळ गुन्हा ठरवलेला होता. सगळ्या क्षेत्रात व पक्ष संघटनात महिलांविषयी किती उच्च सोवळ्या भावना असतात, त्याचे वारंवार दाखले मिळत असतात. मग सापडलेल्या चोराला सगळा जमाव मिळून चोपून काढत असतो. त्यातून आपल्या स्त्रीदाक्षिण्याची साक्ष देत असतो. पुढल्या प्रसंगात पक्ष वा संघटना तितकी बदलते आणि बाकीचा हिडीस प्रकार तसाच्या तसा कायम असतो. कारण पंतप्रधानांनी जी भूमिका मांडली आहे, तिचा को्णीच गंभीरपणे विचार करायला तयार नसतो. मध्यंतरी बेटी बचाव या आपल्या धोरणाचा प्रसार करण्यासाठी मोदींनी मुली सोबतची सेल्फ़ी प्रसारीत करण्याचे आवाहन केले. तर थोर स्त्रीमुक्तीवादी पुरोगामी विदुषी कविता कृष्णन यांनी पंतप्रधानालाच मुलींचा पाठलाग करणारा ठरवण्यापर्यंत हीन पातळी गाठली होती. ती विदुषी व राम कदम यांच्यात कितीसा फ़रक असतो? आज तुटून पडलेल्या कितीजणांनी तेव्हा कविता कृष्णन यांचा तितक्याच पोटतिडकीने निषेध केलेला होता? कुठल्याही हिडीस बिभत्स घटनेमध्ये आपापल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्याला आजकाल राजकीय शिष्टाचार मानले जात असेल, तर यापेक्षा वेगळ्या वाटेने समाजाचा प्रवास होणू शकणर नाही. जसा समाज तसेच राजकीय प्रतिबिंब असते. त्या्चा निषेध करण्यापेक्षा त्या प्रवृत्तीला आपल्या आसपास स्थान असणार नाही, याची काळजी कोणी घेणार आहे काय?

सोशल मीडियापासून कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी वावरणार्‍या महिला मुलींविषयी व्यक्त होणारी मते वा प्रतिक्रीया कशा ‘सभ्य’ असतात? आपल्या आवडत्या विचार भूमिकांविषयी विरुद्ध लिहीणार्‍या बोलणार्‍या महिलांची कशी गणती होत असते? तिथून हा प्रकार सोकावत जात असतो. इतक्या सहजपणे शिवीगाळ चालते, की राम कदम सुसह्य वाटावा. आताही सोशल मीडियात राम कदम यांना शिव्याशाप देताना त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांविषयी व्यक्त झालेल्या अनेक प्रतिक्रीया तितक्याच निषेध करण्यायोग्य आहेत. अगदी राम कदम यांची जीभ घसरली असे अनेक बातम्यात म्हटलेले आहे. म्हणजे जीभ घसरली नसती आणि ते शब्द त्यांनी उच्चारले नसते, म्हणून ते महिलांचा सन्मान करतात असेच गृहीत आहे ना? मनातले ओठावर यायला वेळ लागत नाही, तशी परिस्थिती असली मग पुरते. मुद्दा अशा धारणा भावना मनात असता कामा नयेत. स्त्रियांना उपभोग्य वस्तु वा मजेचे साहित्य समजण्याची मानसिकता, अशी बेसावध क्षणी मनातून शब्द रुपाने बाहेर पडत असते. कदमच म्हणतात, प्रत्यक्ष प्रसंगी कोणी निषेध केला नाही. ही बाब सर्वात भयंकर आहे. कारण तिथे मुली महिलाही होत्या आणि स्वत:ला सभ्य म्हणवणारेही शेकडो लोक होते. पण कोणी निषेधाला पुढे सरसावला नाही. माध्यमातून त्यावर तीव्र प्रतिक्रीया उमटली आणि मगच निषेधाचा महापूर आलेला आहे, असेच कुठल्याही सामुहिक बलात्कार वा अपहरणानंतर घडत नसते का? तेव्हा बघ्ये असलेलेही नंतर तावातावाने निषेधाचा सूर आळवू लागतात. पण प्रत्यक्ष घटनाप्रसंगी सगळे चिडीचूप असतात. बलात्कार होऊ दिला जातो, विनयभंग-छेड काढली जाऊ शकते. मग प्रत्येकातला श्रीकृष्ण जागा होऊन द्रौपदीला वस्त्रे पुरवण्याचे उद्योग सुरू होतात. घटनास्थळी हस्तक्षेप कोणी करायचा? राम कदमना तिथेच रोखणारा कोणी नव्हता. पण फ़िदीफ़िदी हसणारे व टाळ्या पिटणारे हजारो होते ना? त्याची कुणाला शरम वाटली आहे का? काय दुर्दैव आहे बघा. द्रौपदीला वस्त्रहरणाच्या क्षणी वस्त्रे पुरवणार्‍या श्रीकृष्णाच्या जन्माष्टमी सोहळ्यातच हे वस्त्रहरण होऊन गेले आहे.

9 comments:

  1. धरणात पाणी नाही म्हणून मुतू का म्हणणारे, शेतकऱ्यांना साले म्हणणारे, यच्चयावत स्त्रियांना आपल्या भगिनी म्हणत त्यांना पळवण्याच्या वार्ता करणारे हे सर्व माजोरडे ज्या विष-वृक्षाची फळे आहेत त्या विष-वृक्षाला पाणी घालून मोठे करणारे लोक हे त्या माजोरड्यांच्या पापामध्ये समान भागीदार आहेत. हेच ते लोक आहेत जे या माजोरड्यांच्या सभांना गर्दी करतात, त्यांचा जयजयकार करतात, त्यांचे तळवे चाटतात, त्यांनी आयोजित केलेल्या धार्मिक उन्मादोत्सवांमध्ये बेभान होऊन नाचतात.हे माजोरडे आणि त्यांचे निर्लज्ज समर्थक हेच भारतीय लोकशाहीचे सर्वात मोठे कलंक आहेत.

    ReplyDelete
  2. भाऊ,अगदी बरोबर बोललात.या कदमांसारखे लोक पंतप्रधान श्री. मोदी,मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना अशा वक्तव्याने अडचणीत आणतात.कठोर कारवाई आवश्यकच आहे.

    ReplyDelete
  3. बुंदसे गयी वो हौदसे नही आती अशी म्हण आहे

    ReplyDelete
  4. "श्रीकृष्णाच्या जन्माष्टमी सोहळ्यातच वस्त्रहरण" किती मोजून-मापून लिहीलेत हो? नेत्यांचे भान सुटते (अशा नेत्यानां भान असतेच कधी?) त्यामुळे पक्षाची बदनामी होत असते. अन्य पक्षांचे नेते कांही बरळले असतील तरीही कदमांची चूक (अपराधच)क्षम्य नाहीच.

    ReplyDelete
  5. भारतात गावगुंडांना नेतेपद मिळते हे देशाचे दुर्भाग्य आहे. आपण फुकट आपल्या संस्कृतीच्या आणि परंपरेच्या बढाया मारतो. साधे गुंडांना आणि गुन्हेगारांना निवडणूक लढवायला बंदी घालू शकलो नाही. सर्व राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी.

    ReplyDelete
  6. बूँद से गयी है वो हौदसे नही आती. असा बदल करावा भाऊ

    ReplyDelete
  7. हिंदीमधील मूळ उक्ती उलटी असली तरी या प्रकरणात 'हौद से गयी वो बूँद से नहीं आती' असेच म्हणावे लागेल.

    ReplyDelete
  8. जो पकडला गेला तोच चोर असतो बाकी सगळे साधुसंत

    ReplyDelete
  9. असल्या असभ्य लोकाना पक्षात घेऊन भाजप पक्षवाढ करीत आहे, याबाबत आपण परखडपणे लिहले असते तर लिखाण नि:पक्ष झाले असते. लेखाचा उत्तरार्ध कदमाच्या वक्तव्यावर सारवासारवी करणारा आहे

    ReplyDelete