लोकसभेत ५४३ निवडून आलेले खासदार आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेले २८८ आमदार आहेत. त्यातला प्रत्येकजण देशाला वा महाराष्ट्राला ठाऊकच असतो असे नाही. अनेकजण तर मंत्री होतात आणि तरीही त्यांची साधी ओळखही त्यांच्या मतदारसंघाच्या बाहेर नसते. गणपतराव देशमुख तर १९६० च्या दशकातले आमदार आहेत. पण मुंबईतल्या अनेकांना त्यांचे नावही माहिती नसेल. पण आजही गणपतराव विधनसभेत बोलायला उभे राहिले, तर त्यात व्यत्यय आणायची कोणाची बिशाद नसते. त्यांच्या मतदारसंघ आणि जिल्ह्यात शेंबड्या पोरालाही हा दिग्गज ठाऊक असतो आणि तांबड्या बसने प्रवास करीत असूनही सतत निवडून येत असतो. त्यासाठी त्याला कधी दहीहंडी लावून गर्दी जमवावी लागलेली नाही, की लोकप्रिय चेहरे आणून आपली जाहिरात करावी लागलेली नाही. अशा व्यक्तीचा सहवास आपल्याला विधानसभेत सलग नऊ वर्षे लाभला आहे, याचे ज्याला साधे भान नसावे, त्या दिवाळखोराला जग आमदार राम कदम म्हणून ओळखते. खेड्यातल्या जटील समस्येसाठी वंचितांचे प्रश्न कायदेशीर लोकशाही मार्गाने संघर्ष करून सोडवत सलग तीन पिढ्या आपला प्रभाव निर्माण करण्य़ाला आजही किंमत आहे. त्यांच्यापासून काही शिकावे इतकीही ज्यांना समज नाही, ते मुंबईसारख्या सुखवस्तु सुशिक्षित शहरातून आमदार होऊ शकतात. ही त्यांच्यापेक्षा मुंबईकरांसाठी शरमेची गोष्ट आहे. ही सांगड इतक्यासाठी घातली, की आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आलेल्या राम कदम यांचे विधानसभा सदस्यत्व शपथविधी होण्यापुर्वीच रद्द करणार्या हंगामी सभापतीचे नावही गणपतराव देशमुख होते. महाराष्ट्र विधानसभेची ही दोन टोके आहेत. एका बाजूला आपला एक एक शब्द मोजून मापून तोंड उघडणारा तपस्वी आणि दुसरीकडे जीभ टाळ्याला लावणारा उथळ पाण्याचा खळखळाट!
राम कदम तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेद्वार म्हणून विधानसभेत पोहोचलेले होते आणि त्यांच्या पक्षाध्यक्षांनी मराठी राज्य असल्याने तिथे निवडून आलेल्या प्रत्येक आमदाराने मराठीतूनच आपल्या पदाची शपथ घ्यावी, म्हणून सर्व नवनिर्वाचितांना पत्र लिहीले होते. त्यातून खुप मोठा वाद उफ़ाळला होता. आपल्या अध्यक्षांच्या हुकूमाची तामिली करण्यात तेव्हा राम कदम यांनी पुढाकार घेतला होता. पण तितकेच हट्टी समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी हिंदीतून शपथ घेण्याच अट्टाहास केलेला होता. तर त्यांना आक्षेप घेत मनसेचे आमदार पुढे सरसावले होते. त्यापैकी एकाने आझमी यांच्या समोरचा माईक हिसकावून घेतला होता, तर आणखी एकाने आझमी यांची गचांडी पकडली होती. मग त्यांच्याशी हुज्जत करणारे राम कदम एक ‘‘पाऊल’ पुढे जाऊन त्यांनी आझमीच्या कानशिलात आवाज काढला होता. सहाजिकच विधानसभेच्या शिष्टाचाराचा भंग झाला आणि त्या ठराविक आमदारांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला गेला. शपथ घेण्यापुर्वीच त्यांचे सदस्यत्व चार वर्षासाठी स्थगीत करण्यात आलेले होते. तेव्हा विधानसभेचे कामकाजही नित्यनेमाने सुरू झालेले नव्हते आणि हंगामी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख काम बघत होते. तो प्रस्ताव कुठल्याही विरोधाशिवाय संमत झाला आणि राम कदम व इतर दिर्घकाळ निवडून आल्यावरही विधानसभेच्या बाहेरच राहिलेले होते. पुढे ती कारवाई मागे घेतली गेली. पण त्या कृतीतून अवघ्या महाराष्ट्राला राम कदम यांची ओळख झाली. ती कृती शिष्टसंमत नसली तरी लोकांना खुप आवडून गेलेली होती. कारण नेहमी आगावूपणे बोलणार्या आझमी यांना थोबाडून काढावे, अशी इच्छा लाखो लोकांच्या मनात कायम असायची. ती राम कदम यांचा त्या कृतीने पुर्ण झालेली होती. त्या प्रसिद्धीने हा माणुस पुढल्या काळात खुपच बहकत गेला.
अनेकांना उपजत प्रतिभा लाभलेली असते आणि काहीजणांना प्रयत्नपुर्वक मेहनतीने प्रतिभा आत्मसात करावी लागत असते. त्यात कुठलाही शॉर्टकट नसतो. कदम यांना त्याचे भान नंतरच्या काळात राखता आले नाही. मिळालेली प्रसिद्धी डोक्यात जाऊन त्यांनी आजवर अनेक उचापती केलेल्या आहेत. त्यावर किरकोळ टिप्पणी होऊन ते विषय मागे पडले. पण सतत प्रसिद्धीच्या व माध्यमांच्या झोतात राहिल्याने त्यांनाही फ़ुशारल्यासारखे झाले. फ़ुशारणेही एकवेळ सुसह्य असते. पण शेफ़ारले मग वहावत जायला पर्याय उरत नाही. देशातले अनेक नेते, प्रवक्ते आणि पत्रकारांसह बुद्धीमंतही आजकाल तसेच वहावत गेलेले आहेत. अशा लोकांची एक मोठी अडचण असते. त्यांना मर्यादा राखता जपता येत नाहीत. टाळ्या वा प्रोत्साहनाच्या आहारी जाऊन केव्हा ते भरकटतात, त्याचा पत्ता लागण्यापर्यंत नुकसान होऊन गेलेले असते. एकदा चुक झाली तर ती मान्य करण्यातून निसटण्याचा मार्ग तरी सापडतो. पण जेव्हा ती चुक प्रतिष्ठेचा विषय केला जातो, तिथे आपण बाजूला रहातो आणि आपला अहंकार निर्णय घेऊ लागतो. राम कदम त्याच सापळ्यात आता फ़सले आहेत. एका अतिशयोक्तीच्या भरात त्यांनी नाचणार्या पोरांच्या टाळ्या मिळवण्यासाठी अतिशय चुकीचे विधान करून टाकले. जणु त्यांच्या अंगात ‘डर’ चित्रपटातला शाहरुख खान शिरला होता आणि म्हणाला, ‘तू हा कर या ना कर’. आपण नुसते दहीहंडी उभारून नाचणारे कोणी हौशी नसून ‘बेटी बचाव बेटी पढाव’ मोहिम हाती घेतलेल्या पंतप्रधानाच्या पक्षाचे आमदार आहोत, याचेही भान कदमना राहिले नाही. म्हणून मग मुलीचा नकार असेल तरी तिला पळवून आणायला वैफ़ल्यग्रस्त प्रियकराला मदत करण्याची भाषा त्यांच्या तोंडून निघालेली आहे. ती सह्जासहजी निघत नसते. तर त्यातला पुरूषी अहंकार व माज प्रकट होत असतो. अर्थात कदम यांच्यापेक्षा अन्य नेते वा पक्षातले साळसूद लोक वेगळे असतात असे समजायचे कारण नाही.
उगाच दुटप्पीपणा करण्यात अर्थ नाही. सगळ्या पक्षात असे लोक आहेत. बोलत नाहीत वा कुजबुजतात, म्हणून ते पवित्र असतात. मध्यंतरी कॉग्रेसचे प्रवक्ते व प्रसिद्ध वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सन्नी लिओन हिच्याविषयी ट्वीट करून वापरलेली भाषा किती सौजन्यपुर्ण होती? पाश्चात्यांनी फ़ेकून दिलेला कचरा आपण डोक्यावरून मिरवित आहोत काय? असा सवाल सिंघवी यांनी विचारलेला होताच ना? प्रत्येक पक्षातले लैंगिक शोषण हा झाकलेला मामला असतो. सिंघवी चुकले तेहा भाजपावाले त्यांच्यावर तुटून पडलेले होते आणि आज कॉग्रेसवाले राम कदमांवर! पण दोन्ही प्रसंगी त्यांच्या पक्षातले पावित्र्याचे पुतळे मौन धारण करून बसतातच. अगदी आज राम कदमांना जाब विचारण्यात हिरीरीने पुढे आलेल्या माध्यमांच्या क्षेत्रातील महिलांचे शोषण काही लहानसहान विषय नाही. बुद्धीजिवी वर्गातही हा दुटप्पीपणा मुरलेला आहे. तरूण तेजपाल, पचौरी प्रकरणे काय कमी आहेत? उठताबसता ‘शेम’ वाटणार्या व तसे फ़लक झळकवणार्या चित्रपटसृष्टीतल्या मुलींचे कास्टींग काऊच लपून राहिले आहेत काय? फ़रक इतकाच असतो, की एका क्षेत्रातला कोणी सापडला मग उर्वरीत व्यवसायातले साधूसंत बनून त्याला शिक्षा देण्यासाठी आक्रोश सुरू करत असतात. अर्थात त्यामुळे राम कदम यांची मुक्ताफ़ळे योग्य ठरत नाहीत. त्यांनी माफ़ी मागितल्याशिवाय वाहिन्यांवर चर्चेत बोलावणार नाही किंवा त्यांच्यासह चर्चेत सहभागी होणार नसल्याच्या गर्जना चांगल्याच आहेत. पण तितका शिष्टाचार माजी न्यायमुर्ती कोळसे पाटील यांच्याही बाबतीत दाखवायला कसली अडच्ण येत असते? चर्चेत सहभागी असलेल्यांना कुत्रा संबोधले, त्याविषयी कानावर हात ठेवणार्यांनी राम कदमचा कान पकडणे, कुठल्या सभ्यतेचा निकष व मोजपट्टी असते? आपण सगळे सारखेच ढोंगी असतो हे मान्य करायची हिंमत नसलेला समाज, यापेक्षा आणखी कुठले सोंग आणू शकतो?
खूप छान भाऊ !!!
ReplyDeleteclymax तर फार जोरदार
चांगले थोबडावलंत माध्यम आणि तथाकथित ढोंगी विचारवंताना
केवळ धार्मिकतेच्या नावाखाली केलेला समूहउन्माद अशा स्वरुपात आज धार्मिक उत्सवांचे स्वरुप दिसते आहे. समूह उन्मादात सारासार विवेक व विचार नष्ट झालेला असतो.समूह उन्माद हा नेहमी गुन्हेगारीला निमंत्रण देतो. कदमांचा ताबा उन्मादामुळे गेला होता.
ReplyDeleteekdam chan vishleshan bhau. kontyahi pakshacha aso chukla to chuklach. kadmani mafi magayala pahije
ReplyDeleteअसल्या छपरी लोकांमुळेच भाजप पडणार
ReplyDeleteपक्षांतरबंदी कायदा अधिक कडक करून जोपर्यंत त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत या राम कादमासारखे "आयाराम" पैदा होतच राहणार आणि यांची पिलावळ वाढतच जाणार.
ReplyDeleteहिंदू धर्मातील सर्व सणांचे या असल्या उन्माद्खोरांमुळे चारित्र्य-हनन झाले आहे.
धर्माची, नितीमत्तेची, संकृतीची, सात्विकतेची दिवसेंदिवस होणारी धूळधाण जर रोखावयाची असेल तर असल्या उन्मत्तांना ठेचलेच पाहिजे.
अत्यंत योग्य विश्लेषण. कोणीतरी कान पकडणारा हवाच. आपले जुने संदर्भ आपला लेख वाचल्यानंतर आठवतात.
ReplyDeleteसत्तेचा माज आणि खुर्चीचा उन्माद माणुसकीची थट्टा करतो आहे हे मान्यच टरीत नाही. भाऊ आपण नेहमीच आपल्या लेखनातून अशांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालत असता.
ReplyDelete